कहानी पूरी फिल्मी हैं!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
13 Feb 2021 - 3:47 pm

फेसबुकवर सिनेमागली नावाचा एक ग्रुप आम्ही चालवतो. त्यावर नुकतीच कहानी पूरी फिल्मी हैं ह्या नावाची स्पर्धा घेतली..
त्यानिमित्ताने लिहिलेलं..

#CinemaGully
#कहानी_पूरी_फिल्मी_हैं

"राजहंसाचे चालणे जगी झालेया शहाणे,
म्हणून काय कोणी चालूच नये की काय!"

ह्याच चालीवर आम्ही म्हणतो,

'राज अन राहूलचे तराने, ऐकले कितीदा जगाने!
म्हणून आमचे गाऱ्हाणे, ऐकूच नये की काय!

परमेश्वराने अफाट न्यूनगंड, अमाप वेंधळेपणा आणि अनंत निर्लज्जपणा देऊन जे फार कमी नमूने पृथ्वीवर पाठवले त्यापैकी आम्ही एक! आम्ही नव्हतो राजसारखे स्मार्ट, प्रेमसारखे लोभस अन राहूलसारखे आगाऊ! अन मुली तरी कुठे निशा अन सिमरनसारख्या होत्या आमच्या वर्गात? हात आणि तोंड पुसायला आम्ही शर्टाच्या बाह्या वापरायचो अन त्या रुमाल वापरायच्या एवढाच फरक होता आमच्यात! (इथं नाक आणि 'तो' शब्द टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे चाणाक्षांच्या लक्षात येईल) म्हणून आम्हाला साजेशी अशी प्रेमकहाणी सिनेसृष्टीच्या इतिहासात बनलीच नाही.

तशी कहानी आमची पण फिल्मीच आहे. पण आमचा रोल एडिटरच्या टेबलावर नेहमीच कापला जातो त्याला काय करणार?

तुम्हाला शारक्या आवडत असेल तर दिलवाले दुलहनीया ले जाएंगे पाहिला असेलच. त्यात राजच्या एका मित्राचा रोल करण जोहरने केला होता. पण राजला आणखी एक मित्र दाखवलाय तो आठवतो का कोणाला? नाही ना.. तो मी होतो ! ह्या मित्राचं नाव बहुतेक क्रेडिट्समध्येपण दाखवलं नसेल. मग ह्याच्या प्रेमकहाणीत कोणाला इंटरेस्ट असणार? ह्याच्यावर कोणता आदित्य चोप्रा पैसे लावणार?

आता तुम्हाला प्रेम आवडत असेल तर हम आपके है कौन पाहिलाच असेल. त्यात लग्नात सतरंज्या उचलायला म्हणून जो भोला भैय्या दाखवलाय ना तो मी होतो. ह्या सिनेमात सुदैवाने भोला भैय्याला एक नायिका दिली होती. पण ती सुद्धा प्रेमने सिनेमाच्या पहिल्याच प्रसंगात झिडकारलेली ! भोला भैय्या आणि तिचं लग्नसुद्धा शेवटी सामूहिक लग्नसोहळ्यात जोड्या कमी पडल्यावर जबरदस्तीने काही जोड्या उभ्या करतात ना तसं लावून दिलंय.

तुम्हाला प्रेम जर आणखी आवडत असेल तर हम साथ साथ है सुद्धा बघितला असेल. ह्यातला जो प्रेम दाखवलाय ना तो पन्नास टक्के मीच आहे. एका घरात मोठ्या मुलाचं लग्न झाल्यावर, लहान्या मुलाने आपला जांगडबुत्ता आधीच जमवला असतो. आता लहान्याने डायरेक्ट नात/नातू हातात देण्याआधी त्याच लग्न लावणं आवश्यक असतं. पण मधल्या मुलाचं लग्न झालेलं नसल्याने खोळंबा होतो. मग घाईघाईत नात्यागोत्यातली एखादी मुलगी बघून मधल्याच लग्न उरकण्याचा घाट घालण्यात येतो. पण नेमकं त्याच वेळी नात्यागोत्यातल्या सगळ्या मुली संपल्या असतात किंवा त्यांच्या पत्रिकेत मंगळ असतो किंवा त्यांचाही ऑलरेडीच कुठेतरी जांगडबुत्ता जमलेला असतो. ही आमची कथा आहे. जी सिनेमातल्या प्रेमशी थोडीफार मिळतीजुळती आहे. तरीही माझ्यात आणि प्रेममध्ये पन्नास टक्केच साम्य आहे. कारण सिनेमात प्रेमच्या नशिबात सोनाली बेंद्रे दाखवली आहे.

तुम्हाला अगदी जुने म्हणजे हृषीकेश मुखर्जींचे सिनेमे आवडत असतील तर मी चुपके-चुपके मधला अमिताभने केलेला 'परिमल' आहे. ज्याला मुळात आपण ह्या कथेत का गोवल्या गेलोय हे शेवटपर्यंत कळत नाही. आणि त्या धामधुमीत तो ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय तिला प्रोपोजही करू शकत नाहीये. कारण त्याची प्रेमकथा हा दिग्दर्शकाचा प्रॉब्लेमच नाहीये !

तुम्हाला लेटेस्टमध्ये थ्री इडियट्स आवडत असेल तर मी त्यातला प्रीराजूलायझेशन प्रक्रियेने बनलेला फरहान नायट्रेट आहे. ह्या दोघांसाठी सिनेमात नायिका दाखवण्याचे कष्टसुद्धा दिग्दर्शकाने घेतले नाही. कॉलेज कॅम्पसमध्ये फिरताना एखादी मुलगी फरहानकडे बघून हसली असाही एखादा प्रसंग नाही. अन हे दोघेही रँचोच लग्न लावून देण्यासाठी एका मुलीला तिच्याच लग्नातून किडनॅप करून घेऊन जातात.

तुम्हाला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' वगैरे परीकथा आवडत असतील तर त्यातल्या कबीर, अर्जुन अन इम्रानपैकी मी कोणीच नाहीये. इथं दोन महिने गोव्याचा प्लॅन करून शेवटी शेगावला जाणारे आम्ही! स्पेन वगैरे तर मी नकाशात पण पाहिलं नाही. त्यात स्पेनला गेल्यावर एक परी भेटणार, अन आम्ही आणि आमचं आयुष्य अत्यंत निरस आहे हे कळूनही ती आमच्या प्रेमात पडणार अन बाईकवर शंभरेक किलोमीटर आमचा पाठलाग करून भर रस्त्यावर आम्हाला किस करणार हे तर म्हणजे अगदी इश्शचं !!

खरी गम्मत तर ह्याचाही पुढे आहे,

मी जरी सिनेमातला 'राज आर्यन' कधीच बनू शकलो नाही तरी आयुष्यात 'नारायण शंकर' टाईप लोकांची कमी कधीच नव्हती. इतरांच्या कॉलेजात, स्वतःची मुलगी स्टेजवर एका टोणग्यासोबत नाचत असताना खाली कॉलेजच्याच प्रोफेसर मिस ब्रिगेन्झासोबत थिरकणारा प्रिंसिपॉल मल्होत्रा असतो. अन आमच्या कॉलेजात शब्दश: नारायण शंकर होता.आधीच मेकॅनिकल ब्रँच आणि त्यात नशिबात 'नारायण शंकर' हे कॉम्बिनेशन किती 'दुष्काळी' असू शकतं हे स्वतः भोगल्याशिवाय कळू शकत नाही. जिथं कॉलेज गॅदरिंगमध्ये मुलींसाठी 'सातच्या आत हॉस्टेलात' असा नियम होता तिथं इतर वेळी काय असेल !

असो.

आता बघा, आयुष्य इतकं फिल्मी असूनही ही पोस्ट #कहानी_पूरी_फिल्मी_है ह्या स्पर्धेत घेता येणार नाही. कारण आम्ही पडलो ऍडमिन ! म्हणजे तिथंही आम्ही फरहान नायट्रेट त्येजायला...स्पर्धा जिंकणारा फुंसुक वांगडू कोणीतरी वेगळाच !!

चालायचंच...

समाप्त..

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Feb 2021 - 6:20 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

Nitin Palkar's picture

13 Feb 2021 - 8:32 pm | Nitin Palkar

छान लिहिलंय...

सोत्रि's picture

14 Feb 2021 - 5:43 am | सोत्रि

झक्कास, खुसखुशीत!

- (फिल्मी) सोकाजी

तुषार काळभोर's picture

14 Feb 2021 - 8:33 am | तुषार काळभोर

कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, लेग ग्लांस, मध्येच एखादा पुढे सरसावत लाँग ऑन ला भिरकवलेला षटकार... मस्त फटकेबाजी केलीय.

-

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त ! एकदम खुसखुशीत !

👌

चिनार +१

सविता००१'s picture

22 Feb 2021 - 5:19 pm | सविता००१

खुसखुशीत

हाहाहा.. मस्त आणि खुसखुशीत!

बाकी एक दुरुस्ती..
चुपके-चुपके च्या उल्लेखातला अमिताभ म्हणजे "सुकुमार सिन्हा"!
धर्मेन्द्रचा धरमपाजी होण्याआधीच्या काही खूप चांगल्या रोल्स पैकी "डॉ. परिमल त्रिपाठी" एक आहे.. भाई ऐसा अन्याय क्यूं करते हौ.. ! :-) [ह. घ्या.]