आज महत्वाचे काम होते बॅंकेचे. काहीही करून ते आजच पूर्ण करायचे होते. काम तसे पाच मिनिटाचेच होते. पण पुर्वानुभव लक्षात घेता चांगला एक - दीड तास बाजूला काढून ठेवला होता. गाडी चालू केली की लक्षात आले पेट्रोल संपले आहे. बहुधा माझ्या मुलाने संपवले असावे. रोजचे दोन - दोनचे 'पॅक' संपतात म्हणजे काय ? एवढे काय फिरायचे असते काय माहिती ! एकचा नवीन पॅक टाकून मी गाडी सुरु केली.
मुख्य रस्यावर पोहचलो तर स्त्यावर ही मोठी गर्दी. कसाबसा बॅंकेच्या गेटपर्यंत पोहचलो. तिथे एक वॉचमन निर्विकार चेह-याने माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. गेट उघडायला तो तयारच होईना. "आधी मला ड्रेस बदलून 'अपडेट' होऊ द्या मगच आत जाऊ देईन!" इति वॉचमन. "अरे पण परवाच तर हे अपडेटचे प्रकार झाले होते ना ? मग आता काय पुन्हा ? आणि जेव्हा गडबड असते तेव्हाच तुम्हाला असले प्रकार करायचे असतात का ? जा एकदाचा हो पटकन अपडेट. " हळूहळू माझा पारा आता चढू लागला होता.
शेवटी एकदाचा तो 'अपडेट' होऊन आला. माझ्याकडे एकदा पाहिले आणि "आयडी दाखवा" अशी आज्ञा दिली. मी गपगुमान आयडी काढून त्याच्या हातात ठेवले. एकदा आयडीकडे आणि एकदा माझ्याकडे तुच्छतेने पाहात तो उद्गारला ," आयडी जुना झाला हा. नवीन काढा जा. नवीन फोटो काढा तो लावा इथे. " मी खिशातला एक फोटो काढून दिला " लाव तो त्यावर" मी पुटपुटलो.
"हे नाही चालणार साहेब. संपुर्ण बॉडीचा फोटो लागतो आता. 'अप्पर बॉडीवर' जोधपुरी कोट , 'लोवर बॉडी'वर एक जिन्स पॅन्ट, डोक्यावर पगडी आणि खिशावर एखादा आकडा असा फोटो काढून आणा. आता दरवेळी येताना तोच ड्रेस घालून यावा लागणार आता. आम्ही तो ड्रेस बघून सोडणार साहेब आत. आणि तुमचा ड्रेस तुम्ही दुस-याला देऊ नका. नुकसान झालं तर आम्हाला माहिती नाही. "
शेवटी एकदाचा तसला ड्रेस घालून मी बॅंकेत आलो. आता समोर त्याने एक पाटी ठेवली. " वाचून दाखवा साहेब!" तो पुटपुटला. "अरे पदवीधर आहे मी. हे असले ए , बी , सी , डी कशाला विचारतो ? ते पण किती घाण अक्षर आहे ते. पान खाऊन थुंकला का त्या पाटीवर ? "माझा पारा आता चांगलाच चढला होता. " प्रोसेस आहे साहेब !" तो थंडपणे उत्तरला." ठीक आहे. डी , के , २१ सी " मी हे बोललो आणि त्याने पाटी खाली ठेवली. " चुकलं साहेब. के कॅपीटल होता. आता हे वाचा " माझ्यासमोर त्याने दुसरी पाटी धरली. आता माझा धीर सुटत चालला होता. " ओ .. नाही नाही झिरो , टी , वाय." मी प्रश्नार्थक चेहरा करून वॉचमनकडे पाहिले. "बरोबर आहे साहेब. तूम्ही ' माणूस ' आहात. " इति वॉचमन. " तूम्ही लोक मात्र राक्षस आहात. कूठे फेडाल ही पापे?" मी हे बोलतोय तोपर्यंत मी बॅंकेत पोहचलो होते.
आत बॅंकेत गेल्या गेल्या इंशूरन्स काढणारा माणूस त्याची पाटी घेऊन माझ्याकडे धावत आला. " आज काढून टाका साहेब. भविष्य सुरक्षित करा" त्याला कसाबसा मी बाजूला ढकलला. आणि मला पाहिजे असलेला काऊंटर शोधू लागलो . बॅंक आता खूप बदलली होती असे ऐकून होते. ते आता प्रत्यक्षात दिसत होते. काऊंटरची जागा आता टॅबसनी घेतली होती. आधी हा काऊंटर ते तो काऊंटर असा पळत होतो , आता हा टॅब ते तो टॅब असा पळू लागलो. तेवढ्यात नेमका फोन आला. फोन तसा अर्जंटच होता. मी फोन घेतो न घेतो तोपर्यंत वॉचमन धावत आला. " फोन अलाऊड नाही " असे सुनावत मला त्याने बॅंकेबाहेर हाकलले. माझ्या रागाची जागा आता कंटाळ्याने घेतली होती.
शेवटी एकदाचा तो फोन झाला. पुन्हा वॉचमनची हुज्जत घालणे , पाट्या वाचून दाखवणे असले प्रकार करून एकदाचा आत आलो. आणि एकदाचा तो कामाचा 'टॅब' सापडला. १२ वर्ष तपस्या केल्यावर परमेश्वराने दर्शन द्यावे त्या थाटात तिथल्या अधिका-याचे दर्शन मला झाले. " माझा मोबाईल नंबर बदलायचा आहे. " मी केविलवाण्या स्वरात बोललो. "तुमच्या कुत्र्याचे नाव सांगा ? " " हा काय प्रश्न आहे ? " " अहो हा सिक्यूरीटी प्रश्न आहे . नाव सांगा . " " अहो मग वॉचमननी झाडाझडती घेतली ते काय होते ? असो. मोनू नाव आहे कुत्र्याचं. " तो अधिकारी ते नाव टाईप करू लागला. " नाव चुकीच आहे साहेब. तूम्ही चोर आहात. आता केवळ दोन संधी आहेत तुमच्याकडे . जर चुकलात तर बॅंकेतून २४ तासासाठी हद्दपार करू. " " अहो थांबा थांबा. त्या मोनूचा 'एम' कॅपीटल करा. " त्या अधिका-याने तसे केले. ते मॅच झाले असावे. " नंबर बोला" . तो पुटपुटला. माझा नंबर मी त्याला दिला. " ओटीपी आला असेल तो सांगा " मी वॉचमन पहात घाबरत मोबाईल बाहेर काढला. "आला नाही ओटीपी अजुन. " मी त्रासिक स्वरात बोललो. " थांबा जरा. " तो तितक्याच थंड आवाजात बोलला.
शेवटी एकदाचा तो ओटीपी आला. " सी , बी , टी , क्यू १,८,४, ५ , जी , यू, सी ,सी ...." मला धाप लागेपर्यंत मी ती इंग्रजीची सव्वीस खडी वाचत राहिलो. अणूबॉंम्ब टाकताना सुद्धा एवढा मोठा ओटीपी लागत नसेल अशी माझी खात्री होती.तो ओटीपीचा निबंध वाचून झाल्यावर मी अपेक्षेने अधिका-याकडे पाहिले. माझ्याकडे न पहाता तो बोलू लागला ," जुन्या मोबाईल नंबरवर ओटीपी आला असेल तो सांगा " " जुना नंबर? अहो तो तर बंद पडला म्हणून तर इथे आलो ना ? दुसरा ऑपशन द्या तुम्ही. "
"होम ब्रांचला जा" तो असे म्हणतोय न म्हणतोय तोवर वॉचमन आलाच बाहेर काढायला. मी तिथलीच एक खुर्ची पकडून बसलो. " काम होईपर्यंत मी इथून उठणार नाही !" अशी सिंहगर्जना केली. वॉचमन हाताला धरून "ऊठा , ऊठा" असे ओरडू लागला. मी मात्र जागचा हललो नाही. शेवटी वॉचमनने पाण्याचा ग्लास आणून माझ्या तोडांवर पाणी मारले.
मी एकदम चमकून जागा झालो. माझी बायको पाण्याचा ग्लास घेऊन माझ्या बेडपाशी उभी होती. "केव्हापासून उठतेयं! आज ते बॅंकेचे काम करून टाका. तेव्हढा नवीन मोबाईल नंबर तर अपडेट करायचा आहे. पाच मिनिटाच काम !"
बॅंकेचे नाव ऐकताच मी बायकोचा हातातला ग्लास हिसकावला. त्यातले राहिलेले पाणी गटागटा पिऊन टाकले आणि पुन्हा पांघरूणात शिरलो. तिकडे बायको फिसकारुन बाथरुमकडे निघाली. कदाचित ग्लासऐवजी बादली आणायला गेली असावी. मी भयचकीच होऊन तिच्याकडे पहात राहिलो...
प्रतिक्रिया
18 Dec 2020 - 11:55 am | राजाभाउ
हा हा हा. जबरा !!!!!
18 Dec 2020 - 12:11 pm | कंजूस
ब्वॉक. कसली भीती बसली बँकेची.
18 Dec 2020 - 12:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
ब्यांकेची जर इतकी भिती वाटत असेल तर ती घालवण्यासाठी एखाद्या सरकारी हापिसात जा, गेला बाजार मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयात नुसती चक्कर मारा, ब्यांकेची भिती वाटेनाशी होईल
पैजारबुवा,
18 Dec 2020 - 4:30 pm | तुषार काळभोर
+१२३४^९८७६
प्रचंड सहमत.
बँका तुलनेने फार सरळ, सभ्य, सुस्वभावी असतात. किमान बसायला जागा तरी असते.
- (सरकारी ऑफिस टाळणारा) पैलवान
18 Dec 2020 - 12:35 pm | खेडूत
:)
आवडले...मस्तच.
18 Dec 2020 - 12:41 pm | सॅगी
सरकारी बँकेने दिलेले दु:ख अगदी शब्दाशब्दातुन दिसत आहे...फारच भयाण अनुभव...
18 Dec 2020 - 12:45 pm | Rajesh188
ग्राहक चे काम न करणे हेच ब्रीद असावे बँकांचे.
18 Dec 2020 - 12:51 pm | सोत्रि
मस्त खुषखुशीत!
- (बॅकएन्ड बॅंकर) सोकाजी
18 Dec 2020 - 3:51 pm | चांदणे संदीप
असा प्रकार झाला तर!
ऑनलाईन ब्यांकेसारखे जर व्यवहार ब्यांकांच्या ब्रँचमध्ये व्हायला लागले तर लैच औघड होईल.
तुम्ही नकळत ब्यांकांना अशी आयडियाच दिली आहे. आता बस्सा! ;)
सं - दी - प
18 Dec 2020 - 9:23 pm | सिरुसेरि
लेख वाचताना सुरुवातीला हा एक खरोखर घडलेला त्रासदायक अनुभव आहे असे वाटले . पुढे वाचताना हे विडंबन आहे हे लक्षात आले .
29 Dec 2020 - 5:34 pm | चौथा कोनाडा
खतरनाक कल्पना विलास ! लै हसलो !
30 Dec 2020 - 4:20 am | हस्तर
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=178379483983835&id=100...
बघा नक्कि