माझी राधा - २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Mar 2022 - 11:50 pm

न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.

आजकाल हे असं का झालं आहे तेच समजत नाही. या राज्यकारभारापासून दूर कुठेतरी निघून जावे असे वाटते पण एकटेपणाला आपण घाबरतोय. दिवस राज्यकारभारात व्यतीत होतो. कामात मग्न असल्यामुळे एकटेपणाची जाणीव होत नाही. रात्री एकटे असल्यावर डोक्यात विचारांचे काहूर माजते. सगळा इतिहास डोळ्यापुढे येत रहातो. उगाचंच. खरं तर आता त्या विचारांचा काहीच उपयोग नसतो.एखाद्या वेळेस आपण का तसे वागलो याचे स्पष्टीकरण शोधत रहाण्याला काहीच अर्थही नसतो. ज्यांना स्पष्टीकरण हवे होते ते काळाच्या उदरात नाहीसे झाले. ज्यांना नको होते त्यांना आताही त्याचा उपयोग नाही. स्पष्टीकरन म्हणजे स्वतःच्या चुकांची कबूली देण्यासारखेच आहे.
हस्तिनापूरच्या युद्धात कितीतरी योद्ध्यांच्या मरणाला आपण कारणीभूत झालो. योद्ध्याला वीर मरण असते आजाराने , जंगलात पडून हातपाय मोडून खितपत पडून किंवा श्वापदाने हल्ला केल्याने मरण येण्यापेक्षा वीरमरण हे कधीही चांगले असे कितीही म्हणालो तरीही आपण युद्ध टाळू शकत होतो ते आपण केले नाही. ही टोचणी मनातून कधीच जाणार नाही. आपल्या मनात ही भावना होतीच पण गांधारीच्या शापाने ती अधोरेखीत झाली. जो विचार आपण टाळू पहातोय तोच पुन्हा पुन्हा मनत येतो. ठेच लागलेल्या बोटावर पुन्हा पुन्हा तिथेच ठेच लागावी तसा.
हा विचार मनातून क्ढून टाकण्यासाठी मी लक्ष्य दुसरीकडे वळवतो.. गवाक्षाबाहेर कुठल्यातरी अज्ञात बिंदूकडे नजर लावतो. कसल्याशा अज्ञात प्रदेशाचे स्वप्न पहातोय.
या प्रदेशात एक वन आहे. हिरवागार झाडापानांनी नटलेले एक वन आहे. त्या वनातून खळाळत वहाणारा निर्झर आहे. पाण्याच्या त्या कलरवाशी संगत करत पक्षी गाणी गाणी म्हणताहेत. निर्झराच्या आजूबाजूला काही शेतमळे आहेत. तेथे रहाणार्या शेतकर्यांची लहान लहान कुटीरे आहेत. हिरव्यागार मखमली लुसलुशीत हिरवळीवर गाई आणि खिल्लारे मुक्त चरताहेत.
कुठे कुठे या हिरवळीतून वळणे घेत जाणारी पायवाट दिसते आहे. निर्झराच्या एका वळणावर एक मोठे कदंबाचे झाड आहे. झाडाखाली गोपाळ मुलांचा खेळ रंगात आला आहे. निर्झर वळण घेत एका डोहात विसावतो. डोहाच्या काठावर पाणी भरलेले घडे ठेवलेत. .... डोहाकडून आणखी एक पायवाट निघते. वळणवळणे घेत ती गावात येते. गावातली घरे जोडत ती आणखी एका मोठ्या प्रासादासरख्या घराकडे येते. त्या घराभोवती झाडे आहेत. दारत हिरव्यागार मोठ्या पानांचे हात जोडून स्वागताला उभी असल्यासारखी केळीची झाडे आहेत.
..... हे गाव ओळखीचे आहे. अज्ञात नाहिय्ये. अरे हे तर गोकुळ! कितीतरी आठवणी आहेत या इथल्या. वाकड्या ,पेंद्या , गोप्या हे आपले सवंगडी ... काय करत असतील ते आता..... मधे एकदा भेटायला आले होते आपल्याला ... किती संकोच झाला होता त्यांचा हे वैभव पाहून..... आपण एका राजाशी बोलतोय याचेच त्यांना दडपण आले होते. त्यांना आपली भेट मिळवण्यासाठीच कितीतरी सव्यापसव्य करावे लागले होते. ते अजूनही तसेच आहेत. त्यांना आपली केवळ भेट हवी आहे इतर कोणत्याही मागण्या नाहीत हे रक्षकांना खरेच वाटत नव्हते. त्यांचेही चूक नाही. द्वारकेच्या राजाला भेटणारे सगळेच काहीना काही मागण्या घेऊन येतात. कोणाला कसण्यासाठी जमीन हवी असते तर कोणाला काही कामासाठी मोहरा, कोणी न्यायासाठी दाद मागायला येते. तर कोणी आणखी काही . नुसते भेटायला कोणीच येत नाही. द्वारपालांनी अगोदर त्यांना हाकलूनच लावले होते पण नंतर ते भेटले. पाव घटीकेसाठीच. द्वारकेचं वैभव पाहून ते इतके संकोचले होते की काही बोलुच शकले नाहीत. त्या वेळेस हसू आलं होत त्याचंया निरागसपणाचं. येताना ते शिदोरी घेऊन आले होते. ती शिदोरीही रक्षकांनी त्यांना आत नेऊ दिली नव्हती.
गोकुळात गाई चरायला न्यायचो. सगळी एकत्र बसून घरून आणलेली शिदोरी खायचो. पोहे, भाकरी, लोणचं , दही कायकाय असायचं. कुठून ते सगळे मिसळून खाताना त्या काल्याची चव कोणत्याच पक्वानाला येणार नाही.गोड अंबट तुरट तिखट चवींचा असा छान एकत्र मिलाप कुठल्याच बल्लवाचार्याला जमणार नाही.
गोकुळाच्या त्या काल्याच्या आठवणींसोबत काल्याच्या वेळेस म्हणायच्या प्रार्थना , श्लोक , गाणी आठवली. टाळ्या ,दगड काठ्या जे मिळेल त्याने ताल धरायचो. साधेच खेळ , सूरपारंब्या , विट्टी दांडू , काय मजा यायची नाही. संध्याकाळी गाई घेऊन जाताना घरी जायची आपल्यापेक्षा गाईनाच अधीक ओढ असायची.गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट , त्यांचं ते हम्बरणं. ती यमुना नदी , तीचा डोह , काठावरची ती कदम्बाची हिरवट लालसर पालवीची झाडे. सगळं कसं डोळ्यापुढे उभे राहिले. हातातल्या बासरीशी चाळा करत मी त्या अज्ञात बिंदूकडे टक लावून पहातोय. मी हरवलोय त्या हरवलेल्या जगात.
बासरी ओठाला लागते. आणि सूर उमटू लागतात.
सा म प..... प म प ग रे सा. सा ध ध प प म प ग रे सा....
त्या स्वरमालीकेने मीच चमकतो. अंगावर शहारा येतो. हातावरचा केस न केस उभा राहिलाय.
भटियार माझी पाठ सोडणार नाही. एक एक स्वर एक एक स्वरांची ओळ आकाश जागवू लागली. आसमंतात कुठेतरी सूर्याची चाहूल लागणार आहे याची खूण जागवू लागली. समुद्राकडून येणारा पहाटवारा त्या कातरतेत भर घालतोय.
त्या स्वरंसोबत पैंजणांचा आवाजही यायला लागलाय. कुणीतरी बासरीच्या सूरांना पैंजणाच्या नाजूक घुंगरांच्या आवाजाच्या तालाची साथ संगत देतंय.
त्या तालाच्या साथ संगतीची जाणीव होताच साशंक होत मी बासरी वाजवणे बंद करतो. कोण असेल आत्ता या वेळेस? बासरीचे स्वर बंद झाले पैंजणाचे स्वर ही थांबले. आपल्याला भास झाला असेल. पण काळजी घेतलेली बरी. मी थांबून पहातो. पैंजणाचे आवज ऐकू येत नाहीत.
भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही.
आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात.
बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो.

क्रमश :

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Mar 2022 - 11:52 pm | विजुभाऊ

मागील दुवा माझी राधा http://misalpav.com/node/49963

सुखी's picture

15 Mar 2022 - 8:22 am | सुखी

मस्त लिहिलंय पुभाप्र

कर्नलतपस्वी's picture

15 Mar 2022 - 8:53 am | कर्नलतपस्वी

रात्री एकटे असल्यावर डोक्यात विचारांचे काहूर माजते. सगळा इतिहास डोळ्यापुढे येत रहातो. उगाचंच. खरं तर आता त्या विचारांचा काहीच उपयोग नसतो.एखाद्या वेळेस आपण का तसे वागलो याचे स्पष्टीकरण शोधत रहाण्याला काहीच अर्थही नसतो. ज्यांना स्पष्टीकरण हवे होते ते काळाच्या उदरात नाहीसे झाले. ज्यांना नको होते त्यांना आताही त्याचा उपयोग नाही. स्पष्टीकरन म्हणजे स्वतःच्या चुकांची कबूली देण्यासारखेच आहे.

खुपच छान लिहिलय. पुनरावलोकन हे नेहमीच मनात गोंधळ उडवते. गतकाळातील घटना,व्यकतीरेखा,घेतलेले निर्णय हे त्या कालमानानुसार त्यानां आजच्या दृष्टिकोनातून बघणे व कागदावर उतरवणे म्हणजे शिवधनुष्य आहे. उत्सुकता वाढत आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा,लवकरच प्रकाशित करा.

भागो's picture

16 Mar 2022 - 3:23 pm | भागो

छान चालली आहे कथा.

राघव's picture

16 Mar 2022 - 4:46 pm | राघव

मनातलं उतरवणं मुळातच कठीण. त्यात कृष्णाच्या मनातलं उतरवणं म्हणजे.. शिवधनुष्यच ते! वाचतोय. लिहित रहा.

तरीही आपण युद्ध टाळू शकत होतो ते आपण केले नाही. ही टोचणी मनातून कधीच जाणार नाही. आपल्या मनात ही भावना होतीच पण गांधारीच्या शापाने ती अधोरेखीत झाली.

पण हे बरोबर नाही. गांधारीच्या शापावर तिला उत्तर देताना ह्या भावनेनं कृष्णानं ते दिलेलं नाहीये. उलट तो त्या वृद्ध माता-पित्यांना समजून घेऊन देखील, तेवढ्याच कठोरपणे त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालतो. इतकं की ते तिलाही अनावर होतं.

ही टोचणी कृष्णाला कधीच नव्हती आणि युद्ध हे अपरिहार्य होतं हे त्याला पूर्ण मान्य होतं. महाभारत युद्धाच्या आधीपण अनेक क्रूर राजे कृष्णानं स्वतः संपवले आहेत तेही अपरिहार्य होतं हे मान्य करूनच. त्यामुळे युद्ध न टाळण्याचा दोष त्याच्याकडे जाऊ शकत नाही.

गांधारीही कृष्णाला शाप देतांना तो पांडवांचा हितचिंतक किंवा आप्तेष्ट किंवा द्वारकाधीश किंवा असामान्य योद्धा ह्या दॄष्टीकोनातून देत नाही, तर तो भगवंत/सर्वशक्तीमान आहे या भावनेनं, शक्य असूनही त्यानं युद्ध थांबवलं नाही म्हणून शाप देते.

मुक्त विहारि's picture

16 Mar 2022 - 7:33 pm | मुक्त विहारि

आवडलं

विजुभाऊ's picture

18 Mar 2022 - 11:48 pm | विजुभाऊ

पुढील भाग
माझी राधा - ३ http://misalpav.com/node/49987