ध्रांगध्रा - ६

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Jan 2022 - 7:48 am

महेशला इतक्यावर्षात कितीतरी वेळा शेकहॅंड केला असेल. पण त्याचा स्पर्ष असा कधीच जाणवला नव्हता. त्याच्या हाताचा आधार घेऊन मी उठतो. या वेळेस स्पर्ष मघासारखा नाही. हा स्पर्ष नेहमीसारखाच आहे. शक्य आहे मघाशी चक्कर येत होती. त्यामुळे तसे वाटले असेल.
आम्ही उभे राहिलो. समोर एक विलक्षण देखावा दिसतोय.
मागील दुवा ध्रांगध्रा - ५ http://misalpav.com/node/49735
पायवाट जिथे वळतेय त्या बाजुने अक्षरशः मोठी परात असावी तसा तांबुस पांढरा पूर्ण चंद्र वर येतोय.डोंगराचा कोपरा , थोडीशी वळणारी वाट आणि त्या मागे पूर्ण गोलाकार चंद्रबिंब. एखाद्या पोस्तरवर सोभेल असं दृष्य. त्य चंद्रबिंबावर Good Evening / Good Night असं लिहिलेलं असतं तर व्हॅट्सॅपवर थेट फोटो काढून पाठवला असता. हे असलं दृष्य गारूड करतं. कुठेही असा समुद्रात, वाळवंटात, प्रवासात चंद्रोदय , सूर्यास्त, सूर्योदय तुम्हाला हमखास खिळवून ठेवतात. मम्त्रमुग्ध करतात.
त्या चंद्रामुळे एक नक्की झालेय. आम्ही उभे आहोत ती पायवात उजळून निघालीये.
महेश आता काय करायचं?
कशाचं काय करायचं? माझा रोख महेशला समजला नाही.
"चल, परत फिरूया. आपल्याला डोंगर उतरून नाशीक गाथायचंय अजून" जाताना अंधारात नाशीकपर्यंत बाईक चालवायची आहे ती ही त्या सूनसान रस्त्यावरून, याचं मला भान येतंय.
" काय भैसाटला का बे तू" समोरच्याला त्याच्या पेक्षा आपली मते एकदम वेगळी आहेत हे सांगायला याच्या इतके तुच्छता दाखवणारे वाक्य दुसरे नसेल मराठी भाषेत." अरे इथपर्यंत आलोय ते असे अर्ध्यातून परत जायला का?" महेशच्या डोक्यात काय आहे ते समजत नाहिय्ये.
" अरे इथून उतरायला दोन तास जातील. त्या नांतर नाशीक पर्यंत बाईक हाणायची आहे त्या सुनसान रस्त्यावरून. घरी पोहोचायला दोन अडीच वाजतील. इथे मोबाईलची रेंज पण मिळत नाहिय्ये अजिबात.घरातले काळजीत असतील." महेशची समजूत या वाक्यांनी कितपत पतेल या बद्दल शंकाच आहे म्हणा. त्याने एखादी गोष्ट डोक्यात घेतली की मग शेंडी तुटो वा पारंबी तुटो , माघार नाही.हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्याच्या त्या " भैसाटला का बे" या वाक्यावरून पुढचा अंदाज आलाच आहे.
" हे बघ तू म्हणतो ते बरोबर आहे. पण असंही आत्ता खाली उतरायला लागलो तर दोन तास कसेही जाणारच. तिथून पुढे नाशीकला अडीच एक तास लागणार. आणि आपण इथपर्यंत आलोच आह्त तर थोडे पुढे जाऊन येऊ या ना" महेशचा हट्ट विक्रम वेताळाच्या गोष्टीतल्या विक्रमादित्य राजासारखा. " तसेही आपण अपरात्रीच पोहोचणार ना... मग थोडे पुढे जाऊन परत फिरुया".
" अरे उद्या प्रॅक्टिकल्स आहेत रे मटेरीयल सायन्स ची ,सकाळी" माझा तुटपुंजा बचाव.
" सकाळी आहेत ना! ..... मग आपण पोहोचतोय त्या अगोदर...अजून दोन तासांनी निघालो तरी पोहोचु पहाटेपर्यंत.असाही उशीर झालाच आहे की" महेशला समजावणं अवघड असतं.
" अरे पण त्या नंतर कॉलेजला जायचंय "
" त्यात काय! घरी गेलं, तोंड धुतलं , चहा घ्यायचा, आंघोळ झाली की थेट कॉलेज गाठायचं. त्यात काय एवढं!"
अरे पण प्रॅक्टीकलला झोप येईल. त्याचं काय? शिवाय मला डोक्याला खोक पडली आहे. डॉक्टरकडे जाऊन यावं लागेल. रक्त पण येतय अजून" ही मात्रा तरी लागू पडावी. याला समजावणं कठीण जातय.
" एक काम करुया. अगदी पांढरी गावा पर्यंत नको पण गाव कुठे आहे हे समजेल तिथ पर्यंत जाऊया. निदान मला रस्ता तरी समजेल.रस्ता माहीत झाला की परत येता येईल." माझा हट्ट म्हणा किंवा मग डोक्यातली खोक म्हणा, ती किती मोठी आहे हे डॉक्टरच सांगू शकेल, पण महेश त्यामुळे जरातरी एक पाऊल मागे आलाय.
" मला फार चालवणार नाही रे. पुन्हा चक्कर आली तर वांदे व्हायचे. दोघांचेही" मी मुद्दा पुढे रेटतोय. महेशच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलले असावेत. चंद्रप्रकाशात नीट दिसत नाही. पण असावेत.
" तू म्हणतोस म्हणून ...एक काम करुया. त्या समोरच्या वळणापर्यंत जाऊया. तिथून पुढे उजवी डावीकडे जाणार्‍या वाटा असतील तर कळेल तरी. शिवाय खाली दरीत काय आहे ते समजले तरी पांढरीला जायचा रस्ता कन्फर्म होईल.आपण तेथून परत येऊयात." महेश चक्क समजूतदारपणे माघार घेतोय.
ठीक आहे.पुढचे फारतर दोन आडीचशे मीटर जायचे असेल . रस्ताही तसा फार चढणीचा नाहिय्ये.तिथून परत तर फिरायचंय.
आम्ही दोघे चालायला लागतो. चंद्राचा उजेड आहे त्यामुळे पायाखलचं लख्ख दिसतय.चढ असा फारसा नाहीच. त्या वळणावर पुढे काय दिसणार आहे याची मलाही उत्सुकता आहे म्हणा.
" आणि तिथे तू म्हणतोस तशी वाट नसेल तर काहीच नसेल तर?" काहितरी बोलायचे म्हणून मी बोलतो.
" हॅ! काहीच नसेल असे कसे होईल. काहितरी असेलच की. निदान दगडधोंडे झाडं असे काहितरी असेलच ना? काहीच नाही असं कसं शक्य आहे" महेश लॉहिकचा विद्यार्थी " या जगात काहीच नाही असं एकमेव ठिकाण म्हणजे अंतराळ ,स्पेस. काहीच नाही हे फक्त तिथेच असू शकतं"
हे म्हणजे कायच्या काय!..... पण खरं ही आहे म्हणा.हे अर्थातच मी मनात म्हणतो. मोठ्याने म्हंटलं तर महेश तर्कशास्त्राचा आख्खा धडा शिकवेल मला.
बोलता बोलता आम्ही डोंगरावरच्या त्या वळणाजवळ पोहोचतो. पुढे काय दिसणार याची उत्कांठा आहेच.
चढण संपली. रस्ता आता पुडे संपला. म्हणजे जो सरळ रस्ता होता तो संपला.
सिनेमात अचानक दृष्य बदलावं तसं डोळ्यासमोरच्म दृष्य बदललय. सओर विलक्षण काळपट निळं आकाश. जेवायच्या ताटाएवढा मोठा चंद्र. समोर नजर पोहोचेल तिथवर मोकळा अवकाश. सेवन्टी एम एम च्या भल्या मोठ्या पडद्या सारखं. नजर वरून खाली येते.जिथे आकाश सम्पतय त्या क्षितीजावर. जमिनीच्या आणि आकाशाच्या कडा मिळायल्या हव्यात तिथपर्यंत सगळं स्वच्छ . तिथून पुढे धुरकट तपकिरी काळपट.दूरवर एखादं गाव.... त्या गावातल्या घरातले , रस्त्यावरचे टिमटिमणारे दिवे रात्रीच्या प्रवासात घाट उतरताना दिव्यांचे पुंजके दिसतात तशा दिसणार्‍या छोट्या वाड्या वस्त्या.... असं काहीच नाही. चित्रकलेच्या वर्गात रंगकाम करताना अगोदर कागदाला रंगाचा वॉश देतात ना तसा तपकिरी काळपट धूरकट रंगाचा वॉश दिल्यासारखं. क्षितीजाच्या खालचं जग त्या धुरकट तपकिरी रंगाच्या वॉश ने झाकून टाकलंय.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पोरं फेऱ्यात अडकलीत म्हणजे.

मुक्त विहारि's picture

5 Jan 2022 - 2:51 pm | मुक्त विहारि

वाचत आहे

विजुभाऊ's picture

6 Jan 2022 - 7:24 am | विजुभाऊ

पुढील दुवा ध्रांगध्रा - ७ http://misalpav.com/node/49747

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2022 - 9:58 pm | चौथा कोनाडा

ओर विलक्षण काळपट निळं आकाश. जेवायच्या ताटाएवढा मोठा चंद्र. समोर नजर पोहोचेल तिथवर मोकळा अवकाश. सेवन्टी एम एम च्या भल्या मोठ्या पडद्या सारखं. नजर वरून खाली येते.जिथे आकाश सम्पतय त्या क्षितीजावर. जमिनीच्या आणि आकाशाच्या कडा मिळायल्या हव्यात तिथपर्यंत सगळं स्वच्छ . तिथून पुढे धुरकट तपकिरी काळपट.दूरवर एखादं गाव.... त्या गावातल्या घरातले , रस्त्यावरचे टिमटिमणारे दिवे रात्रीच्या प्रवासात घाट उतरताना दिव्यांचे पुंजके दिसतात तशा दिसणार्‍या छोट्या वाड्या वस्त्या.... असं काहीच नाही. चित्रकलेच्या वर्गात रंगकाम करताना अगोदर कागदाला रंगाचा वॉश देतात ना तसा तपकिरी काळपट धूरकट रंगाचा वॉश दिल्यासारखं. क्षितीजाच्या खालचं जग त्या धुरकट तपकिरी रंगाच्या वॉश ने झाकून टाकलंय.

व्वा, अ ति शय सुंदर वर्णन !

महेशची कन्विन्सिंगची पॉवर जबरी आहे !