कुठलाही प्रवास मला आवडतो. अगदी कमी अंतरावरचा रिक्षातला सुद्धा. काय एक एक नमुने दिसत असतात. पण फक्त नमुनेच पाहिले पाहिजेत असं नाही. आत्ताच मेट्रोने (पुण्यातली नाही, आधीच स्पष्ट करतो) प्रवास करताना एक खूपच गोड म्हणता येईल असं एक कुटुंब सोबत होतं. त्यात एक सर्वात गोड अशी मुलगी होती. वय असेल अंदाजे 5-6 वर्षे. इथे हैदराबादला परकर पोलकं घालणाऱ्या मुली सर्वत्र असतात. त्यामुळेच की काय छान दिसत होती. तिचा दादा असेल 10-12 वर्षाचा. तर तो तिला सारखं मास्क लावण्याविषयी टोकत होता. पण ह्या मुलीचे वरचे 4 दात पडले होते आणि त्याचा कोण आनंद तिला झाला होता! ती सतत हसत होती कारण त्यामुळे तिचा दादा पण ते बघून हसत होता, त्यांना तसं हसताना पाहून खूपच मस्त वाटत होतं. खरंच दात पडणं ही किती छान गोष्ट आहे असंच वाटत होतं तिच्याकडे बघून. काही दिवसांपूर्वी माझा भाचा सुद्धा त्याचे दात पडले की आम्हा सगळ्यांना अगदी विडिओ कॉल करून दाखवायचा. आज हा पडला, आता हा हलायला लागलाय तो देखील पडेल अशी ती चर्चा मस्त चालायची. त्याच्या मित्रांमध्ये देखील अशाच achievements विषयी चर्चा होत असे. हा आनंद मला वाटतं नंतर थेट म्हातारपणातच मिळतो. माझ्या घरात एकीकडे ह्या भाच्याचे तर दुसरीकडे माझ्या आजीचे दात पडत आहेत आणि गंमत म्हणजे दोघेही हसताना खूपच निरागस दिसतात. मी कॉलेजला असताना आमचे एक सर गाडीवरून पडले आणि त्यांचे समोरचे दात पडले त्यातला एक दात नेमका पूर्ण निघाला नाही पण तुटला त्यामुळे तो पडेपर्यंत त्यांना नवे दात बसवता येणार नाहीत असं त्यांच्या डॉक्टरने सांगितलं. पण तोपर्यंत ते बोलायला लागले आम्हाला हसू आवरत नसे त्यामुळे आम्ही भरपूर शिव्या खाल्ल्या. त्यावेळी त्यांचा तो तुटलेला दात लवकर पडावा म्हणून आम्हीच जास्त प्रार्थना केली असेल. खरंच त्यावेळी मास्क नव्हते तेच बरं होतं नाहीतर अशी छान आठवण आमच्याकडे आज नसती.
शरीराच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक गंमती होत असतात. दहावीला असताना अभ्यासाच्या टेन्शनबरोबर मला मिशा उशिरा तर येणार नाहीत ही पण काळजी असायची. ज्यांना मिशा आल्या होत्या त्यांचा swag काही औरच असा असायचा. ह्यासोबत फुटलेला आवाज ही एक नवीनच डोकेदुखी होती. मला वाटतं पुरुष ह्या टप्प्यावरच गप्प बसायला शिकत असतील.च्यायला नवा आवाज मिळाल्यावर जास्त बोलायला हवं तर उलट होतं. असो. मागच्या वर्षी कोविडच्या दुखण्यातून उठल्यानंतर एके दिवशी अचानकच डोक्यावरचे केस गळायला लागले, बघता बघता प्रमाण खूपच वाढलं. इतकं की आता शाम्पू आणि खोबरेल तेल ह्याची गरज संपते की काय असं वाटायला लागलं. अकाली टक्कल पडलेल्या मित्रांचे चेहरे राहून राहून डोळ्यासमोर यायला लागले. त्यांना चिडवल्याचा पश्चाताप व्हायला लागला. पण सुदैवाने तसं काही झालं नाही.
अशा सगळ्या गलबल्यात केस पांढरे होणे ह्याला काही फार महत्व उरलं नाहीय. वाढणार वय आणि पांढरे केस हे समीकरण मला वाटतं कधीच नाहीस झालंय. त्यामुळे त्याचा आणि आनंदाचा किंवा दुःखाचा काही संबंध उरला नाहीये. तसाही आताचा काळ हा केसांच्या बाबतीत काळा पांढरा न राहता बराच रंगीबेरंगी झाला आहे. पुन्हा असो.
एकंदरीत दात येणे, पडणे, पुन्हा येणे आणि नैसर्गिकरित्या कायमचे पडणे ह्या टोकांमध्ये बरेच टप्पे आहेत. ते जितके उपभोगता येतील तितके उपभोगून घ्यावेत. कारण माझे दात पडले आहेत हे आनंदाने इतरांना दाखवण्यासाठी वरील दोन टोकांपैकी इतर कोणतही वय हा काही चांगला पर्याय नाही. आमच्या त्या सरांसारखं अवस्था होईल नाहीतर! ह्या सर्वांपेक्षा जास्त दुःख होतं ते निरागसता संपल्याचं! निरागसतेसारखं स
प्रतिक्रिया
31 Mar 2022 - 6:08 am | कर्नलतपस्वी
आमावस्येचा पण आपला एक वेगळाच आनंद आसतो
31 Mar 2022 - 11:31 pm | सौन्दर्य
छान हलकाफुलका लेख, आवडला.
शाळेत असताना 'दंतपुराण' किंवा अशाच नावाचा एक धडा होता, त्यात दातांचे वेगवेगळे प्रकार विनोदी पद्धतीने मांडले होते. त्यात 'भोपळे फॅशन'म्हणजे भोपळ्याचा बियांसारखे दात असे एका प्रकारच्या दातांचे वर्णन होते. आजही तसे दात दिसले की तो धडाच आठवतो व चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटते.
लहानपणी जेव्हा दुधाचे दात पडून नवीन दात यायला लागतात त्यावेळी अश्या नव्याने येणाऱ्या दातांना जिभेने स्पर्श करायची खोड लागते परिणाम स्वरूपी हे दात पुढे येऊ लागतात जे चांगले दिसत नाहीत, मग अश्या दातांना ब्रेसेस लावून काबूत ठेवावे लागते.
माझ्या निरीक्षणा प्रमाणे येथे अमेरिकेत शाळेतील मुलींच्या दातांना ब्रेस लावण्याचे प्रमाण ७५% तर मुलांचे ५०% आसपास आढळले आहे. हाच प्रकार चष्म्याच्या बाबतीत आहे. कितीतरी वेळा तीन चार वर्षांच्या मुलांना लागलेले चष्मे पाहून वाईटच वाटते.
'दात येण्या'च्या आनंदापेक्षा 'दात पडण्या'चा आनंद जास्त असतो अशीही एक 'दंतकथा' आहे.
असेच छान छान लिहीत रहा.
1 Apr 2022 - 1:06 pm | चौथा कोनाडा
मस्त झकास !
दात पडकी गोड मुलगी डोळ्यांसमोर उभी राहिली !
आवडलं लेखन !
आमचं म्हणाल तर ....
वेळच्यावेळी दात पडले वेळच्यावेळी आले.
वेळच्यावेळी दाढीमिशी आली, वेळच्यावेळी आवाज फुटला.
अन ..... वेळच्यावेळी केस पांढरे व्ह्यायला सुरुवात झाली !
1 Apr 2022 - 5:12 pm | सिरुसेरि
मजेदार आठवणी .