सिलींडर १

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
19 Jul 2021 - 3:20 pm

सिलींडर १

अंदाजे चाळीस वर्षे झाली असावीत.किंवा एकोणचाळीस.कदाचित एक्केचाळीस पण.
नक्की आठवत नाही. नुकताच वकील होउन बीडला वकिली सुरू केली होती.आईवडील गावी असत.मी अविवाहीत.बीडला काकांकडे होतो.
   त्या काळात शेगडीसाठी गॅस,ही नवकल्पना,आणि चैनीची गोष्ट होती.शहरातून नुकत्याच गॅस एजंसी सुरु झाल्या होत्या.निवडक लोकांच्या घरीच गॅसशेगड्या होत्या.छोट्या गावांतील लोकांसाठी तर ते एक आश्चर्य होते.तरीही आडगावला आमचे घरी गॅसशेगडी घेतलीहोती.गॅसएजंसी बीडला.सत्तर किलोमीटर अंतरावर.सिलिंडर बीडहून न्यायचे.एस.टीने भरल्या सिलिंडरचे वाहातुकीला बंदी होती.गावी शेगडी अगोदरच पाठवली होती.प्रश्न सिलिंडर होता.सिलिंडर पोत्यात घालून एसटीतून घेऊन जाण्याचा गनिमी कावा,कंडक्टरच्या दक्षतेने फसला. खरे तर,एका मित्राने कंडक्टरला पटवण्याचा आगाऊ (म्हणजे अगोदर)सल्ला दिला होता.पण तो अमलात कसा आणावा हे माहिती नसल्याने व तेवढे धाडस नसल्याने;''तुम्ही शिकले सवरले लोक असं करायले तर कसं'',हा  कंडक्टरचा टोमणा ऐकत,एसटीतून सिलिंडरसह,'बडी बेआबरू होकर  एसटीसे हम निकले '.
     मग सिलिंडर वाहतूकीचा दुसरा मार्ग शोधू लागलो .
रोज बीडहून एक मालवाहू टेम्पो माजलगावला जातो असे कळले.त्यातून सिलिंडर माजलगाव रस्त्यावर असलेल्या आडगाव फाट्यापर्यंत(थांबा) न्यायचे व तिथून बैलगाडीने गावी घेऊन जायचे अशी योजना आखली.
पूर्वतयारी म्हणून टेम्पो जिथून निघे,तिथे गेलो.एका मालवाहू  टेम्पो जवळ किरकोळ शरीर यष्टी असलेला एक माणूस ऊभा होता.त्याच्याकडे चौकशी केली.तोच माजलगावला जाणारे  टेम्पोचा ड्रायव्हर होता.भरल्या टेम्पोला भरल्या सिलिंडरचे ओझे नव्हते. ओझे त्याला हवेहवेसे होते.उलट त्याचा खिसाही  भरणार होता.म्हणून भरले सिलिंडर घेऊन जायला तो तयार होता.माझे ह्रदय भरून आले.त्याने काही अटी घातल्या.''सिलिंडर सोबत तुम्हाला  पण यायला लागेल ,सिलिंडरचे व तुमचे वेगवेगळे भाडे द्यावे लागेल,वाटेत कुणी अडवले तर आम्हाला झंझट नको.तुमचे तुम्हाला निस्तारावे लागेल,ई.'' त्या मान्य केल्या. 'पहाटे पाच वाजता सिलिंडर घेऊन या',असे त्याने सांगितले.जीव भांड्यात पडला.त्या आनंदात घरी गेलो.
दुसरे दिवशी सकाळी चार वाजताच उठलो.इतक्या पहाटे घरातून भरले सिलिंडर टेम्पो पर्यंत घेऊन कसे जायचे हा प्रश्न होता.त्याकाळी सायकल रिक्षा हेच वाहतुकीचे एकमेव आणि स्वस्त साधन होते.सायकल  रिक्षाचे शोधात निघालो.मुख्य रस्त्यावर काही रिक्षा उभ्या होत्या.पण चालवणारे नव्हते.किवा चालवण्याचे स्थितीत नव्हते.जे होते ,ते एकतर गाढ झोपेत होते,किंवा नशेत होते.एवढ्या सकाळी उठायला कुणीच तयार नव्हते.
बरेच रक्त आटवल्यावर एक झोपी गेलेला जागा झाला.
रिक्षावाल्यांशी हिंदीतच बोलायचे असा अलिखित नियम असल्याने आमचा संवाद 'लोकल'राष्ट्रभाषेतच झाला.बीडची हिंदी! ब-याच मिनतवारी नंतर,आणि घासाघिशीनंतर नेहमीपेक्षा  दिडपट जास्त भाडे ,म्हणजे दिड रुपया घेण्याचे बोलीवर यायला तो कसाबसा तयार झाला.शेवटी दिड तर दिड म्हणून मीही तयार झालो.आणि त्याच्या मदतीने सिलिंडर रिक्षात चढवून निघालो.तेव्हा  पाच वाजले होते.टेम्पोवाल्याने पाचची वेळ दिली होती.टेम्पो जर वेळेत गेला असेल तर सगळा खटाटोप आणि रिक्षाच्या भाड्याचे पैसे वाया गेले असते,या विचाराने जीवात जीव नव्हता.
रिक्षावाल्याला 'जल्दी चलाव 'म्हणालो.पण तो त्याची धीमी चाल बदलायला तयार नव्हता.एखाद्या सुमार गवयाने बडा ख्याल आटोपून द्रूत ख्याल,सुरू करावा आणि मैफल (एकदाची)आटोपावी अशा अपेक्षेने बसलोअसताना तो आपला संथ आलापीच आळवित बसतो,तेंव्हा जशी घालमेल होते तशीच काहीशी मनस्थिती झाली होती.शेवटी रिक्षा कसाबसा एकदाचा इच्छितस्थळी पोहचला.तेथे सारे कसे शांत शांत होते.दुकानासमोर रस्त्यावर एक टेम्पो उभा होता.जवळ जाऊन पाहिले.आत एकजण गाढ झोपलेला.हा बहूधा टेम्पो चालकाचा सहाय्यक,किलनर ,म्हणजे  'क्लिनर'असावा. रिक्षा जवळ आला तशी दोन तीन कुत्रे टेम्पो खालून उठली अन भुंकायला लागली.रिक्षा वाल्याने हाड हाड करत त्यांच्यावर दगड भिरकावले.ती भुंकत भुंकत दूर पळाली.आणि दूर जाउन भुंकू लागली.झोपलेल्याला जागे करण्यासाठी  आवाज दिला .सुरू असलेल्या गोंधळामुळे,आणि माझ्या हाकेमुळे, त्याची झोप मोडली. त्यामुळे तो वैतागला असावा .'काय काम आहे?'माझ्यावर भुंकल्यासारखे ' खेकसून त्याने विचारले. इतक्या  सकाळी सकाळी झोपमोड केली हा मोठा अपराध केला असे त्याला वाटले असावे.मी त्याला माझ्या भेटीचे प्रयोजन
सांगितले.'मग एवढ्या लवकर कशाला आलात?'डोळे चोळत त्याने मला विचारले.'काल संध्याकाळी आलो, तेव्हा ड्रायव्हरनेच पहाटे पाच ला यायला सांगितले होते असा मी खुलासा केला. यावर ''त्याला काय होतंय सांगायला? स्वतः घरी झोपला असनार गारीगार,उगवऽल आठ वाजता.अन इथं आमची झोपमोड."असे म्हणत त्याने ड्रायव्हरला एक जबरी  शिवी दिली,आणि  परत झोपण्यासाठी आडवा झाला.'म्हणजे ड्रायव्हर आठला येणार?अरे सकाळी पाचला जायचे सांगितले नं त्याने,म्हणून तर आलो नं मी!-मी. 'मग मी काय करू?आठ वाजता या. - आडव्या अवस्थेतच क्लिनरने फर्मावले.झोपमोड झाल्याचा राग अजून गेला नव्हता. हा संवाद ऐकूनरिक्षावाल्याने ,'शिलींडर खाली करो और  मेरा भाडा द्यो'असे सांगितले. सिलिंडर रिक्षातून काढल्यावर रिक्षावाला निघून गेला तर  पंचाईत होईल, सिलिंडर टेम्पोत चढवायला त्याची मदत लागली असती.हे जाणून,मी त्याला भाडे ठरवतानाच्या कराराचे स्मरण करून देत, 'ठीक है,सिलिंडर तो रखो टेम्पोमे 'असे खडसावले .
रखता हू ना ,मै कब ना बोला ?-रिक्षावाल्याचा जवाब.
सिलिडर टेम्पोत ठेवण्यासाठी क्लिनरची पूर्वपरवानगी हवी होती. ती  मागितली.तो काही तयार नव्हता.
'अरे मग मी काय करू?-' वैतागलेला मी.
'मला काय माहित'?-क्लिनर.
आमच्या संवादाचे वादात रुपांतर होऊ लागले .पण काही उपयोग  झाला नाही.रिक्षावाल्याची गडबड आणि भुणभुण सुरू होती.शेवटी सिलिंडर रिक्षातून काढले व  रिक्षावाल्याचा हिशोब चुकता केला.सिलिंडर रस्त्याच्या कडेला ठेवले आणि त्यावरच बसलो ड्रायव्हरची वाट पाहात.रात्री झोप झाली नव्हती.त्यामुळे पेंग येत होती.सिलिंडर वर बसून झोपणे शक्य नव्हते.सिलिंडरचे कडा ही  टोचत होत्या.पण काय करणार? बसलो तसाच.
या सगळ्यात एक गोष्ट बरी झाली. क्लिनरची झोप ऊडाली.आणि तो खाली उतरला.आणि गायब झाला. 
दहा पंधरा  मिनिटानी  परतला .बहुधा कुठल्यातरी टपरीवर चहा प्यायला गेला असावा.त्याला आता तरतरी आली होती आणि माझ्या अवस्थेकडे पाहून माझी दया!कृपावंत होउन त्याने उदार अंतःकरणाने सिलिंडर टेम्पो मधे ठेवायची अनुज्ञा दिली.आणि ते चढवायला मदत ही केली.आता झोप अनावर होऊ लागली टेम्पोमधेच लवंडावे असा विचार मनात होता.तिथे दुधाचे रिकामे कॅन होते.त्याचा ओशट वास  पसरलेला. नाक दाबून खाली उतरलो. क्लिनरची परवानगी गृहीत धरून समोर केबीन मधे जाऊन बसलो. 'तुमी जरा ध्यान ठेवा टेम्पो कडं,मी आत्ता आलोच'असं सागून ,टेम्पो माझ्या स्वाधीन करून क्लिनर निघून गेला.मी अर्धवट झोपेत मान हलवली अन बसल्या बसल्याच निद्रासुख घेउ लागलो.किती वेळ गेला माहिती नाही.आणि एकदम कुणाच्या तरी भांडणाचे आवाजाने जागा झालो.ड्रायव्हर आणि क्लिनर ची वादावादी सुरू होती.ड्रायव्हर महोदयाचे आगमन झाले तेव्हा क्लिनर तिथे नव्हता.
टेम्पो सोडून गेल्याबद्दल क्लिनरला तो शिव्या घालत होता.क्लिनर टेम्पो सोडून जाण्याची भाषा करत होता. माझा जीव टांगणीला!धमकी प्रमाणे तो खरंच गेला तर काय?मग  टेम्पो कसा जाईल? सिलिंडर कसे न्यायचे? हे प्रश्न समोर नाचू लागले.पण हे त्यांचे बहुतेक
नेहमीचेच असावे.
लुटूपुटीचे भांडण.कारण,दहा पंधरा मिनिटे तोंडी खडाखडी झाल्यावर .ड्रायव्हरने बिडी काढून ओठाला लावली. काडीपेटी नव्हती. क्लिनरने खिशातून काडेपेटी  काढून दिली. पेटवलेल्या बिडीचे दोनचार झुरके मारून ड्रायव्हर ने ती क्लिनर ला दिली. मग त्यानेही  दोन चार 'कश'लगावले ,अन बिडी परत दिली.याचा अर्थ त्यांचा आपसात तह झाला होता.
मनगटावरील घड्याळ साडेसात वाजून गेल्याचे दाखवित
होते. ड्रायव्हरचे लक्ष माझ्या कडे गेले.त्याने मला ओळखले असावे. मी मनातून चिडलो होतो.पण अशा युध्दोत्तर परिस्थितीत त्याच्यावर भडकणे सुज्ञपणाचे होणार नाही ,हे जाणून, मी शक्यतो अजिजीच्या सुरात,'कधी निघणार टेम्पो? तुम्ही सांगितलं म्हणून पाच वाजताच सिलिंडर घेऊन आलोय असे सांगितले .
'माल भरायचाय ,मग  निघू '- तोंडावाटे धूर सोडत ड्रायव्हर  बेफिकीरीने बोलला. 'तुझ्या किरकोळ सिलिंडर साठी रिकामा टेम्पो घेऊन जाऊ की काय?'असा भाव त्याचे चेह-यावर होता. मी भडकलो.मनातल्या मनात.
कमीजास्त बोललो तर हा केबीन मधून उतरवेल,या धास्तीने,''अरे टेम्पो आठ वाजता भरणार होता तर मला पहाटे पाचला का बोलावलंस?'' जीभेवर आलेला  प्रश्न गिळून मी मुकाट बसलो,आणि पेंगू लागलो.सुमारे अर्धा तासाने काही सामान लादलेली एकहातगाडी तिथे आली.ड्रायव्हरने सोबतच्या इसमास उशीरा आल्याबद्दल झापले.त्याच्यासाठी पण हे नेहमीचेच असावे कारण त्याने त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून क्लीनरचे मदतीने हातगाडीवरील सामान,टेम्पो मधे चढवले.टेम्पोचा एक कोपरा भरेल एवढी पोते ,आदी सामान सिलिंडरच्या अवती भवती रचले गेले.मग टेम्पोचा मागचा अर्धा पत्रा वर ओढून टेम्पो पॅक केला.याचा अर्थ आणखी काही सामान यायचे बाकी नसावे.आता बहुतेक टेम्पो निघेल या विचाराने हायसे वाटले.ड्रायवरने माझ्या कडून माझे रु.पाच व व सिलिंडरचे रु.पाच असे दहा रुपये भाडे मागितले.मी घासाघीस करायचा प्रयत्न केला.पण तो त्या रकमेवर अडेल होता.टेम्पो निघण्याचा शक्यता दिसत होती.त्यामुळे माझे  पाच व सिलिंडर चे पाच असे दहा रुपये त्याच्या हातावर टिकविले.एवढ्यात धोतर शर्ट घातलेला, डोक्यावर पांढरी टोपी,कपाळावर गंधाचा टिळा,गळ्यात माळा असलेला अंदाजे पन्नाशीचा जाडजूड इसम तिथे आला .बाजूचे बंद दुकानासमोर दोनदोनदा नमस्कार करून त्या  दुकानाचे शटर उघडले. आत शिरताच सोबतच्या पिशवीतून हार काढून भिंतीवर असलेल्या एका दाढीधारी महाराजाचे फोटोला घातला व तीनतीन वेळेस वाकून नमस्कारकेला.उदबत्ती पेटवून ओवाळली.टेम्पो त्याच्या मालकीचा असावा.कारण तो येताच क्लीनर, शेठ आले  असे  ड्रायव्हरला बोलला होता.ड्रायव्हरचे शेठशी कांही बोलणे झाले.उशीर केल्याबद्दल शेठ त्याच्यावर  डाफरला.माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकत काहीतरी विचारले.ड्रायवरने काहीतरी सांगितले.शेठचे समाधान झाले .त्याने वहीत काहीतरी लिहिले.एक कागद ड्रायव्हरला दिला.तो बाहेर आला.टेम्पोत बसला.क्लिनरला इशारा केला. टेम्पोचे इंजीन सुरू केले. क्लिनर मागे बसला.टेम्पोने जागा सोडली. बीड सोडले.मी  निश्वास सोडला.घड्याळात साडेआठ वाजले होते.
क्रमश:
नीलकंठ देशमुख

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

19 Jul 2021 - 4:00 pm | गुल्लू दादा

येऊद्या पुढील भाग लवकर. धन्यवाद.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:00 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. आज टाकलाय दुसरा भाग.

टर्मीनेटर's picture

19 Jul 2021 - 4:09 pm | टर्मीनेटर

सिलेंडर पुराणाची सुरूवात झकास झाली आहे, पुढचा भाग लवकर येऊद्या 👍

मराठी_माणूस's picture

19 Jul 2021 - 4:33 pm | मराठी_माणूस

मस्त. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:01 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद आज टाकत आहे दुसरा भाग

सौंदाळा's picture

19 Jul 2021 - 4:58 pm | सौंदाळा

खुसखुशीत,
तेव्हा सिलींडरची किंमत किती होती? तुमचे साडे सहा रुपये गेले की आत्तापर्यंत सिलींडरवर.
पुढे काय झाले?

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:01 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद, पुढील भाग वाचा.कळेल

Rajesh188's picture

19 Jul 2021 - 5:11 pm | Rajesh188

आमच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये मी पूर्वी म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी पण सायकल रिक्षा कधीच बघितली नाही.
टांगा किंवा एक बैलाचा छकडा असायचा..
आणि माझ्या अगोदर च्या पिढी कडून सुद्धा सायकल रिक्षा विषयी कधी ऐकलं नव्हत.
बाकी लेख मस्त झालाय.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:02 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद, प्रतिसादाबद्दल

घड्याळात साडेआठ वाजले होते........

इकडे बारा वाजलेत आणि तुमचा टेंपो लवकर निघणार का?

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:02 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. पुढील भाग वाचा. कळेल

तुषार काळभोर's picture

19 Jul 2021 - 9:04 pm | तुषार काळभोर

आमच्याकडे १९८५ ला गॅस आला. तेव्हा आम्ही मुंढव्याला राहायला होतो. आणि सिलिंडर मिळायचा हडपसर मध्ये. ती एजन्सी अजून त्याच जागी आहे. त्यावेळी बहुधा ६५ रुपयांना सिलिंडर होता.
वडिलांकडे आरेक्स १०० होती त्यामुळे ने आण करण्याचा जास्त प्रॉब्लेम नव्हता. कधी संपेल त्याचा अंदाज घेऊन बुक करावा लागायचा. संपल्यावर दोन तीन दिवसात मिळेल या बेताने. गॅस संपल्यावर सिलिंडर आनेपर्यंत स्टोव्ह असायचा.

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:03 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

रीडर's picture

19 Jul 2021 - 11:39 pm | रीडर

मस्त आणि इंटरेस्टिंग गोष्ट. पुढचा भाग लवकर येउद्या

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:03 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. पुढील भाग आज टाकला आहे

सुमो's picture

20 Jul 2021 - 7:37 am | सुमो

सुरुवात. छान लिहिलं आहे.

पुभाप्र....

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:04 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. प्रतिसादाबद्दल

Bhakti's picture

20 Jul 2021 - 10:04 am | Bhakti

पुराण रंगलंय.

'तुम्ही शिकले सवरले लोक असं करायले तर कसं''

बीडची भाषा ;)

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:04 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. प्रतिसादाबद्दल.

बापूसाहेब's picture

20 Jul 2021 - 12:19 pm | बापूसाहेब

छान लेख.. पुढील भाग लवकर येऊद्यात...

नीलकंठ देशमुख's picture

20 Jul 2021 - 12:41 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. आज टाकला आहे

Nitin Palkar's picture

20 Jul 2021 - 8:10 pm | Nitin Palkar

मजा येतेय. दोन्ही भाग एकत्र वाचायला मिळतायत....

चौथा कोनाडा's picture

23 Jul 2021 - 1:40 pm | चौथा कोनाडा

भारी रोचक सिलेंडर श्टोरी !

मी १९९० साली आडमार्गाने गॅस कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला होता ... खुप वेळ गेला (२ वर्षे) आणि प्रचंड मनस्ताप झाला होता. दोन सिलेंडरवाले गॅस कनेक्शनचे पैसे दिले होते पण एकच सिलेंडर मिळाले. मध्यस्थाशी बरेच मोठे भांडण झाले, तो सराईत होता, त्याच्या नादी लागणे म्हण्जे मेंदुची हार्डडिस्क डी-फ्रॅग्मेंटेशनला लावणे.
शेवटी आहे ते पत्करावे लागले ! अनुभव एक आयुष्यातला !

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2022 - 11:56 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. का कोण जाणे, हा प्रतिसाद उशीरा पाहीला.क्षमस्व.