मला या वयातही वाढदिवस साजरा करणं फार आवडतं. तो अगदी थाटामाटात,सर्व जवळच्या व्यक्तींना बोलावून,घरीच मस्त पार्टी करुन साजरा करायला मजा येते.
माझ्या लहानपणी मुलांचे काय कुणाचेच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत नव्हती. नवे कपडे नाहीत, केक नाही, बुके नाही, हाॅल सजवणं नाही, गोडधोड नाही, अगदी साधा शिरा सुद्धा नाही. खेळगड्यांना बोलावणं नाही, गालाची पापी घेणं नाही. काही काही नाही.
वाढदिवसाला सकाळी उठून, आंघोळ करून घरातल्या मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घेणं कंपलसरी असे. त्यानंतर माझी आई मला जवळ घ्यायची. तिच्या पदराचा, कुशीचा स्पर्श छान वाटायचा. मग ती माझं औक्षण करायची. मग माझ्या आवडीचे बटाटेवडे करायची. ते चवदार व्हायचे. माझी आई अन्नपूर्णा होती. फार चविष्ट स्वयंपाक करायची. घरातल्या सर्वांनी मिळून बटाटेवडे खायचे. बस्!झाला वाढदिवस. तेव्हा वडापाव नव्हते. त्यानंतर आयुष्यात इतक्यांदा वडापाव खाल्ला की आता त्या बटाटेवड्यांचं काहीच अप्रूप राहिलेलं नाही. घरची परिस्थिती निम्नमध्यमवर्गीय. वडील एकटे मिळवते. आम्ही चार भावंडं शिकणारी. वाढत्या वयाची. चैन परवडायचीच नाही.
मग मी मोठी झाले. मिळवायला लागले. तरीही सर्वांना बोलावून, पार्टी करुन मी स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाहीच. नवरा दर वाढदिवसाला साडी मात्र घ्यायचा. आम्ही बाहेर जेवायला जायचो. तेवढंच.
माझ्या मुलाचा वाढदिवस मात्र मी साजरा करायची. त्याच्या मित्रांना बोलवायची. घरभर दिवे,फुगे लावायची. घरीच केक करायची. खायला काय काय करायची. पावभाजी हा प्रकार प्रसिद्धीस आला होता. मुलगा खुश होऊन जायचा.
मी पन्नाशी गाठली. आणि माझ्या घरच्यांनी माझा वाढदिवस मला सरप्राइज पार्टी देऊन दणक्यात साजरा केला. मला खूपच आनंद झाला.
तेव्हापासून आजतागायत मी दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करते. जवळचे नातेवाईक आणि मैत्रीणींना बोलावते.
"म्हातारपणी बघा हिला केवढी हौस! (सोस..?!) खरं तर हे सगळ्यातून निवृत्त व्हायचं वय. पण ही वाढदिवस थाटात साजरा करते" ह्या संभाव्य टीकेकडे मी लक्ष देत नाही.
मी महिनाभर आधी मेन्यू ठरवते. स्वयंपाकिणीला सांगते. तिच्या मदतीला दुसरी एक स्वयंपाकीण शोधून ठेवते. मला हाॅटेलात पार्टी द्यायला आवडत नाही. कधी कधी देतेही. पण घरी द्यायला मला आवडतं. घरी मोकळेपणा असतो.भरपूर गप्पा होतात. अन्नाची नासाडी होत नाही. बिरड्याची उसळ, फणसाची भाजी,गोळ्याचं सांबार , पुरणपोळी असा आपला असा अनवट मेन्यू घरी करता येतो. हाॅटेलात नाही. मुलांना खेळता,बागडता येतं. ज्येष्ठांना विश्रांती घेता येते.
पोटभर गप्पा हे खास आकर्षण. हाॅटेलच्या गोंगाटात गप्पा होत नाहीत. थट्टामस्करी कर. ह्याची खेच,त्याची खेच. कुणाचं तरी गमतीनं रॅगिंग कर. हे सगळं घरीच जमतं. गाणी होतात. भेंड्या होतात. खेळ होतात. हे हाॅटेलात कसं होणार?
मी माझ्या सुहृदांचे वाढदिवस लक्षात ठेवते. त्यांना आवर्जून शुभेच्छा देते. जवळ राहणाऱ्या मैत्रीणींना, नातेवाईकांना सकाळी लवकर उठून शुभेच्छा देते. भेटवस्तू देते. मलाही खूपजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. काहीजण फोन करतात आदल्या रात्री बारा वाजता. पण मला राग येत नाही. झोपमोड झाली म्हणून मी चिडत नाही. मला त्यामागचं प्रेम,लोभ आवडतो. माझं मन त्यामुळे प्रसन्न होतं.
मी वाढदिवसाला नटते. माझ्याकडं मेकअपचं सामान नाही. साधी लिपस्टिकही नाही. कधीच नव्हती. माझ्या लग्नातही मी मेकअप केलेला नव्हता. त्यावेळी तशी पद्धत नव्हती मध्यमवर्गात. पण वाढदिवसाला मी पावडर लावते. छानशी भारी साडी नेसते. बाईच्या बांध्यातले डिफेक्टस् झाकणारी आणि नीटनेटकी नेसली तर तिचं सौंदर्य खुलवणारी साडी! तर मी साडी नेसते. मॅचिंग ब्लाऊज घालते. मोजके , ठसठशीत दागिने घालते. ठळक कुंकू लावते. आणि प्रसन्न चेहऱ्यानं येणाऱ्यांचं सर्वात करते. त्यादिवशी मी इतकी आनंदात असते की मी खूप बडबड करते. विनोद करते. थट्टमस्करी करते. वयाबद्दल कोणी कुजबूज केली तर दुर्लक्ष करते.
मला गिफ्टस् घ्यायला, द्यायला आवडतं. मला काय गिफ्ट मिळणार याविषयी मला अगदी लहान मुलासारखी उत्सुकता असते. माझा मुलगा मला खूप भारी गिफ्ट देतो. कुठंतरी ट्रीप, मोबाईल, कॅमेरा,नवा टीव्ही,ट्रान्झिस्टर! किती मजा ना! इतरही ड्रेस मटेरियल,साडी,पर्स, इमिटेशन का होईना पण ज्वेलरी, असं देतात. मी खुश होते. एकूणच मला माणसं जमवून सेलिब्रेशन आवडतं. आता वयपरत्वे आलेल्यांची खातिरदारी करता येत नाही. पण इतकं वय होऊनही मला मोहावर मात करता आलेली नाही. वाढदिवस याचा अर्थ आपला मृत्यू एका वर्षानं जवळ आला हे माझ्या खिजगणतीतही नसतं. मी एक वर्षानं मोठी झालेय याचा मला परमानंद झालेला असतो. माझी आई मनोमन माझं औक्षण करतेय असा भास मला होतो.
प्रतिक्रिया
13 Oct 2020 - 8:09 pm | Sanjay Uwach
खरं सांगू का अजी मला वाढदिवस असण व तो साजरा करणे निश्चितच आवडत, मात्र तो मोठ्या प्रमाणात साजरा करावा असा माझा मुळीच अट्टाहास नसतो. शुभेच्छा देणाऱ्याचे आभार मानावेत व इतर दिवसाप्रमाणे हा पण दिवस आपल्या कामात घालवावा असे मला नेहमी वाटते. आमच्या लहानपणी आपण सांगितल्याप्रमाणे नवीन कपडे घालणे , माझ्या बहिणी मला औक्षण करत असत. "अरे याच्यावरून आज कोणी भांडू नका बरं, याचा आज वाढदिवस आहे "म्हणून माझी आई सर्वांना आवर्जून सांगत असे . घरातील मोठी माणसं हातावर काहीतरी वस्तू किंवा पैसे ठेवत असत. केक वगैरे हा काही प्रकार त्या वेळी नव्हता वाढदिवसाच्या चालीरिती देखील आता खूप बदललेल्या आहेत .केक कापणे, मोठ्याने फटाके लावणे स्टेरिओ वर गाणी लावणे यासारख्या गोष्टी आता त्यात अंतर्भूत झालेले आहेत. आरतीतील निरंजन विझु नयेत म्हणून आपण काळजी घेतो तर केकच्या मेणबत्त्या फुंकर मारून आपण त्या मुद्दाम विझवतो. पण काही का असेना आनंद साजरा करण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतील पण आपल्या आयुष्यातील एक तरी दिवस आनंदात घालवणे हे फार महत्वाचं आहे, की ज्या दिवसाचीे उत्सवमूर्ती आपण असणार आहोत.
13 Oct 2020 - 9:10 pm | वीणा३
<<"म्हातारपणी बघा हिला केवढी हौस! (सोस..?!) खरं तर हे सगळ्यातून निवृत्त व्हायचं वय.>>
ह्याची वेग-वेगळी कारणं आहेत :
१. स्वतःला हे सगळं करणं शक्य नसेल तर,
२. अत्यावश्यक गरजा सोडून कुठलाही खर्च म्हणजे उधळपट्टी (साधी राहणी उच्च विचारसरणी प्रकार), पैसा वाचवताना आयुष्य निघून जातंय हे कळतच नाही, ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत म्हणून सोडून द्यायचं.
३. काही लोक कायम दुखी व्हायची कारणं शोधात असतात. कोणी आनंदी दिसलं कि यांच्या पोटात दुखतं,
तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, आनंदी राहणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. तुम्हाला जमतंय हि खूप मोठी गोष्ट आहे, आनंदी राहणं सोडू नका अजिबात!!!
14 Oct 2020 - 1:10 pm | चौकटराजा
माझ्या मते गेट टुगेदर करायला कोणतेही निमित्त असू नये. मी माझ्या आयुष्यात " व्यक्तिमहात्म्य स्थळमाहात्म्य व कालमाहात्म्य यांना कधीच महत्व दिले नाही.
सावन आये ,या ना आये जिया जब झूमे सावन है अशी माझी वृत्ती आहे ! माझे वडील काहीसे धार्मिक होते तरीही ते म्हणत द्वादशीला पांडुरंगाचे दर्शन पंढरीला आरामात मिळते मग एकादशीला आटापिटा कशाला करायचा ?
माझ्या मते आता जे वाढदिवसाचे फोन वा मेसेजेस येतात त्यातील मनापासूनचे १० टकके ही नसतात . फेसबुक आठवण करून देते . स्मायली ,जी आय एफ टाकायाला काही फारसे कष्ट नसतात सबब टिपिकली " सर्वांचा आभारी आहे ..... यू मेड माय डे ! " हे घासून गुळगुळीत झालेले वाक्य आपणही टाकून मोकळे होतो .एक दिवस का होईना आपले महात्म्य जगाला पटलय हे अहंकाराला सुखावणारे असते.
वाढदिवस साजरा करायचाच झाला तर एकट्याने त्या दिवशी एकांतात निसर्गात रमावे. मी किती सुधारलो ? खरेच काही अक्कलेत वाढ झाली का? केलेले संकल्प वर्षभर खरेच पाळले का ? याचे सिंहावलोकन करायची ही नामी संधी असते नाही का ?
14 Oct 2020 - 3:28 pm | श्वेता२४
माझी आई पण माझ्या वाढदिवशी बटाटेवडा व शिरा हा (कायम ठरलेला) मेनू करायची. त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझा वाढदिवस सप्टेंबर व बहिणीचा डिसेंबरमध्ये असतो. तर दोघींपैकी एकीच्या वाढदिवशी दोघींचाही वाढदिवस साजरा व्हायचा. कायम दोघी मिळून केक कापायचो व दोघींचेही मित्रमैत्रिणी बोलवले जायचे. परिस्थितीच्या मानाने आमचा वाढदिवस खरंतर धुमधडाक्यातच साजरा व्हायचा असं आता चांगलंच जाणवतं. आता नवऱ्याचा व माझ्या वाढदिवसात केवळ ५ दिवसांचे अंतर असल्याने एकतर त्याच्या किंवा माझ्या वाढदिवसाला साजरा होतो. माझअया नवऱ्याला तुमच्यासारखाच उत्साहाने वाढदिवस साजरा करायला आवडतो त्यामुळे शक्यतो त्याच्याच वाढदिवशी आमचे सगळे मित्रमैत्रिणी बोलवले जातात. थोडक्यात मागच्या पानावरुन पुढे चालू.....
29 Oct 2020 - 12:22 pm | आजी
उत्तरं द्यायला उशीर झाला याबद्दल प्रथम क्षमा मागते.जरा इतर कामात व्यस्त होते.
संजय उवाच- आयुष्यातला एक दिवस तरी आनंदात साजरा करावा हे महत्वाचे आहे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.वाढदिवस हा असाच प्रसंग आहे.
वीणा३- आनंदी राहणं तुम्हाला जमतंय हीच मोठी गोष्ट.हे तुमचं म्हणणं मनापासून मान्य.
चौकटराजा- वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या सिंहावलोकन करण्याचा दिवस हे खरं आहे
श्वेता. सेम पिंच आजी- तुम्हांलाही माझ्यासारखाच वाढदिवस साजरा करायला आवडतो.द्या टाळी.
उशीराबद्दल पुन्हा एकदा साॅरी.धन्यवाद.
29 Oct 2020 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाढदिवस अपेक्षा आणि त्याचं मनोगत आवडलं.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...! ( आता जेव्हा असेल त्यासाठी)
आपल्याला पण आपला बड्डे आवडतो. शुभेच्छा आवडतात. गीफ्ट आवडतात आणि जीवाभावाचे चार मित्र जमवून पार्टी द्यायला आवडते. इतकंच. बाकी, कै नै.
-दिलीप बिरुटे
(शुभेच्छूक, मिपा पडिक मित्रमंडळ)
30 Oct 2020 - 1:24 pm | Jayagandha Bhat...
घरगुती मेनू..
पोटभर गप्पा..
औक्षण...
सगळं मनापासून आवडलं.....