प्रभातरंग (आमची रविवार सकाळ)
काल सकाळी प्रभातरंग कार्यक्रम पहिला / ऐकला. (प्रभातरंग सकाळीच असतो याची नोंद घ्यावी)
कार्यक्रमाची वेळ होती सकाळी साडेसहाची.. रविवार पहाट ... आत्तापर्यंत च्या अनुभवावरून बरोब्बर ७. १० ला पोचलो.. पोचल्याबरोरबर कुठे जागा रिकामी आहे यावर एक सराईत नजर फिरवत असतानाच कानावर शब्द पडले कार्यक्रमाची सुरवात करतो .... वेळेवर आल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटली (इथे पुन्हा तीच स्वतःची पाठ थोपटणारी बाहुली (स्मायली)अपेक्षित आहे .. पण सापडत नाहीये)
साबीरभाई स्वतः च बोलत होते .. उस्ताद साबीर ख़ान साहेबांची सारंगी .. साथीला प्रशांत पांडव. पटकन एक खुर्ची पकडली. जरा स्थिरावतोय तोच मागून आवाज आला एका तासात निघू .. हे इंस्ट्रुमेंटल जास्तीतजास्त एक तास ऐकू शकतो .. सारंगी हे वाद्य माणसाच्या गळ्याच्या(आवाजाच्या) सगळ्यात जवळ जाणार ... गळ्यातल्या सगळ्या हरकती लीलया उमटवणार .. म्हणूनच अनेक वर्ष साथीचे वाद्य बनून राहिलेलं.. कोठ्यावर तरी नाहीतर तबल्याला लेहरा धरायला तरी .. बडे गुलाम आली खांसाहेबांसारख्या गायकाला सुरवातीच्या काळात मूळचा सारंगिया म्हणून हिणवण्यात आलं होत ... अश्या वाद्याला लोकप्रियता व प्रतिष्ठा मिळवून दिली ती पंडित रामनारायण आणि उस्मान खान सारख्या दिग्गजांनी. अशा वाद्याची संभावना इंस्ट्रुमेंटल आणि एक तास ?
वैतागून मागे बघितले तर एक तरुण जोडपे .. नवरा बिचारा नक्की बायकोच्या आग्रहाने अला असावा. वैतागाची जागा आता करुणेने घेतली होती.
खरतर मस्त सकाळची वेळ .. वारुणराजांनी कृपा केली होती. मस्त ऊन पडायला सुरवात झाली होती. गोखले इंस्टीट्युट मध्याला ज्ञानवृक्षाची सावली (इथे वडाचे एक प्रचंड झाड आहे) .. त्याच्या सावलीत शंभर एक लोक सहज सामावली होती .. आणि तो बिचारा एक तास कधी संपतो याची वाट पाहत होता.
अशातच साबीरभाईंनी जाहीर केले कि अहिर भैरवाने सुरवात करतो.. सगळा सस्पेन्सचं काढून टाकला. तेव्ह्ड्यात मागून (तोच) आवाज आला .. अहिर भैरव म्हणजे "अलबेला साजन आयो रे" .. या हम ढील दे चुके सनम नांतर लोकांना अहिर भैरव म्हणजे जे या चित्रपट होते ते ... अरे असे नसते रे .. तरी बर हे गाणं गायलं आहे साबीर भाईंच्या वडिलांनी ,, खुद्द उस्मानखान साहेबांनी ... अरे निदान "पूछो ना मैने कैसे रैन बिताई" तरी ऐकारे ..
खरंतर अहिर भैरव म्हटलं कि समोर यायला पाहिजे ते रशीद खांसाहेबांचं "अलबेला साजन अयोरे" .. किंवा जसराजजींचं "आज तो आनंद आनंद" नाहीतर अजोय चक्रवर्तीचं "सावली सलोनी अलबेली नवेली नार" ..
जाऊदे परत एकदा करुणार्द्र नजरेने मागे बघितले ... त्याला बहुदा कळले असावे .. मागून आवाज येण्याचे बंद झाले होते.
आता साबीरभाईंनी अहीरभैरवाचे वैभव दाखवायला सुरवात केली होती . सगळा परिसर अहीरभैरव ने व्यापला होता. यातच साबीरभाईंच्या विनंती वरून अपर्ण केळकर मंचावर आल्या. आपल्या गुरूंची सी आर व्यास यांची बंदिश सादर करायला .. "गुन गाओ निर्गुणके". बंदिशीचे शब्द व रूपरेषा अपर्णाजींच्या आवाजात आणि सहवादन व राग विस्तार सारंगीवर ... सारंगी मानवी गळ्याच्या सर्वात जवळ जाणारे वाद्य याचे हे जणू प्रात्यक्षिकच होते.
यानंतर शेवटी माझ्या मागच्या आवाजाची तपश्चर्या फळाला आलीच .. साबीर भाईनी "अलबेला साजन अयोरे" हे वाजवलेच (अपर्णाजींची स्वरसाथ होतीच)
यानंतर मनोगत वगैरे आटपेस्तोवर साडेनऊ वाजले होते ... "राह तकु मैं . थक गए नैना" या उसमानखा साहेबांच्या रचनेने कार्यक्रमाची सांगता होणार होती शिवरंजनी रागातली ही रचना ... शिवरंजनी म्हणजे "मेरे नैना सावन भादो " बरका हे माझ्या मागच्याला सांगायला मागे वळलो .. तर खुर्ची रिकामी होती .. बहुदा त्याचा एक तास झाला असावा ..
माझी मात्र रविवार सकाळ सत्कारणी लागली ... अहिर भैरव च्या सुरांनी आणि साबीरभाईंच्या सारंगीच्या साथीने ...
हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या स्वानंदी क्रिएशन चे आणि आमचे मित्र संदीप चिपळूणकरांचे आभार
प्रतिक्रिया
23 Sep 2019 - 4:01 pm | महासंग्राम
बिचारा असावा म्हणून गप्प बसला. खरा पुणेकर गप्प बसणं शक्यच नाही.
☺
3 Feb 2021 - 10:23 am | मुक्त विहारि
मी शक्यतो, जाहीर रित्या होणार्या, संगीत कार्यक्रमाला जात नाही..
1. अनावश्यक वाढलेला आवाज .... घरी, आपल्याला हवा तसा, ध्वनी तरंग, ठेवता येतात.
2. आजूबाजूला हमखास, त्रासदायक मंडळी येतात... रडणारे बाळ तर येतेच येते ...
3 Feb 2021 - 7:31 pm | अमर विश्वास
मुवि ....
संगीत मेहेफीलीत ऐकायची मजा काही औरच असते ...
तुम्ही म्हणता तसे काहीवेळा माईक / साऊंड सिस्टिम असे टेक्निकल प्रॉब्लेम्स रसभंग करतात .. पण माझा तरी अनुभव बराचसा पॉझिटिव्ह आहे ..
3 Feb 2021 - 9:13 pm | मुक्त विहारि
तुम्हाला आणि मला, दोघांनाही वाद्य संगीत आवडते ... इथे एकमत आहे ..
पण, आस्वाद घ्यायची ठिकाणे, वेगवेगळी आहेत...
आमच बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, माध्यमे बदलली तरी, ज्ञान लालसा तीच राहिली. भुर्जपत्रे ते संगणक, हा प्रवास हेच दाखवतो.
तस्मात, आनंद घेत रहायचा ...