"तापोळा - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर"
घरी बसून कंटाळा आलेला आणि त्यातून लग्नाचा वाढदिवस जवळ आलेला म्हटलं काहीतरी जवळपास पण कधी न गेलेलो ठिकाण पाहू. मग नोव्हेंबर च्या शेवटी प्लॅन केला , शक्यतो वीकएंड टाळून (म्हणजेच गर्दी टाळून ) जाता येईल असं ठरवून गुरुवार शुक्रवार सुट्टी हाणली आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या "तापोळा" ह्या ठिकाणी जाण्याचं ठरवले. बुकिंग साठी बरेच ठिकाणं शोधली आणि "शिवसृष्टी ऍग्रो टुरिसम " इकडे बुकिंग करून निवांत झालो. ह्या वेळेस ठरवले होते कि जास्त फिराफिर न करता निवांत राहायचे. गुरुवारी सकाळी ७ वाजता निघालो, रमत गमत आणि सगळ्या मिसळी आणि वडा पावाच्या दुकानांना दुरून राम राम करत थेट वाई च्या गणपती चे मंदिर गाठले. गुरुवार असल्याने विशेष गर्दी नव्हती मस्त पैकी आणि शांतपणे दर्शन झाले. गणपतीचे दर्शन घेऊन एकदम छान आणि प्रसन्न वाटले. आता दुसरं ठिकाण होतं मेणवली..पुण्यापासून इतक्या जवळ असून बऱ्याच वेळा ठरवून पण येता आले नव्हते . मंदिरापासून साधारण ३-४ किमी अंतरावर मेणवली लागते, तिकडे गेलो तर मस्त पैकी असा वाडा दिसला. हाच तो प्रसिद्ध नाना फडणीस ह्यांचा वाडा. गाडी पार्क केली आणि वाड्याचे इकडे आलो तर ३-४ स्वयंसेवक लगबगीने पुढे आले आणि म्हणाले कि तुम्हाला वाडा दाखवू शकतो माणशी ४० रु तिकीट. दाराशी मस्त रांगोळी काढलेली आणि एकूण प्रसन्न वातावरण, स्वछता आणि नीटनेटकेपणा इतका कि आतून कोणीतरी येऊन म्हणतील कि "या या बऱ्याच दिवसांनी येणं झालं" :). मग त्या गाईड मुलीने पूर्ण वाडा फिरवून दाखवला. खूपच छान आणि व्यवस्थित पणे सगळं जपून ठेवलेला वाडा बघून मस्त वाटले. जरा वेळ तिकडे अजून भटकलो , फोटो काढले (मोबाइल ने)..आणि म्हटलं मस्त पैकी कॅमेऱ्याने फोटो काढू तर म्हणाले वाड्यातच काय पण मागच्या घाटावर पण फोटो काढायला परवानगी नाही. थोडा हिरमोड झाला पण म्हटलं जाऊ दे मोबाइल ने काढू . जातांना ती म्हणाली कि तुमच्या तिकिटावर मी मोडी लिपी मध्ये नाव लिहून देते. खूप वर्षांनी इतकी व्यवस्थित ठेवलेली गोष्ट पाहून भारी वाटलं. त्या मुलीने अजून एक माहिती दिली कि जवळच एक खूप मोट्ठे गोरखचिंचेचे झाड आहे ते पण पाहून घ्या. मग काय पूर्वी पुस्तकात पाहिले तसे झाडाला वेढा घालून फोटो काढले. काय काय इतिहास ह्या झाडाने पाहिला असेल असा विचार मनात येऊन घाटाकडे निघालो.
बऱ्याच जणांना माहिती आहे कि स्वदेस आणि इतर बऱ्याच चित्रपटांचे तिकडे शूटिंग झाले आहे. आम्ही गेलो आणि इतके मस्त वाटले..अक्षरशः कोणी नाही गावातले २-३ लोकं सोडले तर.. मस्त स्वच्छ , नितळ पाणी आणि शांतता बस्स ह्या व्यतिरिक्त काहीही नाही... शांतपणे तिकडे फिरलो, मुलाला मोट्ठी घंटा दाखवली..गडी एकदम खुश... मग तिकडून निघालो थेट महाबळेश्वर चा घाट चढत चढत चीझ फॅक्टरी नामक ठिकाणी आलो. पण त्या दिवशी काही कारणाने ते बंद होते. जेवायची वेळ झालेली, मग काय पोराला विचारले पण त्याला पिझ्झा , बर्गर वगैरे गोष्टी आवडत नसल्याने म्हणाला बाबा पोळी भाजी खाऊ.. मग पाचगणी वगैरे गावं मागे टाकत थेट हॉटेल राजेश ला गाडी लावली आणि गुजराथी थाळी ऑर्डर केली ..आमच्या शिवाय २-३ जण फक्त त्यामुळे शांतपणे आग्रहाने जेवण वाढत होते आणि आम्ही हाणत होतो. मग बाहेर येऊन त्यांच्या गार्डन मध्ये निवांत फेर फटका मारला आणि मग मार्केट जवळ असल्याने एक चक्कर मारून आलो..विशेष गर्दी नसल्याने निवांत हिंडलो २-३ गोष्टी घेतल्या आणि येऊन गाडीला स्टार्टर मारला..२ वाजले होते अजून ३० किमी जायचे होते आणि रिसॉर्ट वाल्याने सांगितल्या प्रमाणे मॅप ऑफलाइन घेऊन ठेवले आणि निघालो एका स्वर्गीय रस्त्यावर..
स्वर्गीय ह्या साठी कि आजूबाजूला घनदाट झाडी आणि मध्ये आपली गाडी चालली आहे..गाडीत मस्त पैकी किशोर चे एखादे गाणे चालू आहे..काय पाहिजे अजून..तेंव्हा मनात आले (तसे बऱ्याच वेळा मनात आले ) कि ड्रोन हवा होता भारी फुटेज झाले असते..असो घाटात काही ठिकाणी थांबत थांबत परिसर बघत बघत ३-३:३० ला रिसॉर्ट ला पोहोचलो ..ठिकाण बघून मस्त वाटले. एका दरीच्या तोंडावर बांधलेलं आटोपशीर रिसॉर्ट आणि समोर अथांग शिव सागर जलाशय .. बॅगा टाकल्या , फ्रेश झालो मस्त चहा मारला आणि थोड्या वेळातच तिथल्या माणसाने आव्वाज दिला कि १० मिनिटांनी बोटींग ला खाली जाणार आहोत.. तयार व्हा ..मग काय मस्त तयार झालो.. बाहेर पडलो तर अजून २-३ कुटुंब दिसली आणि २-३ छोटी मुलं..चला म्हटलं मुलाला जरा छान मित्रं मिळणार..तर मस्त गप्पा मारत मारत १० मिनिटांत आम्ही तलावापाशी आलो आणि अथांग शिवसागर जलाशय पाहून एकदम प्रसन्न वाटलं.
त्या रिसॉर्ट च्या माणसाने कयाकिंग कसे करायचे हे दाखवले..आम्ही आमचा नम्बर येईपर्यंत मस्त पैकी पायडल बोटींग केले ..मग आमचा नम्बर आला मी पहिल्यांदाच करत होतो कयाकिंग..थोडाफार अंदाज घेतला आणि मग हळू हळू आत पाण्यात गेलो आणि एकदम भारी वाटायला लागलं ..बराच वेळ फिरलो मग पोराला पण घेतले थोडा घाबरत होता पण मग मजा आली त्याला पण.. थोडा अंधार होत आल्यावर तिकडून निघालो एकदम रिफ्रेश झाल्यासारखे वाटले..
रूमवर आलो तर तिकडे गरमागरम चहा, कॉफी ठेवली होती..मस्त गरम कॉफि मारली.. लगेच त्यांनी विचारले कि barbeque आहे काय देऊ.. शाकाहारी असल्याने पनीर द्या म्हणालो आणि कांदाभजी....गार्डन मध्ये चटई टाकली आणि गप्पा मारत ताव मारला.. जरा वेळ रूम वर पडलो.. मुलाने पुण्यातून जातानाच जोरदार क्रिकेट खेळायचा प्लॅन केला होता.. मग काय आला कि छोटा तेंडुलकर बॅट घेऊन.. रिसॉर्ट च्या समोर मोकळ्या जागेत छान पेव्हमेंट ब्लॉक्स होते त्यामुळे मस्त मजा आली..डे अँड नाईट क्रिकेट ची मजा अनुभवत होतो.. आम्ही खेळतोय पाहून अजून मुलं जमा झाले..मग त्या मुलांना तिकडेच सोडून मी आणि बायको ने झोपाळ्यावर बसून परत कॉफी हाणली..आणि थोड्यावेळाने रात्रीच्या जेवण्यासाठी जमा झालो..एव्हाना ओळखी झाल्या होत्या मग गप्पा मारत जेवलो.. ह्याच दरम्यान तिकडे लॉन वर एक जण मस्त पैकी फुगे आणून सजावट करतांना दिसला. बायकांच्या गप्पा झाल्या कि कोणाची तरी bday पार्टी दिसते आहे.. मी तिकडे विशेष लक्ष न देता जेवण रिचवत होतो.. कारण हे सगळं सरप्राईज माझ्या तर्फे बायकोला होतं .. शेवटी ते सगळे तयार झाल्यावर गपचूप गेलो आणि माईक वरून बायकोला आणि सगळ्यांना बोलावलं.. बायको एकदम खुश.. मस्त मँगो केक..आणि सजावट आणि रोमँटिक गाणी....एकदम मजा आला... तर अशा रीतीने त्या दिवसाची सांगता झाली..
दुसऱ्या दिवशी निवांत उठलो ..ब्रेकफास्ट केला आणि आमचे साहेब बॅट घेऊन हजर.. परत क्रिकेट.. मग जेवण.. जेवणाच्या इकडे मस्त कँरम खेळलो..आणि दुपारी ताणून दिली.. उठल्यावर जवळच एक मंदिर आहे तिकडे गेलो अप्रतिम असे मंदिर...आमच्या शिवाय कोणीच नाही म्हणजे देव पण नाही (नवीनच बांधले होते अजून प्राण प्रतिष्ठा व्हायची होती). तिकडून मस्त नजारा पाहून निघालो परत.. आणि लगेच परत जलाशयावर..परत कालच्या सारखे बोटींग आणि कयाकिंग..आणि मग माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला.. २ दिवस काहीच फोटो काढले नव्हते ..हळू हळू आकाशात मस्त रंगांची उधळण सुरु झाली.. अजून १-२ जणं बरोबर असल्याने निवांत फोटो काढत बसलो..इतक्या सुंदर फ्रेम्स मिळाल्या कि बास.... आणि जेंव्हा निघालो तेंव्हा तुफान थंडी पडली. रिसॉर्ट वर गेल्यावर परत कालचेच रिपीट केले खादाडी..मग त्या रिसॉर्ट वाल्यांनी मस्त शेकोटी लावली..तिकडे एक जण होता पर्यटक त्याने जे काही गाणी म्हटली live ..तोड नाही.. जब्बरदस्त आवाज आणि नुसत्या फ़र्माइशी.. रात्र कधी संपली कळलेच नाही..
रात्री ठरवले कि महाबळेश्वर मार्गे जायचे असल्याने सकाळी ७ लाच निघावे कारण रविवार असल्याने तिकडे गर्दी होऊ शकते.. पण रिसॉर्ट वाले म्हणाले कि थंडी भरपूर आहे आणि दुसरं म्हणजे ब्रेकफास्ट ला मिसळपाव आहे.. विषय एन्ड ... सकाळी निवांत उठलो सगळं आवरलं आणि तयार होऊन बसलो.. थंडी अजून वाढली होती..सगळी कडे पूर्ण धुकं आणि समोर ताटात गरमा गरम मिसळपाव.. अप्रतिम चव.. लै भारी .. अशा रीतीने २ दिवसाचा अप्रतिम पाहुणचार घेऊन आम्ही निघालो...आता एकच राहिले होते ते म्हणजे स्ट्रॉबेरी विथ क्रीम ..आणि तापोळ्यातून घाट चढून पुढे आल्यावर एक जागा दिसली ..गर्दी नाही..आणि बाहेर अशा रसरशीत स्ट्रॉबेरी मांडलेल्या.. मग काय गाडी घेतली बाजूला..तो म्हणाला स्ट्रॉबेरी चं शेत पण दाखवतो.. मस्त पैकी शेती बघितली स्ट्रॉबेरी ची.. आणि आल्यावर स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाल्ले अहाहाहा.. एकदम फ्रेश क्रीम आणि फ्रेश स्ट्रॉबेरी..आणि मग त्यावर ताव मारून परत स्वर्गीय अशा तापोळ्यातून परत पुण्याकडे निघालो ते २ दिवसाच्या आठवणी मनात आणि जलाशयातील फ्रेम्स कॅमेऱ्यात ठेवूनच...
काही उपयुक्त गोष्टी
१. तापोळ्या मध्ये बरेच ऍग्रो टुरिसम रिसॉर्ट आहेत आम्ही राहिलो ते "शिवसृष्टी ऍग्रो टुरिसम " (कॉन्टॅक्ट नम्बर - दीपक ९४२३३५९७७६)
२. इकडे राहण्यासाठी जवळपास ६ रूम्स आणि एक डॉर्मेटरी आहे
३. पॅकेज मध्ये ब्रेकफास्ट, २ वेळचे जेवण, संध्याकाळचे barbeque (एक प्लेट प्रत्येकी), कयाकिंग आहे . इकडे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणाची सोय आहे. तसेच बोटींग साठी सगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स वेगळ्या खर्चात समाविष्ट आहे
४. वेळ असल्यास ३ तासाची एक बोट राईड पण आहे ज्यात ३ नद्यांचा संगम पॉईंट, दत्त मंदिर आणि एक पाण्याने वेढलेले बेट असं दाखवतात. साधारण ३ तास लागतात त्यामुळे सकाळी लवकर किंवा दुपारी ३-४ नंतर गेल्यास उत्तम
५. महाबळेश्वर सोडल्यावर गुगल मॅप्स किंवा मोबाईल ला अजिबात रेंज नाही..
~ योगेश पुराणिक
प्रतिक्रिया
8 Jan 2022 - 5:33 pm | ॲबसेंट माइंडेड ...
फोटो दिसत नाहीयेत.
8 Jan 2022 - 6:08 pm | चौथा कोनाडा
हाच ना फोटो ? फोटोची नीट लिंक काढा
१. गुगल फोटोमध्ये जाऊन प्रचि मोठे करा.
२. प्रचि वर उजवी टिचकी मारून "Open Image in New Tab" मध्ये उघडा. नविन टॅबमध्ये उघडलेल्या प्रचिची लिंक घ्या आणि ती मिपा धाग्यावर खोचा,
धन्यवाद !
8 Jan 2022 - 11:26 pm | MipaPremiYogesh
हाच आहे फोटो पण landscape disayla हवा होता.. Mobile वर् कसे karayche ते apan सांगितले ते आणि link मिळाली तरी कुठे takyachi..
9 Jan 2022 - 4:57 pm | चौथा कोनाडा
हा landscape च आहे की, मी फक्त साईझ कमी केला आहे !
9 Jan 2022 - 5:09 pm | चौथा कोनाडा
मिळालेली लिन्क " Insert/edit image (Alt+M)" मध्ये चिटकवायची.
इथे तपशील दिलेतः http://misalpav.com/node/48991
9 Jan 2022 - 5:31 pm | MipaPremiYogesh
जमले धन्यवाद .
9 Jan 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा
ग्रेट .. पण काही प्रचिंचे प्रमाण चुकले आहे ते सुधारल्यास आइसिंग ऑन दि केक !
बाकी ..... प्रचि तर भन्नाटच आलेत. माझे पण टाकतो आता !
9 Jan 2022 - 9:53 am | Bhakti
अप्रतिम फोटो!
8 Jan 2022 - 10:02 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम!
सर्व फोटो एकेक करुन ओपन करुन पाहिले , मस्त आले आहेत फोटो !
8 Jan 2022 - 11:27 pm | MipaPremiYogesh
Dhanywad.. लेखा baddal pan Abhipraay dya
9 Jan 2022 - 12:11 am | योगी९००
मस्त वर्णन केलंय... फार पुर्वी गेलो होतो इकडे. आता परत जावेसे वाटत आहे.
योगायोगाने आपले नाव आडनाल सेमच आहे..
9 Jan 2022 - 8:41 am | कर्नलतपस्वी
फोटो छानच आहेत, वर्णन मस्त, वाटले आम्ही पण तुमच्या बरोबर होतो. जायचा विचार करतोय.
9 Jan 2022 - 8:47 am | कॉमी
तापोळा जबर आहे. आम्ही एक दिवसासाठीच गेलेलो फक्त पोहलेलो- 4-5 तास.
लेख फोटो दोन्ही मस्त.
9 Jan 2022 - 9:51 am | Bhakti
मस्तच!
फोटो नाही दिसले पणं!
9 Jan 2022 - 9:51 am | Bhakti
मस्तच!
फोटो नाही दिसले पणं!
9 Jan 2022 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिसत नाहीत.
-दिलीप बिरुटे
9 Jan 2022 - 3:08 pm | गोरगावलेकर
खूप वर्षांपूर्वी तापोळ्याला एकदाच जाणे झाले आहे तेही थोड्या वेळाकरिताच. तलावात स्पीड बोटिंग केल्याचे आठवते.
9 Jan 2022 - 4:16 pm | प्रचेतस
छान लिहिलंय एकदम.
महाबळेश्वर, तापोळा हा परिसर अतिशय सुंदर आहे. तापोळ्यातूनच फेरी बोटीत गाडी घालून पलीकडच्या किनाऱ्यावर उतरता येतं आणि तिथून कासला जाता येतं.
9 Jan 2022 - 5:01 pm | चौथा कोनाडा
9 Jan 2022 - 5:32 pm | MipaPremiYogesh
आता सगळ्यांना फोटो दिसत असतील ..
9 Jan 2022 - 5:53 pm | ॲबसेंट माइंडेड ...
आता फोटो दिसत आहेत पण दाबल्या सारखे दिसत आहेत.
9 Jan 2022 - 7:04 pm | कंजूस
फोटो


मेणवली घाट
फोटो
वाईचा गणपती
9 Jan 2022 - 8:08 pm | MipaPremiYogesh
होय प्रमाण chukle maze mhanje
10 Jan 2022 - 7:11 am | कंजूस
उदाहरणार्थ पहिले तीन फोटो



Tapola Sunset1
Tapola Sunset 2
Tapola Sunset 3
काय केले -
१) या फोटोंच्या लिंका टाकून फक्त width 100%
दिली, height रिकामा सोडा.
२) रेझलूशन वाढवण्यासाठी - लिंकमध्ये शेवटी
w1488-h903 आहे तिथे
w4288-h2703 असा बदल केला.
w1587-h903
असे दिसेल तिथे
w4587-h2703 असा बदल केला.
साधारणपणे तिप्पट आकडे केले.
३) फोटोचे नाव हे
alt च्या चौकोनात दिले ते बाहेरही
फोटो क्र -
फोटोचे नाव असे दिले.
9 Jan 2022 - 8:14 pm | चौथा कोनाडा
+१
छानन कंजूस सर !
10 Jan 2022 - 1:56 am | शलभ
तापोळा मस्त ठिकाण आहे. माझ्या बहिणीच्या बाल मैत्रिणीचे एक रिसॉर्ट आहे तिकडे गेलेलो आम्ही. 2 दिवस होतो. खूप धमाल केली.
Swimming pool च्या बाजूला रूम्स, वॉटर sports, kayaking, cricket, badminton खेळायला, रात्री DJ with शेकोटी. बाकी नेटवर्क मिळत नाही म्हणून प्रत्येक रूम साठी एक bsnl card देतात. आमच्या घरातल्यांनी एन्जॉय केलं. फक्त मुंबईहून थोडं लांब पडतं.
10 Jan 2022 - 9:07 am | श्रीरंग_जोशी
तापोळ्याबाबत फारसे ठाऊक नव्हते. या लेखामुळे व त्यामधील नयनरम्य छायाचित्रांमुळे तिथे जाण्याची अतिव इच्छा निर्माण झाली आहे.
या लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
10 Jan 2022 - 10:08 am | राघवेंद्र
एकदम मनातले बोललास मित्रा. पुढच्या वारीमध्ये जायला हवे.
10 Jan 2022 - 10:12 am | सौंदाळा
लेख आणो फोटो छानच.
सहलीत निवांतपणा मिळाला हे एकदम बेस्ट झाले.
महाबळेश्वरला खूप वेळा जाऊन आलोय पण तापोळ्याला जाणे झाले नाही.
10 Jan 2022 - 10:51 am | अनिंद्य
छान जागा दिसते.
सूर्यास्ताचे फोटो खास आवडले.
10 Jan 2022 - 11:19 am | टर्मीनेटर
लेख आवडला 👍
फोटोज मस्तच आहेत. तुम्ही फोटोच्या 'width' आणि 'height' चे रकाने कोरे ठेवा, तिथे (800x600 / 600x800) वगैरे values (दिल्यामुळे काही फोटो skewed दिसत आहेत.
10 Jan 2022 - 12:45 pm | चौथा कोनाडा
मेणवली वाडा: वरुन टिपलेले दृष्य

वाईचा घाटः

धोम नृसिंह मंदिरा समोरचा जलाशयः

10 Jan 2022 - 3:51 pm | तर्कवादी
छान लेख व फोटोज.
तापोळाबद्दल मित्राकडून बरंच ऐकून आहे , एकदा जायचे आहे , बघू कधी जमते ते.
अवांतर - आता मिपाने मिपावर छायाचित्र थेट चढविण्याची सोय द्यायला हवी असे सुचवावेसे वाटते, दुसर्या संकेतस्थळांवरुन चित्र इथे आणताना अनेकदा तारांबळ उडते. आणि दुसर्या संकेतस्थळांवर अवलंबून राहणे कितपत योग्य आहे तसेही आता स्टोरेज कॉस्ट कमी झालेली आहे.
11 Jan 2022 - 10:26 pm | अनिरुद्ध.वैद्य
लेख अन फोटो दोन्ही मस्त! आता कधी जाणे झाल्यास, आपल्या लेखाचा रेफ्रंस म्हणुन वापर होणार :) :)
12 Jan 2022 - 11:56 pm | कासव
लेख आणि फोटो मस्तच. तापोळा बामणोली हा परिसर खरंच स्वर्ग आहे.
एक विनंती. सर्व भटकंतीच्या लेखात खर्च किती आला ते पण सांगावं. पेट्रोल नी खानपान सोडून. बोटींग किंवा resort cha साधारण अंदाज दिला तर माझ्या सारख्या अनेकांना फायदा होईल.
18 Jan 2022 - 3:59 pm | MipaPremiYogesh
ख़र्च लिहिला नाही karaan resorts cha vegla asu shakto. Pan package he per couple 4000 rs including all food and kayaking per day. Packages are different based on number of people. Other boatings charges are around 50rs per person.
18 Jan 2022 - 8:14 am | जुइ
अतिशय सुंदर फोटो आणि तितकेच झक्कास वर्णन!
18 Jan 2022 - 5:38 pm | कॅलक्यूलेटर
अतिशय सुरेख फोटो. सूर्यास्ताचे फोटोस तर पैंटिंग्स सारखी अप्रतिम.
20 Jan 2022 - 5:10 pm | नंदन
आटोपशीर वर्णन आवडले - फोटो तर क्लासच!
25 Jan 2022 - 12:39 pm | श्रीगणेशा
खूप छान फोटो. सर्वात पहिला, नौकेसोबत सूर्यास्ताचा फोटो अप्रतिम _/\_
वर्णनही आवडले!
4 Feb 2022 - 12:05 am | विकास...
जबरदस्त फोटोस, परत एकदा वाचून सविस्तर प्रतिसाद लिहीन
4 Feb 2022 - 12:06 am | विकास...
एकदा तिथे राहून पाहायचा विचार आहे, फलटण पासून १००-१२० KMs असल्याने एका दिवसात परत जातात लोक (आमच्या बरोबरची)
4 Feb 2022 - 12:23 am | विकास...
लैच भारी आहे, जावं लागेल मुक्कामाला
ते गुजराथी थाळी कुठे मिळाली? म्हणजे हॉटेल राजेश मॅपवर सापडत नाही . गुजराथी थाळी म्हणजे माझ्यासारख्या व्हेज माणसाची आवडती थाळी
18 Apr 2022 - 5:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
मिपाकर योगेश यांच्या लेखावरुन प्रेरणा घेउन मी नुकतीच ही ट्रिप केली. शिवसृष्टी रिसॉर्टचे बूकिंग मिळाले नाही म्हणुन पर्यायी रिव्हर व्ह्यु रिसॉर्ट्ला राहिलो. काही रूम नव्याने बांधल्यासारख्या वाटल्या. स्वच्छता होती. एकुण सोय चांगली होती. माणशी १६००/- रुपयात दोन चहा, स्नॅक्स, डिनर, नाश्ता आणि ए.सी. रूम म्हणजे काही वाईट नाही. सगळ्यात कळस म्हणजे संध्याकाळचे धरणाच्या पाण्यात पोहणे आणि दुसर्या दिवशी सकाळी कयाकिंग म्हणजे परीपुर्ण पॅकेज वाटले. स्टाफही चांगला होता. जाताना सातारा-मेढा मार्गे गेलो अणि येताना पाचगणी-वाई मार्गे आलो.
फक्त महाबळेश्वरहुन २४ कि.मी खाली उतरायला फार वेळ लागतो. रस्ता ठिकठिकाणी खचला आहे त्यामुळे विशेष काळजी घेउन गाडी चालवावी लागते. त्यात समोरुन एखादा उद्दाम अक्कलशून्य चालक आला की गाड्या अडकुन खोळंबा ठरलेलाच. म्हणुन दिवसा उजेडीच रिसॉर्ट्ला पोचणे उत्तम. शिवाय एक ठिकाण बघण्यासाठी पुणे-ते-पुणे जवळपास ४०० कि.मी अंतर कापण्यापेक्षा एक दिवस महाबळेश्वर दर्शन आणि रात्र मुक्काम , दुसरे दिवशी प्रतापगड दर्शन व एक रात्र तापोळा मुक्काम असे केल्यास (३ दिवस २ रात्री) सगळे काही बघुन होईल आणि ट्रिप सत्कारणी लागेल असे सुचवतो. (मात्र आमच्याकडे तितकी सवड नसल्याने जमले नाही) .
एकंदरीत सध्याच्या उन्हाच्या कहारातही एक छान फॅमिली ट्रिप होउ शकते. येताना मॅप्रो गार्डन् ला खादाडी म्हणजे चेरी ऑन द केक.
18 Apr 2022 - 9:52 pm | मदनबाण
फोटो सुंदर आहेत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)