गज़ल (मराठीत गझल?) आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ... जणू मर्मबंधातली ठेव ही .... पण एकदम कोणीच गज़ल ऐकायला जात नाही.
आपल्या संगीत जीवनाची (कानसेन म्हणून ... तानसेन नव्हे ) सुरवात होते ती सिनेसंगीताने. त्यावेळी प्रमुख दोन प्रकार असतात .. फिल्मी आणि गैरफिल्मी.
गाणी ऐकायची सुरुवात व्हायची ती रेडिओ पासूनच . माझीही सुरुवात तशीच झाली. पुढे कॅसेट, सीडी , एमपी३ , ऑनलाइन अशी साधन बदलली तरी दोन गोष्टी कायम राहिल्या - संगीताची आवड आणि रेडिओ. या प्रवासात रफी किशोर बरोबरच ओपी, एसजे, एसडी, आरडी ही नावेही जवळची वाटू लागली आणि मजरुह, साहिर, शकील यांच्याशीही परिचय झाला. अगदी आनंद बक्षी सकट सर्व आपले वाटू लागले ... (पुढे फिजिक्स मध्ये सायनोसायडल वेव्ह शिकलो .. तीच ती .. एकदा पॉसिटीव्ह एकदा निगेटिव्ह जाणारी ... तेंव्हा त्याचे उत्तम उदाहरण म्ह्णून आनंद बक्षी आठवला .. काही अप्रतिम आणि काही भिकारडी गाणी लिहिणारा )
अशातच "योग्य" वयात आल्यावर वहिवाटीप्रमाणे गज़लेची ओळख झाली ती पंकज उधास मुळे .. होय तीच "चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल" या सारख्या गझलांमुळे. या गझलांच एक बर होत .. समजायला फार कष्ट पडायचे नाहीत.
चांदी जैसा रंग है तेरा लिहिणारा मुमताझ राशिद किंवा
यही तो टूटे दिलों का इलाज़ है अंजुम
मैं क्या कहूँ तुझे कैसी है ना छोड़ी जाये
ये मेरे यार के जैसी है ना छोड़ी जाये .....
हे लिहिणारा सरदार अंजुम
आणि
न समझो के हम पि गए पीते पीते
की थोड़ा सा गम जी गए पीते पीते
असे लिहिणारा शेख "आदम" अबुवाला ....
हे सगळे बऱ्यापैकी हिंदीत लिहायचे आणि एकंदर माहोल मध्ये ते चालून जायचं
अशातच टीव्ही वर (त्यावेळी फक्त दूरदर्शन होत) एक मालिका आली .. मिर्झा गालिब .. खुद्द गुलजार साहेबांचं लेखन आणि दिग्दर्शन .. जगजीतचा आवाज
सिरीयल बघताना एकदम चमकलोच. आदम आणि अंजुम ऐकणाऱ्याला एकदम गालीब ऐकवायचा ? हे म्हणजे बिगीरीतल्या पोराला डायरेक्ट मॅट्रिकचा प्रश्न टाकण्यासारखं होत . पण या सुखद धक्क्यामुळे गज़ल या विषयातील रुची वाढतच गेली ...
पुढे मग गझल गायकीतली पंकज उधास - जगजीत - हरिहरन - गुलाम अली - मेहेदी हसन अशी चढती भाजणी लक्षात आली .. संगीतात जशा प्रवेशिका - प्रथम - द्वितीया - प्राविण्य वगैरे असतात त्याप्रमाणे ...
जसजशा नवीन नवीन गझला ऐकत गेलो तस हेही जाणवलं कि गज़ल ही गायकापेक्षाही जास्त शायरची असते .
आणि हे बरेचसे शायर अपसव्य भाषेत लिहितात ... म्हणजेच उर्दूत .. आणि अशा गझला ऐकताना जर शब्दाचा अर्थ कळला नाही तर रसभंग होतो ... साध्या शब्दात सांगायच तर चॉकलेट बरोबर जर कागदाचा तुकडा तोंडात आला तर काय होईल तस ... चॉकलेटचा आनंद तर जातोच .. पण त्या कागदाची चव नंतर तोंडात अस्वस्थ करत राहते .. अगदी तसंच
मग सुरु झाली एक शोधयात्रा .. अशा अनोळखी शब्दांचे अर्थ शोधायची
उर्दू लिपी शिकायला अती अवघड. त्यामुळे तो नाद कधीच केला नाही. पण निदान हिंदवी तर्जुमा (लिपी) मधले शब्द घेऊन अर्थ शोधायला सुरुवात झाली
त्यावेळी सर्व व्यापी गुगुल बाबा नव्हता .. मग काही जाणकारांना विचारून अर्थ माहिती करून घ्यायला लागलो .
मग उर्दू-हिंदी शब्दकोष ताब्यात आला आणि जगणं एकदम सुसह्य झालं . अर्थात आता गुगुल बाबा मुळे शब्दकोशाची गरज पडत नाही
या सगळ्या प्रवासात असंख्य गझला ऐकल्या - वाचल्या. आता गझल ऐकताना सुराबरोबर शब्दही भिडतात आणि एक संपूर्ण चित्र उभं रहात .. त्याचा आनंद अवर्णनीय असतो
अशाच काही मला आवडलेल्या गझला अर्थासह मांडण्याचा प्रयत्न करतोय ... जिथे शक्य आहे तिथे त्या गझलेची तुनळी (YouTuble ) लिंक द्यायचा प्रयत्न करीन. अर्थासकट गझल अनुभवा. कसे वाटते ते जरूर सांगा
प्रतिक्रिया
20 Oct 2020 - 3:44 pm | समीर वैद्य
लौकर येउद्या... वाट पाहतोय
21 Oct 2020 - 1:06 am | नीलस्वप्निल
गझल आणि जगजीत ...व्वा सुन्दर अनुभुती
21 Oct 2020 - 1:07 am | नीलस्वप्निल
वाट पहातोय ...लौकर येऊद्यात
21 Oct 2020 - 12:36 pm | साहना
पुण्यात एक नाडकर्णी म्हणून प्राध्यापक आहेत त्यांचे गझल ह्या विषयावरील छान पुस्तक आहे. तुम्हाला आवडेल. मी १० वर्षे मागे वाचले होते.
21 Oct 2020 - 12:55 pm | अमर विश्वास
धन्यवाद ...
सुरेशचंद्र नाडकर्णींचे "गझल" हे पुस्तक व इतर पुस्तके ही आपल्या सारख्या मराठी गझलप्रेमींसाठी खजिनाच
22 Oct 2020 - 7:10 am | चांदणे संदीप
पुभाप्र.
सं - दी - प
22 Oct 2020 - 8:10 am | सोत्रि
सुंदर उपक्रम!
- (गज़लप्रेमी) सोकाजी