जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले. पण सलग 3 वर्षे परीक्षेत नापास झाल्याने त्याला 1953 च्या जानेवारी मध्ये पुन्हा कंबोडियामध्ये परतावे लागले. पण त्यापूर्वीच 1951 मध्ये तो मार्क्सवादी चळवळीत दाखल झाला होता.
1963 साली पॉल पॉट कंबोडियन कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख बनला. त्याने अशिक्षित मुले व तरुणांची फौज बनवली ज्याला Khmer Rouge असे नाव पडले. कंबोडियाचा तत्कालिक शासक नोरोडोम सिहनौक ह्याने पॉल पॉटच्या ह्या Khmer Rouge चा निर्दयपणे पाडाव करायला सुरवात केली पण 17 एप्रिल 1975 साली Khmer Rouge ने नोरोडोम सिहनौक ची सत्ता उलटवून लावत देश आपल्या ताब्यात घेतला. 5 जानेवारी 1976 रोजी कंबोडियाने नवे संविधान स्वीकारले व देशाचे नाव बदलून "Democratic Kampuchea" केले. 13 एप्रिलला तो देशाचा पंतप्रधान झाला. मग त्याने देशाच्या नागरिकांचे 3 भाग केले.
1) सर्व अधिकार असणारा.
2) कॅन्डिडेट्स
3) डिपॉसिटीस - हे काहीही अधिकार नसलेले लोक होते. ह्या लोकांना ठार करायचे असे त्याचे ध्येय होते.
देशाची पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर आधारित असली पाहिजे व भरपूर प्रमाणात शेती उत्पन्न मिळवून देश स्वयंपूर्ण करायचा हे त्याचे ध्येय होते. त्याने पैसा चलनातून बाद केला. सर्व शाळा, धार्मिक स्थळे, दुकाने ह्यांचे रूपांतर तुरुंगात केले. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद केली. काळे कपडे हा पोशाख सक्तीचा केला.
शेती करून देश स्वयंपूर्ण करण्यासाठी फक्त 10-20 लाख लोक पुरेसे आहेत. बाकीच्या लोकांचा जगून देखील काही उपयोग नाही असे त्याने रेडिओ वर जाहीर केले.
सत्तेवर येताच Khmer Rouge ह्या त्याच्या लष्कराने 25 लाख लोकसंख्येचे नाम पेन्ह शहर पूर्ण रिकामे केले. इतर लहान मोठी जिंकलेली शहरे देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आली. अमेरिकेचा हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे असे खोटे सांगून त्याने सर्वाना देशाच्या ग्रामीण भागात नेले. तिथे सर्वाना बंदी बनवले गेले. सर्व बंदीवानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे शेतीकाम करावे लागे. आणी त्या बद्दल अन्न मिळत असे ते म्हणजे 2 वाट्या भात. त्यामुळे बरीच लोक उपासमारीने आणी अति श्रमाने मारून जात असत. जो कुणी कामाबद्दल तक्रार करेल किंवा कोणताही नियम मोडेल त्याला देण्यात येणारे अन्नधान्य (2 वाट्या भात) बंद करण्यात येऊन त्याला छळ छावणीत नेण्यात येत असे आणी अगोदरच उपासमारीने अर्धमेल्या झालेल्या त्या व्यक्तीला हाल हाल करून ठार मारण्यात येत असे.
बऱ्याच डिपॉसिटीसना साखळ्यानी बांधून खड्डे खणण्यासाठी नेले गेले आणि मग त्यांना त्याच खड्ड्यात जिवंत पुरून टाकले. अशी हजारो किलिन्ग फिल्ड्स आजही कंबोडिया मध्ये सापडतात.
शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ आहेत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई.
बंदुकीची गोळी ही किमती वस्तू असल्याने लोकांना मारण्यासाठी तो हातोडी, दांडे, फावडी, कुदळ अशी हत्यारे वापरत असे किंवा जिवंत पुरून टाकत असे. तर काही लोकांना बेडला साखळ्यांनी बांधून ठेवले जाई (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत).
शेती आधारित अर्थव्यवस्थेत इतर जगाशी काहीही संबंध ठेवायची गरज नाही असे मत असल्याने त्याने चीन सोडून इतर सर्व देशांशी संबंध तोडून टाकले. देशातील विमान तळ बंद केले, सीमा सील केल्या जेणेकरून कोणीही देश सोडून पळून जाऊ शकणार नाही.
1975 ते 1979 ह्या त्याच्या 4 वर्षाच्या जुलमी कारकिर्दीत कंबोडियाच्या 70 लाख नागरिकांपैकी जवळपास 25 ते 30 लाख लोकांना ठार मारण्यात आले. एक छळ छावणी S - 21 इतकी भयानक होती की तिथे कैद केलेल्या 20000 लोकांपैकी फक्त 7 जण जिवंत राहू शकले. ह्या सर्व मृतांना भाताच्या शेतात पुरले जाई.
आज पर्यंत कंबोडिया मध्ये तब्बल 300 ठिकाणी अशी 'किलिन्ग फिल्ड्स ' सापडली आहेत आणी अजूनही सापडत आहेत.
मे 1975 साली त्याच्या सैन्याने Phú Quốc हे व्हिएतनामचे बेट जिंकल्याने त्याचे व्हिएतनामशी संबंध बिघडले. तह करण्याचे सर्व पर्याय संपल्यावर व्हिएतनामने कंबोडियाशी युद्ध पुकारले. चीनच्या मदतीनं पॉल पॉट ने व्हिएतनामशी लढायचा खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा पराभव झाला. ज्यानंतर तो थायलंडला पळून गेला. थायलंडने पॉल पॉटचा आणी त्याच्या सैन्याचा बफर म्हणून उपयोग केला आणी त्याला चीन कडून हत्यारे मिळवून देण्यास मदत केली.
1985 साली त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये 'मी पूर्णपणे निर्दोष असून माझ्या हाताखालच्या लोकांनी मला न सांगता ह्या हत्या केल्या असे आरोप केला.' त्याच साली व्हिएतनाम ने Khmer Rouge चा पूर्णपणे पाडाव केला. 1989 साली व्हिएतनामचे सैन्य कंबोडिया मधून निघून गेल्यावर पॉल पॉट थायलंड मधून परत देशात आला आणी त्याने नवीन सरकारशी लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 19 मे 1997 ला त्याला लष्कराने ताब्यात घेतले. पण आपल्याला अमेरिकेच्या हवाली करतील म्हणून त्याने 15 एप्रिल 1998 रोजी औषधांचा डोस जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्या केली.
आजच्या कंबोडियातल्या जवळपास प्रत्येक घरातले कुणीतरी पॉल पॉट च्या अत्याचारांचे शिकार झालेले आहे. आणी त्यामुळे आजही खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशातली जनता मानसिक रोगग्रस्त आहे.
समाप्त.
प्रतिक्रिया
7 Oct 2021 - 1:27 am | गामा पैलवान
लोकहो,
कंबोडियाच्या निरपराध नागरिकांचं शिरकाण पॉल पॉटने नाही, तर अमेरिकन सैन्याने केलं. अमेरिकेने व्हियेतनामसोबत कंबोडिया व लाओस मध्येही आक्रमण केलं होतं. जागतिक प्रसारमाध्यमांनी हे तथ्य सोयीस्करपणे दडपलं आहे.
१९६५ सालापासनं अमेरिकेने व्हियेतनाममध्ये घुसखोरी सुरु केली. तिला फारसं यश मिळेना. म्हणून १९६९ मध्ये कंबोडिया या तटस्थ ( होय, तटस्थ) देशामध्ये बॉम्बफेक सुरु केली. ती १९७३ पर्यंत चार वर्षं चालली. हे बॉम्ब नापाम प्रकारचे होते. म्हणजे आगी लावणारे. सोबत अमेरिकी पायदळाने एजंट ऑरेंजची फवारणी सुरु केली. हजारो टन एजंट ऑरेंज फवारला. यामुळे विकृत बालकं जन्मास येतात. व्हियेतनामी लोकांची साक्ष आहे. याच एजंट ऑरेंज मुळे झाडांची सर्व पानं एका दिवसात गळून पडतात. ही संततधार बॉम्बफेक ( = कार्पेट बॉम्बिंग ) आणि फवारलेला एजंट ऑरेंज यांमुळे कंबोडियाचा अक्षरश: सर्वनाश झाला. सोबत दयाळू अमेरिकेने असंख्य भूसुरुंग ( = land mines ) पेरले व विमानांतून टाकले.
लोकांना कळू नये म्हणून अमेरिकी डीप स्टेट ने कंबोडियाची मोहीम गुप्त ठेवली. इतकी गुप्त की आजही अमेरिका एजंट ऑरेंज फवारल्याचं नाकारते. संदर्भ : https://www.nytimes.com/2021/03/16/magazine/laos-agent-orange-vietnam-wa...
या चित्रात बघा एजंट ऑरेंज चे परिणाम ( सोबतचा लेखही वाचला तरी चालेल ) : https://agentorangerecord.com/cambodia/
व्हियेतनाममध्ये ५०००० टन ( अक्षरी पन्नास हजार टन ) एजंट ऑरेंज फवारला. कंबोडियात आकडा आजून जास्त असणार. लोकं ९००००+ टन ( अक्षरी नव्वद हजाराधिक टन ) म्हणतात.
एजंट ऑरेंज + संतत ध्वंफेक + भूसुरुंग = सत्यानाश.
तरीपण कंबोडियाने कुणाकडे कसलीही भीक मागितली नाही. जी काही उरली सुरली जमीन होती तिच्यावर यशस्वीपणे भाताची लागवड केली. परिणामी कंबोडिया सदैव अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण राहिला आहे.
याला कारण एकंच माणूस. तो अमेरिकी हलकटपणाविरुद्ध ठामपणे उभा राहिला. त्याचं नाव सलोथ सार. लोकं त्याला पोलिटिकल पोतान्ते या फ्रेंच बिरुदाने ओळखायचे. त्याची आद्याक्षरं पॉल पॉट होतात.
आज कंबोडियाचा भात उच्च दर्जाचा समजला जातो : https://www.khmertimeskh.com/540271/malys-angkor-crowned-worlds-best-rice/
आता कळलं असेल पॉल पॉट प्रस्थापित प्रसारमाध्यमांचा का नावडता होता ते. अमेरिकेने हा#यचं आणि इतरांनी साफ करायचं. रीतंच आहे ती जगाची.
उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर लेख परत वाचावा म्हणून सुचवेन. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
आ.न.,
-गा.पै.
7 Oct 2021 - 1:45 am | रंगीला रतन
ऑ
ह्या काय आता नवीन? अमेरिका बाराची आहे यात नवीन काय नाही. खरं असेल तर माहिति विन्टरेस्टिंग हाय. आता यावर इथले अमेरिकेचे भाट आणी दोन अव्वल नंबरी नशेडी काय बोलतात ते वाचायला मज्जा येणार पॉप कॉर्न घेउनशान बसलोय :=)
7 Oct 2021 - 2:04 am | अमरेंद्र बाहुबली
गामाजी पुर्णपणे विरोधी माहीती. वर रंगील्यांच्या रतन ने सांगीतल्या प्रमाणे आता चर्चेत मजा येणार. हे अमरीकी काय करतील भरवसा नाही. मी हा धागा वर आणला नसता तर ही माहीती मिळाली असता का रे मिसळ्यानो?? आभार माना माझे. :)
7 Oct 2021 - 1:08 pm | गामा पैलवान
हो, अमरेंद्र! लेख वर काढल्याबद्दल तुमचे आभार मानायचे राहून गेले. त्यानिमित्ताने आता मानतो. :-)
आ.न.,
-गा.पै.
7 Oct 2021 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद गामाजी माफ करा.
7 Oct 2021 - 5:01 pm | गॉडजिला
तुमचे खरे मनापासून आभार
7 Oct 2021 - 7:45 am | चंद्रसूर्यकुमार
यामागे हेनरी किसिंजरचा हात होता. या दोघांनी बांगलादेशमध्ये काय केले हे पण जगजाहीर आहे. म्हणूनच म्हणतो की हेनरी किसिंजर आणि रिचर्ड निक्सन या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवली असेल. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्याच हेनरी किसिंजरला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.
अर्थातच त्यामुळे पॉल पॉटने केलेल्या अत्याचारांचे गांभीर्य कमी होत नाही किंवा त्याचे समर्थनही कोणी करू नये. डावे असेच हलकट असतात. पण त्याला सत्तेवर येण्यासाठी योग्य परिस्थिती किसिंजर-निक्सन जोडगोळीने निर्माण केली हे पण तितकेच खरे.
7 Oct 2021 - 2:29 pm | नगरीनिरंजन
ह्या हेन्री किसिंजरचा भारतद्वेषही प्रसिद्ध होता. विशेषतः इंदिरा गांधींच्या काळात निक्सन व त्याचे भारताबद्दलचे अनुदार उद्गार गाजले होते.
जगत्गुरु श्री मोदींनी मात्र त्यांचे मन जिंकले व दिल्लीत त्यांची भेट घेतली होती.
त्याचा वृत्तांत व विश्लेषण येथे वाचता येईल.
7 Oct 2021 - 7:29 am | सुरसंगम
गामा येतात तेच मुळे संदर्भ सहित माहिती घेऊन.
त्यांच्याबद्दल आदर दुणावला आहे.
पण गामा साहेब मग यां माणसाने आपलीच माणसे मारली याला काय कारण असावे.
आणि हो आता इथे नको तर त्यावर नवीन लेख येवू द्या.
7 Oct 2021 - 8:41 pm | Rajesh188
पोल भांडे - mr.wikipaltz.com
https://mr.wikipaltz.com/113162-pol-pot-OWPSZA
भाषांतर असल्या मुळे मराठी ची पुर्ण वाट लागली आहे समजून घेत वाचा.
7 Oct 2021 - 8:49 pm | रंगीला रतन
पॉल पॉट = पोल भांडे :=) :=) :=)
खत्रनाक भाषांतर आहे. रावले साहेबांची लै आठवन आली :=)
7 Oct 2021 - 8:54 pm | तर्कवादी
पोळ पाट :)
7 Oct 2021 - 8:57 pm | रंगीला रतन
:=) :=) :=)
7 Oct 2021 - 9:01 pm | अमरेंद्र बाहुबली
हे वाचलं तर वेड लागेल
18 Aug 2024 - 12:20 pm | diggi12
माहिती पूर्ण