भिंतीवरचा चिवट पिंपळ

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
30 Mar 2022 - 11:19 pm

भिंतीवरचा चिवट पिंपळ
-----------------------------------------------------------------------------------------------------------

रेश्मा कण्हली. तिने अस्वस्थपणे कूस बदलली . तिच्या अंगात कणकण होती. तिचे दाट, काळेभोर रेशमासारखे केस मोकळेच होते. ते आता अगदीच गबाळेपणाने कसेही पसरले होते. परत तिला ग्लानी आली. त्यात तिला काहीबाही आठवत राहिलं.
तिला तिचं लहानपण आठवलं . गावातलं.
कित्ती छान होतं ते ! गरिबी असली तरी.
तिचा बाप मोलमजुरी करायचा . तिची आई बाळंतपणातच दगावली होती. त्यामुळे बाप आणि आजी त्या आईविना पोरीला जास्तच जीव लावत.
ते एका झोपडीत रहात. समोर लांबवर डोंगर होता. बाप दिवसभर कामाला. दुसऱ्याच्या शेतात मजुरीवर . आजी घरातली कामं करायची . आणि ती शेजारी पाजारी हुंदडायची . तिथं तिच्यासारखीच मुलं. ती मुलं पळायची, खेळायची, वारं प्यायची, झाडावर चढायची, नदीत डुंबायची , मासे धरायची अन काय काय.
रात्री पांढऱ्या केसांच्या , जाडुल्या आजीला बिलगून झोपताना तिला भारी वाटायचं .उबदार,सुरक्षित. मग आजी गोष्ट सांगायची.
एका डोंगरावर एक दुष्ट जादूगार रहात असतो. त्याच्या वाड्यात त्याने एका राजकन्येला कोंडून ठेवलेलं असतं. वाड्याच्या चारी बाजूला प्रचंड मोठे, ज्वाला ओकणारे सर्प . मग एक राजपुत्र येतो. त्या सर्पांशी , जादूगाराशी लढतो. आणि राजकन्येला सोडवतो.
ते ऐकल्यावर तिचं मन आनंदाने भरून जायचं. मग तिचा शेवटचा ठरलेला प्रश्न असायचा .
तो जादूगार आपल्या समोरच्या डोंगरावर राहतो का ? आजी नाही म्हणायची . ते ऐकल्यावर तिला हायसं वाटायचं . मग ती आजीला बिलगायची. दोघी मऊशार गोधडीत गुडूप होऊन जायच्या बाहेरच्या आकाश आणि त्याच्या कुशीतल्या चांदण्यांसारखं .
=====
तिची झोप मोडली . सपनाने तिला मिठसाखरेचं पाणी दिलं . तिने ते कसंतरी प्यायलं कोरडं पडलेलं तोंड जरा ओलसर झालं . ती परत आडवी झाली . पुन्हा ग्लानी . पुन्हा आयुष्याच्या चित्रपटाची रिळं फिरत राहिली -
एके दिवशी आजीने तिला वेगळीच गोष्ट सांगितली - लग्नाची . स्वतःच्या लग्नाची . मजेशीर . हे नवीनच काहीतरी होतं . तिच्या डोक्यात नव्याच गोष्टी फिरू लागल्या . तिथले ज्वाळा ओकणारे सर्प गेले अन थुईथुई नाचणारे मोर आले !
थोडी मोठी होताच आजीने तिचं लग्न लावून दिलं . पोरगाही कोवळाच . तिच्यापेक्षा थोडा मोठा . मजुरी करणाराच . आणि तिच्या बापाच्या दुप्पट दारू पिणारा .
सुरुवातीला ती खुशीत होती . देहसोहळा आनंदून भोगत होती . तिला तो राजपुत्र वाटत होता .
तिला दिवस गेले . एक मुलगी झाली .
तिचा नवरा मोठमोठ्या गप्पा करायचा . त्याला मजेत आयुष्य जगायचं होतं . त्यासाठी त्याला गावात रहायचं नव्हतं . एके दिवशी तो दोघींना घेऊन एका मोठ्या शहरात आला .
ते मोठं शहर पाहून ती भयचकित झाली आणि आश्चर्यचकितही !
रेश्माला काय ? जिथे नवरा तिथे ती ! सुरुवातीच्या दोन दिवसांत नवऱ्याच्या प्रेमाने , चांगलंचुंगलं आयतं खाण्याने , नवीन कपड्यांनी ती सुखावली . ते एका गाववाल्याच्या झोपडीत राहत होते . तो एकटाच होता . हे आले म्हणून तो तात्पुरता दुसरीकडे गेला . नवरा काम शोधायला बाहेर जाऊन यायचा . ती पोरीचे मुके घेत , तिला कवटाळत , तिच्याशी लाडे लाडे बोलत त्याच्या येण्याची वाट पाहत बसायची . आपलं आयुष्य आता बदलणार यात तिला शंका राहिली नव्हती .
=====
तिचं आयुष्य बदललं .खरोखरी बदललं …
एका क्षणात तिचं आयुष्य एका दुःस्वप्नात बदललं .
तिच्या नवऱ्याने मायलेकींना एका दलालाला विकलं आणि पैसे मिळाल्यावर स्वतःचं तोंड काळं केलं.
ती एका कुंटणखान्यात येऊन पडली . परिस्थितीची दुःखद जाणीव गडद झाली , तेव्हा तिला कळलं की पोरगी आणि कुठेतरी विकली गेलीये .
एक वर्षाची तान्ही पोर ती , आईच्या अंगावर पिणारी ... तिला त्या दुधाचा आणि आईच्या प्रेमाचा लाभ आयुष्यभरात पुन्हा कधीच होणार नव्हता . आणि आयुष्याची परवड वेगळी .
गाव सुटलं , माहेर सुटलं. नवरा गायब ,पोरही गायब . आसऱ्याला कुंटणखाना . नकोनकोसा वाटणारा . गलिच्छ !
तिने खूप विरोध केला . ती खूप रडली. पार डोळ्यातलं पाणी आटेपर्यंत . बदल्यात तिला मिळाली उपासमार, पाशवी मार आणि तनमन भाजून टाकेल असा लैंगिक अत्याचार .
थोड्याच दिवसात तिला सारं काही कळून चुकलं . तिला जिवंत रहायचं होतं . तिच्या पोरीला शोधायचं होतं . आजीकडे परत जायचं होतं आणि ... नवऱ्याचा बदला घ्यायचा होता .
=====
दलालाने तिच्या रेशमासारख्या असलेल्या केसांवरून तिचं नाव रेश्मा ठेवलं होतं .
लक्ष्मीची रेश्मा झाली . तिची जुनी ओळख त्या एका नावातच पुसली गेली . तिने ते नाव स्वीकारलं . परिस्थितीही .
तिने कपाळाचं कुंकू पुसलं ... आणि झगमगती टिकली लावली .
त्या xxxx नवऱ्याचं कुंकू पुसताना तिला जराही दुःख झालं नाही .
रेश्मा सावळीशी . वागायला साधी, दिसायलाही साधीच. अंगाने भरलेली वगैरे नाही. किरकोळच. चेहऱ्यावर शांत भाव. म्हणजे गिऱ्हाइकं आकर्षून घ्यायला भांडवलाचा सगळाच अभाव .
पण तिच्या काळ्याभोर रेशमी केसांनी वेढलेल्या चेहऱ्यात एक सात्विक सौन्दर्य होतं.
तिथली अक्का म्हणजे मालकीण , एक गलेलठ्ठ काळी बाई होती. जाडजूड हातांची, आडदांड . त्या हातांचा पुरेपूर वापर करणारी. पोरी तिला टरकून असत . तिच्यामागे तिला खडूस अक्का म्हणत.
तिथल्या पोरींनी तिची दखल घेतली. तिला समजावलं , सावरलं . त्यांचं एकेकीचं दुःख ऐकता ऐकता तिचं दुःख कमी होत गेलं . तिच्या गावातल्या डोंगरावरचा झरा पावसानंतर जसा हळूहळू आटत जायचा , तसं.
आणि रोजचा देहसोहळा ... पण आधी हवाहवासा वाटणारा तो , आता मात्र प्रेमहीन , यंत्रवत , नकोसा .
तिथल्या पोरी प्रेमाने एकत्र रहात असल्या तरी त्यांच्यामध्येही धुसफूस असायचीच . चारच दिवसांत तसा प्रसंग आला.
बंट्या आसपासचा एक भाई होता. नवानवा उगवलेला . छाती फुगवून चालणारा . जास्तीचे हातवारे करून बोलणारा . तब्येतीने चांगला होता पण तिचा जादाच मज असलेला .
एके दिवशी तो आला. सपनाकडे बसायला . ती दिसायला गोरीपान , शिडशिडीत अन तरतरीत होती . पण ती त्याला नाही म्हणाली. ती चार दिवस आऊट होती. त्यांच्या भाषेत तिचं मास्टर कार्ड आलं होतं. सपना त्याची फेव्हरेट होती. त्याचं टाळकं सणकलं. पण तो गप्प बसला .
बंट्या विचारात पडला . त्याच्या नजरेस रेश्मा पडली.
ती आल्यानंतर तो पहिल्यांदाच आला होता. तो तिच्याकडे पाहतच राहिला. तिची शांत मुद्रा त्याला आकर्षक वाटली. जणू चिखलात उगवलेलं कमळ .
त्या रात्री तो तिच्याकडे गेला . पण एक घोळ झाला.
सपनाला वाटलं , जाईल एखाद्यावेळेस तिच्याकडे अन येईल फिरून आपल्याकडे. हिच्यापेक्षा तर आपण सुंदर आहोत .पण तसं झालं नाही. बंट्या रेश्माच्या साधेपणाने वेडा झाला. त्याच्या क्वचित होणाऱ्या चकरा वाढल्या .
लहानपणी आजी तिला गजरा करून द्यायची . ज्या मिळतील त्या फुलांचा . एके संध्याकाळी तिला आजीची अन गजऱ्याची आठवण आली . मोगऱ्याचा सिझन सुरु झाला होता . त्या दिवशी तिने मोगऱ्याचा गजरा केसांत माळला . तिचे रेशमी केस मोकळे सोडले . मोगरा घमघमत होता . बंट्यासाठी !
सपना ते पाहत होती , असूयेने . तिचं डोकं फिरलं होतं .
थोडक्यात, रेश्माने सपनाचं गिऱ्हाइकं तोडलं होतं . हे कारण भांडणासाठी पुरेसं होतं . आधी सपनाने रेश्माशी भांडण केलं . आणि बंट्याशीसुद्धा . पार शिव्यागाळीपर्यंत अन हाणामारीपर्यंत .
बंट्या गेला तो कोयताच घेऊन आला. सपनाला मारायला . पण रेश्मा मध्ये पडली. तिने त्याला स्वतःची आण घातली .
' ए साली , तू बीचमी मत पड नाही तो तेरेकोभी खलास कर दूंगा ! ‘ बंट्या म्हणाला.
त्यावर रेश्माने त्याला हात जोडले, ‘ 'बंट्या , जाऊ दे राजा .'
बंट्या आणखी चवताळला.
‘ ठीक आहे . मला मार. घे जीव माझा ,' रेश्मा म्हणाली.
त्यावर बंट्या भंजाळला . तो तिच्याकडे पाहतच राहिला. मग निघून गेला.
सपना पुन्हा तिच्याशी भांडली , म्हणाली , ' ते माझं गिऱ्हाईक आहे , कळलं ? अन तेवढंच . तुझं त्याच्यावर दिल-बिल आलं असेल ना , तर साफ झूठ ! '
तेव्हा रेश्माला जाणवलं - आपल्याला बंट्या , त्याचा सहवास आवडायला लागलाय ...
अक्काने काय चावी फिरवली कोणास ठाऊक ? पण त्या माडीची पायरी बंट्याने परत चढलीच नाही. तिथे जायचं नाही, हे त्याने ठरवूनच टाकलं . पण प्रेमभंग झाल्यासारखा तो वागू लागला. उगा ! रेश्माच्या यादमध्ये तो जास्त प्यायला लागला.
सपना रेश्माला त्रास देण्याची एक संधी सोडत नसे . पार तिचे कपडे फाडून ठेवण्यापासून ते शिव्यागाळी करण्यापर्यंत . तिचा तो एक आवडता टाईमपास होता . रेश्मा बिचारी सहन करीत राहायची . ही इथून दुसरीकडे गेली तर बरं होईल असं तिला वाटत राहायचं .
पण सपना तिला सुखाने काही जगू देईना .
तिचा त्रास सोडता दिवस जात होते. रेश्मा आता तिथे सरावली होती… तिचा स्वाभिमान हज्जारदा ठोकला गेला होता . तिची तळतळ विझत चालली होती . आता तिने पोरीची आस सोडली होती. आणि बदल्याची आगही.
घरी जायचा तर प्रश्नच नव्हता. आजी-बापाला काय सांगणार होती ती ? त्यांचा दुःखाचा जीव आणखी दुःखात पडला असता.... आणि... धंदा ?....
परत फिरायची वाट बंद झालेली ती एक अभागी स्त्री होती .
त्यांचा तीन मजली वाडा होता . काडेपेटीसारखा . पूर्ण त्यांचा . जुन्या पद्धतीचा. थोडाफार पडका . त्याच्यामध्ये एके ठिकाणी पिंपळ उगवलेला . खोल्यांना खिडक्या . ज्यामध्ये उभं राहता येईल . आजूबाजूची पूर्ण गल्ली , पूर्ण परिसर धंदेवाल्यांचाच . तंग कपडे घातलेल्या , भडक मेकअप केलेल्या पोरींनी भरून गेलेला . जिन्हें नाझ है हिंदपर , वो कहां है ? या साहिरच्या गाण्याची आठवण करून देणारा .
रात्री कधीतरी गिऱ्हाईकांचं ओरबाडणं संपल्यावर अंथरुणाला पाठ टेकायला मिळायची. कंजेस्टेड कम्पार्टमेंट्स . वर्षानुवर्ष वापरलेल्या घाणेरड्या गाद्या- उशा. कधीच्या काळी रंगवलेल्या भिंती. त्या वस्तीत देवाचं माहित नाही पण अस्वच्छपणा मात्र कणाकणात भरून राहिलेला . एखादीने निवांत खाल्लेल्या गुटख्याचा , तर दुसरीच्या सिगारेटच्या धुराचा , वेगवेगळ्या उदबत्त्या अन परफ्युम्सचे वास .
त्यात ढेकूण. गिऱ्हाईकं ठराविक भागालाच चावायची ... पण ढेकूण मात्र - मिळेल तिथे !
त्यांच्यातली एक पोरगी वात्रट होती , ज्यूली. तिचा एक जोक ठरलेला होता - अपना बदन हैच इसके लिये . चढ़नेके लिये ! पहिले कस्टंबर बादमे खटमल !
पण अशा सगळ्या परिस्थितीत झोप लागायची नाही.अक्काच्या वर असलेल्या यल्लम्मा देवीच्या फोटोला दहा वेळा नमस्कार केला तरी . देवी बदलून इतर बाबा - महाराजांच्या फोटोला नमस्कार केला तरी .
तिला वाटायचं ,आपण दुष्ट जादूगाराच्या वाड्यात अडकलो आहोत. पण तिथून सोडवणार कोण ?
आणि त्या वाड्याला राखणारे चार सर्प - दलाल , त्यांचे गुंड, अक्का आणि समाज. सगळेच इतके मजबूत कि...
पण एक गोष्ट होती - दुष्ट जादूगार फक्त उंच डोंगरावरच्या वाड्यातच राहतो , असं काही नाही . हे तिला आताशी उमगलं होतं . तो कोणीही असू शकतो ... माणूसही , परिस्थितीही .
मग तिला आजीची याद यायची. स्वतःच्या पोरीपेक्षा जास्त. तिला गावच्या मोकळ्या हवेची याद यायची . इथे तर सगळी घरं एकमेकाला चिकटून . सदानकदा मादीला नर चिकटल्यासारखी . तिचा जीव तिथल्या प्रत्येक गोष्टीनेच गुदमरायचा .
मग तिला आजीच्या गोष्टीची याद यायची . लहानपणी तिला कळत नसे. पण तिला आता सतत वाटत राहायचं . गोष्टीत राजपुत्र मोठं साहस करायचा. पराक्रम गाजवायचा. का? एखादा दुसऱ्याच्या शेतात मजुरीवर राबणारा मजूर का नाही ? कि सामान्य माणूस काहीच मोठं काम करू शकत नाही? का तो परिस्थितीच्या खाली झोपायलाच जन्माला येतो? …
पण त्याच परिस्थितीत त्याच सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी खळबळजनकही घडतंच की ... सपना गरोदर राहिली.
त्या पोराचा बाप कोण ? ते यल्लमादेवीलाच माहित .
अक्काने विरोध केला . पोर पाडायला सांगितलं . उगा झिकझिक ! धंद्याची खोटी ! पण सपनाला पोर पाहिजे होतं . बुढेपनकी काठी म्हणून . त्याच्यावर भांडाभांडी . सपनाला मारहाण
पण तिच्या बाजूने उभी राहिली - ती रेश्मा .
=====
ती चावट पोरगी ज्यूली कधी बोलायची भारी . थोडीफार शिकलेली , वाचायची आवड असलेली . जेव्हा सपना अक्कापुढे झुकली नाही , तेव्हा तिने तो पिंपळ तिला आणि रेश्माला दाखवला होता . पडक्या भिंतीत , सिमेंटमध्ये उगवलेला . म्हणाली , ' हा पिंपळ बघा . कुठेही येतो , कसाही वाढतो . चिवटपणा सोडत नाही . आपलंही तसंच आहे . आपणही इथे तसेच , जगतच राहतो ... पण मला तर वाटतं की हा चिवटपणा तर निसर्गाने प्रत्येक बाईला दिलाय .'
रेश्माला आधी परिस्थितीशी लढायचं होतं. ते अशक्य आहे हे कळल्यावर तिला कितीदा तरी मरायचं होतं . तरीही ती जगत होती . त्या पडक्या भिंतीवरच्या चिवट पिंपळासारखी .
तिथे गर्भारपणाचा अनुभव कोणालाच नव्हता. अक्कालासुद्धा. एक रेश्मा सोडता.
रेश्मा जणू सपनाची आईच झाली. कधी सपना तिच्या गळ्यात पडून रडत असे. इतकं वाकडं वागूनसुद्धा ही इतकं चांगली कसं काय वागू शकते ,याचा तिला प्रश्न पडत असे.
सपनाचे गर्भारपणाचे सगळे कोडकौतुक रेश्माने पुरवले . तिचे डोहाळे पुरवले . एकदा तिच्या या प्रेमाने सपनाला तिच्या आईची याद आली अन ती ओक्साबोक्शी रडायलाच लागली . रेश्माने तिला कुशीत घेतलं . तिला शांत केलं .
एके दिवशी एक गोरंपान, गुटगुटीत बाळ जन्माला आलं.सपनासारखं गोरं आणि कदाचित त्याच्या माहित नसलेल्या बापासारखं गुटगुटीत . पोरी त्याला गुंडू म्हणायला लागल्या .
पण हाय रे दैवा ! त्याच्या मागेच कोरोनाही जन्माला आला.
डेंजर ! जीवघेणा ! माणसं माणसांनाच घाबरायला लागली. लांब पळायला लागली .जवळ येणं सोडाच स्पर्शही टाळायला लागली. अशी परिस्थिती बाहेर , मग या बायांकडे बसायला येणार कोण ? झक मारायला !
आधी त्यांच्याकडे बसायला माणसं यायची, तर आता धंदाच बसला होता. अन धंदाच बसला तर पोट खपाटीला बसायला किती वेळ लागतो ?
गिऱ्हाईक घाबरायला लागली होती. त्यात संचारबंदीसारखी अवस्था. अन थोडी संधी मिळाली तरी....विषाची परीक्षा घेणार कोण ? गल्लीतल्या पोरी जणू विषकन्या ठरल्या होत्या.
संध्याकाळपासून फुलून जाणारी वस्ती सामसूम झाली होती . गुंडू जन्माला आला तेव्हा मोप थंडी होती . पण हळूहळू उकाडा सुरु झाला होता .
अक्का तिथली जुनी.ती म्हणायची,' मैने जिंदगीमे ऐसा लफडा कब्बीच नही देखा. गल्ली ऐसी शांत कब्बीच नही देखी . जबसे इधर आई ! …’
पण अक्काने पोरींना प्रेमाने सांभाळलं .अक्काचं हे प्रेमळ रूप पोरींनी कधी पाहिलं नव्हतं .
अक्का कायम बैठकीच्या खोलीत बसलेली असायची . इतर खोल्यांच्या मानाने ती खोली प्रशस्त . बसायला खुर्च्या . वर एलईडी ट्यूब्स . फिकट बदामी रंगाच्या प्रकाश देणाऱ्या .
अक्का सपनाच्या पोराला मांडीवर घेऊन बसायची. त्याचं जावळ कुरवाळायची. म्हणायची , ' मेरा गुंडू बडा आदमी बनना मंगताय ! ' कोरोनाने तिचा झाकलेला प्रेमळपणा वर आला होता.... तिची कूस कधी उजवलीच नव्हती ना . ती बोलकी झाली. पोरींना तिच्या जवानीतल्या एकेक गंमती सांगू लागली.
एके दिवशी रेश्माने अक्काला सांगितलं , पोरी तुम्हाला खडूस म्हणतात म्हणून . त्यावर ती खदखदून हसली . तिचं थुलथुलीत पोट गदगदा हलेपर्यंत . तिचा मूड भलताच मस्त होता ना . नंतर तिला म्हणाली , असू दे . मी आहेच खडूस . पण गुंडू मला कधी खडूस म्हणेल का ?
गुंडू बाळ अक्काकडे असायचं नाहीतर रेश्माकडे . रेश्मा जणू त्या बाळात हरवून गेली होती ...
ती सपनाला म्हणायची , ' मी गुंडूला आयाबहिणींची इज्जत करायला शिकवणार गं ! '
त्यावर सपना हसून तिला टीचर म्हणायची .
पण त्या छोट्या पोरामुळे त्यांच्या त्या घरात जिवंतपणा होता . त्या बंदिस्तपणाच्या काळातही .
त्या दिवसांमध्ये सगळं घर जणू जवळ आलं. देहाला आराम होता , पण त्याने पोट तर भरत नाही . चार दिवस खूप बरं वाटलं , सगळ्या पोरींना . लचकेतोड थांबली होती . पण जसा आठवडा गेला - पोरी उदास बसायच्या. कधी खिडकीत, कधी अक्काच्या पायाजवळ , ते चेपून द्यायला . तेव्हा डोळ्यात पाणी आणून ती म्हणायची, ' गल्ली ऐसी शांत हो जाएगी तो एक दिन हमबी शांत हो जाएंगे ! …’
सगळ्या दुनियेचेच हाल , त्यात यांचेही . जवळचा पैसा संपला . नवीन आवक थांबलेली. बरं , कोणी उसने पैसे देईना कि किराणा… कर्जबिर्ज कोणाला चुकलंय आणि ?
अक्कानं टेन्शन घेतलं. अन एके दिवशी तिला हार्ट ॲटॅक आला. तिला ऍडमिट करावं लागलं .
या सगळ्या परिस्थितीला घाबरून दोन - तीन पोरी पळून दुसऱ्या धंद्यावर गेल्या. दोन - तीन पोरी एका दवाखान्यात आया म्हणून कामाला लागल्या. कोविड वॉर्डात . रिकामं पोट जीवाची भीतीही बाजूला ढकलून देतं !
राहिली ती रेश्मा,सपना आणि तिचं बाळ . त्या बाळाकडे बघून, त्याचं निष्पाप हसणं बघून त्यांचे दिवस सरत होते . पण त्याने पोट तर भरत नाही.
अक्का असती तर तिने काही केलं असतं. पण ती नव्हती अन पैसा नव्हता आणि घरात सामानही. अशा परिस्थितीत काय करायचं ? हे त्या दोघींनाही माहिती नव्हतं . त्यांना फक्त एकच गोष्ट वापरायची माहिती होती . बाकी दुनियादारी शिकायला त्यांना संधी कधी मिळाली होती ?
त्यात एक दिवस ते बाळ तापाने फणफणलं.
त्याला डॉक्टरकडे न्यायचं कसं ? नेलं तर पैसे ? पोराची अन पोटाची, दोन्ही गोष्टी अवघड झाल्या होत्या.
गल्लीत जरा गडबड झाली म्हणून रेश्माने पाहिलं . खाली एक टेम्पो आला होता. बरोबर बंट्या आणि पोरं. त्यांनी शिधावाटपाचा कार्यक्रम हातात घेतला होता. एक मोठी पिशवी . त्यावर स्थनिक नगरसेवकाचं नाव आणि फोटो.
पिशवीत दोन किलो कांदे अन दोन किलो बटाटे.
कंटेनमेन्ट झोन असल्याने तिथं फारच अवघड परिस्थिती होती . साधा भाजीपाला मिळायची मुश्किल ! या परिस्थितीत ते सामान म्हणजे मोठीच गोष्ट होती. रेश्मा बघत होती. टेम्पोमधल्या पिशव्या संपत आल्या होत्या. तिचा जीव खालीवर होत होता. तिला एका पोराला हाक मारावीशी वाटली. पण तिथे बंट्या उभा असल्यामुळे ती गप्प बसली. वाटणारी पोरं त्यांच्या बिल्डिंगकडे येतील असं तिला वाटेना. आधी तिला वाटलं होतं , या परिस्थितीत तरी , बंट्या आपल्याला एखादी पिशवी जास्त देईल . पण कसलं काय ?
बाकीची पोरं वाटप करत होती . बंट्या पुढारपण करत रुबाबात उभा होता . टेम्पोला टेकून . त्याची नजर वर रेश्माच्या खिडकीकडे गेली . तीही तिथे होतीच . त्याच्याकडे पाहत . पण नजरानजर झाल्यावर मात्र त्याने नजर वळवली .
बंट्या पुरा बदला घेत होता. त्याने एका वाटणाऱ्या पोराला इशारा केला, यांच्या बिल्डिंगमध्ये न जाण्याचा.
तिचे डोळे पाण्याने भरले. कांदे बटाटे तर कांदे बटाटे तेही आता खूप होते.पोट भरायला. त्यात सपना पोराला कुशीत घेऊन बसलेली. चोवीस तास. जे काही करायचं होतं ते तिलाच करायचं होतं .
बंट्या टेम्पोपासून हलला तसा तिने त्या दांडगट पोराला डोळा मारला. पोरगं बनेल होतं. त्यानेही उलट डोळा मारला.
टेम्पो गेला. पोरंही गेली. निर्मम संध्याकाळही हात हलवत निघून गेली .
रेश्मा विचारात पडली होती. बाळाला दूध पाहिजे आणि त्यासाठी सपनाला खायला पाहिजे. पण खाणार काय ? आजतर घरात दाणा नव्हता.तिला खूप अगतिक वाटलं , हरल्यासारखं . तिला त्या बाळाविषयी कणव दाटून आली. तिला तिच्या तान्ह्या पोरीची याद आली.
पोरगं वाचलंच पाहिजे. आता तिचं ते एकच लक्ष्य होतं. आता बाहेर अंधार झाला होता . ती खिडकीपाशी गेली आणि तिला तो पोरगा दिसला . पोट्या. त्याच्या हातात भली मोठी पिशवी होती.
तो टपाटप ढांगा टाकत जिना चढून वर आला. तिने दार उघडलं.तो आत आला. त्याच्या मागे तिने झटकन दार लावून घेतलं. तिला उगा पंचाईत नको होती . त्याने थोडीशी का होईना, गावठी टाकलेली असावी . घपकन वास आला .
' घे ! भरपूर आणलंय.दोनचार पिशव्या एकत्र केल्यात.'
' थँक्स रे ', ती म्हणाली. काही शब्द तिथल्या पोरी सर्रास वापरायच्या.
' ते थँक्स नको मला… मला बसायचंय.'
' क्या ? येडा होगयेला क्या तू ? '
' ए .., देते का, जाऊ घेऊन परत ? कांदे - बटाटे पायजे ना ? चल ! मग तुझे कांदे - बटाटे दे ! '
रेश्माचं काळीज धडधडलं . ती गप बसली.
' मेरेको सपनाके साथ बैठनेका , ‘तो पुढे म्हणाला.
' अरे , तिचं पोर आजारी आहे. '
' ते मला माहित नाय .'
रेशमाचे डोळे पाण्याने भरले . तिला त्या पोटातल्या आगीलाच आग लावावीशी वाटली . नाहितर काय ? हा साला फालतू पोरगा ! दुसऱ्याने दिलेल्या कांदे - बटाट्यावर फुकटचा भाव खातोय साला ! आयत्या बिळावर नागोबा . अशा वेळीहि त्याला त्याच्या बदल्यात बाई पाहिजे . शरीर विकणं तिला काय नवीन होतं ; पण हे काय ? इतका क्षुद्रपणा असावा आयुष्याला . या क्षणाला तिला त्या परिस्थितीचा खूप राग आला .
ती आतल्या खोलीत गेली. तिने सपनाला ते सांगितलं , तर तिने त्या पोट्याचं खानदानच उद्धारलं .
रेश्मा बधीर झाली. तिला ती कांदे-बटाट्याची मोठी पिशवी दिसत होती. तिला वाटत होतं , सपनाने आढेवेढे घेऊ नयेत. पण तिची पोराला सोडायची तयारी नव्हती .
मन वैरी उगा ! …पोटातल्या भुकेच्या आगीने तिचं चित्त सैरभैर झालं ... हे पोर म्हणजे पापाचं पोर. त्याचा बाप कोण ? हेहि साला माहिती नाही ... अन त्या साल्यासाठी एवढं .. . तिचे विचार रागाने भरकटले . पण क्षणभरच .
पण सपना … त्याची आई ?....अन तिला हृदयाच्या आतून तिच्या मुलीची याद आली. इवलीशी जिवणी फाकून हसणाऱ्या तिच्या बाळाची. परत तिचं गुंडूवरचं प्रेम उफाळून बाहेर आलं .
तिच्या आठवणीने , काही विचारात ती बाहेर आली.
' ए, ती नाही बसत… माझ्याबरोबर बसतो का ? '
त्याने एकदा तिला खालूनवरून न्याहाळलं . भाईचं सामान…सोडलेलं .... त्याला चालणार होतंच. त्याला मोकळं व्हायचं होतं... फक्त मोकळं . त्यासाठी त्याला बस एका मादीची गरज होती ...
कपडे काढताना तिला वाटलं , आता आपल्याला कोरोना होणारच आहे. आपण उडी टाकलीच आहे , एका मौतका कुँवामध्ये ! पण जाणूनबुजून. त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी… एक सामान्य माणूस, एक आई काय करू शकते ? तर काहीही... अगदी दुसऱ्याचं पोर असलं तरी ! ...
कोरोनाच्या सुरवातीचा काळ. भ्रमित करणारा. त्यात ती एक साधी, अडाणी स्त्री. त्या क्षणाला , ती यापेक्षा वेगळा काय विचार करू शकणार होती ?
गर्मीचे दिवस . कपडे काढूनही , फॅन लावूनही उकडत होतं . त्याचा स्पर्श निबर होता . तो धसमुसळेपणाने आवाज करत होता .
त्याला अंगावर घेताना ती थरकापली. आता थेट स्पर्श -एका देहाचा दुसऱ्या देहाशी. हा दिवसभर कुठेकुठे फिरला असेल ? कोणाकोणाला भेटला असेल? … गल्लीतल्या पोरींनी धंदा बंद केला. आणि बंद ठेवायला सांगितलंही आहे. आणि आपण ? देह जगवण्यासाठी देहच वापरायचा ! या पोट्याने कांदे-बटाटे तर दिले. - पण आपण त्याला पैसेही मागू या . सपनाचं तरी भागेल . अंगावर पाजणाऱ्या आईचं पोट तर भरायलाच पाहिजे .
आता आपल्याला कोरोना होणार. आपण मरणार… बरं होईल. या परिस्थितीच्या , दुष्ट जादूगाराच्या तावडीतून आपल्याला मरण सोडवेल. एक राजपुत्र बनून !....
तरीही मरणाच्या भीतीने तिचं विचारचक्र थांबलं. तिने पोट्यालाही थांबवलं .
' ए कोरोना ?...'
' कसला कोरोना ? येडे ! आपल्याला काय झालेला नाय आन तुलाबी होणार नाय. तू ....तू मला....तर मी तुला सगळं सामान आणून देईन. जे पाहिजे ते .'
' कसं काय? '
' तुला काय करायचंय ? आपल्याला कोण नाही बोलेल यार ? भाईये आपण इथले ! बस नाम बता - सब हाजीर ! खाना - पिना , दारू,गांजा जे पाहिजे ते .' त्याने वाफा सोडल्या . बंट्याभाईच्या जीवावर .
' ए, खरंच काही होणार नाही ? '
' एक बार बोला ना नही, बस ! '
तिला हायसं वाटलं. घरासमोरच्या डोंगरावर जादूगार राहत नाही हे कळल्यावर जसं वाटायचं तसं .
काही होत नाही म्हणल्यावर आणखी गिऱ्हाईकं करायला हरकत नव्हती . तिला बरंच वाटलं . आणखी पैसे कमवता येतील . त्यात हा पोट्याही मदत करेल .
पोटयाचं खरं होतं. त्याला काहीच होत नव्हतं ...अगदी तो कोरोनाचा वाहक असला तरी !
तो गेला. जाताना कांदे-बटाट्याची पिशवी आणि रेश्माला कोरोना देऊन.
=====
तिचा ताप वाढला. ग्लानीही .
बंट्यापर्यंत निरोप गेला. रेश्माची वाईट अवस्था कळल्यावर त्याच्याही डोळ्यांत पाणी आलं . बाकीच्या पोरांना न दिसेलसं त्याने ते पुसून टाकलं . xxx xxx तो जागला .
त्याने अँब्युलन्स पाठवली. तिला एका सरकारी दवाखान्यात दाखल करून घेतलं गेलं.
तिला जेव्हा बेडवर ठेवण्यात आलं , तिचा त्रास वाढला होता. तिला श्वास लागला.
आजूबाजूला सगळेच पेशंट . कोरोनाबाधित. स्टाफची धावपळ. डॉक्टर कमी. आणि ऑक्सिजनची तर बोंबच ! …
तिला ऑक्सिजन लावावा लागणार होता. पण आणणार कुठनं? त्याचा पुरवठा बोंबललेला होता . तिच्याकडे लक्ष कोण देणार ? ती एक सामान्य बाई, त्यातून धंदेवाली ...
तिची तब्येत बिघडतच चालली . तिचं भान गेलं . आजूबाजूचा गोंधळही तिला ऐकू येईनासा झाला .
पिंपळाचा तगून राहण्याचा चिवटपणा संपला होता . जणू त्याला मारण्यासाठी त्याच्या मुळावर कोणी ऍसिड ओतलं असावं .
मग एके क्षणी - तिच्या नजरेला एकदम लख्ख प्रकाश दिसला. त्या प्रकाशात तिला आजी दिसली.आणि आजीच्या हातात असलेलं सपनाचं बाळ. पोटभर प्यायलेलं… हसणारं.
मग दुसऱ्या क्षणाला रेश्माच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला . संपूर्ण . कायमचा .
============================================================

kathaa

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

31 Mar 2022 - 3:14 am | सोत्रि

खुप छान!

- (कथा आवडलेला) सोकाजी

कर्नलतपस्वी's picture

31 Mar 2022 - 6:04 am | कर्नलतपस्वी

माणूसकिचे अनेक पहलू क्रोधाने दाखवले.
कथा आवडली.
लिरवारू

कर्नलतपस्वी's picture

31 Mar 2022 - 2:35 pm | कर्नलतपस्वी

कधी कधी ये भ्रमणध्वनी आघावपणा करतो.
करोना मधे माणूसकीचे अनेक पहलू बघायला मीळाले.

सौंदाळा's picture

31 Mar 2022 - 11:02 am | सौंदाळा

अप्रतिम कथा
तुम्ही एखादी दीर्घ कथा लिहायचे मनावर घ्याच आता.

कासव's picture

1 Apr 2022 - 12:56 am | कासव

कथेचा शेवट होत असताना खूप सुन्न झालं. खूप छान कथा लिहिली आहे असं म्हणणं पण जीवावर येत आहे.

मी सुद्धा करोना योध्या च काम केलं आहे. सुन्न करणारे अनुभव पण घेतले पण ह्या वेष्या कशा तग धरून राहिल्या असतील lockdown मध्ये हा विचार पण नाही केला कधी.

ही एक खरी गोष्ट आहे का? की कल्पना विस्तार?

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2022 - 12:56 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त कथा ! चित्रदर्शी ओघवती लेखन शैली !
रेश्माचे चित्र तंतोतंत डोळ्यापुढे उभे राहिले !
कोरोनाच्या काळात अश्या लोकांचे खुप हाल झाले. एका वेगळ्या जगाला स्पर्श करून सुन्न करणारी कहाणी समोर आणलीत !

सिरुसेरि's picture

1 Apr 2022 - 4:04 pm | सिरुसेरि

विदारक वास्तववादी लेखन .

कपिलमुनी's picture

1 Apr 2022 - 9:52 pm | कपिलमुनी

नो कमेंट्स

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Apr 2022 - 9:39 pm | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी खूप आभारी आहे
कायम ऋणात

बिपीन सुरेश सांगळे's picture

4 Apr 2022 - 9:41 pm | बिपीन सुरेश सांगळे

कासव
खूप आभारी आहे .

हि एक पूर्ण काल्पनिक कथा आहे .
कळावे

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 Apr 2022 - 7:28 am | बिपीन सुरेश सांगळे

सौंदाळा
आपल्या प्रतिक्रियेचे खूप स्वागत
नक्की लिहीन
वेळेचा अभाव हा एक अडथळा आहे मात्र
पण एक दीर्घकथा लिहिलेली आहे , इथे आहे ती - अदा बेगम
ती आपण वाचलीही आहे
कळावे

चांदणे संदीप's picture

12 Apr 2022 - 11:42 am | चांदणे संदीप

कोरोनामुळे इतके विदारक प्रसंग ऐकले, वाचले, पाहिले. पण, हा एक निराळा वाचनानुभव.

जराशी मोठी कथा आहे दिसल्यावर नंतर सावकाश वाचू असं ठरवून सोडून दिलेलं. पण, शीर्षक कुठेतरी माझ्यातल्या कवीला सारखं साद घालत होतं. एखाद्या कवितेची चांगली ओळ होऊ शकते असं वाटतं होतं. मग आज फक्त शीर्षक घेऊन काहीबाही खरडल.

भिंतीवरचा चिवट पिंपळ
मुळे रोवूनी खोल जातो
राबत्या वाहत्या जगाला
कोवळ्या पानांनी बघतो

पुढे फुटतो कोंब कोवळा
मळकट मुळांची मागे नक्षी
कधी विसावा पाहून बसती
हलके येऊन नवथर पक्षी

गावकुसाच्या राईमध्ये, आब
राखूनी पिंपळ असतो
भिंतीवरचा एकूट पिंपळ
कोण त्याची दखल घेतो?

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा

छान समर्पक रचना !

राबत्या वाहत्या जगाला
कोवळ्या पानांनी बघतो

मुळ रचनेच्या संदर्भाने या दोन ओळींच्या मीटरमध्ये गडबड वाटते,
जाणकारांनी प्रकाश टाकावा.

फक्त शीर्षक घेऊन काहीबाही खरडल.

हे जर काहीबाही खरडणे असेल तर खरे काव्य / लेखन किती खोल असेल हाच विचार करतोय.

१०-१२ ओळीत काय काय बसवलयं!! मस्त .. .

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Apr 2022 - 6:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

आणि संदिप सरांचे समयोचीत काव्यही
पैजारबुवा,

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Apr 2022 - 7:25 am | बिपीन सुरेश सांगळे

संदीप
चौको
पैजारबुवा
आभारी आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Apr 2022 - 7:30 am | बिपीन सुरेश सांगळे

संदीप
कविता खूपच आवडली . छान शेड पकडली आहे

शीर्षक तसं आहे खरं .

आणखी लोकांनी वाचण्यासाठी ती कविता विभागातही लावावी

आणि एक -

भिंतीवरचा एकूट पिंपळ
कोण त्याची दखल घेतो?

या ओळी मला रेश्मा किंवा तसं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींशी साम्य दाखवणाऱ्या वाटल्या .

पुन्हा आभार अन शुभेच्छा !

तर्कवादी's picture

14 Apr 2022 - 6:54 pm | तर्कवादी

चित्रपटातील नायक्/नायिकेचा चिवट संघर्ष शेवटी यशस्वी होतो , बदला पुर्ण होतो असं दाखवलं जातं..
पण वास्तव आयुष्याच्या संघर्षात अनेकदा परिस्थितीच्या रेट्यासमोर स्वप्नं /धेय्यं बदलतात..अर्ध्यात सोडून द्यावी लागतात आणि अखेरीस 'जगणं' हेच धेय्य बनून जातं.
स्वतःच्या मुलीला भेटण्याचं स्वप्नही विसरुन गेलेल्या , दुसरीचं मुल वाचवणं हेच धेय्य बनलेल्या रेश्माची कथा हृदयस्पर्शी वास्तव आहे. या कथेवर चांदनी बार सारखा चित्रपट बनू शकतो..तुमची कथा एखाद्या निर्मात्यापर्यंत पोहोचावी याकरिता शुभेच्छा..

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Apr 2022 - 9:27 am | बिपीन सुरेश सांगळे

तर्कवादी
इतक्या सुंदर अन मोलाच्या प्रतिक्रियेबद्दल
आपला खूपच आभारी आहे

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Apr 2022 - 1:01 pm | बिपीन सुरेश सांगळे

आजच्या मटा मध्ये साहित्य संमेलनावर लेख आलेला आहे .
त्यामध्ये संमेलनाचं जुनाट स्वरूप यावर भर देण्यात आलेला आहे . आणि सध्याच्या काळाप्रमाणे त्यामध्ये बदल घडवला पाहिजे असं सांगितलं आहे .
अतिशय योग्य लेख !
सध्याच्या इ पिढीचा समावेश त्यामध्ये असावा , हा मुख्य मुद्दा ,.

त्यामध्ये मिसळपाव चा उल्लेख आलेला आहे . या संस्थळावर तरुण लोक मोठ्या प्रमाणात लिहितात आणि वाचतात असा उल्लेख आहे .
फार भारी वाटलं ते वाचून

अर्थात - फक्त तरुण लोक असं नाही तर सगळ्या वयोगटाचे असं म्हणायला पाहिजे होतं

आणि एक - फार संस्थळाचा उल्लेख नाहीये त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त

लेखाची लिंक असल्यास कोणी ती द्यावी

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2022 - 1:13 pm | चौथा कोनाडा

त्यामध्ये मिसळपाव चा उल्लेख आलेला आहे . या संस्थळावर तरुण लोक मोठ्या प्रमाणात लिहितात आणि वाचतात असा उल्लेख आहे .
फार भारी वाटलं ते वाचून

अगदी. मी दुसर्‍या एका धाग्यावर प्रतिक्रिया देताना या वृत्ताचा उल्लेख केला आहे.

लेखाची लिंक :
https://maharashtratimes.com/editorial/samwad/artical-on-95th-akhil-bhar...

बिपीन सुरेश सांगळे's picture

17 Apr 2022 - 7:33 pm | बिपीन सुरेश सांगळे

चौको

लै भारी
आभार
अन - लिंक दिली ते फार भारीच काम

बिपीन सुरेश सांगळे's picture

26 Apr 2022 - 11:05 pm | बिपीन सुरेश सांगळे

साहित्य संमेलनातील सासणे सरांच्या भाषणातील काही भाग -

आजच्या मराठी साहित्याला सर्वसामान्य माणसाच्या जगण्याबाबत काहीएक करूणा वाटते काय, हा जुनाच प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमधल्या 'सादत हसन मंटो' ने अनेक वर्षांपूर्वीच उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवीय चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोअरकीपर्स, टांगेवाले, रस्त्यावर अंगमेहनतीची कामं करून जगणारे, अशांच्या जीवनव्यवहाराबाबत विलक्षण करूणा व आस्था मंटोंच्या कथांमधून प्रकट झाली असल्याचे सांगत मराठी कथेला अद्यापही एखादा मंटो मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अद्यापही मराठी कथेमध्ये करूणास्वरूप असं लिखाण आलेलं नसून समाजातला हा दुर्लक्षित वर्ग मराठी कथेतून सहसा सापडत नाही, या उणिवेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

कृपया वरील प्रतिसादाचा विपर्यास करू नये . मी सरांशी सहमत आहे . अनेकांचे प्रयत्न आहेत त्या दृष्टीने पण ते कमी आहेत , असा त्याचा अर्थ .