बीटवरचा पोलीस कडक रुबाबात रस्त्यावरून फिरत होता. ती त्याची रोजची सवयीची चाल होती. तो काही कोणाला रुबाब दाखवावा असा प्रयत्न करत नव्हता, कारण त्याला पाहायला तिथे फारसं कोणी नव्हतंच. रात्रीचे दहा वाजत आले होते. थंड वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या. पावसाचा ओलावा दाटून आला होता. त्यामुळे रस्ते जवळजवळ निर्मनुष्य झाले होते.
चालता चालता तो रस्त्यावरच्या दुकानांची दारं ढकलून पाहत होता. हातातली काठी छानशा लयीत फिरवत होता. अधूनमधून वळून आजूबाजूच्या शांत रस्त्यांवर जरबेची नजर टाकत होता. ताठ, दमदार पावलं टाकणारा तो दक्ष पोलीस म्हणजे जणू मूर्तिमंत शांततेचा रक्षक.
शहराचा हा भाग "लवकर उठे, लवकर निजे" पठडीतला होता. इतक्या उशीरा एखादा सिगारवाला किंवा खानावळ उघडी असलीच, तर तिथले दिवे दिसत होते. बाकीच्या बऱ्याचशा दुकानांची दारं कधीचीच बंद झाली होती.
एका रस्त्यात साधारण मध्यावर येताच अचानक त्याची चाल मंद झाली. तिथल्या एका काळवंडलेल्याशा हार्डवेअर स्टोरच्या दाराला टेकून एक माणूस उभा होता. त्याच्या तोंडात एक न पेटवलेला सिगार होता. पोलीस त्याच्या जवळ पोहोचताच तो माणूस एकदम बोलू लागला. "सगळं काही आलबेल आहे, पोलिसदादा. " समजावणीच्या सुरात तो म्हणाला, "मी इथे एका मित्राची वाट बघतो आहे. आजची भेटीची वेळ आम्ही वीस वर्षांपूर्वी ठरवली होती. तुम्हांला गंमत वाटली असेल ना? सगळं सांगतो, म्हणजे तुमची खात्री पटेल, की यात काही काळंबेरं नाही. आता हे दुकान आहे ना, इथे वीस वर्षांपूर्वी बिग जो ब्रेडी रेस्टोरंट होतं."
"होय, होतं खरं. पाच वर्षांपूर्वी पाडून टाकलं ते. " पोलीस म्हणाला.
दारातल्या त्या माणसाने एक काडी ओढून आपला सिगार पेटवला. त्या प्रकाशात त्याचा फिकटसा चेहरा दिसला. रुंद जबडा, भेदक नजर, आणि उजव्या भुवईजवळ एक छोटासा पांढरा वण. त्याच्या गळ्यातल्या टायवर पिन म्हणून एक मोठाला हिरा लावला होता. तिथे विचित्रच दिसत होता तो हिरा.
तो सांगू लागला, "वीस वर्षांपूर्वी आजच्या तारखेला मी जिमी वेल्स बरोबर इथे बिग जो ब्रेडी मध्ये जेवायला आलो होतो. जिमी म्हणजे माझा परम मित्र. जगातला सर्वात छान माणूस. तो आणि मी दोघं इथे न्यू यॉर्क मध्ये लहानाचे मोठे झालो. अगदी सख्ख्या भावांसारखे आम्ही एकत्र असायचो. माझं वय अठरा, आणि जिमीचं वीस. दुसऱ्या दिवशी मी देशाच्या पश्चिमेला, पार दुसऱ्या टोकाला जायला निघणार होतो. नशीब काढायला. जिमीला न्यू यॉर्कच्या बाहेर ओढून नेणं शक्यच नव्हतं. त्याच्या मते न्यू यॉर्क हे जगातलं एकमेव शहर! तर त्या रात्री आम्ही ठरवलं, की बरोब्बर वीस वर्षांनी त्याच दिवशी, त्याच वेळी इथेच भेटायचं. मग आम्ही कशाही अवस्थेत असलो, कितीही दूरवरून यावं लागलं, तरीही. वीस वर्षांनंतर आपली आयुष्यं घडलेली असणार, हे आम्हांला ठाऊक होतं. जशी आमच्या नशिबात असतील, तशी. "
"अरे वा!क्या बात है.." पोलीस म्हणाला. "इतक्या वर्षांनी भेटणार तुम्ही.. पण म्हणजे इथून निघाल्यानंतर तुम्हांला मित्राची काही खबरच नाही म्हणा की!"
"तसा काही काळ आमचा संपर्क होता, पण वर्षा-दोन वर्षांत तो तुटला. काय सांगू.. पश्चिमेकडचं गौडबंगाल काही निराळंच. मी सारखा आपला इकडे तिकडे धावपळ करत असायचो. पण मला ठाऊक आहे. जिमी जिवंत असला ना, तर आज तो मला इथे नक्की भेटणार. कारण तो म्हणजे जगातला सर्वात सच्चा, शब्दाला पक्का माणूस. तो कधीच विसरणार नाही. इथं या दारात उभं राहता यावं म्हणून एक हजार मैल प्रवास करून आलोय मी आज. आणि माझा मित्र आला ना, की सार्थक होईल त्या प्रवासाचं."
मित्रासाठी थांबलेल्या त्या माणसाने एक सुंदरसं घड्याळ काढलं. घड्याळाच्या झाकणावर छोटे छोटे हिरे जडवलेले होते.
"दहाला तीन मिनिटं बाकी आहेत." तो म्हणाला. "या दारातून निघून आमची ताटातूट झाली ना, तेव्हा बरोब्बर दहा वाजलेले होते."
"तिकडे पश्चिमेकडे चांगलं नशीब काढलंत. खरं ना?" पोलिसाने विचारलं.
"हो तर, अगदी मस्त! जिमीची परिस्थिती माझ्या अर्ध्याने तरी बरी असावी अशी आपली माझी एक आशा. जिमी म्हणजे ना.. माणूस तसा मेहनती, पण नुसता घाण्याचा बैल. मोठमोठ्या चलाख लोकांशी स्पर्धा करावी लागली, तेव्हा कुठे जमवली मी इतकी संपत्ती. न्यू यॉर्क मध्ये आपसूकच स्थिरस्थावर होतो माणूस. पण एखाद्या धारदार पात्यासारखं लखलखतं आयुष्य हवं असेल, तर तिकडे पश्चिमेकडे जावं लागतं."
पोलिसाने काठी गर्रकन फिरवली आणि एक दोन पावलं टाकून पुढे चालत तो म्हणाला, "निघतो मी. तुमचा मित्र लवकर भेटो. पण त्याला उशीर झाला तर? दहाच्या ठोक्याला परत फिरणार का?"
"छे. नाही. तसं कसं करेन? निदान अर्धा तास तरी थांबणार आहे. या पृथ्वीवर कुठेही जिमी जिवंत असला, तर तेवढ्यात पोहोचलाच पाहिजे इथे. चला, अच्छा पोलिसदादा."
"अच्छा." बीटवर पुढे चालता चालता पोलीस पुन्हा दुकानांची दारं तपासू लागला.
थंडी वाढली होती. रिमझिम पाऊस सुरु झाला होता. आता वाऱ्याच्या झुळुका नव्हे, चांगलंच वारं सुटलं होतं. पंधराएक मिनिटं उलटून गेली असतील. रस्त्यावरचे तुरळक लोक भकासपणे, एक शब्दही न बोलता भराभरा चालताना दिसत होते. थंडीमुळे त्यांनी कोटांच्या कॉलरी उभ्या करून त्यात माना दडवल्या होत्या, आणि हात खिशात घातले होते. आपल्या बालमित्राच्या भेटीसाठी एक हजार मैलांवरून आलेला तो माणूस हार्डवेअर स्टोरच्या दारात सिगार ओढत उभा होता. खोटी वाटावी अशीच होती त्याची विचित्र कहाणी.
तो वीसेक मिनिटं थांबला असेल. मग लांब ओव्हरकोट घातलेला एक उंच माणूस रस्त्याच्या पलीकडून घाईने आला. त्याच्या कोटाची कॉलर पार कानांपर्यंत उंचावलेली होती. वाट बघणाऱ्या माणसाकडे जाऊन त्याने जरा संशयानेच विचारलं, "कोण? बॉब? बॉबच ना रे तू?"
"कोण जिमी? जिमी वेल्स?" दुकानाच्या दारातला माणूस किंचाळला.
"देवा!" तो उंच माणूस बॉबचे दोन्ही हात हातांत घेत उद्गारला."होय. बॉब. खरंच. जिवंत असलो, तर आज इथे तू भेटशील, अशी खात्रीच होती मला. बापरे. वीस वर्षं म्हणजे किती मोठा काळ ना रे! ते जुनं रेस्टोरंट गेलं रे आता. पण ते अजून इथे असलं असतं तर..म्हणजे आज परत एकदा आपण तिथे जेवायला गेलो असतो. काय मग, मित्रा, कसा काय वाटला पश्चिमेचा पाहुणचार?"
"मस्त! मला जे जे म्हणून हवं होतं, ते सगळं मिळालं. पण जिमी, तू फार बदलला आहेस गड्या. माझ्यापेक्षा तू दोन तीन इंच उंच असल्याचं आठवत नव्हतं मला."
"अरे, विशीनंतर जराशी उंची वाढली माझी."
"बरं जिमी, न्यू यॉर्क मध्ये चांगलं बस्तान बसलं आहे ना तुझं?"
"माझं ठीक चाललं आहे. एका सरकारी खात्यात नोकरी करतो मी. चल बॉब, इथे माझ्या माहितीत एक ठिकाण आहे, तिथे जाऊ आणि भरपूर गप्पा मारू. जुन्या आठवणी काढू. चल."
हातांत हात घालून दोघं चालू लागले. पश्चिमेकडून आलेला मित्र आपल्या यशाने हुरळून गेला होता. त्याने आपल्या कारकिर्दीचा इतिहास सांगायला सुरुवात केली. ओव्हरकोटात बुडालेला मित्र लक्ष देऊन ऐकत होता.
कोपऱ्यावरच्या फार्मसीवर झगझगीत दिवे होते. तिथे पोहोचताच दोन्ही मित्र एकदम वळून त्या प्रकाशात एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहू लागले.
पश्चिमेकडून आलेला मित्र झट्कन थांबला. त्याने आपला हात सोडवून घेतला. "तू जिमी वेल्स नव्हेस." तो रागाने म्हणाला, " वीस वर्षं म्हणजे मोठा काळ खराच, पण तेवढ्या काळात एखाद्याचं रोमन योद्ध्यासारखं नाक असं पग कुत्र्यासारखं बसकं होऊ शकत नाही."
"पण कधीकधी तितका काळ एखाद्या चांगल्या माणसाला बिघडवायला पुरेसा ठरतो." तो उंच माणूस म्हणाला. "गेली दहा मिनिटं तू अटकेत आहेस, सिल्की बॉब. तू इकडे येणार, अशी खबर शिकागोहून आली होती. तुझ्याशी जरा हवापाण्याच्या गप्पा मारायला सांगितलं होतं त्यांनी. गपचूप चलतोस ना? हं. तेच शहाणपणाचं ठरेल. थांब जरा. पोलीस स्टेशनला पोहोचण्यापूर्वी ही चिठ्ठी वाच. तुला द्यायला सांगितली होती. इथे या खिडकीशी उजेडात वाच. वेल्स साहेबांनी दिलीय."
पश्चिमेहून आलेल्या माणसाने त्या छोट्याशा कागदाची घडी उघडली. चिठ्ठी वाचायला सुरुवात करताना त्याचा हात स्थिर होता, पण वाचून संपेपर्यंत तो थरथरू लागला. चिठ्ठी तशी छोटीशीच होती. "बॉब, मी ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी आलो होतो. तू सिगार पेटवायला काडी ओढलीस. त्या प्रकाशात मला चेहरा दिसला, तो शिकागोत पोलीस शोधत असलेल्या माणसाचा. का कोण जाणे, पण तुला अटक करणं मला जमलं नाही. म्हणून मी तिथून निघून गेलो, आणि साध्या पोषाखातल्या पोलिसाला ते काम करायला पाठवलं. जिमी."
….............................................................................
मूळ कथा : After Twenty Years – O. Henry (१९०६)
प्रताधिकारमुक्त कथा आंतरजालावरून साभार.
कुमार१ लिखित O. Henry यांचा परिचय : https://www.misalpav.com/node/48985
प्रतिक्रिया
16 Jun 2022 - 8:58 am | कुमार१
आवडलीच..
खास O H शैली !
16 Jun 2022 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार
गोष्ट आवडली, शेवट अनपेक्षीत नव्हता पण गोष्ट रंगवुन सांगण्याच्या शैली मुळे वाचावीशी वाटली.
पैजारबुवा,
16 Jun 2022 - 11:14 am | तर्कवादी
फार पुर्वी ही कथा वाचली होती. आता मराठीत वाचायला आवडली.
बीट म्हणजे काय ?
16 Jun 2022 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है. कथा भारी रंगवली आहे, आवडली. ओळ न ओळ, शब्द न शब्द आवडला. कथेचा शेवट पण क्लास आहे.
येत राहावे, लिहिते राहावे...! पुलेशु.
-दिलीप बिरुटे
16 Jun 2022 - 2:34 pm | अमरेंद्र बाहुबली
कथा छान. वाईट वाटलं. ज्या मित्राला भेटायला तो आलाहोता त्यानेच अशी दगाबाजी करावी. मैत्री २० वर्षे जूनी असो की ३५ वर्षे दगाबाजी होतेच. :)
16 Jun 2022 - 3:55 pm | श्वेता व्यास
भाषांतर आवडले.
16 Jun 2022 - 4:22 pm | Bhakti
अगदी छोटीसी फिल्म पाहतेय असंच वाटलं!कमाल कथा रंगवली आहे.
16 Jun 2022 - 7:47 pm | सस्नेह
कथा आवडली. अनुवाद ही छान जमलाय.
16 Jun 2022 - 7:57 pm | सरिता बांदेकर
छान भाषांतर केलंय.
मूळ कथा माहित होती तरी वाचताना उत्सुकता होती,
मित्र येईल का याची.
16 Jun 2022 - 7:58 pm | कर्नलतपस्वी
छान भाषांतर केलय.
17 Jun 2022 - 7:56 pm | स्मिताके
कुमार१, ज्ञानोबाचे पैजार, तर्कवादी, प्रा. डॉ., अ बा, श्वेता व्यास, भक्ती, सस्नेह, सरिता बांदेकर, कर्नलतपस्वी
प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे. मला आवडलेली कथा आपल्यालाही आवडली हे वाचून आनंद द्विगुणित झाला आहे.
कुमार१: आपण लिहिलेली शैलीची वैशिष्ट्ये नेमकी दाखवणारी कथा!
तर्कवादी : प्रत्येक पोलिसाच्या गस्त घालण्याच्या ठराविक मार्गाला त्याचा बीट म्हणतात.
भक्ती : हो, अगदी चित्रदर्शी कथा आहे. मलाही हे प्रसंग डोळ्यासमोर घडल्यासारखं वाटत होतं.