मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.
मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या. मी ही अचंबित झालो. असा विचार करणे बरोबर नाही असे एकीकडे वाटत होते. जपाचा जोरही अचानक वाढला होता. पण त्याच बरोबर सूडाचे मानसिक समाधानही मिळत होते. विशेष म्हणजे जप चालू असल्याने ह्या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेने पाहणेही चालू होते.
खरे तर आदला सगळा दिवस चांगला गेला होता. झोप पण चांगली लागली होती. त्रास देणाऱ्या माणसाची सावलीसुद्धा बरेच दिवस शिवली नव्हती. पण आज पहाटे त्या माणसाच्या विचाराने माझा कब्जा घेतला होता. मी सोडून आजूबाजूचे जग शांतपणे झोपले होते. मनात असा विचार आला की, तो माणूसही आता स्वस्थ झोपला असेल आणि मी मात्र इकडे तळमळतोय. रागाने तडफडतोय.
सद्गुरू पैंच्या तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे, सकारात्मक विचाराचे महत्त्व माझ्या लक्षात आलेले होते. तसेच नकारात्मक विचारांनी नुकसान होते हेही लक्षात आले होते. तसेच यासगळ्यासाठी मनात येणाऱ्या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवायची आवश्यकता नव्याने कळली होती.
अप्रिय घटना किंवा आठवणी नव्याने मनात साठणार नाहीत याची काळजी घेणे हा फक्त निम्माच भाग समजला पाहिजे. कारण भूतकाळातील आठवणी अजून त्रास देऊ शकतात हे आज लक्षात आले होते. त्या आठवणींचा बीमोड हा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे याची आज खात्रीच पटली होती. कारण ह्या आठवणींवर माझा काहीही ताबा नाही, उलट त्याच माझा ताबा घेताहेत याचा नुकताच अनुभव आला होता. त्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे होता. विचार चालू झाला. आणि वर उल्लेखलेल्या ग्रंथातील एका वाक्याची आठवण झाली.
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.
अंघोळ व पूजा झाल्यावर शांतपणे बसलो. वर दिलेल्या वाक्याच्या आधारे उपाययोजना करायचे निश्चित केले आणि तो माणूस समोर आहे असे समजून, त्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे वगैरे कल्पना करायला लागलो. पण अजिबातच जमेना. उलट संताप वाढायला लागला. तरीही प्रयत्न वाढवत राहिलो. तरीही मला ते जमत नव्हते. एकवेळ अशी आली की, माझ्या मुठी घट्ट वळल्या गेल्या, सर्वांगाला घाम फुटला. तरीही मला त्या माणसाचे शुभचिंतन करता येईना. भले किंवा कल्याण हे शब्द सुद्धा आठवेनात. तरीही जे शब्द सुचतील ते वापरून मी पुढची पाच मिनिटे प्रयत्न करत राहिलो. गंजीफ्रॉक घामाने ओला झाला होता. शरीरपण थोडेसे थरथरत होते. पण शेवटी कसेबसे शुभचिंतन करायला जमले होते. त्यावेळी एक लक्षात आले की, मनावरचा ताण हलका झाला आहे. मोकळे मोकळे वाटत आहे.
शांतपणे डोळे मिटून बसलो. तर थोड्या वेळाने आणखी एका अप्रिय माणसाची आठवण आली. ही जरा जुन्या काळातील आठवण होती. परत वरील प्रमाणे त्याच्यासाठीही शुभचिंतन केले. त्रास झाला पण फारसा झाला नाही. विचार करता असे लक्षात आले की, ही आठवण पहिल्या आठवणी इतकी त्रासदायक नव्हती त्यामुळे शुभचिंतन करणे त्यामानाने सोपे झाले.
पुढचे अनेक तास थांबून थांबून अशाच जुन्या जुन्या आठवणी एकामागोमाग येत होत्या व मी शुभचिंतन करायचा प्रयत्न करत होतो. मात्र शुभचिंतन करायला त्रास फारसा होत नव्हता, कारण या आठवणींत तेवढा कडवटपणा भरलेला नव्हता. एव्हाना भावासहित शुभचिंतन करण्यासाठी विश्वप्रार्थना ही खूप उपयोगी पडते आहे हे लक्षात आल्याने तिचाच वापर करू लागलो होतो. यासगळ्या प्रकारात शब्द महत्त्वाचे नसतात तर भाव महत्त्वाचा असतो. अन्यथा मनापासून शुभचिंतन करणे शक्य होत नाही.
शुभचिंतनामध्ये आपल्याला जे हवेहवेसे वाटते तेच समोरच्या व्यक्तीला मिळते आहे ही भावना धरायची असते. त्या दृष्टीनेही विश्वप्रार्थना उत्कृष्ट आहे.
या जुन्या जुन्या आठवणी मनांत येत असताना, मधूनच पहिल्या माणसाची परत आठवण यायची. पण ती प्रत्येक वेळेस आणखीनच सौम्य झालेली जाणवत असे. त्यामुळे शुभचिंतन करण्यांस सहज जमत असे. दातओठ खाऊन किंवा मुठी वळायची कधीच आवश्यकता भासत नव्हती. मलाच माझे आश्चर्य वाटत होते. असे हळूहळू सगळ्याच अप्रिय आठवणींबद्दल व्हायला लागले होते.
माझा हा प्रयत्न ३ दिवस चालू होता. आता कुठलीच आठवण त्रासदायक वाटत नव्हती. एकदाच शुभचिंतन करूनही किंवा शुभचिंतन करायच्या नुसत्या विचारासरशी त्या आठवणीतून आरामात मुक्त होतो येत होते!
काही दिवसांनी मला त्रास देणारा त्या माणसाला मी लांबून पाहिले. पूर्वी माझ्या मनांत या माणसाच्या फक्त दर्शनाने तात्काळ तिडीक उठत असे. पण यावेळी असे काही झाले नाही. मी शांतपणे माझ्या मनातल्या प्रतिक्रियांकडे पाहत होतो. मन खूपच शांत होते. अगदी त्रयस्थपणे त्या माणसाकडे पाहत होते. आपल्याला कोणत्याही प्रकारचे अशुभ चिंतन करायचे नाहीये हे मन स्वत:लाच शांतपणे समजावत होते!!. मी त्या माणसाच्या त्रासातून मुक्त झालो होतो. खूप हायसे वाटत होते.
यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता.
असेच अनुभव इतर बऱ्याच जणांबद्दल आल्याने हा योगायोग नाही हे स्पष्ट झाले. वर दिलेले व ठळक केलेल्या वाक्याने त्याची सत्यता पटवली होती.
त्यानंतर नकोशा वाटणाऱ्या आठवणींवर हाच उपाय मी वापरू लागलो व आजपर्यंत निर्भेळ यश मिळाले आहे. ज्यांना ज्यांना मी हा उपाय सुचवला व ज्यांनी ज्यांनी तो वापरला त्यांना फायदा झाला. अर्थात ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनाच मी हे सांगितले आहे. त्यामुळे "शंकाविरहित वापराचा परिणाम", हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच.
याबाबतीत माझ्या मनांत जे विचार वेळोवेळी आले ते, मी मांडतोय. मी आजपर्यंत कोणतेही मानसशास्त्राचे पुस्तक वाचलेले नसल्याने मी शास्त्रीय पद्धतीने या सगळ्याचे विवेचन करू शकणार नाही. हे जे मी लिहितोय ते सर्व अप्रिय, त्रासदायक अथवा नकारात्मक गोष्टींबद्दलच्या आपल्यातल्या साठवणीबाबत लिहीत आहे. त्याला फक्त स्वानुभवाचा आधार आहे.
१. आपल्या आयुष्यात जे काही घडत असते त्या सर्वांची नोंद होत असते. घडलेली घटना, काळ, वेळ त्यावेळच्या भाव व भावना, याचबरोबर या सगळ्याची तीव्रता पण नोंदवली जात असते.
त्यामुळे ती आठवण होताच आपले मन परत सर्वार्थाने ती घटना जशीच्या तशी परत अनुभवू शकते. साधारणत: आपण कसे बरोबर व दुसरा कसा चुकीचा हाच उहापोह आपले मन यावेळी करते. तसेच काही जमलेली नवीन माहिती किंवा मुद्दे यांचा उहापोह होऊन, ही नवीन माहिती पण मग जुन्या माहितीच्या शेजारी साठवली जाते. मूळ माहितीत भर घातले जाणारे हे नवीन मुद्दे साधारणत: रिव्हर्स इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असण्याची शक्यताच जास्त असते. थोडक्यांत जुन्या आठवणींवर आणखीन एक घट्ट व भक्कम वीण घातली जाते. ती आठवण आणखीन धष्टपुष्ट होते.
२. घडलेल्या घटनेची कोणतीही नोंद पुसली जाऊ नये किंवा ती आमूलाग्र बदलली जाऊ नये यासाठी काही एक यंत्रणा काम करत असते.
याच कारणामुळे आठवणीतला कडवटपणा निघून जाईल असे (शुभचिंतन) जर आपण काही करायला लागलो तर त्याला सुरवातीला विरोध होतो. मात्र हा विरोध मावळेपर्यंत जर आपण प्रयत्न चालू ठेवले तर मात्र हे शुभचिंतनही स्वीकारले जाते व या आठवणींच्या जवळ साठवले जाते.
पुन्हा जेव्हा ही आठवण होते, तेव्हा त्या आठवणीतील कडवटपणा बरोबरच हे शुभचिंतनही अंतर्भूत असल्याने ही आठवण सौम्य झालेली असते. तसेच नव्याने शुभचिंतन केले गेल्यास त्याला फारसा विरोध होत नाही. ते कुठे साठवायचे हा प्रश्न मागच्या वेळेसच निकालात निघालेला असतो.
३. सर्व नोंदींची प्रतवारी केलेली असते व सर्वात जास्त वेटेज असलेली आठवण सर्वात वर व त्याचपध्दतीने बाकीच्या आठवणी त्याखाली साठवलेल्या असतात.
याच कारणामुळे एखादी सर्वोच्च अप्रिय घटना त्यात मिसळलेल्या शुभचिंतनाने जेव्हा सौम्य होते तेव्हा तिची प्रतवारी तात्काळ घसरते. थोड्यावेळाने त्या खाली असलेली दुसऱ्या क्रमांकाची अप्रिय घटना आपोआप वर येते. अशा रीतीने आपण आणखी आणखी भूतकाळात शिरायला लागतो. अशा रितीने भूतकाळातील जुन्या जुन्या आठवणी हळूहळू वर यायला लागतात.
४. वर सांगितलेला क्रम सदैव अद्ययावत केला जात असतो.
एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर तिचा वापर वारंवार होणे साहजिकच असते. पण ;
एखाद्या अप्रिय घटनेची जर बराच काळ उजळणी झाली नाही तर त्याची फेरप्रतवारी करण्याची गरज भासायला लागते. त्यामुळे ती आठवण परत स्मृतीतून किंवा जिथे कुठे साठवलेली असेल तिथून मनांत प्रक्षेपित केली जाते. या आठवणीबाबत, मनाच्या मिळालेल्या नवीन प्रतिक्रियेवरून मग तिचे फेरमुल्यांकन केले जाते व त्याप्रमाणे ती योग्य क्रमाने परत साठवली जाते.
५. या फेरप्रतवारी करण्याच्या अंतर्गत आवश्यकतेमुळे, एखादी जुनी आठवण अचानक आठवते व काही कारण नसताना आपल्याला हे मध्येच कसं काय आठवतंय? याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. प्रत्यक्षात हीच वेळ असते या अप्रिय आठवणीवर हल्ला करण्याची.
६. कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते. त्यासाठी जिथे ही आठवण साठवलेली आहे तिथेच शुभचिंतन साठवले जावे हा आपला हेतू असायला लागतो. पण कोणती अप्रिय गोष्ट नक्की कुठे साठवलेली असते हेच आपल्याला नीट माहीत नसते.
७. त्यामुळेच अचानकपणे मनांत येणारी ही आठवण, म्हणजे जणू आपला एखादा लपलेला शत्रू बिळातून अचानक बाहेर आलेला असतो व तो परत बिळात लपायच्या आत त्याच्यावर हल्ला करायची संधी असते. इथे आपले शस्त्र असते शुभचिंतनाचे. आपल्या या शस्त्राचा वार झाल्यावर, हा शत्रू गोंधळून जातो व हा घाव अंगावर वागवत, जखमी होऊन परत मूळ जागी परततो. काही काळाने हा शत्रू आपली ओली जखम घेऊन परत मनात अवतीर्ण होतो. त्याची अपेक्षा असते, अशुभ चिंतनाच्या औषधाने आपण बरे होऊ. गमावलेली ताकद परत मिळवू. पण परत शुभचिंतनाचा हल्ला झाल्यास तो आणखीनच नाउमेद होतो. त्यांचा क्रमांक आणखीनच घसरतो व अप्रिय आठवणींच्या साठ्यामध्ये गलितगात्र व क्षीण होऊन आणखीनच तळाशी जातो.
८. या सर्व नोंदी आपल्यातच होत असतात. मग त्याला अंतर्मन म्हणा किंवा चित्त म्हणा किंवा अंतरंग म्हणा किंवा स्मृती म्हणा. कोणी त्याला मेंदू म्हणेल. साठवणीच्या जागेचे नाव काहीही असले तरी, ती जागा आपल्या शरीरातच कुढेतरी असते. थोडक्यांत कोणत्यातरी पेशींद्वारेच सगळे कार्य चालू असते. आपल्या शरीरातील पेशी म्हटल्यावर, त्या पेशींची भरणपोषणाची जबाबदारी आपण उचलत असतो हे मान्यच करायला लागते. त्यामुळे आपलेच नुकसान करणाऱ्या अशा अप्रिय गोष्टी व त्यांचा कडवटपणा टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रसंगी तो कडवटपणा वाढवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करणे हा किती आतबट्ट्याचा व्यवहार आहे याची कल्पना येईल.
९. पण जर या अप्रिय गोष्टींमधील कडवटपणा आपण सौम्य करू शकलो तर या साठ्याची वाढ होण्याचे ताबडतोब थांबते. अप्रिय व्यक्तींची मनातल्या मनात उजळणी करणे, त्यांना शिव्याशाप देणे, म्हणजे आपल्याच शरीरातील काही पेशी त्या अप्रिय व्यक्तीला आंदण देणे होय. इतकेच नव्हे तर त्यांची पालनपोषणाची जबाबदारी उचलणे व भविष्यांत त्यांना जागा पुरेनाशी झाली तर आणखी जागा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यासारखे आहे.
१०. जर घटना एकदा घडली व नोंदही एकदाच झाली तर सगळं ठीक चालले आहे असे म्हणता येईल. जी घटना प्रिय अथवा अप्रिय नाही अशा गोष्टीच्या बाबतीत असेच घडते. मात्र प्रिय व अप्रिय गोष्टी याला अपवाद असतात.
११. असे म्हटले जाते की, आपला केला गेलेला मान, सन्मान फार काळ लक्षात राहत नाही, पण आपला झालेला छोटासा अपमान शेवट पर्यंत लक्षात राहतो. आपली झालेली फसवणूक आपल्याला कायम त्रास देते. विशेष करून ज्याच्यावर आपण उपकार केलेले आहेत, त्याने जर त्या उपकाराची परतफेड अपकाराने केली असेल तर मात्र अशा घटना फार खोलवर घर करून राहतात. साधारणत: अशा घटना सात्त्विक संताप निर्माण करतात. तिथे फार फार जपायला लागते. अशा प्रसंगात या कडवट आठवणी किंवा त्यातील अप्रिय व्यक्ती अत्यंत वेगाने आपल्या शरीरातील जागा बळकावत असतात. स्मृती साठवणाऱ्या पेशी या खूप महत्त्वाच्या व दुर्मिळ समजल्या पाहिजेत. नेमक्या त्याच पेशी आपल्या शत्रूला देणे हा आपणच आपल्यासाठी केलेला घोर अपराध समजला पाहिजे.
१२. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अप्रिय घटनेतील अप्रिय व्यक्ती आपल्याशी अयोग्य रितीने वागून आपल्या अंतर्मनात प्रथम जागा व्यापते. त्यानंतर मात्र त्या घटनेच्या प्रत्येक उजळणी बरोबर ह्या व्यापलेल्या जागेवर ही अप्रिय व्यक्ती इमारत बांधायला लागते. आपण जितक्या वेळेस उजळणी करू तितकी ही इमारत आणखी भक्कम व मोठी व्हायला लागते. साधारणत: प्रत्येक उजळणीत, आपण कसे बरोबर होतो व ती व्यक्ती कशी चूक होती हेच आपण आपल्यालाच समजावून सांगत असतो व वाढत्या श्रेणीत त्या व्यक्तीला शिव्याशाप देत असतो. आपल्याला असे वाटत असते की आपण देत असलेले हे सर्व शिव्याशाप कोठेतरी बाहेर जात आहेत. वास्तविक हे सर्व शिव्याशाप आपण आपल्याच शक्तीने आपल्यातच नोंदवून ठेवत असतो व आपले चित्त दूषित करत असतो.
१३. आपण आपल्या जीवनात जे काही निर्णय घेत असतो, ते नेहमी आपण आपल्यात साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून घेत असतो. त्यामुळे आपण आपल्यात साठवत असलेली माहिती ही नेहमी सकारात्मक राहील याची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे.
१४. अप्रिय घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतच असतात. त्याची नोंद होणे अपरिहार्य असते. पण या नव्याने घडणाऱ्या अप्रिय घटनांची काही कारण नसताना उजळणी केली जाऊन या नोंदीची वाढ होणार नाही एवढेच आपल्या हातात असते. ते जर जमू शकले तर आपले चित्त नव्याने मलिन होऊ शकणार नाही. तसेच शुभचिंतनाचे हत्यार वापरून भूतकाळातील नकोशा किंवा नकारात्मक आठवणी सौम्य करून, तीही साफसफाई आपण करू शकतो.
१५. नामस्मरणासारख्या किंवा इतर कोणत्याही अंतरंग शुद्ध करणाऱ्या पद्धतींमुळे मनाला सूक्ष्मता येते. त्यामुळे मन खूप संवेदनशील बनते. पण म्हणून विकार संपलेले नसतात. त्यामुळे त्यांचे उद्दीपन लवकर होते. त्यामुळे या जुन्या आठवणी जेव्हा जागृत होतात तेव्हा त्या मनाला पूर्वीपेक्षा खूपच जास्त ताकदीने व्यापतात. यामुळे बऱ्याच दिवसांची साधना खर्ची पडते. यासाठी साधनी माणसाने नेहमी या जुन्या आठवणींच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे.
१६. प्रत्येक माणसात गुण व दोष दोन्हीही असतात. पण अप्रिय माणसांत फक्त दोषच आहेत अशी आपली भावना असते. ह्या अप्रिय माणसांबद्दल कलुषित झालेले आपले मन त्या माणसातील चांगले गुण टिपायलाही नकार देते. कोणी दाखवायचा प्रयत्न केला तरी त्यातही आपण नकळत खुसपटच काढत बसतो. पण हा नकारात्मक भाव गेल्यावर मात्र त्या माणसातले गुणही हळूहळू दिसायला लागतात.
१७. माणूस जितका सज्जन असेल त्याप्रमाणात त्याने याबाबतीत सावध राहायला लागते. आपण सज्जन असल्याचा त्याने अभिमान बाळगला तर मात्र त्याच्या हातून नकोश्या घटनांची उजळणी फार मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता बळावते. त्यामुळे सज्जन माणसाला सर्वात जास्त दु:ख भोगायला लागते असे दिसून येते. यास्तव सज्जन माणसाने अशा आठवणीतून मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणावेसे वाटते.
प्रतिक्रिया
7 Jul 2020 - 5:39 pm | शाम भागवत
ते लेख प्रल्हादांनीपण वाचले होते. ते त्यावेळेस फोरमचे प्रशासक होते.
8 Jul 2020 - 5:54 pm | सतीशम२७
खूपच उपयोगी !!!!
8 Jul 2020 - 8:10 pm | सुबोध खरे
भागवत साहेब
आपण जे लिहिले आहे ते प्रामाणिक आहे त्याचा आपल्याला फायदा झाला हे ऐकून छान वाटले.
तुम्ही लिहीत चला त्याचा आमच्या सारख्या सामान्य माणसांना झाला तर फायदाच होईल.
बाकी ते जडजंबाल अध्यात्म वगैरे मला काही झेपत नाही, माझे कोणीही सद्गुरू वगैरे नाहीत किंवा मी नामस्मरण, जप, प्राणायाम, ब्रम्हविद्या वगैरे करत नाही.
परंतु भारतीय लष्कराशी साडे तीन वर्षे सर्वोच्च न्यायालयात लढा दिल्यावर माणसांचे अनेक वाईट अनुभव आले. ज्यात मला देशद्रोही म्हणण्यापासून भ्रष्ट मार्गाने मी बाहेर पडलो असे निखालस असत्य जालावर टाकणाऱ्या माणसांपर्यंत अनुभव आहेत.
शक्य असेल तेथे मी सरळ स्पष्ट प्रतिवाद केला अन्यथा सरळ तुमची लायकी नाही म्हणून दुर्लक्ष केले.
पण बाहेर पडल्यावर एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळली ती म्हणजे स्वतःची मनोवृत्ती आणि व्यक्तिमत्व नकारात्मक होऊ द्यायचे नाही हा विचार सतत मनात ठेवला. यामुळे आजही माझ्या मनात केवळ अशा माणसांबद्दलच नव्हे तर एकंदर जगातील माणसांबद्दल कोणतीही कटुता नसून त्याचा माझ्या मनावर कोणताही दुष्परिणाम नाही.
सध्याच्या कोव्हीडच्या वातावरणात मी आणि माझी पत्नी काम करीत आहोत रुग्ण आम्हाला ताप नाही म्हणून स्पष्टपणे खोटे बोलतात.
साडे तीन महिन्यातील टेलिफोनिक कन्सल्टेशनचे पैसे किती झाले हे विचारण्याचे सौजन्य एकही महाभागाने दाखवलेले नाही.मग रात्री साडे अकरा वाजता आपल्या बायकोला ताप आहे आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतो यासाठी चार फोन करण्यात अनमान न करणाऱ्या माणसाने नंतर ती बरी झाली याचा एक साधा फोन करण्याचे सौजन्य दाखवले नाही. पैसे विचारणे नाहीच मग दवाखान्यात येऊन देणे तर दूरच.
असे अनेक किस्से आहेत.
हे सर्व ओझे जर घेऊन जगात राहिलो तर जगणे अशक्य होईल. तेंव्हा अशा माणसांना आपल्या मनात किती जागा अडवू द्यायची हे आपणच ठरवावे लागते.
एकदा तुम्ही ठरवलेत कि आपल्या मनात त्याच्याबद्दल ५ मिनिटे विचार करण्याची तरी या माणसाची लायकी आहे का? कि मग त्याला मनातून काढून टाकणे सोपे होते. मग आपले आयुष्य जास्त सोपे होते.
यामुळे मी सुखात दुपारी आणि रात्री झोपतो.
तेंव्हा आपण लिहीत राहा आपण का लिहिले हे विचारणाऱ्या माणसांना आपण आपल्या मनात जागाच दिली नाही तर त्यांचा जळफळाट होईल ते सुद्धा अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते.
मिपा आणि मायबोलीवर अशा काही डू आय दि आहेत उदा. झम्प्या दामले
अशाना मी खेटराने विचारत नाही त्यामुळे ते जळफळाट होऊन जिथे तिथे माझ्या प्रतिसादावर गरळ टाकत राहतात आणि मला अलिप्त पणे पाहण्यात फार मजा येते.
8 Jul 2020 - 8:35 pm | शाम भागवत
हेच तर साधायचे असते. त्यासाठी “नामस्मरण“ हाच एकमेव मार्ग आहे असे काही नाही.
तुम्ही निरपेक्ष बुध्दीने जी वैद्यकीय सेवा देताय, ती सुध्दा उपासनाच आहे. तुम्हाला येणारे कटू अनुभव, ही तर तुमची परिक्षचा घेतली जात आहे असे मला वाटते. असे अनुभव येऊनही तुमच्या कार्यात खंड पडत नाही हे विशेष. नियती कडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या या परिक्षांमधे सतत उत्तिर्ण होण्याबद्दल अभिनंदन
9 Jul 2020 - 9:00 am | संजय क्षीरसागर
इतकी साधी गोष्ट नुसतं मराठी वाचता आलं तरी समजेल.
कुठे आहे यात जडजंबाल अध्यात्म ?
9 Jul 2020 - 9:24 am | शाम भागवत
ॐ शांती ॐ
:)
10 Jul 2020 - 9:06 pm | संजय क्षीरसागर
अशी १३ वर्षांची साधना केवळ १/३ मिनीटात निरुपयोगी ठरली !
पुन्हा वाचा :
@ शाम भागवत : स्मृतींची ती काय मिजास भागवत ?
एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा,
समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही.
खेळ खलास !
लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय.
फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग
मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
10 Jul 2020 - 9:14 pm | शा वि कु
हि दोन वाक्ये फारच खटकण्यासारखी आहेत. पुनः पुनः अधोरेखित करण्यासारखी वाटत नाहीत.
10 Jul 2020 - 9:22 pm | शाम भागवत
ॐ शांती ॐ
11 Jul 2020 - 12:12 pm | सुबोध खरे
मी म्हणजे मी म्हणजे मीच असतो
11 Jul 2020 - 3:55 pm | संजय क्षीरसागर
पुन्हा वाचा :
@ शाम भागवत : स्मृतींची ती काय मिजास भागवत ?
एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा,
समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही.
खेळ खलास !
लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय.
फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग
मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
______________________________
आता यात तुम्हाला काय समजलं का मुद्दाच कळला नाही ?
11 Jul 2020 - 4:28 pm | शाम भागवत
ॐ शांती ॐ
13 Jul 2020 - 11:06 am | सुबोध खरे
हा तात्विक बेसिस नाही ! हे प्युअर मानसशास्र आहे.
असंभव ! मॅटर अजून तसाच आहे
अन्यथा हा सगळा बोगस प्रकार आहे.
ज्या प्रसंगात समोर व्यक्तीच नाही (किंवा आयडेंटीफाय होणार नाही) तिथे नशीबाला दोष देणं हा सुद्धा वेडगळपणा आहे.
असल्या सॅडिस्ट प्रकारामुळेच, त्यावर उतारा म्हणून क्षमापनेसारखा दुसरा बाष्कळ उपाय करावा लागतो !
काय भारी विचारसरणी आहे !
अशा नेभळट वृतीच्या लोकांनी बनलेल्या समाजातली व्यक्तीच नेता होते, इतकी समज सुजाण मतदाराला असायला हवी.
जितका नागरिक आपल्या हक्कांप्रती सजग आणि सक्षम तितका नेता श्रेष्ठ हे लोकशाहीचं मूलतत्त्व आहे.
जग्गीचं इंग्रजी बरं आहे आणि थोडा फार श्लेष जमतो यापलिकडे असल्या प्रश्नोत्तरांचा काही उपयोग नाही.
एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा,
समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही.
खेळ खलास !
लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय.
फक्त सॅडिस्ट व्यक्ती स्मृतींनी व्यथित होते आणि मग
मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
@ शाम भागवत : माहितेय ते मला ?
काय बोल्ता ?
मग हा लेख कशापायी लिहिला ?
अशी १३ वर्षांची साधना केवळ १/३ मिनीटात निरुपयोगी ठरली !
हे सगळे आपले प्रतिसाद काय दर्शवतात?
मानसशास्त्र फक्त आपल्यालाच कळलंय अशा अविर्भावात आपण हे लिहिलंय. यात आपला केवळ अहंगंड दिसतो आहे याला मनोविकार शास्त्रात DELUSIONS OF GRANDEUR ( मी म्हणजे मी म्हणजे मीच) आणि हे एक मनोविकाराचे लक्षण असू शकते.
Grandiose delusions (GD), delusions of grandeur, expansive delusions are a subtype of delusion that occur in patients suffering from a wide range of psychiatric diseases, including two-thirds of patients in manic state of bipolar disorder, half of those with schizophrenia, patients with the grandiose subtype of delusional disorder, and a substantial portion of those with substance abuse disorders.
श्री जग्गी वासुदेव हे काय आपल्याकडे वारावर जेवायला होते? ते निदान ६३ वर्षाचे आहेत त्याचा तरी मान ठेवा.
१३ वर्षांची साधना केवळ १/३ मिनीटात निरुपयोगी ठरली, हे आपण स्वतःच ठरवले?
ज्याने साधना केली त्याला ठरवू द्या.
हे म्हणजे माझा होमिओपॅथी वर विश्वास नाही म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग झालाच नाही हे मी तुम्हाला ठासून सांगण्यासारखे आहे.
यालाच म्हणतात DELUSIONS OF GRANDEUR ( मी म्हणजे मी म्हणजे मीच)
मनाचा शून्य अभ्यास असलेले संत-महंत त्यापासून मुक्तीच्या भंपक साधना सांगतात.
संत महंत यांनी केवळ लिहिलेल्या गोष्टींवर तुम्ही ठरवता कि त्यांचा मनाचा अभ्यास शून्य आहे
मग आपले इथले लेख वाचून आपल्याला अर्थशास्त्रात काहीहि कळत नाही असे लिहिले तर ?
लेखकाने काय लिहिले आहे हे आपल्याला समजत नाही असे असू शकेल हि शक्क्यता आपण गृहीतच धरत नाही.
दादा कोंडके यांनी म्हटलं होतं " हात चोळीत गेला" यावर कॉलेजची मुलं हसायला लागली तर ते म्हणाले कि यात हसण्यासारखं काय आहे?
मी काहीही बोललो तरी त्याचा दुसराच अर्थ तुम्ही काढता.
आजतागायत ज्ञानेश्वरीवर डझनावर पी एच डी केलेले आणि वर्षानुवर्षे अभ्यास केलेले संशोधक सुद्धा सांगतात कि आपल्याला अजून ज्ञानेश्वरी अर्धी सुद्धा समजलेली नाही.
तर ज्ञानेश्वरीवर आपली टिप्पणी " वयाच्या मानाने बरं लिहिलं आहे " अशी आहे.
म्हणून लिहिलं आहे. DELUSIONS OF GRANDEUR ( मी म्हणजे मी म्हणजे मीच)
18 Jul 2020 - 2:19 pm | संजय क्षीरसागर
सांगायची वेळ आणलीच !
या निमित्तानं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो.
अध्यात्मात सजगतेला फार महत्त्व आहे, कारण स्वतःचा उलगडा होण्यासाठी, अविरत चाललेली मेंटल अॅक्टीविटी थांबणं गरजेचं आहे.
अनेक संतांनी सजगतेविषयी सांगितलंय.
जे. कृष्णमूर्तींची तर संपूर्ण शिकवण अवेअरनेसवर केंद्रित आहे.
यात नामस्मरणी सुद्धा आहेत आणि मजा म्हणजे सजगता नेमकी नामस्मरणाच्या विरुद्ध प्रक्रिया आहे.
पण आजपावेतो एकालाही सजगता म्हणजे नक्की काय हे सांगता आलेलं नाही !
तर सजगता म्हणजे : The Ability to Differentiate Between Fact & Illusion.
लेखकाचा काय झोले ?
त्याला भास आणि वस्तुस्थितीत फरक करता येत नाही.
अर्थात ही प्रत्येक साधकाची परिस्थिती आहे (यात अध्यात्मात रस नसलेले पण आले);
कारण सगळे मनाचंच अनुसरण करतायेत.
_______________________________________
मग मनापासून सुटकेची संतांनी काय शक्कल लढवली ?
तर नाम घेत रहा म्हणजे मन कशात तरी गुंतून राहिल.
ते जुनी लफडी काढणार नाही आणी
अशी सकाळी सकाळी पिस्तुल काढायची वेळ येणार नाही !
पण हा उपाय बोगस आहे कारण जरा नाम हुकलं की स्मृतींचा लफडा सुरु !
पार अजपाजप चालू झाला तरी एखादी जोरकस स्मृती केंव्हा नामाला थर्ड लावेल याचा नेम नाही;
कारण अजपा आणि अप्रिय स्मृती दोन्हीही मनाच्याच प्रक्रिया आहेत !
_____________________________________
सजगता साधण्याचा सोपा उपाय काये ?
एखादी अप्रिय स्मृती जागृत झाली तर फक्त समोर पाहा,
समोरचं स्पष्ट दिसेल. ती व्यक्ती नाही की तो प्रसंग नाही.
खेळ खलास !
लागा तुमच्या कामाला. कसली आलीये क्षमापना आणि कसलं काय.
__________________________________
आलं लक्षात ?
आता तुम्हाला माझा मानसशास्त्राचा अभ्यास लक्षात यायला काही हरकत नाही !
त्यामुळे तुमचं हे सदोदित चालणार गाणं `मी म्हणजे मी म्हणजे मीच'
किती निरर्थक आणि बेसलेस आहे हे सुद्धा कळेल आणि
थोडी प्रगल्भता दाखवून तुम्ही मुद्दा काये ते बघू लागाल.
18 Jul 2020 - 5:03 pm | शाम भागवत
हाहाहा
ॐ शांती ॐ
18 Jul 2020 - 7:35 pm | संजय क्षीरसागर
मग मनापासून सुटकेची संतांनी काय शक्कल लढवली ?
तर नाम घेत रहा म्हणजे मन कशात तरी गुंतून राहिल.
ते जुनी लफडी काढणार नाही आणी
अशी सकाळी सकाळी पिस्तुल काढायची वेळ येणार नाही !
पण हा उपाय बोगस आहे कारण जरा नाम हुकलं की स्मृतींचा लफडा सुरु !
पार अजपाजप चालू झाला तरी एखादी जोरकस स्मृती केंव्हा नामाला थर्ड लावेल याचा नेम नाही;
कारण अजपा आणि अप्रिय स्मृती दोन्हीही मनाच्याच प्रक्रिया आहेत !
_______________________________________
आता ॐ शांती ॐ न करुन सांगतायं कुणाला ?
कारण ३० वर्षांची नामसाधना करुनही पिस्तुल काढावं असं वाटतं याचा उघड अर्थ, मी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे आहे आणि
हा लेख लिहून तुम्ही तो सिद्ध केलायं !
18 Jul 2020 - 7:47 pm | शाम भागवत
ॐ शांती ॐ
11 Jul 2020 - 6:06 pm | चौकस२१२
सुबोध खरे , आपला प्रतीसाद आवडला आणि पटला
8 Jul 2020 - 8:34 pm | शाम भागवत
हेच तर साधायचे असते. त्यासाठी “नामस्मरण“ हाच एकमेव मार्ग आहे असे काही नाही.
तुम्ही निरपेक्ष बुध्दीने जी वैद्यकीय सेवा देताय, ती सुध्दा उपासनाच आहे. तुम्हाला येणारे कटू अनुभव, ही तर तुमची परिक्षचा घेतली जात आहे असे मला वाटते. असे अनुभव येऊनही तुमच्या कार्यात खंड पडत नाही हे विशेष. नियती कडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या या परिक्षांमधे सतत उत्तिर्ण होण्याबद्दल अभिनंदन.
8 Jul 2020 - 11:02 pm | सतीशम२७
सुंदर, आप्रतिम खूप उपयोगी !!!
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील. ===>
अगदी बरोबर......कठीण आहे....पण केल पाहिजे....प्रयत्न करेल,
9 Jul 2020 - 6:14 am | शाम भागवत
शुभं भवतु.
_/\_
9 Jul 2020 - 11:35 am | प्रसाद गोडबोले
१०० !
10 Jul 2020 - 12:51 pm | शाम भागवत
नाही हो. फक्त पन्नास.
:)
उरलेले पन्नास गांजाचे आहेत.
:)
ते मला नकोत. ते तुम्ही घेतले तरी चालेल. नव्हे. तुम्हीच घ्या.
;)
10 Jul 2020 - 10:49 am | राजाभाउ
सर आपला अनुभव आमच्या बरोबर शेअर केल्या बद्दल मनापासून धन्यवाद तुमचे त्यावरील विश्लेषण पण खुप आवडले.
तुम्ही जरी हे केवळ आपल्या भावनिक स्वार्था साठी सुरु केले असले (आणि यात काहीच गैर नाही) तरी आता तो अनुभव केवळ विशिष्ठ व्यक्ति किंवा प्रसंगा पुरता मर्यादित नसून तो तुमच्या जिवनाचा भाग झाला आहे. म्हणजे तुम्हाला यातुन काय गवसले तर, क्षमाशिलतेचा गुण. आणि हे फार मोठे आहे, मार्ग कुठलाही असो कारण क्षमाशिलता ही एक उन्नत भावना किंवा neocortical emotion आहे. त्यामूळे तुमचे मनापासून अभिनंदन.
10 Jul 2020 - 11:55 am | शाम भागवत
धन्यवाद.
_/\_
10 Jul 2020 - 6:23 pm | उन्मेष दिक्षीत
कुठले प्रतिसाद तुम्ही घेतलेत, नुसते ॐ शांती ॐ किंवा सहमत असहमत एवढंच केलंय.
10 Jul 2020 - 6:46 pm | शाम भागवत
हाहाहा
30 Oct 2020 - 5:56 pm | उपयोजक
फक्त हे शत्रूबद्दल शुभ चिंतणे कमालीचे जड गेले.
एखाद्या अबलेवर बलात्कार झाला तर ती अबला त्या बलात्कार्याबद्दल शुभ चिंतू शकेल का?
त्रास देणार्याबद्दल शुभ चिंतणे हे आपण त्याला वास्तवात अद्दल घडवू शकत नसल्याने आपल्याच मनाविरुद्ध केलेली मांडवली वाटते.इतकी दयामाया संत,महात्मे कदाचित दाखवू शकतील.सामान्य माणसाला ते शक्य होईलंसे वाटत नाही. पृथ्वीराजाने महंमद घोरीचा पहिल्याच खेपेला समूळ नाश न केल्याचे दुष्परिणाम माहित असतीलच.
30 Oct 2020 - 8:57 pm | शाम भागवत
हो. हे अवघड आहेच. मलाही ते सोपं गेलेलं नाही.
ती घटना घडून गेलेली आहे. तिचा त्रास सहन करून झालेला आहे. त्या घटनेच्या आठवणी म्हणजे परत परत परत होणारा बलात्कारच असतो. तोही स्वत:च्या शक्तिच्या वापराने. हे लक्षात आले तर जमू शकेल. अन्यथा नाही.
बलात्कार ही एक एक्स्ट्रीम व दुर्मीळ घटना आहे. त्यामुळे त्यावरचा उपाय योजणे हे सोपे नक्कीच नसणार.
क्षमा करणे व अन्यायाचे परिमार्जन करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे लक्षात न आल्याने, याबाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय असं वाटतंय. अपवाद फक्त कानडाऊ योगेशु यांचा होता.
मला खुलासा करावयाचा होता. पण गांजा, सॅडिस्ट संत वगैरेंच्या गोंधळात टंकाळा वाढतच गेला. असो.
क्षमा करणे ही देहाच्या आतील बाब आहे. त्यामधे त्या अप्रिय आठवणीतील मी व माझेपणा घालवायचा आहे. तो गेला की, त्या घटनेतील अप्रियपणा निघून जातो. त्यामुळे त्या घटनेची स्मृती संपूर्णपणे शुध्द स्वरूपात जशीच्या तशी शिल्लक राहते.
वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ती घटना कोणा दुसऱ्याच्या बाबतीत घडली आहे पण त्या घटनेचे सर्व तपशील मात्र आपल्या लक्षात राहीले आहेत.
किंवा
एका वाक्यात सांगायचे झाल्यास त्या घटनेचा मी फक्त साक्षीदार आहे.
अन्यायाचे परिमार्जन ही देहाबाहेरची गोष्ट आहे. यात तक्रार नोंदवणे, लढणे, झगडणे, न्याय मिळवण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सर्व करणे येते.
यातील देहांतर्गत त्रास कसा वाचवायचा हे मी लिहिले आहे.
देहाबाहेरच्या कृतींच्या संदर्भात विचार करताना असे म्हणता येईल की,
अन्यायाचे परिमार्जन करायचे असेल तर थंड डोक्याने एकही चूक न करता हे साघणे हे देहांतर्गत गोष्टी साध्य झाल्यावर जास्त चांगल्या रीतीने जमू शकेल.
पण हे समजले नाही तर मात्र संतांना जबाबदार धरले जाते.
पृथ्वीराजाला ना क्षमा शब्दाचा अर्थ कळला ना कृष्णाची महाभारतातली वागणूक कळली. पण तो संत नक्कीच नव्हता.
असो.
30 Oct 2020 - 9:58 pm | संजय क्षीरसागर
१. एकतर अप्रिय भूतकाळाचं स्मरण होणं हे व्यक्ती झोपेत असल्याचं लक्षाण आहे. इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये हे आश्चर्य.
२. वेळच्या वेळी मॅटर निस्तरता न आल्यानं हे पश्चात उद्योग करायला लागतात. त्यात संतत्व वगैरे काही नाही. तो शुद्ध नेभळटपणा आहे.
३. कुण्या संतानं ही दुसर्याला आतल्या-आत माफ करायची आयडीया सांगितली असेल तर ती स्वतःला भ्रमित करण्याची पद्धत आहे. तो कायमचा इलाज नाही. ती किंवा इतर तत्सम अप्रिय स्मृती केंव्हाही पुन्हा वर येईल, त्याचा काहीही नेम नाही. त्यामुळे आपण जागृत होणं हा सर्वावर एकमेव उपाय आहे.
आता करा ते ॐ शांती : शाती : !
30 Oct 2020 - 10:30 pm | शाम भागवत
30 Oct 2020 - 10:30 pm | शाम भागवत
30 Oct 2020 - 10:30 pm | शाम भागवत
माझ्या ऐवजी तुम्ही केलंय.
धन्यवाद
त्यामुळे आता मी नाही करत.
😀
31 Oct 2020 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे
क्षमा नेमकी कुणाला. ज्या व्यक्तिशी संबंधीत अप्रिय आठवण आहे त्या व्यक्तीला की स्वत:ला की दोन्ही? दुसरे म्हणजे क्षमा हा मनाचा आविष्कार आहे ती देहाच्या आतील बाब आहे असे म्हणण्यात काही विशेष प्रयोजन आहे का? आपण सगळीकडे इथे देह हा शब्द वापरला आहे.
31 Oct 2020 - 2:21 pm | शाम भागवत
शब्दांत सांगणे अवघड आहे.
एकासाठी सोपे केले की, दुसऱ्यासाठी अवघड होतंय.
एकीकडे क्षमाही करायची ती आपल्या स्वास्थ्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने अन्यायाच्या परिमार्जनासाठी जे काही करावयाचे ते सर्व करायचंय पणत्यात सूडबुध्दी नसली पाहिजे.
फरगीव्ह बट नॉट फरगेट.
31 Oct 2020 - 2:57 pm | सतिश गावडे
भागवतजी, ते ॐ शांती : शाती : लिहायचं राहीलं ना. ते असलं की तुमचा प्रतिसाद पटकन ओळखून लगेच उपप्रतिसाद देता येतो लोकांना. :)
1 Nov 2020 - 3:56 pm | शाम भागवत
😀
31 Oct 2020 - 2:55 pm | कानडाऊ योगेशु
स्वतःला.
संदीप खरे म्हणतो तसे कधीतरी स्वतःलाही माफ करायला हवे.
काही वेळेला काही नाईलाज झाल्यामुळे लायकी नसलेल्य व्यक्तींसमोर झुकावे लागते अथवा आतबट्ट्याचा व्यवहार करावा लागतो.
नंतर स्वतःच्याच मनात अपराधीपणाची भावना येत राहते. त्यातुन सुटायचे असेल तर स्वतःला माफ करता यायल हवे.
31 Oct 2020 - 5:15 pm | प्रकाश घाटपांडे
हो ना दुसर्याला क्षमा केली अन ते त्याला समजल तर तो भांडायला यायचा तू कोण मला क्षमा करणारा ? :)
1 Nov 2020 - 3:54 pm | शाम भागवत
😀
असेही होऊ शकते.
16 Nov 2020 - 9:10 pm | अर्धवटराव
+१००
श्रीकृष्ण आणि भीम यांचात हाच फरक आहे.
भीम १०० कौरवांना अमानवीय पद्धतीने संपवतो, युद्धोत्तर काळात धृटराष्ट्राला सतत टोमणे मारत राहातो.
श्रीकृष्ण शिशुपालाचे १०० अपराध थंड डोक्याने मोजु शकतो, द्रौपदीला एका प्रसंगी फक्त वस्त्र पुरवतो आणि त्याचं निमित्त करुन दुसर्या प्रसंगी १८ औक्षहिणी सैन्यांचं पारिपत्य घडवतो. आणि द्वारका बुडण्यपुर्वी शांतपणे देह ठेवतो.
17 Nov 2020 - 6:40 am | चामुंडराय
असे दिसतेय.
17 Nov 2020 - 10:50 am | शाम भागवत
😀
2 Jan 2021 - 12:46 pm | प्रकाश घाटपांडे
हा धागा मी सायकियाट्रिस्ट डॉ सचिन केतकर यांच्या निदर्शनास फेबुवर आणला आहे. ते नक्कीच यावर मानसोपचार शास्त्राच्या दृष्टीकोनातून त्यांच्या साहित्यात अशा विषयावर लिहितील
2 Jan 2021 - 4:55 pm | शाम भागवत
अप्रिय आठवणी भाग-2 लिहायचा विचार करत होतो. पण आता डॉक्टर केतकर यांचं म्हणणे ऐकल्यानंतर लिहायचा विचार करीन.
3 Jan 2021 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे
तुम्ही पुढचा भाग टाका ना! त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे असे त्यांच्या फेबुच्या वॉलवर म्हटले आहे. त्यांचा भावनिक नियमन असा व्हिडिओ त्यांच्या युट्युब चॅनेल वर आहे
https://youtu.be/-GpAylDU2uI
3 Jan 2021 - 10:31 am | कंजूस
युट्यूब विडिओ (ओफलाइन फाइल) डाउनलोड.
https://getvideo.org/en
या वेबसाईटवरून करता येतात.
360 p / 720p hd असे दोन पर्याय आहेत.
जाहिराती नाहीत.
एक विडिओ डाउनलोड केल्यावर डाउनलोडेड फाइलचं नाव बदली करावं.मगच दुसरा करायला जावं. कारण फाईल नेम एकच राहतं.
20 Dec 2022 - 11:42 am | प्रकाश घाटपांडे
मी आज त्यांना परत आठवण केली आहे. व लिहायला प्रवृत्त केले आहे. मला माझ्या अप्रिय आठवणीकडे कसे पहावे हा जो मुद्दा मी आत्मचिंतनासाठी ( खर तर चिरफाड) नेहमी घेतो त्यात स्वत:चे विश्लेषणासाठी मला किती दृष्टीकोन मिळतात हे मी पहात असतो मला हा व्यक्तिमत्व विकासाचाच भाग वाटतो.
2 Jan 2021 - 1:01 pm | कंजूस
परमहंसांची एक गोष्ट आहे. दु:खदायक अप्रिय घटना विसरता येत नाही. मानसोपचार वगैरे मनुष्य प्राण्यास अशक्य. कारण इतर प्राण्यांसारखी विस्मृती दिलेली नाही. आठवणी येतच. राहतात.
प्रत्यक्ष उदाहरणे पाहिली आहेत.
2 Jan 2021 - 1:16 pm | प्रकाश घाटपांडे
तीव्रता कमी करता येते. परमहंसांची कुठली गोष्ट?
मानसोपचार वगैरे मनुष्य प्राण्यास अशक्य.>>>> माणसानेच विकसित केलय ते शास्त्र
3 Jan 2021 - 10:24 am | कंजूस
एक माणूस एकदा म्हणाला "मला द:ख निवारणासाठी काही सांत्वनपर आजच्या प्रवचनात सांगा."
"काय दु:ख?"
" माझा सोळा वर्षांचा मुलगा गेला."
"हे दु:ख निवारण अशक्य आहे., तरीही आज दिवसभर यावरच काही सांगेन."
-------
आर्थिक घातातून लोक सहज सावरतात पण इतर सांसारिक द:ख रुतुन बसतात.
25 Mar 2021 - 12:20 pm | प्रकाश घाटपांडे
शाम भागवत आपण हा भाग ऐका https://www.eplog.media/manachapodcast/unpleasant-event-and-me/
25 Mar 2021 - 1:22 pm | शाम भागवत
ऐकला.
27 Mar 2021 - 1:12 pm | प्रकाश घाटपांडे
अप्रिय आठवणींपासून सुटका करण्यासाठी उपाय भावनिक विलगता कि साक्षीभाव?
हा प्रश्न मी विचारला होता. पण यात दूरस्थ ते तटस्थ या प्रवासा बद्द्ल त्यांनी सांगितले . पण यात खर तर फरक नाही असे ते म्हणाले. मला कधी कधी हे शब्दांच्या कसरती वाटतात. तटस्थ ते त्रयस्थ प्रवास होतो का असा हि प्रश्न पडतोच पुढे.
“निर्णयाची किंमत देणं अपरिहार्य असतं.. पण त्या किंमतीवर व्याज देणं सक्तीच्ं नसतं..”
ट्रिगर बसला की व्याज देणे ही प्रतिक्षिप्त क्रिया बनते. ही प्रतिक्रिया दिली होती.
27 Mar 2021 - 1:28 pm | शाम भागवत
मला शब्दांच्या जंजाळात जायला आवडतं नाही. फसायला होतं. बर्याचदा, कळल्यासारखं वाटतं पण आचरणात आणणं जाम जमत नाही. असो.
त्यांच्या साईटवर मी आज दिलेला अभिप्राय 👇 खालीलप्रमाणे आहे.