माझे दहावीपर्यंतेच शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झाले, म्हणजे अगदी विज्ञान सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो. न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करण्यापेक्षा Newton’s law of motion पाठ करणे सोपे आहे हे अकरावाव्या वर्गात समजले. बऱ्याचदा असे वाटते स्वादुपिंड, यकृत, आतडे, जठर यात अडकून जर गोंधळ झाला नसता तर मी आज इंजीनियर होण्याऐवजी डॉक्टर झालो असतो. आता जरतरला काही अर्थ नाही. माझा इंग्रजी माध्यमाचा पहिला तास आजही आठवतो. अकरावीचा गणिताचा तास होता. सर Logarithm शिकवत होते. सरांनी फळ्यावर an असे लिहिले आणि याची फोड करुन सांगा असे विचारले. मी आपला आधी मराठी भाषेत विचार केला
“a चा घात n बरोबर a गुणिले a गुणिले a … असे n वेळा.” मग त्याचे इंग्रजीत भाषांतर केले
“a’s exponent n is equal to a multiplied by a multiplied by a ….. n times.” वाह आले. हाय काय नाय काय. लगेच हात वर केला. सरांनी माझ्यासारख्या दुर्लिक्षत कराव्या अशा काळतोंड्या बारक्या मुलाकडे पूर्ण दुर्लक्ष करुन अकरावीला असून सुद्धा फक्त वर्गातच लक्ष असनाऱ्या मुलीला विचारले. ती कॉन्व्हंटची मुलगी तिने स्टेनगन मधून फायरींग सोडल्यासारखे उत्तर दिले.
“a to the power n equal to a into a into a into a..... n times.”
तिची स्टेनगन ज्या वेगात फायरींग करीत होती त्यावरुन माझ्यासारख्या गाढवाला काही बोध होणे शक्यच नव्हते पण माझा आत्मविश्वास उगाच बोलून गेला हीचे चुकले. आता आपली संधी म्हणून सचिन तेंडुलकरच्या आत्मविश्वासाने मी माझा हात अजून उंच केला. परंतु सरांनी तिला Excellent असे म्हणता क्षणी माझा आत्मविश्वास सचिन तेंडुलकरवरुन यजुवेंद्र चहालवर घसरला. चहालला जर का ताजतवान्या शोएबचा पहिला बॉल खेळायला सांगितले तर त्याचा जो आत्मविश्वास असेल त्या स्तरावर माझा आत्मविश्वास घसरला होता. त्यानंतर सरांनी जे शिकवले ते मी विचार करीत होतो तसेच होते तरी मघाच्या उत्तराचा काही उलगडा होत नव्हता. भाषेवरुन गणिताच्या तासाला गोंधळ होण्याचे ते कदाचित पहिलेच प्रकरण असावे. पुढे जाऊन या साऱ्याचे अर्थ लागले, गणितिय इंग्रजी भाषेत multiplied ऐवजी into वापरतात आणि exponent ऐवजी to the power वापरतात. परंतु तेंव्हापासून बोलायची, वापरायची, उच्चारायची इंग्रजी भाषा आणि लिहायची, पुस्तकातील इंग्रजी भाषा यातल्या फरकाचा मोठा धसका घेतला. मला तर इंग्रजी शब्दांचे लांबलचक स्पेलिंग पाठ करणे ते शब्द उच्चारण्यापेक्षा सोपे वाटत होते.
एखादा कठीण शब्द आहे तो उच्चारायला त्रास होत आहे तर ते ठीक आहे पण बऱ्याचदा तर लहान असल्यापासून जे आंग्ल शब्दोच्चार संस्कार झाले त्यावरच घाला घातला जातो . मग माझे डोक भडकते आमचे शिक्षण वाया गेले की काय अशी भिती वाटायला लागते. मी ते नाटॅठोम आणि कटाप बद्दल बोलत नाही. कुणी खेळायचा नियम तोडला तर त्याला किती आत्मविश्वासाने सांगायचो तू खेळातून कटाप. कधी साधा विचार सुद्धा आला नाही कि ते कटाप नाही Cut Off आहे आणि ते नाटॅठोम Not at home आहे. आजही कुणाला खेळातून कटाप करण्यात जी मजा आहे ना ती Cut Off करण्यात येत नाही. O हे अक्षर असेल तर त्याचा उच्चार तोंड फाडून ऑ असा करायचा उदा. ऑस्ट्रीच, ऑकरा पण नाही आता सांगतात की त्याचा उच्चार ओस्ट्रीच ओकरा असा करा. बाकी त्या भेंडीला कुणी ओकरा ऐवजी लेडीज फिंगर म्हटले तर भारत सोडून सारेच कोण हा मनुष्य भक्षक प्राणी आला म्हणून बघतील. जगात भेंडीला लेडीज फिंगर म्हणत नाही.
इंग्रजी भाषेची मुळातच गोची आहे असे वाटते. आपण ज्याप्रकारे शब्द प्रोनॉउंस करतो त्याला प्रोनॉउंसियेशन असे म्हणत नाही तर प्रनंसियेशन म्हणतात. आपले असे नाही आपण शब्दाचा उच्चार ज्याप्रकारे करतो त्याला उच्चार असेच म्हणतो उगाच उच्चर किंवा उच्चीर म्हणत नाही. जिथे मुळातच इतका गोंधळ आहे तिथे पुढे गोंधळ असनारच. इंग्रजी शब्दोच्चारातील चुका काढण्यात कॉन्व्हंट (याला सुद्धा खूप दिवस मी कॉनमेंट म्हणत होतो) शिक्षित मित्रमैत्रीणी नेहमी पुढे असतात. माझी मुंबईची मैत्रीण होती तिला माझ्या साऱ्याच उच्चारात चुका दिसायच्या त्याला भाषेची अट नव्हती. मराठीसाठी माझ्याकडे सरळ उत्तर होते. तू असशील दादर हिंदू कॉलनीतली मी विदर्भातील वऱ्हाडी आहे मी असाच बोलनार. इंग्रजीबाबत हा नियम लागत नाही काही झाले तरी ती जागतिक भाषा आहे. एक दिवस सकाळी मी सहज म्हटले
“चल ब्रेकफास्ट करुन येऊ” त्यावर तिचे लगेच उत्तर होते
“गाढवा ब्रेकफास्ट नाही ब्रेकफस्ट असते ते”
“काही काय मग तुम्ही फास्टींगला फस्टींग का नाही म्हणत?”
“ह्या आला मोठा शहाणा” आला मोठा शहाणा हे मुलीने मुलांना गप्प करायचे ब्रम्हास्त्र वापरुन तिने मला गप्पा केले असले तरी माझे लॉजिक चुकीचे नव्हते. त्यानंतर जीभ कधी ब्रेकफास्टकडे वळली तर कधी ब्रेकफस्टकडे वळली. नाव काही घ्या हो शेवटी खायचे इडलीदोसा किंवा पोहेच ना. ब्रेकफास्टला ब्रेकफस्ट म्हटले म्हणून आपण दोशाएवजी पॅनकेक खातो का? एकदा आम्ही जेवायला गेलो असताना मी विचारले.
“डेझर्टमधे काय आहे?” लगेच एक मित्र म्हणाला
“सँड, वाळू” सारी मुलं हसायला लागले
“हे बघ जर का तुला डिझर्टमधे आईसक्रिम खायचे नसेल ना तर वुई विल डिझर्ट यू इन डेझर्ट” डेझर्टमधे वितळनाऱ्या आईसक्रिमसारखा मी रागाने वितळत होतो माझ्या त्या मित्रमैत्रीणींना त्याचे काही नव्हते.
इंगजीवरुन इंग्रजांपेक्षाही भयंकर षडयंत्र ही इंग्रजी माध्यमातील शिक्षित मित्रमैत्रीणी करीत असतात. षडयंत्राचा इंग्रजी शब्द कू(Coup) तो सु्द्धा एका षडयंत्रापेक्षा कमी नाही. लहान असल्यापासून शिकलो होते की काही शब्दांच्या सुरवातीलाच जर का P असेल तर त्याचा उच्चार मूक असतो. उदा. Psychology, Pneumonia अगदी चुपके चुपके चित्रपटात सुद्धा त्याचा खूप चेष्टा करुन झाली होती. शब्दांच्या शेवटी P असेल तर त्याचा उच्चार सुद्धा मूक असू शकतो हे नवलच होते. या नियमाने मॅप म्हणजे मॅSS टॅप टॅSS असे होईल परंतु इंग्रजीत एक नियम सर्वत्र लागू होत नाही. मूक उच्चार हे एखाद्या सिक्रेट कोड सारखे आहे, कोणत्या अक्षराचा उच्चार मूक आहे हे बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला कळले की झाले त्यासाठी काही नियम असा नाही. Castle मधला T किल्ल्यात बंदिस्त असतो म्हणून उच्चारायचा नाही तर Whistle मधला T हवेत उडून जातो. मॉरगेज (Mortgage) T गहाण असतो तर लॉज (Lodge) मधला D झोपला असतो. लहानपणी वारंवार मार खाऊन मी ऑफ्टन चा उच्चार ऑफन असा करायला शिकलो तर मोठे झाल्यावर बघितले माझा गोरा मित्र ऑफ्टन म्हणत होता. त्याने मला सांगितले की त्यांच्या इंग्रजी भाषेत तसा उच्चार चालतो. रिसीप्ट की रीसीट असा गोंधळ उडाला की मराठीतली रशीद सोपी वाटते. क्लॉदेस नाही तर क्लोद्स E सायलेंट, कपबोर्ड नाही तर कबोर्ड P सायलेंट. मी लहानपणापासून प्लम्बर असाच उच्चार करीत आलो आहे आता तुम्ही म्हणाल ते प्लम्बर नाही प्लमर असते तर मग प्लंम्बर मधल्या B ला संडासात फ्लश करायचे का? शक्य नाही हो ते आता. पार्किंग च्या ठिकाणी मला नेहमी वाटायचे सारेच कसे स्पेलिंगमधे चुका करु शकतात. Wallet Parking असे लिहण्याऐवजी Valet Parking असे कसे लिहिले असते. नंतर कळले की W वाले Wallet आणि V वाले Valet वेगळे असते इतकेच नव्हे तर त्याचा उच्चार सुद्धा वॅले असा आहे त्यातला T बॅले डांसमधल्या T सारखा कुणीतरी पळवून नेला आहे. तसाच आणखीन एक गोड गैरसमज होता आपण लग्नात फुकटात उभ्या उभ्या जे जेवतो तो बुफे आणि हॉटेलात पैसे देऊन खातो तो बफेट लंच. कितीतरी दिवस मी बुफे हा मराठी शब्द आहे असेच समजत होतो. आता कळले तो मराठी नाहीतर इंग्रजी शब्द आहे दोन्हीचा अर्थ एकच आहे. दोन्ही कडे तो T जेवणासोबत गिळायचा असतो. कुणीतरी आता बुफेला स्वहस्त भोजन पंगत वगैरे असा भारदस्त मराठी शब्द शोधायला हवा. फॉरेन मधला G मूक असतो. रेइन (Reign) म्हणजे राज्य करने पण त्या राज्यात G ला स्थान नाही. Tough, Island, doubt असे कितीतरी शब्द आहेत ज्यात कुणाचा तरी गळा दाबला गेला आहे. यातील काही लहान असतानाच माहित होते तर काही नंतर समजले. इंग्रजी भाषेत A to Z साऱ्या अक्षरांचा मनाला वाटेल तेंव्हा गळा दाबला जातो. तो गळा दाबायला कसलाही नियम नाही. इंग्रजी भाषेत जेवढे नियम आहेत ना तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त त्या नियमांचे अपवाद आहेत. नियम कोणता आणि अपवाद कोणता हे कळायलाच मार्ग नाही असे असताना नियम बनवताच कशाला देव जाणे.
मधली अक्षरे गिळण्यात फ्रेंच भाषा इंग्रजीच्या खूप पुढे आहे. Bon Voyage, Bon Appetit, Avant garde यासारख्या सुंदर शब्दांची भाषा ती पण उच्चारात मात्र भयंकर कंजुस आहे. फ्रेंच शब्द म्हणजे म्युजियमची भली मोठी इमारत परंतु आत मात्र एकच चित्र असे प्रकरण आहे. फक्त बघून घाम फुटावा अशी भली मोठी स्पेलिंग पण उच्चार मात्र तोंडातून वाफ निघावी इतकाच असतो. इंग्रजी मधे बऱ्याचदा फ्रेंच शब्द येतात. यायलाच हवे वेगवेगळ्या भाषेतील शब्दांमुळे भाषा अधिक समृद्ध होते. किती वर्षे मी रेंडेजवॉयस विथ सिमी गरेवाल वाचत होतो नंतर कळल की त्याचा उच्चार रंडेव्ह्यू असा करायचा असतो. नेहमीप्माणे रेनॉल्ट कारमधल्या T चा गळा दाबून त्याचे रेनॉ असे केलेले आहे. बुके (Bouquet) हाही तसाच फ्रेंच भाषेतून आलेला शब्द या शब्दाचे स्पेलिंग साधे Booke असे करता आले असते पण नाही त्यात नको तेवढी अक्षरे टाकली त्यापेक्षा आपले पुष्पगुच्छ बरे. ब्युरो, शँपेन, शोफर अशी कितीतरी फ्रेंच शब्द इंग्रजी भाषेत आहेत ज्याचे उच्चार छोटे परंतु स्पेलिंग मात्र मोठे आहेत. शँपेनचे स्पेलिंग Shampen केले असते तर त्याच्या चवीत काही फरक पडला नसता. फेसबुकमुळे एक नवीन शब्द समजला RSVP. जो तो सांगायचा RSVP कर, काही दिवस तर हे LOL किंवा ROFL यातलेच प्रकरण आहे असेच वाटत होते. आंतरजालावर शोध घेतला असता कळले RSVP म्हणजे Répondez s’il vous plaît याचा उच्चार कसा करतात माहित नाही. यापलीकडे जर का कुणी RSVP म्हटले ना तर त्याला सांगनार आहे बाबा रे आधी मूळ फ्रेंच वाक्यप्रचाराचा उच्चार करुन दाखव नंतरच मी तुझ्या आमंत्रणाला उत्तर देतो. एक मात्र खरे इंग्रजीत जर फ्रेंच शब्द नसते तर मजा आली नसती. फ्रेंच भाषेमुळे इंग्रजीला सांस्कृतीक इतिहास आहे असे वाटते. मला राग येतो त्या लांबलचक स्पेलिंगचा. ज्या अक्षरांचा उच्चार करायचा नाही ती अक्षरे स्पेलिंग पाठ करताना मुलांना घाम फुटावा आणि त्यामुळे शिक्षकांना मुलांना कुटुन काढायची संधी मिळावी याच कारणाने दिली असतात असेच वाटते. कधी कधी तर असे वाटते की राजा बोलेल ती दिशा या न्यायाने राजा बोलेल तो शब्द असे प्रकरण आहे . शब्द लिहिला राजाला वाचायला दिला त्याने जसा वाचला तसा त्याचा उच्चार. राजाला लांबलचक स्पेलींगमधे जी अक्षरे वाचायचा कंटाळा आला तर त्यांचे उच्चार मूक. असो मूक अक्षरांचे बोलके पुराण आता खूप झाले.
आता आता कुठे मी वोल्क्सवॅगन नाही तर फोक्सवॅगन म्हणायला शिकून माझा आत्मविश्वास काहीसा वाढवला होता पण चुका काढणारे माझ्या आत्मविश्वासावर टपलेलेच असतात. अशांनी माझा आत्मविश्वास जितका कमी करात येईल तितका कमी केला होता. आत्मविश्वासाची ऐशीतैशी करण्यास फक्त बाहेरचेच कारणीभूत असतात असे नाही घरचे सुद्धा तितकेच कारणीभूत असतात. मी म्हणालो
“चला आज हॉटेलात जेवायला जाऊ”
“बाबा हॉटेलात जेवायला नाही राहायला जातात.”
“मग जेवतात कुठे रस्त्यावर”
“रेस्तराँट् मधे.” रेस्टॉरंटं नाही. बाहेरच्या देशात गेल्यावर आपल्यासारख्या Hotel अशा पाट्या न दिसता जिकडे तिकडे फक्त Restaurant अशा पाट्या का दिसतात याचे उत्तर मला पोरं झाल्यावर सापडले होते. अजूनही लॉजिंग आणि बोर्डिंगमधे नक्की फरक काय आहे ते कळत नाही त्यात आता हा हॉटेल आणि रेस्तराँट् मधला फरक लक्षात ठेवा. मीच काय आमच्या अख्खा खानदानात कोणी कधी बाहेरगावी गेला तर राहिला धर्मशाळेत, चहा पिला किंवा खाल्ले हॉटेलात आणि जेवला खाणावळीत. कुणाच्या बापाची कधी रेस्टॉरंटमधे जाऊन जेवायची हिंमत झाली नाही. एक दिवस बायकोने आदेश दिला पोरांचा अभ्यास घे. मी मुलाला म्हणालो
“कोणती टेस्ट आहे?”
“इंग्रजी”
“चल पोयम म्हण”
“पोयम नाही बाबा पोम असत ते” थंडी होते आणि गरमी वाजते असे धेडगुजरी मराठी बोलणारी ही पिढी माझ्या इंग्रजी उच्चारातील चुका काढत होती. मी दरडावून विचारले.
“तुझ्या बापान पायल का बे?” बापानेच बाप काढल्यावर पोरगा काय बोलणार. मी लहान असल्यापासून हातावर छड्या खात ज्या पोयम पाठ केल्या त्या साऱ्या वाया गेल्या का? कोण ठरवत हे शब्दांचे उच्चार त्यांना भर चौकात चाबकाचे फटके देऊन उच्चार करायला सांगायला हवे मग समजेल कोणत्या शब्दांचा काय उच्चार असतो ते. आता मी ठरविले आहे माझा आत्मविश्वास ढासळू देण्याची संधी द्यायची नाही. आपल्याला जे योग्य वाटते ते बोलायचे. होतील चुका तर होतील करु नंतर दुरुस्त. म्हणून म्हणतो हे इंग्रजी माय माफ कर… यापुढे मी मला वाटते तसेच बोलणार. चूक भूल पदरात घे.
(लेखाचा उद्देष कोणत्याही भाषेची खिल्ली उडवावी असा नाही तर आलेले अनुभव गमतीने मांडण्याचा एक प्रयत्न आहे.)
मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
प्रतिक्रिया
10 Aug 2021 - 11:13 am | सौंदाळा
मस्त, खुसखुशीत
अकरावीला मराठी माध्यमातून इंग्लिश मिडियम मधे जाणर्यांचा प्रातिनिधिक अनुभव
10 Aug 2021 - 11:32 am | योगेश कोलेश्वर
लेख आवडला ...
10 Aug 2021 - 11:46 am | टवाळ कार्टा
माझे डिप्लोमाचे पहिले सेमिस्टर आठवले....पहिला महिना फक्त मराठीत माहित असलेल्या गोष्टींना इंग्रजीत काय म्हणतात ते समजण्यातच गेला...एक गणित तेव्हडे आठवडाभरात पटकन जमले कारण त्यात अंक आणि चिन्हे असतात...बाकी बोंब होती....सेमिस्टरच्या शेवटी चेमिस्ट्रीची व्हायवा अक्षरशः हिंदीतून दिलेली (केमिकलची नावे सोडून)
याबाबतीत सेमी-इंग्रजी माध्यम हा सुवर्णमध्य वाटायचा...पण आता इंग्रजी माध्यमाची कॉन्व्हेंट नसलेली शाळा बरी असे वाटते
10 Aug 2021 - 11:58 am | खेडूत
झकास, आवडला.
असाच देश एका डॉक्टरला मुकला, कारण बॉटनीच्या बाई पंच्याहत्तर मुलंमुली असलेल्या वर्गात अचानक उभे करून कसली कसली पाना फुलांची ग्रीक, रोमन नावं विचारत. आम्ही कलटी मारून जीवशास्त्र सोडून इलेक्ट्रॉनिक्स घेतलं!
गावातल्या शाळेतून कर्हाड सारख्या मोठ्ठ्या (!) शहराच्या कॉलेजात या इंग्रजीने बावरून जायला होई. (दहावी बोर्डात इंग्रजीला ९५ असून!)
10 Aug 2021 - 11:06 pm | कासव
:)
11 Aug 2021 - 2:22 pm | खेडूत
दोन्ही नाही, आमच्या काळात फक्त 'सायन्स कॉलेज कर्हाड'. :)
10 Aug 2021 - 12:01 pm | कुमार१
लेख आवडला .
10 Aug 2021 - 12:10 pm | ज्ञानोबाचे पैजार
खरेतर स्वातंत्र्यलढा इंग्रजांपेक्षा ईंग्रजीची विरुध्द लढला असता तर बरे झाले असते. बालपणीच्या अनेक आनंदांना आम्ही मुकलो नसतो.
इंग्रज भारत सोडून गेले तरी इंग्रजी हद्दपार झाली नाही. उलट ती राजाची आवडती राणी होउन बसली आहे.
अजूनही मलविसर्जन करायला जाताना टॉयलेट ला जायचे? वॉशरुम मधे जायचे? लॅटरीन ला जायचे? का टु नंबरला जायचे? हे न समजल्याने बर्याच वेळा पोट दाबून बसावे लागते.
पैजारबुवा,
10 Aug 2021 - 2:19 pm | मित्रहो
धन्यवाद पैंजारबुवा
मलविसर्जनला वॉशरुम मधे गेलो तर तिथे त्यांच्या देशात पाणी नसते. तरी त्याला वॉशरुम म्हणतात.
या साऱ्या प्रक्रियेला मोशन म्हणतात मग कायनेटिक एनर्जी म्हणजे नक्की काय .
10 Aug 2021 - 1:16 pm | अनन्त्_यात्री
इंग्रज भारत सोडून जाण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे इंग्रजी भाषेवर भारतीयांकडून सतत होणारे अनन्वित अत्याचार. ते इथून गेले, सुटले.. पण आम्हा भारतीयांची ही सवय जाणं कठीणेय.
11 Aug 2021 - 1:24 pm | सामान्यनागरिक
हल्ली जे लोक असे धेडगुजरी शिक्षण घेऊन नोकरी/धंदा करतायत /शिकवतायत आणि आपापल्या क्षेत्रात उच्च पदांवर पोचले आहेत. आता त्याच्या बरोबर काम करणारे किंवा शिकणारे आता अजुनच भयंकर लुकलुकणारे दिवे लावतायत !
जर आपल्या पिढीत जे झालं त्याला तुम्ही अत्याचार म्हणत असाल तर आजचे लोक जे बोलतात ते ज्यु लोकांवर छ्ळ्छावणीत झालेल्या अत्याचारां पेक्षा भयंकर असेल
10 Aug 2021 - 2:00 pm | सरिता बांदेकर
मस्त लिहीलंय.उच्चाराच्या बाबतीत मला पण कुठून आलीय ही असं बघतात.
माझे शालेय शिक्शण पण मराठीत झालंय.
शालेय निरोप समारंभात शिक्शकांनी सांगितले पहिली सेमिस्टर लेक्चरर काय बोलतात ते लक्श देऊन ऐका नाहीतर सगळं डेक्यावरून जाईल.
त्याची आठवण झाली.
10 Aug 2021 - 2:01 pm | सरिता बांदेकर
मस्त लिहीलंय.उच्चाराच्या बाबतीत मला पण कुठून आलीय ही असं बघतात.
माझे शालेय शिक्शण पण मराठीत झालंय.
शालेय निरोप समारंभात शिक्शकांनी सांगितले पहिली सेमिस्टर लेक्चरर काय बोलतात ते लक्श देऊन ऐका नाहीतर सगळं डेक्यावरून जाईल.
त्याची आठवण झाली.
10 Aug 2021 - 2:02 pm | चौकस२१२
जगभर पसरल्या इंग्रजीतहि गमती आहेत, मग त्यातील अगम्य अश्या उच्चार पद्धती !
ऑस्ट्रेलियातील सांगतो
H या अक्षराचा उच्चार एच कि हेच ? येथेही दोन गट आहेत
10 Aug 2021 - 2:23 pm | मित्रहो
सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद
धन्यवाद सौंदाळा, योगेश कोलेश्वर, टवाळ कार्टा, खेडूत, कुमार१, पैंजारबुवा, अनन्त्_यात्री, सरिता बांदेकर, चौकस२१२
10 Aug 2021 - 2:37 pm | उन्मेष दिक्षीत
अभिषेक उपमन्यु चा विडिओ बघितला नसला तर बघा.
10 Aug 2021 - 3:01 pm | गॉडजिला
उत्तरोत्तर झकास पंचेस रंगत गेले...
रेंडेझेवीअस विथ सिमी हा मलाही नंतर रांदेवु विथ सिमी आहे कळाले आज ते रंडेव्ह्यू आहे हे समजले.
-(क्सी जिनपिंग शी जिनपिंग कसा या विचारतील) गॉडजिला
10 Aug 2021 - 3:07 pm | कंजूस
आमच्या एक बाई इंग्लंडला जाऊन आल्यावर त्यांनी
फारमर नाही, फाssमंss,
टीचर नाही टीsssचं. वगैरे सुरू केलं.
मग सर्व शाळेभर टिंगल सुरू.
लेख भारी झाला.
10 Aug 2021 - 9:13 pm | गॉडजिला
हे अनुस्वार देत तोंड दाबून इंग्रजी बोलले की झाला ब्रिटिश असेंट, हे हॅरी पॉटर ने शिकवलं... शाळेत इंग्रजीचा आणि आमचा काही संबंधच आला नाही, तेंव्हां पास तरी कसे झालो इंग्रजीमधे हे आता मलाच पडणारे कोडे आहे...
10 Aug 2021 - 4:19 pm | Bhakti
मराठी मेडियमवाल्यांना इंग्रजी खुप त्रास देते.एका प्रक्टिकलला "वाईप वर्किंग प्लटफार्म फर्स्ट" असं लिहिलं होतं, काही समजलं नाही म्हणून पंधरा मिनिटे तशीच बसून होते,मग इन्चार्जने अर्थ सांगितल्यावर डोक्यावरचं हात मारला.principal आणि principle या शब्दात अजून गल्लत करतात,मला माझ्या सरांनी सांगितले होते डोक्यात पडते ती पाल pal आणि ple वेगळं आहे.
10 Aug 2021 - 4:46 pm | अकिलिज
आमच्या गृपमधलीला बाकीच्यांनी 'मुफीन' नांव पाडलंय, कारण ती स्पेलिंगप्रमाणे एकदा तसं म्हणाली होती. ईथे बोलणर्यांपेक्षा टिंगल करणार्यांचीच चलती आहे. खरे तर मराठी मिडीयम मध्ये शिकवणार्यांनी तसेच शिकवले असेल किंवा ठरविक गोष्टींशी संबंधच पहिल्यांदा आला असेल हे कोणी समजूनच घेणारं नाहीये. आम्हाला शिकवताना 'आयदर ऑर' शिकवलं होतं. आता कितीही 'ईदर नीदर' म्हणाला तरी जीभेवर रूळावयाला किती वेळ लागेल माहीती नाही.
10 Aug 2021 - 5:14 pm | कंजूस
Into म्हणजे multiply हे एक इ्ंग्रजी जाणणाऱ्यांनी चुकीचं समजावलेलं प्रकरण होतं.
ते १९८५ मध्ये COBOL कंपुटर भाषा शिकताना समजलं .
Divide 3 into 22 चं उत्तर 7 ??
4 into 25 चं उत्तर 6 ??
( 100 नाही.)??
हे काही समजेना. नंतर into ची चूक कळली.
3 { divides} into 22 {is} 7{ times}
4 {goes} into 25 {6 times and remainder} is 6
COBOL मध्ये शुद्ध इंग्रजित कमांडस लिहिता येतात.
11 Aug 2021 - 11:04 am | मराठी_माणूस
व्वा. फार वर्षांनी COBOL ची आठवण झाली.
10 Aug 2021 - 5:20 pm | Rajesh188
व्याकरण म्हणजे त्या भाषेचे नियम.आणि व्याकरण चे नियम मोडून जे उच्चार केले जातात त्याला अशुद्ध उच्चार असेच म्हणावे लागेल.
फुकटची थेर आहेत ती..
10 Aug 2021 - 9:15 pm | गॉडजिला
मातृभाषेवर अत्याचारच नाही ?
10 Aug 2021 - 7:03 pm | मदनबाण
सुरेख लेखन...
किती वर्षे मी रेंडेजवॉयस विथ सिमी गरेवाल वाचत होतो नंतर कळल की त्याचा उच्चार रंडेव्ह्यू असा करायचा असतो.
मी तो पहिल्यांदा रांडेव्ह्यू असा केला होता ! :)))
मला अजुनही आरनॉल्डचे [ टर्मिनेटर] आडनाव उच्चारता येत नाही, स्पेलिंग तर फार लांबची गोष्ट राहिली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre
10 Aug 2021 - 7:13 pm | कंजूस
शेजवानकर?
10 Aug 2021 - 8:04 pm | मदनबाण
शेजवानकर?
व्हय... आरनॉल्ड श्वार्ज़नेगर
मला श्वान असेच आणि इतकेच इच्चार करता यायचे ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre
10 Aug 2021 - 9:17 pm | गॉडजिला
शिवाजीनगर, असा आमचा बालपणीचा प्रयत्न...
10 Aug 2021 - 7:50 pm | मित्रहो
सर्वांना मनापासून धन्यवाद!
धन्यवाद उन्मेष दिक्षीत, गॉडजिला, कंजूस, Bhakti, अकिलिज, Rajesh188, मदनबाण,
@ उन्मेष दिक्षीत विडियो लिंकबद्दल धन्यवाद. मी बघितला नव्हता. आता बघितला, मस्त आहे.
@ गॉडजिला, @मदनबाण योग्य उच्चार तर मलासुद्धा नक्की माहिती नाही. आमच्या इथे हैदराबादला एक त्याच नावाचे रेस्तराँट् आहे. मित्र परिवार तो शब्द ज्या प्रकारे उच्चारतात त्यावरुन मी अंदाज बाधंला. मी रांदेवू, रँडेव्यू हे उच्चार सु्द्धा ऐकले.
@कंजूस मी तरी Divide into ऐकले नव्हते. आज समजले.
@अकिलिज इदर निदर प्रकरण उच्चारायला सुरवातीला त्रासच गेला. हळूहळू सवय झाली. तसेच आताचे क्वारंटाइन कि क्वारंटीन मी तरी सुरवातीला टारपेंटाइन सारखे क्वारंटाइन करीत होतो नंतर क्वारंटीन करायला लागलो. शेवटी राहायचे घरातच आहे.
@Rajesh188 खर आहे. थेर आहेत म्हणून तर गंमत आहे. खूप भाषेतून शब्द इंग्रजीत आल्याने नियमांना अपवाद खूप असतात
10 Aug 2021 - 9:18 pm | तुषार काळभोर
एकदम मस्त लेख. वाचता वाचता नॉस्टॅल्जिक झालो.
पाचवीला एकदा शब्दांची लघुरूपे शिकवताना सगळ्यांना एकेक शब्द वाचायला सांगितला होता. एकानं Gent's = Gentlemen's Lavatory चा उच्चार जंटलमेन्स लवस्टोरी असा केलेला.
..
अकरावीला बायोलॉजी शिकवणाऱ्या विदुषीने "गो टू द लास्ट बेंच अँड स्टॅण्ड अप देर" असं सांगितल्यावर बोटांच्या दिशेने मागे जायचं हे कळलं, पण उत्तरार्ध न कळल्याने मी शेवटच्या बाकावर बसलो. मग माझंच जर्नल माझ्याच डोक्यात घातलं होतं.
..
मगरपट्टा सिटी होईपर्यंत हडपसर हे गाव होतं. त्यामुळे उच्चार (अजून) गावठी आहेत. इंजिनियरिंग ला गेल्यावर ज्यांच्याशी मैत्री झाली ते पुण्याच्या पूर्व भागातील मध्यमवर्गीय कॉन्व्हेन्ट वाले. सेंट पॅट्रिक, ऑर्नेला, विन्सेंट, मेरीज चे. आणि त्यांच्यासोबत दोन इंग्रजी माध्यमवाले दिल्लीकर. सुदैवाने कोणीही मला त्यांच्यात घेण्यात, बोलण्यात, बरोबर फिरण्यात टाळलं नाही. प्रचंड सांभाळून घेतलं. डाय अनादर डे हा पहिला इंग्लिश पिक्चर त्यांच्यासोबतच वेस्ट एन्ड ला पाहिला. त्यांच्यासोबतच इंग्रजी पेपर, मासिकं, पुस्तकं, कादंबऱ्या वाचायची सवय लागली. त्यांच्या सोबतच मॉल मध्ये जायला शिकलो. आताही कुठेही सराईता सारखं वावरता येतं, तो आत्मविश्वास त्याच कॉन्व्हेन्ट च्या मित्रांनी दिला.
..
पोम' विषयी आजच कळलं आणि अजून काहीच शिकलो नाही हे कळलं :)
अवांतर:
एक सायलेंट विनोद.
A blonde gets an opportunity to fly to a nearby country. She has never been on an airplane anywhere and was very excited and tense. As soon as she boarded the plane, a Boeing-747, she started jumping in excitement, running over seat to seat and starts shouting, "BOEING! BOEING!! BOEING!!! BO....."
She sort of forgets where she is, even the pilot in the cock-pit hears the noise. Annoyed by the goings on, the Pilot comes out and shouts "BE SILENT!"
There was pin-drop silence everywhere and everybody is looking at the blonde and the angry Pilot. She stared at the pilot in silence for a moment, concentrated really hard, and all of a sudden started shouting,"OEING! OEING! OEING! OE...."
10 Aug 2021 - 8:05 pm | कॉमी
मस्त लेख. तुमचा लेख वाचून मी स्वतःच्या आणि इतरांच्याही उच्चारांबद्दल आजिबात अवेअर नाहीये असे जाणवत आहे.
आपल्याला मारून मुटकून उच्चार शिकवणारे कोणीही शिक्षक नव्हते हे भाग्यच म्हणायचं. इंग्रजी शिरेल बघून इंग्रजी बोलणे शिकलो. नरेंद्र जाधवांच्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर- "मदर फादर आणि चादर एकत्र गुंडाळणाऱ्या शिक्षकाकडून नाही, फारीन साहेबांकडून इंग्रजी शिकलो".
10 Aug 2021 - 8:45 pm | कॉमी
ह्या धाग्यावरून आठवलं, वेगवेगळ्या (फ्रेंच, स्पॅनिश, इंग्लिश) भाषांवरून हा माणूस छान विनोदी लहान लहान व्हिडीओ बनवतो.
https://youtube.com/shorts/tPQbnLLDpts?feature=share
10 Aug 2021 - 9:40 pm | गॉडजिला
सबटायटल बघूनच इंग्रजी जमू लागले...
त्यांच्या उच्चारायचे निरीक्षण होऊ लागले
म्हणजे अमेरिकेत aeiou स्पेलिंगमध्ये जसे च्यां तसे म्हणायचे असतात जसे a पासून शब्द सुरू होत असेल तर ॲ नाही ए म्हणायचे Apple म्हणजे ऍपल न्हवे एपल म्हणायचे
I जिथे जिथे असेल व त्याच्या मागे पुढे e नसेल तर तिथं आय असे उचारायचे, म्हणजे fight = फाईट नाही फाआयट म्हणायचे इथे i+e एकत्र मोघम शॉर्ट म्हणून फाईयट प्रोनांस करायचे. I chya मागे अन पुढे e तर मात्र आय नाही इ असेच म्हणायचे... अमेरिकन इराक न्हवे आयराक का म्हणतात ते समजले आयरएक र+ए शॉर्ट.
E चा वापर जोर देऊन e उच्चार करायला होतो म्हणजे phebe म्हणजे फेबे न्हवे फ इ ब इ म्हणजेच फिबी. O जर e च्या आधी असेल तर ओ सायलेंट म्हणजेच फोनिक्स न्हवे फिनिक्स
असे अनेको नियम फक्त संवाद ऐकुन समजू लागले, मग लक्षात आलं अमेरिकन उच्चार वेगळे, ब्रिटिश वेगळे आफ्रिकन वेगळे किंबहुना जगातील प्रत्येक व्यक्ती ज्या मातृभाषेत इंग्रजी शिकते त्याच्या स्पेलिंग प्रमाणे शब्दाचा उच्चार करते...
शाळेत मराठीतून ईंग्रजी शिकताना मराठीदायक ईंग्रजी आपण शिकलो म्हणजे midas. =मिडास मआयडस न्हवे...
आता मात्र मला बरेचं इंग्रजी असेंट सहज कळतात, अगदी गाणी ऐकताना देखील सबटायटल अनोइंग वाटतात...
10 Aug 2021 - 9:50 pm | गॉडजिला
अजून एक नियम Q ने सुरू होणाऱ्या शब्दात नंतर हमखास u हेच अक्षर असते आणि ते क्व अथवा कॉव असे उच्चारतात जसे क्वेश्चन अथवा कॉवेशश्चन
U पासून सुरु होणारे शब्द अं उच्चाराने सुरू होतात जसे अंब्रेला अंब्रिज
जरा मराठीचे कंडिशनिंग दूर केले की ईंग्रजी अनुस्वार, आकार, उकार रफार, आणि इतर बाबींसाठी चिन्हे न्हवे अक्षरांचा वापर करते ते समजायला सुरुवात होते... मग लक्षात येतं ईंग्रजी जमायला शाळेत तर अजिबात जायची गरज नाही.
मी आधी इंग्रजी अक्षरे लिहायला शिकलो, मग ऐकायला, नंतर इंग्रजीतून विचार करायला आणि सर्वात शेवटी ईंग्रजी पुस्तकं वाचायला शिकलो. तो पर्यंत हिंदी डबिंग अथवा अनुवादित पुस्तकांवर भर होता
11 Aug 2021 - 12:58 pm | शाम भागवत
ही व त्याच्या वरती असलेल्या प्रतिसादातील जास्तीची माहिती उपयुक्त वाटली व आवडली.
👍
11 Aug 2021 - 7:23 pm | गॉडजिला
यासाठिच संवादासाठि दर्जेदार हेडफोन वापरायचा माझा आग्रह असतो... हलकेसे अक्शर देखिल व्यवस्थित पुर्णपणे मेंदुमधे घुसते आणि सबटायटल सोबत विश्लेशण सुरु होते पुढे पुढे मेंदु इतका तयार होतो की सबटायटल्स वाचणे सोडा दिसणे देखिल रसभंग करणारे होउ लागते...
10 Aug 2021 - 9:25 pm | धर्मराजमुटके
एव्हढे निराश व्हायचे कारण नाही. इंग्रजी आपली मातृभाषा नाही. समोरच्याला हे कळत असते. नसेल कळत तर सरळ फाट्यावर मारायला शिकायचे. समोरच्याला गरज असेल तर आपोआप समजून घेतो. सुधारणा जरुर करा पण गंड बाळगू नका.
10 Aug 2021 - 9:46 pm | गामा पैलवान
मित्रहो,
मस्त खुसखुशीत लेख आहे. :-)
इथे इंग्लंडमध्येही लंडनवाले बाहेरच्यांना चिडवतात. कारण काय तर उच्चार गावठी आहेत म्हणून. हा प्रकार जगात सर्वत्र चालतो. फार काय आम्हीही आमच्या बालकाला नीट इंग्रजी बोल म्हणून दटावतो. घरोघरी मातीच्याच चुली.
फ्रेंच उच्चारांवरून इथल्या लोकल इंग्लिश लोकांची एक गंमत आठवली. इथले इंग्लिश लोकं फ्रेंच उच्चारांचा मुद्दाम इंग्लिश उच्चार करतात. म्हणजे depot चा उच्चार डेपो आहे, तर इथले इंग्लिश लोकं मुद्दाम डेपॉट असा करतात. तेच robot म्हणजे रोबॉट च्या बाबतीत. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा ज्या ठिकाणी चालते त्या Rolland Garros चा उच्चार रोलाँ गॅराँ असा आहे. बीबीसी सकट सगळे इंग्लिश लोकं मात्र रोलँड गॅरॉस करतात. अंगात उंगल्या भारी.
आ.न.,
-गा.पै.
12 Aug 2021 - 11:50 am | चौकस२१२
https://www.youtube.com/watch?v=OtQxugFYQqs
हि ब्रिटिश मालिका आठवली ... त्यातील वापरेलली खास इंग्रज भाषा ! हीच एक धमाल
ब्रिटिश विनोदी मालिका उत्तम दर्जाचं नर्मविनोदासाठी प्रसिद्ध त्यातील वातवरण आहे दुसरया महायुद्धातील एक फ्रेंच कॅफे य मालिकेत नक्की कोणाची टर उडवली आहे फ्रेंचांची कि ब्रिटिशाची कि जर्मनांची
याशिवाय पीक पँथर या चित्रपटातील पोलीस हा बेल्जियन आहे आणि त्याने मेसेज ( निरोप ) या शब्दवरून घातलेली गोंधळ.. अगम्य .. लेख आणि दिग्दर्शकाला शत प्रणाम
11 Aug 2021 - 6:38 am | नचिकेत जवखेडकर
मस्त लेख. मला पण नाटॅठोम असाच उच्चार वाटायचा खूप वर्षं..
११वीत असताना आमच्या वर्गात एक आंध्र प्रदेशमधला मुलगा होता. त्याला अजिबातच इंग्रजीचा गंध नव्हता. रोज उशिरा येत असल्यामुळे एकदा फिजिक्स च्या सरांनी त्याला विचारलं, what is your problem? why do you come late everyday? तर तो म्हणाला, सर मैं आंध्रा से आया हूँ !
11 Aug 2021 - 7:20 am | प्रचेतस
झक्कास लेख.
11 Aug 2021 - 9:04 am | कंजूस
सुद्धा शिकून घ्यावं लागतं.
ज्यांना यातल्या संभाव्य चुका माहिती आहेत त्यांनी याचे विडियो युट्यूबवर टाकले पाहिजेत.
उदाहरणार्थ public / people
Back/ backside
Garden/park
Elderly/old
Salary/payment/
Etc.
मराठीत मुलगा/चिरंजीव /कार्ट/कुलदीपक यांचे अर्थ आणि उपयोग वेगळे आहेत.
11 Aug 2021 - 9:15 am | उग्रसेन
इंग्रजी शब्दछल . छानच लेख. लय भारी.
11 Aug 2021 - 11:15 am | मित्रहो
मुलाशी गप्पा मारताना हा विषय सुचला. सहज लिहलेल्या लेखावर खूप छान चर्चा सुरु आहे.
धन्यवाद तुषार काळभोर ( a.k.a. पैलवान ), कॉमी, गामा पैलवान, बाबुराव, प्रचेतस, नचिकेत जवखेडकर, धर्मराजमुटके सर्वांना मनापासून धन्यवाद
@तुषार काळभोर भारी किस्से आहेत. Gentleman's Love story लय भारी. माझ्या मित्रमैत्रीणींनी जितके चिडवले तितकेच सांभाळून सुद्धा घेतले. ते पोम पोरांनी शिकविले.
@कॉमी विडियोच्या लिंकबद्दल धन्यवाद. बघतो आता.
@गॉडजिला खूप छान निरीक्षण. माहितीतले सारे शब्द जे Q पासून सुरु होतात त्यानंतर U येते. U चा उच्चार अ असा शिकल्यान माझा मुलगा लहान असताना गस्ट बेडरुम म्हणायचा.
@ धर्मराजमुटके गंड नाही पण एक भिती असते कुठे काही चुकले तर नाही.
@गामा पैलवान हो सर्वत्र दुसऱ्याच्या उच्चाराला नाव ठेवायची पद्धत आहे.
@ कंजूस हो या शब्दांनमधला फरक समजून घ्यायला हवा. तसेच काही वेळा एकाच अर्थाचे दोन शब्द वापरले जातात. यावर भरपर यु ट्युब विडियो आहेत. आताच OOO मेल बघितले. I will return back on 8/20. यात return म्हटल्यावर back ची गरज नाही.
@ नचिकेत जवखेडकर छान किस्सा आहे. आंध्रमधले H चा उच्चार हेच असा करतात. दक्षिणेत नावात T असेल तर त्यानंतर H लावायची पद्धत आहे. उदा. आपल लताचे स्पेलिंग बहुदा Lata असे करतो. ते Latha असे करतात. मी खूप दिवस ते लाथा असे वाचत होतो. मला कुणीतरी सांगितले होते Th म्हणजे त आणि T म्हणजे ट.
11 Aug 2021 - 7:10 pm | गॉडजिला
आपल्यात काना मात्रा वेलांटी, उकार, अनुस्वार वगैरे वगैरे बाबिंसाठी चिन्हे आहेत इंग्रजीत हे सर्व अक्षरे वापरुनच साध्य करतात... u ने जर स्पेलिगं ची सुरुवात होत नसेल तर तो नेहमीच उच्चारासाठी सपोर्टीव शब्द/असतो त्यामुळे यु असाच उच्चार करुन u नंतर येनारे अक्षर जोडाक्शर धरुन वापरले जाते जसे
guest = गयुईस्ट = यु+इ = ग्युएस्ट म्हनजेच चटकन ग्येस्ट मराठीकरण केले तर गेस्ट.
यु बहुतांश वेळी जोडाक्शराचे काम करते um = युअम = मराठीकरण केले तर अम.
यु ने सुरुवात होत असेल तर मात्र यु जोडाक्षर नाही पुर्ण शब्दाक्षर बनते म्हणजे यु असेच उच्चरले जाते.
जसे युनिक, युगांडा... हि जोडाक्शरे म्हणुनच काम करतात पण जेंव्हा त्याने शब्दाची सुरुवात होते ते उच्चारताना पुर्ण शब्दाक्षर उच्चारतात
thats an elephanat
दॅट्स अॅन एलिफंट हे झाले मराठीकरण
पण ते दएट्स एन इलिफंट म्हटले की इंग्रजी असेंट मिळुन जातो.
th नंतर aeou आले तर थ नाही द अथवा ध बनतो पण आय आले तर द नाही थ राहतो जसे थर्टी, थर्स्ट वगैरे वगैरे वगैरे...
मला सबटायटलस ओज्बर्व करताना असे स्वताचे नियम पडताळुन सुधरताना इंग्रजी समग्र समजुन यायल खुपच फायदा झाला सर्वात महत्वाचे म्हणजे विविध असेंट अगंवळणी पडले संभाषणात आपली अडचण असेंट असतात स्पेलिंग नाही...
आता अगदी एमिनेम चे रॅप गॉड हे गाणे देखिल ताकतीने म्हणता येउ लागले आहे
11 Aug 2021 - 7:12 pm | गॉडजिला
आपल्यात काना मात्रा वेलांटी, उकार, अनुस्वार वगैरे वगैरे बाबिंसाठी चिन्हे आहेत इंग्रजीत हे सर्व अक्षरे वापरुनच साध्य करतात... u ने जर स्पेलिगं ची सुरुवात होत नसेल तर तो नेहमीच उच्चारासाठी सपोर्टीव शब्द/असतो त्यामुळे यु असाच उच्चार करुन u नंतर येनारे अक्षर जोडाक्शर धरुन वापरले जाते जसे
guest = गयुईस्ट = यु+इ = ग्युएस्ट म्हनजेच चटकन ग्येस्ट मराठीकरण केले तर गेस्ट.
यु बहुतांश वेळी जोडाक्शराचे काम करते um = युअम = मराठीकरण केले तर अम.
यु ने सुरुवात होत असेल तर मात्र यु जोडाक्षर नाही पुर्ण शब्दाक्षर बनते म्हणजे यु असेच उच्चरले जाते.
जसे युनिक, युगांडा... हि जोडाक्शरे म्हणुनच काम करतात पण जेंव्हा त्याने शब्दाची सुरुवात होते ते उच्चारताना पुर्ण शब्दाक्षर उच्चारतात
thats an elephanat
दॅट्स अॅन एलिफंट हे झाले मराठीकरण
पण ते दएट्स एन इलिफंट म्हटले की इंग्रजी असेंट मिळुन जातो.
th नंतर aeou आले तर थ नाही द अथवा ध बनतो पण आय आले तर द नाही थ राहतो जसे थर्टी, थर्स्ट वगैरे वगैरे वगैरे...
मला सबटायटलस ओज्बर्व करताना असे स्वताचे नियम पडताळुन सुधरताना इंग्रजी समग्र समजुन यायला खुपच फायदा झाला सर्वात महत्वाचे म्हणजे विविध असेंट अगंवळणी पडले संभाषणात आपली अडचण असेंट असतात स्पेलिंग नाही... शाळेत खरच इंग्रजी शिकलो होतो का हा प्रश्नच आहे
आता अगदी एमिनेम चे रॅप गॉड हे गाणे देखिल ताकतीने म्हणता येउ लागले आहे
11 Aug 2021 - 8:08 pm | शाम भागवत
👍
11 Aug 2021 - 8:36 pm | मित्रहो
धन्यवाद खूप उपयुक्त माहिती.
त्यावेळी मुलगा नर्सरी मधे होता. a असेल तर अॅ आणि U असेल तर अ असा उच्चार करायचा असा शिकला होता म्हणून तो तसे बोलायचा.
दक्षिणेत नावांमधे त साठी Th वापरतात. रजनीकांतचे स्पेलिंग Rajanikanth असे लिहतात. Trupthi, Shrikanth, Sathish वगैरे.
11 Aug 2021 - 12:41 pm | बोलघेवडा
कारण माहीत नाही पण एका विशिष्ट राज्यातील बहुससंख्य लोकांचे इंग्लिश खूपच निकृष्ट वाटले। म्हणजे मास्टर्स डिग्री असते पण बेसिक इंग्लिश ची बोंब असते. माझ्या एका रुम मेट ने मला "Are you tea?" अस विचारलं होत. म्हणजे मला चहा हवा आहे का? असं त्याला विचारायचं होत. :)
11 Aug 2021 - 12:54 pm | शाम भागवत
आयुष्यात मला आज प्रथमच असं वाटलं की, माझं इंग्रजी चांगलं आहे.
तुमच्या रूममेटला व तुम्हाला धन्यवाद.
😜
11 Aug 2021 - 12:56 pm | शाम भागवत
लेख मस्त.
इंग्रजीचा न्यूनगंड कमी करायला खूप फायदा झाला.
😀
11 Aug 2021 - 1:05 pm | बोलघेवडा
आणखीन एक गोष्ट म्हणजे, हा रुम मेट फक्त प्रेसेंट टेंस मधेच बोलायचा. म्हजे भूतकाळ, भविष्यकाळ असो याची वाक्य सगळी प्रेझेंट टेंस मधेच :)))
Have been, had been वगैरे तर त्याच्या गावीही नव्हतं. तो शब्दशः फक्त "वर्तमानकाळात" जगायचा.
आणखीन विशेष म्हणजे बऱ्याचदा त्याची वाक्याची सुरुवात "चचं, why because...." ने व्हायची. :))
11 Aug 2021 - 2:23 pm | गामा पैलवान
मित्रहो,
हे इथल्या इंग्लंडमधल्या ससेक्स प्रांताच्या स्थानिक बोलीतले उच्चार आहेत : http://www.misalpav.com/comment/804923#comment-804923
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2021 - 2:50 pm | मित्रहो
तुमच्या प्रतिसादातून ससेक्स मधील गावांचे उच्चार कळले. गावाचे स्पेलिंग वाचून गावाचा उच्चार लक्षात ठेवणे म्हणजे दिव्यच आहे.
मी त्यावेळी मिपावर होतो पण तो लेख मी वाचला नव्हता. दोन्ही लेखातील काही मुद्दे सारखे आहेत. शेवटी सर्वांना पडणारे प्रश्न सारखेच. त्या लेखात उल्लेख केलेले कर्नल मी सुरवातीची काही वर्षे कोलोनल असे वाचत होतो. छान लेख आहे.
11 Aug 2021 - 2:46 pm | चांदणे संदीप
इंग्रजीच्या यातना मराठी मिडीमवाल्यांनाच जास्त असतात.
सं - दी - प
11 Aug 2021 - 6:04 pm | मित्रहो
मनःपूर्वक धन्यवाद चांदणे संदीप, बोलघेवडा, शाम भागवत
12 Aug 2021 - 7:39 am | नचिकेत जवखेडकर
मी चेन्नईला असतानाचा किस्सा. वोडाफोन कडून फोन आला होता आणि तो कॉल सेंटर वरचा माणूस काय बोलत होता ते कळेना मला. तर मी त्याला म्हणालो, sorry i don`t understand Tamil, could you please speak in English? तर तो म्हणे आयाम ट्वाकिंग इन इंग्लिश वोनली सार ! :)
12 Aug 2021 - 9:20 am | तुषार काळभोर
खतरनाक!!
द्याट मेड माय डे!!
12 Aug 2021 - 10:06 am | मित्रहो
हा हा हा भारी किस्सा. तामीलची एक वेगळी बोलीभाषा, बोलनारा इंग्रजीत बोलतो पण ऐकनाऱ्याला तामील वाटते.
12 Aug 2021 - 12:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या कंपनीचा एक प्लँट चेन्नै मधे आहे तर एक उत्तराखंडात रुद्रपुर येथे.
जेव्हा एखाद्या मिटींग मधे दोन्ही कडचे लोक इंग्रजीतुन बोलायला लागतात तेव्हा इथे पुण्यात बसलेल्यांना बहुदा इंग्लीश टु इंग्लिश ट्रांसलेटरचे काम करावे लागते. या शिवाय मिटिंगचे मिनिट्स सुध्दा पुण्यातल्याच माणसाने लिहायचे,( मग तो कोणत्याही पोस्टचा असुदे), असा आमच्या येथे अलिखित नियम आहे. नाहितर. तिन्ही बाजूंनी हमखास गैरसमज होतात.
उत्तराखंड वाले नेहमी "द परपज व्ह्याय आय एम सेईंग धिस" अशी प्रत्येक वाक्याची सुरुवात करतात.
तर चैनै वाले "यस सर" "राईट सर" "नथिंग सर" याचा यथेच्छ वापर करतात. समोरच्याचे एखादे वाक्य जर खोडायचे असेल तर ते "नथिंग सर" असे म्हणतात.
चेनै वाले प्रत्येकाच्या नावापुढे मिस्टर लावतात. उदा मिस्टर एमडी सर सेड धिस टू मी थ्री डेज बिफोर"
तर उत्तराखंड वाले कोणालाही "यार" म्हणतात आणि दर चार वाक्यांनंतर एक शिवी देतात. उदा "यार, दॅट XXXX सेलटॅक्स ऑफिसर इज बिहाइंड अस फॉर मेनी डेज नाउ, विई शुड शट हिम अप सम हौ XXXX"
एकदा तर हे गैरसमज इतके विकोपाला गेले होते की चैन्नैच्या लोकांनी उत्तराखंडच्या प्लँटची एकही ऑर्डर कंपनीच्या बाहेर पडू देणार नाही असे जाहिर केले.
शेवटी आमच्या एमडींना मधे पडून दोन्ही बाजुंची समजुत काढावी लागली होती. आमच्या एमडींच्या मते दोन्हीही बाजू बरोबरच होत्या.
पैजारबुवा,
12 Aug 2021 - 10:56 am | विवेकपटाईत
लेख आवडला. प्रत्येक भाषेची आपली वैशिष्ट्य असतात. आपण बामुश्किल अङ्ग्रेजीत काठावर पास होणारे. बाकी सरकारी नौकरी जवळपास 39 वर्षे आयुष्यभर साहेबांच्या भाषेतच बोलावे लागले . पंजाबी, मद्रासी, बंगाली अश्या अनेक अङ्ग्रेजी भाषेत संवाद होत होता. ऐकणार्याच्या कानांवर किती अत्याचार होत असेल, कल्पना करणे शक्य नाही.
13 Aug 2021 - 10:25 pm | सस्नेह
इंग्रजी उच्चरांनी शालेय जीवन तर हराम केलेच, पण दर दहा वर्षांनी पुढील पिढीकडून एकाच शब्दाचे बदलत जाणारे उच्चार शिकणे हा सर्वात डोके भंजाळणारा इश्शू.
साध्यासरळ Yes ला कधी यस म्हणायचं, कधी ये ss, कधी याssह आणि कधी युप म्हणायचं हे अजूनही न समजलेली,
स्नेहा
13 Aug 2021 - 11:47 pm | चामुंडराय
.
14 Aug 2021 - 9:39 am | गॉडजिला
Yes ला कधी यस म्हणायचं, कधी ये ss, कधी याssह आणि कधी युप म्हणायचं हे अजूनही न समजलेली,
स्नेहा
Yes = होय
Yea, Yeah (असेंटचा खेळ शब्द एकच) = हो
Yup = हो in sporty manner
17 Aug 2021 - 3:11 pm | मित्रहो
धन्यवाद सस्नेह
हो इंग्रजीतल्या काही बोलीभाषा मुळे नक्की काय वापरायचे ते कळत नाही. तीच गोष्ट No किंवा Nope विषयी असते.
17 Aug 2021 - 8:37 pm | गॉडजिला
हो, होय, हो ना, होय तर असे विवीध शब्द हो होय यासाठी वापरतो... No, nope , naah तसेच आहे