माझी क्रिकेटची कै.कारकिर्द.
क्रिकेट आणि विश्वविक्रम यांचे अतुट नाते आहे. किंबहुना क्रिकेट हा खेळच ,केवळ नवनवे विक्रम करण्यासाठी आणि मोजण्यासाठी निर्माण झाला ,असे काही क्रिकेटपंडिताचे मत आहे.गल्ली ते मोहाल्ली ;सामना पोरासोरांचा असो वा आंतरराष्ट्रीय;नीत्य नवनवे विक्रम होतात व मोडले जातात.त्यांच्या नोंदीही होतात.पण काही मात्र दुर्लक्षित राहतात बॅटींग,बॉलींग व फिल्डींग काहीही न करता ,एकाच दिवसात क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा व इतिश्री,करण्याचा अनोखा विश्व विक्रम कुणाच्या नावावर आहे हे दुर्दैवाने आज कुणालाही ठाउक नाही .भले गल्ली क्रिकेट मधील का असेना,अर्धशतकाहून अधिक काळ विस्मृतीचे अंधारात खितपत पडलेला हा अनोखा विक्रम प्रकाशात आणण्यासाठी हा लेखनप्रपंच.आता सुज्ञ वाचकांना हे सांगायची आवश्यकता नाही की सदरचा विक्रम सदर लेखकाच्या नावी आहे.
ज्याचा जन्म,अन बालपणीचा सुरुवातीचा काळ खेड्यात गेला ;त्या माझ्या सारख्याच्या नशीबी हुतुतू ,आट्यापाट्या,खोखो,गोट्या विटीदांडू,
शिवणापाणी,लपाछपी,दगड की माती, लगोरी,अशा शुद्ध देशी खेळा व्यतिरिक्त ,विदेशी खेळ खेळण्याची तर जाउ दे, ते माहिती असण्याची शक्यता पण दुर्मिळ.त्या काळात रेडिओच दुर्मिळ होता. 'खुळ्याचे खोके' '(इडीयटबॉक्स)अजून आलेही नव्हते.गल्लीत एक गुरुजी राहायचे. त्यांच्याकडे रेडिओ होता.दोन तीन वर्षातून कधीतरी,त्यांचे घरी रेडिओवर गाणे,बातम्या ,श्रुतिकाऐवजीइंग्रजी /हिंदीत अखंड बडबड आणि त्यासोबत टाळ्या,आरडाओरडा असे काही ऐकू यायचे.ते चार पाच दिवस गुरुजी रेडिओ ला कान लावून बसायचे.मधून मधून तेही ;फोर,सिक्स,आउट,असे ओरडत टाळ्या वाजवायचे,कधी डोक्याला हात लावायचे.ते असे वेड्यासारखे का करताहेत असे प्रश्न मनात यायचे.
बीडला राहणारा चुलतभाउ गावी आल्यावर ,तोंडासमोर एक
नळकांडे धरून रेडिओवरच्या त्या इंग्रजी हिंदीतल्या बडबडीची नक्कल करायचा.मी पण रेडिओ वर ऐकू यायचा तसा आरडाओरडा करून त्याला मदत करायचो. क्रिकेट नावाचा एक खेळ लोक खेळतात वत्याचे वर्णन रेडिओ वरून लोकांना ऐकवले जाते असे त्याच्या कडून कळले.पण ऐकणारे टाळ्या का वाजवतात? का ओरडतात?डोक्याला का हात लावतात ?हे कळत नसे.आम्ही पण खेळतो. मग ते रेडिओ वर का येत नाही? असे बालसुलभ प्रश्न पडायचे. पण त्याचे उत्तर आणि क्रिकेट कसा असतो हे तेव्हा कळले नाही.
पाचवीत असताना शिकायला ,बीडला गेलो.खेड्यातल्या शाळेपेक्षा इथल्या शाळेत वेगळेच वातावरण होते.मुले क्रिकेटच्या गप्पा करायची. क्रिकेटप्लेअरचे वर्तमानपत्रात आलेले फोटो कापून वह्यात चिकटवायची,
एकमेकांना दाखवायची. क्रिकेटपटूच्या फोटोचे बदल्यात फोटोची देवघेव व्हायची.म्हणजे पतौडीच्या दोन फोटोंचे बदल्यात एक सोबर्स वगैरे.हीच लेनदेन गोट्या,मोरपीसे यांच्या बदल्यात पण व्हायची.मला ते सारेच नवीन.गप्प बसून पाहायचे ,ऐकायचे.क्रिकेट नक्की कसा असतो ,हे माझ्या साठी कोडेच होते.थोडक्यात क्रिकेट च्या बाबतीत मी गावंढळ होतो.
वर्गमित्रांना विचारायची लाज वाटे.'लगान'सिनेमातील खेडवळ लोकांना एक गोरी मेम ,हा खेळ समजावून सांगते.मला माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा असलेल्या,शेजारी राहाणारे एका मिशाळ मित्राने, क्रिकेटची ओळख करून दिली. तो पण खेड्यातून नुकताच शहरातआलेला.त्यामुळे दोघांचे चांगले जमायचे.फिरायला जाताना मी क्रिकेटचा विषय काढला."ते फार सोपं असतंय, आपला विटी दांडू असतो नं तसं;फक्त विटी ऐवजी चेंडू अन दांडू ऐवजी बॅट,टोलवा टोलवीच सगळी."त्याने फारच सोपं करून सांगितलं.आणि खेळाविषयी बरीच माहिती दिली.दोन टिम असतात.एका टिममधे अकरा खेळाडू पाहिजेच.पण नसतील तरी बिघडत नाही.अगदी एका विरुद्ध एक असेही खेळता येते.खेळायला लाकडी बॅट व दगडी बॉल लागतो अन ते ही नसतील तर बॅट म्हणून लाकडी फळी व बॉल म्हणून प्लॅस्टीकचे डबडे पण चालते.तीन स्टंप सुध्दा लागतात. तेही नसतील तरी अडत नाही.भिंतीवर खडू किंवा कोळशाने रेघा मारल्या की स्टंप तयार.भिंत ही नसेल तर दगड ,चप्पल,सायकल,डबा काहीही चालते.पॅड ग्लोवज म्हणजे काय ?बॉलर बॅटसमन, विकेट किपर,फिल्डर फास्ट बॉलर, स्पिन बॉलर,म्हणजे कोण?धावा कशा काढतात? चौकार ,षटकार कसे हाणतात?आऊट कसे करतात किंवा होतात ? वगैरे खूप सारा तपशील ; त्याला माहिती होता तसा व आठवला तेवढा सांगितला.शक्य तिथे प्रात्यक्षिके पण करून दाखवली.'वत्सा तुला मी हे क्रिकेटचे गुह्यतम गुढज्ञान दिले आहे ,याचा उपयोग करून तू महान क्रिकेट पटू होशील "अशा अविर्भावात माझ्याकडे पाहून त्याने स्मीत हास्य केले.भगव्दगीता सांगितल्यावर श्रीकृष्णाने अर्जुनाचे जशी अवस्था झाली तशीच माझी झाली.गुरुदक्षिणा म्हणून त्याला समोरच्या हॉटेलात नेऊन हाफ कटींग चहा पाजला .
त्याने दिलेले ज्ञान ऐकून, मला कधी एकदा क्रिकेट खेळेन असे झाले होते.ती संधी कधी मिळते माहिती नव्हते. पण माझी तयारी सुरू झाली होती.वर्तमानपत्रात येणारे क्रिकेट च्या बातम्या कडे इतके दिवस माझे लक्ष नसायचे.आता मात्र मी त्या बातम्या वाचू लागलो.अगदी तालूका जिल्हा स्तरावरच्या स्पर्धांच्या ही. एका जुन्या वहीत मिळतील त्या क्रिकेटपटूंचे फोटो चिकटवू लागलो.मराठवाडा पातळीवर आंतर जिल्हा क्रिकेटस्पर्धेत दुसरा क्रमांक मिळालेल्या बीडच्या संघाचा ,बीडच्याच ,पेपरात आलेला फोटो पण वहीत चिकटवला होता.भारतीय आणि बाहेरच्या संघातील खेळाडूंची नावे ही माहिती झाली होती. आतापर्यंत एखादी 'गल्ली म्याच'पण पाहिली नव्हती.पण ऐकीव माहिती आधारे आणि पेपर वाचून वर्गात मित्रांसोबत क्रिकेट वर बोलण्या इतपत तयारी झाली होती.त्यांना विश्वास वाटावा म्हणून गावातल्या टिममधे मी खूप क्रिकेट खेळलो आहे अशी थाप मारली होती.
आमच्या सहावी (अ)वर्गाचा मॉनिटर आणि सहा सात मुले क्रिकेट खेळायची.पण सहावी (ब)मधली मुले ज्याम भारी होती.त्यांच्याकडे आख्खी टिमच होती.शाळा सुटली की रोज प्रॅक्टीस करायचे.सुटीच्या दिवशी तर दिवसभर ग्राउण्डवरच.एके दिवशी मधल्या सुट्टीत ,'ब 'च्या मुलांनी आमच्या मॉनिटरला 'म्याच 'खेळायचे चॅलेंज दिले.ते त्याने घेतले.
वर्गातल्या क्रिकेट खेळणारे मुलांची मिटींग बोलावली.टिम साठी दोन तीन मुले कमी पडत होती.वर्गात नेहमी दंगा करणारे दोन आंडदांड मुलांना ,केवळ दांडगाई चे निकषांवर टिममधे सामिल केले गेले.कुणीतरी माझे नाव सांगितले.मॉनिटरने ने मला बोलावले .मी गावाकडे एका म्याच मधे स्पीन बॉलींग करुन सहा गडी आऊट केले होते व एकोणचाळीस धावा काढल्या होत्या असे सांगितले. खरं तर पूरी टिम एकट्याने आऊट करून हापसेंच्युरी मारली असे सांगायची फार इच्छा होती.पण असे सांगितले तर तो मलाच क्याप्टन करील अशी भिती वाटली. नसती भानगड व्हायची,म्हणून जीभ आवरली. माझ्या तोंडून माझी कामगिरी ऐकून त्याने माझा समावेश सहावी ब विरुद्ध च्या सामन्यासाठी सहावी अ च्या टिममधे 'ऑलराउंडरप्लेअर ' म्हणून केला.बॅट किंवा बॉल कधीही हाती न धरलेला मी म्याच खेळण्यासाठी
सज्ज झालो.आठवड्यातून एक दिवस,पिटी/खेळाचा तास शेवटी ,शाळा सुटायचे अगोदर, असे.पिटीच्या सरांना सांगून खेळाचे तासात म्याच खेळायची परवानगी मिळवली होती.ते स्वतः हंपायर म्हणून येणार होते.ईतर सरांना पण बोलावले होते.शाळेच्या बोर्डवर म्याच ची माहिती व दोन्ही टिमच्या प्लेअरचे नावे कुणीतरी लिहिली होती.त्यात माझेही नाव ऑलराउंडर प्लेअर म्हणून झळकले .म्याच दुसरे दिवशीच होती.त्यामुळे प्रॅक्टीसला वेळ नव्हता.त्या दिवशी शाळेतून घरी जाताना मित्रांसोबत क्रिकेटचीच चर्चा होती.बॅट बॉल व वेळ नसल्याने घरी मनातल्या मनातच बॅटींग बॉलींग ची प्रॅक्टीस करावी लागली.रात्री झोपताना क्रिकेटचेच विचार.उद्या खरी खरी हापसेंच्युरी मारायची अन चारपाच तरी प्लेअर आऊट करायचे असे मनात ठरवले.
म्याचचे दिवशी वर्गात लक्षच नव्हते. इतिहासाचे तासात,केव्हातरी,कुठेतरी दोन राज्यातील लढाई नंतर झालेला तह आणि त्याची कलमे असा रटाळ विषय शिकवणे सुरू होते.मी क्रिकेटच्या तंद्रीत होतो.सहाजिकच माझे तिकडे लक्ष नव्हते. एक खडू भिरभिरत येऊन डोक्यावर आदळला अन पाठोपाठ "बैलोबा कुठे लक्ष आहे? " या सरांच्या प्रश्नाने माझी तंद्री भंग पावली. (तंद्री नेहमी भंगच पावत असते).नेम धरून खडू टाळक्यावर मारणे आणि बैल,बोकड,रेडा,घोडा,गाढवादी चतुष्पाद पाळीव प्राण्यांच्या ;बैलोबा,बोकडोबा,रेडोबा ,घोडोबा,अशा'आदरार्थी 'उल्लेखाने,
आपल्या द्विपाद गाळीव शिष्यांनासंबोधणे ही त्यांची खास
स्टाईल होती."काय चाललं होतं सांगा रेडोबा? कुठे होतो आपण?" सरांचा प्रश्न." काही नाही सर ..ते ..आपलं...म्या..च. "--मी.
डोक्यात जे होतं तेच ओठावर आलं."म्याच? कसली म्याच?"सरांना काही कळले नसावे . "सर तो आज क्रिकेट म्याच खेळणार आहे "कुणीतरी ओरडले. ते ऐकून सरांचा पारा आणखीनच चढला. मला जवळ बोलावले. माझा कान पिरगाळला;उरलेला तास वर्गाबाहेर उभे राहून ,तहाची कलमे पाठ करायची शिक्षा फर्मावली, तेव्हा कुठे सर शांत झाले.मी मुकाट्याने वर्गाबाहेर उभा राहिलो.घरुन येताना आणलेले शेंगदाणे खीशात होते.ते खात खात तहाच्या कलमांचे रवंथ करु लागलो. पुढचा तास मराठीचा. नेमके त्या दिवशी मराठीचे सर रजेवर.इतिहासाचे सरांचा तो तास ऑफ होता .म्हणून त्या तासालाही तेच सर आमच्रा वर्गावर; अन मी ,शेंगदाणे आणि तहाची कलमे चघळत वर्गा बाहेर.शेंगदाणे चघळण्यात वेळ बरा गेला. पण उभे राहून पाय दुखत होते. शेवटी एकदाचा तास संपल्याची घंटा झाली.अन माझी सुटका झाली.सुदैवाने बाहेर जाताना सरानी तहाची कलमे विचारली नाहीत.पण "नीट खेळा बरं का म्याच" म्हणून टोमणा मारताना पुन्हा एकदा कान पिरगाळलाच. बाकीचे तास कसेबसे संपले,अन ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो खेळाचा तास आला.आम्ही आपापली दप्तरं सांभाळत बाहेर धुम ठोकली.कॅप्टनने क्रिकेटचे सामान खेळाचे खोलीतून बाहेर काढले.बॅट स्वतः कडे ठेवून इतर वस्तू मुलांकडे दिल्या.माझ्या वाट्याला एक स्टंप.बॅट,बॉल,स्टंप,पहिल्यांदाच जवळून पाहिले. दोन्ही टिम खेळाचे सामान हाती घेऊन,लढाईला निघालेल्या योध्यांचे अविर्भावात खेळाचे मैदानाकडे दोन दोनच्या रांगेत रवाना झाल्या. मैदान शाळेपासून बरेच लांब होते.तिथे पोहंचेपर्यंत दोन्ही टिममधे आपसात क्रिकेटच्या लढाईच्या आधीच जोरदार बढाया,चढाया सुरु झाल्या.प्रकरण हातघाईवर येऊन वाटेतच सामन्याचा निक्काल लागायची वेळ आली.तेवढ्यात मागून पिटीचे सरांची सायकल आली,अन सगळे योध्दे ,वैर विसरून शांतीयात्रेत सामिल असल्या सारखे पूढे निघाले.
शाळेचे स्वतःचे मैदान नव्हते.एका मंदिराजवळ सार्वजनिक मोकळी जागा होती तेच खेळाचे ग्राउंड .ते सार्वजनिक असल्याने 'आव जाव घर तुम्हारा' असाच मामला.तिथे खेळ सोडून इतर अनेक गोष्टी चालू होत्या.एका कडेला पाण्याचे डबके साचलेले होते.तिथे डुकरे मनसोक्त जलक्रिडा करत होती.काठावर हिरवे गवत वाढलेले.काही घोडे ,म्हशी ,गायी इ.जनावरे तिथे चरत होती.काही उनाडटप्पू पोरे दंगामस्ती करत होती.एका उंचवट्यावरचे झाडाखाली पत्त्यांचा डाव रंगला होता.आमच्या सोबत चे पिटीसरांना पाहून द्विपाद प्राण्यांचा पत्त्यांचा डाव थांबला, व ते पसार झाले.पण चतुष्पाद प्राण्यांचे उदरभरण आणि जलक्रिडा मात्र सुरूच राहिल्या.आम्हालाही त्यांचा तसा त्रास नव्हता. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मोकळ्या जागी खेळपट्टी निश्चित करून स्टंप ठोकायचे काम सुरू झाले.दोन्ही क्याप्टननी
आपापल्या टिमच्या खेळाडूंची नावे असलेले कागद एकमेकांना दाखवून ,हंपायर कडे दिले.त्यांनी ते काळजी पूर्वक नजरेेखालून घातले.मग दोन्ही टिमच्या खेळाडूंना समोरासमोर रांगेत उभे करून ओळखपरेड घेतली.मला नखशिखांत न्याहाळत, 'तू क्रिकेट खेळतोस?'अशी पृच्छा केली. माझ्या ऐवजी आमच्या कॅप्टनने मी गावाकडे खेळल्याचे सांगितले.ते जास्त काही बोलले नाहीत;पण त्यांचेनजरेवरून त्यांचा विश्वास बसला नसावा असे वाटले.मग नाणेफेक झाली.टॉस 'ब 'च्या कॅप्टनने जिंकला. व बॅटींग करणार असे सांगितले.आमच्या कॅप्टन ने फिल्डींग लावली.मला 'तू मिडॉफला उभे राहा 'असे सांगितले .मिडॉफ म्हणजे काय अन कुठे हेमाझ्या मार्गदर्शकाने सांगितलेच नव्हते.आता आली का पंचाईत.फिल्डींग लावून क्याप्टन परत आला. मी पहिल्याच जागी शुंभासारखा उभा.'अरे मिडॉफला जा'पुन्हा तो ओरडला. मी न ऐकल्यासारखं केले.शेवटी त्यानेच माझे बखोटे धरून मला एके ठिकाणी उभे केले .ब टिमच्या क्याप्टन स्टंपासमोर बॅट घेऊन उभा राहिला.तो भारी हीटर होता असे कुणीतरी सांगितले होते.त्यांचा दुसरा प्लेअर समोरच्या स्टंपाजवळ उभा होता.तिथे बाजूला पिटी सर.त्यांनी हंपायर म्हणून अनेकदा काम केले
असावे.सराईतपणे त्यांनी खेळ सुरू करायची खूण केली
म्याच पाहायला दोन्ही वर्गातील मुले व काही सर पण आले होते.ते टाळ्या वाजवत,ओरडत मजा घेत होते.आमच्या क्याप्टनने बॉलींग सुरू केली.
पहिल्या ओवरमधे काही धावा निघाल्या.पण माझ्याकडे बॉल आलाच नाही. मी आपला कटेवरी हात ठेवून मजा पाहात उभा होतो. दुसरी ओवर सुरू झाली.आमच्या बॉलरने टाकलेला बॉल ब च्या क्यापटनने मारला. तो आकाशात उडाला आणि माझ्या दिशेने आला.आमच्या टिमचे खेळाडू आणि पाठीराखे उत्साहात 'अरे क्याच घे क्याच घे' असे ओरडू लागले.
मी आपला कंबरेवर हात ठेवून पाहात होतो.ते असे का ओरडतात हे कळेचना.क्षणात तो बॉल झाडावरून फळ अलगद पडावे तसा माझ्या पुढ्यात पडला.मी तो हळूच उचलला अन बॉलर कडे जाउन त्याच्या हातात दिला.तो खाउ की गिळू अशा नजरेने माझ्याकडे बघत होता.क्याप्टन सह सगळी टिम माझ्या अंगावर धावून आली.'ब 'ची मंडळी मात्र मी मस्त फिल्डींग केली म्हणतटाळ्या वाजवू लागले.
'अरे ×××× एवढी सोपी क्याच का घेतली नाहीस?'क्याप्टन जोरात ओरडला.आपलं काहीतरी चुकलंय हे माझ्या ध्यानात आले पण नक्की काय चुकलं?हे कळत येत नव्हते.माझ्या मुखावर प्रश्नचिन्ह लटकलेले क्याप्टनला दिसले असावे.''क्याच घेतली असती तर आऊटझाला असता नं तो' माहिती नाही का तुला?'.आता कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला.ब्याट्समन ने फटका मारुन बॉल उडवला आणि तो जमिनीवर पडायचे आत विरुध्द बाजूचे प्लेअरने पकडला तर तो आऊट होत असावा.विटी दांडू सारखेच की.मला क्रिकेटचे ज्ञान देणारा माझा मिशाळ मित्र,क्याच घेतल्यावर ब्याटस्मन आऊट होतो एवढीच गोष्ट सांगायचे विसरला होता. त्याला तरी हे माहिती होते की नव्हते कोण जाणे?
आता आपले अज्ञान कसे ऊघड करायचे? मी रेटून म्हणालो,
"आमचे गावात क्याचआउटची बोलीच नाही".यावर सगळे फिदीफिदी हसू लागले. "तुला क्रिकेट कशाशी खातात हे माहिती आहे का? " पिटीसर ,ते हंपायर आहेत हे विसरून म्हणाले. मग पुन्हा हशा झाला.काहीतरी गंमत चालली आहे हे बघून आता खेळपट्टीवर प्रेक्षक पण जमले . कुणी टाळ्या वाजवू लागले. कुणी जोरजोरात ओरडू लागले. या सगळ्या गोंधळात म्याच पाहायला आलेल्या दोन सरांनी खेळाचा अन खेळपट्टीचा ताबा घेतला होता.एक सर ब्याटींग अन दुसरे सर त्यांना बॉलींग करू लागले . हंपायर व इतर सर पण त्यांना सामिल झाले,आणि त्यांचीच म्याच सुरू झाली. अशा रितीने सहावी अ विरुद्ध सहावी ब ची क्रिकेट म्याच तिथेच अनिर्णित अवस्थेत संपली.
घरी गेल्यावर मी क्रिकेटची चिकटवही फाडून बंबात घातली ,अन त्यावर तापलेल्या पाण्याने आंघोळ केली ,अन त्या दिवशीच कायमचा क्रिकेट सन्यास घेतला .
नीलकंठ देशमुख
•
प्रतिक्रिया
26 Dec 2020 - 11:10 pm | टवाळ कार्टा
=))
27 Dec 2020 - 9:39 am | नीलकंठ देशमुख
या संकेत चिन्हाचा अर्थ कळला नाही.
पण दखल घेतली त्या बद्दल धन्यवाद
27 Dec 2020 - 2:57 am | गामा पैलवान
नीलकंठ देशमुख,
भारी रोचक किस्सा आहे. अगदी असेच मीसुद्धा अनेक सोपे झेल सोडले आहेत. अशा झेलसांडू लोकांना 'कोंबड्या पकडतोस का', म्हणून चिडवीत असंत.
कुतूहल म्हणून विचारतोय की मराठवाडा क्रिकेट स्पर्धेत बीडचा दुसरा क्रमांक आला होता तर पहिला कोणाचा आलेला? माझा अंदाज लातूर किंवा उदगीर. उत्सुकता आहे.
आ.न.,
-गा.पै.
27 Dec 2020 - 9:38 am | नीलकंठ देशमुख
लिखाण आवडले हे आपण कळवले. धन्यवाद. स्पर्धेत कुणाला पहिला क्रमांक मिळाला माहिती नाही. तेव्हा लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात होते. उदगीर अजूनही लातूर जिल्ह्यात आहे.तूम्ही त्या भागातले असावेत. तर उस्मानाबाद ला पहिला क्रमांक देऊन टाकायला हरकत नाही
28 Dec 2020 - 5:21 pm | गामा पैलवान
नीलकंठ देशमुख,
माहितीबद्दल धन्यवाद ! :-)
मी त्या भागातला नाही. मुंबई ठाणे परिसर आणि थोडाफार सह्याद्री या पलीकडे फारसा फिरलेलो नाही. फक्त कुतूहल याचं आहे की जुन्या काळी देखील मराठ्माड्यात क्रिकेट इतकं लोकप्रिय होतं.
आ.न.,
-गा.पै.
28 Dec 2020 - 6:19 pm | नीलकंठ देशमुख
मी वर्णन केलेला काळ एकोणीसशे सदुसष्ट अडूसष्ट चा आहे .
भारतात सगळीकडेच क्रिकेट लोकप्रिय आहे.तेव्हा ही होते
28 Dec 2020 - 12:23 pm | योगी९००
एकदम मजेशीर लेख.. अगदी निरागसपणे भावना व्यक्त झाल्या आहेत. लेख आवडला.
मी पण लहानपणी क्रिकेटच्या बाबतीत बाताड्या होतो. एका गावाहून दुसर्या गावात वडीलांची बदली झाल्यावर नवीन शाळेत अश्याच टेपा लावून एखाद्या टीम मध्ये वर्णी लावून घ्यायचो. ओपनिंग करून आधीच्या शाळेतील वर्गाला दोनदा मॅच जिंकून दिली असे काहीतरी सांगुन पहिल्या दोन-तीन नंबर वर बॅटींग करायचो. एखाद्यावेळी मटका लागला तर चांगला स्कोरही करायचो. पण असा नियमितपणा खेळात नव्हता म्हणून हळू हळू डिमोशन होऊन ६ किंवा ७ नंबरपर्यंत आमची गाडी घसरायची. पण थोडा बरा खेळत असल्याने टीम बाहेर कधी काढले गेले नाही (तसेच माझ्याकडे एक चांगल्या दर्जाची बॅट पण होती. हे ही एक टीम बाहेर न जाण्याचे कारण असावे). फिल्डींग चांगली होती व बर्याच वेळा कॅचेस पकडले आहेत त्यामुळे त्याबाबतीत मात्र जरा नशीबवान ठरलो. एकदा एक मॅच मी घेतलेल्या चार कॅचेसमुळे आम्ही जिंकली होती. आधी बॅटींग करताना फक्त तीन रन्स मी काढल्या होत्या. त्यामुळे बॅटींग मधले अपयश फिल्डींगमध्ये भरून काढून पुढच्या मॅच साठी टीममध्ये जागा पक्की केली होती.
28 Dec 2020 - 3:59 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया वाचून छान वाटले. धन्यवाद. तुम्ही पण छान लिहिलंय...
28 Dec 2020 - 12:48 pm | सिरुसेरि
मस्त अनुभवकथन . अगदी मालगुडि डेजच्या स्वामीची आठवण करुन देणारे . बाकी त्या काळी तुम्हाला बैलोबा म्हणणारे गुरुजी आता तुमची प्रगती बघुन आनंदी असतील .
28 Dec 2020 - 3:52 pm | नीलकंठ देशमुख
खूप धन्यवाद. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल. मालगुडी डेज ची आठवण झाली हे वाचून तर भारावलो.
28 Dec 2020 - 1:44 pm | अथांग आकाश
मजेशीर लेख! मी म्याच बघायला तिथे असतो तर तुम्ही सोडलेला झेल बघून लगान सारखे शाबाश कचरा... शाबाश! असे ओरडलो असतो :)
28 Dec 2020 - 1:47 pm | अथांग आकाश
मजेशीर लेख! मी म्याच बघायला तिथे असतो तर तुम्ही सोडलेला झेल बघून लगान सारखे शाबाश कचरा... शाबाश! असे ओरडलो असतो
28 Dec 2020 - 3:53 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
28 Dec 2020 - 5:50 pm | टर्मीनेटर
भारी लिहिलंय, मजा आली वाचयला 😄
28 Dec 2020 - 6:15 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया वाचून छान वाटले. धन्यवाद
28 Dec 2020 - 10:41 pm | सरिता बांदेकर
रेडिओचा जमाना आठवला. मला आताच्या मॅचेस् बघण्यापेक्शा तेव्हा रेडिओ कॅामेंटरी ऐकायला मजा यायची. आणि प्रत्यक्श न बघितल्यामुळे खेळताना मुलांची अशीच गडबड व्हायची म्हणजे कॅच न पकडणे यासारखी
तुम्ही छानच लिहीलं आहे
29 Dec 2020 - 8:29 am | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
29 Dec 2020 - 12:47 pm | रंगीला रतन
छान.
विनोदी किस्सा आवडला.
29 Dec 2020 - 3:35 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल
29 Dec 2020 - 6:40 pm | कोण
मजेशीर आठवण.
29 Dec 2020 - 7:32 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद