मला काही काही वेळा असं वाटायचं की माझ्या मनात एक बाईपण लपलेलं आहे. पुरुषासारखा पुरुष मी पण काही वेळा असं वाटायचं खरं. हा प्रॉब्लेम आता सांगायचा कुणाला. सौंदर्यशास्त्र , आधुनीक चित्रकला वगैरेचा अभ्यास तेव्हा करत होतो. त्यात काही वेळा अशा चमत्कारीक कल्पना मांडलेल्या असायच्या. त्या कशा वेल डिफाईंड संकल्पना होत्या. फार चमत्कारीक वाटायला लागलं होतं. महर्षी दयानंदचा मी विद्यार्थी.राकटपणा, मस्ती, मारामारी म्हणजे आमच्या करीकक्युलम मधला भाग.पण आता काहीतरी वेगळं वाटायला लागलं होतं.भिती वाटत होती .लॅटंट होमोसेक्शुआलिटी वगैरे शब्द आठवायला लागले. त्यावेळी रघु तीन महिन्याचा होता.मी एकदा धीर करून बायकोला सांगूनच टाकलं.
ती रघुला थोपटत निजवत होती. पाच दहा मिनीटं माझं पुराण ऐकल्यावर तिनं रघुनंदनला बाजूला ठेवलं.
मला म्हणाली काय वाचतोयेस सध्या. मी हातातलं पुस्तक दाखवलं.
बिभीषण दंजेवार आणि जॉन मुडोस्कीच्या कवितातींल आदीम संवेदनांचे तौलनीक परीक्षण.
हसून म्हणाली . असलं वाचल्यावर काहीतरी परीणाम होणारच डोक्यावर.मुलाला बाजूला ठेवून म्हणाली.
दिवे मालव आणि ये माझ्याजवळ.
अर्ध्या तासानी अंधारात परत खळखळून हसली अगदी ठसका लागेस्तो.
आता काय झालं?मी विचारलं.
काही नाही आतापर्यंत तुझ्या मैत्रीणींवर गस्त घालत होते, आता तुझ्या मित्रांवर पाळत ठेवावी लागणार का काय ?
परत एक हसण्यची उबळ.मला ज्याम बावळटासारखं वाटायला लागलं.
मग एकदा किरणला (माझा डॉक्टर मित्र) विचारलं तो म्हणाला
नाना, याला मराठीत वात्सल्य म्हणतात.बाप झाल्यावर असं वाटतंच.वात्सल्य एमेच्या अभ्यासक्रमात नसतं.असा तिरकस बाण मारून तो पण मोकळा झाला.मग मनाचं समाधान झालं .
----------------------------------------------------------------------------------------------
एका हातात चादर आणि एका हातात उशी घेउन रात्री कधी कधी रघु बेडरूम मध्ये येतो.
बाबा ,उठा ना .
काय झालं रे .मी इथे तुमच्याजवळ झोपतो.
का रे बरं नाही का?
बाहेर पाल आहे बाबा.माझ्या पांघरुणात येत होती.
मी सरकून जागा करून देतो.माझ्या दंडावर डोकं टेकून तो शांत झोपतो.माझं मन अशावेळी वात्सल्याच्या पूरात वाहून जातं.
खिडकीच्या काचेतून चंद्राचा प्रकाश झिरपत त्यच्या चेहेर्यावर पडलेला असतो. मधेच तो झोपेत हसतो.मी त्याच्या चेहेर्याकडे टक लावून बघत राहतो.वात्सल्याच्या या उमाळ्याला मी घाबरत होतो.आत्ता या घडीस मी पुरुष पण नसतो आणि स्त्री पण.पोटच्या पोराची लागलेली माया अलैंगीक असते.मी त्याचं एक संरक्षक कवच असतो. माझी पालकत्वाची आस तो पूर्ण करत असतो. एका पूर्णत्वाच्या भावनेनी मी नाहून निघतो.
पण थोड्या वेळानी रघू जागा होतो.
बाबा, आपण बाहेर जाऊ या हॉलमध्ये?मला काही
का रे?
बाळी एकटीच आहे बाहेर.तिचं तोंड उघडं असतं झोपेत.तिच्या तोंडात पाल गेली तर?
चल जाऊ या बाहेर.आम्ही बाहेर हॉलमध्ये जातो.
आम्ही बाहेर हॉलमध्ये जातो.
बाबा , झोप येत नाही येत. चंद्रूची गोष्ट सांगा ना.
बाळा ,रात्रीचे तीन वाजलेत.
सांगा ना बाबा.
माझा नाईलाज असतो.
त्या दिवशी किरण काकाचा फोन आला तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते.........
---------------------------------------------------------------------------------------------
नाना,पंधरा बेडशीट पाहिजेत.
पाठवतो सकाळी.
नाना सकाळी नाही आत्ता हव्यात.
अरे आत्ताच आलो मी गोडाऊन बंद करून.
नाना, बर्न केस ऍडमीट केली आहे.किरणचा आवाज जरा उतरलेला आला.
ठिक आहे .येतो मी. तासाभरात.
हॉस्पीटलला पोचलो तेव्हा थंकम्मा वाट बघत होती.
नाना, लाव जल्दी.स्टेराईल करनेका है. सुबाह मे दो हार्नीया है. उसका ड्रम नही लगाया अभीतक..मालूम नही कैसा बर्न का ऍडमिशन किया सर ने..तिची बडबड सुरु होती.
किरण किधर है? स्पेशल वॉर्ड कडे खूण करत म्हणाली.अंदर. पोलीस केस है ना. स्टेटमेंट ले रहे रहे.
सत्तर परसेंट बर्न है..जल्दी करना पडताय..
एव्हढ्यात किरण बाहेर आलाच. सोबत एक हवालदार आणि एक इंस्पेक्टर.
नाना हे बबनराव साळूंके
हे नाना ,माझे मित्र .बबन रावांच लक्ष नव्हतं.
बघा ,डॉक्टर मला गडबड वाटते.
तो भैया गेला कुठे
त्याला सिरम आणि सोफ्रातुलेचा स्टोक आणायला गेलाय.
डिपॉझीट भरलं का?
नाही अजून , ठाकूरनी पाठवलेली केस आहे. सिव्हीलची ट्रान्सफर आहे.
त्या भैयाला पाठवा आला की. आणि किरण या ठाकूरच्या केसेस घेऊ नका . साला लीडर आहे म्हणून नाहीतर भडवा आतच ठेवायच्या लायकीचा आहे.
साळूंके साहेबांना चहाचा कप हातात देत थंक्कामा म्हणाली
अभी सुबहतक चाय नही मिलेगी. मै घर जाती. सात बजे आउंगी. हां और एक बात दूध खतम हो गया. रात को बाबाको क्या देगा?
असं म्हणायला आणि बाळाचा रडण्याचा आवाज आला.
ये सुवर्णा किधर गयी.
ए मावशे , बच्चे को ला बाहर.
सुवर्णा एका बाळाला घेऊन बाहेर आली.
गोरंपान हेल्दी बाळ.उजेडात आल्यावर डोळे दिपल्यामुळे एकदम गप्प झालं.
चायला हे पोरं कोणाच?
तिचंच.
म्हणजे ?
बर्न केस .सुधा ठाकूर.
आनि तुम्ही का सांभाळताय?
त्याचा बाप गेला भाईर म्हणून.सुरेखानी माहिती पुरवली.
केस पेपर बनवला?
त्याचा कशाला?
च्यायला डॉक्टर लोकांना अक्कल कमीच.पोर आजारी पडलं काय झालं तर ?
त्या भडव्यानी उद्या केस ठोकली तर काय घरी घेऊन जाणार त्याला.
आता पोर किंचाळायला लागलं होतं.
साळूक्यांनी चहाचं एक बोट चाटवलं.पोर दहा सेकंद गप्प बसलं.
नाना ,प्लीज एखादी बॉटल आहे का घरी?
नाही हो आमच्याकडे अजून बाटली नाही.
हे पोर पण बाटली न्हाय घेणार. सुरेखानी पुरवणी जोडली.
पोर आता फारच टेंभळायला लागलं होतं.
किरण साहेब पेपर बनवा त्या पोराचा आणि मग ठेवा हितं.
आदेश देऊनसाहेब निघून गेले.किरणचा चहा तसाच पडला होता. सुवर्णानी चमच्यानी बाळाला चहा पाजयला सुरुवात केली.
पोट जर्रा भरल्यावर फुरक्या मारण्याचे खेळ सुरु झाले.मग एकदा जोरात मुती आणि रडायला सुरुवात.
नाना,उगाच डॉक्टर झालो रे .लग्नाचा पत्ता नाही आणि पोरं सांभाळतोय.
उद्या सकाळी दोन हार्नीया आहेत डॉक्टर कोर्यांची. ओटी सेट नाही अजून. नाना प्लीज थांब थोडा वेळ.
मी तोपर्यंत सुरेखाकडून ओटी तयार करून घेतो.
बाळ माझ्या हातात.
आता त्यानी खिदळायला सुरुवात केली. सहा महिन्याचं असणार.आपण बोललो की रीस्पाँस देत होतं.
खाली ठेवलं की हातापायाची सायकल जोरात चालू.
माझं लक्ष नाही म्हटल्यावर रडायला सुरुवात. मी त्याला कडेवर घेऊन खिडकीपाशी उभा राहीलो. थोड्या वेळानी पेंगुळल पण झोपेना.
त्याची झोपेची दवा नाही तुमच्याकडं.सुरेखा पाठीमागून येऊन म्हणाली.द्या हिकडं.बाळाला आपल्याला हवं असलेलं आसपास असल्याचं कळलं असावं.रडणं वाढलं.
माझ्याकडे नाही रे बाबा . त्याला ते कळेना. हातापायाची सायकल जोरात सुरु.
नाना , पाठ करा , तो भैय्या आला तवा सांगा.
सुरेखानी पोलकं एका बाजूनी वर करत सांगीतलं.
मी पाठ करून उभा राहीलो.काय चाललं आहे ते सांगायला पाठीला डोळे नको होते. चुर्रुप पुर्रुप चे आवाज येत होते.
मला हसायला यायला लागलं.
हसताय काय नाना? पोर रडतंय.आनि मला बी काही कमी नाई.
घरच्या पोरान्ला नाही नाईटला पाजत.म्हून याला घेतला.
दुपारी थंक्कूनी पाजला.
थंक्कूनी ?
मग? तिची तं जूळी हायेत घरी.
नशीबवान आहे पोर.
फाटलं नशीब पोराचं.आईस हाये ईस वर्षाची. बाप हाए तेव्हढाच.
कवडी नाही खिसात. ही ब्राह्मण आन त्यो ठाकूर.
भांडण झाला नी पेटवून घेतला . तो भैया काय करतो.
मुडदा वाचमन हाये ठाकूर शेठचा.
आलंच बा हे सोंग .
माझ्यापाठी एक बॉडीगार्ड सारखा माणूस येऊन उभा राहीला होता.
त्यानी न बोलता मुलाला घेतलं आणि विचारलं दवा रख्खा हू कांटरपे. डाक्टर साब किधर है.पोर झोपेत कुरकुरलं.
सुरेखाच्या चेहेर्यावर एक उजाळा मला दिसला.पोट पोराचं भरलं आणि तृप्ती आईच्या चेहेर्यावर खुलत होती.
पुरुषांना हे सुख कधीच मिळणार नाही, उगाचच माझ्या मनात काहीतरी आलं
---------------------------------------------------------------------------------------------
घरी रात्री पोहचता पोहचता उशीर झालाच. काय्य हे किती उशीर. रघू वाट बघून झोपलां.मग सगळी स्टोरी मी डीटेलवार सांगीतली.
आईगं -अय्या-आपण जाऊच या उद्या -पण काय हो?-लाज नाही मेल्यांना -आणि अशा अनेक चित्कारानंतर आम्ही झोपलो. रात्री झोपेत बाळ येत होतं.खरं म्हणजे दुसर्या दिवशी जायची मला काहीच आवश्यकता नव्हती पण बुलावा आल्यासारखा मी किरण कडे गेलोच.किरण सुधा सिंगचं ड्रेसींग बदलत होता.भय्याच्या बरोबर आता एक चश्मेवाली बाई बसली होती.लडीवाळ चाळे करत बोलत होती. चाळीशीची बाई आणि भय्या कुजबुजत असतानाच किरण बाहेर आला.
ये बच्चेको आप लेके जाओगे क्या?
यावर ती बाई म्हणाली
नाही गं बाई मला असते शाळा सकाळची. किरणनी एक सुस्कारा सोडला.
इसके नानाजीके घर लेके जाओ ना.ये हॉस्पीटल है.उसकी मा सिरीयस है.मेरेपास स्टाफ की कमी है.
भय्या एक नाही आणि दोन नाही. ठीक है तो बच्चेकी ऍडमिशन दिखानी पडेगी पेपरपे.
सुवर्णानी मला खूण करून बाजूला बोलावलं.ती रांड त्याची रखेल आहे.या दोघांनी मिळूनच जाळलं असणार.तू सांग हे साळूंके साहेबाला.यावर ती म्हणाली
मेला साळूंके तो. कालच भय्यानी त्याला पाच हजार दिलेत.
हिचं माहेर असेल ना? ते लोक आहेत कुठे?
ते ब्राह्मण.त्यांनी सांगीतलं आमची पोरगी दोन वर्सापूर्वीच मेली.फोन बी करू नका.
बाळ आता त्या बाईकडे होतं.आज दूधाची बाटली पण आलेली दिसली. पण निपल तोंडात घेतलं की पोर रडायला सुरुवात करायचं.थक्कांम्मानी घेउअ पाह्यलं. सुवर्णानी निपल तोंडात घालून पाहिलं. नाही म्हणजे नाही .इतक्यात मी विचारलं साखर आहे का त्यात्?सुवर्णाच्या डो़क्यात काय आलं कुणास ठाउक. पालथ्या हातावर बाटलीतलं दूध चार थेंब टाकून बघीतलं आणि त्या बाईवर ओरडायला सुरुवात केली.
अगं पण तुला समजेना .
बाई आहेस का काय.उकळतं दूध तुझ्या बापानं बाटलीत भरलं होतंका कधी.?
पंधरा विस मिनीटं जुगलबंदी चालू होती.शेवटी बाळ दूध पिऊन झोपल्यावर बाई पळालीच.
----------------------------------------------------------------------------------------------
मोठे प्रॉब्लेम त्यानंतरच्या आठवड्यात सुरु झाले.डीपॉझीट नाही. औषधं नाहीत.आणि अभिमन्यू सिंग फरार.किरणनी त्याच्याकडली होती नव्हती तेव्हढी औषधं वापरून टाकली. भैय्याचा पत्ता नाही.सुधा सिंगची कंडीशन खालावत जात होती.दिवसातल्या फार थोड्या वेळासाठी ती शुद्धीवर असायची.चंद्रू म्हटलं की डोळे उघडायची . बाळाचं नाव चंद्रवदन होतं ते आता मला कळलं होतं.रूम मध्ये आता घाण वास यायला सुरुवात झाली होती.एकेक दिवस सुधा मृत्युच्या जवळ जात होती. नवर्याचा पत्ता नाही. चादरी पण कमी पडायला लागल्या.बाकीचे पेशंट वास येतो म्हणून कुरकुर करायला लागले. किरण आता प्रेशर खाली यायला लागला होता.साळूंके साहेबांनी मदत केली. अभिमन्यूचा ठाव ठिकाणा शोधला. त्या दिवशी रात्री मी तिथेच होतो. रात्री साडेबारा वाजता अभिमन्यू सिंग आला. पैसे नाहीयेत म्हणून मोकळा झाला. किरणचा चेहेरा रडवेला झाला. सात दिवसाची मेहेनत पाण्यात. बाबांना काय ऊत्तर द्यायचं त्याला काही सूचेना. मी बाबांशी फोन वर बोललों नाईलाज होता.सुधा सिंगचे डिसचार्ज पेपर बनवले. चंद्रू झोपला होता.
उसको कल सुबह मै लेके जाता हूं. आता किरण खवळला.
तुम उसको लेके जाव नही तो मै डिसचार्ज पेपरमे नही साईन करता. असं म्हटल्यावर तयार झाला.
सोबत ती चिपडी होतीच.अँब्यलन्स आल्यावर मी निघालो.एकदा चंद्रवदनला जवळ घेतलं
बाळा , इथ पर्यंतच आपली सोबत होती असं मनात म्हणताना माझ्या डोळ्यात पाणी आलं.
----------------------------------------------------------------------------------------------सकाळी वॉचमननी हॉस्पीटलची बेल कर्कश्श वाजवली. सुवर्णा शिव्या घालतच उठली. गुरखा बाहेर उभा होता. लिफ्टमे बच्चा किसका है. धावत जाऊन बघीतलं तर चंद्रू लिफ्टच्या फ्लोरवर रडत होता.
अभिमन्यू सिंग पोराला लिफ्टमध्ये ठेवून पसार झाला होता.
----------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
27 Jul 2008 - 5:53 am | भाग्यश्री
ओह गॉड, कशी असतात माणसं.. मग, तुम्ही आणलं का त्याला घरी? भाग एक आहे, म्हण्जे दुसरा पण येतोय.. लवकर येऊदे.. तुम्ही सुंदर लिहीता!
27 Jul 2008 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रामदास, तुमचे कथा लेखन मिपाचं वैभव आहे, आणि वाचक म्हणुन आमची संवेदनांची परिक्षा.
क्रमश नका करु हो !!! :) एकाच बैठकीत वाचन झालं पाहिजे.
आता पुढील भाग येईपर्यंत काय काय कल्पना करायच्या ? त्या लेकराचं पुढं काय झालं ? उगाच रविवारची सकाळ डिस्टर्ब केली राव तुम्ही आमची !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
27 Jul 2008 - 11:57 am | बिपिन कार्यकर्ते
१०१% सहमत...
आधी असं जीवघेणं लिहायचं, वर क्रमशः टाकयचं, जीव जायचा एखाद्या वाचकाचा.... :)
बिपिन.
27 Jul 2008 - 8:26 pm | मेघना भुस्कुटे
मीपण १०१ % सहमत. प्लीज लवकर लिहा...
27 Jul 2008 - 10:10 am | यशोधरा
रामदासजी, लवकर पुढचा भाग टाका!!
तुमचे कथा लेखन मिपाचं वैभव आहे, आणि वाचक म्हणुन आमची संवेदनांची परिक्षा.
क्रमश नका करु हो !!! एकाच बैठकीत वाचन झालं पाहिजे.
आता पुढील भाग येईपर्यंत काय काय कल्पना करायच्या ? त्या लेकराचं पुढं काय झालं ? उगाच रविवारची सकाळ डिस्टर्ब केली राव तुम्ही आमची !!!
अगदी, अगदी!!
27 Jul 2008 - 10:51 am | विद्याधर३१
क्रमश: बाबतीत पिडा काकांचा आदर्श ठेवला पाहीजे.
क्रमश: अतिशय योग्य जागी.. वाचकांची उत्सुकता वाढवणारा.( या बाबत रामदासजी आपणही योग्यच आहात.) आणी २ दिवसात पुढचा भाग.
तेंव्हा पुढचा भाग लगेच येउ द्या.
विद्याधर
27 Jul 2008 - 10:54 am | शैलेन्द्र
रामदासजी, तुमचि कथा मी एकटा असताना वाचतो, चार जनात रडायची लाज वाट्ते अजुनही...
27 Jul 2008 - 11:02 am | अभिज्ञ
वा!
रामदासबुवांचा अजून एक फर्मास लेख.
लेखनशैली जबरा.
पुढचा भाग हि लवकर येउ द्यात.
27 Jul 2008 - 10:11 pm | प्रियाली
अतिशय मोकळी लेखनशैली. वाचकांना खिळवून ठेवणारी.
पु.ले.शु.
27 Jul 2008 - 11:29 am | स्वाती दिनेश
पी सी,जेसी नंतर ही एकदम वेगळीच कथा! किती बहुपेडी लिहिता ! अभिनंदन!
आता पुढील भाग येईपर्यंत काय काय कल्पना करायच्या ? त्या लेकराचं पुढं काय झालं ? उगाच रविवारची सकाळ डिस्टर्ब केली राव तुम्ही आमची !!!
हेच म्हणते.
स्वाती
27 Jul 2008 - 11:42 am | मदनबाण
काका फारच सुरेख्,,वाचताना कुठेही लिंक तुटली नाही..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
27 Jul 2008 - 1:34 pm | विनायक प्रभू
गत आयुश्यात अश्या किति तरि टोपल्या डोक्यावर वाहिल्या. बद करुन समुद्रात फेकल्या. पुन्हा परत चक्र सुरु केलेस रे रामदासा.
विनायक प्रभु
27 Jul 2008 - 7:36 pm | डॉ.प्रसाद दाढे
रामदासजी, तुम्ही फारच जीवघेणे लिहिता हो! अफाट प्रतिभा लाभली आहे तुम्हा॑ला. सर्वच क्षेत्रात तुमचा स॑चार दिसतो. हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर इ गोष्टी॑ एकदम परफेक्ट लिहिल्या आहेत. मागे पिसी-जेसीच्या वेळा मी अ॑दाज केला होता की तुम्ही बॅ॑केत कि॑वा पोलिसात असाल. आता वाटते आहे डॉक्टर असाल.
पित्याच्या मनातले वात्सल्याचे भाव अगदी अचूक आहेत. किरणची अगतिकताही सुरेख मा॑डली आहेत. शासकीय- निमशासकीय रूग्णालयात असेच अनुभव येतात. डॉक्टरला ड्युटी म्हणून माणूसकीला काळिमा फासणारी कृत्य उघड्या डोळ्या॑नी पाहावी लागतात पण तो अगतिक असतो..
27 Jul 2008 - 11:25 pm | इनोबा म्हणे
रामदासजी, तुम्ही फारच जीवघेणे लिहिता हो!
हेच म्हणतो
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
27 Jul 2008 - 8:32 pm | संजय अभ्यंकर
आपण दोघेही इतके सुंदर लेखन करता.
मिपा वर प्रकाशित झालेल्या कथा व लेखन, आपण पुस्तक रुपाने प्रकाशित कराव्यात हा आमचा आग्रह आहे.
तात्यांनु, कॉपीराईटचे तेवढे सांभाळा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
27 Jul 2008 - 10:50 pm | बिपिन कार्यकर्ते
पूर्ण सहमत..... तात्या, काय करता येईल?
बिपिन.
28 Jul 2008 - 9:02 am | मेघना भुस्कुटे
काय करता येईल, तात्या?
27 Jul 2008 - 8:13 pm | धनंजय
पाझरते आहे.
त्या बाळाला एक गोष्ट देता आली नाही खरे आहे, पण वत्सल्याचा झरा वाहातो आहे.
28 Jul 2008 - 3:58 am | गुंडोपंत
अगदी अचूक पकडता बुवा तुम्ही मनातल्या दुखर्या कोपर्याला.
वर सगळ्यांनी म्हंटलेच आहे तेंव्हा 'तेच'!
आपला
गुंडोपंत
28 Jul 2008 - 8:03 am | पिवळा डांबिस
मी सरकून जागा करून देतो.माझ्या दंडावर डोकं टेकून तो शांत झोपतो.माझं मन अशावेळी वात्सल्याच्या पूरात वाहून जातं.
खिडकीच्या काचेतून चंद्राचा प्रकाश झिरपत त्यच्या चेहेर्यावर पडलेला असतो. मधेच तो झोपेत हसतो.मी त्याच्या चेहेर्याकडे टक लावून बघत राहतो.वात्सल्याच्या या उमाळ्याला मी घाबरत होतो.आत्ता या घडीस मी पुरुष पण नसतो आणि स्त्री पण.पोटच्या पोराची लागलेली माया अलैंगीक असते.मी त्याचं एक संरक्षक कवच असतो. माझी पालकत्वाची आस तो पूर्ण करत असतो. एका पूर्णत्वाच्या भावनेनी मी नाहून निघतो.
प्रत्येक पित्याला येणारा हा वात्सल्याचा अनुभव!! पुरुषत्वातून पालकत्वात होणारं ते संक्रमण तुम्ही सुरेख चित्रित केलंय!! जियो!!
काही नाही आतापर्यंत तुझ्या मैत्रीणींवर गस्त घालत होते, आता तुझ्या मित्रांवर पाळत ठेवावी लागणार का काय ?
परत एक हसण्यची उबळ.मला ज्याम बावळटासारखं वाटायला लागलं.
=))
सहाजिक आहे!!!! बाकी आमच्या वहिनी सॉलिड स्मार्ट आहेत हो!!!!
;)
28 Jul 2008 - 12:26 pm | नंदन
मी सरकून जागा करून देतो.माझ्या दंडावर डोकं टेकून तो शांत झोपतो.माझं मन अशावेळी वात्सल्याच्या पूरात वाहून जातं.
खिडकीच्या काचेतून चंद्राचा प्रकाश झिरपत त्यच्या चेहेर्यावर पडलेला असतो. मधेच तो झोपेत हसतो.मी त्याच्या चेहेर्याकडे टक लावून बघत राहतो.वात्सल्याच्या या उमाळ्याला मी घाबरत होतो.आत्ता या घडीस मी पुरुष पण नसतो आणि स्त्री पण.पोटच्या पोराची लागलेली माया अलैंगीक असते.मी त्याचं एक संरक्षक कवच असतो. माझी पालकत्वाची आस तो पूर्ण करत असतो. एका पूर्णत्वाच्या भावनेनी मी नाहून निघतो.
-- 'बाप' वाक्ये!
चंद्रू म्हटलं की डोळे उघडायची
-- यासारखी छोटी पण पॉवरफुल, जीवघेणी वाक्यं हे तुमच्या लेखनाच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक म्हणावं लागेल. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
28 Jul 2008 - 4:02 pm | मनिष
बाकी प्रतिक्रिया भाग २ मधे!;)
- (क्रमशः प्रतिक्रिया लिहून सूड उगवणारा आसुरी) मनिष :)
ह. घ्या! :)
29 Jul 2008 - 12:59 am | चतुरंग
रामदास, तुमची प्रतिभा बघून थक्क झालोय!
टोटल सरंडर!!
चतुरंग
2 Jun 2012 - 7:00 pm | रघु सावंत
अफाट प्रतिभा लाभली आहे तुम्हा॑ला. सर सलाम त्रिवार सलाम =रघू सावंत
17 Jun 2016 - 8:04 pm | मराठी कथालेखक
छान कथा
पण उद्गारवाचक चिन्हांच्या अभावामुळे वाचताना थोडा गोंधळ उडाला.
27 Jan 2021 - 8:47 pm | NAKSHATRA
रामदासजी, तुम्ही फारच जीवघेणे लिहिता हो! अफाट प्रतिभा लाभली आहे तुम्हा॑ला. सर्वच क्षेत्रात तुमचा स॑चार दिसतो. हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर इ गोष्टी॑ एकदम परफेक्ट लिहिल्या आहेत. मागे पिसी-जेसीच्या वेळा मी अ॑दाज केला होता की तुम्ही बॅ॑केत कि॑वा पोलिसात असाल. आता वाटते आहे डॉक्टर असाल.
पित्याच्या मनातले वात्सल्याचे भाव अगदी अचूक आहेत. किरणची अगतिकताही सुरेख मा॑डली आहेत. शासकीय- निमशासकीय रूग्णालयात असेच अनुभव येतात. डॉक्टरला ड्युटी म्हणून माणूसकीला काळिमा फासणारी कृत्य उघड्या डोळ्या॑नी पाहावी लागतात पण तो अगतिक असतो..
28 Jan 2021 - 9:46 pm | सौंदाळा
प्रतिसाद तरी स्वतःचा द्या
नुसती उचलेगिरी
1 Feb 2021 - 9:44 pm | शाम भागवत
हा हा हा.
पण तसेच असेल असं नाही.
फक्त
खाली। अगदी अगदी
किंवा +१ वगैरे लिहायचे राहीले असावे.
हे सगळं संशयाचा फायदा मिळावा म्हणून लिहितोय. ;-)