सहज डोक्यात विचार आला. मिसळपाववर अनेकांनी वृत्तविषयक लेख लिहिले आहेत. पण साधारणत: वृत्त हे पद्याच्या ओळीशी निगडीत असतं, पूर्ण कवितेच्या आकृतिबंधाशी नाही.
.
गझलचा आकृतिबंध (poetic form) बर्यापैकी परिचयाचा आहे. हायकू आहे. पूर्वी लोक सुनीत लिहायचे (मुख्यत्वे शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये). पण याव्यतिरिक्त आकृतिबद्ध कविता मराठीत विशेष दिसत नाहीत.
जगातील साहित्य परंपरांमध्ये अनेक रोचक आकृतिबंध आहेत. मला वाटलं आपण मिसळपाववर आव्हानमाला चालू करायला हवी. काही निर्यमक आहेत, काहींच्या अंत्ययमकाची मांडणी नियमबद्ध आहे (rhyme scheme), काहींमध्ये अंतर्यमक आहे (मला विशेष स्वारस्य), काहींना चरण कसे पाडावेत याचे नियम आहेत -उदा. सुनीतामध्ये १४ ओळींचे ८+६ असे गट पडतात, कधीकधी धृवपद कसं आणि किती वेळा आलं पाहिजे याचे दंडक असतात, काहींमध्ये अर्धयमकच हवं असा आग्रह असतो. असे कितीतरी प्रकार.
इथे जर मी काही २०-३० आकृतिबंधांचा परिचय दिला तर त्यामध्ये पद्य लिहिण्याचं आव्हान तुम्हाला आवडेल का? हा उपक्रम पुढचे एक-दोन वर्ष चालू शकेल!
नियम एकच: मी जाणूनबुजून पद्य असा शब्द वापरला आहे. काव्य नाही. काव्यामध्ये रसोत्पत्ती अपेक्षित असते. पद्य टुकार असू शकतं. विषय कोणताही चालेल. केवळ आकृतिबद्ध पद्य लिहिण्याचा सराव व्हावा म्हणून हा खटाटोप.
खडा टाकून ठेवतो. अभिप्राय कळवा.
प्रतिक्रिया
26 Nov 2021 - 10:39 am | गवि
अवश्य. शुभस्य शीघ्रम..
26 Nov 2021 - 4:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
शिघ्रम शिघ्रम
पैजारबुवा,
26 Nov 2021 - 5:30 pm | विजुभाऊ
मराठी मधे आकृतीबद्ध पद्याची परंपरा फार प्राचीन आहे
मुख्यत्वे याचे अक्षरगणवृत्त आणि मात्रागणवृत्त असे दोन प्रकार पडतात.
पण यमक आणि रसोत्पत्ती हे सर्वात महत्वाचे भाग आहेत.
अक्षरगणवृत्त आणि मात्राव्रुत्त हे गायकीच्या दृष्टीने तालात ( मीटरमधे) असतातच. शब्दांची मोडतोड करावी लागत नाही.
आपल्या बहुतेक आरत्या , श्लोक हे छंदोबद्ध आहेत.
रामरक्षेचा अनुष्टुभ छंद, किंवा मोरोपम्तांच्या आर्या ही काही उदाहरणे
26 Nov 2021 - 10:04 pm | धष्टपुष्ट
अनुष्टुप आणि आर्या यांना मी वृत्तबद्ध काव्य अस म्हटलंय.
आकृतिबंध हा शब्द थोडा वेगळा वापरलाय मी - सुनीत, हायकू यांना वृताचं बंधन नसलं तरी poetic फॉर्म चं आहे. गझल हा एक आकृतिबंध - त्याच्या प्रत्येक ओळीचं वृत्त कुठलं हे ठरलेलं नसलं तरी त्याच्या फॉर्म चे नियम आहेत.
असा भेद हेतुश: केलाय.
28 Nov 2021 - 11:39 am | मदनबाण
जरुर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotan
28 Nov 2021 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नोटेड.
-दिलीप बिरुटे