शिनेमाचं कोर्ट

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
19 Jan 2022 - 8:40 pm

शिनेमाचं कोर्ट.
  भुतकाळात म्हणजेच माझ्या बालपणी
'ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या 'च्याचालीवर,'शिनेमा सत्यं जगन्मिथ्या'; अर्थात : आजूबाजूला जे दिसतंय ते खोटं असू शकेल पण  शिनेमात दाखवतात ते सत्य असते, अशी धारणा असण्याच्या वयात,शिनेमातली कोर्टं,
शिनेमातल्या कोर्टात चालणारे खटले,शिनेमातल्या कोर्टातले व
कोर्टाबाहेर,म्हणजे घर,क्लब इ.ठिकाणी असणारे जज्जसाहेब,
सरकारीवकील,बिनसरकारी,म्हणजे साधेवकील,साधेपोलीस,
साहेबपोलीस,खरे साक्षीदार,खोटे साक्षीदार,सज्जनआरोपी,बदमाशआरोपी,
हे सगळेच 'लयी भारी'या कॅटॅगिरीत मोडणारे असायचे !
काय ते कोर्ट,काय ते कोर्टातले लोक,काय ते कोर्टातले खटले!काय काय आणि कसे कसे वर्णावे?
ते शिनेमे भुतकाळात जमा झाले.तसेच माझे बालपण ही!पण वर्तमानकाळात सुध्दा ते शिनेमे कधीमधी पाहायला मिळतात,आणि तो भुतकाळ वर्तमानात येतो .
  तर अशा शिनेमातले जज्जसाहेब,ख-या कोर्टातल्या खरोखर रिटायर झालेल्या,ख-या जज्जसाहेबापेक्षा,किमान दहा वर्षांनी म्हातारे दिसणे आणि अतिगंभीर चेह-याचे असणे बंधनकारक असे.ते जेव्हा कोर्टात नसत तेव्हा म्हणजे,कोर्टाबाहेर असत तेव्हा,म्हणजेच,घरी,दारी वा घराबाहेर, इतरत्र असत,तेव्हा कायम थ्रीपीस सूट मधे,आणि तोंडात जळती सिगार(सिगारेट नाही)किवा चिरूट धरून असायचे. घरात असताना ,कधीकधी सूटाला सुट्टी देऊन 'गाऊन'शी गट्टी असे.हा गाऊन कोर्टातला नसे.
वेगळा असे.
घरात असे गाऊन घालणारा जज्ज, वकील वा इतर कुणी इसम प्रत्यक्षात मला तरी कधी पाहायला मिळाला नाही.
  अंदाजे दोनहजार चौरसफुट (किमान)आकाराचे हॉल मधून वरती जाण्यासाठी,म्हणजे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी,दोन्हीकडून किंवा एकीकडून पाय-यायुक्त जीना असलेल्या,अतिभव्य,बंगल्याखेरीज  इतरत्र राहाण्यास जज्जसाहेबांना आणि वकीलांनाही कुठल्यातरी कायद्याचे,
कुठल्यातरी कलमानुसार बंदी आहे असा सगळ्या शिनेमावाल्यांचा दृढ समज असावा.म्हणून या मंडळींचा 'शिनेनिवास' प्रचंड मोठ्या बंगल्यातच असणे क्रमप्राप्त असे.
घरातल्या लोकांशी जज्जसाहेब,किंवा जज्जसाहेबाशी घरातले लोक,
घरगुती,वा कौटुंबिक विषयावर, हास्यविनोद करत बोलले तर ईंडीयन पीनल कोडच्या कुठल्यातरी कलमाखाली सगळ्यांना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली जाईल,असा ही शिनेमावाल्यांचा समज असावा.त्यामुळेच की काय,शिनेमातल्या त्यांच्या घरात कायम गंभीर वातावरण असणे आवश्यक.
जज्जच नाही तर सरकारी वकिलाकडे पण तीच परिस्थिती असायची .
  त्यामुळे एखाद्याही शिनेमात,बंगल्याऐवजी छोट्या घरात वा फ्लॅटमधे राहणारे,आपापल्या घरात तरी ,थ्रीपीस सूट,गाऊन ऐवजी;सदरा पायजमा ,धोतर ,लुंगी बनियन, अशा साध्या कपड्यात वावरणारे;सिगार,चिरुट ऐवजी,तंबाखू हातावर मळून,तोंडात अलगद चिमुट सोडणारे,घरात गंभीर चेह-याने वावरण्याऐवजी,घरच्यांशी घरगुती वा हवापाण्याच्या गप्पा मारणारे,विनोदी किस्से सांगणारे व सांगितलेले ऐकणारे,वकील किंवा
जज्जसाहेब,कधीच पाहायला मिळाले नाहीत,असे मी अगदी कोर्टातल्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून शपथेवर सांगू शकतो.
  शिनेमात मुख्य भुमिका जज्जची नसेल आणि ते नुसतेच कोर्टापुरते जज्जसाहेब असतील तर,भव्य बंगला,भव्य हॉल,जिना,पाय-या,घरात गाऊन,थ्रीपीस सूट,तोंडात सिगार,असले लाड व्हायचा प्रश्न नसे.त्यांचे म्हातारे असणे व अतिगंभीर चेहरा असणे मात्र मस्ट होते!तिथे अजिबात तडजोड नसे.अशा जज्जना कोर्टातल्या शीनमधे पण फारसा भाव नसे.पण काही अत्यावश्यक कामे मात्र,नियमितपणे इमानेइतबारे करावीच लागत.ती नाही केली तर बहुतेक कानून की तौहीन वगैरे समजली जात असे .उदाहरणार्थ,साक्षी पुरावा चालू असताना वकीलाने 'ऑब्जेक्शन माय लॉर्ड', म्हणले की ,
'ऑब्जेक्शन सस्टेन्ड' ओवररूल्ड वगैरे म्हणायचे. वकीलाने ,"ये पॉईंट नोट किया जाय"असे म्हटले रे म्हटले की ,पूर्वीचे जमान्यातल्या शाळेतल्या एखाद्याआज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे,निमुटपणे मान खाली घालून समोरच्या
टेबलावरील कागदावर काहीतरी  लिहायचे.अधुनमधुन ख-या कोर्टातल्या ख-या जज्जसाहेबासमोरच्या टेबलांवर कधी न दिसणारा हातोडा,टेबलावर मारत 'ऑर्डर ऑर्डर 'असे ओरडायचे.आणि 'कोर्ट की कारवाई कल तक 'मुल्तवी',की काय की जाती है' असे म्हणून उठून जायचे .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे,खटल्याच्या शेवटी किंवा कधीकधी  प्रसंगानुरूप,अधे मधे केव्हाही ,'तमाम सबुत और गवाहो को मद्देनजर रखते हुवे मुजरीमको बाईज्जत बरी किया जाता है 'म्हणयचे ,म्हणजेच निर्दोष सोडून द्यायचे ,किंवा 'इंडियन पीनल कोड दफा अमुक अमुक के तहत,उम्रकैद किंवा सजा ए मौत दी जाती है म्हणत शिक्षा ठोठावायची.आणि हो सजाए मौत सुनावल्यानंतर पेनाची नीट मोडायला मात्र विसरायचे नाही.एवढी कामे इमानेइतबारे  केले की झाले.
जज्जसाहेबांचे कामही संपले.असो.
  शिनेमातल्या कोर्टात खरा भाव असायचा तो वकीलाला!त्यात शिनेमाचा हिरोच जर वकील असेल तर विचारायलाच नको.मग विरोधातला वकील बदमाश, कपटी,कारस्थानी असणार हे ठरलेले.क्वचित प्रसंगी,
नवखा वकील असलेला हिरो आपल्या सिनीयर वकीलाच्या विरोधात इन्साफ के लिए लढत असे.कोर्टात एकमेकाकडे डोळे फाडफाडून पाहाणारी,घसाताणताणून ओरडणारी,भरपूर डायलॉग बाजी करणारी  वकील मंडळी ,कोर्टाच्या बाहेर क्लबमधे वगैरे भेटून ,बहुतेक बिलीयर्ड
वगैरे खेळत,असत.पण तिथेही,एकमेकां विरुद्ध भरपूर डायलॉगबाजी करत .अर्थात तिथेपण  डोळेफाडून फाड फाडणे,घसाताणताण ताणूनओरडणेही ओघाने आलेच!
आणि हो ,ही मंडळी म्हणजेच सरकारी वकील, साधे वकील, सिनीयर वकील, ज्युनियर वकील इ. लोक,आपापल्या मोठमोठ्या मोटारीत फिरायचे.या मंडळीना चालत जाणे, सायकल वापरणे यावर बंदी असावी.
शिनेमातल्या वकिलाला,ज्युनियर शिप म्हणजे अनुभवी वकीलाच्या हाताखाली उमेदवारी करण्याची,अनुभवाची,आणि हो मुख्य म्हणजे कायद्याचे ज्ञानाचीही गरज नसायची .डायरेक्ट खूनाचा खटला चालवायला मिळे.आणि वरती बोनस म्हणून हिरोईन पण.हे किती मस्त!
  अशा मंडळीकडून चालवले जाणारे शिनेमातल्या कोर्टातले खटले  म्हणजे तर मज्जाच असे! तमाम कायदे कानूनच नाहीतर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेले हिरो वा हिरोईनयांचे ,आणि सोबत प्रेक्षकांचा जीव, खुंटीला टांगते ठेवून;पुराव्याच्या कायद्याला ,'पुरावा 'की 'जाळावा'या अविर्भावात
खटल्यांचे कामकाज सुरू असायचे .
आहाहा! काय काय  वर्णन करावे?
साक्षीदाराचे पिंजऱ्यात बहुतेक आरोपी असलेला हिरो किंवा हिरोईन असे.किवा त्याचे किंवा तीचे आई किवा वडील.आणि  सरकारी वकीलसाहेब,आरोपीवरचे आरोप सिद्ध करण्यासाठी साक्षीदार तपासण्या ऐवजी ,गळा ताणून ताणून,आरोपीलाच म्हणजे त्याला किवा तिला प्रश्न विचारायचे.पिंजऱ्यातली ती किवा तो आरोपी ,वकीलाचे प्रश्नावर,
उत्तरादाखल,"ये सच नहीहै",असे कळवळून सांगे.त्यावर जणू काही गुन्हा साबित करायची जबाबदारी 'पिंजऱेवाल्यावर 'आहे असे समजून, "तो  फीर सच  क्या है ?"असा बिनतोड सवाल वकीलसाहेब करायचे.मग पिंजऱेवाला किंवा पिंजरेवाली व्यक्ती,जे असेल तो/ती,फ्लॅशबॅक मधे जाई,आणि खरी कहाणी कोर्टा समोर येई.तेव्हा कुठे पिंजरेवाला/वाली खटल्यातून सुटे.आणि प्रेक्षकही!
कधी कधी जज्जसाहेब,पिंजरेवाल्यालाला शिक्षा ठोठावणार,तेवढ्यात' ठहरीये जज्जसाहेब' म्हणत कुणी  आगंतुक ,कोर्टात हजर  होई.आणि खरी 'कहानी बयां' करी.मग जज्ज साहेब,तेच खरे मानत आणि तपास ,
पुरावा असल्या फालतू भानगडीत वेळ न घालवता,
ताबडतोब पिंजऱ्यातल्या आरोपीला 'बरी'करत.म्हणजे सोडून देत.आणि कोर्टातच हजर राहून गम्मत पाहात बसलेल्या व्हिलनला म्हणजेच, ख-या आरोपीला,डायरेक्ट फाशी किवा जन्मठेपीची शिक्षा ठोठावत.खरं तर इथे शिनेमाचा 'द एंड'करायला हरकत नसे.पण अशा वेळेस तो व्हिलन
म्हणजेच खरा आरोपी;साधेपोलीस,पोलीस साहेब,जज्जसाहेब,व
वकील साहेब, कोर्टात हजर असलेली पब्लीक,इत्यादींचे डोळ्यासमोर,
त्यांचे हातावर तुरी देऊन,आणि अनेकदा हिरोईनला हातात घेऊन पसार होत असे.लगेच  हिरो त्याचे पाठलागावर जात असे.या दोघांना पुटपुटत सोपी व्हावी म्हणून शिनेमातल्या कोर्टासमोर दुचाकी ,चारचाकी वाहने
तयारच असत.मग जोरदार पाठलाग व्हायचा, हाणामारी,'दे दण्णादण्णी',व
गैरे व्हायची.शेवटी व्हिलन/खरा आरोपी एकदाचा मरे, किंवा पकडला जाई(पुन्हा पळून जाण्यासाठी!).तेव्हाच कुठे प्रेक्षकाची सुटका होत असे.
या शेवटच्या भागाचा शिनेमातल्या कोर्टाशी,अर्थातच काही म्हणजे काहीच संबंध नसे.पण मायबाप प्रेक्षकांना शेवटी नक्की काय झाले हे दाखवणे शिनेमेवाल्यांचे कर्तव्य असल्याने ते दाखवावेच लागे,नाही का?आणि म्हणून इथे ते सांगणे पण भाग आहे,नाही का?
  तर असे ते शिनेमे,असे ते शिनेमातले कोर्ट,असे ते  शिनेमातल्या कोर्टातले खटले आणि कोर्टाबाहेरचे प्रसंग,असे त्या शिनेमातल्या,कोर्टातल्या व कोर्टा बाहेरच्या प्रसंगातील माणसे !  सगळेच कसे भारी होते नाही?
पण गेले ते दिवस.काळ बदलला.हल्ली वास्तवदर्शी शिनेमे काढायचे फ्याड निघाले आहे.त्यामुळे सगळे काही ;अवास्तवी,अवाजवी,अतिवास्तव दाखवण्यात शिनेमावाले धन्यता मानतात म्हणे!त्यांच्या तडाख्यातून शिनेकोर्टबाजी पण सुटली नाही.
मग,तसे ते शिनेमे,त्या शिनेमातले कोर्ट,शिनेमातल्या
कोर्टातले खटले,शिनेमातल्या कोर्टातल्या खटल्यातली माणसे,पाहायला गर्दी करणा-या ,सरावलेल्या,
चटावलेल्या शिने प्रेमींनी काय करायचे?

                   नीलकंठ देशमुख

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

19 Jan 2022 - 8:47 pm | कुमार१

छानच.

नीलकंठ देशमुख's picture

19 Jan 2022 - 9:43 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

बोका's picture

19 Jan 2022 - 9:02 pm | बोका

यावरुन गविंचा कोर्टटिपा हा लेख आठवला.

नीलकंठ देशमुख's picture

19 Jan 2022 - 9:42 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. गवि? समजल्यास छान होईल.
कोर्टटिपा .मी वाचले नाही.

गवि ह्यांनी कोर्टरूम सिनवर असाच एक लेख मिपावर लिहिला आहे. तो लेख बोकांच्या प्रतिसादातील 'कोर्टटिपा' वर टिचकी मारल्यास वाचता येईल.

सौंदाळा's picture

20 Jan 2022 - 10:19 am | सौंदाळा

खुसखुशीत लेख
खर्‍या जीवनातील जज्ज, साक्षीदार आणि वकीलांचे कीस्से वाचण्यास उत्सुक आहे.

हा हा हा. मजा आली. खुसखुशीत लेख.

यावरुन "कोर्ट" सिनेमातील जजचे पात्र आठवले. अनेकदा परत परत बघत रहावा असा चित्रपट. कोर्टरुम, वकील, जज यांची सर्व सिनेमांनी डोक्यात फिट केलेली चित्रे बदलून टाकणारा.

जज हे पात्र अत्यंत वास्तव वाटेल असे. कोर्ट चालू असताना लेखनिकेला शब्दन शब्द प्रॉंप्ट करणे, वकील आणि आरोपी यांना "हे सर्व रेकॉर्डवर जातंय हां, मस्करी चाललेली नाहीये" वगैरे ऐकवणे.. "मॅडम,तुमची केस फारच वीक झालीय" किंवा "ही एकच केस घेऊन बसायचं का आम्ही?" असा पोलिसाला दम देणारे.

अगदी घरच्या ग्रुपसोबत गेट टुगेदरला जाताना भेंड्या खेळणं, तिथे इतर नातेवाईकांसोबत इम्प्रेशन मारणार्या गप्पा, न्युमरोलॉजी, रत्न-खडे अंगठीत घालणे असे सल्ले देणारा.

वेगळी छटा असलेला पण विनोदी असा आणखी एक जज म्हणजे जॉली एलएलबीमधला.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jan 2022 - 12:13 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. तुमचा लेख पण वाचला.छान आहे. तिथे प्रतिक्रिया दिलीय.
कोर्ट सिनेमा पाहिला नाही. ऐकलय.त्याविषयी.
सौरभ शुक्ला ने दोन्ही जॉली एलेलबी मधे जज्ज फार मस्त साकारला आहे.तेच मुल्क धे कुमुद मिश्राने पण.

कोर्टकाम रटाळ आणि रुक्ष वाटते हे खरे. पण अनेकदा फौजदारी च नाहीतर दिवाणी ,कौटुंबिक खटल्यात सुध्दा खूप नाट्य असते कारुण्य ही असते.
ते टिपता यायला हवे.
चित्र पटात कोर्टाचे कामकाजाचे वास्तव चित्रण केल्यास कुणी पाहाणार नाही.उठून जातील.म्हणून
त्यातील नाट्यमयता तेवढी उचलून तेच दाखवली जाते आणि ते योग्य असते. परंतु नाट्य निर्मिती चे नावाखाली अतिरंजित,आणि अति अवास्तव चित्रण करणे हास्यास्पद वाटते.
प्रश्न सादरीकरण कसे असावे हा आहे. कथा पटकथा दिग्दर्शन आणि निर्मिती या वर काम करणारे मंडळीच्या बौध्दीक आकलन,पब्लीक डिमांड ई.अनेक गोष्टींवर ते अवलंबून असते.
अनेक जुन्या चित्रपटातून देखील कोर्टप्रसंग छान चित्रण केलेले छान अभिनित केलेले अनेक उदाहरणे आहेत.
मी त्या चित्रपटांतील फक्त हास्यास्पद वाटणारा धागा उचलून तो विनोदी अंगाने मांडायचा प्रयत्न केला आहे.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2022 - 1:21 pm | मुक्त विहारि

हिंदी कोर्ट आणि हाॅलीवूड कोर्ट, ह्यात फारसा फरक नाही

डिस्क्लोजर, Run Away Jury, Witness For the Prosecution, The Rain maker, हे पण असेच आहेत

पण, कोर्ट रूम ड्रामा मधला, आवडता सिनेमा म्हणजे, Witness For the Prosecution...Charles Laughton, जबरदस्त अभिनय ...

नीलकंठ देशमुख's picture

20 Jan 2022 - 5:58 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. तुम्ही ऊल्लेख केले ले इंग्रजी सिनेमे पाहिले नाहित. पण ऐकलय त्या विषयी बरेच. विटनेस फॉर प्रॉसिक्युशन विषयी जास्त ऐकलय. नक्की पाहीन.

चौथा कोनाडा's picture

21 Jan 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा

मस्त, खुसखुशीत !
मला आयुष्यात एकदाही कोर्ट बघायची पाळी आली नाही, पण मनात हे आणि कोर्ट सिनेमातील वातावरण यांची तुलना होत राहिली.

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2022 - 9:19 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल