वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
30 Apr 2022 - 9:28 am

असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.

ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला
गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं
होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते.
अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका
नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात
एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती.
कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल? तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल?
नवीन मित्र चांगले मिळतील का? त्यांच्याशी आपले आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळायला हवेत..
हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवता येतील, अशी नाती
इथे तयार व्हायला हवीत...!

साला हे असलं कायतरी फोकनाड लिहायलाच
पायजे का ??

कारण ते तसं काईच नव्हतं. बारावीचा निकाल
लागलेला. बरा होता.
तर वडील बोल्ले आता फुडं काय?
मी बोल्लो असा असा कराडला नंबर लागलाय.
जाऊन ॲडमिशन घेऊन येतो.
ते बोल्ले की मी यिऊ का बरोबर?
मी बोल्लो की तुमी तिथं येऊन काय करणार?
माझं मी बघतो. पैशे तेवढे द्या.
त्यांनी दिले. मी घेतले.
हे एवढंच झालं.

मी काही लगेच त्यांना वाकून नमस्कार वगैरे केला
नाही. कारण त्यावेळी समजा ते कमरेला टॉवेल
लावून तंबाखू मळत होते. आणि तंबाखूचा बार
भरल्यावर माणूस जिकडे जातो, तिकडे जाण्याची
गडबड त्यांच्या हालचालींमध्ये ठळकपणे दिसत होती..!

शिवाय नंतर आई पण गालावर हात वगैरे फिरवून
बोलली नाही की, जा बाळा, चांगला शिकून मोठा हो..
माझे सगळे पांग वगैरे फेड..!
किंवा समजा "अरे राहू दे राहू दे.. माझ्या कशाला?
देवाच्या पाया पड..!" हे असलं काही बोलण्याची
संधीच मी तिला दिली नाही..!
त्यामुळे ती बोलली की आता डबा वगैरे कशाला
उगाच? घरचंच किती काळ खाणारेस तू ? कंटाळा नाही का आला?

किंवा नंतर समजा आमचं सगळं गाव वगैरे मला
निरोप बिरोप द्यायला वेशीपर्यंत लोटलं नाही..
कारण साला कुणाला काय पडलंय कामं-धामं
सोडून.‌.! त्यामुळे बस गावाबाहेर पडताना माझ्या
घशात आवंढे दाटून यायचे थोडक्यात हुकले..
आणि आता गेला तो चान्स कायमचाच..!

बस कराडात शिरायच्या आधी खिडकीतून दिसली
अस्ताव्यस्त पसरलेली पात्रात तुडुंब भरलेली
एक नदी..!
पार पुलाला पाणी टेकलंय.. त्यामुळंच गाड्या
हळूहळू सरकतायत..!
आता हा जुनाट पूल हिच्या दणक्यात गचकला
नाय म्हणजे झालं..!
पण साला एवढी भरगच्च नदी असते??
कृष्णाच असेल काय ही..? पण ही काय त्या गाण्यातल्यासारखी संथ बिंथ वाहत नाय..!
उलट, फेसांडत फुफाटत हिच्या वाटेत जे येईल
त्याला आडवं करतच आली असणार ही..!
बाब्बौ..! एवढा वेळ बघायला नाय पायजे.! हे पाणी खेचतंय आपल्याला..!!
हे ड्रायव्हराss आता तू पळव बाबा गाडी लवकर..!
अजून माझं बरंच जगायचं राह्यलंय..!

बाकी मग कराडात बसमधून उतरून स्टॅण्डबाहेर
आलो तर सगळे रिक्षावाले "कॉलेsज कॉलेsज"
म्हणून मोठमोठ्यानं हाकारत होते...

मला कळेना की ही काय भानगड आहे..? एखाद्या
विशिष्ट कॉलेजचं नाव का घेत नाहीयेत कुणी..!

नंतर कळलं की कराडात 'सैदापूर' भागात सगळेच नामांकित कॉलेजेस एकवटले आहेत..!
गव्हर्नमेंट इंजिनिअरींग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक,
गव्हर्नमेंट फार्मसी, वेणुताई चव्हाण सायन्स
कॉलेज, एसजीएम वगैरे वगैरे सगळेच..!
यशवंतरावांची पुण्याई..! आणि काय?

तर रिक्षावाल्यानं मला "राष्ट्रोद्धाराय तंत्र शिक्षणम्"च्या कमानीपुढं सोडलं आणि मग राष्ट्राचा उद्धार बिद्धार करण्याच्या हेतूने मी दोन बॅगा सांभाळत
ॲडमिशनच्या लायनीत उभा राहिलो.
काहींच्या ॲडमिशनसाठी आई बाप काका मावश्या
मामा माम्या आज्जी आजोबा लहान भावंडं वगैरे
सगळा गोतावळाच नटून सजून आलेला दिसतोय..!
म्हटलं की बाबा लग्न वगैरे आहे की काय इथं
आसपास..?
पण तसं काईच नव्हतं ते..
पोराला एकटं कसं सोडायचं हा एकमेव प्रश्न
असणार..!
कारण ते तसं असतंच ना म्हणजे..!‌
म्हणजे समजा एखाद्या पर्यटन स्थळी लहान
पोराला घोड्यावर बसवून त्या घोड्याच्या मागे पर्स
सावरत पळणारी चिंताग्रस्त आई बघितलेलीच
असेल ना..!
कारण त्या घोडेवाल्यानं समजा आपल्या पोराला
पळवून बिळवून नेलं तर काय घ्या.! म्हणून सोबत पळालेलं बरं..!
घोडेवाल्याचा तसा काही दुष्ट प्लॅन दिसला तर लगेच
शोले-स्टाईल झडप घालून पकडता येईल..!
ये हाथ नहींss फांसी का फंदा हैं वगैरे..!

कारण मग तो पोरगा नंतर घोड्यावरनं उतरून
आता समजा स्वतःच भलामोठा घोडा झालेला
असला तरीही काळजी असतेच ना..!
आणि पुढेही समजा आपल्या घोड्याला नंतर
एखादी सुस्वभावी सुस्वरूप किंवा समजा खानदानी
वगैरे घोडी मिळाली तरीही काळजी उरतेच ना..!
आणि मग त्या घोडा घोडीने मिळून नंतर समजा
स्वतःचे घोडा घोडी जन्माला घातले तरीही शेवटी
जीवाला काळजी असतेच ना..!
नाहीतर हे सगळे आज्जी आजोबा वगैरे सहकुटुंब सहपरिवार एवढ्या अगत्याने कशाला आले असते
उगाच..!

तर होस्टेल ब्लॉक सी..!
होस्टेलची संपूर्ण वर्षाची फी फक्त सहाशे रूपै..!
काळ्या दगडांतली दणकट जुनी बिल्डींग.
रूममध्ये तीन खाटा..! तीन्ही खाटा मधोमध
अर्धवर्तुळात बेंड झालेल्या..!
ह्या खाटांना बोलतं करायला पाहिजे..!
भयंकर अत्याचारांच्या दबलेल्या कहाण्या सांगण्यास
त्या इच्छुक असणार ..!
बाकी इथे राहून गेलेल्या पूर्वजांची भीषण सेक्शुअल उपासमार झाल्याची स्पष्ट चिन्हंही सगळीकडे
दिसतायत..!
कारण भिंतींवर आणि कपाटांच्या दारांमागे
खजुराहोला फेफरं आणतील अशा पद्धतीच्या
लैंगिक हालचालींसंबंधी कलाकारी..!
ह्या पूर्वज रूममेट्स कलाकारांना दैवी प्रतिभेचा
स्पर्श झाला होता..!
परंतु योग्य नैसर्गिक आउटलेट न मिळाल्यामुळे ही देणगी
अशीच इथं सांडून गेलेली दिसते..! दुर्दैव..!

खिडकीतनं बाहेर बघितलं तर सगळीकडं गारेगार
हिरवं कोवळं लुसलुशीत गवत..!
आणि भरपूर झाडं..!
या भागात सगळीकडे हे असंच असणार..!
त्यामुळेच श्रीनिवास कुलकर्णींनी 'डोह' मध्ये एवढी
चांगली निसर्गवर्णंनं करून ठेवली आहेत..!
अशा वातावरणात राहिल्यावर माणसाच्या मनाची
टवटवी टिकून राहणारच ना..!

पण आमच्या नजरेला एवढ्या समृद्ध हिरवाईची
सवय नाय..!
कारण बदाबदा कोसळणारं प्रचंड ऊन ही एवढीच
नैसर्गिक साधनसंपत्ती देवाने बहाल केलीय
माणदेशाला..!
"घ्या हे ऊन आणि ऐश करा" बोल्ला देव..!
त्यामुळे समजा आमच्या प्रिय माण नदीत
सदानकदा कोरड्या रखरखीत वाळूची डबरी आणि काठांवर चिलारी..!
आणि मग त्या भांडवलावर आम्ही कोणत्या कवितांचे आणि किती मजले उभे करावेत बरं ?
कदाचित कुलकर्णींना पण ते जमले नसते..!
मग आमचा विषय कुठून येतो?

शिक्षणप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

30 Apr 2022 - 9:47 am | सुबोध खरे

छान लेख

प्रदीप's picture

30 Apr 2022 - 10:27 am | प्रदीप

हे तर किंचीत, 'कोसला २०२२' झालंय!! आवडले.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2022 - 12:47 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त.

sunil kachure's picture

30 Apr 2022 - 12:55 pm | sunil kachure

छान जमली आहे कथा.

मजा आली वाचताना...

धन्यवाद!!

तुषार काळभोर's picture

30 Apr 2022 - 6:16 pm | तुषार काळभोर

स्वतः हॉस्टेलवर राहायची वेळ आली नाही, पण मित्रांच्या रुमवर पडीक असल्याने अंमळ नॉस्टॅल्जिक झालो.. पण हॉस्टेलवर राहून वायाला जाणं हे जगायला शिकवतं!

उगा काहितरीच's picture

30 Apr 2022 - 4:09 pm | उगा काहितरीच

छान झालंय लिखाण. पुढील भाग पण येऊ द्यात.

सस्नेह's picture

30 Apr 2022 - 5:34 pm | सस्नेह

आणखी येऊद्या...

कर्नलतपस्वी's picture

30 Apr 2022 - 8:52 pm | कर्नलतपस्वी

धबधब्या खाली किवा मुसळधार पावसात चिंब भीजल्यागत......

काय बदा बदा आगदी महादेवाच्या डोक्यावर आकाशातून गंगा पडल्यावरही....

नादच करायचा नाय......

ओपन सिक्रेट....
मस्तच. आवडले.

कर्नलतपस्वी's picture

30 Apr 2022 - 8:52 pm | कर्नलतपस्वी

धबधब्या खाली किवा मुसळधार पावसात चिंब भीजल्यागत......

काय बदा बदा आगदी महादेवाच्या डोक्यावर आकाशातून गंगा पडल्यावरही....

नादच करायचा नाय......

ओपन सिक्रेट....
मस्तच. आवडले.

कर्नलतपस्वी's picture

30 Apr 2022 - 8:52 pm | कर्नलतपस्वी

धबधब्या खाली किवा मुसळधार पावसात चिंब भीजल्यागत......

काय बदा बदा आगदी महादेवाच्या डोक्यावर आकाशातून गंगा पडल्यावरही....

नादच करायचा नाय......

ओपन सिक्रेट....
मस्तच. आवडले.

सुखी's picture

1 May 2022 - 4:52 am | सुखी

झकास जमली आहे

चौथा कोनाडा's picture

1 May 2022 - 1:07 pm | चौथा कोनाडा

भारी लिव्हलंय !

चौथा कोनाडा's picture

1 May 2022 - 1:07 pm | चौथा कोनाडा

भारी लिव्हलंय !

अनिंद्य's picture

2 May 2022 - 4:23 pm | अनिंद्य

झक्कास !

चांदणे संदीप's picture

3 May 2022 - 9:01 pm | चांदणे संदीप

कॉलेज, अ‍ॅडमिशन आणि त्यावेळेसच्या मनातल्या भावनांची गर्दी अचूकपणे उतरलीये लेखनात. थोडक्यात पण भारीच.

सं - दी - प

मुक्त विहारि's picture

3 May 2022 - 9:16 pm | मुक्त विहारि

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ....

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

4 May 2022 - 3:12 am | हणमंतअण्णा शंकर...

एक दोन गोष्टी वगळता तंतोतंत.

चिलारीच्या ऐवजी घाण बाभळ आणि गारवेल.

कराडात आयटीला अ‍ॅडमिशन मिळूनदेखील प्रवेश घेतला नाही कारण डोक्यात एम्बीबीएसचं खूळ घुसलं होतं.

आपल्या पायावर उभं राहायला इतकी वर्षं द्यायची मात्र तयारी नव्हती आणि बेसिक ट्रेड बरी म्हणून शेवटी मात्र कोल्हापुरात इंजिनियरिंग केलं.

आजी-आजोबा मात्र सोडायला आले होते. दोघांनाही तणतणत केएम्टीनं कॉलेजात नेलं. होस्टेल कॉलेजजवळच होतं. सगळं पार पाडून शेवटी होस्टेलवर बॅगा टाकल्या.

आजी साधी सुती साडी घालून माथ्यावरून पदर घेऊन. आजोबा टेरिकॉटच्या घळघळीत विजारीत. दशकांचा दुष्काळी राप दोघांच्याही रंध्रारंध्रात. आणि कोल्हापुरातला तो सुखद भुरुभुरु पाऊस. १७ वर्षांनी गाव सोडणारा भांबावलेला मी.

कोल्हापूर सीबीएसवरती तो निर्णायक क्षण आला. त्या क्षणापुढे खूप मोठा कडेलोट असतो. मी बेसावध नव्हतो तरीही घाबरलेला होतोच. इथून पुढे आजीच्या काकणांची किणकिण ऐकत जाग येणार नाही हे जाणवून देणारा क्षण. आजोबांच्या घोरण्याने झोपमोड होणार नाही हेही. आम्हाला वाढवताना त्यांना पोटाला चिमटा वगैरे काढावा लागला नाही तरी तिथपर्यंत यायला प्रचंड खस्ता खाल्या हे तर दुसरी-तिसरीपासुनच मला कळत होतं. आई माझ्या वडिलांच्या अपघाती मरणानंतर वर्षातच आम्हां दोन भावंडांना अनाथ करून त्यांच्या पदरात टाकून एका पावसाळी रात्री कुठेतरी एकटीच निघून गेली ते असहाय्य पोरकंपण त्या वियोगाच्या वेळेस गच्च गच्च भरून आलेलं. ते तर अजाणतं स्वत:च पोरकं असलेलं पोरकंपण होतं. आणि हे मात्र जाणतं, व्याकूळ आणि भितीनं गांगरून टाकणारं पोरकंपण. मुलाच्या मरणातही धीरगंभीर राहिलेले दोन दशकांचे अश्रू बांधून ठेवलेले आजोबा , अश्रू म्हणजे स्वभावातल्या मायेचाच अवयव असणारी आजी आणि भेदरलेला मी कितीतरी वेळ आपली अंत:करणं रिकामी करत राहिलो.

आपण मोठे स्वतंत्र झालो हे जाणवून देणार्‍या, आपला सर्वव्यापी भूतकाळ आपल्यावर धबाधब ओतणार्‍या आणि अधांतरी भविष्यकाळ आडाख्यांनी रचायला लावणार्‍या ज्या जागा आयुष्यात असतात त्यांचे नेपथ्य असणारे हे दुर्मिळ प्रहर.

आजोबा त्यानंतर दोनदा कॉलेजवर येऊन भेटून गेले. त्यांना राहवत नसे. येताना आवर्जून सशाचं भरपूर कालवण घेऊन येत. एकदा त्यांनी गावच्या एस्टी ड्रायव्हर कडून मोठा डबाभरून कापड बांधून जिवंत खेकडेसुद्धा पाठवले होते. कुणी कोल्हापुरात येणार असतील तर आजी हमखास मटण किंवा मासे करून पाठवून देई. माणदेशातल्या, किंवा माझ्या गावाशेजारच्या माडग्याळ बोकडांचे मटण, विशिष्ट मसाले, शेंगदाणा गुळाच्या आणि म्हशीच्या कणीदार तुपाच्या पोळ्या, बाजरीच्या पातळ दिडदोन महिने टिकणार्‍या भाकर्‍या, कोरड्या चटण्या, लोणची वगैरे एक्झॉटिक गोष्टी माझ्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना आवडत.

त्यामुळे तिथली हिरवळ, समृद्धी माझ्या अंगावर आली नाही. उलट पाण्याने फुगफुगलेल्या हायब्रीडीपणाचा त्रासच व्हायचा. त्यापेक्षा अधिक सकस, रानमटकीच्या भाकरीसारखं दुष्काळी पण अस्सल मूल्यवान मला भूतकाळाने दिलं होतं. ते संचित त्याच्या सगळ्या शतकानुशतकांच्या दारिद्र्याने मला खूप उर्जा पुरवित राहिले.

दत्तकप्रकरणात दंगली झाल्या तेव्हा आजोबा कोल्हापुरात शालिनी पॅलेसवर एसारपीच्या नेमणुकीत होते. रंकाळ्यात गळ टाकून मासे पकडणे हा विरंगुळा. मी त्याच घाटावर खूपदा एकटा बसून कल्पनांचे गळ टाकत विचारांची मढी उकरत बसे. वाण आणि गुण दोन्ही गेले नाहीत. खिशात फक्त बसपुरते पैसे, क्वचित गंगावेश टीस्टॉलवर चहा-मिसळ खाण्याइतपत उरलेले. त्यामुळे कोल्हापुरातल्या दुपारींना मदनमोहनच्या गाण्याचा स्कोअर असे. आजोबांनी ज्या अनेक नोकर्‍या केल्या त्यातली एक म्हणजे गावोगावी सरकारकडून चित्रपट दाखवणे. साठीतल्या चित्रपट संगीताची गावच्या रखरखत्या असह्य उन्हालाही त्यामुळे कड होतीच.

मी कुलकर्णी अजून वाचले नाहीत. माझं ते वय निसटलं.

राजारामपुरीतल्या बाईच्या पुतळ्याजवळच एक रद्दीवाला होता. त्याच्याकडे मौजेचे दिवाळी अंक किलोवर मिळत. एकदम स्वस्तः नॅशनल जिओ मात्र प्रिमियम लावून.
कुठल्याश्या दिवाळी अंकात कराडच्या घराविषयी कुलकर्णी की संत यांचा एक ललित लेख वाचल्याचे स्मरते. कुलकर्णींच्या मुलाचा नव्हे. बहुतेक संतांचाच असावा.

अनिंद्य's picture

4 May 2022 - 11:00 am | अनिंद्य

हे आवडले. थेट, खरेखुरे, मनातून आलेले.

वेगळा स्मृतिलेख लिहिण्याचे मनावर घ्या अण्णा.

मुक्त विहारि's picture

4 May 2022 - 8:22 pm | मुक्त विहारि

वाचता वाचता, अक्षरे अंधूक झाली....

सुक्या's picture

4 May 2022 - 11:16 pm | सुक्या

जबरदस्त !!!
अगदी मनापासुन आलेले ...

वामन देशमुख's picture

4 May 2022 - 6:52 am | वामन देशमुख

छान लिहिलंय, पाटील.
अजून येऊ द्या.

सिरुसेरि's picture

7 May 2022 - 10:51 am | सिरुसेरि

सुरेख लेखन आणी प्रतिसाद . ज्याला शिकण्याची तळमळ आहे , तो कितीही अडचणी आल्या तरी त्यातुन मार्ग काढतोच .