हिंदी फिल्म इंडस्ट्रीने जीवनातल्या प्रत्येक घडीसाठी, प्रसंगासाठी, घटनेसाठी गाणी पुरवलेली आहेत. तुम्ही कोणताही प्रसंग डोळ्यासमोर आणा, त्याला साजेसं गाणं तुम्हाला नक्कीच सापडेल. प्रियकराला स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करायला हिंदी गाणी जितक्या आस्थेने मदत करतात तितक्याच आस्थेने प्रेमभंग झालेल्या हृदयाला पिळवटून टाकणारी गाणी तत्परतेने पुढे येतात. आनंदाचा प्रसंग असो किंवा प्रेमभंगाचे दुःख असो, जन्माचा सोहळा असो किंवा मृत्यूचा घाला, वीरश्री असो किंवा पराभवाचे शल्य असो, दिवाळी, दसरा, होळी, नवरात्र, गणेशोत्सव, जन्माष्टमी, ईद, ख्रिसमस, रक्षाबंधन वगैरे सर्वच सणांसाठी गाणी आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टी पुरवत आहे आणि माझी खात्री आहे की भविष्यात देखील पुरवील. इतकेच कशाला अगदी भिक्षा मागण्यांसाठी देखील “गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा” किंवा ‘शिरडी वाले, साईं बाबा, आया है तेरे, दर पे सवाली” सारख्या गाण्यांची तजवीज करून ठेवली आहे.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ह्या गाण्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखादं विविक्षित गाणं कानावर पडलं आणि तो सिनेमा आपण पाहिला असेल तर लगेच सिनेमातील गाण्याचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. कित्येक वेळा असेही होते की गाण्याशी संबंधित आपल्या जीवनात घडलेली एखादी घटना एकदम आठवून जाते. मन भूतकाळात विहार करून येते व काही क्षण तरी पुनः प्रत्ययाचा अनुभव देऊन जाते. आता लिहायला घेतल्यावर असंख्य गाणी व त्याला जोडून घडलेले प्रसंग आठवले.
१९८५ सालची गोष्ट असेल. मी त्यावेळी मुंबईत बोरिवलीला राहत असे. सकाळच्या ७.१३च्या लोकल ट्रेनने मी दररोज चर्चगेटला ऑफिसला जात असे. असेच एकदा ट्रेनसाठी थांबलो असता तीन छोटी-छोटी मुले, वय वर्षे ५ ते ८ च्या आसपासची असावीत, हातात एक पत्र्याचा डबा व तो वाजवायला एक गुळगुळीत दगड घेऊन बसली होती. अंगावर मळकट कपडे ते देखील अनेक ठिकाणी फाटलेले, केसांवर धूळ, अनेक दिवसात आंघोळ न केल्यामुळे करपलेला काळा वर्ण वगैरे बघून ती ट्रेनमध्ये गाणी गाऊन पैसे कमावणारी होती हे लगेच लक्षात येत होते. आसपास बऱ्यापैकी गर्दी जमा झाल्यावर त्यांनी आपल्या किनऱ्या स्वरात गाणं म्हणायला घेतलं. “भोले हो भोले, तू रुठा, दिल टूटा, मेरे यार को मनाले, वो प्यार फिर जगा दे”. लगेच त्यातल्या दोन मुलांनी नाचायला घेतलं व तिसरी मुलगी डब्यावर दगड वाजवीत ताल देऊ लागली. बघता बघता त्यांच्या भोवती गर्दी होऊ लागली व ती मुले अधिकच उत्साहाने नाचायला लागली. त्यांचे ते हावभाव, त्यांचा चपळपणा, जमलेल्या गर्दीतील लोकांच्या अगदी जवळ जाणे, डोळ्याला डोळा भिडवून नाचणे अगदी दाद घेऊन गेले. त्यांच्यावर नाण्यांचा, नोटांचा वर्षाव झाला. तेव्हढ्यात ट्रेन आली, जमलेली गर्दी आपल्या पोटासाठी पांगली व ती तीन मुले आनंदी चेहऱ्यांनी जमलेले पैसे मोजत बसली. ते तिघं एकमेकांचे भाऊ-बहीण होते की पोटासाठी त्यांचं ते जॉईंट व्हेंचर होते हे सांगता येणं कठीण आहे, पण पोटासाठी करायला लागणारा झगडा त्यांना त्या लहान वयातच अवगत झाला होता व त्यांनी तो आपल्या परीने सोडवला देखील होता. आजही हे गाणे कुठेही ऐकले तरी ती तीन मुले व त्यांचा नाच आठवतो.
आमच्या एका लांबच्या परिचयाच्या गुजराती गृहस्थाने त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी, ऑफिसचे सहकारी ह्यांच्याबरोबर आम्हाला पण त्या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले. समारंभाच्या रात्री जेवण होते. बरोबर रात्री सात वाजता सर्वजण जेवायला बसले, पहिला घास घेणार इतक्यात स्पीकरवर “एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों’ हे गाणं लागलं आणि यजमान पती-पत्नी एकमेकांच्या हातात हात घालून नाचत नाचत येऊ लागले. मध्येच ते एखाद्या अतिपरिचयाच्या व्यक्तीला, पानावरुन उठवुन, हात धरून आपल्याबरोबर नाचायला लावत. बघता बघता अर्धी पंगत उठून त्या गाण्यावर नाचू लागली होती. त्या गाण्यातील प्रत्येक ओळीवर हावभाव करीत मंडळी नाचत होती. गाण्याच्या शेवटापर्यंत अनेक जणांच्या डोळ्यात पाणी आलेले स्पष्ट दिसत होते. लांबलचक आभार प्रदर्शनाच्या भाषणाने जे साध्य झाले नसते ते तीन-साडेतीन मिनिटाच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील गाण्याने साध्य झाले होते. आज कित्येक वर्षे उलटली ह्या गोष्टीला पण ते गाणे व तो प्रसंग ह्यांचे एक अतूट नाते मनावर कोरले गेले आहे.
नोकरीनिमित्ते मी अनेक वर्षे गुजरातमध्ये काढली, त्यातील १९९५ ते २००० ह्या काळात मी राजकोटला होतो. राजकोटलाच आमचे रिजनल ऑफिस तसेच पेट्रोल-डिझेलचा डेपो देखील होता. ऑफिस व डेपो मिळून जवळजवळ आम्ही चाळीस - पंचेचाळीस मंडळी राजकोटला होतो. दर तीन ते पाच वर्षांनी आमच्यातील काही जणांची बदली व्हायची व त्यांच्या जागी नवीन ऑफिसर, कर्मचारी यायचे. २००० साली एकाच वेळी आम्हा पाच जणांची बदली झाली. उर्वरित स्टाफने आम्हाला सेंडऑफ द्यायचे ठरवले. सेंडऑफच्या दिवशी रात्री हॉटेलात एक पार्टी ठरवली व आम्ही सर्वजण त्या हॉटेलात पोहोचलो. सेंडऑफ कमिटीने आम्हा पाचही जणांना स्टेजवर बसवले व आमच्यावर स्तुतीपर व शुभेच्छा चिंतनाची भाषणे होऊ लागली. थोड्या वेळाने एक कर्मचारी उठला व सेंड ऑफ कमिटीला, मला एक गाणं म्हणायचे आहे असे सांगून स्टेजवर चढून माईक हातात घेतला. लगेच त्याने गाणे म्हणायला घेतले. “तेरे सादी पे दु तुझको तौफा मै क्या ? पेस करता हूँ दिल एक टुटा हुआ, खुस रहे तू शदा, ये दुआ है मेरी, बेवफा ही शही, दिलरुबा है मेरी, खुस रहे”
(थोडं अवांतर - गुजरातमध्ये अनेक सुशिक्षित, उच्चविद्या विभूषित मंडळी देखील ‘स’ आणि ‘श’ चा गोंधळ घालतात. अगदी न चुकता ‘स’च्या जागी ‘श’ उच्चारणे व ‘श’च्या जागी ‘स’ उच्चारणे अगदी कॉमन आहे. शंगीत (संगीत) शभा (सभा), राकेस (राकेश), सैलेस (शैलेश), ही अशीच काही उदाहरणे. एखाद्या भाषेत एखादा शब्द अथवा मुळाक्षर नसणे आणि त्यामुळे तो बरोबर उच्चारता न येणे हे मी समजू शकतो. उदाः हिंदीत ‘ळ’ नसल्याने हिंदी भाषिक ‘ळ’ चा उच्चार ‘ल’ असा करतात, पण गुजरातीत ‘स’ आणि ‘श’ दोन्ही असताना त्यांचा उच्चार नेमका विरुद्ध का केला जातो हे मला एक न उलगडलेले कोडे आहे. अर्थात सर्वच गुजराती असे करतात असेही नाही)
पण खरी गम्मत पुढेच घडली. गाण्यातील “खुस रहे तू शदा” मधल्या प्रत्येक ‘तू’वर जोर देऊन, तो स्टेजवर बसलेल्या आमच्या एका मॅनेजर समोर वाकून बोट दाखवी, जणू काही इतर ‘खुस राहोत न राहोत, पण ‘तू’ मात्र खुश रहा” असेच त्याच्या हविर्भावावरून वाटत होते. पहिल्यांदा असे घडले तेव्हा सर्वानी दुर्लक्ष केले, पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा असे घडल्यावर ते मॅनेजर अगदी अस्वस्थ झाले व ती विविक्षित ओळ येणार असे दिसल्यावर मुद्दामच इथे-तिथे बघायला लागले. जमलेली मंडळी आधी गालातल्या गालात नंतर अगदी मोकळेपणाने हसू लागली. पुढचे कितीतरी दिवस ते गाणे आमच्या ऑफिसमध्ये फेमस झाले होते.
प्रसंग कोणता ? गाणं कोणतं ? कशाचा कशाला ताळमेळ नव्हता पण त्याच्या भावना सच्च्या होत्या व अत्यंत तळमळीने तो ते गाणं म्हणत होता. आजही हे गाणं ऐकायला मिळाले की तो संपूर्ण प्रसंग पुन्हा डोळ्यासमोर उभा राहतो व चेहऱ्यावर हास्य फुलते.
आमचा एक संगीतप्रेमी मित्र आहे, मदनमोहन हा त्याचा अत्यंत आवडता संगीतकार. मदन मोहनची सर्वच गाणी त्याला अगदी तोंडपाठ. कॉलेजमध्ये असताना ‘हसते जख्म’ मधील “आज सोचा तो आँसू भर आए” हे गाणे तो गुणगुणत होता. पण चुकीने तो “आँसू सोचा तो आँसू भर आए” असं म्हणत होता. आम्ही इतर मित्रांनी त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या शब्दांवर अडूनच राहिला. मग मात्र आम्ही त्याच्याशी पैजच लावली की जो जिंकेल त्याला इतरांनी हॉटेलमध्ये येथेच्छ खायला घालायचे. शेवटी एका ज्यूक बॉक्स असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो व आठ आण्याचे नाणे टाकून ते गाणे त्याला तीनचार वेळा ऐकायला लावले तेव्हा कुठे त्याने त्याची चूक मान्य केली व त्याच हॉटेलमध्ये त्याच्या पैशाने आम्ही वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर आडवा हात मारला व तृप्तीचा ढेकर दिला. त्या नायिकेच्या डोळ्यात भले ‘आँसू भर आए’ आमची मात्र पोटे तुडुंब भरली. रेडियोवर किंवा टीव्हीवर हे गाणे ऐकताना किंवा पाहताना ते हॉटेल व ते पदार्थच डोळ्यासमोर फेर धरतात.
१९८१ साली आम्ही पंधरा एक जण कंपनीतर्फे व्हॉलीबॉल टूर्नामेंटसाठी ट्रेनने मद्रासला (त्यावेळी ते चेन्नई नव्हतं) निघालो होतो. आमच्या टिममध्ये एक दळवी नावाचा उंचापुरा, तगडा आणि राकट असा प्लेअर होता. अतिशय दिलखुलास, सतत हसत राहणारा व चेष्टा मस्करी करण्यात सगळ्यात पुढे असणारा. असा जरी असला तरी तो रागावायचा देखील पटकन म्ह्णून मग कोणी त्याच्या नादाला लागायचे नाही. तर ट्रेनमध्ये जेऊन खाऊन आणि पिऊन झाल्यावर सर्व जण गाऊ लागले. हा मात्र खिडकीच्या बाहेर बघत शांत बसला होता. गाण्याचा पहिला बहर ओसरल्यावर आम्ही त्याला गाणे म्हणायचं आग्रह केला. थोडेफार आढेवेढे घेत त्याने गाणे म्हणायला सुरवात केली.
“मुबारक हो तुझको, समां ये सुहाना,
मै खुश हूँ, मेरे आँसुओ पे न जाना,
मै तो दिवाना, दिवाना, दिवाना”
तो जसं जसं गाणं पुढे पुढे गायला लागला, भलताच गंभीर झाला. गाणं संपता संपता तर त्याने डोळे पुसलेले आम्ही सर्वांनी पाहिले. डोळ्यात गाडीच्या इंजिनातील कोळशाचा कण गेला असं म्हणायला पण वाव नव्हता कारण डबा सेकंड क्लास एसीचा होता. एव्हढा धिप्पाड, आडदांड गडी पण त्याला हळवं झालेलं पाहून आमच्याही काळजात काहीतरी हललं. कोणत्या प्रसंगाने कोणाच्या जखमेवरची खपली निघून जखम भळाभळा वाहू लागेल हे सांगणे खरंच कठीण आहे.
आमच्या लहानपणी म्हणजे १९६५ - ७०च्या काळात उत्तर भारतीय मंडळी मुंबईत रामलीला करीत. मुंबईत उत्तर भारतीय लोकांची संख्या खूपच असल्याने तसेच इतर लोकांना देखील रामायण आवडत असल्याने अश्या कार्यक्रमांना अमाप गर्दी लोटत असे. रामलीला रात्री नऊच्या आसपास सुरु होत व त्यात पुरुष मंडळींच स्त्री पात्र करीत असत. बहुतेक वेळा ही स्त्री पात्र चेहऱ्यावर भरपूर रंगरंगोटी करीत त्यामुळे संपूर्ण स्टेजवर ती उठून दिसत. तर एकदा अशीच रामलीला चालू होती व शूर्पणखा रामाशी सलगी करायला येते तो प्रसंग चालला होता. राम तिला म्हणतो की माझे तर लग्न झाले आहे, माझा धाकटा भाऊ लक्ष्मण अजून अविवाहित आहे, त्याला विचारून बघ. मग ती शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाते व त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पकडायला त्याच्या समोर गात गात नाचते. ह्या रामलीलेत नाचताना ती जे ‘काला पानी’ चित्रपटातील गाणे म्हणते ते आजही आठवते.
"नज़र लागी राजा तोरे बंगले पर, नज़र लागी राजा तोरे बंगले पर.
जो मैं होती राजा बन की कोयलिया, कुहुकु रहती राजा तोरे बंगले पर.
जो मैं होती राजा कारी बदरिया, बरस रहती राजा तोरे बंगले पर.
जो मैं होती राजा बेला चमेलिआ, लिपट रहती राजा तोरे बंगले पर.
जो मैं होती राजा तुम्हरी दुल्हनिया, मटक रहती राजा तोरे बंगले पर."
प्रत्येक कडव्याच्या शेवटी शूर्पणखा लक्ष्मणाला मिठी मारायला धावायची व लक्ष्मण तेव्हढ्याच जोराने तिला ढकलून द्यायचा. संपूर्ण रामलीलेच्या नऊ दिवसात हा प्रसंग प्रेक्षकांत फारच प्रिय होता व जमलेली मंडळी जोरजोरात हसून दाद द्यायची. त्या वयात ह्या गाण्याचं इतकं गारुड मनावर होतं की जर परीक्षेत हे गाणं कोणी कोणाला उद्देशून म्हंटले आहे असा प्रश्न जर आला असता तर मी ‘शूर्पणखा लक्ष्मणाला’ असेच उत्तर बिनदिक्कत दिले असते.
जाता जाता एका मराठी गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यावेळी मी सेकंड इयर बी.कॉम.ला असेन. आमच्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न कोल्हापूरला ठरले होते. आम्ही पाच-सहा मित्र तसेच त्या बहिणीच्या काही मैत्रिणी ट्रेनने कोल्हापूरला निघालो होतो. ट्रेनमध्ये गप्पा गोष्टी करत, पत्ते खेळत, गाण्याच्या भेंड्या लावत आम्ही सर्व प्रवास पूर्ण केला. प्रवासात एका सुबक ठेंगणीने माझे लक्ष वेधून घेतले होते, आणि हे इतरांच्या लक्षात येण्यावाचून राहिले तर ते मित्र-मैत्रीण कसले ? ट्रेनमध्ये आम्हा दोघांची भरपूर चेष्टा-मस्करी झाली, चिडवणे झाले. कोल्हापूरला पोहोचल्यावर हॉलवरच राहण्याची सोय केली होती. लग्नाच्या आदल्या रात्री त्या सुबक ठेंगणीने माझ्याकडे तिरपे कटाक्ष टाकत, “बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं जाता साताऱ्याला” ही ठसकेदार लावणी म्हंटली. मात्र दुसऱ्याच दिवसापासून ती एका मुलाबरोबर दिसू लागली व आमचे एकतर्फी प्रेम-प्रकरण दीड दिवसाच्या गणपतीसारखे लगेचच संपुष्टात आले. मात्र आजही हे गाणे ऐकले किंवा युट्युबवर पाहिले की ती सुबक ठेंगणीच डोळ्यासमोर येते.
सध्या ती काय करत असावी बरे ?
प्रतिक्रिया
11 Aug 2021 - 3:58 am | सोत्रि
सुंदर, नॅास्टॅलजीक करणारा लेख. गाण्यांशी संबंधीत बऱ्याच तरल आठवणी जाग्या झाल्या!
- (मनातली गाणी आठवणारा) सोकाजी
11 Aug 2021 - 9:09 am | ज्ञानोबाचे पैजार
अशी अनेक गाणी आपल्या मनात घर करुन बसलेली असतात.
सहज कुठे ऐकु आली की लगेच आठवणी जाग्या होतात.
पैजारबुवा,
11 Aug 2021 - 11:15 am | मराठी_माणूस
मस्त.
“आँसू सोचा तो आँसू भर आए” हे तो कसे म्हणत असेल ह्याची कल्पना केली कारण ते मिटर मधे बसत नाही. कारण मुळ शब्दा मधल्या (आज) "ज" चा उच्चार कळत / नकळत आहे.
बाकी ते गाणे छानच आहे.
11 Aug 2021 - 2:44 pm | चांदणे संदीप
गाण्यांच्या आठवणी आवडल्या.
सं - दी - प
12 Aug 2021 - 6:34 pm | सौन्दर्य
सोकाजीराव, पैजारबुवा - जुन्या आठवणी जाग्या करण्याची गाण्यांची शक्ती अमाप आहे.
मराठी माणूस - कदाचित नेमक्या त्याच कारणाने आम्ही इतर मित्र आमच्या शब्दावर अडून बसलो असू. त्या काळात रेडिओवर कित्येक वेळा गाणी सुस्पष्ट ऐकू यायची नाहीत.
चांदणे संदीप - तुम्ही पण तुमच्या आठवणी शेअर करा. मजा येईल.
12 Aug 2021 - 7:17 pm | गॉडजिला
एकदम चीगी विगी करून सोडणारे लिखाण
13 Aug 2021 - 1:41 pm | तुषार काळभोर
गाण्यात कायली मिनोग ज्या दिलखेचक पद्धतीने Baby शब्द उच्चारते ना... कलेजा खल्लास होतो!
13 Aug 2021 - 6:09 pm | गॉडजिला
_/\_
13 Aug 2021 - 6:09 pm | गॉडजिला
_/\_
13 Aug 2021 - 12:04 pm | सुमो
गाणं असो किंवा एखादी सुरावट, कुठेतरी तार छेडली जाते अन मग आठवणी जागतात ...
मस्त लिहिलं आहे. आवडलं लिखाण.
13 Aug 2021 - 2:01 pm | सुबोध खरे
माझा संगीत प्रवास
https://www.misalpav.com/node/43484
13 Aug 2021 - 7:21 pm | सौन्दर्य
डॉक्टर साहेब तुमचा हा लेख आज प्रथमच वाचत आहे. जवळजवळ दोन वर्षांपूर्वी ह्याच थीमवर तुम्ही हा लेख लिहिलात हे समजल्यावर आनंद झाला. मी कित्येक दिवस असा लेख लिहू की नको असा विचार करीत होतो, शेवटी लिहूनच टाकला. आपल्या विचारातील समानता बघून गंमत वाटली.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
15 Aug 2021 - 1:01 pm | कुमार१
आवडले !
16 Aug 2021 - 11:45 am | राजेंद्र मेहेंदळे
एकदम सहमत!! प्रत्येक प्रसंगाशी एक गाणे(किवा उलट म्हणुया हवे तर) जोडलेले असते. आणि नंतर कधीही ते गाणे लागले की तो प्रसंग/व्यक्ती आठवतात.
एका पावसाळी कुंद दिवसात कोकणात एका घरी पाहुणा गेलो होतो. ओसरीवर पागोळ्यांचे आवाज ऐकत बसलो असताना घरातील कोणीतरी छोटी मुलगी "पंछी,नदीया पवन के झोके" हे गाणे गात बसली होती. ते डोक्यात कोरले गेले आहे.
ट्रेक मध्ये म्हटलेली अनेक गाणी, ट्रेकला जाता येताना बस किवा ट्रेन् मध्ये एक कोपरा पकडुन घसा फाटेपर्यंत म्हटलेली गाणी,कोणालातरी इंप्रेस करण्यासाठी म्हटलेली हळुवार गाणी यावर एक लेखच होईल :)
16 Aug 2021 - 11:09 pm | गॉडजिला
तेंव्हा वाटसप मोबाईल सोशल नेटवर्क असे काहीच उपलब्ध नसल्यानें गाणी हा फ्लर्ट करायचा एकमेव राजमार्ग होता :)
16 Aug 2021 - 11:05 pm | सौन्दर्य
राजेंद्र जी, मग लिहून टाका न एक लेख. आम्हाला वाचायला आवडेल. प्रतीक्षेत आहे.
कुमार जी, धन्यवाद.
18 Aug 2021 - 8:52 pm | मदनबाण
लेखन आवडले...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vijanasurabhi | Bachelor Party |
18 Aug 2021 - 10:02 pm | चौथा कोनाडा
मस्त, फर्मास लेख ! वाचताना मलाही काही गाणी आठवली !
सुबक ठेंगणीचा किस्सा भारी आहे ... हा .. हा ... हा .... !