तुमच्या जाण्याने जग सुने झाले
सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे ||
किती आठव काढावी
किती स्मृती जपावी
त्या आठवांनी डोळा पाणी आले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१||
रिक्त झाली तुमची नेहमीची जागा
तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा
असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२||
कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान
दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून
रिक्त राहीले स्वतः केले दुसर्यांचे भले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३||
आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही
शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही
काळाने तुम्हाला असे अकाली का नेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४||
(माझे वडील जाण्याला आज सव्वा महिना झाला. वडीलांना हाक मारण्यास मी पोरका झालो. त्यांच्या आठवणी तर येतच राहतील.
आजच्या जागतिक फादर्स डे निमित्ताने ही काव्यसुमनांजली वडीलांना अर्पण.)
- पाषाणभेद
२०/०६/२०२१
प्रतिक्रिया
20 Jun 2021 - 8:28 pm | चित्रगुप्त
दिवंगत वडिलांच्या स्मृतीला सादर अभिवादन.
20 Jun 2021 - 9:12 pm | मदनबाण
वडिल्यांच्या जाण्याने जे दु:ख आपणास झाले त्याची वेदना कमी व्हावी म्हणुन मी प्रार्थना करतो... __/\__
मदनबाण.....
21 Jun 2021 - 7:15 pm | शा वि कु
वडिलांच्या स्मृतीला प्रणाम.
23 Jun 2021 - 12:26 pm | खिलजि
आपल्या दुःखात मी सहभागी आहे . फार वाईट वाटलं , आणि तुमचं दुःख या रचनेत पूर्णतः उतरलंय असं वाटलं . महादेव त्यांच्या आत्म्यास सद्गती देओ.
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
23 Jun 2021 - 11:27 pm | सौन्दर्य
मोजक्या शब्दात व्यक्तिचित्र चांगले मांडलेत. तुमच्या दुःखाला उतारा मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करीन.
माझ्या वडिलांचा आम्हाला लहानपणापासून कधीच आधार असा झाला नाही तरी देखील माझ्या वयाच्या ३०व्या वर्षी ते गेले आणि माझे बालपण संपले असे मला जाणवले. जोपर्यंत आपल्या डोक्यावर कोणीतरी असते तो पर्यंत आपण लहानच असतो पण ते छत्र हरपले की आपण लहान राहात नाही.
24 Jun 2021 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येकासाठी आपले वडील स्पेशलच असतात.
तुम्ही त्या भावना कमीत कमी शब्दात चपखल मांडल्या आहेत
पैजारबुवा,
24 Jun 2021 - 11:22 am | सौंदाळा
श्रध्दांजली
भिड्णारी कविता
24 Jun 2021 - 1:26 pm | चौथा कोनाडा
हृदयस्पर्शी रचना.
आम्हा भावंडांचे वडील माझ्या वयाच्या ७ व्या वर्षी गेले. वडिलांचे छत्र नसणे म्हणजे काय हे पुरेपुर अनुभवले.
पण त्यांच्याच आशिर्वादाने सर्व काही सुरळीत झाले आणि आयुष्यात स्थिरस्थावर झालो. पुसटसे आठवत असलेले वडिल नेहमी सोबत असतात ही जाणीव जीवनातली दु:खं पेलण्यास बळ देते.
पाभे, तुमचे वडिल देखील तुमच्या सोबत सतत असतील हे नक्की !