शांताबाईंच पुस्तक म्हणून सहजच दुकानात दिसलं आणि घेतलं हे पुस्तक. आज चवथ्या किंवा पाचव्यांदा वाचतेय. नावावरून कळलं असेलच कि यात व्यक्तिचित्र वाचायला मिळतील. शांताबाईंच्या कविता मला खूप आवडतात. पण त्यांचं गद्य लेखन मी फारसं वाचलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक दिसल्यावर मी लगेच घेतलं. आणि अगदी डोळे मिटून विश्वास ठेवावा आणि तो सार्थ ठरावा असं या पुस्तकाबाबत झालं. सहज सध्या सोप्या भाषेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींबाबत यात लिहिले आहे. कुठे बोजड शब्दांचा वापर नाही, कुठे अतिरेकी कौतुक केले नाही. आवडलेल्या गोष्टी जश्या सांगितल्या आहेत तशाच खटकलेल्या गोष्टी देखील लिहिलेल्या आहेत.
सुरवातीला प्रस्तावनेत त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे कि ' वडीलधारी माणसे ' मधील सगळ्याच व्यक्ती या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या म्हणून वडीलधारी हा शब्द वापरलेला नाही. शांताबाईंच्याच शब्दात सांगायचं तर "वडीलधारी माणसे म्हणताना वयाच्या वडिलकीबरोबर गुण, कर्तृत्व, कला, संपन्नता यांची वडिलकीही मला अभिप्रेत आहे. म्हणूनच केशवराव कोठावळे, मंगेशकर भावंडे हि वयाने माझ्यापेक्षा लहान असली तरी मला आदरणीयच आहेत." त्यांचे बालपण, कॉलेज चे दिवस, लेखनक्षेत्रातले उमेदवारीचे दिवस, मुबईतील बेकारीचे दिवस, गीतलेखनात टाकलेली पहिली पावले अश्या अनेक प्रसंगी यातल्या व्यक्तींनी त्यांना उत्तम साथ दिली, आधार दिला. म्हणूनच शांताबाई त्यांच्याविषयी कृतज्ञ आहेत. मग यात त्याच्या स्वतःच्या आई पासून मंगेशकर भावंडे, आचार्य अत्रे, कॉलेज मधील प्राध्यापक अश्या सगळ्या व्यक्ती येतात.
पुस्तकात पहिलच व्यक्तिचित्रण येत ते त्यांच्या आईच. त्यांना वहिनी म्हणत. आईविषयी लिहिताना शांताबाईंच्या सूर थोडा हळवा होतो. उत्तम स्थितीत दिवस काढलेली आई, वडिलांच्या निधनानंतर दिर जाऊच्या आश्रयाने दिवस काढते, मुलांना वाढवते याचे मोजके चित्रण त्यांनी दाखवले आहे. शालेय शिक्षण कमी असले तरी वाचनाची आवड असलेली आई आणि तिच्यासाठी मासिके, पुस्तके आणून देणारे बाबा त्यांना लख्ख आठवतात. आईमुळं वाचनाची गोडी निर्माण झाल्याचं त्या काबुल करतात. निसर्गसौंदर्याची डोळस जाण मला वहिनीने दिली असे त्या म्हणतात. हे सांगतात त्या अनेक दाखले देतात. जसे कि बैलगाडीने प्रवास करताना रानातल्या फुलांचे झुपके काढून बैलगाडी सजवणे, रानफुलांचे विविध रंग आणि वास,काजूच्या मोहराचा मादक वास, वेलींच्या भेंडोळ्यांमधील नजाकत हे सगल वहिनीच देणं असं म्हणतात.अनेक जुन्या कविता वहिनीला पाठ आहेत याच त्यांना आश्चर्य वाटत. मुलं सगळी छान स्थिरस्थावर झाल्यावर आई आता सुखात आहे याच शांताबाईंना समाधान वाटत. मुलं, सुना नीट वागतात, तिचा सल्ला घेतात, तिला मान देतात यातच तिच्या कष्टाचं चीज झालं असं त्यांना वाटत.
दुसरे व्यक्तिचित्रण आहे शांताबाईंची कॉलेज मधील प्राध्यापक गुरुवर्य माटे. शिक्षक म्हणजे दरारा, करारी व्यक्तिमत्व अशी काही समजूत असण्याच्या वेळी माटे सर म्हणजे प्रत्यक्ष प्रतिभासंपन्न माणूस समोर उभा असे. शिकवताना हळूच मिश्किल बोलणे तरीही कुणाला बोचणारी नाही याची दक्षता घेणं हे त्यांचे वैशिट्य. भरपूर वाचन असलेले माटे शिकवताना अत्यंत चपखल परंतु साध्याश्या उपमा देत जेणेकरून विषय सहज सोपा होऊन समजेल. भाषेची विशिष्ट जाण, रुची माट्यांना होती असं शांताबाई म्हणतात. संतवाडःमयाची गोडी माटे सरांमुळे लागली हे बाई इथे कबूल करतात. एरवी कठोर वाटणारा हा शिक्षक कविता त्यातही स्त्रियांवरील कविता शिकवताना हळवा होतो याच विशेष वाटे. त्यासाठी बाईंनी लेखात काही उदाहरणे दिली आहेत. एक संत जनाबाई तर दुसरे सीता . प्रभू रामचंद्राने सीतामाईचा ती गर्भवती असताना त्याग केला त्याबद्दल मोरोपंतांची आर्या शिकवताना माटे सर भावुक होतात असं त्या म्हणतात. विचारवंतांचा आणि कलावंताचा रस्ता अहंकार माट्यांच्या ठायी पुरेपूर असल्याचं सांगायलाही त्या विसरत नाहीत. ते स्वतः लेखक होते. त्यामुळे शिकवताना विषय समजावून सांगण्याची त्यांची हातोटी जबरदस्त होती. पैशाच्या अडचणीत असलेल्या बाईंना माटे नेहमी निस्वार्थीपणे मदत करत.
नंतर त्यांनी लिहिलंय जोग सरांविषयी. जोग सर फर्ग्युसन कॉलेजला शिकवायला तर शांताबाई एस पी कॉलेजला शिकायला. जोग सरांची पुस्तके अभ्यासाला होती आणि तिथूनच त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा वाटतं होता. पण जेव्हा प्रत्यक्षात भेट झाली तेव्हा भीती वाटण्यासारखं त्यांच्यात काहीच नाही असं त्यांना जाणवत. अनेकदा अडलेल्या शब्दांशी त्या जोगांजवळ चर्चा करत, त्याचा अर्थ समजावून घेत, क्वचित नाही पटला तर वादही घालत. पण जोग सर शांतपणे सगळं ऐकून घेत. आधी बाईंना बोलून देत आणि मग त्यांची समजूत काढत. अशावेळी बाईंना कधी ओशाळवाणे होई. नवकाव्याबद्दल जोगांना आक्षेप होता. क्वचित तो बरोबर असेल तरी कायम त्याबद्दल दुराग्रह ठेवणे बाईंना पटत नसे. आधुनिक मराठी कवितेचे प्रेम जोगांनी आपल्याला लावले हे त्या प्रामाणिकपणे मांडतात. काहीकाही ठिकाणी शांताबाई इतकं छान लिहितात. जोगांविषयी लिहिताना त्या म्हणतात ,"जोगांचा अनाग्रहीपणा मनाला विशेष जाणवे. आणि इतर आपल्याविषयी काय म्हणतात याविषयी उदासपणा. बेफिकीरपणा नव्हे. बेफिकीरपणा मध्ये अहंकाराची, आत्मतृप्तीची झाक असते. जोग उदासीन होते. " उदासीन आणि बेफिकीर या दोन शब्दांमधला नेमका फरक बाई बरोबर दाखवून देतात. शेवट करताना जोगांकडे असेलेला संयम किती महत्वाचा आहे आणि अंगी बाणवणे किती कठीण हे मान्य करतात.
नंतर येत ते साहेबांचं व्यक्तिचित्रण अर्थात आचार्य अत्रे. बाई त्यांना साहेब म्हणत. साहेबांच्या नवयुग मध्ये बाई कामाला लागल्या. त्यांच्या दृष्टीने त्या काही करू शकतील असं तिथे काम नव्हतं. पण बाईंना मुंबई सोडून द्यायची नाही याचा चंग बांधलेल्या साहेबानी त्यांना काही ना काही काम देऊन नवयुग मध्ये अडकवून ठेवले. अगदी बाईंच्या राहण्याची व्यवस्था स्वतःच्या घरात करून, खाण्यापासून सगळी काळजी साहेबानी घेतली. बऱ्याचवेळा साहेबांची लेखनिक म्हणून बाईंचं काम चाले. साहेबांकडून खूप काही शिकायला मिळालं असं त्या म्हणतात.एकदा सुरु झालं कि कुठेही ना अडखळता साहेब एकापुढे एक वाक्य सांगत जात . जणू त्यांना दृष्टीसमोर ते दिसे आणि ते फक्त वाचून दखवत आहेत . बाईंच्या लिखाणातील अलंकारिक,कृत्रिम शैली मोडून काढण्यात साहेबांचा मोठा वाटा आहे. साधे, सरळ, सुबोध लिहिण्याची सवय त्यांनी लावली असं बाई म्हणतात.कितीतरी संदर्भ साहेबांना मुखोद्गत होते. कोणताही पुस्तक त्यासाठी चाळायची गरज त्यांना वाटायची नाही. अनेकदा अनेक पुस्तके ते खरेदी करून आणत. पुस्तके वाचून त्यावर खुणा केलेल्या असत. त्यांच्याकडे राहून बाईंना खूप विविध विषयांवरती वाचन करायला मिळालं. साहेबांच्या अनेक आठवणी यात त्यांनी उलगडून सांगितल्या आहेत.
मामा वरेरकर, संगीतकार वसंत पवार, केशवराव कोठावळे यांचीही व्यक्तिचित्र यात आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना आलेले अनुभव, शिकलेल्या गोष्टी असे अनेक प्रसंग बाईंनी यात चितारले आहेत. या सगळ्यांकडून वेळोवेळी मिळालेला आधार, मदत त्यांना मोलाची वाटते.
आणखी एक प्रकरण आहे दुर्गाबाई भागवत यांच्यावर. त्यांची झालेली पहिली भेट, त्यांचा साधेपणा, त्यांची हुशारी, त्यांचं अफाट वाचन यांनी भारवून गेलेल्या शांताबाई. तीव्र रागद्वेष असणाऱ्या, फटकळ बोलणाऱ्या दुर्गाबाईंनी सुरवातीला वाटणारी भीती त्यांच्या नैसर्गिक मोकळ्या वागण्याने नंतर गेली आणि एक प्रकारचं मनमोकळं, एका सखी सारखं नातं त्यांच्यात निर्माण झालं. दुर्गाबाईंच्या लिखाणाचे पैलू सांगताना त्यांच्या लेखनाचं भारतीयता हे वैशिट्य त्या नमूद करतात. दुर्गाबाईंची लेखनाची शैली, विषय, येणारे संदर्भ सगळं भारतीय आहे. क्वचित सनातन हा शब्द देखील शांताबाई वापरातात. दुर्गाबाईंच्या अनेक हृद्य आठवणी शांताबाईंनी साठवून ठेवलेल्या यात जाणवतात.
आणि शेवटी आहे मंगेशकर कुटुंबीय. यातल्या लता, आशा आणि हृदयनाथ यांच्यावर तीन स्वतंत्र लेख आहेत. तीन स्वतंत्र लेख असले तरीही प्रत्येकात यातल्या सगळ्यांचा उल्लेख येतोच. प्रत्येकाजवळ झालेली पहिली भेट, त्यांच्या घरी झालेलं अगत्य, प्रत्यकाशी असलेलं वेगळं नातं, प्रत्येकाशी असलेली वेगळी जवळीक. कधी गीतकार म्हणून, कधी साहित्यिक म्हणून तर कधी घरचीच व्यक्ती म्हणून त्यांच्यात सामावून घेण्याच्या मंगेशकर कुटुंबीयांविषयि शांताबाईंना अपार माया वाटते. गाणी लिहिताना, गाण्याला चाली लावताना, रोकॉर्डिंग करतानाच्या अनेक आठवणी बाई यात सांगतात. अनेक माहित नसललेया साध्या गोष्टी आपल्याला कळतात आणि आपल्याला देखील हि माणसं जवळची वाटू लागतात.
अत्यंत वाचनीय असं हे पुस्तक आहे . कुठंही कंटाळवाणं होत नाही . वाचन कमी असलेल्या मला यातल्या काही व्यक्ती माहीतही नाहीत . त्यांची पुस्तक माहित असणं दूरच. पण या पुस्तकातून त्यांच्याविषयी माहिती झाली. असे शिक्षक आपल्यालादेखील लाभले असते तर असही वाटून जात. बाईंची लिखाणाची साधी सोपी भाषा मनाची पकड घेते. उगाच कुणाला कौतुकाच्या थप्प्या न लावता तरीही असलेला आदर लिखाणातून नीट व्यक्त होईल याची काळजी घेतलेली आहे. आणि म्हणूनच हि व्यक्तिचित्र मनाला भिडतात. कोणी परिपूर्ण नसतोच पण त्याच्यात असलेल्या उणीवांसह त्या व्यक्तीला स्वीकारण महत्वाचं. समोरच्या व्यक्तीमधलं चांगलं ते शोधावं यानुसार शांताबाई सर्वांचं खूपच छान वर्णन करतात. आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. सुरेश एजन्सीने प्रकशित केलेल्या या पुस्तकाची किंमत १७० रुपये आहे. संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे.
-धनश्रीनिवास
प्रतिक्रिया
19 Jul 2022 - 2:45 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...
19 Jul 2022 - 6:59 pm | श्वेता व्यास
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.
20 Jul 2022 - 12:32 pm | कर्नलतपस्वी
शांताबाईचे लेखन वेड लावते. आमचे गाव यांचे आजोळ म्हणून अभिमान पण वाटतो.
"धुळपाटी,तोच चंद्रमा नभात " बरोबरच "वडिलधारी माणसं "पण घेऊन येणार.
21 Jul 2022 - 2:17 pm | सिरुसेरि
सुरेख पुस्तक परिचय . +१
21 Jul 2022 - 2:38 pm | यश राज
शांताबाईंच्या कविता आवडतात , हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.
21 Jul 2022 - 4:13 pm | Bhakti
शान्ताबाई शेळके यान्चे लिखाण मराठी साहित्यातील खजिनाच!सुरेख पुस्तक परिचय.
22 Jul 2022 - 4:49 pm | सविता००१
पुस्तक परिचय
25 Jul 2022 - 12:54 am | nutanm
सुंदर पुस्तक परिचय, परिचय वाचूनच लगेच कुठूनही मिळवून , वाचनालय किंवा विकत घेऊन वाचावेसे फार वाटतेय.
25 Jul 2022 - 8:22 am | सुरसंगम
ह्या एवढ्या सगळ्या मोठ्या हस्तींच्या कला गुणांचं एकत्रित गुंफण केलेलं लिखाण वाचायला निश्चितच आवडेल.
धन्यवाद ताई पुस्तक परिचय बद्दल.
25 Jul 2022 - 8:25 am | सुरसंगम
ह्या एवढ्या सगळ्या मोठ्या हस्तींच्या कला गुणांचं एकत्रित गुंफण केलेलं लिखाण वाचायला निश्चितच आवडेल.
धन्यवाद ताई पुस्तक परिचय बद्दल.
25 Aug 2022 - 7:48 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर पुस्तक परिचय.
वि. वा. शिरवाडकरांच्या नट सम्राट नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडी एक वाक्य आहे, 'आम्ही नट म्हणजे नुसते लमाण, नाटककाराचे शब्द प्रेक्षकांपर्यंत पोचवणारे... खरं श्रेय नाटककार, दिग्दर्शक यांचं....' तसच काहीसं वाटलं. पुस्तकाचा आशय संक्षेपाने वाचकांपर्यंत पोचवण्यात, वाचकांच्या मनात पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यात हा परिचय नक्की यशस्वी झालाय.
खुप लिहा. लिहित रहा.
25 Aug 2022 - 8:54 pm | चौथा कोनाडा
व्वा, खुप सुंदर पुस्तक परिचय!
हे वाचले नव्हते, आता मस्ट यादीत समाविष्ट करतो.
🌹 🌹
वहिनीची ओळख करून देत देता लेखात गुंतवून 🌹 टाकले त्यामुळे लेख अतिशय वाचनीय झाला आहे!
कुठे छापायला दिला नसेल तर नक्की द्या ! हार्दिक शुभेच्छा!
🌹 🌹