भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. (लेख त्याबद्दल नाही) लवकरच सध्याचे राष्ट्रपती दिल्लीतील भव्य राष्ट्रपती भवनातून दुसरीकडे राहायला जातील आणि नूतन निर्वाचित राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय रायसीना हिलवरच्या ब्रिटिश राजवटीने बांधलेल्या व्हॉईसरॉय हाऊस उर्फ आताचे राष्ट्रपती भवन नामक राजेशाही प्रासादात राहायला येतील.
प्रासाद अतिभव्य आहे, भारताच्या प्रथम नागरिकाच्या पदाला आणि गौरवाला साजेसा आहे, ३४० खोल्या, रमणीय बागबगीचे, शेकडो सहायक, पोषाखी अंगरक्षक आणि घोडदळ, खानसामे, नोकरचाकर असा सर्व जामानिमा असलेला आहे हे आपण सर्वच जाणतो. पण सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीच्या जोडीदारांबद्दलही आपल्यासारख्या सामान्यांना कुतूहल असतेच. अमेरिकेत FLOTUS (The first lady of the United States) उर्फ ‘फ़र्स्ट लेडी’ आणि आपल्याकडे 'प्रथम महिला' असे नामनिधान असलेल्या राष्ट्रपतींच्या पत्नींबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असते.
आपल्याकडे 'राष्ट्रपती' हे पद सीमित अधिकार असलेले प्रतीकात्मक प्रमुखाचे पद आहे. भारतीय 'प्रथम महिला' हे पद तर कुठेच चर्चेत नसते. पण देशी-विदेशी पाहुणे, सोहळे -समारोह आणि त्यासाठी लागणारे मोठे मन्युष्यबळ असा सगळा गोतावळा पडद्यामागे राहून सांभाळण्याचे काम या प्रथम महिला करत असतात. काहीजणी अहोंसोबत देशी-विदेशी दौऱ्यांवर, विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. काही समाजकार्यात अग्रेसर तर काही सक्रिय राजकारणात ओढल्या गेलेल्या. त्यांच्याबद्दल थोडेसे :-
लेडी एडविना माउंटबॅटन भारत स्वतंत्र झाल्यानंतर साधारण दहा महिने 'प्रथम महिला' किंवा तत्कालीन नामनिधानानुसार 'लेडी व्हॉइसराय' होत्या. ब्रिटिश राजवटीतर्फे होणाऱ्या भव्य सोहळ्यांचे, राजेशाही मेजवान्यांचे, संगीत-नृत्यादी कार्यक्रमांचे चोख आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. स्थानिक भारतीय आणि जगभर पसरलेला असा त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. तत्पूर्वी अनेक ब्रिटिश मडमांनी हे पद सांभाळलेले असल्याने त्यात काही नावीन्य नव्हते.
प्रथम 'शुद्ध भारतीय' व्हॉईसरॉय चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी राष्ट्रपती भवनात राहायला आले तेव्हा ते विधुर होते, त्यांच्या पत्नी अलमेलू मंगलम्मा आधीच निवर्तल्या होत्या. गांधीवादी विचारसरणी आणि अत्यंत साधी राहणी असलेल्या राजाजींना बडेजाव नापसंत होता, त्यामुळे दीडेक वर्षे राष्ट्रपती भवनात फारसे सोहळे वगैरे नव्हतेच. ते एका साध्या खोलीतच राहत. देशात अन्नधान्याच्या कमतरतेच्या बातम्यांनी अस्वस्थ होऊन त्यांनी प्रसिद्ध मुघल उद्यानाच्या काही भागात गव्हाची शेती करण्याचे आदेश दिले होते !
पुढे व्हॉईसरॉय पद संपुष्टात येऊन 'भारतीय गणराज्याचे प्रथम राष्ट्रपती' म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत राष्ट्रपतीभवनात राहायला येणाऱ्या भारतीय 'प्रथम महिला' म्हणजे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या पत्नी राजवंशी देवी. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचा सुविद्य राजेंद्रबाबूंशी विवाह झाला होता. अत्यंत साधे आणि सोज्वळ व्यक्तिमत्व लाभलेल्या राजवंशी देवी राष्ट्रपतीभवनात होणाऱ्या कोणत्याही शासकीय समारोहात उपस्थित नसत. राष्ट्रपती भवन परिसरात असलेल्या शाळेचे सर्व कार्यक्रम, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्याचा सोहळा असो की खेळाच्या स्पर्धा, तिथे मात्र राजवंशी देवी सक्रिय सहभाग नोंदवत असत. राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या सर्वांशी त्यांचे फार चांगले संबंध होते. त्यांच्या सुखदुःखात नेहेमी उपस्थित असत आणि सर्वांना मायेनी वागवत, त्यामुळे स्टाफने त्यांना 'अम्माजी' असे संबोधन बहाल केले होते. पुढे सर्वच राष्ट्रपतींच्या सौभाग्यवतींना 'अम्माजी' म्हणण्याचा प्रघात पडला. राजेंद्रबाबूंना पदाच्या दोन टर्म मिळाल्यामुळे त्यांचा मुक्काम सलग दहा वर्षे राष्ट्रपती भवनात होता. त्यानंतर आजवर कोणालाही तशी संधी पुन्हा मिळाली नाही. अम्माजींच्या आग्रहामुळे दरवर्षी १ फेब्रुवारीला 'राष्ट्रपती भवन दिवस' साजरा करण्यास सुरुवात झाली. आजही तो दिवस राष्ट्रपतींचे कुटुंब, सर्व सेवक, मदतनीस, सैन्य अधिकारी आणि त्यांचा कुटुंबकबिला असे एकत्र येऊन साजरा करण्यात येतो. कठोर राजशिष्टाचार थोडा बाजूला पडून सर्वजण एकमेकांशी जोडले जातात, ही अम्माजींची सुंदर कल्पना.
दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हाडाचे शिक्षक. ते राष्ट्रपतिपदी पोहोचण्याच्या आधीच त्यांच्या पत्नी शिवकामु निवर्तल्यामुळे राष्ट्रपती भवनाला पुन्हा पाच वर्षे 'अम्माजी' नव्हत्या.
डॉ. झाकीर हुसेन यांच्या रूपाने पुन्हा एकदा एक विद्वान राष्ट्रपती त्यांच्या सुविद्य पत्नी शाहजहाँ बेगमसह राष्ट्रपती भवनात राहायला आले. कुटुंबवत्सल बेगम साहिबा मुघल गार्डन वगळता फारश्या बाहेर जात नसत. डॉ. झाकीर हुसेन आणि बेगम शाहजहाँ दोघेही दिल्लीतील जामिया विद्यापीठानजीकच्या एका मशिदीत शेजारी-शेजारी चिरनिद्रा घेत आहेत. राजधानी दिल्लीत पार्थिवावर अंतिम संस्कार होणारे पहिलेच राष्ट्रपती आणि प्रथम महिला.
चौथे राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी उर्फ व्ही व्ही गिरी यांच्या पत्नी सरस्वती बाई फारच धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या आणि कोणत्याही सार्वजनिक समारोहात सामील होत नसत. त्यांच्या नावे एक वेगळाच विक्रम आहे. त्यांना एकूण १४ अपत्ये होती, त्यातील चार तर एकाच वर्षात झाली होती - अनुक्रमे जानेवारी आणि डिसेम्बरमध्ये, दोनदा जुळी मुले !!! पतीसोबत रशिया (तत्कालीन सोव्हियत युनियन) च्या दौऱ्यावर गेल्या असता त्यांच्या उदंड अपत्यसंख्येने प्रभावित होऊन तेथील महिला संघटनांनी त्यांना 'वीरमाता' पुरस्कार देण्याचा घाट घातला होता. सुदैवाने त्यांनी तो नाकारला आणि तेंव्हा भारतात प्रचलित 'दो या तीन बस' या मोहिमेला मूक हातभार लावला.
सरस्वती बाईंनी विदेशी दौऱ्यांवर जाण्यास सुरुवात केली तर पाचवे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांच्या सुविद्य आणि उत्साही पत्नी बेगम आबिदा अहमद यांनी जवळपास सर्व विदेश दौऱ्यांवर अहोंना सोबत केली. त्यांना समाजकारणात - राजकारणात गती होती. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी दोनदा उत्तरप्रदेशातील बरेली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. आयुष्याच्या शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेली ही वेगळी 'प्रथम महिला'. आज संसद भवनाजवळच्या मशिदीत दोघे पती-पत्नी चिरनिद्रा घेत आहेत. दिल्लीत त्यांचे समाधीस्थळ सुंदर राखले आहे.
सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या पत्नी नागरत्नम्मा आणि आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या पत्नी जानकी दोघी कुटुंबवत्सल होत्या. दिल्लीतील वास्तव्य कमीच आवडणाऱ्या. गडद रंगाच्या भरजरी रेशमी कांजीवरम साड्यांमधे दिल्लीतील पंजाबी वातावरणात त्या उठून दिसत. राष्ट्रपती भवनात दक्षिण भारतातील सणवार उत्साहात साजरे करत. राष्ट्रपतींच्या काही दौऱ्यात-समारंभात दिसत पण प्रसिद्धीच्या झोतात फारश्या नसत.
अम्माजी राजवंशी देवींप्रमाणेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्वाधिक प्रेम आणि आदर लाभणाऱ्या प्रथम महिला ठरल्या प्रधान कौर - सातवे राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्या पत्नी. लौकिकार्थाने फारसे शिक्षण न लाभलेल्या प्रधान कौर फार प्रेमळ, निगर्वी, साध्या आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अगदी चतुर्थश्रेणी सफाई कर्मचाऱ्याच्या घरी सहज जाऊन चहापान करणे असो की वाहनचालकाच्या घरी लग्नात भेटवस्तू घेऊन उपस्थिती असो, त्यांच्या मायाळू स्वभावामुळे त्यांना सर्वांचे भरपूर प्रेम लाभले. खऱ्या अम्माजी. अहोंच्या कोणत्याही शासकीय समारंभाला मात्र त्या कधीच उपस्थित राहिल्या नाहीत.
पुढे डॉ शंकर दयाल शर्मा यांच्या सुविद्य पत्नी विमला शर्मा 'अम्माजी' पदी आल्या. त्या स्वतः डॉक्टरेट होत्या आणि समाजकार्यात हिरीरीने भाग घेत. पती निधनानंतरही अनेक वर्ष दिल्लीतील विविध समाजसेवी संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होत्या.
वेगळेपणाच्या तीन कथा लेखात समाविष्ट केल्याच पाहिजेत. दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पत्नी 'मा टिन टिन’ उर्फ उषा नारायणन या विदेशी मूळ असलेल्या एकमेव प्रथम महिला, त्यांचा जन्म बर्मा (आता म्यांमार) चा. नारायणन विदेश सेवेत कार्यरत असतांना त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले. दोघेही एकत्र जग फिरले आणि आज दिल्लीतील पृथ्वीराज रोड भागातील एका ख्रिश्चन दफनभूमीत चिरनिद्रा घेत आहेत. राष्ट्रपती नारायणन यांच्याप्रमाणेच उषाजींनी स्वतः उत्तम दर्ज्याचे लेखन केले आहे.
समाजाच्या सर्व स्तरांतून अत्याधिक प्रसिद्धी लाभलेले डॉ अब्दुल कलाम हे पहिले 'बॅचलर' राष्ट्रपती. त्यामुळे प्रथम महिला हा विषय कटाप. गमतीचा योगायोग असा की त्यांच्या कारकिर्दीत श्री अटलबिहारी बाजपेयी हे पंतप्रधानही अविवाहित होते.
बाराव्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांची निवड झाली आणि राष्ट्रपती भवनाचे अधिकारी आणि अन्य सर्वांची एक वेगळीच पंचाईत झाली - आजवर 'फर्स्ट लेडी' आणि 'प्रथम महिला' कसेबसे रुळवले पण राष्ट्रपतींचे पती डॉ देवीसिंग शेखावत यांना काय म्हणून संबोधायचे असा प्रश्न आला. त्यांना 'फर्स्ट जेंटलमन' असे संबोधन वापरले बहुतेक. ते स्वतः बॉटनी विषयातले डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना मुघल गार्डन आणि राष्ट्रपतीभवनातील अतुलनीय वृक्षराजीची भुरळ पडली नसती तरच नवल. ते काही विदेशी दौऱ्यांवर प्रतिभाताईसोबत दिसत पण मूळ गावी अमरावतीला त्यांचे वास्तव्य जास्त असे. त्यांना सर्व 'सरजी' म्हणत.
तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या पत्नी शुभ्रा मुखर्जी संगीतप्रेमी. स्वत: उत्तम रविंद्र संगीत गायिका. दिल्लीतील लेडी इर्विन विद्यालयात प्राध्यापिका होत्या. त्यांना फुलांची आणि बागकामाची अतीव आवड असल्याने मुगल गार्डनमध्ये माळीकाम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांचे विशेष सख्य होते. राष्ट्रपती भवनात अखेरचा श्वास घेणाऱ्या त्या एकमेव प्रथम महिला.
सध्याच्या प्रथम महिला सविता कोविंद मनमिळावू आणि विनम्र म्हणून ओळखल्या जातात. अनेक सार्वजनिक समारंभात अहोंसोबत दिसतात. कोविड काळात स्वतः मास्क शिवणे आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता यासाठी त्यांनी हिरीरीने काम केले होते.
आता राष्ट्रपती भवनाला प्रतीक्षा आहे ती नवीन 'अम्माजी' किंवा सरजींची. बघुयात.
(चित्रे जालावरून साभार. एका दुर्लक्षित विषयावरची माहिती संकलित करणारे टिपण एवढाच लेखनाचा उद्देश आहे. )
प्रतिक्रिया
16 Jun 2022 - 1:41 pm | कपिलमुनी
वेगळा विषय
16 Jun 2022 - 1:48 pm | ज्ञानोबाचे पैजार
वेगळ्याविषयावरची रोचक माहिती.
पैजारबुवा,
17 Jun 2022 - 1:51 pm | Nitin Palkar
छान संकलन.
16 Jun 2022 - 3:40 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्त माहीती.
17 Jun 2022 - 7:27 am | जेम्स वांड
लेख आवडला. मुख्य म्हणजे उद्देश्य आवडला.
17 Jun 2022 - 9:00 am | श्रीरंग_जोशी
नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरचा समयोचित लेख खूप आवडला. उत्तम लेखनशैली व फोटोजची निवडही समर्पक आहे.
यावरुन आठवले - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पूर्वी लोकसत्तेच्या शनिवारच्या आवृत्तीत स्तंभ लिहित असत. त्यात त्यांनी मिशन काश्मिर चित्रपटाच्या राष्ट्रपती भवनातल्या खेळाबाबतची आठवण लिहिली होती. त्या प्रसंगी चित्रपटाशी संबंधीत कलाकारांची तत्कालिन राष्ट्रपती स्व. के आर नारायणन व त्यांच्या पत्नी स्व. उषा नारायणन यांचेशी ओळख करुन देण्यात आली. तेव्हा सोनाली कुलकर्णी यांना भेटताच दोघांपैकी एकाने (श्री किंवा सौ नारायणन) तुम्ही केलेली रमाबाईं आंबेडकरांची भूमिका खूप आवडल्याचे आवर्जून सांगितले. सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी ही खूपच आनंददायक गोष्ट होती.
17 Jun 2022 - 1:20 pm | अनिंद्य
सोनाली कुलकर्णीचा किस्सा छान. उषा नारायणन बहुभाषाकोविद असल्याचे ऐकून आहे, त्या सोनालीशी मराठीत बोलल्या असतील तरी आश्चर्य वाटणार नाही. :-)
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
17 Jun 2022 - 9:01 am | पद्मश्री चित्रे
नवीन माहिती.
17 Jun 2022 - 9:10 am | कर्नलतपस्वी
राष्ट्रपती भवनातील बाग फेब्रुवारीपासून आम जनता भेट देऊ शकतात.
17 Jun 2022 - 11:31 am | अनिंद्य
बरोबर !
राष्ट्रपती भवनाचा मुघल गार्डनचा काही भाग दरवर्षी काही दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उघडला जात असे. प्रणबबाबूंच्या आणि कलाम सरांच्या कारकिर्दीत भवनातील काही दालने आणि एक कलाकृतींचे संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. आत बघता येते, बुकिंग आधी करावे लागते मात्र, राष्ट्रपती भवनाच्या संस्थळावर आहे माहिती.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
17 Jun 2022 - 10:05 am | श्वेता व्यास
छान संकलन, उत्तम लेख!
17 Jun 2022 - 7:46 pm | स्मिताके
अगदी निराळा विषय आणि सुरेख फोटो.
17 Jun 2022 - 8:46 pm | गामा पैलवान
अनिंद्य,
चांगली माहिती आहे. दुर्लक्षित विषय लक्षांत आणवून देण्याची हातवटी आवडली.
राष्ट्रपतीभवनात मशीद कुठनं आली, असा प्रश्न पडला. जरा शोधाशोध केल्यावर कळलं की झाकीर हुसेनाने राष्ट्रपती असतांना बांधवून घेतली. सेक्युलर ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा अवमान आहे.
आ.न.,
-गा.पै.
18 Jun 2022 - 12:48 pm | अनिंद्य
लेख आवडल्याचे सांगितलेल्या सर्वांचे आभार.
... सेक्युलर ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा अवमान आहे....
सध्या राष्ट्रपती भवनाच्या आवारात मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा आहेत. भविष्यात जिनालय, बुद्धविहार, सिनेगॉग किंवा अग्यारी बांधायची झाल्यास भरपूर जागा आहेच.
18 Jun 2022 - 9:44 pm | गामा पैलवान
अनिंद्य,
भारत हा सेक्युलर देश असल्याने अधिकृतरीत्या तो नास्तिक आहे. सहाजिकंच भारताचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती नास्तिक आहे. परिणामी भारताच्या प्रमुखाचा प्रासाद नास्तिक वास्तू आहे. तिथे मशीद बांधणे सेक्युलर वा इस्लामी कोणत्याही अंगाने आजीबात ग्राह्य नाही.
आ.न.,
-गा.पै.
18 Jul 2022 - 12:30 pm | नेत्रेश
atheist = नास्तिक
secular = निधर्मी
निधर्मी म्हणजे नास्तिक नव्हे.
उदा: अमेरीका secular देश आहे, पण तो नास्तिक नाही. प्रत्येक डॉलरवर In God We Trust हा त्यांचा official motto छापलेला असतो.
18 Jul 2022 - 7:01 pm | गामा पैलवान
नेत्रेश,
एकदम बरोबर. सही पकडे है. माझं विधान दुरुस्त करतो :
त्रुटी दाखवून दिल्याबद्दल आभार ! :-)
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2022 - 1:27 pm | चौथा कोनाडा
माहितीपुर्ण नितांत सुंदर लेख !
💖
या विषयावर मनामध्ये फारसे विचार आले नाहीत.
लेख वाचून नविन माहिती मिळाली.
वृत्तपत्र, मासिके यात छापण्या सारखा लेख !
या वर एक उत्तम शॉर्टफिल्म देखिल बनू शकते !
हॅटस् ऑफ अनिंद्य !
20 Jun 2022 - 6:26 am | प्रचेतस
लेख आवडला, घेतलेला आढावा सुरेख. वेळोवेळी होत गेलेले बदल छान टिपलेत.
20 Jun 2022 - 1:59 pm | कुमार१
सुंदर लेख !
22 Jun 2022 - 1:57 pm | अनिंद्य
ताज्या घडामोडींमुळे लेखविषयासंदर्भात लक्षात आलेली गोष्ट :-
श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर राष्ट्रपती भवनात 'सर जी' मात्र असणार नाहीत कारण श्री मुर्मू आधीच निवर्तले आहेत.
(संदर्भ - माध्यमातून प्रसिद्ध झालेला श्रीमती मुर्मू यांचा परिचय)
24 Jun 2022 - 9:50 pm | मदनबाण
सुरेख लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithala Konta Zenda | Dnyaneshwar Meshram |
2 Jul 2022 - 8:39 pm | अनिंद्य
आलिशान राष्ट्रपती भवनातून निवृत्तीनंतर राष्ट्रपती आणि परिवार कुठे राहायला जात असेल असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहॆ. त्याबद्दल :
निवृत्त राष्ट्रपतींना त्यांच्या पसंतीच्या भारतातील कोणत्याही ठिकाणी उत्तम निवासस्थान,पुरेशी सुरक्षा आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्यात येतात. तहयात. त्यांच्या मृत्यूपश्चात अम्माजी/सर जी हयात असेपर्यंत निवासस्थान आणि सर्व सोयीसुविधा वापरू शकतात.
डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, व्ही व्ही गिरी, नीलम संजीव रेड्डी, आर वेंकटरमण आणि प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपतींनी निवृत्तीपश्चात दिल्लीबाहेर आपापल्या पसंतीच्या शहरात अनुक्रमे पटना, चेन्नई, बंगळुरू, चेन्नई आणि पुणे येथे वास्तव्य करणे पसंत केले.
डॉ. झाकीर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद यांचे पदावर असतांनाच निधन झाले त्यामुळे निवृत्तीपश्चात निवासाचा प्रश्न आला नाही.
ज्ञानी झैल सिंग, डॉ. शंकर दयाल शर्मा, के आर नारायणन, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांना दिल्लीतील उच्चभ्रू भागात निवासस्थाने पुरवण्यात आलीत. पैकी १० राजाजी मार्ग ह्या एकाच घरात (एकावेळी नाही) निवृत्तीपश्चात राहणारे तीन महामहिम - चक्रवर्ती राजगोपालाचारी उर्फ राजाजी, डॉ कलाम आणि प्रणव मुखर्जी.
सध्याचे राष्ट्रपती आणि अम्माजी निवृत्तीनंतर बहुदा दिल्लीच्या १२ जनपथ या पत्त्यावर राहणार आहेत.
10 Jul 2022 - 2:19 pm | मदनबाण
निवृत्त राष्ट्रपतींना त्यांच्या पसंतीच्या भारतातील कोणत्याही ठिकाणी उत्तम निवासस्थान,पुरेशी सुरक्षा आणि अन्य सोयीसुविधा पुरवण्यात येतात. तहयात.
खरंतर मी या धाग्यावर हा प्रतिसाद आधी लिहणार होतो, पण टाळले होते. प्रतिभा पाटिल या सगळ्यात अयोग्य व्यक्ती होत्या ज्यांना हे पद मिळणे योग्य नव्हते. अत्यंत उधळ्या, लोभी अश्या व्यक्तिमत्वाचे त्यांनी प्रदर्शन या पदावर बसुन केले. बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठीचा मुद्दा पुढे करत त्यांना त्या पदासाठी उभे राहताना पाठिंबा दिला होता, जो मला व्यक्तिगत रित्या आवडला नव्हता असे स्मरते.
असो...
संदर्भ :-
Pratibha Patil in soup over gifts from foreign dignitaries
President Pratibha Patil grabs 2,61,000 sq ft of land meant for soldiers and officers
Pratibha Patil’s Pune Bungalow: Denying the undeniable
Pratibha’s Pune home a break from tradition
The disastrous presidency of Pratibha Devisingh Patil
जाता जाता :-
मोठ्या पदांवरच्या लोकांचे ते पद सोडल्यावर जे चोचले पुरवले जातात ते आता बंद व्हावेत, तसेच आमदार-खासदार पासुन नगरसेवक पदांवर बसलेल्या लोकांची पेंशन देखील बंद व्हावी असे माझे व्यक्तिगत मत आहे. देशसेवा करण्यासाठी राजकारणात येणार्यां या जवळपास सर्व लोकांची एकुण संपत्ती कोट्यावधी मध्ये असताना सामान्य करदाता जो आयुषभर घासुन काम करतो आणि टॅक्स भरतो त्या पैशाची अशी नासाडी आता तरी थांबली पाहिजे. श्रीलंकेतल्या लोकांनी त्यांच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांची घरे जाळली ती वेळ आपल्या देशात येऊ द्यायची नसेल तर यांना मिळणार्या सवलती आणि पेंशन बंद झाले पाहिजे. देशसेवेला वाहुन घेतल्याचे सांगुन राजकारण करणार्यांना पेंशन का द्यावे ?
काही दुवे :-
Government spends Rs. 2.7 lakh a month per MP
Salaries and perks of MPs cost exchequer Rs 1,997 crore in 4 years
India spent Rs 1,997 crore in 4 years on MPs' salaries, reveals RTI query
Ex-MPs’ pension costs exchequer Rs 70.50 cr
₹28 crore annual expenditure on pension and family pension of Haryana MLAs
Time to think of universal basic pension for all Indians and not just Govt employees
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TV
11 Jul 2022 - 3:44 pm | अनिंद्य
पेंशनबंदीची सुरुवात उच्चस्तरावरून व्हावी याला सहमती.
असे कधीही होणार नाही हेही तितकेच खरे.
'सेवा' करायला राजकारणात येणारे वगैरे अंधश्रद्धा कधीच दूर झाली आहे :-)
18 Jul 2022 - 7:08 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रतिभा पाटिल या सगळ्यात अयोग्य व्यक्ती होत्या ज्यांना हे पद मिळणे योग्य नव्हते.
माझ्या मते कोविंद गी व्यक्ति सर्वात अयोग्य होती. भाजपची सत्ता यावी म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रात्री दोन वाजता ऊठवली होती, महाराष्ट्र व करिनाटकच्या राज्यपालांवर आजिबात नियंत्रण नसणे. ह्या गोष्टी पाहील्या तर राष्ट्रपती म्हणून ह्या व्यकेतिस आज्बात मान दियावासा वाटत नाही. राष्ट्रपती स्वाभिमानी नी राष्ट्रहीताचा विचार करनारा असावा, भाजपच्या हितीची विचार करनारा नसावा.
23 Jul 2022 - 6:40 pm | कंजूस
आमदार खासदारांची पेन्शन मुद्दा.
18 Jul 2022 - 11:39 am | अनिंद्य
आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे.
राष्ट्रपतीपद हवेच कशाला या प्रश्नाचा उहापोह करणारा एक लेख :
https://www.loksatta.com/lokrang/president-constitution-president-author...
18 Jul 2022 - 12:14 pm | रंगीला रतन
झकास लेख.
19 Jul 2022 - 11:57 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान माहिती दिलीत.
धन्यवाद.
19 Jul 2022 - 4:34 pm | टर्मीनेटर
बरीच नवीन माहिती मिळाली!
लेख आवडला अनिंद्य साहेब 👍
21 Jul 2022 - 4:58 pm | अनिंद्य
सर्व नवीन प्रतिसादांचे स्वागत !
22 Jul 2022 - 11:10 am | अनिंद्य
अपेक्षेप्रमाणे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
श्री मुर्मू आधीच निवर्तल्यामुळे राष्ट्रपती भवनाला 'सरजी' लाभणार नाहीत हे स्पष्ट आहे.
23 Jul 2022 - 2:58 pm | अनिंद्य
होऊ घातलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे पारिवारिक जीवन कंटकाकिर्ण आहे असे दिसते.
पती आणि दोन मुलगे अकाली जग सोडून गेल्यानंतर आता त्यांना कुटुंब म्हणून फक्त एक कन्या 'इतिश्री' आणि जावई 'गणेशचंद्र' एवढेच.
31 Jan 2023 - 11:57 am | अनिंद्य
१ फेब्रुवारी.
पहिल्या अम्माजी राजवंशी देवींच्या कल्पनेप्रमाणे दरवर्षी १ फेब्रुवारीला 'राष्ट्रपती भवन दिवस' साजरा होतो. तसा उद्या होईल - राष्ट्रपतींचे कुटुंब, सेवक, मदतनीस, सैन्य अधिकारी आणि त्यांचा कुटुंबकबिला असे सगळे एकत्र येऊन !
उद्यापासूनच राष्ट्रपती भावनातले प्रसिद्ध मुघल गार्डन (आता नवे नाव अमृत वाटिका) नागरिकांना बघण्यासाठी खुले होईल.