वैदिक सहा दर्शनांपैकी (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत) सांख्य आणि मीमांसा ही दर्शने निरीश्वरवादी आहेत. निरीश्वरवाद ही संकल्पना जुनीच आहे. वैदिक परंपरेला निरीश्वरवादाचे वावडे नाही. असे असले तरी काळाच्या कसोटीवर उतरल्याने (मूळ तत्वांना बाधा न आणता बदलत्या काळानुसार अत्यंत उच्च कोटीच्या सत्पुरूषांनी वेळोवेळी उजाळा दिल्याने) वेदांत तत्वज्ञानाची महती आजही अखंडपणे टिकून आहे या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करत मूळ विषयाकडे वळतो.
या प्रकरणात ईश्वराच्या स्वरूपाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
प्रथमदर्शनी भगवान रमण महर्षींनी ईश्वराविषयी केलेली विधाने एकमेकांशी विसंगत असल्याने तसेच काही बाबतीत ती परस्पर विरोधी देखील असल्याने कोड्यात टाकणारी वाटतात. प्रसंगोप्पात त्या त्या संदर्भानुसार परमेश्वर कधीच काही करत नाही (तो सदैव अकर्ता असतो), तर कधी ईश्वरी संकल्पाविना झाडाचे पान देखील हलत नाही अशी विधाने ते करत असत. कधी ईश्वर ही एक मनोनिर्मीत संकल्पना आहे, तर कधी ईश्वर ही चराचराला व्यापून दशांगुळे उरणारी एकमेव वस्तुस्थिती किंवा सद्वस्तु (सत्य) असल्याचे ते सांगत असत. प्रश्नकर्त्यांच्या आकलनक्षमतेतला तसेच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीतला फरक लक्षात घेतला, तर महर्षींसमवेत त्यांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद होत असल्याचे जणू प्रतिबिंबच महर्षींनी दिलेल्या वरपांगी पाहता विसंवादी वाटत असलेल्या उपदेशांमधे स्पष्टपणे दिसून येते.
सगुण साकार स्वरूपात ईश्वराची भक्ती करत असलेल्या साधकांचा बुद्धिभेद न करता देव मनुष्य-सदृश स्वरूपात अस्तित्वात आहे या गृहीतकार आधारित असलेले विवेचन महर्षी करत असत. ईश्वरच सृष्टीचा निर्माता आहे, श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलावा तसे आपल्या दैवी शक्तीने तोच जगाचा भार वाहतो आहे, सगळ्या जीवसृष्टीचे भरणपोषण करण्याची काळजी तोच घेतो आहे, तसेच ईश्वरी संकल्पाच्या विरोधात गेले असता काहीही साध्य करता येत नाही - साधारणत: अशा स्वरूपाचा उपदेश सगुण साकार उपासकांना महर्षी देत असत. साधकाचे/ साधिकेचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जोवर अस्तित्वात आहे, तोवर सगुण साकार ईश्वरभक्ती उपकारक आहे (किंवा तोच चित्तशुद्धीचा राजमार्ग आहे) हा महर्षींच्या शिकवणीचा गाभा होता. (हाच मार्ग पुढे अनन्य शरणागतीच्या/ समर्पणभावाच्या आणि ओघानेच आत्मज्ञानप्राप्तीच्या दिशेने जातो. 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे महर्षी नेहेमी सांगत असत).
त्या उलट सगुण साकाराविषयी आकर्षण नसलेल्या (निर्गुण निराकाराकडे ओढा असलेल्या) साधकांना ईश्वर आणि ईश्वरी सत्तेविषयीच्या उपरोक्त संकल्पना 'अथ ते इति' मनोनिर्मीत असून प्रत्येकाच्या अंतर्यामी जन्मजातच लाभलेल्या ईश्वरी प्रचितीचा/ सच्चिदानंद स्वरूपाचा (हृदयस्थो जनार्दनः) अनुभव घेण्यात त्या बाधक ठरतात असा उपदेश महर्षी देत असत. महर्षींच्या सर्वोच्च पातळीवरच्या उपदेशात 'ईश्वर' तसेच 'स्व-स्वरूप' या शब्दांचा प्रयोग आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्या स्वयंसिद्ध स्वसंवेद्य परतत्वाची (सर्वेश्वराची) प्रचिती येते, त्या अद्वैतानुभूतीचेच जणू ते समानार्थी शब्द असावेत अशा प्रकारे केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महर्षींच्या उपदेशानुसार आत्मसाक्षात्कार हाच ईश्वरी साक्षात्कार आहे. ईश्वराची (द्वैतभावाने) प्रचिती घेणे असा ईश्वरी साक्षात्काराचा अर्थ होत नाही, उलट साधक आणि ईश्वर यांच्या संबंधातला द्वैतभाव नष्ट झाल्यावर साधकाचा आपल्या स्वायत्त अस्तित्वाचा भ्रम लयाला गेल्याने त्याला एकतत्वाचा बोध होतो असा अर्थ महर्षींना अभिप्रेत आहे या त्यांनी वेळोवेळी केलेल्या विवेचनातून स्पष्ट होते (उदाहरणः अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥ तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्य तत्त्वी ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज).
भगवान रमण महर्षींनी आत्मानुभवाच्या पातळीवरून केलेल्या ईश्वरविषयक विवेचनाचा गोषवारा असा घेता येईलः
१. ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे.
२. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही.
३. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).
सर्वेश्वराव्यतिरिक्त हिंदू पुराणांमधे नॉर्स किंवा ग्रीक पुराणांप्रमाणेच बहुविध देव/ देवतांचे वर्णन केलेले आहे. याच देव/ देवता सांप्रतच्या काळात हिंदू धर्माचे प्रमुख वैशिष्ट्य झाल्याचे दिसून येते. या देव देवता त्यांची उपासना करत असलेल्या लोकांइतक्याच सत्य आहेत असे सांगून महर्षी कित्येकांना आश्चर्याचा धक्का देत असत. आत्मसाक्षात्कार झाल्यावर ईश्वर (एकेश्वरवादी) असेल किंवा बहुविध देव/ देवता (इष्टदैवत या स्वरूपात) असतील; साधकांच्या दृष्टीने पाहता त्यांचे प्राक्तन एकसारखेच असते (देवतेचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, साधकच उपास्य देवतेत विलीन होऊन जातो) हे महर्षीं मान्य करत असत. साक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याआधी विश्वाचे संचलन करत असलेल्या सर्वोच्च ईश्वरी सत्तेने नेमेलेले विशिष्ट जबाबदारी पार पाडणारे उच्चपदस्थ अधिकारी अशा स्वरूपात देव/ देवतांचे पूजन करणे किंवा त्यांची सकाम उपासना करण्याला देखील महर्षी मान्यता देत असत.
प्रश्नः ईश्वराचे वर्णन सगुण साकार आणि निर्गुण निराकार दोन्ही पद्धतींनी केले जाते. सगुण साकार ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपातच अवघे जग समाविष्ट आहे असे मानले जाते. असे असेल तर या जगाचाच एक घटक असलेल्या आम्हाला परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाचा सहजतेने प्रत्यय यायला हवा.
रमण महर्षी: ईश्वराच्या तसेच जगाचा स्वरूपाविषयी किंवा सत्यासत्यतेविषयी निर्णय घेण्याआधी तुम्ही स्व-स्वरूपाची ओळख करून घेणे तुमच्या हिताचे आहे.
प्रश्नः स्व-स्वरूपाचा बोध झाल्यानेच ईश्वरी साक्षात्कार घडेल?
रमण महर्षी: खचितच, देव तुमच्या अंतर्यामी आहे.
प्रश्न: मग स्व-स्वरूपाला जाणून घेण्यात किंवा ईश्वरी साक्षात्कार होण्यात अडसर कशाचा आहे?
रमंण महर्षी: इतस्ततः भटकणारे मन आणि जगण्याची विपर्यस्त पद्धत.
प्रश्नः ईश्वर ही एक व्यक्ती आहे का?
रमण महर्षी: होय, ईश्वर नेहेमीच प्रथमपुरूषी एकवचनी ('मी' चे शुद्ध चैतन्यस्वरूप) असतो, तो नेहेमी दत्त म्हणून तुमच्या पुढ्यात उभा असतो. तुम्ही जागतिक घडामोडींना अवास्तव महत्व देत असल्याने तो दृष्टीआड होतो. तुम्ही अवांतर गोष्टींमधे स्वारस्य घेणे थांबवले आणि केवळ ईश्वरप्राप्तीचाच मनोमन ध्यास घेतला तर (अवांतर गोष्टी दृष्टीआड होत) सच्चिदानंद स्वरूपात फक्त त्याचेच प्राकट्य शिल्लक उरते.
प्रश्नः आपण असे सांगता की ईश्वरविषयक मांडलेली कुठलीही व्याख्या, मग ती कितीही उच्च उदात्त आणि महान असेल, तरी ती निव्वळ संकल्पनाच असते. याचा अर्थ असा घ्यावा का की ईश्वरच अस्तित्वात नाही?
रमण महर्षी: नाही, (ज्याच्याविषयी कुठलीही संकल्पना शब्दात मांडता येत नाही असे) ईश्वराचे अस्तित्व नित्यसिद्ध आहे.
प्रश्नः मी जेव्हा जेव्हा सगुण साकार रूपात ईश्वराचे पूजन करतो, दर वेळी आपण काही चूक तर केली नाही ना असा एक संदेह माझ्या मनात निर्माण होतो. अमर्याद असलेल्या ईश्वराला मर्यादेत बंदिस्त करणे, निराकाराला साकार स्वरूपात भजणे हा एक प्रकारचा प्रमादच नाही का? त्याच वेळी निर्गुण निराकार स्वरूपात ईश्वरी उपासना करताना सातत्य ठेवणे मला कठिण जाते.
रमण महर्षी: तुम्ही विशिष्ट नावाने पुकारले असता लगेच प्रतिसाद द्याल की नाही? तुम्ही नामरूपात्मक जगतच सत्य आहे असे मानून जगता, तोवर सगुण साकार स्वरूपातच तुम्ही ईश्वरी उपासना करावी यात आक्षेपार्ह काय आहे? आपल्या स्वरूपाचा बोध होत नाही तोवर ईश्वरी उपासना सुरू ठेवा, ती सगुण साकार किंवा निर्गुण निराकार स्वरूपात असल्याने काही फरक पडत नाही.
पुरवणी:
पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी केलेले मार्गदर्शन अध्यात्मिक साधकांच्या दृष्टीने मोलाचे आहे:
शब्दाचे पांडित्य, कल्पनेच्या गोष्टी, वाउगी चावटी, करू नये
तेणे पोटी उठे, दंभ अभिमान, आत्म-समाधान दूर राहे
गोडी कळावया, द्यावा गूळ खाया, देव ओळखाया, स्वानुभव
स्वामी म्हणे नाही, पांडित्याचे काम, स्वये आत्माराम, दाखवावा
(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत संजीवनी गाथा)
स्वामीजींची वर-प्रार्थना अशी आहे:
उदारा जगदाधारा देई मज असा वर | स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर ||१||
काम-क्रोधादिका थारा मिळो नच मदंतरी | अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरी साजिरी ||२||
शरीरी हि घरी दारी स्त्रीपुत्रादि परिग्रही | अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही ||३||
नको धन नको मान नको लौकिक आगळा | सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा ||४||
नको भोग नको त्याग नको विद्या नको कला | अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला ||५||
नर नारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी | राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी ||६||
मी-माझे मावळो सर्व तू तुझे उगवो अता | मी-तूपण जगन्नाथा, होवो एक चि तत्वता ||७||
देव-भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता | दाखवी देव-देवेशा, प्रार्थना ही तुला आता ||८||
(संदर्भः स्वामी स्वरुपानंद कृत भावार्थ ज्ञानेश्वरी)
प्रतिक्रिया
30 Jun 2020 - 4:36 pm | शाम भागवत
सुंदर विवेचन
30 Jun 2020 - 4:37 pm | शाम भागवत
ही तर शामरावांना मारलेली जोरदार थप्पड आहे. :)
शामराव मिपा संन्यास घ्या आता.
:)
30 Jun 2020 - 4:50 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला गाजर दिलं आहे.
ते आपल्याच हातांनी डोळ्यासमोर धरुन,
नामस्मरण करत राहा :
> तुम्ही नामरूपात्मक जगतच सत्य आहे असे मानून जगता, तोवर सगुण साकार स्वरूपातच तुम्ही ईश्वरी उपासना करावी यात आक्षेपार्ह काय आहे?
30 Jun 2020 - 5:00 pm | शाम भागवत
ॐ शांती ॐ
30 Jun 2020 - 5:20 pm | कोहंसोहं१०
खरंय..मलाही वाटतंय अगदीच संन्यास नाही पण तरी आता मिपावरून थोडे लक्ष काढून घ्यावे. संन्यास घेतला तर अश्या लेखमाला मिस होतील. कोण जाणे कधी कुठून अचानक काय गवसेल ज्यामुळे अध्यात्मात प्रगती होईल. संत आणि गुरु वेळोवेळी आठवण करून देत असतात आपल्याला काय करावे आणि काय नाही. आपली अखंड सावधानता महत्वाची :)
30 Jun 2020 - 5:10 pm | संजय क्षीरसागर
१. > ईश्वर नेहेमीच प्रथमपुरूषी एकवचनी ('मी' चे शुद्ध चैतन्यस्वरूप) असतो, तो नेहेमी दत्त म्हणून तुमच्या पुढ्यात उभा असतो. तुम्ही जागतिक घडामोडींना अवास्तव महत्व देत असल्याने तो दृष्टीआड होतो.
२. > तुम्ही नामरूपात्मक जगतच सत्य आहे असे मानून जगता, तोवर सगुण साकार स्वरूपातच तुम्ही ईश्वरी उपासना करावी यात आक्षेपार्ह काय आहे?
कशाचा कशाला मेळ नाही !
या असल्या बोगस समन्वयानं साधक कायम गोंधळणार !
बघा ते शाम भागवत.
एकमेव वाचक मिळाला होता, तो पण आता गोंधळला !
30 Jun 2020 - 5:16 pm | शाम भागवत
ॐ शांती ॐ
30 Jun 2020 - 5:15 pm | कोहंसोहं१०
छान सुरु आहे लेखमाला. सर्वंकडे प्रतिसाद देत नसलो तरी सर्व लेख वाचतोय. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.
30 Jun 2020 - 5:28 pm | मूकवाचक
30 Jun 2020 - 9:30 pm | अर्धवटराव
जन्मे ना कोणि, मरे ना कोणि.
स्वर्ग नाहि, नर्क नाहि, 'मी' सुद्धा नाहि, neither space nor time... what exists is sheer existence..
Hats off _/\_
1 Jul 2020 - 1:53 am | अर्धवटराव
हे सर्वात महत्वाचं
जय जय राम कृष्ण हरि _/\_
1 Jul 2020 - 4:28 pm | मूकवाचक
सर्वश्री शाम भागवत, संजय क्षीरसागर, कोहंसोहं१० आणि अर्धवटराव यांनी मनमोकळे प्रतिसाद दिले आहेत. मनःपूर्वक धन्यवाद.