भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
26 Jun 2020 - 12:29 pm

या प्रकरणात अध्यामिक साधकांचे भावविश्व तसेच त्यांच्या समस्यांविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

अध्यात्मिक साधकांच्या भावविश्वाचा धांडोळा घेतला असता शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, उत्कट भावभावनांचे मानसिक स्थिती सतत दोलायमान ठेवणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येत असल्याचे लक्षात येते. इथे उल्लेख केलेले अनुभव 'प्रचिती' या विभागातल्या मागील दोन प्रकरणांमधे उल्लेख केलेल्या अनुभवांइतके नाट्यमय स्वरूपाचे नसले, तरी साधकविश्वात या अनुभूतींच्या अन्वयार्थाविषयी कमालीचे कुतुहल असल्याचे दिसून येते. या पैकी काही अनुभूतींचा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचे मैलाचे दगड असा अन्वयार्थ लावला जातो; तर काही अनुभूतींचा आत्मसाक्षात्काराच्या मार्गातले अडथळे किंवा साधकाला पथभ्रष्ट करणारे चकवे असा अन्वयार्थ लावला जातो. सकारात्मक अनुभव क्षणिक न ठरता ते स्थिर व्हावेत किंवा अधिकाधिक कालावधी करता अनुभवता यावेत या दृष्टीने साधक जिवाचे रान करताना दिसतात. नकारात्मक अनुभव चकवा देणारे असतील तर त्यांना बळी न पडणे; तसेच ते साधनेत विक्षेप आणणारे असतील तर त्यांचा अडसर दूर करणे या दृष्टीने साधकांना अथकपणे यथाशक्ती यथामति प्रयत्न करावे लागतात असे दिसून येते.

श्री रमण महर्षींचा कल मात्र उघडपणे 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच सुखद अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. क्वचित प्रसंगी आपल्या उपदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मविचाराला तात्पुरती बगल देत एखाद्या साधकाला उपयुक्त ठरेल असे वाटले तर विशिष्ट अनुभूती येण्यामागच्या मूळ कारणाविषयी महर्षीं सविस्तर उहपोह करत असत. आत्मलाभ व्हावा या दृष्टीने साधकांना आलेल्या अनुभूतींचे उपकारक किंवा अपायकारक असे वर्गीकरण करत महर्षींनी तदनुषंगिक मार्गदर्शन केल्याची अपवादात्मक आणि मोजकीच उदाहरणे आहेत. साक्षेपाने पाहिले असता मात्र अध्यात्मिक अनुभूतींमधे स्वारस्य घेण्यापासून महर्षी आपल्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत असेच दिसून येते.

अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने/ साधिकेने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला/ तिला तितक्याच तत्परतेने मार्गदर्शन करत असत. साधकांनी मांडलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या व्यथा महर्षी अतिशय संयत वृत्तीने, सहानुभूतीपूर्वक तसेच अक्षरशः जिवाचे कान करून समजावून घेत असत. त्यांच्या समस्यांचे समाधान होईल या दृष्टीने साधकांना रुचतील पचतील अशी अत्यंत विधायक उत्तरे महर्षींकडून मिळत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.

प्रश्नः ध्यान करत असताना काही वेळा मला एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाची अनुभूती येते. अशा वेळी मी स्वत:ला "हा आनंद कोण अनुभवतो आहे" असा प्रश्न विचारायला हवा का?
रमण महर्षी: तुमचे मन स्वरूपात पूर्णपणे लीन झालेले असेल, तुम्ही अनुभवता तो आनंद जर खरोखरचा आत्मानुभूतीचा आनंद असेल, तर तुम्हाला अशी शंका येण्याची शक्यताच उरणार नाही. अनुभूतीबद्दल प्रश्न पडावा याचाच अर्थ असा होतो की तुम्ही अजून आत्मस्थिती प्राप्त केलेली नाही.

सतत शंका कुशंका उपस्थित करणार्‍याचे 'मी' चे मूळ स्वरूप किंवा त्याचे उगमस्थान गवसले तरच सगळ्या शंका कुशंकांचा अंत होतो. एक एक शंका दूर करत बसणे (अध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने) फारसे हितावह नाही. एका शंकेचे निरसन केले तर तिच्या उत्तरातूनच दुसरी शंका निर्माण होते; आणि मारूतीच्या शेपटासारखी शंकासुराची शेपटी लांबतच जाते! मात्र शंकाकुल असलेल्या व्यक्तीने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध आरंभला तर शंका कुशंकांच्या कचाट्यात सापडलेला तथाकथित 'मी' वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही ('मी' चे मूळ स्वरूप काही वेगळेच आहे) हे तिच्या लक्षात येते. स्वरूपबोध झाला की सगळ्या शंका कुशंकांचा आपोआप अंत होतो.

प्रश्नः ध्यानस्थ असताना कधीकधी आनंदाची उत्कट प्रचिती आल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याची जाणीव मला होते. इतर वेळी मात्र मला अशी अनुभूती येत नाही. या मागे काय कारण आहे?
रमण महर्षी: सच्चिदानंद स्वरूप ही एक निरंतर अस्तित्वात असलेली गोष्ट असल्याने स्वरूपानंदाची येरझार होणे संभवत नाही. ज्या गोष्टींची येरझार झाल्याचे अनुभवता येते त्या मनोनिर्मीत असल्याने तुम्ही तिकडे फारसे लक्ष न पुरवलेलेच बरे.

प्रश्नः ध्यानातल्या आनंदाने देहात विलक्षण चैतन्याचा संचार होतो, मात्र ती अनुभूती ओसरल्यावर मला खिन्न, निरूत्साही आणि हताश झाल्यासारखे वाटते. असे का होते?
रमण महर्षी: आनंदाची अनुभूती येत असताना तसेच ती ओसरल्यानंतर निरूत्साही वाटत असताना - या दोन्ही स्थितीत असताना तसेच त्या मधील स्थित्यंतर अनुभवण्यासाठी 'तुम्ही' सदोदित उपस्थित असता हे तुम्हाला मान्य असेलच. अनुभव येत जात राहिले तरी आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे तुम्ही एकीकडे सुरूच ठेवा. तुम्हाला स्वरूपाचा यथोचित बोध झाला, की मग या तथाकथित अनुभूतींचे महात्म्य तुमच्या खिजगणतीतही नसेल हे मी खात्रीने सांगतो.

प्रश्नः ध्यान करत असताना अवांतर विचार आणि वासनांकडे धाव घेण्याच्या मनाच्या ओढाळ प्रवृत्तीवर मात करण्यासाठी मी काय करायला हवे? विचारांवर ताबा मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनाचे नियमन कशा प्रकारे करता येईल?
रमण महर्षी: तुमचे मन जसजसे स्वरूपानुसंधानात स्थिर होत जाईल, तसतसे इतर विचार आणि वासना आपोआपच बाजूला पडत जातील. मन दुसरे तिसरे काहीही नसून नानाविध विचारांचे ते एक गाठोडे आहे. विचारांच्या अवाढव्य विस्तार झालेल्या वटवृक्षाचे मूळ 'मी आहे' हा विचारच आहे. 'मी' च्या मूळ स्वरूपाकडे तुमची दृष्टी वळेल (अंतर्मुखता वाढेल) आणि अहंस्फुरणेचे उगमस्थान तुम्हाला गवसेल तेव्हा सगळे विचार स्वरूपात विलीन होऊन जातील.

नियमीतपणे ठरलेल्या वेळी जागे होणे, स्नान-संध्या करणे, मंत्रपठण किंवा जपजाप्य करणे तसेच चित्तशुद्धीसाठी अन्य कर्मकांडे करणे या गोष्टी साधकांसाठी उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. मात्र उपरोक्त सगळ्या गोष्टी आत्मविचाराकडे ज्यांचा कल नाही किंवा आत्मविचार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी नाही अशा साधकांसाठीच मोलाच्या आहेत. आत्मविचार करण्याकडे ज्यांचा ओढा आहे तसेच आत्मविचार करणे ज्यांना शक्य आहे अशा साधकांसाठी यम-नियम, शिस्तबद्ध आचरण, कर्मकांडे आणि तत्सम गोष्टींची आवश्यकता नाही.

पुरवणी (विभाग ५ ची सांगता):

या प्रकरणाच्या पुरवणीत भगवान रमण महर्षींविषयी तसेच डेव्हिड गॉडमन यांच्याविषयी लेखमालेशी संबंधित असलेले माहिती थोडक्यात समाविष्ट केलेली आहे.

डेव्हिड गॉडमन यांनी एकाग्र निष्ठेने, साक्षेपाने आणि महत्प्रयासाने रमण महर्षींच्या काही दशकांच्या कालावधीत शिष्यांसोबत झालेल्या संवादांचे संकलन केलेले आहे. 'बी अ‍ॅज यू आर' या जालावर तसेच यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या पुस्तकाव्यतिरिक्त 'द पॉवर ऑफ द प्रेझेन्स' असे शीर्षक असलेल्या त्यांच्या ग्रंथाचे तीन खंड रमणाश्रमात तसेच ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. रमण महर्षींच्या सान्निध्यात कमी अधिक काळ व्यतित करण्याचे अहोभाग्य लाभलेल्या कित्येक भक्तांनी त्यांचे मनोगत लिहून ठेवलेले आहे. तमिळ किंवा तेलगू भाषेतल्या जाणकार व्यक्तींकडून या गोष्टी समजावून घेत, समकालिन संदर्भ पडताळून त्यांची सत्यासत्यता ठरवत, गद्य तसेच पद्य दोन्ही स्वरूपातल्या मनोगतांचे इंग्रजी भाषेचे सौष्ठव सांभाळत गॉडमन यांनी भाषांतर केलेले आहे. तुटक तुटक स्वरूपात उपलब्ध असलेल्या रमणभक्तांच्या आठवणी संकलित करत असताना लेखनातल्या प्रवाहात खंड पडू नये या दृष्टीने गॉडमन यांनी मधे मधे स्वतः स्फुट लेखन करत काही सांधे जोडले आहेत. स्वत:चे लेखन काटेकोरपणे अधोरेखितही केलेले आहे. त्यांच्या या भगिरथ प्रयत्नांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत! त्यांचे लेखन इंग्रजीत असल्याने जगभरच्या रमणभक्तांसाठी त्यांनी एक मोठा खजिनाच उपलब्ध करून दिलेला आहे असे म्हणावे तर अतिशयोक्त ठरू नये.

अनुवाद करताना येत असलेल्या काही मर्यादांविषयी देखील गॉडमन यांनी प्रांजळपणे भाष्य केलेले आहे. उदाहरणार्थ ते म्हणतात - श्री रमण महर्षी नेहेमी आपलेच खरे करणारे दुढ्ढाचार्य ('पॉम्पस व्हिक्टोरिअन') असावेत, किंवा उपदेशामृत पाजण्याची संधी शोधत सरसावून बसलेले शुष्क तत्वज्ञानी असावेत असा स्वर माझ्या लेखनातून कदाचित दिसेल. असे वाटले तर ती माझी मर्यादा आहे. वस्तुस्थिती मात्र तशी मुळीच नाही. काही दशकांच्या कालखंडात झालेल्या संवादांचे एकत्रिकरण केल्याने तसा आभास होऊ शकतो. असो.

रमण महर्षी हयात असताना आश्रमात अत्यंत खेळीमेळीचे, नियमांचा जाच किंवा नैतिकतेचे अवास्तव स्तोम नसलेले तसेच अत्यंत अनौपचारिक वातावरण होते असे स्पष्टपणे दिसून येते. रमण महर्षींच्या निव्वळ उपस्थितीने आश्रमातले वातावरण सवंगपणा, प्रचारकी थाट, भपकेबाजपणाकडे न झुकता ते स्वभावत:च सात्विक, सौहार्दपूर्ण आणि पवित्र कसे राहिले हे गॉडमन यांची पुस्तके वाचून लक्षात येते.

आत्मविचार आणि शरणागती या दोन शब्दात रमण महर्षींच्या शिकवणीचे सार सामावलेले आहे. महर्षींच्या उपदेशात इतर गोष्टींचा (उदा. कर्मयोग, विविध उपासना पद्धती, विविध योग पद्धती) समावेश आत्मविचार आणि शरणागतीला पूरक या स्वरूपातच केला गेलेला आहे हे सहज लक्षात येते. स्वरूपानुसांधान साधण्यासाठी किंवा अनन्य भक्ती करण्यासाठी साधकांनी उद्युक्त व्हावे हा महर्षींच्या उपदेशाचा केंद्रबिंदू असल्याने लेखमालेच्या उर्वरित भागात शेवटच्या विभागात येणारा अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह साधकांच्या दृष्टीने दुय्यम महत्वाचा आहे असेच म्हणावे लागेल.

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

vikramaditya's picture

26 Jun 2020 - 12:30 pm | vikramaditya

इग्नोर करणे या सारखं मिपावर मोठं अस्त्र नाही...

शाम भागवत's picture

26 Jun 2020 - 12:40 pm | शाम भागवत

छान.

इन्दुसुता's picture

27 Jun 2020 - 8:29 pm | इन्दुसुता

या मालिकेतील सर्वच भाग आवडले.
माझ्या आवडीचा विषय, तुमची संयत व अवडंबर रहित आणि सोपी भाषा, आणि शुद्धलेखन यामुळे प्रत्येक भाग अतिशय आवडला.

"इग्नोर करणे या सारखं मिपावर मोठं अस्त्र नाही..." हे वर वाचले.
प्रत्येक भाग वाचल्यानंतर " लेखनआवडले" असा प्रतिसाद दिला नाही... तरी, ही पोच सर्व भागांसाठी आहे असे समजावे.

नियमीतपणे ठरलेल्या वेळी जागे होणे, स्नान-संध्या करणे, मंत्रपठण किंवा जपजाप्य करणे तसेच चित्तशुद्धीसाठी अन्य कर्मकांडे करणे या गोष्टी साधकांसाठी उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. मात्र उपरोक्त सगळ्या गोष्टी आत्मविचाराकडे ज्यांचा कल नाही किंवा आत्मविचार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी नाही अशा साधकांसाठीच मोलाच्या आहेत. आत्मविचार करण्याकडे ज्यांचा ओढा आहे तसेच आत्मविचार करणे ज्यांना शक्य आहे अशा साधकांसाठी यम-नियम, शिस्तबद्ध आचरण, कर्मकांडे आणि तत्सम गोष्टींची आवश्यकता नाही.

हा अध्यात्माचा गाभा आहे!

विवीध मार्ग आहेत आत्मस्वरूप जाणण्याचे. साधकाच्या तयारीनुसार योग्य तो मार्ग निवडला जातो.

- (साधक) सोकाजी

मूकवाचक's picture

28 Jun 2020 - 10:59 am | मूकवाचक

विक्रमादित्य, शाम भागवत, इन्दुसुता आणि सोत्रि - मनःपूर्वक धन्यवाद!