पेन..
कितीही प्रामाणिकपणाचा आव आणला तरी आयुष्यात एका गोष्टीची चोरी आपण सगळ्यांनीच केलीये/अजूनही करतो...
पेन !!!
ह्यात प्रामुख्याने दोन प्रकार येतात,
चोरी केलेला पेन आणि जवळ राहून गेलेला पेन...
आठवणीने वापस केलेला पेन ही कॅटेगरी आता नामशेष झालीये..एवढासा पेन, त्यात काय वापस करायचं?
'चोरी गेलेले पेन' ही एक पॅरालल इकॉनॉमी आहे. ह्यांच व्हॅल्यूएशन रिलायन्सच्या मार्केट कॅपिटल एवढं नक्कीच असेल.हर्षद मेहता सिरीजमध्ये शेयर मार्केट आणि मनी मार्केट ह्यांचा उल्लेख आहे. ह्यांच्याच आसपास, पण न दिसणारं एक पेन मार्केटसुद्धा आहे. प्लॅटफॉर्म नंबर पौने दस सारखं!
ह्या मार्केटची मोडस ऑपरेंडी साधारण खालीलप्रमाणे,
पहिल्याने पेन विकत घ्यायचा, दुसऱ्याने तो चोरायचा, काही दिवस वापरून हरवायचा. मग पहिल्याने परत पेन विकत घ्यायचा. इथं पहिला आणि दुसरा कधीही इंटरचेंज होऊ शकतात. त्यात तिसरा,चौथा अप टू इंफिनिटी कितीही लोकं येऊ शकतात. मुळात इथं काही नियम नाहीयेत.
"अ पेन, वन्स ईट इंटर्स इन दी मार्केट, कॅन नायदर बी सोल्ड नॉर कॅन बी बॉट. ओन्ली दी ओनरशिप कॅन बी चेंज्ड विदआऊट इंटिमेशन टू दी प्रायमरी ओनर. धिस सायकल कॅन बी रिपीटेड फॉर 'एन' नंबर ऑफ टाईम्स अनटिल द पेन इटसेल्फ डिसॅपियर्स फ्रॉम दी मार्केट"
काही लोकांनी पेनला बांधून वगैरे ह्या मार्केटला आळा घालायचा प्रयत्न केला पण दोरीसकट पेन गायब व्हायला लागल्यावर त्यांनी प्रयत्न थांबवले. त्यातल्या त्यात आपलं होणार नुकसान जर कमी करायचं असेल तर पेन विकत घेताना त्याच्यासोबत रिफिल्स कधीच घेऊ नयेत. कारण रिफिल संपेपर्यंत पेन आपल्याजवळ राहील हा दुर्दम्य आशावाद काहीच कामाचा नाहीये.
मला गिफ्ट मिळालेला अन थोडासा महागडा पेन काही दिवसांनी हरवला. त्यात मला काही विशेष वाटलं नाही. पण जवळजवळ सहा महिन्यांनी तो पेन माझ्याजवळ परत आल्यावर मी अवाक झालो.शेवटी 'आपलं काही जमणार नाही भौ!' असं म्हणून स्वतः त्या पेनचा त्याग केला.
मानवजात नष्ट झाल्यावर करोडो वर्षांनी उत्खननात जेंव्हा अब्जावधी पेन सापडतील तेंव्हा सगळ्या आकाशगंगेतले लोकं पृथ्वीवरच राहत होते का असा प्रश्न त्या शास्त्रज्ञांना पडल्याशिवाय राहणार नाही.
समाप्त
(देव न करो, पण उत्खननात जर त्याच पेनांनी लिहीलेलं माझं लिखाण सापडलं तर पृथ्वीवरील मानवजात अचानक नष्ट का झाली ह्याचही उत्तर मिळून जाईल!!)
-- चिनार
प्रतिक्रिया
18 Jan 2021 - 12:06 pm | मुक्त विहारि
पेन न हरवलेला माणूस, देवत्वाला पोहोचतो,
आमच्या घरात, माझेच पेन ऐनवेळी जागेवर मिळत नाहीत,
हरवलेले पेन्स, नेमके बायकोच्या पर्स मध्ये मिळतात, हा निव्वळ योगायोग आहे,
तिच्या मते, मी आणलेले पेन्स जादूचे असतात, ते अचानकच, तिच्या पर्स मध्ये शिरतात, बायको बरोबर, अशा गोष्टींच्या बाबतीत, वाद घालू नये, इतपत शहाणपण, नक्कीच आहे,
त्यामुळे, एकाच वेळी, 7-8 पेन्स आणलेले परवडतात
18 Jan 2021 - 12:32 pm | खेडूत
हे हे! सहमत.
त्यामुळेच कंपन्या दाहाचे पॅक विकतात. लोकांना वाटतं घाऊक घेताना स्वस्त पडावं म्हणून दहाचा पॅक विकतात..
आजकाल कागदावर लिहितोच कोण असाही एक मतप्रवाह आहे, पण नाही म्हणलं तरी कागद आणि पेन अजूनही काही प्रमाणात वापरावे लागतात.
तीन रुपयात मिळणारे यूज अँड थ्रो पेन मी वापरतो, तेच आता जगात सर्वाधिक लोकप्रिय असावेत! :))
18 Jan 2021 - 1:38 pm | ज्ञानोबाचे पैजार
३ रुपये वाला पेन सगळ्यात बेस्ट असतो, आणि तो इतरां पेक्षा लिहितोही सुरेख.
लेख आवडला हेवेसांनलगे
पैजारबुवा,
18 Jan 2021 - 4:42 pm | मुक्त विहारि
शिवाय, तुम्हाला एक पण खरेदी धड जमत नाही, असा घरचा आहेर मिळतो.
जाऊ द्या, "आपलेच पेन आणि आपलीच बायको," अशी समजूत करून घ्यायची.
शिवाय, पेनापेक्षा बायको महत्वाची
18 Jan 2021 - 5:08 pm | चौथा कोनाडा
+१
"आपलीच बायको अन आपलेच पेन्स"
:-)
18 Jan 2021 - 3:16 pm | टवाळ कार्टा
=))
18 Jan 2021 - 7:43 pm | मदनबाण
बरीच पेन वापरली, शाई पेन पासुन बॉलपेन आणि पायलट पेन पासुन जेल पेन. सुवासिक शाईचे बॉल पेन देखील वापरुन झाले आहे. :)
शाळेतील वर्गात पेन पेन खेळण्याचा आनंद शब्दात वर्णन करणे कठीणच ! स्टेशनरीच्या दुकानातील विवध पेन पाहुन वेगळीच गम्मत वाटायची, महागडा पेन घेण्याचा हट्ट देखील आठवतो.
कळफलक बडवता बडवता पेनाची सोबत कधी सुटली ते कळलेच नाही... तरी देखील हापिसात जाताना खिशात पेन अडकवलेले असते, जरी त्याचा वापर फार क्वचित झाला तरच ! पेनाची सवय सुटल्याने हाताने लिहायची सवय कधी सुटली ते देखील समजले नाही.
विनायक प्रभू मोड ऑन { पेन वापरत राहवा नाहीतर नंतर तो "चालणे" बंद करतो ! :))) } विनायक प्रभू मोड ऑफ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
18 Jan 2021 - 7:56 pm | कानडाऊ योगेशु
गंमतीशीर लेख.
रेल्वेचे रिझर्वेशन जेव्हा रिझर्वेशन काऊंटरवरच होत असे तेव्हा तिथे बरेच पेन गायब झालेले अथवा मिळालेले आहेत. ह्यावरचा एक उपाय म्हणजे टोपण आपल्याजवळ ठेवुन फक्त बाकिचे पेन देणे पण तेव्हाही फक्त टोपणच शिल्लक राहिले अथवा टोपण रहीत पेन स्वतःकडे राहिले असेही झालेले आहे. अर्थात हे कोणी हेतुपुर्र्सर करत नसावेत.
अजुन एक आठवण म्हणजे बारावीला असताना कुठल्याश्या कामानिमित्त कॉलेजच्या ऑफिसात जावे लागले होते. बहुदा विद्यार्थ्यांसाठी सुटीचा दिवस असावा आणि त्यामुळे मोकळ्या हाताने आलो होतो.आणि तेव्हा नेमकी सही करायची आवश्यकता निघाली. आणि तेव्हा नेमका माझ्याकडे पेन नव्हता त्यावेळी तिथल्य शिपायाने विद्यार्थी असुन पेन जवळ नाही असे म्हणुन बरेच रागे भरले होते होते. त्याचा इतका मोठा परिणाम झाला होता कि सुवासिनी जशी कुंकुवाशिवाय बाहेर पडत नाहीत तसा मी ही कायम पेन लावुन बाहेर जात असे.
पुढे पासपोर्ट च्या कामानिमित बेंगळुरु मध्ये असताना पोलिसठाण्यात व्हेरिफिकेशन साठी बोलावले होते तेव्हा आधीचा हा अनुभव गाठिशी होताच म्हणुन पेन सोबत घेऊनच तिथे गेलो होतो तेव्हा तिथे त्याच कामासाठी आलेले नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कामे करत असलेले काही होतकरु नग पेन मागत होते.अक्षरशः किव आली होती त्यांची तेव्हा.
पण गेल्या कित्येक वर्षात पांढर्या कागदावर रेघोट्या मारल्याचे आठवत नाही. गळुन पडलेल्या शेपटासारखा पेनही गायब झालाय.
18 Jan 2021 - 8:23 pm | Bhakti
मला खुपचं पेन मिळायचे.कधी भारी कधी साधे ,असेच फिरायचे कुठ कुठ..पण सध्या जो पेन वापरतेय तो गिफ्ट आहे
.. एक दीड वर्षापासून वापरतेय.खुप सुंदर पेन आहे ,अगदी ऐतिहासिक आहे दिसायला पेनबाबत माझी समस्या सुटली आहे.