बघता बघता दिवाळीची सुट्टी संपली. पंधरा दिवस शेवरीच्या कापसासारखे भुर्रकन उडून गेले. नाहीतर शाळेतला एक तास एका दिवसासारखा, संपता संपत नाही. त्यात मधल्या सुट्टीनंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा किचकट विषयांचा तास असेल तर जास्तच कंटाळा येणार. हातात घड्याळ नसल्यानं किती वाजलेत समजायचं नाही, म्हणून खिडकीतून वर्गात डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या किरणांची खूण ठेवायचा प्रयत्न केला, पण सूर्यमहाराज कधी वेळेवर नसायचे. तास सुटताना खूण करून ठेवली तर, दुसऱ्या दिवशी ते भलतीकडेच असणार, त्यामुळे सूर्यावर जाम चिडलो मनात ठरवून टाकलं, चंद्र, तारे तोडून आणणाऱ्या एखाद्या येडपटला गाठावं, शिडीवर शिडी, शिडीवर शिडी असं करत-करत ढगाजवळ पोहोचावं, ढगांवर उभं राहून सूर्य तोडून आणावा, चांगली अद्दल घडेपर्यंत त्याला थंड पाण्याच्या डोहात डुबवून काढावा. हल्ली असे खुळ्यासारखे काहीही विचार माझ्या डोक्यात घोळत राहतात, पण उगाचच कुणी आपल्यावर हसायला नको, म्हणून मी कुणाला सांगत नाही
एके दिवशी सरानी विचारलं,"सांगा पाहू, सूर्य उगवला नाही, तर काय होईल. तसा आमच्या वर्गातील चोंबडा उठला. तसं त्याच नाव विजय, पण! मस्ती करणाऱ्या मुलांची नावं सांगण्यापासून,आपण किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी सारखं सरांच्या पुढं पुढं करणार म्हणून सगळे त्याला चोंबडा म्हणायचे.
"सर, अंधार होईल,"चोंबडा म्हणाला.
"तू अतिशहाणा आहेस, खाली बस."
सर त्याला कधीच टाकून बोलत नाहीत, पण नकळत त्यांच्या तोंडून हे वाक्य निघालं, असा दुर्मिळ क्षण कुणीच सोडणार नव्हतं, सगळा वर्ग जोरजोरात हसू लागला, एवढे जोरात कि त्या हास्यांमधुन कृत्रिमतेचं भलंमोठं टेंबुक बाहेर डोकावू लागलं. त्याचा चेहरा तर बघण्यासारखा झाला. सरांनी दोन तीन वेळा डस्टर टेबलवर आपटल्यावरच सगळा वर्ग शांत झाला. आपलं उत्तर बरोबर असून सुद्धा सरांनी आपला अपमान केला, हे त्याच्या मनाला लागल्यानं तो पुन्हा म्हणाला,"सर, माझं उत्तर बरोबर आहे, अंधारच होईल ना?"
"अरे, अंधारच होईल, हे एखादं शेंबडं पोरगं पण सांगेल."
तसं या वाक्यात हसण्यासारखं काहीच नव्हतं तरी पुन्हा सगळे हसू लागले.
"पुरे झालं आता," रागावल्याचं नाटक करत सर म्हणाले.
'अजून कोण सांगणार,' म्हणत त्यांनी प्रकाशला उठवलं.
"जास्त झोपायला मिळल,"प्रकाश म्हणाला.
"तू नुसत्या झोपा काढ, शाळेत येऊन पण झोपाच काढतो ना रे! अजून किती झोपा काढणार?"
परत सगळा वर्ग हसू लागला, प्रकाश सुद्धा हसण्यात सामील, प्रकाशला कुणी टाकून बोलू दे, नाहीतर टोचून बोलू दे, त्याला कधीच राग येणार नाही. घडणारी प्रत्येक गंमत तो आनंदाने अनुभवणार. भले त्यासाठी तो स्वतः जबाबदार असला तरी. प्रकाशचं पण तसं बरोबरच होतं, त्याच्या वयाची मुलं, म्हणजे आम्ही चांगले सात-साडेसात वाजेपर्यंत झोपायचो, प्रकाश सहा वाजता उठून गुरं चरायला घेऊन जायचा. गोठ्याची साफसफाई करून झाल्यावर त्याचा बाप त्याला घरी सोडणार. कधी कधी प्रकाश म्हणायचा,"एकदातरी ताप येऊन आजारी पडायला हवं, म्हणजे चांगलं आठ वाजेपर्यंत झोपायला मिळलं." पण या बाबतीत प्रकाशच नशीब फुटकं होतं, तो कधीच आजारी पडायचा नाही.
शाळेचा पहिला दिवस सुट्टीत सोडवायला दिलेल्या प्रश्नपत्रिका तपासणार म्हणून बऱ्याच जणांच्या मनात धाकधूक. दोन-चार हुशार मुलं आणि सगळ्या मुली सोडल्या तर बाकी सर्वांचा दिवाळीचा अभ्यास अपूर्ण. एखादी मुलगी कितीही ढब्बू असली तरी गृहपाठ मात्र पूर्ण. शाळेतून घरी जाऊन आईला कपडे धुवायला, भांडी घासायला, पाणी भरायला मदत करून गृहपाठ करायला यांना वेळ तरी कधी मिळतो? हा समस्त मुलांना पडणारा एक प्रश्न! नाहीतर मुलं शाळा सुटल्यावर उनाडक्या करत हिंडणार आणि गृहपाठ अर्धवट. मी मात्र माझा गृहपाठ पूर्ण करायचो. उगाच सरांकडून मार खाऊन, अपमान करून घ्यायला आवडायचं नाही. कधी असा प्रसंग आला तर तो घाण्याच्या बैलासारखा दिवसभर डोक्यात गोल गोल फिरत राहणार. हजेरी घेऊन झाल्यावर सर गृहपाठ तपासू लागले. पहिलाच नंबर सुरेशचा.
सरांनी सुरेशला उठवून विचारले,"काय, गृहपाठ झाला का?
सुरेश आणि अजून आठ दहा मुलं दोन-अडीच किलोमीटर दूर असलेल्या बाजूच्या गावातून यायचे. नेहमी हि मुलं एवढ्या दुरून चालत यायची, पण आज पहिला दिवस असल्यानं सकाळच्या एस.टी. नं येऊन तासभर बाहेर थांबलेली.
"हो सर," सुरेश उत्तरला.
"आण बघू, दाखव! " सर म्हणाले.
"सर, सकाळी एस. टी. नं आलो, सुरेश घाबरत घाबरत म्हणाला.
तू एस.टी. ने आला कि घोड्यावरून मी विचारले का?
सरांच्या या प्रश्नावर सगळ्या मुलींच्या खी खी च्या खळखळाटाची, आणि ज्या मुलांचा गृहपाठ पूर्ण होता त्यांच्या खो खो च्या गडगडाटाची एक लाट वर्गभर पसरली, ज्यांचा गृहपाठ अपूर्ण ते मात्र एखाद्या संन्यास्यासारखे गंभीर. त्यांना माहीत होतं ह्या लाटेचा आपल्यालासुद्धा फटका बसणार आहे.
"मी काय सांगितलं, गृहपाठ घेऊन ये!" सर कडाडले.
" सर, सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेचे ताव हातात होते, हात चुकून खिडकीबाहेर काढला, तेव्हढ्यात झाडाची फांदी हाताला लागून ताव हातातून सुटले, " सुरेश घाबरत पण, एका दमात म्हणाला.
"थापा मारतोस का?" सर ओरडले.
"नाही सर, तुमच्या गळ्याची शप्पथ," सुरेश भाबडेपणाला म्हणाला.
" खोटं बोलतो, वरून माझी शप्पथ घेतोस, मला लवकर वर पोचवायचा विचार दिसतोय, म्हणजे तुम्ही उंडगायला मोकळे, काय रे?
सरांच्या या वाक्यावर परत सगळ्या मुली हसू लागल्या. सुरेशनं मुलींकडे रागानं पाहिलं आणि ठामपणे म्हणाला," सर, तुम्हाला खोटं वाटत असेल तर नितीन ला विचारा , तो माझ्याच बाजूला बसला होता. "
"काय रे नित्या, हा खरं बोलतोय," सरांनी नितीनला विचारलं.
"हो सर," नितीन खाली मान घालून म्हणाला.
"काय? वकील पत्र घेतलाय का त्याचं”
“नाही सर,”
आणि तुझा गृहपाठ झालाय का?"
"हो सर," अजूनही नितीन ची मान खालीच होती.
"आण बघू" सर म्हणाले.
नितीन काही जागेवरून हलला नाही, तसे सर ओरडून म्हणाले," आण ना, गधड्या"
"सर, मी लिहिलेले ताव सुध्दा सुरेश कडे दिले होते," नितीन घाबऱ्या आवाजात म्हणाला.
नितीनच्या ह्या उत्तराने वर्गात हास्यांचा स्फोट झाला. थोड्यावेळापूर्वी सर चिडल्यासारखे वाटत होते. पण आता, ते सुद्धा गालातल्या गालात हसू लागले, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. सर जागेवरून उठून सुरेश जवळ येऊन म्हणाले, " कुठल्या हातात गृहपाठ होता पुढे कर!"
सुरेशनं मुकाटयाने हात पुढं केला. सरानी जोरात हातावर पट्टी मारली. सुरेशनं आपलं तोंड वेडंवाकडं करत हात मागे घेऊन दुसऱ्या हाताने चोळू लागला.
"आता कुठलेच कागद हातातून सुटणार नाहीत, काय? "
आपला मोर्चा नितीन कडे वळवत सर म्हणाले," तुझ्याकडे दफ्तर नाही कि हात नाहीत, तो तुझा नोकर आहे, तुझा अभ्यास सांभाळायला?"
नितीनची मान अजून हि खालीच होती. "अहो नितीन साहेब मी तुम्हाला विचारतोय, नव्या नवरी सारखी मान खाली घालून काय उभे?"
सरांच्या ह्या वाक्यावर पुन्हा मुली हसू लागल्या, मुलं मात्र एकदम शांत, आम्हाला माहित होतं सर चिडले म्हणजे त्यांच्या तोंडून साहेब, बाईसाहेब असे शब्द बाहेर पडतात. तरीसुद्धा नितीन घुम्यासारखा उभा, त्यामुळे सर जास्तच चिडले. नितीनच्या दोन्ही हातावर पट्टीचा एक एक फटका बसला. आता वर्गात एकदम शांतता पसरली, ज्यांचा ज्यांचा गृहपाठ अर्धवट सगळ्यांची तोंडं काळवंडली. माझा गृहपाठ पूर्ण होता, तरीसुद्धा छाती धडधडू लागली.
पुढचा नंबर प्रकाशचा, प्रकाशची कारणे सगळ्यापेक्षा वेगळी, करमणूक करणारी. एके दिवशी प्रकाशनं दांडी मारली, दुसऱ्या दिवशी सरांनी विचारलं," काल का नाही आलास?"
"सर, काल आमची गाय व्याली," प्रकाशनं उत्तर दिलं.
प्रकाशच्या उत्तरावर सगळा वर्ग हसू लागला.
"मग, तू काय बाळंतपण करायला राहिलास? कि बारश्याची तयारी करत होतास? सरांनी विचारले.
पुन्हा एक हास्यांचा स्फोट झाला, या वेळेस प्रकाश सुद्धा हसण्यात सामील झालेला, जणू काही तो प्रश्न त्याला विचारला नसून इतर कुणाला विचारला असावा. सरांनी प्रकाशला उठवलं, प्रकाश आज काय कारण सांगतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं.
"गृहपाठ घेऊन ये!" सर म्हणाले.
"सर, मी मुंबईला गेलो होतो," प्रकाशचं वाक्य पूर्ण होण्या अगोदर सर वैतागून म्हणाले," तू कुठे दिल्लीला गेलास कि काय? मी विचारलं का, फक्त गृहपाठ घेऊन ये एवढंच सांगितलं ना?
प्रकाशनं हो म्हणून नुसतीच मान हलवली.
"मग, आण बघू!" सर म्हणाले.
"मामाने दिवाळीचा फरार दिला होता,
प्रकाशच वाक्य पूर्ण होण्याअगोदर सर प्रकाशजवळ पोहचले, त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले," अरे, मी विचारतोय काय? तू बोलतोयस काय?
कशाचा कशाशी मेळ आहे का?
प्रकाशनं नाही म्हणून नुसतीच मान हलवली.
"मग ?" सर म्हणाले.
सर, खरोखरच चीडले होते. प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवल्यावर, तो थरथरायला लागला होता. आता पुढे ज्यांचे नंबर होते त्यांचं काही खरं नव्हतं. सगळे प्रकाशला मनातल्या मनात शिव्या देत असणार.
"सर, मी तेच सांगतोय, प्रकाश काकुळतीला येऊन म्हणाला.
"बरं, चालू दे तुझं मामा पुराण, नाहीतर आज मला काहीच काम नाही,कुणी कुणी काय काय कथा रचल्या आहेत, मला सगळ्या ऐकायच्या आहेत,"सर शांतपणे म्हणाले.
"दिवाळीच्या सुट्टीत मुंबईला मामाकडे गेलेलो, गावाला येताना मामानं फराळ दिला. मी घरी नसताना आईनं, सगळा फरार मी लिहिलेल्या तावांमध्ये बांधला, तुम्हाला खोटं वाटत असेल तर, उद्या आईला घेऊन येतो ! पक्या एका दमात म्हणाला.
सर क्षणभर शांत झाले, प्रकाशची चांगलीच खरडपट्टी निघणार म्हणून सगळ्यांनी कान टवकारले पण,
"ठीक आहे, हात पुढे कर!" एवढंच म्हणत सरांनी प्रकाशच्या हातावर पट्टीचा फराळ दिला.
तास सुटल्यावर प्रकाशला विचारलं,"काय रे, खरचं लिहिलेले ताव आईनं फरार बांधायला घेतले?
"नाय रे, कुठलेतरी रद्दीचे पेपर होते, फरार सोडताना ट्यूब पेटली, आईला घाबरवलं, म्हटलं माझा सगळा अभ्यास वाया घालवलास, जर का सरांनी बोलावलं तर शाळेत यायला लागलं."
प्रकाशनं चांगलंच डोकं चालवलं होतं, बिचारी अडाणी माउली; तिला कुठं ठाऊक होतं, आपलाच मुलगा आपल्याला गंडवतोय. नाहीतर आमच्या घरी एखादा जरी लिहिलेला कागद पडलेला दिसला कि आजी विचारणार, "दीपक, हा तुझा अभ्यासाचा कागद हाय का बघ!
मी नाही म्हणून सांगायचो. माझे अभ्यासाचे कागद असे मी कुठेतरी टाकून देईन का? पण तिला कोण सांगणार,
ती परत म्हणणार,"अरे, एकदा वाचून तरी बघ!"
मग मी चिडून म्हणायचो,"नाय म्हटलेले" तुला कळत नाय?
मग ती स्वतःशीच पुटपुटायची," आताच्या पोरांना चांगल्याचं पण सांगायची सोय नाय, लगेच अंगावर येतात, मारक्या बैलासारखं."
अभ्यास सोडून इतर गोष्टीत प्रकाशच डोकं जास्त चालायचं एके दिवशी पी टी च्या तासाला खेळायला न सोडता, सर प्रसिद्ध व्यक्तींच्या गोष्टी सांगू लागले. मोठ्या लोकांना मोठेपण प्राप्त होण्या अगोदर किती संघर्ष करावा लागला, किती संकटांचा सामना करावा लागला. मध्येच सरांनी आम्हाला विचारलं, सांगा पाहू तुम्हाला मोठापणी कोण व्हावंसं वाटत. मुलींमध्य कुणाला शिक्षक तर, कुणाला नर्स व्हावंसं वाटत होतं, मुलामध्ये कुणी एस. टी. ड्रायव्हर, कुणाला पोलीस, तर कुणाला मिलिटरी मध्य जायचं होतं. एवढ्या वर्गात एकच मुलगा होता, ज्याला डॉक्टर व्हायचं होतं: तो म्हणजे प्रकाश.
"सर मला डॉक्टर व्हायचं हाय!"
प्रकाशच्या उत्तरावर सर उडालेच, सगळा वर्ग त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला थोड्या वेळासाठी सरांची मती कुंठित झाली, मुक्यासारखे सर नुसतेच त्याच्याकडं बघत बसले, काय बोलावे हेच त्यांना कळेना, शेवटी ," हो हो डॉक्टर हो! पण, त्या अगोदर खूप अभ्यास कर,” हा मोलाचा सल्ला देऊन सर पुढच्या विद्याथ्याकडे वळले.
आपण डॉक्टर व्हावं असं प्रकाशला मनापासून वाटायचं. पण अभ्यासाचा कंटाळा त्याच्या डॉक्टर व्हायच्या स्वप्ना आड येत होता. माणसाचं पोट फाडून त्यात कोणकोणते अवयव असतात, ते एकदातरी त्याला डोळे भरून पाहायचं होतं. ह्या एका कारणासाठी त्यानं डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. नशीब त्यानं सरांना तसं सांगितलं नाही, नाहीतर सर भोवळ येऊन पडले असते. जरी अभ्यासाचा कंटाळा येत असला, तरी त्यानं वेगळ्या प्रकारे डॉक्टरकी ची तयारी सुरु केलेली. जीवशास्त्राच्या तासाला सर जलचर, उभयचर हा धडा शिकवत होते, "बेडूक सापडला तर उद्या येताना घेऊन या." सर मुलांना म्हणाले. सरांचा कोणताच शब्द पडू न देणाऱ्या एखाद्या आज्ञाधारक विद्याथ्याप्रमाणे शाळा सुटल्या सुटल्या दफ्तर ठेवून, प्रकाशनं तडक पऱ्या गाठला. शोधा शोध करून एक भला मोठा बेडूक पकडून आणला, रात्रभर एका पुठ्याच्या खोक्यात डांबून ठेवून दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन आला. त्या दिवशी प्रकाशला मदतनीस बनवून सरांनी बेडकासंबंधी माहिती देऊन तास संपल्यावर त्याला सोडून द्यायला सांगितले. पण आता तो सरांचा आज्ञाधारक विद्यार्थी ज्ञानपिपासू झाला होता. प्रकाशनं बेडकाला सोडून न देता घरी आणला. ब्लेड, सुईदोरा घेतला. बेडकाच पोट फाडून सगळी आतडी बाहेर काढून व्यवस्थित निरीक्षण करून पुन्हा आत कोंबून सुईदोऱ्यानं पोट शिवून घेतलं . पण! प्रकाशाचं ऑपरेशन पूर्ण होण्याअगोदर रात्री पासून उपाशी असणाऱ्या बेडकानं आपला प्राण सोडला होता
खरंच प्रकाश काय करेल याचा नेम नव्हता. एकदा आम्ही मुलं गप्पा मारत बसलेलो. मंग्या सांगू लागला,"अरे, चिरफळं कुठून डोहात टाकली तर मासे मरतात."
झालं, मासे पकडायला जायचं ठरवून आमची टोळी चिरफळाच्या शोधात निघाली. दयानं संज्याला टोपली आणायला पिटाळलं.
चिरफळ करवंदांपेक्षा लहान हिरव्या रंगाचं फळ त्याला उग्र वास येतो, आणि ते मसाल्यात सुद्धा वापरतात. आम्ही सगळं रान पालथं घातल्यानं कुठली झाडं कुठे आहेत हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं. संज्यानं टोपली आणल्यावर आम्ही देवळाच्या पऱ्याकडे निघालो तिथं आसपास दोन-चार चिरफाळाची झाडं होती. देवळाकडे जायचं म्हणजे कातळ तुडवत जावं लागणार. कातळावर आता कोचाच रान. काही गोंड्याच्या आकाराची हिरव्या रंगाची तर काही सुकलेली कोचं. टोचली तर त्याचे बारीक बारीक काटे काढायला सुद्धा जमायचं नाही. आणि दुखायचं सुद्धा खुप. माझे बरेच से सवंगडी अनवाणी, माझ्या पायात स्लीपर असून सुद्धा स्लिपरच्या बाहेर डोकावणाऱ्या भागाला टोचायची. त्यामुळे मी जपून पाय टाकायचो. कातळ ओलांडून देवळाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या रानात आम्ही शिरलो,. आजूबाजूला असणारी चिरफाळाची सगळी झाडं पाहून घेतली, ज्या झाडावर जास्त चिरफळं होती त्या झाडावरची आधी काढायचं ठरलं. पण झाड काटेरी. काठीने पाडून किती पाडणार. कोयती सुद्धा बरोबर आणली नव्हती, नाहीतर कोयतीने काटे तासता आले असते. जरी सगळ्यांनाच झाडावर चढायला येत होतं तरी, सगळेजण एकत्र असल्यावर बरेच जण आळस करत, मग आम्ही नेहमीचे दोघं-तिघं झाडावर चढणार बाकीचे नुसतेच गप्पा मारत दगडावर बसणार. मी एक फताडा दगड उचलला आणि ज्या ठिकाणी पकडायचं , त्या ठिकाणचे काटे दगडाने तासून घेतले फक्त पुढची टोके उडवली तरी पुरे होतं पाठचा भाग जास्त टोचत नव्हता. असं करत करत झाडावर चढलो. एक बरोबर खुणेसारखी लांब काठी घेऊन ज्या फांदीला जास्त चिरफळं असतील ती आपल्याकडे ओढून घ्यायची फळं तोडून खाली टाकायची. सगळ्या झाडावरची मिळून आम्ही अर्धा टोपली चिरफळं काढली. आम्हाला येऊन बराच उशीर झाला होता. सूर्य रंगांची उधळण करत जाण्याच्या तयारीत असल्यानं आम्ही निघायचं ठरवलं. अंधार पडायच्या आत घरी पोहचणं गरजेचं होतं. आम्ही रानातून पुन्हा कातळावर उतरलो तर वाटेत प्रकाशाला फुरसं आणि विंचवाची झुंज लावायची हुक्की आली. " चला, विंचूची आणि फुरशाची कुस्ती लावू," प्रकाश म्हणाला.
आम्ही नाही हो करत करत तयार झालो. कातळावर आठ-दहा दगडी उचलल्या तर, एक तरी विंचू सापडतो पण, फुरसं मिळणं मुश्किल होतं, म्हणून मोठ्या दगडी उचलू लागलो. तीन चार दगडी उलटल्यावर एक छोटं फुरसं सापडलं.आम्ही गोल रिंगण करून मध्ये फुरसं आणि विंचू ठेवला. प्रत्येकाने हातात काठ्या घेतल्या, फुरसं बाहेर जायला निघाले कि काठीने विंचवावर ठेवायचं. विंचू फुरशाला डंख मारता होता, फुरसं विंचवाला डसत होतं. चांगलीच कुस्ती रंगली होती. शेवटी दोघंही शांत झाली. दयानं दोघांनाही काठीनं ठेचून आम्ही घराकडे निघालो. सूर्य डोगरापासून वितभरच वर होता म्हणजे घरी पोहोचायच्या आत काळोख पडणार होता. पण प्रकाश पुन्हा दगडी उलटू लागला त्याच्या मनात काय चाललंय कळत नव्हतं.
"चल ना, काळोख होईल कळत नाय," दया त्याच्यावर खेकसला.
तेव्हढ्यात प्रकाशनं एक काटी घेऊन विंचवाच्या नागीवर दाबून नागीला धरून उचलला.
" हा बघ विंचू!" प्रकाश म्हणाला.
"आता ह्याचं काय करणार हायेस?" दयानं विचारलं.
प्रकाशनं विंचवाची नांगी स्वताला टोचून घेतली. आम्ही सगळे बघतच बसलो, काय बोलावं कुणाला कळत नव्हतं, हातातल्या विंचवाला कातळावर जोराने आपटून प्रकाश घराकडे धावत सुटला. रवीनं विंचू जिवंत आहे कि नाही पाहिलं, तो मेला होता तरी पुन्हा त्याला दगडानं ठेचत रवी म्हणाला,"अरे, बघितलं का त्यानं स्वताला विंचू चावून घेतला." आतापर्यंत प्रकाश आमच्यापासून बराच दूर गेला होता.
म्हणून आम्ही सुद्धा वेगानं चालू लागलो. प्रकाश दिसेनासा झाला तरी आम्ही वेगानं चालत होतो. आता अंधारून यायला लागलेलं. कातळ संपवून आम्ही पऱ्याजवळ पोहोचलो. पऱ्या ओलांडून वाडीकडे जाणाऱ्या डागेत पुन्हा प्रकाश दिसला. तो लंगडत चालला होता. त्याला तसं लंगडताना पाहून आम्ही घाबरलो. रवीनं आंब्याची फांदी तोडून घेतली. वेग वाढवून प्रकाशला गाठला. जवळ जाताच दयानं विचारलं," काय झालं? लंगडतोस का?"
"धावताना दगडावरून पाय घसरला; बहुतेक मुरगळला असणार!" प्रकाश म्हणाला. गोल आकाराचे मोठाले दगड वाटेवर उताणी पडलेले. दिवसासुद्धा जपून चालावं लागायचं. आता तर थोडं अंधुक दिसू लागलेलं, त्यात विंचवाचं विष चढू नये म्हणून हा सुसाट चाललेला, पाय घसरून पडला.आतापर्यंत पाय चांगलाच सुजत चाललेला.
"काय रे, अक्कलबिक्कल हाय का नाय विंचू कशाला चावून घेतलास. दया रागावून म्हणाला.
"कधी चावला नव्हता ना! चावल्यावर कसं वाटत बघायचं होतं." प्रकाश हसत हसत उत्तराला.
"दुखतंय का? विष कुठपर्यंत चढलंय?" रवीनं विचारलं.
जिथे ठणकत होतं तिथे बोट लावून प्रकाश म्हणाला," जास्त ठणकत नाय, चुकता लागला वाटतं!"
स्वतःच विंचू चावून घेतल्याने शरीरात जास्त विष गेलं नव्हतं. जिथे विंचवाची नांगी टोचली होती, तिथे रवीनं आंब्याचं पान तोडून देठावर जमा झालेला चीक दाबून धरला. आंब्याचा चीक, तुळस, लवंग तेल अशी विंचू उत्तरवण्याची सटर-फटर औषधं आम्हाला माहीत होती. विंचू चावल्यावर काही जण तासाभरात ठणठणीत होतात, तर काही जण दोन दोन दिवस बोंबलत बसतात. ज्यांना लवकर बरे वाटत नाही अशा लोंकाना मग वाडीतील काही जाणते म्हातारे कसलातरी पाला चोळून जिथे विंचू लागला तिथे दाबून धरतात आणि हुंगायला देतात. असली जालीम औषधे आम्हाला माहीत नव्हती. आम्ही बऱ्याचदा जे कुणी औषध देतं त्याला कोणत्या झाडाचा पाला आहे म्हणून खोदून खोदु विचारलं, पण कुणीच सांगत नव्हतं. त्यांचं म्हणणं झाडाचं नाव सांगितलं तर औषध लागू पडत नाही. पण आम्हाला माहीत होतं तसं काही नसणार, जर सगळ्यांनाच ते औषध माहीत झालं तर, त्यांना कुणी विचारलं नसतं.
अंधारून आल्यानं रस्ता दिसत नव्हता
" चालायला जमल ना?” रवीनं विचारलं.
"पाय जास्तच ठणकतोय!" प्रकाश म्हणाला.
शेवटी दोघांच्या खांद्यावर हात टाकून प्रकाश हळू हळू चालू लागला. त्याला सोडायला सगळी टोळी त्याच्या घरात गेली. प्रकाशला लंगडताना पाहून त्याच्या आईने काळजीनं विचारले,
" काय रे काय झालं? लंगडतोस का?”
"अगं, विंचू चावला म्हणून धावत येत होतो तर, पाय मुरगळला,"
त्याच्या आईनं तोंडाचा पट्टा सुरु केला. प्रकाश बरोबर आम्हालाही शिव्यांचा प्रसाद मिळण्या अगोदर आम्ही तिथून सटकलो. दुसऱ्या दिवशी चिरफळं कुटून मासे पकडायला गेलो, प्रकाश काही आला नाही. विंचवाचं विष फार चढलं नाही, पण पाय चांगलाच दुखावला होता. आम्ही क्रिकेट खेळायला जायचो, तो आमच्या बरोबर लंगडत लंगडत यायचा, पण पाय दुखत असल्यानं खेळायचा नाही. आम्हाला मात्र आयताच अंपायर मिळाला होता.
प्रतिक्रिया
14 Apr 2022 - 7:39 pm | भागो
व्वा! एकदम मस्त.
14 Apr 2022 - 9:58 pm | मुक्त विहारि
हलके फुलके....
अभ्यास नामक भानगड नसती तर, शाळा ही खरोखरच मजेशीर गोष्ट आहे ...
15 Apr 2022 - 11:07 am | कर्नलतपस्वी
परत एकदा शाळेत गेल्या सारखे वाटले.
धागा आवडला.
15 Apr 2022 - 1:09 pm | शलभ
मस्त लेख
16 Apr 2022 - 8:47 am | Deepak Pawar
भागो, मुक्त विहारि, कर्नलतपस्वी, शलभ सर्वांचे मनःपूर्वक आभार.
18 Apr 2022 - 2:09 pm | स्वराजित
खुप छान लेख
18 Apr 2022 - 2:16 pm | सौंदाळा
मस्त लिहिले आहे.
शेवटी घाबरलो होतो, विंचवाची नांगी टोचून घेताना प्रकाशच्या पायाला फुरसे चावले की काय असं वाटत होतं.
20 Apr 2022 - 3:24 pm | Deepak Pawar
स्वराजित, सौंदाळा मनःपूर्वक आभार.
21 Apr 2022 - 9:21 pm | चौथा कोनाडा
भारी आहे उपद्व्यापी प्रकाशची कहाणी !
विंचवाची नांगी टोचून घेणारा धाडसी वीर !
बाकीचे पोरं काय काय कारणं सांगतात वाचून हसलो !
मस्त लेख, आवडला हेवेसांनले !
22 Apr 2022 - 3:56 am | Jayant Naik
खेड्यातील शाळा आणि ते शिक्षक डोळ्यासमोर उभे केलेत. मस्त.
22 Apr 2022 - 9:36 am | Deepak Pawar
चौथा कोनाडा, Jayant Naik आपले मनःपूर्वक आभार.