या प्रकरणात पुनर्जन्माविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
देहाचा मृत्यु झाल्यावर जीवात्म्याची (individual soul) गती पुढे कशी असते या विषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यासाठी बहुतांशी सगळ्याच धर्मांनी आपापल्या सिद्धांतप्रणालींची निर्मिती केल्याचे दिसून येते. त्या पैकी काहींचा असा दावा आहे की जीवात्मा स्वर्ग किंवा नरकात जातो, तर काहींचा असा दावा आहे की जीवात्मा नवा देह धारण करून पुनर्जन्म घेतो.
श्री रमण महर्षीं असे प्रतिपादन करत असत की जीवात्मा स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे या चुकीच्या गृहीतकावर उपरोक्त सिद्धांतप्रणाली आधारित आहेत. एकदा या भ्रमाच्या आरपार पाहता आले (स्वरूपाचा साक्षात्कार झाला); की मग देहपातानंतर जीवात्म्याची गती काय असेल या विषयीच्या अत्यंत भुसभुशीत पायावर उभारला गेलेला समस्त सिद्धांतप्रणालींचा डोलारा तत्क्षणी भुईसपाट होतो. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म तर सोडाच, (आत्मस्वरूपाचा) जन्म आणि मृत्यु देखील संभवत नसल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.
आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून मांडलेला उपरोक्त सिद्धांत काही लोकांच्या पचनी पडत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या मर्यादा लक्षात घेत आपली भूमिका लवचिक करून (आत्मस्वरूपापेक्षा खालच्या प्रतलावर) पुनर्जन्म होतो असे महर्षी मान्य करत असत. अशा लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना एखादी व्यक्ती जीवात्मा खरोखर अस्तित्वात आहे असे गृहीत धरून चालली; तर देहपात झाला तरी जीवात्म्याचे अस्तित्व टिकून राहते आणि तोच यथावकाश नवा देह धारण करून नव्या जीवनाची सुरूवात करतो असे स्पष्टीकरण महर्षी देत असत. देहतादात्म्य साधण्याची प्रबळ वासना मनात असल्यानेच 'पुनरपि जननं पुनरपि मरणं' ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहते. मनाने नाहक ओढवून घेतलेल्या भ्रममूलक मर्यादा ओलांडून सीमोल्लंघन केले, देहतादात्म्य नष्ट झाले की मग जन्म, मृत्यु आणि पुनर्जन्म तसेच तदनुषंगिक सिद्धांतप्रणाली पूर्णपणे गैरलागू ठरतात असे महर्षी सांगत असत.
*** [हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥ - संत एकनाथ महाराज]
प्रश्नः पुनर्जन्म खरा आहे का?
रमण महर्षी: जोवर अज्ञान आहे तोवर पुनर्जन्म होत राहतात. (आत्मस्वरूपात मात्र) भूतकाळ, वर्तमानकाळ तसेच भविष्यकाळात देखील पुनर्जन्माची शक्यताच संभवत नाही. हेच सत्य आहे.
प्रश्नः प्रत्येक व्यक्तीच्या हातून घडलेल्या (पापपुण्यात्मक) कर्मांचा तिच्या पुढच्या जन्मांवर परिणाम होतो का?
रमण महर्षी: या क्षणी तुमचा (आत्मस्वरूपाचा) जन्म झालेला आहे का? मग इतर जन्मांविषयी तुम्ही विचार का करावा? वस्तुस्थिती तर अशी आहे की (आत्मस्वरूपाचा) जन्म किंवा मृत्यु होत नाही. ज्याने जन्म घेतला आहे त्याला जन्ममरणाचा फेरा कसा चुकवावा या संबंधी विचार करू द्या. (तुम्ही स्वरूपस्थितीत स्वस्थ रहा).
प्रश्नः मृत्युनंतर जीवात्म्याचे पुढे काय होते?
रमण महर्षी: या क्षणी जिवंत असलेल्या व्यक्तीने हा प्रश्न विचारणे उचित नाही. मृत झालेला जीव हा प्रश्न उपस्थित करेल तर ते कदाचित उचित ठरेल. जन्म आणि मृत्युच्या मधल्या काळात देहधारी जीवाने 'मी' चे खरे स्वरूप शोधून त्याच्या समोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचे उत्तर शोधणेच संयुक्तिक आहे. आत्मबोध झाला की तुमच्या सगळ्या शंका कुशंकांचा आपोआप अंत होईल.
प्रश्नः भूतकाळ आणि भविष्यकाळ या निव्वळ कल्पनामात्र आहेत का?
रमण महर्षी: होय, वर्तमान ही देखील निव्वळ एक कल्पनाच आहे. काळच नव्हे तर अवकाशाचे देखील अस्तित्व मनोनिर्मितच आहे. त्यामुळे काळ आणि अवकाशाच्या मितीत घडत असलेले जन्म, पुनर्जन्म देखील काल्पनिकच आहेत.
प्रश्नः माणसाला खालच्या पातळीवरच्या पशुचा जन्म मिळणे शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. जडभरत या राजयोग्याला हरणाचा जन्म ('जातिस्मर मृग') मिळाल्याची कथा सर्वज्ञात आहे.
प्रश्नः जीवात्म्याने पशुचा देह धारण केला असता त्याची/ तिची अध्यात्मिक प्रगती होणे शक्य असते का?
रमण महर्षी: ते अशक्य कोटीतले नसले, तरी अशी उदाहरणे दुर्मिळात दुर्मिळ श्रेणीतली आहेत. मनुष्यदेहात मिळालेला जन्मच (पारमार्थिक दृष्ट्या) सर्वश्रेष्ठ असतो, तसेच आत्मसाक्षात्कार घडण्यासाठी मनुष्यदेहच धारण करावा लागतो या धारणा पूर्णपणे चुकीच्या आहेत. प्राण्यांना देखील आत्मसाक्षात्कार घडू शकतो.
पुरवणी:
पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी आत्मबोध झाल्याने जन्म मरणाची 'वार्ता' कशी संपते याचे वर्णन असे केले आहे:
भूत-भविष्याचे मान, आम्ही नेणो वर्तमान
सदा सर्वकाळ जाण, आत्म-रूपी सावधान
आम्ही ठाई चि निर्गुण, आम्हा कैसे जन्म-मरण
स्वामी म्हणे आत्म-पणे, आम्हा सर्वत्र नांदणे
देह नव्हे ऐसा, केलो गुरू-राये
देखिली म्या सोये, स्व-रूपाची
जन्म-मरणाची, संपली ते वार्ता
दूर ठेली चिंता, संसाराची
आता आत्म-रूप, झाले त्रिभुवन
हारपले भान, दिक्कालाचे
स्वामी म्हणे मन, होता चि उन्मन
लाधले निधान, स्वानंदाचे
(संदर्भः प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत संजीवनी गाथा)
भगवान रमण महर्षींच्या परम कृपांकित 'लक्ष्मी' गायीविषयीचा माहितीपटः
प्रतिक्रिया
29 Jun 2020 - 12:20 pm | मूकवाचक
29 Jun 2020 - 1:26 pm | शाम भागवत
छान
29 Jun 2020 - 3:36 pm | Jayant Naik
काही महिन्यापूर्वी. आम्ही रमण महर्षींचा आश्रम बघून आलो. अतिशय पवित्र वातावरण . तुमचे लेख खूप सुंदर होत आहेत. असेच लीकीत रहा.
29 Jun 2020 - 3:37 pm | Jayant Naik
असेच लिहित जा असे वाचा. क्षमस्व.
30 Jun 2020 - 10:06 am | मूकवाचक
श्री. शाम भागवत आणि श्री. जयंत नाईक यांना मन:पूर्वक धन्यवाद!
30 Jun 2020 - 11:24 am | संजय क्षीरसागर
१. > आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता स्वर्ग, नरक आणि पुनर्जन्म तर सोडाच, (आत्मस्वरूपाचा) जन्म आणि मृत्यु देखील संभवत नसल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते.
२. > आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून मांडलेला उपरोक्त सिद्धांत काही लोकांच्या पचनी पडत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या मर्यादा लक्षात घेत आपली भूमिका लवचिक करून (आत्मस्वरूपापेक्षा खालच्या प्रतलावर) पुनर्जन्म होतो असे महर्षी मान्य करत असत.
३. > प्रश्नः भूतकाळ आणि भविष्यकाळ या निव्वळ कल्पनामात्र आहेत का?
रमण महर्षी: होय, वर्तमान ही देखील निव्वळ एक कल्पनाच आहे. काळच नव्हे तर अवकाशाचे देखील अस्तित्व मनोनिर्मितच आहे. त्यामुळे काळ आणि अवकाशाच्या मितीत घडत असलेले जन्म, पुनर्जन्म देखील काल्पनिकच आहेत.
४. > प्रश्नः माणसाला खालच्या पातळीवरच्या पशुचा जन्म मिळणे शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. जडभरत या राजयोग्याला हरणाचा जन्म ('जातिस्मर मृग') मिळाल्याची कथा सर्वज्ञात आहे.
______________________________________
लवचिकपणा म्हणजे स्वतःचा आणि पर्यायनं दुसर्याचाही गोंधळ उडवून देणं.
एकतर ठामपणे सांगा की पुनर्जन्म नाही किंवा मग प्रामाणिकपणे कबूल करा की मला माहिती नाही.
जो सिद्ध साधकांच्या मर्जीनुसार, त्यांचा कल पाहून उत्तरं देतो, तो साधकांचं अनुसरण करत असतो.
मग अध्यात्म आणि राजकारण यात फरक तो काय ?
_____________________________________
दुर्लक्ष करा आणि पुढे रेटत राहा असाच सल्ला इथले भक्ताळू देतील आणि
तुमच्याकडेही इतक्या उघड विसंगतीला काही उत्तर नसल्यानं हे असंच चालू राहील.
पण इतका उघड विरोधाभास `लिखित म्हणजे सत्य' वाटतं,
अशा भाबडेपणालाच मंजूर होईल.
30 Jun 2020 - 12:13 pm | शाम भागवत
मूकवाचका,
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
पुभाप्र व पुभाशु
30 Jun 2020 - 12:16 pm | संजय क्षीरसागर
तेवढं राहून गेलं !
30 Jun 2020 - 1:18 pm | शाम भागवत
:)
ते तुमच्या धाग्यावर.
;)
30 Jun 2020 - 5:42 pm | मूकवाचक
श्री संजय क्षीरसागर यांनाही मन:पूर्वक धन्यवाद.
1 Jul 2020 - 1:50 am | अर्धवटराव
जन्मे ना कोणि, मरे ना कोणि.
स्वर्ग नाहि, नर्क नाहि, 'मी' सुद्धा नाहि, neither space nor time... what exists is sheer existence..
Hats off _/\_