एका आईचा सूडाग्नी (कथा परिचय : २)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
10 Jun 2021 - 10:11 am

विदेशी कथा परिचयमाला भाग १ इथे
...

युरोपमध्ये लघुकथांची परंपरा खूप जुनी आहे. एकोणिसाव्या शतकात तर ती अगदी बहरली होती. तेव्हाच्या कथालाटेत अनेक कथाकारांनी ताकदीचे लेखन केले. बिगर इंग्लिश लेखकांतले दोन नामवंत कथाकार म्हणजे फ्रान्सचे गी द मोपासां ( Maupassant) आणि रशियाचे चेकॉव्ह ( Chekhov). त्यांच्या एकाहून एक सरस कथांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यांच्या असामान्य लेखनामुळे त्यांच्यानंतर कथाविश्वात मोपासां आणि चेकॉव्ह अशी दोन ‘घराणी’ निर्माण झाल्याचे मानले जाते.
मोपासां यांच्या लेखनाने फ्रेंच कथा एकदम वयात आली असे म्हणतात. त्यांचे काही विचार मननीय आहेत. त्यांचे एक वाक्य मला खूप विचारात पाडून गेले; अगदी मनाला भिडले. ते असे:

“जगात फक्त वेश्या आणि शेतकरी हेच खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. बाकी सगळे लोक निरनिराळे मुखवटे धारण करून जगतात”.

हे वाचल्यावर या लेखकाबद्दलचे कुतूहल चाळवले गेले.

त्यांचे नाव काही मराठी कथाकारांकडून बऱ्यापैकी ऐकले होते. ते एकोणिसाव्या शतकातील एक महान फ्रेंच कथाकार असून त्यांनी 300 कथा लिहिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा १८७०च्या फ्रान्स-प्रशियाच्या युद्धकाळात लिहिलेल्या आहेत. त्यातून त्यांनी युद्धाची एकंदरीत निरर्थकता दाखवून दिलेली आहे. युद्धकाळात सामान्य जनता विनाकारण भरडून निघते आणि त्यांच्यावर या हिंसेचा खोलवर मानसिक परिणाम होत असतो, हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बर्‍याच कथा लिहिल्या. त्यापैकी गाजलेली एक म्हणजे Mother Sauvage". तिचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.

कथेची पार्श्वभूमी
फ्रान्स-प्रशियाच्या युद्धानंतर पंधरा वर्षांनी कथेचा निवेदक फ्रान्सच्या एका लहान गावात आलाय. त्याच्या स्थानिक मित्राचा तिथला मोठा वाडा युद्धकाळात प्रशियन सैनिकांनी उध्वस्त केला होता. तो त्याने आता पुन्हा बांधला आहे. आता दोघेही त्या गावात मस्तपैकी फिरत आहेत. अचानक निवेदकाला एका उध्वस्त झालेल्या झोपडीचे अवशेष दिसतात. निवेदक १५ वर्षांपूर्वी या झोपडीत आलेला असतो. म्हणून आता ते विदीर्ण दृश्य पाहून त्याला धक्का बसतो. तो मित्राला विचारतो, की ही झोपडी व त्यातल्या माणसांचे काय झाले ? मग मित्र त्याला ती जुनी दुःखद घटना सांगतो, जी कथारूपाने वाचकांसमोर येते.

कथेचा सारांश
वर उल्लेख केलेल्या झोपडीत एक म्हातारी व तिचा मुलगा राहत असत. म्हातारीचा नवरा पोलिसांच्या गोळीबारात पूर्वी मरण पावलेला होता. पुढे मुलगा ३३ वर्षाचा झाल्यावर फ्रान्सच्या लष्करात भरती झाला. आता म्हातारी झोपडीत एकटीच उरली. ती खूप धीराची होती. ती आठवड्यातून एकदा गावात सामान आणायला जाई तेव्हा ती चक्क खांद्यावर बंदुक लटकवून जाई ! अशात त्या गावात एकदा प्रशियन सैनिकांची पलटण मुक्कामास आली. तिथल्या पद्धतीनुसार या सैनिकांची विभागणी करून त्यांना गावकऱ्यांच्या घरी मुक्कामाला सक्तीने पाठवले जाई. अशा चार सैनिकांना म्हातारीच्या घरी ठेवण्यात आलेले होते.

ते चौघेही तिच्या घरी शिस्तीत राहू लागले. ते आपला खर्च स्वतः करत होते. तसेच कष्टाची कामेही आपणहून करीत जेणेकरून म्हातारीला भार पडू नये. अल्पावधीत त्यांचे म्हातारीशी तिच्या मुलांप्रमाणे नाते झाले. म्हातारी मात्र तिच्या मुलाच्या आठवणीने काळजीत असे. तिला फक्त त्याच्या पलटणीचा क्रमांक माहीत होता. ती त्या चौघांना सारखे विचारी, “23 नंबरची पलटण सध्या कुठे असेल हो?” अर्थात ते चौघे परक्या देशाचे असल्याने त्यांना ते काही माहीत नव्हते. म्हातारीने हे चौघे शत्रूराष्ट्राचे आहेत हे माहीत असूनही त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले.

एके दिवशी म्हातारी एकटी असताना सकाळीच तिथे पोस्टमन आला व त्याने तिला एक चिठ्ठी दिली. तिने ती वाचली. त्यात अतिशय दुःखद बातमी होती. तिचा मुलगा बॉम्बस्फोटात ठार झाल्याचे त्याच्या सहकाऱ्याने कळवले होते. तिला हा जबरदस्त धक्का होता पण ती अजिबात रडली नाही. मात्र मनातून ती खूप व्याकूळ झाली. त्याच्या आठवणींचे कढ येऊ लागले. तेवढ्यात तिला ते चौघे सैनिक परत येत असल्याची चाहूल लागली. तिने घाईने ते पत्र लपवले. ते चौघे हसत-खिदळत येत होते व त्यांनी बरोबर एका सशाला खाण्यासाठी आणले होते.

मग म्हातारीने त्यांच्यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. एका सैनिकाने तिला तो ससा मारून दिला. मात्र ते दृश्य पाहून आज तिला अगदी भडभडून आले. स्वयंपाक झाल्यावर त्या चौघांनी खाण्यावर यथेच्छ ताव मारला. म्हातारीला मात्र आज जेवण अजिबात गेले नाही. एकीकडे तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजू लागले होते. एकदम ती त्यांना म्हणाली, “तुम्ही इथे माझ्याकडे तब्बल महिनाभर आहात आणि मला अजून तुमची नावेदेखील माहीत नाहीत !” त्यावर त्यांनी आपापली नावे सांगितली. पण तिचे नुसत्या सांगण्यावर समाधान झाले नाही. तिने एक कागद घेतला व त्यावर सर्वांची नावे व पूर्ण पत्ते व्यवस्थित लिहून घेतले.

सैनिक म्हातारीच्या घराच्या माळ्यावर झोपत असत. त्या दिवशी खूप थंडी होती. सर्वांची जेवणे झाल्यावर म्हातारीने त्या माळ्यावर वाळलेल्या गवताचे भारे आणून ठेवले. तिथे भरपूर गवत ठेवून झाल्यावर त्यांची झोपायची जागा मस्तपैकी उबदार झाली. यथावकाश ते चौघे शिडीने चढून माळ्यावर झोपायला गेले. म्हातारी जागीच होती. जेव्हा त्यांना गाढ झोप लागली तेव्हा तिने हळूच ती शिडी काढून घेतली. मग ती दबक्या पावलांनी बाहेर पडली आणि तिने अजून गवताचे भारे आणून घरभर रचून ठेवले. आता तिची ‘तयारी’ पूर्ण झाली होती !
सर्वत्र शांतता होती. त्यात फक्त त्या चौघांचे घोरण्याचे सूर ऐकू येत होते. म्हातारीने निश्चय केला आणि तिने घरातल्या गवताला आग लावून दिली व ती झरकन बाहेर पडली. क्षणार्धात संपूर्ण झोपडीने पेट घेतला. ज्वाळांचे लोट आसमंतात विखुरले. थोड्याच वेळात माळ्यावरून त्या चौघांच्या आर्त भेदक किंकाळ्या ऐकू आल्या आणि मग काही वेळात सारे कसे शांत शांत झाले. एव्हाना झोपडी जळून खाक झाली व तिचा सांगाडा फक्त उरला होता.

आता म्हातारी त्या खाक झालेल्या झोपडीसमोर हातात बंदूक घेऊन उभी राहिली. तिला पुसटशी शंका होती की चौघांपैकी कोणी जिवंत आहे की काय. मात्र तसे काही नाही याची खात्री पटल्यावर तिने ती बंदूक भिरकावून दिली. एव्हाना त्या आगीची बातमी गावभर पसरली आणि लोकांचा लोंढा व काही प्रशियन सैनिक तेथे येऊन पोहोचले. त्यातला एक जर्मन अधिकारी होता. त्याने पाहिले की म्हातारी शांतपणे एका झाडाच्या खोडावर बसून राहिलेली आहे. त्याने तिला दरडावून विचारले, “तुमच्याकडचे सैनिक कुठे गेले ?” तिने शांतपणे जळालेल्या झोपडीकडे बोट दाखवले.

पुढे असा संवाद झाला :
तो : कशी लागली आग ही ?
ती : मीच ती आग लावली आहे !

आता त्याचा एकदम यावर विश्वासच बसेना. त्याला वाटलं म्हातारी काहीपण बरळतीय. पण तिने ठामपणे धिटाईने संपूर्ण घटना त्याला सांगितली. मग तिने तिच्याकडील दोन कागद काढून त्याला दाखवले. त्यातील एकावर तिच्या मुलाच्या मृत्यूची बातमी होती, तर दुसर्‍यावर त्या चौघांची नावे व पत्ते लिहिलेले होते.
पुढे ती म्हणाली, “तुम्ही या चौघांच्या आयांना ही बातमी जरूर कळवा आणि मी हे कृत्य केल्याचे सांगाच, विसरू नका बरं का !”

आता मात्र तो भडकला. त्याने त्याच्या बारा सैनिकांना जवळ बोलावले व म्हातारीला ठार मारायचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी तिला त्या जळक्या तप्त घराला लागून उभे केले आणि मग तिच्यावर बंदुकीच्या गोळ्यांची सरबत्ती झाली. गतप्राण होताना म्हातारीच्या हातात तिच्या मुलाबद्दलचे पत्र घट्ट धरलेले होते. सैनिकांचे एवढ्यावर समाधान झाले नाही. त्यांनी संपूर्ण गावावरच सूड घ्यायचे ठरवले. मग त्यांनी तिथे हैदोस घातला आणि अनेक घरे उद्ध्वस्त केली.

ok
….

अशी ही एका शूर आईची कहाणी. तिची बदलती रूपे लेखकाने छान चितारली आहेत. सुरुवातीस जेव्हां ते चौघे मुक्कामासाठी तिच्यावर लादलेले असतात तेव्हा ती त्यांच्याकडे पुत्रवत बघते. जरी ते शत्रूराष्ट्राचे असले तरी त्यांना अतिथीसमान वागवते. तिचा मुलगाही सैनिक आहे. तेव्हा त्यालाही असेच कुठेतरी राहावे लागत असेल या भावनेपोटी ते असावे.

पुत्रवियोगानंतर मात्र तिच्या मनातील मायेची जागा वैराने घेतली जाते. आता तिला ‘आपल्या’ व ‘त्यांच्या’ देशातील युद्धाची जाणीव झाली असावी. मग ‘युद्धात सर्व क्षम्य असते’, हाच मंत्र तिने जपलेला दिसतो. पुढे त्यांना जाळल्यावर भ्याडपणे पळून न जाता स्वतःच्या मृत्यूला सामोरे जाऊन ती एक शूरमाता ठरते. त्या चौघांच्या घरी ही दुःखद घटना कळली पाहिजे, हा तिचा आग्रह आपल्याला चकित करून जातो. कुठल्याही आईला आपल्या ठार झालेल्या मुलाचा मृतदेह सुद्धा बघायला न मिळणे यातले दुःख ती जाणून आहे. निदान त्यांच्या आयांना आपली मुले बेपत्ता वाटण्यापेक्षा मृत झाल्याचे कळणे तिला महत्वाचे वाटलेले दिसते. कथेतील म्हातारीचे कृत्य बघून ते योग्य की अयोग्य हे द्वंद्व वाचकाच्या मनात उभे राहू शकते. परंतु ज्या शौर्याने तिने ते केले व त्याचे प्रायश्चित्तही घेतले ते बघता अखेरीस ती वीरमाताच म्हणावीशी वाटते.

मोपासां यांच्या या गाजलेल्या कथेचा मराठी अनुवाद ‘रानमाय’ या नावाने झालेला असून तो एस. डी. इनामदार यांच्या ‘दिगंतराचे पक्षी’ या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे.
..............................
प्रचि 'विकी'तून साभार !

(कथा परिचय : ३) : कुणास सांगू ?

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Jun 2021 - 10:36 am | मुक्त विहारि

धन्यवाद

गॉडजिला's picture

10 Jun 2021 - 11:24 am | गॉडजिला

हेच म्हणतो

पाषाणभेद's picture

10 Jun 2021 - 10:38 am | पाषाणभेद

कथेचा छान परिचय करवून दिलात आपण.
अजून इतर कथाही लिहाव्यात.
शिर्षकात कथा परिचय असे लिहील्यास मिपासाठी नवीन सदर सुरू केल्यासारखे होईल.

कुमार१'s picture

10 Jun 2021 - 11:50 am | कुमार१

वरील तिघांचे प्रतिसादाबद्दल आभार !

पाभे,
सूचना चांगली आहे .
यापूर्वी एका इंग्लिश कथेचा परिचय इथे करून दिला आहे

तुषार काळभोर's picture

10 Jun 2021 - 12:34 pm | तुषार काळभोर

धन्यवाद..

चित्र अगदी टिपिकल एकोणिसाव्या शतकातील जर्मन / प्रशियन अधिकाऱ्यासारखे दिसते आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jun 2021 - 1:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट आवडली..
अशाच अजुन काही गोष्टी वाचायला आवडतील
पैजारबुवा,

स्मिताके's picture

10 Jun 2021 - 6:36 pm | स्मिताके

कुमार१ आपण लिहिलेले दोन्ही परिचय आवडले. आता दोन्ही कथा वाचणार. आभार.

कुमार१'s picture

10 Jun 2021 - 6:41 pm | कुमार१

वरील तिघांचे अभिप्रायाबद्दल आभार !

मूळ कथा इंग्लिशमध्ये इथे वाचता येईल.

आग्या१९९०'s picture

10 Jun 2021 - 7:26 pm | आग्या१९९०

छान परिचय.
दूरदर्शनवर ' कथासागर ' मध्ये चेकॉव्हच्या कथा असत त्याची आठवण झाली.

कॉमी's picture

10 Jun 2021 - 8:51 pm | कॉमी

कथा आवडली. एक मराठी अनुवादीत कथासंग्रह सापडला, पण त्यात ही कथा नाही दिसली.

मोपासांच्या कथा लहान दिसतात, त्यामुळे कधीही वाचता येऊ शकतात.

कुमार१'s picture

10 Jun 2021 - 9:11 pm | कुमार१

आग्या, बरोबर.
अधूनमधून त्या कथा डीडी-भारतीवर दाखवत असतात.

कॉमी,
कथालांबीबाबत सहमत.

( तुमचे सदस्य प्रातिनिधिक चित्र छान आहे. आवडले !)

का कुणास ठाऊक पण जीए कुलकर्णींच्या 'जोडवी' या गोष्टीची आठवण झाली. एका गरीब कुटुंबातल्या मुलाला गावातला दुकानदार उधारी थकली म्हणून भर बाजारात कानफाडीत देतो. हि गोष्ट त्याच्या आईला समजल्यावर त्याची आई मुलाला घेऊन दुकानदाराला भेटते आणि उधारी चुकती करते. पैसे मोजून घेतल्यावर दुकानदार आता सगळा हिशोब फिटला असं म्हणतो. पण ती आई म्हणते अजून एक हिशोब राहिला आहे. असे म्हणून ती त्या दुकानदाराला सणसणीत थोबाडीत मारते. ती मारून झाल्यावर ती म्हणते आता हिशोब पूर्ण झाला. असे म्हणून ती चालायला लागते. चालताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर टकटक आवाज येतो. तो आवाज मुलाला नेहमीपेक्षा जरा जास्तच भावतो.

तुम्ही सांगितलेल्या कथेत पुत्र प्रेमाने विध्ध्द होणे साहजिकच आहे. परंतु आपल्या मुलाचा आत्मसन्मान आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणं हे मला फारच भावलं.

कुमार१'s picture

11 Jun 2021 - 7:54 am | कुमार१

सर,
तुम्ही एका फार चांगल्या कथेची आठवण करून दिलीत याबद्दल आभार !
जीएंच्या अन्य काही कथाही अशाच अगदी मनात खोलवर घुसतात.

Bhakti's picture

12 Jun 2021 - 7:19 am | Bhakti

जोडवी..
क्या बात! प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला.

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2021 - 5:34 pm | चौथा कोनाडा

सुंदर कहाणी.
ओघवते कथन आवडले !

प्रदीप's picture

11 Jun 2021 - 6:19 pm | प्रदीप

करून दिल्याबद्दल धन्यवाद. कधीतरी मोपॉसाँच्या कथा वाचल्या पाहिजेत- माझ्याकडून ते अद्यापि निसटून गेलंय.

'जोडवी' ह्या नावाची जी. एं.ची वेगळी कथा मी तरी वाचल्याचे आठवत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे हा प्रसंग त्यांनी कुठल्यातरी कथेत अथवा 'माणसे, अरभाट व चिल्लर' ह्या लिखाणांत, कथालेखकाच्या स्वतःच्या आयुष्यांत झाला, अशा तर्‍हेने लिहीला आहे. चूभूद्याघ्या. तरीही. हा भाग, जी. एंच्या संदर्भात आठवतोय खरा. तेव्हा हा तपशिलांतील फरक झाला. असो.

कुमार१'s picture

11 Jun 2021 - 9:01 pm | कुमार१

वरील सर्वांना धन्यवाद !

वरच्या चर्चेत टोबी यांनी जो आत्मसन्मानाचा मुद्दा उपस्थित केला आहे त्याबद्दलचा वाचलेला हा प्रसंग.

पुलंच्या ‘दाद’ या पुस्तकात असा एक मजकूर आहे:

मुंबईला एका रस्त्यात “काम चालू, रस्ता बंद” असे लिहीलेल्या पाटीजवळ काही मजूर तंबाखू खात बसले होते. त्यांच्या शेजारून पुलं व त्यांचा मित्र जात असतात. त्या मजुरांकडून पाहून तो मित्र शिष्टपणाने म्हणतो,

“हे बघ, यांचं काम चाललंय !”

त्यावर मजुरांमधला एकजण पचकन पिंक बाजूला टाकतो आणि मोठ्याने उत्तर देतो,

“ओ शेठ, हापिसात शिकनोट टाकून शिनेमा बघायला जायाची आमच्या सर्विसमंदी सोय नाय, काय समजलेत !”

यावर पुलं असे लिहून जातात :
“ त्या वाक्यापेक्षा ती पिंक माझ्या अंगावर पडली असती तरी मला चालले असते”.

सुधीर कांदळकर's picture

12 Jun 2021 - 6:45 am | सुधीर कांदळकर

मूळ कथाही आणि आपण करून दिलेला परिचयही. कथांनी साहित्यविश्व लोकप्रिय केले आणि समृद्धही केले. कालौघात अशी गाळीव रत्ने हाती उरतात आणि त्यालाच आपण अक्षरवाड्मय म्हणतो.

पात्रांतले मनोहर भावनिक नातेसंबंध, बदलत्या परिस्थितीमुळे त्यात होणारे विलक्षण बदल, असामान्य, ठळक व्यक्तीवैशिष्ट्ये आपण या लेखातून छान टिपली आहे. वाचल्यावर छान ताजेतवाने वाटले. आणि हो, कथेची निवड महत्त्वाची आणि सुरेख.

मस्त. धन्यवाद.

Bhakti's picture

12 Jun 2021 - 7:17 am | Bhakti

नवीन लेखकाची आणि नवीन कथेची सुरेख माहिती आहे.
प्रेमास्वरूप आई , वात्सल्य स्वरुप आई ही कायम कथांमध्ये वाचायला मिळाली आहे तेव्हा सुडाग्नी भडकवणारी माता निराळीच आहे पण तिचे भावनिक बदल कथेत छान मांडले आहेत.

म्हणजे बॉलिवूडने हि कथा ढापली असती तर

युद्ध भारत पाकिस्तान चालू आहे, या भारतीय आईचा मुलगा सीमेवर मरतो तरी भारत देश जिंकत असतो व पाक शरणागत येणार असतो व काश्मीरमधे हे शत्रूचे लोक ज्या घरात निशस्त्र बसलेले असतात तिथे भारतीय सैन्य धाड घालते तेंव्हा हि बाई आई म्हणून समोर येऊन भाईचाराचा योग्य मार्ग दाखवते व त्या मुलांचे रक्षण करते ज्यासाठी तिला 26 तारखेला आदर्श माता पुरस्कार दिला जातो...

सुखीमाणूस's picture

12 Jun 2021 - 10:45 am | सुखीमाणूस

एका चान्गल्या कथेचा मस्त अनुवाद.

कुमार१'s picture

12 Jun 2021 - 11:08 am | कुमार१

आणि हो, कथेची निवड महत्त्वाची

>>
>>>> या कथेचा ‘रानमाय’ हा मराठी अनुवाद मी वीस वर्षांपूर्वी वाचला होता. त्यानंतर ती कथा मनात घर करून राहिली होती.
आता जालावरून या कथेचे इंग्लिश रूपांतर वाचले आणि मग ती अधिकच आवडली.

चौथा कोनाडा's picture

12 Jun 2021 - 5:20 pm | चौथा कोनाडा

काही वर्षांपूर्वी आलेला हिंदी सिनेमा "मॉम" हा देखील बहुधा "आईचा सुडाग्नी" याच विषयावर आहे !

कुमार१'s picture

12 Jun 2021 - 6:03 pm | कुमार१

माहितीसाठी धन्यवाद.
श्रीदेवीची आक्रमक भूमिका दिसते आहे त्यात.

कुमार सर ,
सुंदर कथा परिचय.

“जगात फक्त वेश्या आणि शेतकरी हेच खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. बाकी सगळे लोक निरनिराळे मुखवटे धारण करून जगतात”. = >
आजही लागू , मुखवटे बदलन्याची "कला" ही खूपच महत्वाची होत आहे असे दिसते, आजूबऊला .

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 11:17 am | गॉडजिला

जगात फक्त वेश्या आणि शेतकरी हेच खऱ्या चेहऱ्याने जगत असतात.

माहीत नाही या महाभागाने वेश्या खऱ्या चेहऱ्याची का मानली ते...

आग्या१९९०'s picture

13 Jun 2021 - 11:37 am | आग्या१९९०

एस्कॉर्ट सर्व्हिस मुखवटाच आहे.

साधे लिहिणारी मोठी माणसे आणि त्यांच्या काळाला पुरून उरणाऱ्या कथा. खरे 'क्लासिक' साहित्य !

सुरेख परिचय कुमार१, अजून वाचायला आवडतील अशा विस्मृतीत गेलेल्या मोजक्या कथा, जरूर विचार करा.

कुमार१'s picture

15 Jun 2021 - 7:46 am | कुमार१

उत्साहवर्धक प्रतिसाद आणि चांगल्या चर्चेबद्दल सर्वांचे आभार !

अनिंद्य,
अशा साहित्याचा जरूर विचार करेन.
शंभर वर्षे किंवा त्याहून जुने असलेल्या इंग्लिश साहित्याचा एक फायदा म्हणजे ते जालावर वाचायला सहज उपलब्ध असते.

श्रीगणेशा's picture

29 Jul 2021 - 5:44 pm | श्रीगणेशा

छान आहेत सर्व कथा.

@कुमार१ सर,
तुम्हाला या संकेत स्थळाविषयी माहिती असेलच:
https://www.gutenberg.org/

छान संग्रह आहे तिथे पुस्तकांचा.

कुमार१'s picture

29 Jul 2021 - 6:11 pm | कुमार१

धन्यवाद
अभिप्राय व माहितीबद्दल !