गतवर्षी वाचकांना मी लीळा पुस्तकांच्या या अभिनव पुस्तकाचा परिचय करून दिला होता. वर्षभरात त्या पुस्तकाची मी अनेक पुनर्वाचने केली. त्यातला मला सर्वाधिक आवडलेला भाग म्हणजे त्याची दीर्घ प्रस्तावना. त्यामध्ये लेखकाने अन्य एका पुस्तकाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे अरुण टिकेकरांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी'. या पुस्तकाचे नावच इतके भारदस्त वाटले की त्यावरून ते वाचायची तीव्र इच्छा झाली.
अक्षरधारा-प्रदर्शनामधून केलेल्या मागच्या पुस्तक खरेदीला आता वर्ष उलटून गेले होते. जसे हे वर्ष सुरू झाले तशी माझी पावले आपसूक पुन्हा एकदा त्या दालनाकडे ओढली गेली. सुदैवाने मला हे पुस्तक तिथे मिळाले. त्याच्या मुखपृष्ठावरील शीर्षक, उपशीर्षक आणि चित्रकार वसंत सरवटे यांनी केलेले सुरेख रेखाटन पाहताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो. 'ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध' असे उपशीर्षक असलेले हे छोटेखानी पुस्तक म्हणजे टिकेकर यांच्या ग्रंथमय जीवनाचा सुरेख आढावा आहे. त्याचे वाचन हाडाच्या पुस्तक अभ्यासक आणि संग्राहकाला एक सुंदर ग्रंथयात्रा घडवून आणते.
टिकेकर आपल्याला एक साक्षेपी वृत्तपत्र संपादक, इंग्रजी साहित्याचे आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे गाढे संशोधक म्हणून परिचित होते. त्यांच्या संशोधनास उपयुक्त अशा जुन्या, छपाईबाह्य आणि दुर्मिळ ग्रंथांचा शोध घेणे हा त्यांचा आयुष्यभराचा छंद होता. त्यासाठी त्यांनी देश-विदेशातील अनेक पुस्तकांचे अड्डे पालथे घातले. त्या दरम्यान त्यांना आलेल्या विलक्षण अनुभवांचा धांडोळा त्यांनी या लेखनातून घेतलाय. या पुस्तकाचे दोन विभाग आहेत : ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध.
यापैकी ग्रंथ-शोध हे लेखन पूर्वी दैनिक लोकसत्ताच्या लोकमुद्रा या सांस्कृतिक पुरवणीत सन 2001 मध्ये लेखमालेच्या रूपात प्रसिद्ध झाले होते. तर 1996मध्ये त्यांनी ‘वाचनसंस्कृती’ या विषयावर जे व्याख्यान दिले होते त्याचे संस्कारित लिखित रूप म्हणजे वाचन-बोध हा दुसरा विभाग.
ग्रंथशोध
हा पुस्तकाचा मुख्य भाग असून त्याचा सारांश लेखकाच्या शब्दात असा:
“
माणसं ग्रंथांची जागा घेऊ शकत नाहीत, ग्रंथ माणसांची जागा घेऊ शकतात”.
एखाद्या दर्दी ग्रंथवाचकाच्या आवडीचे तीन टप्पे त्यांनी सांगितले आहेत. आधी छंद, पुढे त्याचा नाद होणे आणि शेवटी त्याची नशा चढणे. यासंदर्भात मद्य आणि पुस्तक वाचन या दोन्हीमुळे चढणाऱ्या नशांची सुंदर तुलना त्यांनी केली आहे. एखाद्या घरात ग्रंथ नेटकेपणाने मांडून सुंदर सजावट करता येते, मात्र मद्याच्या बाटल्या कपाटात दडवून ठेवाव्या लागतात ! अशा सुंदर विवेचनाशेजारीच तो मजकूर चित्रबद्ध करणारे सरवटे यांचे सुंदर रेखाटन छापलेले आहे. एखाद्या ग्रंथबाजाच्या नशेच्या अवस्था त्यांनी सुरेख वर्णिल्या आहेत. त्या मुळातूनच वाचण्यात मजा आहे.
दुर्मिळ पुस्तकांचा एखाद्याने घरी संग्रह केल्यानंतर त्यांची निगा राखणे हे जिकीरीचे काम असते. त्यासाठी कुठल्याही रासायनिक पावडरी न वापरता वेखंडाच्या मुळ्या पुस्तकाच्या कप्प्यांमध्ये ठेवण्याची नामी शक्कल त्यांनी सुचवली आहे. दुर्मिळ ग्रंथ आयुष्यभर मिळवत राहणे हे कष्टप्रद काम असते. त्यासाठी त्यांनी मुंबई-दिल्लीपासून सातारा-नाशिक पर्यंत तसेच विदेशातही वणवण केली. त्यासाठी अनेक पदपथ, रद्दीची दुकाने व खास जुन्या पुस्तक विक्रीची दुकाने पालथी घातली. या उद्योगातून संबंधित ग्रंथविक्रेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे अनेक उत्तमोत्तम जुने ग्रंथ त्यांना मिळवता आले. त्यांची अशा ग्रंथांविषयीची असोशी या वाक्यातून स्पष्ट होते :
‘ग्रंथ जितका जुना आणि दुर्मिळ, तितके त्याच्यातील शब्द अधिक बोलके होतात’.
एखादे जुनेपाने पुस्तक मिळाल्यानंतर त्याच्या पहिल्या पानावर काही विशेष नोंदी आढळतात. त्याच्या बऱ्याच आठवणी त्यांनी लिहिल्यात. एका पुस्तकाच्या पानावर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची स्वाक्षरी होती, तर जमशेदजी टाटा यांच्या चरित्रात जेआरडी टाटांनी ती प्रत गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांना भेट दिल्याची नोंद व स्वाक्षरी होती. जुन्या पुस्तकांच्या पानांमध्ये काही वेळेस लपवून ठेवलेल्या दुर्मिळ वस्तू मिळतात. कधी ते एखादे मागच्या शतकातील टपाल तिकीट असते तर कधी एखादे मोरपीस. त्यांच्या एका मित्राला अशा ग्रंथातून इंदिरा गांधींची लग्नपत्रिका मिळाली होती !
.
दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्विक्रीची किंमत कशी ठरवायची हा या व्यवहारातील एक बिकट प्रश्न असतो. ग्रंथप्रेमीने असा ग्रंथ हातात घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव दर्दी विक्रेता अचूक ओळखतो आणि मग किंमत चढवतो. त्यावर मुरलेला वाचकसुद्धा काही कमी नसतो. तो ती किंमत जोरदार पाडून मागतो ! असे घासाघीसीचे अनेक किस्से पुस्तकात आहेत. १८८३मध्ये प्रकाशित झालेल्या ‘इंडिया इन १९८३’ या पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. त्या पुस्तकात ‘ब्रिटिशांना 1983मध्ये भारत सोडवा लागेल’ असे भाकित केले होते. त्यामुळे त्यावर ब्रिटिश सरकारने जप्ती आणली होती. असे दुर्मिळ पुस्तक त्यांना अवघ्या दहा रुपयात मिळाल्याने परमानंद झाला होता. कधीकधी दुर्मिळ ग्रंथांबाबत अनभिज्ञ असलेला विक्रेता एखाद्या ग्रंथाची किंमत खूपच कमी सांगे. अशा वेळेस लेखक त्याचे महत्त्व जाणून असल्याने स्वतःहून मोठ्या मनाने त्या विक्रेत्याला वाढीव किंमत द्यायचे.
मुंबईच्या दुर्मिळ ग्रंथविक्री करणाऱ्या दुकानदारांविषयी पुस्तकात सविस्तर आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे. एकेकाळी या व्यवसायात इस्मायली खोजा ही मंडळी प्रामुख्याने होती. अशा मंडळींशी लेखकाचे नाते निव्वळ ग्राहक विक्रेता असे न राहता अगदी घरोब्याचे झाले होते.
पुणे-मुंबईच्या प्रत्येकी एका पुस्तक दुकान आणि दुकानदारांबद्दल एकेक स्वतंत्र प्रकरण पुस्तकात आहे.
पुण्याचे दुकान म्हणजे इंटरनॅशनल बुक सर्व्हिस. त्याचे मालक विठ्ठल दीक्षित यांचे एकेकाळी पुलंनी ‘इंटरनॅशनल दीक्षित’ असे नामकरण केले होते. ते दुकान नसून पुस्तक मंदिर होते. तेथे नेहमी लेखक-प्रकाशक, संशोधक, क्रीडापटू आणि वैज्ञानिक या सर्वांची उठबस असे. पानशेतच्या पुराच्या तडाख्यात सापडूनही ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले होते. तिथे येणाऱ्या अभ्यासकांना हवा तो ग्रंथ मिळवून देण्याची हमी दीक्षित घेत असत, मात्र ‘किमतीत सवलत’ हे शब्दही तिथे उच्चारायला बंदी होती ! मुंबईच्या ‘strand बुक स्टॉल’चा उल्लेख ‘प्रवेशमूल्य नसलेली एक नामांकित शिक्षणसंस्था’ असा गौरवाने केला आहे. यात सर्व काही आले. त्याचे मालक टी एन शानभाग. ते स्वतः अनेक देशांत जाऊन तिथून पुस्तके खरेदी करून आणत. त्यांनी दुकानाचा ५० वा आणि स्वतःचा ७५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या दोन्ही वेळेस त्यांनी महा-ग्रंथप्रदर्शने भरवली. तेव्हा त्यांनी अनेक जागतिक ग्रंथ तब्बल 40 ते 80 टक्के सवलतीत ग्राहकांना दिले. एवढे केल्यावरही तेव्हाची पुस्तकविक्री काही कोटी रुपयांची झाली. शानभाग यांच्या ग्रंथसेवेबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ने गौरवलेले आहे.
विविध संशोधन ग्रंथांच्या जोडीने काही वैशिष्ट्यपूर्ण जाडजूड शब्दकोशांचाही पुस्तकात उल्लेख आहे इंग्लिश शब्दकोशांमधील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे ‘को-बिल्ड डिक्शनरी’. (या शब्दाचे मला कुतूहल वाटल्याने त्याबद्दल जालावरून वाचन केले. या प्रकारचा कोश सर्वप्रथम 1987 मध्ये प्रकाशित झाला. ‘को’ चा अर्थ कॉर्पस ड्रिव्हन’ असा आहे. कोशाच्या या प्रकारात दैनंदिन जीवनात लोक जसे बोलतात व लिहितात त्याची समर्पक उदाहरणे दिलेली असतात). इंग्लिशचे मिळतील तेवढे शब्दकोश त्यांनी विकत घेतले होते. इंग्लिशमध्ये सदोदित नवनवीन प्रकारचे कोश तयार झाल्याने ती समृद्ध ज्ञानभाषा झाल्याचे मत ते नोंदवतात. त्याचबरोबर मराठीत मात्र आपण जुन्या पिढीतील त्याच त्या कोशांचे पुनर्मुद्रण करीत असल्याची खंतही व्यक्त करतात.
एकदा त्यांच्या मित्राला भारतीय सणांवरचे दुर्मिळ पुस्तक 10 रुपयाना मिळाले होते. पण त्या पुस्तकावर मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा शिक्का होता. मग कर्तव्यभावनेने त्यांनी ते पुस्तक त्या ग्रंथालयात जाऊन परत केले. अधिक चौकशी करता एक धक्कादायक माहिती मिळाली. ज्या व्यक्तीने ते वाचण्यासाठी नेले होते तिचा नंतर खून झाला होता.
जातिवंत ग्रंथसंग्राहकांना ग्रंथांची नशा चढलेली असते. अशा काही मंडळींचे मजेदार, विक्षिप्त आणि तर्हेवाईक किस्से पुस्तकात आहेत. Ann Fadiman या लेखिकेने ‘मॅरीइंग लायब्ररीज’ या निबंधात तिच्या वैवाहिक आयुष्याच्या आरंभावर लिहिले आहे. ती आणि तिचा पती हे दोघेही लग्नापूर्वी दर्दी ग्रंथसंग्राहक होते. लग्नानंतर दोघांचे संग्रह एका घरात आले. ते एकत्रितपणे रचताना लक्षात आले की ५० पुस्तके ही दोघांच्याही संग्रहात आहेत. आता अशा दोन-दोन प्रतिंपैकी कोणाची एक काढून टाकायची यावर जोरदार खडाजंगी झाली ! अखेर कसाबसा समझोता झाला. निबंधाच्या शेवटी त्या म्हणतात की, जेव्हा त्याच्या व माझ्या पुस्तकांचे सुयोग्य मीलन झाले तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही विवाहबद्ध झालो.
हेलन हॅन्फ ही अमेरिकी लेखिका लंडनच्या एका ग्रंथविक्रेत्यांशी 1949 ते 1969 अशी तब्बल 20 वर्षे पत्रव्यवहार करते. ती सर्व पत्रे ‘84 चेरिंग क्रॉस रोड’ या नावाने पुढे पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. ते प्रकाशित होताच त्यावर ब्रिटिश ग्रंथप्रेमींच्या अक्षरशः उड्या पडल्या.
असे किस्से सांगितल्यावर, ग्रंथप्रेमींचा देश म्हणून इंग्लंडची जागतिक कीर्ती असल्याचे मत लेखक नोंदवतात. इंग्लंडच्या वेल्श परगण्यात हे-ऑन-वाय हे छोटेसे गाव तर ग्रंथांचे (आद्य)गाव म्हणून प्रसिद्ध आहे. रिचर्ड बूथ नावाच्या ग्रंथप्रेमी विक्रेत्याने चाळीस वर्षांच्या परिश्रमातून या गावाला तशी जागतिक ओळख मिळवून दिलीय. दरवर्षी जगभरातून पाच लाख ग्रंथप्रेमी या गावाला भेट देतात. असंख्य विषयांची नवीजुनी पुस्तके तिथे मिळतात. आपण हवी ती पुस्तके घ्यायची, त्यांची किंमत आपणच मोजायची आणि तेवढे पैसे काचेच्या भांड्यात टाकायचे, अशी ही विक्रीची अभिनव पद्धत. नंतर जगभरात या कल्पनेचे अनुकरण करून ३० ग्रंथगावे निर्माण केली गेली आहेत. (कालांतराने 2017 पासून महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्धी पावले आहे).
हे-ऑन-वायला प्रत्यक्ष भेट देऊन आल्यानंतर टिकेकर म्हणतात, की त्यांची आयुष्याची ‘हज यात्रा’ आता पूर्ण झाली आहे; आता ‘अंतिम’ प्रवासाची तयारी करायला हरकत नाही !
अनेक ग्रंथप्रेमींच्या संग्रहाचे त्यांच्या निधनानंतर काय होते याचा छडा लावणे हाही लेखकाच्या छंदाचा एक भाग होता. असे काही ग्रंथप्रेमी आयुष्याच्या अखेरच्या अवस्थेत आपला संग्रह नामवंत ग्रंथालयाला भेट देतात. अन्य काही जण तसे मृत्युपश्चात देण्याचे इच्छापत्र करून ठेवतात. अशा संग्रहांचे चांगले जतन होते. मात्र काहींच्या बाबतीत असे काहीच न घडल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या संग्रहाची वाताहत होते. बरेचदा त्यांचे वारस असे ग्रंथ सरळ रद्दीत टाकताना दिसतात. समाजाचा सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या ग्रंथांचे असे मातेरे होऊ नये म्हणून लेखक त्यासाठी धडपड करीत. त्यामागची त्यांची तळमळ या लेखनातून जाणवते. महाराष्ट्रातील काही मोजक्या सांस्कृतिक अभ्यासकांचे ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर नामवंत संस्थांनी जतन केले आहेत. त्यामध्ये द वा पोतदार, रावसाहेब मंडलिक आणि अ का प्रियोळकर ही ठळक उदाहरणे आहेत. अर्थात त्या संग्रहांची आताची ‘अवस्था’ मात्र फारशी चांगली नाही. खुद्द टिकेकरांनीही वयाची साठी उलटल्यानंतर त्यांचा निम्मा अधिक ग्रंथसंग्रह मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला भेट दिलेला आहे. आपले सांस्कृतिक संचित मोठ्या प्रमाणात सुयोग्य जतन करण्यासाठी समाजातील धनिकांनी पुढे यावे तसेच या कामी सरकारचेही व्यापक धोरण असावे अशी सूचना त्यांनी केली आहे.
....असा आहे हा पुस्तकाचा आत्मा असलेला पहिला भाग.
या सर्व रसाळ विवेचनात लेखकाने जुन्या काळच्या ग्रंथांना ‘ग्रंथ’ म्हणूनच संबोधले आहे; ‘पुस्तक’ हा शब्द क्वचित वापरलेला दिसतो. यातून लेखकाच्या मनात असलेला ग्रंथांविषयीचा कमालीचा आदर आणि आपुलकी जाणवते.
…….
वाचनबोध
दुसऱ्या भागातील हे लेखन मुळात त्यांच्या व्याख्यानावरून बेतलेले असल्याने ते काहीसे आवेशपूर्ण आहे. वाचन म्हणजे काय, वाचकांचे व साहित्याचे प्रकार आणि स्वानुभव अशा विविध अंगांनी ते नटलेले आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे असे :
• रिकामा वेळ घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जे वाचले जाते ते वाचन नव्हे. आपल्या आवडीनिवडीच्या विषयाचे आवर्जून केलेले वाचन ते खरे वाचन. असे वाचन वाचकाला बौद्धिक पातळीवर नेते.
• चांगल्या वाचनाची सवय लागण्यासाठी वाचनगुरू लाभल्यास उत्तम. हेच जर गुरुविना आपणच धडपडत शिकलो तर त्यात आयुष्यातील बराच वेळ वाया जातो.
• ‘हल्लीचे लोक वाचत नाहीत’ हे रडगाणे आपण शंभरहून अधिक वर्षांपासून गात आहोत. ते थांबवावे. आपापल्या आवडीचे वाचणारे अनेक जण समाजात असतात.
• वाचकांचे चार गट पाडता येतील :
१. हा वर्ग वाचत असतो, पण काय वाचावं याचे निकष त्याच्यापाशी नसतात. या वर्गाचे प्रमाण ९० टक्के असू शकेल.
२. हा वर्ग वाचतो आणि चांगले किंवा वाईट साहित्य कशाला म्हणायचे हेही तो जाणतो. हल्ली वाचक कमी झालेत अशी ओरड करण्यापेक्षा आपण या वर्गाची टक्केवारी कशी वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे
३. समीक्षकांचा वर्ग : यामध्ये कोणीही उठून जगातील कुठल्याही विषयाची समीक्षा करू नये. प्रत्येक समीक्षकाचा आपापला अभ्यासाचा प्रांत असावा आणि त्यानुसार त्याने संबंधित विषयाची
समीक्षा करावी
४. न वाचता वाङमयीन मते अधिकारवाणीने सांगणारा वर्ग ! हा तर घातकच.
पुढील लेखनात जीवनासाठी कला की कलेसाठी कला या साहित्यिक वादावर जडभारी विवेचन आहे. ते सामान्य वाचकाला फारसे भावेल असे नाही. आयुष्यातील वाचनप्रकाराचे टप्पे त्यांनी सांगितले आहेत. काव्य, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र आणि शेवटी तत्त्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत. हा त्यांचा अनुभव आहे. काही अंशी तो काही वाचकांना लागू होईल. पण यात व्यक्तीभिन्नता नक्की राहील. कोणाला एखादाच वाचनप्रकार कदाचित आयुष्यभर आवडू शकेल. इंग्लिशमधील काही चांगले ग्रंथ वाचून त्यांना स्वतःला काय बोध झाला याचे त्यांनी सुरेख वर्णन केलेले आहे. ‘Learning to philosophize’, ‘U and non-U revisited’ अशा काही रोचक व मार्गदर्शक पुस्तकांचा त्यांनी विशेष उल्लेख केलाय. त्यातील U and non-U मधील ‘बोलणे आणि सामाजिक स्तर’ याबाबतचे मुद्दे रंजक आहेत.
...
हे पुस्तक वाचल्यावर मीच माझ्या मनाला असा प्रश्न विचारला,
" मला यातून काय बोध झाला?"
याचे माझ्या मनाने दिलेले उत्तर असे,
"लेखन-वाचन संस्कृती या विषयांवरील लेखन मला आकर्षित करते. म्हणून मी ते आवर्जून व आवडीने वाचतो. त्यातल्या काही भागांचे पुनर्वाचन करतो. मला या विषयावर विचार करावासा वाटतो. हा खरा आनंद व हेच खरे समाधान".
तर वाचकहो,
या विषयाची जर तुम्हाला आवड असेल, तर हे पुस्तक, विशेषतः त्याचा मुख्य भाग असलेला 'ग्रंथ-शोध' वाचायला हरकत नाही. पारंपरिक पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचा आकार (म्हणजे लांबी-रुंदी) लहान आहे. छपाईच्या अक्षरांचा आकार ज्येष्ठांना सुखावणारा आहे (आजकाल छापील पुस्तकांमध्ये हे दुर्मिळ होत चाललेले आहे). या अभ्यासपूर्ण पुस्तकाला अक्षरनिष्ठांची मांदियाळी हे समर्पक शीर्षक टिकेकर यांच्या संपादकीय सहकारी अपर्णा पाडगावकर यांनी सुचवले होते. त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख प्रस्तावनेत केलेला आहे हेही एक विशेष.
……….
अक्षरनिष्ठांची मांदियाळी
अरुण टिकेकर
दुसरी आवृत्ती २०११
१७३ पाने, किंमत ₹ १७५
रोहन प्रकाशन
प्रतिक्रिया
13 Jan 2022 - 9:38 am | ॲबसेंट माइंडेड ...
लेख आवडला.
13 Jan 2022 - 11:57 am | ज्ञानोबाचे पैजार
बघायला लागेल हे पुस्तक..
"माणसं ग्रंथांची जागा घेऊ शकत नाहीत, ग्रंथ माणसांची जागा घेऊ शकतात”.
ह्या बद्दल थोडी साशंकताच आहे, आपले ऋशी-मुनी हे खरतर चालते फिरते ग्रंथच होते की. ज्या काळी लेखन छपाई अवगत नव्हती त्या काळापासुनचे ज्ञान जतन करण्याचे काम यांनी मोठ्या जबाबदारीने केले.
त्यामुळेच खरे तर ‘ग्रंथ जितका जुना आणि दुर्मिळ, तितके त्याच्यातील शब्द अधिक बोलके होतात’.
हे वर्णन त्यांना चपखल लागू होते.
रच्याकने :- मी पहिल्या गटातला वाचक आहे, जे मिळेल ते वाचतो,
पैजारबुवा,
13 Jan 2022 - 1:01 pm | टर्मीनेटर
ह्या बाबत बुवांशी सहमत! अकरावी - बारावीत असे पर्यंत माझे पुस्तक वाचनवेड शिगेला पोचले होते. चांगले वाचण्याच्या नादात नको ते ही बरेच वाचून झाले 😀
पुढे जगाच्या विद्यापीठात माणसे वाचायला शिकल्यावर मात्र पुस्तकांपेक्षा त्यांच्याकडूनच खरे 'ज्ञानार्जन' होत असल्याचा साक्षात्कार झाला!
त्यामुळे ग्रंथ वाचून पुस्तकी पंडित होण्यापेक्षा चालत्या बोलत्या माणसांकडून मिळणारे शिक्षण/व्यवहारज्ञान चांगले असे माझे वैयक्तिक मत.
13 Jan 2022 - 1:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
ग्रंथ वाचून पुस्तकी पंडित होण्यापेक्षा चालत्या बोलत्या माणसांकडून मिळणारे शिक्षण/व्यवहारज्ञान चांगले
बाडिस
पैजारबुवा,
13 Jan 2022 - 2:11 pm | कुमार१
ग्रंथ आणि माणसे एकमेकांची जागा घेऊ शकतात की नाही यावर मतभिन्नता राहीलच. परंतु, हा मुद्दा पुस्तकातील वसंत सरवटे यांच्या रेखाचित्रात इतका सुंदर दाखवला आहे की चित्र पहातच रहावेसे वाटते!
सोफ्यावर आणि त्याच्या पाठीवर छानपैकी पुस्तके रचून दाखवली आहेत....
13 Jan 2022 - 1:47 pm | मुक्त विहारि
माणसे भानावर आणतात
दोघेही हवेतच ...
13 Jan 2022 - 10:42 pm | टर्मीनेटर
अर्थातच! पुस्तके निरूपयोगी आहेत असे अजिबात नाही. प्राथमिक आणि विषयाधारित मूलभूत ज्ञान आपल्याला शाळा / कॉलेज मध्ये पाठयपुस्तकातून मिळत असले तरी विद्यार्जनात शिक्षकांचा वाटा तेवढाच मोठा असतो. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी त्याच्याशी निगडित ग्रंथ / पुस्तके नक्कीच उपयुक्त ठरतात हे देखील मान्य.
असहमती ही (मूळ) लेखकाच्या
ह्या मताविषयी आहे.
मुळात ग्रंथच जर माणसाने लिहिले आहेत (इथे कोंबडी आधी की अंड आधीच्या धर्तीवर ग्रंथ आधी की माणूस आधी असला काही प्रश्न उद्भवत नाही हे बरे 😀) मग ह्या मताला/विधानाला काय अर्थ राहतो?
ग्रंथ मोठा पण ग्रंथ लिहिणारा माणूस दुय्यम?
निर्माता मोठा की निर्मिती मोठी?
+१
14 Jan 2022 - 6:19 am | कुमार१
>>>
अगदी पटलेच !
मूळ लेखकाची मते पटली नाहीत तरी त्यातून हे जे मंथन होते ते महत्त्वाचे.
आभार !
13 Jan 2022 - 12:13 pm | कुमार१
*हे वर्णन त्यांना चपखल लागू होते.
>>+१११
13 Jan 2022 - 12:27 pm | टर्मीनेटर
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख!
पुस्तक परिचय आवडला 👍
13 Jan 2022 - 1:30 pm | कुमार१
छान प्रतिसाद. आवडला
अगदी बरोबर !
या पुस्तकाच्या वाचनातून असे विचार मंथन होते हे मला भावते.
विविध वाचकांच्या मतांवर चर्चा होणे हे केव्हाही चांगलेच
13 Jan 2022 - 1:19 pm | Bhakti
अफाट लिहिलंय!
धाप लागली वाचताना.
स्वतः गट क्रमांक दोन मध्ये पाहते 😁
13 Jan 2022 - 1:33 pm | कुमार१
भक्ती
धन्यवाद.
गट क्रमांक ४ सोडून आपण ज्या कुठल्या गटात आहोत त्याबद्दल जरूर अभिमान असावा 😀
शेवटी आवड आपली आपली
13 Jan 2022 - 1:33 pm | कुमार१
भक्ती
धन्यवाद.
गट क्रमांक ४ सोडून आपण ज्या कुठल्या गटात आहोत त्याबद्दल जरूर अभिमान असावा 😀
शेवटी आवड आपली आपली
13 Jan 2022 - 1:46 pm | मुक्त विहारि
प्रतिसाद नंतर देतो
13 Jan 2022 - 3:56 pm | मुक्त विहारि
ह्याचे उत्तर म्हणजे, हा लेख ...
असेच एक पुस्तक वाचले होते, निरंजन घाटे यांचे, वाचत सुटलो त्याची गोष्ट....
लेख अप्रतिम आहे...
13 Jan 2022 - 2:05 pm | सर टोबी
येथिल युनियन बुक स्टॉल अभ्यासाच्या पुस्तकांसाठी खूपच खात्रीशीर दुकान होते. आणि पुस्तकांची नावं, लेखक दुकानातील लोकांना इतकी तोंड पाठ असत की आपल्याला पुरतं नाव घेण्याआधीच दुकानदार पुस्तकाचे नाव सांगत असे. गुजराथी व्यावसायिक असल्यामुळे पुस्तक वेळेला नसले तर मागवून देण्याचे अगत्य असे. मराठी दुकानदारांना टेचात नाही म्हणण्यात काय आनंद मिळतो ते समजत नाही.
हमाम में सब नंगे तसे अभ्यासाच्या पुस्तकाच्या दुकानात सर्व लेखक एका समान, अरे तुरे च्या पातळीवर असतात. अरे चिरपुटकर घे रे, शांती नारायणचे रिअल अनालिसिस आहे का बघ असा खाक्या असतो.
सतत अभ्यासाच्या वातावरणात राहून कमी शिकलेले लॅब असिस्टंट आणि झेरॉक्सवाले देखील ज्ञानेश्वरांच्या रेड्यासारखे ज्ञानी झालेले असतात का अशी शंका येते. केमिकल अनालिसीस ला कोणता सबस्टांस दिला असं विचारायला गेलो की आपल्यालाच काय काय स्टेप्स केल्या ते विचारणार!
13 Jan 2022 - 2:36 pm | कुमार१
मु वि
>> लाखातले बोललात !
....
स टो
>>> अ ग दी . मस्तच !
13 Jan 2022 - 5:11 pm | कर्नलतपस्वी
मद्य आणि पुस्तक वाचन या दोन्हीमुळे चढणाऱ्या नशांची सुंदर तुलना त्यांनी केली आहे. एखाद्या घरात ग्रंथ नेटकेपणाने मांडून सुंदर सजावट करता येते, मात्र मद्याच्या बाटल्या कपाटात दडवून ठेवाव्या लागतात !
असहमत, पुस्तके आणि मद्य ड्रॉईंग रूमची शोभा वाढवतात एखाद्या चांगल्या आवडत्या ब्रांड चे मद्य पाहुण्याने संपवले तर त्याच ब्रांडची दुसरी बोटल आणू शकतो. पण एखादे दुर्मिळ पुस्तक कोणी नेले आणी हरवले किवा हडपले तर पुन्हा मीळेल किंवा नाही सागंता येत नाही. त्याची रुखरुख लागते.
सत्तयाहत्तरची गोष्ट, कँनाँट प्लेस दिल्ली, "द मॅन हु किल्ड द गांधी "कर्नल मनोहर मालगावकर, पुस्तक मला फुटपाथवर मिळाले. बहुतेक त्यावेळेस त्यावर प्रतीबंध होता आसे समजले, खरे खोटे करत बसलो नाही. पुढे काही दिवसानी एक मीत्र घेऊन गेला आणि परत केलेच नाही. ते मला आता सेवानिवृत्त नंतर किलोनी पुस्तके घ्या या स्कीम मधे मिळाले. तसेच साद देती हिमशिखरे, आता डिजीटल काँपी संग्रही आहे.०
मी पुस्तके लपवतो. बार मात्र मी नेहमी खुला ठेवायचो.
लेख छान आहे अभिनंदन.
13 Jan 2022 - 6:22 pm | प्रचेतस
अगदी अगदी कर्नलसाहेब, दुर्मिळ पुस्तकांची तुलना कशानेच होत नाही.
13 Jan 2022 - 11:32 pm | टर्मीनेटर
कर्नल साहेब मी पण ह्याच्याशी असहमत आहे! अर्थात (मूळ) लेखकाने हे विचार २००१ साली मांडले असल्याने त्यावेळी ते कालसुसंगत असतील पण आता वीस वर्षानंतर ते कालबाह्य झाले आहेत.
नवीन पिढीला बुकशेल्फ ठेवणे ओल्ड फॅशन वाटत असून ड्रॉईंगरूम/लिव्हिंग रूम मध्ये पर्सनल बार असणे हा स्टेटस सिम्बॉल वाटतो.
बाकी माझ्याकडे तुमच्यासारखा पुस्तक संग्रह नसला तरी मद्याच्या बाटल्या कपाटात दडवून वगैरे ठेवाव्या लागत नाहीत 😀
14 Jan 2022 - 12:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
पण एखादे दुर्मिळ पुस्तक कोणी नेले आणी हरवले किवा हडपले तर पुन्हा मीळेल किंवा नाही सागंता येत नाही. त्याची रुखरुख लागते.
हा अनुभव अनेकदा घेतला आहे, एका मित्राने तर निर्लज्ज पणे सांगितले होते की "घरातल्या रद्दी बरोबर चुकून तुझे पुस्तक रद्दीत गेले"
तेव्हा पासून अगदी कितीही जवळचा / मोठा माणुस असला तरी माझे पुस्तक देत नाही आणि कोणाकडे मागतही नाही.
एखादा फारच नाराज झाला तर त्या व्यक्तीने जे पुस्तक मागितले असेल विकत घेउन त्याला भेट म्हणुन देतो.
पैजारबुवा,
14 Jan 2022 - 12:35 pm | कुमार१
>>> +११११ अ ग दी च !
यावरून जॉर्ज बर्नाड शॉ यांच्याबद्दलचा एक किस्सा प्रस्तुत पुस्तकात दिला आहे. तो माझ्या शब्दात लिहितो.
शॉ नी त्यांच्या मित्राला त्यांचे पुस्तक ‘शुभेच्छांसह’ असे लिहून सही करून भेट दिले होते. कालांतराने त्यांना तीच प्रत जुन्या पुस्तकांच्या दुकानात सापडली. शॉ नी ती विकत घेतली, पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘पुन्हा एकवार शुभेच्छांसह’ असे लिहीले आणि त्याच मित्राला पुन्हा ते भेट दिले !!
13 Jan 2022 - 5:43 pm | चौथा कोनाडा
सुंदर लेख !
💖
वाचायला आवडतेच जमेल तेवढे वाचत असतो, आजकाल ऑडियो बुक्स ऐकत असतो, बुकाच्या सानिध्यात रकयला आवडतेच !
13 Jan 2022 - 6:27 pm | कुमार१
*
>> छान योग.
*
>>> छान, चालू ठेवा
13 Jan 2022 - 6:54 pm | कंजूस
वाचतोय सर्वांचे प्रतिसादही.
13 Jan 2022 - 7:39 pm | स्मिताके
आपली समज आणि वाचन किती तोकडं आहे हे असे लेख वाचून समजतं!
सध्या आन्तरजालावर बरंच लेखन सहज उपलब्ध असल्यामुळे सर्व प्रकारचं वाचन होत असतं. आणि वाचल्याशिवाय चांगलं वाईट कळणार नाही म्हणताना त्यात बराच वेळ जातो. चांगल्या वाईटाचे निकषसुद्धा त्या त्या समाजानुसार, काळानुसार, व्यक्तीनुसार बदलू शकतात. त्यामुळे अधिकच गोंधळ.
>>चांगल्या वाचनाची सवय लागण्यासाठी वाचनगुरू लाभल्यास उत्तम.
हे पटलं. असा गुरू कोण, याचा शोध घ्यायला हवा आता. :)
13 Jan 2022 - 8:04 pm | कुमार१
हा शोध वाटतो तितका सोपा नाही ! आयुष्याच्या विविध टप्प्यांमध्ये गुरु देखील बदलत जातील. माझ्या बाबतीत कसे झाले ते सांगतो.
१. शालेय जीवन : इथे गुरु अर्थातच आपले पालक आणि शिक्षक. माझ्या घरातच आजी व काका लेखन करायचे. त्यामुळे ते काय वाचत आहेत याचा प्रभाव पडला.
२. महाविद्यालयीन काळ : इथे माझ्यापेक्षा अधिक वाचणारे मित्र हे काही प्रमाणात मार्गदर्शक ठरले.
३. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात स्वानुभव हाच बर्यापैकी गुरू ठरला. एखादा लेखक किंवा विशिष्ट विषय वाचल्यानंतर आपल्याला ते कितपत भावते यानुसार पुढील पुस्तकांची निवड ठरवली गेली.
४. गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या आवडीचे जे पुस्तक मी वाचतो त्यातच मला पुढच्या एखाद्या पुस्तकाची सूचना मिळते. त्या अर्थाने आता मी ‘ग्रंथ हेच गुरु’ या विचारापर्यंत आलेलो आहे !
५. प्रस्तुत लेखात म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी वाचलेल्या एका पुस्तकामुळे मी हे पुस्तक वाचण्यास प्रवृत्त झालो. अशी अजून चार-पाच उदाहरणे माझ्या बाबतीत घडलेली आहेत.
13 Jan 2022 - 9:17 pm | स्मिताके
होय खरं आहे. असे गुरु बदलत राहणंच योग्य आहे.
माझा वरचा प्रतिसाद नीट लिहिला गेला नाही.
>>आपली समज आणि वाचन
याठिकाणी "माझी समज आणि वाचन " याअर्थी लिहिलं होतं. गैरसमज नसावा.
14 Jan 2022 - 11:48 pm | श्रीगणेशा
लेख आवडला आणि त्यावर सुरू असलेली चर्चाही!
कुमार सर, तुमच्या प्रत्येक अभ्यासपूर्ण लेखातून खूप काही शिकायला मिळतं.
खूप वर्षांपूर्वी एका ग्रंथ प्रदर्शनात भटकत असताना एक खूप जुनं पुस्तक सापडलं. एका फ्रेंच पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर होतं. माझ्या संग्रही असलेलं ते सर्वात जुनं पुस्तक असावं. त्यातील निवडक लेखांचं मराठी भाषांतर लिहावं असं खूप दिवस मनात आहे. तुमचं आणि इतरही मिपाकरांचं वेगवेगळ्या विषयांवरील लिखाण वाचून, ते राहून गेलेलं भाषांतर मनावर घ्यावं असं वाटत आहे. पूर्वी कधीही भाषांतराचा प्रयत्न केला नसल्याने, कितपत लिहिता येईल त्याबद्दल शंकाच आहे. आणि दुर्दैव म्हणजे, सुरुवात, ते पुस्तक घरात नक्की कुठे ठेवलं आहे, तिथपासून करावी लागेल.
15 Jan 2022 - 9:26 am | कुमार१
>>>
जरूर प्रयत्न करा. माझ्या शुभेच्छा ! वाचायला आवडेल.
खरंय , एखादी आवडीची गोष्ट घरात सापडत नसेल तर भयंकर अस्वस्थ व्हायला होते.
मी परदेशात असताना एक लेख अगदी मन लावून एकटाकी लिहून काढला होता. भारतात परत आल्यानंतर लक्षात आले की तो कुठे तरी हरवला आहे. जवळजवळ वर्षभर घरभर धुंडाळूनही तो मिळाला नाही.
मनाची मोठी गंमत असते. एकदा तो आपण कष्टाने लिहिलाय ना, मग आता पुन्हा आठवून लिहिणे काही मनावर घेतले जात नाही.
कधीतरी तो सापडेल या वेड्या आशेवर असतो......
15 Jan 2022 - 8:20 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर लेख.. नेहमी प्रमाणेच.
मुंबई सारख्या शहरात जागेच्या कमतरते मुळे ग्रंथांचा मनाप्रमाणे संग्रह करण्यास बऱ्यापैकी मर्यादा येतात. अनेकदा खुप चांगली पुस्तके ज्याला देऊन टाकावीत अशी व्यक्तीही सहजी नजरेस येत नाही. माझ्याकडे सुमारे दहा वर्षांचे 'रिडर्स डायजेस्ट' चे अंक होते. जागे अभावी ते एखाद्या संग्रहकाला द्यावेत असा विचार केला. whats app वर अनेक समूहात विचारणा करूनही बराच काळ त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर गोव्याहून एका शिक्षकाने प्रतिसाद दिला आणि ते अंक सुस्थळी पडले.
16 Jan 2022 - 8:15 am | कुमार१
धन्यवाद !
ते अंक सुस्थळी पडल्यामुळे तुम्हाला समाधान आणि त्यांनाही आनंद.