माझी राधा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 Mar 2022 - 9:00 am

उत्तरात्र झाली आहे. कसल्याशा चाहुलीमुळे मी जागा झालो आहे.
उत्तररात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाच आवाज नाही. नाही म्हणायला दूरवरून अस्पष्ट ऐकू येणारी समुद्राची गाज ऐकू येतेय.
गवाक्षाबाहेरून येणारा प्राजक्ताच्या फुलांचा गंध वातावरणातील प्रसन्नता आणखीनच वाढवतोय.
इतक्या शांततेची सवय जवळजवळ संपलीच आहे. आजकाल वेळच कुठे असतो शांततेसाठी आपल्या कडे. दिवसभर काही ना काही चालूच असतं. कोणी ना कोणी सोबत असतंच. आपण एकटे असे नसतोच कधी.
माझेच विचार मला मोठ्याने ऐकायला येताहेत. काहीतरी धूसर आठवतंय. ते आपल्या हातातून निसटून गेलंय. हे प्रकर्षाने जाणवतय.
काहीतरी हरवलंय माझं . नक्की काय ते समजत नाही. अस्वस्थ करणार्‍या या विचाराने मी सैरभैर होतो. शोध कशाचा घ्यायचा तेच ठरवता येत नाही.ते कदाचित आत्ता समोर ही असेल
मी इकडे तिकडे पहातो. दालनातले सगळे दीप कधीचेच विझले आहेत. त्यांच्यातील सुगंधी इंधनाचा गंध आसपास रेंगाळतोय समोरच्या भिंतीवर रंगवलेले भित्तीचित्र त्यावरची पानाफुलाची वेलबुट्टी या मंद उजेडात अस्पष्ट दिसताहेत , मंचकावर ठेवलेल्या तबकातील विड्याची पाने कोमेजली आहेत. तबकात देठ लवंगा साली उरल्या आहेत. त्याच्या बाजूलाच लिहीण्यासाठी आणलेल्या शाईचा घडा,लेखणी आणि भूर्जपत्रे मांडून ठेवली आहेत.रात्री सेवकाला बाहेर जायला सांगितल्या नंतर आपण काहितरी लिहीत होतो. मलय देशातल्या दूताने आणलेली एक वार्ता उत्साहीत करणारीच आहे. वाटाघाटीं चे मुद्दे अगोदर विचार करून ठेवलेले चांगले असते.
दिवसभराच्या कामाची आठवण करून देणारी ही खूण.... राज्यकारभाराच्या जबाबदारी ची आठवण करून देते.
हल्ली केंव्हा केंव्हा यापासून कुठेतरी दूर जावेसे वाटते. पूर्वी हे असं नव्हते वाटत. अहीरांच्या बंडानंतर हे असं वाटायला लागलंय. ते बंड आपण मोडून काढलं . बळाचा वापर करून. राज्य वसवण्यासाठी त्यांची जमीन घेतली. त्यांच्यावर आपण अन्याय केलाय याची टोचणी मनातून जात नाही. पण राज्यकारभारात हे असे कटू निर्णय घ्यावे लागतातच. कितीही न पटणारा असला तरीही. बहुजनांच्या सोयीसाठी कोणावरतरी अन्याय करावा लागतो.
काही दिवसतरी राज्यकारभारापासून उसंत घेऊया. कुठेतरी दूर जाऊया. पण जाणार कुठे. कुठेही गेलो तरी राज्यकारभारापासून दूर जाता येत नाही. ते सोडा ..... कुटुंबासमवेत साधं समुद्रकिनार्‍यावर जायचं म्हंटले तरी यादवसेनेचे रक्षक सोबत असतात. द्वारकेचं राजेपद अंगाला चिकटलय. ते सुटणार नाही. खरेतर त्यापासूनच लांब जायचंय. अदृश्य झालो तरच शक्य होइल ते. या विचारानं अस्फूट हसू येतं. स्वतःशीच हसतो.
मंचकाशेजारी ठेवलेल्या चषका शेजारीच ठेवलेल्या बासरी कडे लक्ष्य जाते.
एक अपराधी पणाची भावना मनात येते.आपण कितीतरी दिवसात बासरीला स्पर्षही केला नाही. त्या पिवळ्या रेषमी उत्तरीयात गुंडाळलेली बासरी मी अलगद सोडवतो. बासरीच्या वेळु वरून हात फिरवतो. किती साधं वाद्य आहे नाही! वीणेसारखे जपून ठेवा , तारा लावून घ्या हे असले नखरे नाहीत की मृदंगासारखी मुखलेपन केल्यानंतरच वाजेन अशा मागण्या नाहीत . एक हळूवार फुंकर पुरेशी असते हीला खुलवायला.
मी बासरी ओठाला लावतो. बोटांनी छिद्रे बंद करतो आणि एक फुंकर घालतो. इतक्या दिवसांनी बासरीची विचारपूस केली याचा कसलाही राग मनात न आणता ती बोलायला लागते. माझ्या श्वासांना स्वर देणारी ही बासरी माझंच एक अभिन्न अंग आहे. हे मात्र प्रकर्षाने जाणवते.
युद्द्यात पांचजन्य शंख वाजवताना हे असे कधी जाणवतच नाही. तो देखील माझ्याच श्वासामुळे बोलतो. बोलतो कसला! ओरडतो. ऐकणाराच्या छातीत धडकी भरवतो.
संदीपनी गुरुजींच्या आश्रमात असताना गुरुजींच्या पुत्राला पंचजनाच्या तावडीतून सोडवताना आपल्याला मिळाला होता.
गम्मत आहे नाही. दोन वाद्ये दोन्ही आपणच वाजवतो. एक युद्धाला प्रेरीत करतो आणि दुसरी........?
मी माझ्याच विचारांना हसतो. हा असा कधी विचारच केला नव्हता. हातातली बासरी पुन्हा ओठाला लावली. नी ध प म प ग रे सा.....
न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.
( क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 9:03 am | मुक्त विहारि

गम्मत आहे नाही. दोन वाद्ये दोन्ही आपणच वाजवतो. एक युद्धाला प्रेरीत करतो आणि दुसरी........?

हे वाक्य आवडले .....

गवि's picture

12 Mar 2022 - 12:18 pm | गवि

वाचतोय

सुखी's picture

14 Mar 2022 - 8:20 am | सुखी

Interesting पूभाप्र

विजुभाऊ's picture

14 Mar 2022 - 11:52 pm | विजुभाऊ

माझी राधा - २ http://misalpav.com/node/49971