पी रामराव.(एफ आर एस डी)(संपूर्ण)

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
3 Apr 2022 - 7:13 am

पी रामराव.(एफ आर एस डी)

जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव.

बाय अपॉइटमेंट ओन्ली.

ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही.

ह्या क्षणी रामराव ऑफिसमध्ये टेबलावर पाय टाकून आपली नखे साफ करण्यात गुंतले होते. बेकार डिटेक्टिव दुसरे काय करणार? ‘ह्या क्षणी’ अस म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. रामराव द ग्रेट गेले दोन अडीच तीन महिने दररोज नखे साफ करत होते. डोक्यात तुंबलेल्या बिलांचा विचार चालू होता. बँक बॅलंस अॅबसोल्युट मिनिमम लेवेलला आला होता. बँक आता फाईन लावणार अशी परिस्थिती झाली होती. दुष्काळात तेरावा महिना. दोन महिन्यांचे ऑफिसचे भाडे तुंबले होते. सकाळचा –दुपारचा चहा देणाऱ्या भटाच्या सहनशक्तीलाही मर्यादा होती.

केव्हा नवीन केस हातात येणार? त्यांना नेहामी वाटायचे हा आत्ता फोन वाजेल,

“हॅलो डिटेक्टिव रामराव बोलत आहेत काय? मी रत्नाकर शाह बोलतो आहे. होय तोच तो हिऱ्याच्या पेढीचा मालक. माझ्या मुलाच्या हालचालींवर नजर ठेवायची आहे. आपण हे काम घेतले तर माझ्यावर अनंत उपकार होतील. मला माहित आहे की आपण खूप बिझी असणार. प्लीज माझ्यासाठी. ओहो थॅंक्यू सो मच. चेक आजच घेऊन जा ऑफिसमधून.”

किंवा

कोणी सुंदर ललना ऑफिसचा दरवाजा धाडकन उघडून आत येईल आणि धपापलेल्या उराने म्हणेल, “रामराव प्लीज मला वाचवा. माझ्या पाठीमागे खतरनाक गुंडे माझी अब्रू लुटण्यासाठी लागले आहेत.”

किंवा

एखादं धमकी पत्र. “साल्या, लई माजलास काय रे तू? जीव सस्ता झालाय कारे? पुण्याच्या बाहेर जाउन दडी मार नाहीतर तुझी खैर नाही आणि आमच्या भानगडीत पडायचे नाही.काय समजलास ना?”

नाही. असे फोन, अश्या ललना असे खलिते फक्त बाबुराव अर्नाळकरांच्या कथेत असतात. लहानपणी त्या कथा वाचून आज रामराव डिटेक्टिव झाले होते. त्याचे ते आदर्श आता काय करत असतील बरे? झुंजार विजये बरोबर कांदापोहे खात बसला असेल. काळापहाड नवीन रत्नभांडार कसे हस्तगत करायचे ह्याचा विचार करत असेल. धनंजय छोटूला गुन्हेगारीशास्त्राचे धडे देत असतील, आणि मी?

मोबाईलच्या घंटीने रामारावांचे दिवास्वप्न भंग झाली.

व्वा! आली नवी केस! किती दिवस वाट पहायला लावली. देर आयी, दुरुस्त आयी. इट इज नेव्हर टू लेट!! रामरावांनी उत्साहाने फोन उचलला. फोन बिल्डींग मॅनेजरचा होता.

“मिस्टर रामराव, मी शर्मा बोलतो आहे.आपल्या ऑफिसचे तीन महिन्यांचे भाडे द्यायचे राहीलं आहे. आपण हे भाडे व्याजासह ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत चुकते केले नाही तर...”

“देणार, अगदी देणार. माझी एक पेंडिंग इनवॉइस येत्या आठवड्यात क्लिअर होते आहे. ती झाली कि पहिली गोष्ट म्हणजे ऑफिसचे भाडे.” रामराव घाईघाईने बोलत होते.

“ही थाप आपण एक्झक्टली किती वेळा मारणार आहात? कुछ नया सोचो सरजी.”

फोन बंद झाला. शर्मा बोलत होता ते खरच होतं.

फोन पुन्हा वाजला. आता कोण? दूध वाला असणार.

रामरावांनी फोन बघितला. कोणीतरी अनोळखी व्यक्ती फोन करत होती. नवीन केस? कसे शक्य आहे. इतके दिवस आली नाही. आज कशी येईल? उगाच खोटी आशा बाळगायची आणि तोंडघशी पडायचे. का कोणी दूरचे आतोबा खचले पण जाताजाता मला लाखोंकी जायदाद देऊन गेले. त्यांच्या वकिलाचा तर फोन नसेल? काही सांगता येत नाही. रामरावांनी नव्या उत्साहाने फोन उचलला आणि आतोबांच्या मृत्युची सुखद बातमी ऐकण्यासाठी कान टवकारले. त्यांचे हृदयाचे ठोके वाढले. हाताला घाम फुटला होता. तोंडाला कोरड पडली होती. केव्हा एकदा ती बातमी ऐकेन असे त्यांना झाले होते.

“मी बीएसेनेल मधून बोलत आहे. आपले मार्च महिन्याचे बिल 448रुपये अजून भरलेले नाही. जर हे बिल आपण त्वरित भरले नाही तर आपली सेवा खंडित होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर आपण हे बिल आधीच भरले असेल तर धन्यवाद. बीएसेनेल आता आपणासाठी आणत आहेत करमणुकीचा अमोल खजिना.....”

त्याने वैतागून फोन बंद केला. हाही कॉल नुरा निघाला॰

पुन्हा एकदा फोनची घंटी वाजली.

एक मिनिटभर ते फोनकडे बघत राहिले. आपलाच फोन वाजतो आहे की बाजूच्या ऑफिसामधला. त्याना संशय वाटला. रामरावांनी चक्क फोनला हात लावुन बघितले. खात्री करून घेतली. मगच फोन उचलला. फोन उचलताना त्यांनी आपल्या मनाची तयारी केली होती. इलेक्ट्रिकवाला राहिला होता. त्याचाच फोन असणार.

“हलो, पी रामराव डिटेक्टीव्ह एजन्सीमध्ये आपले स्वागत आहे. चीफ डिटेक्टीव्ह रामराव बोलतो आहे. मला सांगा मी आपली काय मदत करू शकतो?”

क्षणभर दुसऱ्या बाजूला स्टिरिओफ़ोनिक शांतता. रामराव अगतिक. शेवटी दुसऱ्या बाजुवाल्याला कंठ फुटला.

“आपण हरवलेल्या गोष्टी शोधून देता काय?”

“अर्थात! ती तर आमची खासियत आहे. मागे एका कविचे हृदय हरवले होते. त्यामुळे तो बिचारा सैर भैर झाला होता. रात्रंदिवस कविता पाडत होता. त्याच्या आईबाबांनी ती केस आमच्यावर सोपवली. आम्ही त्याच्या कवितांचे रसग्रहण आणि विश्लेषण केले तेव्हा आम्हाला असे दिसले कि त्याचे हृदय हरवले नव्हते तर त्यानेच ते कुणाला तरी दिले होते, नक्की कोणाला ते त्याला आठवत नव्हते. त्याच्या हृदय चोराला आम्ही शोधून काढले आणि त्या दोघांचे गोड मीलन घडवून आणले. आता बोला. ते सोडून द्या, तुमचे काय हरवले आहे?”

“माझे शरीर,” दुसऱ्या बाज्ने आवाज आला, “माझी बॉडी हरवली आहे.”

“वा छानच की. पण तुम्ही काही काळजी करू नका.” रामराव बोलून गेले. आपण काय बोललो ह्याची जाणीव झाल्यावर ते ओरडले, “ऑ. काय बोलताव काय तुम्ही?”

“माझी बॉडी. शरीर. विचार केल्यावर मला वाटायला लागले आहे कि ते मुद्दाम पळून गेले आहे.”

रामरावांनी खरं तर तिथल्या तिथेच फोन बंद करायला पाहिजे होता. पण काय असतं ना की ऐन वेळी तुमचे चाक जमिनीत रुतत जाते.

“अबे ओ सा...” रामरावांनी स्वतःला आवर घातला, “नाव काय रे तुझं?”

“माझं नाव सराफ, अनिल सराफ.”

अनिल सराफ! बापाने कमावलेल्या गडगंज संपत्तीचा एकमेव वारस. अनिल सराफ! शहारातील सर्वात श्रीमंत! बापाने मिळवलेला पैसा कसा उडवायचा ह्याची घोर चिंता पडलेला तरुण.

रामरावांनी आवाजात खोटे खोटे मार्दव आणले. “अनिल सराफ! तर तू शहरातला एकमेव कोट्याधीश हं.”

“हो. तोच मी आणि माझे शरीर हरवले आहे.”

“वा, छान, तू असं कर, कधीतरी वेळ मिळाला की माझ्या ऑफिसमध्ये ये. मग आपण स्वस्थ चित्ताने बसून बोलू.” असं बोलून रामरावांनी फोन आदळला.

रामरावांची आता मात्र सटकली. डोके भणभणायला लागले. कोण हा नालायक उपद्व्यापी माणूस? उगाच कुणाची खेचायची म्हणून फोन करतात? दुसऱ्याला मनःस्ताप देण्यात ह्या असल्या गटारी वृत्तीच्या लोकांना काय सुख मिळते? असतात असे लोक. जगात संत महात्म्यांपासून बलात्कारी लोकांपर्यंत निरनिराळ्या प्रकारचे लोक ठासून भरलेले आहेत.

चढलेले डोके शांत व्हायला चहाच पाहिजे. रामरावांनी खिसे चाचपले. खिशात होते थोडे पैसे. चहा आणि एक पॅकेट पार्ले-G साठी. पैसे जपून वापरायला पाहिजेत. नाहीतर कुणाकडून उधार मागायची वेळ येईल. रामरावांनी ऑफिसचा दरवाजा ओढून घेतला. कुलूप लावायची इच्छा नव्हती. इकडे चोर तरी कशाला येईल. चोरी करण्यासारखे काही नव्हतंच.

लिफ्ट मधून बाहेर पडले तेव्हा रामरावांच्या डोक्यात असुरी विचार धुमाकूळ घालत होते. त्यावेळी अनिल सराफच्या नावाने फोन करणारा मिळाला असता तर त्याची काही खैर नव्हती. चहा आणि बिस्किटे खाल्ल्यावर डोके जरा शांत झाले. समोरच्या इलेक्ट्रोनिक्सच्या शोरूम मधून चक्कर टाकली. त्याचा एसी फुल चालला होता. ( रामरावांच्या ऑफिसमधला एसी गेले तीन महिने बंद होता) तबियत गार गार झाल्यावर रामराव ऑफिसात परतले. दरवाजा उघडून आत आले.

“हलो, रामराव नाही का आपण? मी अनिल सराफ. ग्लॅड टू मीट यू, सर. इथे तुमच्या समोर बसलो आहे. तुम्ही मला बोलावले होते म्हणून आलो. केव्हाची वाट पहात बसलो आहे.”

रामरावांना चारशे चाळीस व्होल्टचा झटका बसला जणू. ऑफिसमध्ये चिटपाखरू देखील नव्हते. आवाज मात्र स्पष्ट येत होता. त्यांनी टेबलाच्या खाली बघितले. छोटा फ्रीज होता तो उघडून बघितला. गोद्रेजचे कपाट उघडून पाहिले. ह्या शिवाय लपायला दुसऱ्या जागा नव्हत्या.

एकदम डोक्यात ट्यूब पेटली. त्यांनी हळूच टेबलाचा खण उघडला. आतून पिस्तुल काढले. दबत्या पावलांनी बाथरूम कडे चालत गेले. उजव्या हातात पिस्तुल तोलत डाव्या हाताने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि भारी आवाजात ओरडले. “हॅंड्स अप. माझ्या हातात पिस्तुल आहे. हात वर करून बऱ्या बोलाने बाहेर ये.”

नेहमीचा उंदीरही पण आत नव्हता. मग बाहेर कोण येणार? खात्री करून घेण्यासाठी कमोड उघडून बघितला. कमोडचा फ्लश एकदा दोनदा चालवला. आत कोणी लपला असेल तर जाईल गटारात. जाइना का. एक निश्वास टाकून आपल्या खुर्चीवर येऊन बसले.

“तुमचा गोंधळ झाला असेल नाही का. मला पाहून आय मीन न पाहून?”

“अरे पण तू कोण आहेस आणि समोर का येत नाहीयेस?”

“मीच तो अनिल सराफ. आपण तासापूर्वीच बोललो होतो आठवले? तुम्हीच मला तुमच्या ऑफिसमध्ये यायचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी आलो. मी पुढे का येत नाहीये? तोच तर माझा प्रॉब्लेम आहे. माझे शरीर मला सोडून पळून गेले आहे. प्लीज तेव्हढे शोधून द्या ना.”

“हे पहा, हा विनोदाचा क्रूर प्रकार आहे. हो ना? किंवा नाहीतर मी स्वप्नात आहे. ह्यापैकी एक खरं असायला पाहिजे. हे नाटक कृपाया थांबवा. गेले दोन महिने माझा धंदा झालेला नाही. भोवानीच्या टायमाला तुम्ही उगीच वांधा करू नका. ह्याक्षणी कोणी गिर्हाईक आले तर ते हा प्रकार पाहून बिथरून जाईल. मला वेड लागले आहे असं वाटून पुन्हा माझ्या ऑफिसात पाउल टाकणार नाही. मार्केट मध्ये माझी उरली सुरली अब्रू जाईल. तेव्हा तुम्ही जे कोणी असाल –सोनार, सराफ किंवा जव्हेरी- मला छळू नका. तुम्ही गेला नाहीत तर मला नाईलाजाने धक्के मारून तुम्हाला हाकलावे लागेल.”

“धक्के मारून? कुठे धक्के मारणार? माझी बॉडी मला वाऱ्यावर सोडून पळून गेली आहे. आणि ती शोधून काढायच्या ऐवजी तुम्ही मला धक्के मारायच्या बाता करता आहात. हाच का तुमचा प्रोफेशनॅलीझम?”

“ओ मिस्टर, ही जादू तुम्ही कशी केली. तेव्हढ मला सांगा आणि इथून फुटा.”

“मिस्टर तुमचं मन थाऱ्यावर नाही. म्हणून तुमची भाषा अशी असुसंस्कृत झाली आहे. म्हणे फुटा! ही काय बोलायची भाषा झाली. म्हणे ही जादू तुम्ही कशी केली? तुम्ही स्वतःला हुशार डिटेक्टीव्ह समजता ना. पण हुशारी म्हणजे फुशारकी नव्हे की मला जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सम्यक ज्ञान आहे असं समजणे. स्वामी समर्थ रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणे सांगितली आहे त्यात....”

“ठीक आहे ठीक आहे. आता मी आपल्या कडून शिकतो. सांगा काय सांगायचे आहे ते.”

“ह्या जगात आपल्याला जितक्या गोष्टींचे ज्ञान आहे त्यापेक्षा जास्त गोष्टींचे अज्ञान आहे. मी माझे शरीर गमावू शकत नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय? तुम्ही माझ्याशी बोलत आहात—एका शरीर विहीन आवाजाशी बोलत-- आहात हे तुम्हाला मान्य आहे आणि तुम्हाला वेड लागलेले नाही. मग माझे शरीर हरवले आहे हे मान्य करायला तुम्हाला काय अडचण आहे?”

रामराव आता मात्र पुरते गोंधळून गेले होते, “मला डिस्टर्ब करू नका. मी विचार करतो आहे.”

थोड्या वेळाने आवाज पुन्हा बोलू लागला.

“तुमचा विचार करून झाला असेल तर माझे ऐका, हे काम तुम्ही घेणार असाल तर मी तुम्हाला पेशगी म्हणून पन्नास हजार रुपये देईन. उरलेले पन्नास हजार काम झाल्यावर.”
पन्नास हजार! रामरावांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. त्यामुळे त्यांना त्याचा अर्थ समजला नसावा. जेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तेव्हा केवळ खुर्चीचा आधार असल्यामुळे ते कोलमडून जमिनीवर पडले नाहीत. पन्नास हजार! क्षणभर त्यांची तबियत गार्डन गार्डन झाली. झूठी ही सही.
“तुमचा डेस्कटॉप वापरू का? आताच पैसे तुमच्या खात्यात जमा करतो.”

रामराव हो ना म्हणायच्या आधीच संगणकाच्या पडद्यावर अक्षरं उमटत गेली.

“तुमच्या खात्याचा तपशील इथे तुम्हीच भरा. ही एवढी रक्कम पुरेशी आहे ना?”
रामरावांना स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. आवाजात जेव्हढा निर्विकारपणा निरीच्छ्पणा आणता येईल तेव्हढा आणून ते म्हणाले, “हम्म, ठीक आहे. काम चालू करायला पुरेशी आहे.”
जणू काय केवळ पन्नास हजारावर काम सुरु करायचे म्हणजे मी आपल्यावर उपकार करतो आहे असा आव आणला.
“ह, आता तुमची केस हिस्टरी तुम्हीच तुमच्या शब्दात सांगा. एक मिनिट थांबा. माझी सेक्रेटरी आज रजेवर आहे. बिचारीची आई इस्पितळात आहे.”
पी.रामराव ह्यांची ही आवडती थाप होती. क्लाएन्टवर छाप मारण्यासाठी एखादी सेक्रेटरी असावी अशी त्यांची कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. पण तिचा भरघोस पगार महिन्याच्या पहिल्या तारखेला तिच्या खात्यात जमा करता येईल असा धंदा चालायला पाहिजे ना. असो. पी. रामराव भविष्यात कधीकाळी सुंदर, सेक्सी, हुशार आणि त्यांच्यावर मनोमन प्रेम करणारी सेक्रेटरी –डल्लाश्री- नोकरीवर ठेवू शकतील अशी शुभेच्छा त्यांना देऊया. सध्यातरी तिला रजेवर पाठवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
“अरेरे कुठल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे? मला सांगा. मी एक फोन .....”
“आपल्या सदिच्छे बद्दल मी आपला आभारी आहे. मी तिच्या आईची काळजी घेतो आहेच.”
पी. रामरावांना हा विषय वाढवण्यात रस नव्हता. “आपण मला आपल्या केसबद्दल सांगत होता, नाही का?”
“ओह येस. सर, आपल्याला माझी थोडीतरी माहिती असेलच. इथल्या वर्तमानपत्रात आणि मासिकांत माझ्याबद्दल यथेच्च बदनामीकारक मजकूर छापला गेला आहे. मी विक्षिप्त, तऱ्हेवाईक, गर्भश्रीमंत, एकल्ली तरुण आहे असा एकंदरीत सूर!”
“तुम्हाला एककल्ली म्हणायचे आहे ना?”
"बरोबर आहे," आवाज सहमत झाला. "तथापि, जेव्हापासून माझे वडील गेले- देव त्यांच्या आत्म्यास शांति देवो- तेव्हापासून ‘पेज थ्रीने’ माझा पिच्छा पुरवला. पिताश्री माझ्यासाठी जाताना बराच पैसा अडका, शेअर्स, भरभराटीस आलेला धंदा, फार्म हाउस शिवाय केपी मध्ये दोनचार बंगले सोडून गेले. पेपरवाल्यांना गॉसिप साठी रेडीमेड बकरा मिळाला. त्यामुळे माझ्यासाठी कोणतेही खाजगी जीवन जगणे खूप कठीण होते आणि ते टाळणे तितकेच कठीण होते.”
रामरावांना सराफचा हेवा वाटला.
“खर आहे.” रामरावांनी खोटी खोटी सहानुभूती दर्शवली.
“माझा पिंड नेहमीच शैक्षणिक आणि अभ्यासू होता. माणसाला जितके ज्ञान मिळवता येणे शक्य आहे तितके ज्ञान मिळवावे अशी माझी तीव्र इच्छा होती. मी शाळा, कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझे वाचन, अभ्यास, प्रयोग चालू होतेच. माझ्या

वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यावर मी सैरभर झालो. ह्या आयुष्याला काही अर्थ आहे का? मी सत्याच्या शोधात योग, कन्फ्यूशियसची शिकवण, अद्वैत, बुद्धीझम आणि इतर अनेक तत्वज्ञानांचा अभ्यास केला."
“गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी ह्याच्या शिकवणुकीचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला.”
“म्हणजे शेळीचे दूध, मनःशुद्धीसाठी उपास तापास.....” रामराव मधेच बोलले.
“हो हो तेच ते. ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश म्हणजे मरण! मी जास्त काही बोलत नाही. पण अविनाशी सत्याच्या शोधात मी सुखलोलुप जीवनशैलीचा त्याग केला. दारू, बिअर एवढेच काय पण चहा कॉफी पिणे देखील बंद केले. चरस, गांजा, अफू, सिगरेट, मावा सर्व काही बंद झाले. फाईव स्टार हॉटेल मधल्या पार्ट्या बंद. रात्री दहा वाजता दिवे बंद करून झोपायचे, सकाळी -सॉरी- पहाटे चार वाजता उठून ध्यान धारणा!”
“कमाल आहे तुमच्या निग्रहाची.” खात्यात जमा झालेले पन्नास हजार बोलत होते.
“सात दिवस व्यवस्थित गेले. आठव्या दिवशी एव्हढी गाढ समाधि लागली की माझे शरीर केव्हा पळून गेले ते मला समजलेच नाही. समाधी उतरल्यावर बघतो तर काय? माझे शरीर माझ्यावर रागावून माझ्या मनाचा, माझ्या आत्म्याचा त्याग करून पळून गेले होते. ते माझ्यावर खुन्नस म्हणून पळून गेले होते. जाताना माझ्यासाठी एक नोट सोडून गेले.
रामराव खुर्चीतून खाली पडणार होते पण त्यांनी स्वतःला सावरले.
==========================================================
“ती नोट मी येताना माझ्याबरोबर आणली नाहीये. तुम्हीच सांगा कशी आणणार? पण वाचून वाचून तोंड पाठ झाली आहे. म्हणून दाखवू?”
“अर्थातच! हुशार डिटेक्टीव कुठल्याही दुव्याकडे दुर्लक्ष करत नसतो. असे लहान सहान दुवे सांधून रहस्याचे जीग्सा पझल सुटत असते.”
“पण त्या आधी एक सैविधानिक इशारा. माझ्या शरीराने व्यक्त केलेल्या मतांशी मी सहमत असेलच असे नाही. आता सांगतो ती नोट काय होती.

'प्रिय मूर्खशिरोमणी
मी तुझ्या नीरस आणि कंटाळवाण्या जीवनशैलीला विटलो आहे. तू आणि तुझे मन! मी तरूणआहे, दिसायला बऱ्यापैकी आहे, जीवनाचा उपभोग घेण्यासाठी उत्सुक आहे. इतर शरीरांप्रमाणे मलाही कधीतरी ‘प्यावी’ असे वाटत नाही का? बकरीचे दूध पिऊन पिऊन कंटाळा येत असावा असे तुला वाटत नाही का? दूध तर दूध पण किमानपक्षी गाईचे तरी असावे कि नाही? आजूबाजूला बघतो तर इतर सर्व शरीरे छान छान ड्रेस करून पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी सज्ज होऊन संध्याकाळी बागेत चकरा मारत असतात. आणि मी मात्र नामस्मरणात दंग होतो. तुला वाटत नाही की मला टॅक्सीमध्ये ललनांसोबत फिरायला आवडत असेल? तुला समजत नाही का कि मला सिगारेट, दारू, डान्स, तंदुरी चिकन खायला आवडेल? तुझ्या त्या शापित मनाकडे जितके लक्ष देतोस तेव्हढेच लक्ष माझ्याकडे द्यायला पाहिजेस? मला पण भावना आहेत? आयला -सॉरी- भावनांचा उद्रेक झाला की तोंडातून शिवी बाहेर पडणार की जात्यावरच्या ओव्या?.
ता. क. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. '''
रामरावांना शरीराने केलेल्या तक्रारीत काही वावगे वाटले नाही. त्यांनी डोळे मिटून विचारात गढून गेल्याचे नाटक केले. अखेर त्यांनी डोळे आणि तोंड उघडले. “सराफ साहेब, तुम्ही तुमच्या शरीरावर अन्याय करत आहात अस तुम्हाला वाटत नाही?”
“पण मला ध्यान धारणा शिकवणारे गुरुजी, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी... “
“त्या गुरुजींना आपण थोडा वेळ विसरुया, तुम्हाला तुमचे शरीर परत पाहिजे आहे कि नको?”
रामरावांनी जोरात विचारले.
“अर्थातच! शरीर परत पाहिजे म्हणून तर मी इथे आलो आहे."
“तर मग, मिस्टर सराफ, मी काय सांगतोय ते ऐका. हे विपश्यना वगैरेचे फ्याड डोक्यातून काढून टाका. त्याने तुमची बॉडी परत येणार नाहीये. मी सांगतो तस वागलात तर थोडीफार आशा आहे.”
“तुम्ही माझी बॉडी परत आणू शकाल अशी तुमची खात्री आहे?” आवाजाने दुःखी आवाजाने विचारले.
रामरावांनी पेरी मॅसन स्टाइल त्याला उत्तर दिले, “हे पहा सराफ या बाबतीत मी तुम्हाला खोटी आश्वासने देणार नाहीये. ह्या बरोबर हे ही सांगतो की ह्या केसचा मी शेवटपर्यंत पाठपुरावा करेन. मला सांगा तुमचे शरीर कुठे असेल. काही अंदाज?”
“नाही, मला अजिबात कल्पना नाही.”
“परवा इल्ले. तुम्ही आता घरी जा, आणि आराम करा. तुमच्या डोक्यातल्या समाधि साधनाच्या कल्पनांना फाटा द्या अगदी केराची टोपली दाखवा. तो पर्यंत मी तुमची बॉडी शोधतो. पत्ता लागला कि लगेच तुम्हाला कॉल करेन. निश्चिंत रहा.”
“प्लीज, रामराव.” आवाज रडलेल्या आवाजात बोलला.
“चलो, गुड नाईट,” रामरावांनी त्याला जवळ जवळ बाहेर काढले.
“तुम्ही गेलात?” रामरावांनी विचारले.
त्यांना उत्तर मिळाले नाही. म्हणजे आवाज गेला होता.
आवाज ऑफिसच्या बंद दरवाज्यातून बाहेर कसा गेला हे त्याचे त्यालाच माहित!
रामरावांनी ओळखीच्या दोन तीन खबरींना फोन लावले. कुणालाही काम नव्हते. सगळे हातावर हात ठेऊन रिकामे बसले होते. पण रामरावांसाठी काम करण्यात कुणालाही उत्साह नव्हता. कारण रामरावांची सध्याची अवस्था मार्केट मध्ये माहित होती. त्यांची खात्री पटवताना रामरावांना थोडे कष्ट पडले पण शेवटी ते राजी झाले. (बिचारे ते तरी काय करणार. गाजराची पुंगी. वाजली तर वाजली, नाहीतर नाही.) रामरावांनी त्यांना काम सांगितले. शहर धुंडाळून अनिल सराफला शोधून काढायचे. त्याची “बॉडी” असे शब्द वापरले नाहीत नाहीतर ते बिथरून गेले असते. फाईव स्टार हॉटेल पासून ताडी माडी गावठीच्या गुत्त्यांपर्यंत कुठेही तो असू शकेल अशी टिप ही दिली.
रामरावांच्या खिशात पैसे खुळखुळत असल्याने त्यांना मोठ्या हॉटेलात जाऊन चापून जेवण्याची इच्छा झाली असल्यास नवल ते काय? शिवाय बिल सराफच्या नावावर फाडायची सोय होतीच “इनिशिअल एक्सपेन्सेस”! थोडे खाणे पिणे झाल्यावर रामरावांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली.
त्यांनी रोझीला फोन लावला.
रोझी दिसायला अत्यंत सुंदर तरुणी होती. केवळ दिसायला सुंदर नव्हती तर बुद्धीनेही सुपर होती. रामरावांच्या डोक्यातल्या प्लानला तीच न्याय देऊ शकणार होती. रामराम आणि ती एकाच वेळी महान डिटेक्टीव गुरुनाथकडे उमेदवारी करत होते. तिला आपली “पार्टनर” बनवण्याची रामरावांची इच्छा होती पण तिला डायरेक्ट विच्रायचे धैर्य त्यांच्यात नव्हते.
रामरावांनी रोझीला फोन केला.
“माय डिअर रामराव, आज म्या गरीबाची कशी काय आठवण झाली?” रोझीचा आवाज ऐकून रामरावांना अनामिक आनंद झाला. अंगावरून कुणीतरी मोरपीस फिरवत आहे अशी भावना झाली. पण हा बिझिनेस कॉल आहे ह्याची जाणीव होऊन त्यांनी स्वतःला सावरले. कंट्रोल रामराव, कंट्रोल युअरसेल्फ!
“काय चाललय, कस चाललय? माझ्याशी बोलायला वेळ आहे का?”
“अरे रामराव, मी थोडी बिझी होते. माझा कुत्रा सिम्बा आहे न, त्याला ट्रेन करायला शांताराम मानकापे नावाचा डॉग ट्रेनर ठेवला आहे. त्याला झाडत होते. माझ्या कुत्र्याला शेकहॅंड कर अस सांगितले तर तो भो भो करून अंगावर येतो. हे काय ट्रेनिंग झाले? ते जाऊ देत. तू सांग. तू कसा आहेस?” रोझी झपाझप बोलत गेली.
“रोझी, शांताराम मानकापे? . ते जाऊ दे. एक काम आहे. केवळ तूच करू शकशील असे.” रामराव मस्का मारत म्हणाले.
“हे बघ डायव्होर्स वगैरेची केस असेल तर मला इंटरेस्ट नाही. आणि पैश्याचे काय?”
रामरावांना थोडा राग आला. स्वतःला सावरुन ते म्हणाले, “पैशाची काळजी करू नकोस.”
रामरावांनी तिला केस समजावून सांगितली. तिला काय नाटक करायचे आहे त्याची कल्पना दिली.
बरेच काम झाले होते. रामरावांनी कित्येक दिवसानंतर सुखाची झोप घेतली.

रात्री नंबर १ खबरीचा--त्याचे नाव होते नानू काळुंद्रे--फोन आला. बातमी उत्साहवर्धक होती.
“डिटेक्टीव साहब, सापडला तुमचा सराफ. या इथे ‘ला धमाल’ हॉटेलात नटमोगऱ्यांवर पैसे उधळत आहे. लवकर या आणि त्याला तुमच्या ताब्यात घ्या. बाय द बाय येताना माझा मेहेनताना आणायला विसरू नका.”
रामरावांनी सराफच्या आवाजाला फोन केला आणि ‘ला धमाल’ हॉटेलात यायला सांगितले.
रामराव हॉटेलात पोहोचले बघतात तर काय, सराफची बॉडी दोन पेंटेड सेंटेड छमकछल्लोंच्या गराड्यात होती. दूर एका टेबलापाशी रामरावांचा खबरी नानू काळुंद्रे बसला होता. रामरावांनी जेव्हा कॅश देऊन त्याचा हिशेब चुकता केला तेव्हा त्याचा चेहरा उजळला.
“आणि माझे बिल तर तुम्ही द्यालच.”
“हो हो काळजी करू नकोस.” खबरीने एक कडक सॅल्यूट ठोकला आणि चालता झाला.
रामराव आवाजाची वाट बघत बसले. मध्यंतरात त्यांनी रोझीला बोलावून घेतले.
“ह्या माणसाच्या नमुन्याला जरा नादी लाव.”
“बस्स इतकच. सो सिम्पल.”

आवाज येऊन पोचला होता.
“पी.रामराव बघता आहात न तुम्ही? पहा तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी पहा. काय फाजिलपणा चालला आहे तो. अरेरे काय हा माझ्या शरीराचा अधःपात.” आवाज विव्हळत बोलला. “शू मोठ्याने बोलू नका. सावज सावध होईल. मला परिस्थिती हाताळू द्या.”
रामराव पुढे गेले.
“मिस्टर सराफ, मला आपल्याशी काही बोलायचय.” सराफने प्रथम रामरावकडेकडे साफ दुर्लक्ष केले. रामरावानी घसा खाकरून पुन्हा त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
“कोण तुम्ही. घसा साफ करायचा असेल तर तिकडे वॉश बेसिन आहे. तिकडे जा.”
“मी तुमच्या जीवश्च कंठश्च मित्राचा मित्र आहे. तुमच्यात आणि तुमच्या मित्रांत गैरसमजनिर्माण झाले आहेत. त्या बद्दल मला थोडं बोलायचं होतं.”
“माझा जीवश्च कंठश्च मित्र? असा कोणी नाही.”
“आहे, तुमचे मन, तुमचे व्यक्तिमत्व, तुमचा आत्मा! तुमच्या शरीरावर त्याचा हक्क आहे. तुम्ही त्याला सोडून पळून गेलात. त्याला आपली चूक उमगली आहे. ते आता सुधारले आहेत. त्यांना चार चौघांसारखे व्हायचे आहे. मी त्याच्या वतीने रदबदली करायला आलो आहे.”
हे ऐकून सराफचा चेहरा रागाने लालीलाल झाला. “हे पहा, मला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. मी त्याला नोट लिहिली होती. ती तुम्ही वाचली असणार. त्यात जे मी लिहिले आहे त्यावर मी ठाम आहे. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका असं लिहिले असतानाही तुम्ही आलात. आता इथून निघा नाहीतर मी सिक्युरिटीला बोलावीन. उगीच शोभा होईल.”
रामरावांनी तेथून काढता पाय घेतला. हा राउंड आपण हरलो आहे दुःखद याची जाणीव त्यांना झाली.
==============================================================

पण रामराव असे सहजा सहजी हार मानणारे असते तर आत्तापर्यंत त्यांनी आपला धंदा बंद करून पेरी मॅसन किंवा धनंजय ह्यांच्या घरी पाणक्याचे काम नसते का धरले.
“मग आता पुढे काय करायचे?” आवाजाने क्षीण आवाजात रामरावांना विचारले.
“अनिलजी,असा धीर सोडून कसे चालेल? मला विचार तरी करू द्या. जगात असा कोठलाही प्रश्न नाही की ज्याचे उत्तर नाही. मग हा तर अगदी साधा सुधा प्रश्न आहे.” रामराव अनिलजी पेक्षा स्वतःलाच धीर द्यायचा प्रयत्न करत होतो.
“जीवन हे असेच असते. त्याची रीतच अशी न्यारी उफराटी. ज्या वेळी जे पाहिजे असेल ते त्या वेळी मिळाले तर. पण नाही. आता मला ह्या सर्वांचा वीट आला आहे. सर्व संग परित्याग करून संन्यासाश्रम स्वीकारावा आणि हिमालयात अशा ठिकाणी जावे की जेथे इंटरनेट, ट्विटर, फेसबुक, चॅट असणार नाही. ऑर्डर करायला अमेझान स्विगी असणार नाही. ऑर्डर केली तरी हिमालयाच्या दुर्गम पर्वतातील गुहेत येऊन पॅकेट कोण डिलिवर करणार? ‘हेल इज द अदर पीपल अॅंड इंटरनेट इज द गेटवे टू द हेल.’ ते दरवाजे बंद केले कि न रहेगा बॉंस, न बजेगी बॉंसुरी! एक सांगा, रामराव समजा तशीच वेळ आली तर – जस्ट इन केस ह- स्विगी उकडलेली कंदमुळे डिलिवर करतील काय हो? तस कशाला जाताना थोडी बांधूनच घेईन बरोबर. हिमालयात जाण्यासाठी जी कोणती लेटेस्ट फ्लाईट असेल तिचे तिकीट बुक कराल का माझ्यासाठी? ‘मेक माय ट्रीप’ला माझे नाव सांगा.......”
“हे पहा सराफ, इतर काही माहित नाही पण अमेझानचा मोटो असा आहे कि ‘वुइ डिलिवर व्हेअर नो मॅन हॅज एवर डिलिवर्ड!’” रामरावांनी सराफला जाणीव करून दिली कि एकविसाव्या शतकातली ही पिशाच्चं ‘पाठलाग हा सदैव करतील असा कुठेही जगती.’
“अनिलजी, हिमालय, सन्यास असले खुळचट विचार डोक्यातून काढून टाका. मला अजून थोडा वेळ द्या. मी माझ्या कामात यशस्वी झालो नाही तर मी पण तुमच्या बरोबर हिमालयात येईन आपण जोडीने जाऊ.”
अखेर सराफने कुरकुरत का होईना मला एक शेवटचा चान्स द्यायचे मान्य केले.
निराश, विमनस्क रामराव हॉटेलात विचार करत बसले होते. नशिबाने चांगली केस मिळाली होती, पण लाभत नव्हती. हजार हजार रुपयाची आचमन टाकणाऱ्या रामरावांना लाखाची लॉटरी लागली होती. काय उपयोग? ह्या क्षणी जर का सराफचे शरीर त्यांच्या समोर आले असते तर त्यांनी त्याचा मर्डर केला असता.
त्यांच्या समोर सराफचे शरीर नव्हते तर वेटर ऑर्डर घेण्यासाठी उभा होता. रामरावांना पत्त्याच नाही.
रामराव आपल्यासारखेच. आपण हॉटेलात गेलो कि उगीचच वेटरला विचारतो गरम काय आहे. खरं तर घ्यायचा असतो कटिंग चहा.
न विचरता वेटरने गरम यादी धडा धडा सांगितली.
“साधा आईसक्रिम, फ्राईड आईसक्रिम, कोला, लस्सी, छास. निंबूपाणी, इडली, डोसा, उत्थप्पा, मेंदूवडा, वडापाव, कोल्हापुरी मिसाssssळ.....”
“चमचाभर पॉयझन नाही मिळणार?”
“पॉयझन? काय ते?”
“विष.”
“विष? इथं नाही भेटत ते. शेजारच्या केमिस्टकडे मिळेल. घरात उंदीर झाले जणू.”
“जा सध्या एक कडक मीठा घेऊन ये. तो काही विषा पेक्षा कमी नाही.”
रामराव चहा पिता पिता विचार करत होते.
पाठीवर धपाटा बसला तेव्हा ते विचारतंद्रीतून बाहेर पडले. पाठी नितीन कोर्डे उभा होता.
“काय रामू, किती दिवसांनी तुझा रडका चेहरा दिसला. चहा पितो आहेस? चहाचा आदर राख. चहा पिताना तरी हसरा चेहरा ठेवावा. नाहीतर चहाचा कोप होईल हो. काय प्रोब्लेम काय आहे?”
“कोरड्या. किती दिवसांनी भेटतो आहेस रे. केव्हढा फुगला आहेस. कॉलेजमध्ये सुक सुक लकडी होतास! बायको खूप लाड करते का. म्हणून एव्हढा वाढलास?”
कोरड्याने पण कडक मीठाची ऑर्डर दिली. मग खुर्चीवर मांडी ठोकून बसला. जुनी सवय.
“रामू, तुझा धंदा कसा चालला आहे? डिटेक्टिव एजन्सी सुरु केली होतीस असं कानावर आलं होतं.”
“माझे सोड रे. तू काय करतोस ते सांग.”
“मी क़्विझ मास्टर झालो आहे. कुठेच काही जमेना म ही लाईन पकडली. बरं चाललं आहे. मोठ मोठ्या हॉटेलात, शाळा कोलेजात प्रॉग्राम करतो. पोटापुरतं मिळतं. आपल्याला जास्तीची अपेक्षा नाही. त्यामुळे सुखी आहे. पोटापुरतं दे रे देवा लई नाही लई नाही मागणं. अशी
आपली पॉलिसी. कुणाला सुखी माणसाचा सदरा पाहिजे असेल तर सांग. कंपनी भावात देईन.”
रामरावांना वाटलं आपणच एक मागावा.
आणि त्याच वेळेला त्यांच्या डोक्यात ती फॅंटॅस्टिक आयडिया आली.
“नितीन माय डीअर गुडफेलो, मला मदत करशील?”
“अरे सांग माझ्या आका, बंदा आपकी सेवामे हाजीर है.” रामरावांनी आपली योजना नितीनला समजावून सांगितली. रोझीलाही सामील करून घेतले.
रोझीला फोन केला.
“अरे रामराव, काय तुझा हा सराफ. मला सोडायला तयारच नाही. चिकटू साला. माझ्या बरोबर नको त्या जागी यायला बघत होता. शेवटी त्याला पिटाळला तेव्हा शुद्धीवर आला.”
“रोझी, थोडा पेशन्स ठेव. क्लायमॅक्सच्या जवळच आहोत आपण.”
रामरावांनी रोझीला थोडक्यात प्लॅन समजावून सांगितला.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ‘ला बेला दाम’ पंच तारांकित हॉटेलच्या बॅंन्क़्वेट हॉल मध्ये क़्विज़चा कार्यक्रम सुरु झाला.
रोझी आणि सराफची बॉडी दोघेही प्रेक्षकांच्यामध्ये उपस्थित होते. रामरावांच्या बरोबर आवाज होता. चला, इथपर्यंत प्लॅन के मुताबिक होते.
प्रथम नितीनने स्वतःच्या – डॉन क़्विज़ोमॅटिक्स – कंपनीचीची ओळख करून दिली. नंतर खेळाची कल्पना दिली. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या धर्तीवर हा ‘कौन बनेगा लखपती’ बेतला होता. विजेत्याला लाख रुपये रोख बक्षिस मिळणार होते.(हे मोठे आकर्षण होते.)
नितीनने खेळाची नांदी केली.
भाग घेण्यासाठी खूप प्रेक्षक उत्सुक होते. पण नितीनने सराफच्या शरीराला पाचारण केले. सराफला असल्या खेळात काडीमात्रही रस नव्हता. पण रोझीने त्याला भरीस घातले म्हणून तो पुढे झाला. रोझीने त्याच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून तो खुश होऊन खुळ्या सारखा बिचकत बिचकत स्टेज वर गेला.
“वहिनी, लाजू नका. तुम्ही पण अनिलसाहेबांबरोबर बसा.”
रोझीने लाजण्याचा अप्रतिम अभिनय केला. (ते बघून रामरावांच्या हृदयात कळ उठली.) नितीनने थोडी इकडची तिकडची बक बक केली, सराफची पब्लिकला ओळख करून दिली, त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आणि गेम सुरु केला.
नितीनने पहिला प्रश्न विचारला.
“महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय आहे.
तुमचे ऑप्शन आहेत
एक – मुंबई
दोन – टीम्बक्तू
तीन – पुणे
चार – मुक्काम पोस्ट ढेबेवाडी
आणि
पाच – नागपूर.”
हॉल मध्ये टाचणी पडेल तरी आवाज येईल एव्हढी शांतता. सर्व प्रेक्षकांनी आपापले मोबाईल सरसावले. मुलाने आईबाबांना, बहिणीने भावाला, मित्रांनी मैत्रणींना, पुतण्याने काकांना, नवऱ्याने बायकोला, ह्याने त्याला/तिला आणि तिने तिला/ह्याला एकच प्रश्न विचारला.
“महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय आहे?”
प्रेक्षकांमध्ये तीन गट पडले. मुंबैवाले, पुणेवाले आणि नागपुरवाले.
बिचाऱ्या ढेबेवाडीला कोणी वाली नव्हता.
इकडे हॉटसिट वर बसलेल्या सराफचा चेहरा घामाघूम झाला. प्रश्नातला एकही शब्द त्याच्या ओळखीचा नव्हता. राजधानी –पुणे – मुंबई – नागपूर? हे काय प्रश्न झाले.
विचारायचे झाले तर दारूच्या जाती उपजाती विचारायच्या की नाही. किंवा तरुणींच्या अंग प्रत्यंगाची नावे विचारायची.
रामरावांनी त्याची त्रेधा तिरपीट बघितली. त्यांनी अनिलच्या आवाजाला म्हणा, मनाला म्हणा, वा आत्म्याला म्हणा सांगितले, “हीच ती क्रुशिअल वेळ आहे. जा पुढे व्हा आणि आपल्या शरीराचा ताबा घ्या.”

आता माहौल बदलला होता. अनिल सराफ पूर्वीचा अनिल सराफ झाला होता.
अनिल सराफने हसत हसत उत्तर दिले. “मुंबई.”
“लोक हो, तुम्हाला काय वाटते हे उत्तर बरोबर आहे?”
प्रेक्षकात आरडा ओरडा सुरु झाला. पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर हमरातुमरीवर आले.
नितीनने सगळ्यांना शांत राहण्याचा इशारा केला.
“शांतता शांतता शांतता. वाद विवाद कशाला. आपण आपल्या कॉमप्युटर बाबाला विचारूया.”
नितीनने हेड फोन धारण केला.
“कॉमप्युटर बाबा, महाराष्ट्राच्या राजधानीचे नाव काय आहे? फक्त माझ्या कानात सांग बरका.”
नितीन आपल्या जागेवरून उठला. त्याने नाटकीय पद्धतीने सराफ आणि रोझीच्या भोवती एक चक्कर मारली.
“आपका जवाब,” एव्हढे बोलून त्याने पॉझ घेतला. आता उत्सुकतेने परिसीमा गाठली होती.
“सही है.”
उत्तर ऐकून पुणेकरांची आणि नागपूरकरांची घोर निराशा झाली. इतके दिवस म्हणजे त्यांची चुकीची समजूत झाली होती का? नागपूरकरांचे म्हणणे होते कि हिवाळ्यात नागपुरच राजधानी असते की नाही? पुणेकरांचा पॉइंट निराळाच होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे “अहो, पुणे सगळ्या जगाची किमान भारताची तरी सांस्कृतिक राजधानी आहेच आहे.” एक खवचट पार्लेकर म्हणाला, “ते काहीही असो, कोथरुडची मात्र नक्कीच आहे.”
हा प्रश्न तसा खूप अवघड होता. नंतरचे प्रश्न मात्र त्यामानाने अगदी सोप्पे सोप्पे होते. उदा. १९७० सालचे अर्थशास्त्राचे नोबल कुणाला मिळाले? सराफने धाडदिशी उत्तर दिले. “पॉल सॅम्युएलसन.” किंवा “एका कोळियाने” ही स्पायडरमॅनच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी कुणी लिहिली? अर्थात पी एल देशपांडे ह्यांनी! हा काय विचारायचा प्रश्न झाला.
असो.
रामरावांना उरलेल्या पन्नास हजारांशी देणेघेणे - माफ करा – घेणे होते.
कार्यक्रम संपल्यावर अनिलजी हसत हसत रामरावांकडे आले.
“मी आपला आभारी आहे रामराव. आणि हे घ्या आपले उरलेले- पन्नास हजार!” मग रोझीकडे बघून ते म्हणाले, “रोझी, गेल्या दोन दिवसात आपली ओळख अशी फारशी झालीच नाही. नाही का? चल आज......”
तर रोझी अनिल सराफ बरोबर गेली. मला काय त्याचे?
चालायचच. असो.
मत्प्रिय वाचकहो, नितीनने एक प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर सराफला काय नितीन कोरडेला पण माहित नाही. प्रश्न असा होता,
“सोडावॉटरच्या बाटलीत ती गोटी कशी टाकतात?”
कुणाला उत्तर माहित असेल तर प्लीज इथे प्रतिसादात टाकाल का?

कथा

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

4 Apr 2022 - 12:40 am | गामा पैलवान

भागो,

एकदम मस्त. मजा आली.

गोटीच्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही. पण तर्क लावतो. त्यानुसार मला वाटतं की बाटली बनवतांना आधी गोटी घेऊन तिच्याभोवती बाटली फुंकत असावेत.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

4 Apr 2022 - 12:42 am | गामा पैलवान

भागो,

बऱ्याच दशकांनी नटमोगरी हा शब्द वापरलेला पहिला. धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

तुषार काळभोर's picture

4 Apr 2022 - 10:15 am | तुषार काळभोर

अन एक्दम अत्याधुनिक गोष्टीत पण १९५४ सालच्या कादंब-यांत शोभतील अशी नावे असतात :)
मजा आली.
गोटीवरून बॉईज-२ पिच्चरमधलं गोटीसोडाबाटलीफोडा गाणं आठवलं

सौंदाळा's picture

4 Apr 2022 - 2:16 pm | सौंदाळा

लेखन आवडले.
पण कथेचा टर्निंग पॉइंट तितकासा रुचला नाही.

श्वेता व्यास's picture

5 Apr 2022 - 11:08 am | श्वेता व्यास

कथा आवडली.

कर्नलतपस्वी's picture

5 Apr 2022 - 2:42 pm | कर्नलतपस्वी

_/\_

भागो's picture

6 Apr 2022 - 10:03 am | भागो

आभार. कथा वाचून प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. काही प्रतिसाद विचार करायला लावणारे.