स्वच्छ एकटेच तळे : आस्वाद

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Jul 2020 - 1:55 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

स्वच्‍छ एकटेच तळे
विसावले चांदण्यात.
- शंकर रामाणी

शंकर रामाणी यांची ही फक्‍त दोन ओळींची कविता. या दोन ओळीतील एकूण पाच शब्द म्हणजे ही कविता.

स्वच्‍छ - शुचिर्भूत. कलंक नसलेले. डाग नसलेले. नितळ.
एकटेच - एकांत. समाधी लागलेले. चिंतन.
तळे - पाण्याचा साठा. पाणी म्हणजे जीवन. जीवनाचा साठा. तृप्त. विसावले - शांतता. शांती. तृप्तता. आयुष्याच्या सुरूवातीला खूप कष्ट
करूनच विसावता येते. खस्ता खावूनच विसावता येते. तसे
नसेल तर विसावण्याला आळशी म्हणतात. सुस्त म्हणतात.
चांदण्यात - शीतलता. सौहार्दता.

कवितेत तळे आहे. तलाव नाही. तळे नैसर्गिक, तर तलाव मानव निर्मित. तळे असल्याने आजूबाजूला हिरवीगार झाडी सुध्दा असली पाहिजेत. हिरवळ असली पाहिजे. पक्षी असले पाहिजेत. आणि आजूबाजूंच्या झाडीत पशू सुध्दा असले पाहिजेत. जे तलावावर दिवसा आपली तहान भागवायला येत असावेत.
तळे म्हणजे तलाव नाही. पोहण्यासाठी माणसाने बांधून घेतलेला कृत्रिम तलाव नसून हे नैसर्गिक तळे आहे. हे निसर्गरम्य ठिकाण असले पाहिजे. नाहीतर ते स्वच्‍छ कसे राहील? आणि आजूबाजूला शांतता तरी कशी राहील? तळ्यात जीवन असेल. म्हणजे जलचर असतील.
तळे शांत असते. त्यात लाटा निर्माण होत नाहीत. समुद्रात लाटा निर्माण होतात. खाडीत लाटा तयार होतात. निवांत एकट्याच विसावलेल्या मनात क्रोधाच्या- संतापाच्या लाटा निर्माण होत नाहीत.
कवितेत चांदणे आहे, म्हणजेच रात्रीची वेळ आहे. दिवसभर कष्टाची- परमार्थाची कामे केली तर चांदण्यात रात्री शांत विसावता येते. चांदण्याची रात्र आहे म्हणजे कदाचित पौर्णिमेची रात्र असली पाहिजे. पौर्णिमेला चंद्राच्या गुरूत्वाकर्षणाने समुद्रात लाटा निर्माण होतात. मात्र पौर्णिमा असूनही या तलावात समुद्रासारख्या लाटा येत नाहीत. तळे शांत असते. तृप्त असते. तृप्ततेचे – शालीनतेचे आणि शांततेचे हे प्रतीक म्हणजे ही कविता.
तळे एकटेच. त्या विशिष्ट सामसुम जागी आपले कर्तव्य बजावणारे. आपल्या पोटातील जलचर, आजूबाजूचे जंगल, पशू, पक्षी यांच्यावर उपकार करत असल्याचा कोणताही आव न आणता, कोणताही गाजावाजा न करता, प्रसिध्दीचा सोस न धरता इतरांसाठी उपयोगी पडत राहते. तृषार्तांची तहान तृप्त करत राहते. म्हणजेच जीवनाचे भरण पोषण करणारे तळे. प्रसिध्दीच्या झोतापासून जंगलात दूर निवांत आपल्याच शांत चित्तात समाधिस्त. रात्री शुभ्र चांदण्यात कृतार्थतेने विसावले आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती!’
(‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या आताच प्रकाशित झालेल्या समीक्षेच्या पुस्तकातून. लेख इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

1 Jul 2020 - 2:33 pm | प्रमोद देर्देकर

मस्त विवेचन.
आवडले.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jul 2020 - 10:17 am | डॉ. सुधीर राजार...

खूप खूप धन्यवाद.

सिरुसेरि's picture

1 Jul 2020 - 3:14 pm | सिरुसेरि

सुरेख परिचय. +१.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jul 2020 - 10:17 am | डॉ. सुधीर राजार...

खूप खूप धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

2 Jul 2020 - 12:58 pm | चांदणे संदीप

सुंदर उलगडून सांगितली कविता.
पाण्याचं आणि त्यातल्या त्यात तळ्याचं मला खूप आकर्षण आहे. लहानपणी आमच्या गावाबाहेरच्या तळ्यात पोहायचा आनंद मी घेतला आहे.

एक तळे निळे निळे
माशांना सार्‍या घेऊन लोळे

असं एक बडबडगीत लिहिलेलं खूप आधी.

सं - दी - प

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Jul 2020 - 2:18 pm | डॉ. सुधीर राजार...

तुमचं बडबडगीतही आवडलं

मूकवाचक's picture

2 Jul 2020 - 1:02 pm | मूकवाचक

झेन कविता आणि हायकूंची आठवण करून देणारे शब्दसंख्या आणि आशयात व्यस्त प्रमाण असलेले सुरेख काव्य, आणि अप्रतिम भाष्य! धन्यवाद.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

3 Jul 2020 - 2:19 pm | डॉ. सुधीर राजार...

आपला खूप आभारी आहे सर