नमस्कार मिपाकर्स ..
आपण सर्व जाणतोच की भारतीय खाद्यसंस्कृती ही विविधतने नटलेली व प्रचंड मोठी आहे. प्रत्येक राज्यात, प्रान्तात, जिल्ह्यात एवढेच काय प्रत्येक गावा गावात खाण्या पिण्याचे असंख्य व वेगळे वेगळे प्रकार पहायला मिळतात. जे पिढी दर पिढी पुढे सुपुर्द केले जातात पण काळाच्या ओघात त्यातले काही पदार्थ नामशेष होत जातात.
मला स्वत:ला या सर्व पारंपारीक व विस्मृतीत जात असलेल्या रेसिपिज चे खुप म्हणजे खुप अप्रुप आहे व हे सर्व पदार्थ टिकले पाहीजे आणि त्याच बरोबर आजच्या पिढीला या पदार्थांची ओळख व्हावी असे मला मनापासुन वाटते. कारण त्यातल्या बरयाचश्या पदार्थांमागे काही ना काही लोककथा/संकल्पना असतात.
आज मी आपल्यासाठी घेवुन आलो आहे अशाच विस्मृतीत गेलेल्या किंवा नामशेष होत असलेल्या पाककृतींसाठी एक खास सदर. सांगण्यासारखं खुप आहे पण टायपण्याचा टंकाळा असल्याकारणाने जसे जमेल तसे सर्व पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करेन.
आजचा पहिला पदार्थ आहे छिबा ढोकली
छिबा ढोकली हा पदार्थ साधारणतः १५ वर्षांपुर्वी सर्व प्रथम मी माझ्या कच्छी मित्राकडे खाल्ला होता. मी घाईत असलया कारणाने मित्राच्या आजीने अक्षरशः १५ मिनिटा मध्ये हा पदार्थ बनवला होता. गरम चहा व व आजीच्या हातच्या छिबा ढोकलीची चव मला अजुन ही स्पष्ट आठवते.
छिबा ढोकली हा कच्छ , गुजरात मधील पारंपारीक पदार्थ आहे. हा एक झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. जो गरमा गरम मसालेदार चहा बरोबर वाढला जातो. कच्छ मध्ये पुर्वी किंवा काही दशकांपुर्वी घरी पाहुणे आले तर छिबा ढोकली व मसालेदार चहा हमखास दिला जायचा पण आता हा प्रकार बनवणं खुप कमी झालं आहे.
ढोबळ्मानाने हा थोडाफार सुरळीच्या वड्यांसारखा प्रकार आहे पण फरक हा आहे की सुरळीच्या वड्याचे पीठ खुप पातळ असते व ते अगोदर शिजवुन घ्यावे लागते मग पालथ्या ताटावर शिजवलेले पिठ थापुन मग आपण वड्या करतो.
याऊलट छिबा ढोकलीचे पीठ सरबरीत असते , मग ते पीठ सुलट्या ताटावर पातळसर पसरवुन ताट उलटे ठेवुन वाफवुन घ्यावे लागते. मग त्याच्या रिबिनी सारख्या पटृया कापुन घ्याव्या लागतात.
चला बघुया साहित्य आणि कृती.
साहित्य
अर्धा कप बेसन
१ बारिक चिरलेली मिरची
१ चमचा कसुरी मेथी
पाव चमचा हींग
चिमुट्भर हळद
१ चमचा साखर
१ चमचा लिम्बाचा रस
मीठ चवीपुरता
कोथिंबिर
लाल मिरची पावडर(कच्छ मध्ये मेथिया पावडर अर्थात लोणच्याचा मसाला वापरतात पण लाल तिखट हि वापरु शकतात.)
पाणी
तडक्यासाठी --
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
१ चमचा तीळ
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, चिरलेली मिरची, कसुरी मेथी,हिंग, हळद, साखर एकत्र करुन घ्या
आता अगदी सावकाश थोडे थोडे पाणी टाकुन सर्व साहीत्य परत एकदा मिक्स करुन घ्या. पाणी जास्त टाकु नये. पीठ सरबरीत असायला हवे.
आता लिंबाचा रस व चवीपुरता मीठ टाकुन मिश्रण परत एकदा ढवळुन घ्या.
आता एक ताट घेवुन चमच्याने थोडे थोडे मिश्रण ताटात टाकावे व दुस-या चमचा वा सरोट्याने ते मिश्रण गोलाकार आकारात व अगदी पातळ्सर थर असेल असे पसरवुन घ्यावे. जास्त जाडसर थर नसावा.(ताटाला तेल लावण्याची गरज नाहिये.)
मिश्रण पसरवलेले ताट जर उलटे केले तर मिश्रण खाली पडता कामा नये.
आता ताट वर बसेल अशा आकाराचे भांडे घेवुन पाणी ऊकळुन घ्यावे.
त्यावर आता ढोकलीचे मिश्रण पसरलेले ताट उलटे ठेवुन ४ ते ५ मिनिटे दणद्णीत वाफेत शिजवुन घ्यावे.
५ मिनिटांनतर ताट उतरवुन घ्यावे, व ढोकलीच्या कडा सोडवुन घ्याव्यात व सुरिने सरळ काप द्यावेत.
त्यावर ब्रश ने थोडे तेल पसरवुन घ्यावे.
वर चिमुटभर मेथिया पावडर किंवा लाल तिखट पसरवावे.
सरोट्याने छिबा ढोकलीच्या लांबसर पट्ट्या काढुन घ्याव्यात.
आता गरम तेलात मोहरी व तिळ टाकुन तडतडुन घ्यावी व तयार तडका छिबा ढोकलीच्या गुंडाळिवर सोडावा.
गरमा गरम मसालेदार चहा बरोबर छिबा ढोकली वाढावी.
छिबा ढोकली ची रेसिपी अस्मादिकांच्या तुनळि चॅनलवर.
https://www.youtube.com/watch?v=upM3Ro76mXA&t=49s
(आम्ही अलिकडेच आमचे स्वतःचे तुनळीवर चॅनल सुरु केले आहे त्यामध्ये हे सर्व पारंपारिक व अनवट कींवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पदार्थ दाखवतो. हे सर्व प्रकार टिकावेत यासाठीच आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. तुमचा अभिप्राय नक्कि कळवा)
प्रतिक्रिया
18 Jul 2022 - 7:20 am | जेम्स वांड
एपिक टीव्ही वर शेफ आदित्य बाल लॉस्ट रेसिपीज नावाचा कार्यक्रम होस्ट करत असे ते आठवले एकदम !
बाकी गुजराती खाद्य परंपरेतील नाजूक खांडवी किंवा आपल्या सुरळीच्या वड्या नक्कीच ओळखीतल्या होत्या पण छीबा ढोकली हा प्रकार नवीनच समजला, कच्छ मध्ये बहुसंख्य असलेल्या गुराखी फिरस्ता समाजामुळे अश्या फ्रुगल व हार्डी रेसिपीज उत्क्रांत होत गेल्या असाव्यात काय ? असा प्रश्न पडतो
18 Jul 2022 - 12:39 pm | यश राज
धन्यवाद जेम्स साहेब.
18 Jul 2022 - 8:20 am | कंजूस
पाणी कमी असल्यामुळे कमीतकमी भांडी वापरून पदार्थ करण्याकडे कल असावा. करून पाहणार.
पुढचा पदार्थ
केर सांगरी भाजी, ( केरची फळे आणि शमिच्या शेंगांची भाजी).
लिसोटा आचार( भोकराचे लोणचे)
18 Jul 2022 - 12:40 pm | यश राज
धन्यवाद कंजूस जी , करायला खूपच सोपा प्रकार आहे हा.
18 Jul 2022 - 9:25 am | सस्नेह
मस्त आहे की !
सुरळीच्या वड्यांपेक्षा सोपी आणि सुटसुटीत पाकृ. नक्की करून बघणार.
स्नेहा
18 Jul 2022 - 12:42 pm | यश राज
धन्यवाद स्नेहा जी आणि चव ही भन्नाट लागते.
18 Jul 2022 - 10:05 am | वामन देशमुख
मने छिबा ढोकली रेसिपि गमी.
---
वधू आववा दो.
18 Jul 2022 - 12:46 pm | यश राज
तमारा खूप खूप आभार .
लवकरच दुसरा भाग टाकण्याचा प्रयत्न करेन.
18 Jul 2022 - 10:39 am | मुक्त विहारि
धन्यवाद
18 Jul 2022 - 12:47 pm | यश राज
धन्यवाद मुविजी.
19 Jul 2022 - 9:59 am | मुक्त विहारि
आपण, माबोकर दिसता....
कारण, माबोवर तशी, "जी" लावायची प्रथा आहे
मला, इथे, मुविकाका म्हणून ओळखतात, त्यामुळे, मुविकाका, असे म्हणावे, ही नम्र विनंती ...
19 Jul 2022 - 12:11 pm | यश राज
नाही हो काका , मी माबो वर नाही
मी आपला जुनाच मिपाकर आहे.
नक्कीच मुविकाका म्हणेन पुढच्या वेळी :)
18 Jul 2022 - 10:51 am | श्वेता व्यास
हा पदार्थ आजेसासूबाईंनी शिकवला, करायला सोपा आहे शिवाय चविष्टही!
18 Jul 2022 - 12:47 pm | यश राज
धन्यवाद श्वेताजी
18 Jul 2022 - 1:27 pm | Bhakti
वाह मस्त आणि बनवायला ही सोपी पाककृती!
गुजराती डाळीच्या पिठाचे पदार्थ आवडतातच.
18 Jul 2022 - 1:58 pm | यश राज
गुजरातच्या खाद्यसंस्कृती मध्ये चण्याच्या दाळीच्या पिठाचा मुबलक वापर केला जातो.
18 Jul 2022 - 3:44 pm | अनिंद्य
छिबा ढोकली रेसिपी फर्स्ट क्लास. करून बघणार.
विस्मृतीत जाणाऱ्या पाककृतीची सिरीज करा हो, बेस्ट काम.
पानकी, मक्की नू खीच, सोरठी कढी सगळेच येउद्या !
18 Jul 2022 - 3:54 pm | यश राज
धन्यवाद खरचं. आम्हा दोघा उभयंतांचं या बाबतीत काम सुरुच आहे. लिस्ट खुपच मोठी आहे पण कामाच्या रगाड्यातुन जसा जसा वेळ मिळत जातो तशा या पाककृतींवर काम करत जातो.
बाकी आपल्या सगळ्या मिपाकरांचे खुप खुप आभार, सर्वांच्या प्रतिक्रीयेमुळे हुरुप वाढला.
18 Jul 2022 - 10:15 pm | सरिता बांदेकर
नक्की करणार.
विस्मृतीत गेलेले पदार्थ आठवायला पाहिजेत,तुमच्या निमित्ताने.
धागा टाकल्याबद्दल धन्यवाद.
18 Jul 2022 - 10:26 pm | यश राज
धन्यवाद सरिताजी
19 Jul 2022 - 8:36 am | nutanm
असाच खानदेशी साटोरी हा पदार्थ आहे बर्यापैकी विस्मरणाात गेलेला व गोड पदार्थ. माझी आई नेहमी करायची पण आता चांगलीच वृद्ध झाल्याने तिला जमत नाही व आम्हाला या पदार्थाचा दुप्पट, तिप्पट खटाटोप झेपत नाही. पीठ (रवा+ मैदा दूधात घट्ट भिजवून तेलाचे मोहन घालून थोडा वेळ रेस्ट देऊन नंतर कुटून मऊ करून
घेणे. एकीकडे गुळाचा शिरा करून घेणे व पीठ कुटल्यावर छोटी पारी लाटून शिर्याचे सारण भरणे व मोठी जाडसर पुरी लाटून घेणे व अशा 4/5 पुर्या लाटून मग तुपात तळून घेणे, खूप सुंदर लागतात , थोड्या मऊ थोड्या खूसखुशीत.
19 Jul 2022 - 12:15 pm | यश राज
खानदेशात साटोरी किंवा सांजरी ही मुख्यत्वे अखाजी म्हणजेच अक्षय तृतीयेला आणि दिवाळी ला करतात.
साटोरी करणे म्हणजे भारीच खटाटोप व वेळखाऊ आहे म्हणून आता हा प्रकार बनवणं कमी होते आहे.
19 Jul 2022 - 3:51 pm | टर्मीनेटर
क्या बात!
खमणी, खमण ढोकळा, सुरळीच्या वड्या हे बेसनाचे अनेक गुजराती पदार्थ मला आवडतात!
लॉकडाऊन मध्ये काही महिने एकटा राहिल्याने आता बरेच पदार्थ बनवताही येतात त्यात इन्स्टंट ढोकळ्याचाही समावेश आहे. पण ही साधी सोपी रेसिपी आवडली 👍
लवकरच करून बघणार किंवा करायला लावणार हे वेगळे सांगणे न लागे 😀
19 Jul 2022 - 4:48 pm | यश राज
खूप खूप धन्यवाद
20 Jul 2022 - 11:55 am | जेम्स वांड
खांडवी
20 Jul 2022 - 12:28 pm | Bhakti
थ्री इडियट मधला गुजराती पदार्थांवरचा संवाद आवडतो,
पर तुम लोग का खाना इतना खतरनाक क्यों होता है ..
. ढोकला,
पास्ता,
Craf,
थेपला ..
. ऐसे लगता है जैसे कोई मिसाइल्स है,
20 Jul 2022 - 1:43 pm | जेम्स वांड
पण पास्ता अन caraf (हे काय असते?) ते गुजराती कधी झाले ?
मला वाटते थ्री इडियट मधील पदार्थ म्हणजे
ढोकला, फाफडा, हांडवा, ठेपला हे आहेत
(वरील चार सकट इतर गुर्जर पदार्थप्रेमी) वांडो.
20 Jul 2022 - 2:20 pm | Bhakti
अय्यो ,माफ करा.
टाईप करायचा कंटाळा आला,कुठुनतरी copy paste केलं.
जाऊ द्या , प्रत्यक्ष ऐका पहा :)
21 Jul 2022 - 11:21 am | टर्मीनेटर
येस्स! प्रतिसाद लिहिताना हेच नाव आठवत होतो, पण "खांडवी" आठवले नाही म्हणुन स्मरणशक्तीला फार ताण नं देता सरळ 'सुरळीच्या वड्या' लिहून मोकळा झालो होतो 😀
धन्यवाद!
20 Jul 2022 - 11:07 pm | सौ मृदुला धनंजय...
खूपच सुंदर आणि सोपी रेसिपी . नक्कीच करून बघेन.
21 Jul 2022 - 12:49 am | यश राज
धन्यवाद मृदुलाजी
21 Jul 2022 - 8:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छीबा ढोकली आवडला पदार्थ. लिहिते राहा. येत राहा.
-दिलीप बिरुटे
21 Jul 2022 - 11:39 am | यश राज
धन्यवाद प्रा. डॉ.
21 Jul 2022 - 10:02 am | गवि
उत्तम. अशा अनवट पदार्थांच्या सीरिज मिपावर अवश्य याव्यात.
21 Jul 2022 - 11:40 am | यश राज
धन्यवाद गवि सर.
22 Jul 2022 - 10:49 pm | मदनबाण
अ रे वा... भारी प्रकार दिसतोय. :) तो वरती व्हिडियोत उल्लेखलेला हांडवा पदर्था देखील चाखुन पहायला मिळावा अशी काहीशी इच्छा झाली ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Parampara
23 Jul 2022 - 12:05 pm | यश राज
धन्यवाद मदनबाणजी
23 Jul 2022 - 9:48 am | कर्नलतपस्वी
मासवडी,पाटवडी सारखाच प्रकार आहे वाटते. धनगर हा पदार्थ खुप भारी बनवतात.अर्थात बाकी लोक सुद्धा बनवतात नाही आसे नाही.
या वड्यांची मस्त झणझणीत आमटी आणी ज्वारीची हातावर थापलेली चुलीवरची भाजी. आहाहा,
23 Jul 2022 - 11:23 pm | यश राज
धन्यवाद सर,
नक्कीच +१
मासवडी किंवा पाटवडी करणे म्हणजे बरेच सोपस्कार असतात. बरेच मेहनतीचे काम पण आहे. पण एंड रिझल्ट एकदम जबरदस्त.
23 Jul 2022 - 9:49 am | कर्नलतपस्वी
भाजी ऐवजी भाकरी वाचावे.
28 Jul 2022 - 11:31 am | गोरगावलेकर
आवडली. नक्कीच करून बघणार
28 Jul 2022 - 2:07 pm | यश राज
खूप धन्यवाद
28 Jul 2022 - 1:34 pm | कानडाऊ योगेशु
मध्यप्रदेशात ह्याला खांडवी असे म्हणतात. का हा वेग्ळा पदार्थ आहे?
28 Jul 2022 - 2:14 pm | यश राज
सुरळीच्या वड्याना मध्य प्रदेशात, गुजरातेत खांडवी म्हणतात.
खांडवी तयार करण्यासाठी अगोदर बेसन दह्यात किंवा ताकात गुठळी न पडता शिजवून घ्यावे लागते व नंतर अगदी कौशल्याने ते पीठ ताटावर पसारवून सुरळीच्या वड्या कापाव्या लागतात.
त्या मानाने छीबा धोकली हा प्रकार खूप सोपा आहे