तिसरी कसम
"गळाकाटू वकी$$$$ल '',शिपायाने केलेली पुकार ऐकून डायसवर बसलेल्या काटे एकदम चमकले.
काय आडनावं आहे!चित्र विचित्र आडनावं सगळीकडेच असतात.पण इकडे विदर्भात वेगळीच त-हा आहे.
गिडमिडे,किडमिडे,बुडबुडे,लुकतुके,किरकिरे, एकवेळ ठीक.पण मानकापे,नाकमोडे,गळाकाटू,हाततोडे,
पायमोडे अशी,डोक्यापासून पायापर्यंत शरीराचे विविध अवयवांचा छेद करणारी आडनावे,भयंकरच आहेत.रोज नववीन ऐकायला मिळतात.आडनावांची निर्मिती या विषयावर संशोधन करून पुस्तक लिहीता येईल असा क्षणिक विचार त्यांच्या मनात आला.त्यांना हसू आले .पण समोरच्या फायलीत तोड घालून मोठ्या कष्टाने त्यांनी ते लपवले.साहेब आडनावाला हसले हे वकीलांना कळले तर भानगड व्हायची!
मागच्या वर्षी,मराठवाड्यात एका तालुक्याचे गावी नवीन साहेब आले होते.कोर्टात वकीलांची पुकार होत होती. वाघ,कोल्हे,लांडगे,मोरे,हरणे,ससे,कावळे,रेडे,म्हसे ....,
ही आडनावे ऐकून साहेबांना हसू आवरेना.'इथे तर प्राणी संमेलन आहे ',न राहावून त्यांनी डायसवरून शेरा मारला.झालं!वकीलमंडळी संतापली.साहेबांच्या निषेधाचा ठराव,कामावर बहिष्कार,वरिष्ठांकडे तक्रार,
असे प्रकार सुरू झाले.प्रकरण मिटवायला शेवटी जिल्हा न्यायाधीशांना यावे लागले.हा प्रसंग आठवून ते दचकले.आपण लपवलेले हसू कुणाच्या नजरेत तर आले नाही नं,हे हळूच पाहून घेतले.सुदैवाने कुणाचेच लक्ष नव्हते.ते निर्धास्त झाले .पण त्यांनी तिथेच, मनोमन
मनोमन,'खाओ कसम 'म्हणत ,',डायसवर असताना हसायचे नाही अन कसलेही शेरे मारायचे नाहीत' अशी शपथ घेतली
नव्वद साली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्त झालेल्या काट्यांना नोकरीत सहा वर्षे झाली होती .ही तिसरी पोस्टींग.लातूरातल्या एका तालुक्यातून , विदर्भात या जिल्ह्याचे ठिकाणी बदली होवून आता महिना झाला होता.उन्हाळा संपत आला होता.तरी वातावरण अजून ही गरमच होते.
कोर्टाची मुख्य इमारत दुमजली,भव्य होती.जुनी इंग्रज आमदानीत बांधलेली.तिथले कोर्ट हॉल,निजी कक्ष,इतर खोल्या प्रशस्त मोठमोठ्या होत्या.तिथे जिल्हा न्यायाधीश,
इतर वरिष्ठ न्यायाधीशांचे कोर्ट हॉल आणि प्रशासनिक कार्यालये होती.मुख्य इमारतीत जागा नसल्याने त्यांच्यासारख्या कनिष्ठ आधिका-यांची इतरत्र व्यवस्था केली होती.
पूर्वी इंग्रजी काळात,मोटार वाहने नव्हती तेव्हा बहुतेक
आधिकारी;घोड्यावर किंवा घोडागाडीत बसून कोर्टात येत.त्या घोड्यांसाठी तबेले बांधले होते.पुढे इंग्रज गेले आणि घोडेही गेले.तबेले ओस पडले.कोर्टाला जागा कमी पडू लागली ,तेव्हा या रिकाम्या तबेल्यांची डागडुजी करून त्यांचे रुपांतर कोर्टात करण्यात आले.या दोन तीन कोर्टांना,'तबेला कोर्ट' म्हणत.पैकी एका कोर्टात
बसून ,काट्यांची व्यवस्था केलेली होती.
इथे रुजू झाल्यानंतर दोनतीन दिवसांनी कोर्टाचे आवारात स्कुटर पार्क करून कोर्टात जाताना,''तबेला कोर्टात नवीन साहेब आलेत काय रे?''असे एक वकील दुस-याला विचारताना त्यांनी ऐकले होते.तो 'तबेला कोर्ट'हा शब्द ऐकून ,त्यांनी शिरस्तेदाराकडे विचारणा
केली.तेव्हा त्याने तो इतिहास सांगितला होता.ते ऐकून 'खिंकाळावे की काय 'असे त्यांना वाटले होते.
एसबेस्टॉसचे छत असलेल्या ठेंगण्या कोर्ट हॉलचे हाल
विचारायलाच नकोत.भिंतीलगत फायलीं गच्च भरलेली कपाटे आणि त्यावर,कपाटात जागा नसलेल्या,धुळीने माखलेल्या असंख्य फाईलीं ठेवल्या होत्या.त्यामुळे छता लगतच्या छोट्या खिडक्यां बंदच झाल्या होत्या.
परिणामी त्या हवा,उजेड येण्यासाठी उपयोगी नव्हत्या.पण त्यातून पावसाचे पाणी आत यायला वाट मात्र मोकळी होती. हॉलमधे समोर, थोडे उंचावर डायस होते.डायसवर उभे राहून हात वर केला तर सहज छताला लागे.हॉलमधेच खाली कारकुनांची दोन टेबले,
वकीलासांठी डायससमोर चार पाच खुर्च्या,मागे पक्षकार,
आरोपीसाठी दोन बाके होती.साहेबांचा निजिकक्ष म्हणजे चेम्बर, डायसच्या मागे होता.हॉलचे दारातून आत आल्यावर ,डायस ओलांडून ,साहेब निजि कक्षात जायचे.तिथली परिस्थिती कोर्टहॉल पेक्षा फारशी वेगळी नव्हती.दहाबाय पंधराची खोली.त्यात कपाटे, टेबल ,
खुर्च्यांनी बरीच जागा व्यापलेली होती.कोर्ट सुरू होण्याचे आधी व नंतर आणि मधली सुटी,एवढा काळ वगळता,बाकीचा वेळ डायसवर असल्याने निजिकक्षात फार वेळ बसायला लागत नव्हते,हीच एक समाधानाची गोष्ट होती.
आरोपीवर गुन्हा सिद्ध वगैरे झाला तर,त्याला काय शिक्षा व्हायची ती होई.पण काम करणा-यांना मात्र रोजच दिवस भर बसण्याची शिक्षा होती.
वकील,आरोपी,पक्षकार आले,तरी काम झाले की निघाले.कारकून,शिपाई पण अधूनमधून बाहेर चक्कर टाकत.पण न्यायाधीश साहेबांना,पूर्ण वेळ इथेच बसणे बंधनकारक होते .डायसवर तर बॅडने गळा आवळलेल्या शर्टावर कोट, त्यावर गाऊन,पायात मोजे, त्यावर बूट,असे सगळीकडून बंदिस्तावस्थेतील वेशभुषेत बसायचे.छताला लटकलेला,डुगडुगणारा पंखा देइल ती हवा खायची.वअंगमेहनतीचे काम न करतही घाम ढाळायचाअन न्यायदानाचे काम करायचे.
काल रात्री वादळी पाऊस झाला होता.उकाडा वाढला होता.कोर्टाच्या आवारात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून डबकी झाली होती.काट्यांचे कोर्ट हॉलसमोर तर मोठे डबके झाले होते.त्यात मधोमध एक मोठा दगड ठेवून कुणीतरी थोडी सोय केली होती.कोर्टात जाण्यासाठी त्यावरून उडी मारण्याशिवाय पर्याय नव्हता.तो अडथळा ओलांडताना साहेबांची काय गम्मत होते हे पाहायला काही मंडळी,आपले लक्ष नाही असे
भासवत तिकडे थांबली होती.कॉलेजात एथलॅटीक्स स्पर्धेत भाग घेतल्याचा अनुभव कामी आल्याने,काटे सुखरुप कोर्टात पोहचले.त्यामुळे बघ्यांची पार निराशा झाली .पण त्यांना नंतर काही गंमती जमती पाहायला मिळाल्या होत्या.एकाला डबके दिसलेच नव्हते,तो सरळ चालत गेला दगडाला ठेचकाळला.अनकोर्टाला आपोआप ओला दंडवत घालता झाला.एका सिनियर वकीलसाहेबांचा पाय डबक्यातल्या दगडावरून निसटला अन खोलात गेला.मग भरल्या पॅटनेच कोर्टात हजर होवून त्यांनी प्रकरणात बाजू मांडली.युक्तिवाद सुरू करण्यापुर्वी 'त्या डबक्याचे काहीतरी करा',अशी विनंतीवजा सुचना काट्यांना केली. त्यांनी 'ठीक आहे' म्हणून मान डोलावली.
दुपारी मोठ्या साहेबांचे बोलावणे आले.मोठे साहेब,म्हणजे जिल्हा न्यायाधीश, इतरासारखे बढतीने नाही,तर वकीलीतून सरळ नियुक्तीने जिल्हा न्यायाधीश झाले होते.त्याचा त्यांना फार अभिमान होता. इतर न्यायाधीशांना त्यांच्या समोर उगीच कॉम्प्लेक्स येई.ते कडक शिस्तीचे व फटकळ म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांचे बोलावणे आले म्हटल्यावर काट्यांना उगीच भिती वाटू लागली.आपली कुणी तक्रार केली असेल का?आपली काही चुक झाली आहे का?एक ना अनेक ,शंका मनात येवू लागल्या.मधल्या सुटीत,तयार होवून,म्हणजे कोटावर टाय लावून,काटे दबकतच मोठ्या साहेबांचे दालनात गेले.दालन प्रशस्त व हवेशीर होते.कुलर सुरू होते.दारे खिडक्यांनावाळ्याचे पडदे होते.त्यावर पाणी मारलेले होते.सगळीकडे सुगंधित थंडावा होता.आत इतर न्यायाधीश दिसल्यामुळे काट्यांना हायसे वाटले.
साहेब मोठ्या प्रशस्त,फिरत्या खुर्चीवर बसले होते.
चाळीशी उलटून दोनतीन वर्षे झालेले साहेब; उंचेपुरे, धिप्पाड,व रुबाबदार होते.डोक्यावरचे दाट केसात तुरळक पांढरे केस चमकत होते.गोल फ्रेमचे चष्म्यातून त्यांनी काट्यांकडे पाहिले व मानेने त्यांच्या नमस्काराचा स्विकार केला.त्यांचे बाजूला वयाने जेष्ठ असे सह जिल्हा न्यायाधीश बसलेलेले होते.साहेबांनी त्यांच्यासमोर वकीली केली होती.त्यामुळे ते आता कनिष्ठ असूनही साहेब त्यांना मान देत असत.टेबला समोरचे खुर्च्यांवर इतर न्यायाधीश मंडळीसोबत तिस-या रांगेत काटे बसले.
यावर्षी तिथे बदलून आलेल्या न्यायाधीशांची साहेबांनी पुन्हा एकदा ओळख करून घेतली.प्रत्येकाने उभे राहून आपले नाव,पद,मुळ गाव,कुठुन बदलून आलो आदी माहीती सांगितली.हा ओळख समारंभ सुरू असताना, साहेब अधुनमधून,घर मिळाले का?मुलांना शाळेत प्रवेश मिळाला का?कोर्ट काम कसे चाललेय?वगैरे विचारपूसही करत होते.मग साहेबांनी,'अजून कुणाला काही सांगायचंय का?'असे विचारले.काट्यांच्या डोक्यात,अन डोळ्यासमोर कोर्टा समोरचे डबके होते.
त्यांनी लगेच उठून ती समस्या सांगितली."मग, मी ते डबके बुजवू का?",साहेबांनी त्यांच्यावर नजर रोखून फटकारले.काट्यांना तोंडात चपराक बसावी तसे वाटले.
आपले काय चुकले ते कळेना. ते गांगारून गेले
व तसेच स्तब्ध उभे राहिले.वातावरण एकदम गंभीर झाले.काहींच्या चेह-यावर कुत्सित हास्य होते तर काहींच्या डोळ्यात काट्यांविषयी दया दिसत होती.
आपण नको तेवढे कठोर बोलल्याचे साहेबांच्या लक्षात आले.त्यांनी हातानेच काट्यांना खाली बसायला सागितले.सकाळ पासूनच कोर्टाच्या आवारात साचलेल्या पाण्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला येत होत्या.एक कर्मचारी एका खड्ड्यात पडला होता.एका सिनियर डिव्हिजन साहेबांची स्कुटर पाण्यात बंद पडली होती.स्वतः साहेबांच्याच मोटारीने उडवलेले डबक्यातले पाणी,एका पोलीसाच्या गणवेषावर पडले होते.अनेक
वकीलांनी त्या,डबक्यांबद्दल सामुहिक आणि वैयक्तिक तक्रारी केल्या होत्या.एकंदरित या प्रश्नाने ते स्वत:च
वैतागले होते.तो वैताग काट्यांवर निघाला होता.त्यांनी बेल वाजवून अधीक्षकास बोलावण्यास सांगितले.हातात फाईल घेवून संबंधित अधिक्षक हळूच आत येवून उभे राहिले.'तोंडी निरोप देवूनही पिडब्ल्यूडीचे लोक दुरुस्तीचे कामाला आले नाहित,आता लेखी पत्र दिले आहे' असे त्यांनी सांगितले.' एक्झिक्युटिव्ह ईजिनिअरला फोन लावा, लगेच बोलावून घ्या'.उद्यापर्यंत सगळे काम झाले पाहिजे,अशा सूचना दिल्या.'जी सर' म्हणत,अधिक्षक निघून गेले.
तेवढ्यात चहाआला.आता वातावरण बरेच निवळले होते.साहेब,सहन्यायाधीशांशी बोलत होते.इतर मंडळी हळू आवाजात एकमेकाशी बोलत होती.साहेबांनी पुन्हा सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले.जुने प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न करायच्या सुचना दिल्या.
काट्यांनी इथे आल्यापासूनच त्या साठी प्रयत्न सुरू केले होते.ते सांगावे असे वाटले.पण आधी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मत्यांनी काही न बोलता गप्प बसायचे ठरवले.सहजिल्हा न्यायाधीशांना काटे करत असलेल्या
या कामाची माहिती होती.त्यामुळे त्यांनी साहेबांना त्या विषयी सांगितले.आपल्या वाग्बाणांनी दुखावलेल्या काट्यांना चुचकारण्याची संधी आली, असे साहेबांना वाटले.मग त्यांनी काट्यांकडे ते कसे काम करतात याची चौकशी केली.त्यांनी दबक्या आवाजात मोजक्या शब्दात हवी तेवढी माहिती दिली.साहेबांनी संतोष व्यक्त करत, इतरांना, काटेंसारखे काम करा,गरज असेल तर त्यांचा सल्ला घ्या ,असे सांगितले.हे सगळे सुरु होते तरीही आधीचा प्रसंग काट्यांच्या डोक्यातून जात नव्हता त्यांनी तिथेच ,मनोमन,'खाओ कसम 'म्हणत,'आपल्या कुठल्याच समस्या वरिष्ठांकडे मांडायच्या नाहीत',असी दुसरी शपथ घेतली.
बैठक संपल्यावर काटे आपल्या कोर्टात परतले.वतेव्हा कोर्टाबाहेर फाटक्या कपड्यातल्या एक माणूस,छोट्या मुलाला घेवून उभा असलेला दिसला.अंध असावा .
थोड्या वेळात काटे डायसवर आले.तो माणूस चाचपडत आत आला व लवून नमस्कार करू लागला.'याचे काय आहे?',त्यांनी विचारले."दारूच्या चार पाच जुन्या केसेस आहेत.अनेक वर्षांपासून गैर हजर आहे.आता जुनी प्रकरणं काढली.त्यात परवा वारंट काढले.ते रद्द करून घेण्यासाठीहजर झालाय."शिरस्तेदाराने सांगितले
."काय रे इतकी वर्ष गैरहजर का आहेस?"जेलमधे राहायचंय का?त्याची फाईल पाहात काट्यांनी विचारले.
थोडे पुढे येवून हात जोडत तो गयावया करू लागला.
"साहेब डोळ्यांनी नीट दिसत नाही.काही कामधंदा नाही.त्यात या लेकराची माय कवाच सोडून गेली. त्याला संबाळावं लागतं.भीक मागून कसंबसं जगतो.वकील लावायला पैसे नाहीत.आता तुमीच मायबाप,"त्या किरट्या उघड्या पोराला जवळ धरत, काकुळतीला येत,सांगू लागला.
ते कथन ऐकून काट्यांचे ह्रदय हेलावले.याला जेलमधे पाठवलं तर लहान पोर उघडं पडेल.काय करावे?
"कुणी जामिनदार आहे का?"- काटे
."नाही साहेब,कोण घेईल जामिन?"-तो.
काट्यांना त्याची आणखी दया आली.
"इथून पुढे हजर राहाशील?" थोडा विचार करून,त्यांनी विचारले.
"हो साहेब राहील हजर.जेलात धाडू नका."पुन्हा हात जोडत तो म्हणाला.
कोर्टात हजर असलेला पोलीस अन खालचा कारकून हसतोय असा त्यांना भास झाला.पण तिकडे त्यांनी दुर्लक्ष केले.' वकील साहेब याचे वकीलपत्र घेता का? वैयक्तिक जामीनावर सोडा, म्हणून अर्ज लिहून द्या'.ही कार्यवाही पाहात समोर बसलेल्या एका ज्युनीअर वकीलाला त्यांनी सांगितले.साहेबाचीच आज्ञा म्हणल्यावर,त्याने मान डोलावली.पण नवखा असल्याने,नक्की काय करायचे ते कळेना.शेवटी खाली बसलेला कारकून व पोलीसाच्या मदतीने,त्यांनी विनंतीअर्ज लिहिला,आरोपीची सही घेतली.दुस-या एका वकीलाकडून स्टॅम्प घेवून अर्जावर चिकटवला,व अर्ज शिरस्तेदाराकडे दिला.तो त्याने काट्यांकडे दिला.अर्जात ब-याच चुका होत्या.पण त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी वारंट रद्द केल्याचा,व आरोपीला वैयक्तिक जामीनावर सोडण्याचा आदेश लिहीला .तसे आरोपीला सांगितले.चांगले काम केल्याबद्दल वकीलसाहेबांना धन्यवाद दिले. त्यांना स्वत:लाही आपल्या हातून एक सत्कृत्य घडले असे वाटले.मग ते दुस-या फाईल्स पाहू लागले.
दरम्यान जामीनपत्र देण्याचे ,सह्या करण्याचे सोपस्कार
आरोपीने पूर्ण केले,व मुलासह चाचपडत तो बाहेर गेला.
थोड्या वेळाने काट्यांना त्याची आठवण आली.त्यांनी फाईलीतून डोके बाहेर काढून पाहिले." त्याला सोडले का? कुठे आहे तो?"त्यांनी विचारणा केली.
" हो .आताच बाहेर गेला '',शिरस्तेदार म्हणाला.
तो आंधळा माणूस, त्या लहानग्या पोराला घेवून बाहेरच्या डबक्यातून नीट जाईल ना?खड्ड्यात पडणार तर नाही नं ? त्यांना चिंता लागली.
"बाहेर जा.अन त्याला कोर्टाबाहेर नीट पोहचव ''.त्यांनी लगेच शिपायाला सुचना केली.शिपाई बाहेर गेला व थोड्या वेळात परत आला. व कारकुनाने कानात कुजबुजू लागला.' काय झाले रे?'त्याला विचारले. " काही नाही त्याने पोराला कोर्टाबाहेर झाडाखाली बसलेल्या भिकारणीकडे देलं ,अन सायकलवर बसून निघून गेला ".शिपायाने सांगितले."काय म्हणालास ?"
काटे जवळ जवळ ओरडलेच.त्याने तीच हकीकत पुन्हा सांगितली. ते आवाक झाले.कारकून आणि पोलीसाच्या चेह-यावर, हसू का दिसले ते आठवले.'हॅबीच्युअल आहे तो.बाजूच्या कोर्टात पण पाच सहा खटले आहेत.तिथे पण गैरहजर आहे'.पोलीसाने पुढे येत माहीती पुरवली. 'अरे मग आधी का नाही सागितले?आणि ते पोरगं तरी त्याचं होतं का?"या त्यांच्या प्रश्नावर, 'तुम्ही काम करत असताना आम्ही मधेच कसं सांगावं?'अशा अर्थाचे भाव मुद्रेवर घेवून तो गप्प राहिला.काटे काय समजायचे ते समजले.म्हणजे तो आंधळाही नव्हता,अन ते पोर पण त्याचं नव्हतं.आपल्याला चांगलीच टांग मारली की त्याने!
ते समजले.मग त्यांनी तिथेच ,मनोमन ;'खाओ कसम' म्हणत ,'इथुन पुढे नीट पारख केल्याशिवाय ,पूर्ण खात्री झाल्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवायचा नाही.'अशी तिसरी शपथ घेतली.
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
13 May 2022 - 12:38 pm | कपिलमुनी
कोर्टाचे अनुभव मस्त आहेत.
मी पहिल्यन्दा कोर्टात गेलो तेव्हा चित्रपटातल्या सारखे कोर्ट नसते हे बघून फार निराशा झाली होति..
एका तालुका कोर्टात तर खडूने किण्वा चुन्याने चौकोन आखला होता तोच कटघरा !
हात दोरीने बांधलेले चोर पोलिस निवांत वीडी-काडी शेयर करत गप्पा मारत आहेत . वकील नंबर ची वाट बघत झाडाखाली पेंगत आहेत .. आणि एका कौलारू खोलीत कोर्ट चालू होते.
13 May 2022 - 1:17 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
13 May 2022 - 2:09 pm | Bhakti
छानच !
13 May 2022 - 5:35 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
13 May 2022 - 3:18 pm | सिरुसेरि
कोर्ट परिसराचे सुरेख चित्रण . +१
13 May 2022 - 5:35 pm | नीलकंठ देशमुख
आभारी आहे. प्रतिसादाबद्दल
13 May 2022 - 5:43 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... ! भारी अनुभव.
भोळसट आणी सहृदयी माणसे अशी बळी पडतात असे घडते बर्याच वेळा !
बिच्चारे काटे !!!
कोर्टाच्या वातावरणाचे सुंदर चित्रण !
💖
13 May 2022 - 10:37 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले.
13 May 2022 - 11:03 pm | सौन्दर्य
एकदा एका कन्झ्युमर कोर्टात गुढघ्यावर दुसरा पाय आडवा ठेवून बसल्याबद्दल न्यायाधीशाने मला झापले होते ते आठवले.
16 May 2022 - 7:44 am | नीलकंठ देशमुख
कोर्टात शिस्त पाळावी हे अपेक्षित असते. ते सभ्यपणे संयमी शब्दात सांगता येते.पण वर खुर्चीवर बसल्यावर काही लोकांना आपण फार शक्तीशाली आहोत असे वाटते .सगळ्याना सुधारणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटते.त्यामुळे उगीच झापणे, रागावणे हे होते. मी पण हे केले असेन. आता वळून पाहाता ते चुकीचे होते असे वाटते.
13 May 2022 - 11:47 pm | सुखी
खुसखुशीत
14 May 2022 - 4:30 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
14 May 2022 - 9:46 am | तुषार काळभोर
तुमचे सगळेच लेख चित्रदर्शी असतात. सर्व स्थळे, पात्रे, प्रसंग डोळ्यांसमोर उभे करता. आणि 'न्यायालय' या गोष्टीशी सामान्य माणसाचा अपवादानेच संबंध येतो, त्यामुळे तुमच्या कथा वाचणे रोचक असते.
14 May 2022 - 4:31 pm | नीलकंठ देशमुख
आभारी आहे. प्रतिसाद मिळाला की छान वाटते.
14 May 2022 - 4:31 pm | नीलकंठ देशमुख
आभारी आहे. प्रतिसाद मिळाला की छान वाटते.
14 May 2022 - 5:17 pm | जव्हेरगंज
डिटेलवार वर्णन फार आवडले!!
14 May 2022 - 8:52 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
14 May 2022 - 10:04 pm | फारएन्ड
सुंदर लेख! इतके वास्तवदर्शी वाटणारे डिटेलिंग असले की वाचायला मजा येते. लोकांच्या स्वभावाचे अचूक चित्रण केले आहे.
15 May 2022 - 10:11 am | नीलकंठ देशमुख
छान वाटले अभिप्राय वाचून. धन्यवाद