भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ८ - गुरूतत्व

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
12 Jun 2020 - 11:37 am

या प्रकरणात अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असलेल्या तसेच अध्यात्मिक साधकांच्या जीवनात निर्णायक भूमिका निभावत आलेल्या गुरूतत्वाविषयी भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

रमण महर्षी नेहेमी सांगत असत की ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः). ते असा निर्वाळा देत असत की वाघाच्या जबड्यात सापडलेले सावज जसे कधीच पलायन करू शकत नाही, तद्वतच एखाद्या भाग्यवंतावर सद्गुरूंचा कृपाकटाक्ष पडला की मग कुठल्याही परिस्थितीत सद्वुरू त्याला अंतराय देत नाहीत. भक्ताचे इहपरलोकी रक्षण करण्याची जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतात. असे असले तरी साधकानेही न चुकता आणि एकाग्र निष्ठेने गुरूपदिष्ट मार्गाचे अनुसरण करावेच लागते.

आपल्याकडे गुरूपद नाही आणि आपले कुणीही शिष्य असा महर्षींचा दृष्टीकोन असला तरी शिष्यवर्गाच्या दृष्टीने मात्र ते करूणेचा आणि कृपेचा अथांग सागरच होते. एखादा शिष्य छोट्या आकाराचे भांडे घेऊन जाईल, तर एखाद्यात सगळ्या सागरालाच रिचवण्याची क्षमता असेल. हे लक्षात घेता ज्याची जितकी क्षमता आहे तितके कृपादान त्याच्या पदरी पडेल असेच म्हणावे लागेल. सागराने कृपणता दाखवली अशी तक्रार करणे हा खरे तर एक प्रकारचा नादानपणाच नाही का?

चित्ताचा क्षोभ तात्पुरता का होईना निवळण्यासाठी संतांच्या सहवासात राहणे हा एक हमखास परिणामकारक ठरणारा उपाय आहे. समाधी साधनात संत निष्णात झालेले असतात, नव्हे तीच त्यांची विनासायास आणि अखंड टिकून राहणारी सहजस्थिती झालेली असते. अशा सत्पुरूषांविषयी जिव्हाळा वाटणे आणि त्यांच्या सान्निध्यात राहणे ज्यांना आवडायला लागते, असे शिष्यदेखील शनै: शनै: त्यांच्या समाधीस्थ जगण्याची सवय अंगी बाणवायला लागतात.

महर्षी नेहेमी असे सांगत असत की गुरू अंतर्यामी आहे आणि बाहेरही आहे. त्यामुळे गुरूकृपा दोन प्रकारे काम करते. बाहेर असलेले गुरू उपदेश देण्याचे तसेच त्यांच्या सामर्थ्याने शिष्याला आत्मनिष्ठ होण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य करतात. अंतर्यामी असलेले गुरूतत्व जागृत झाले, की ते शिष्याच्या मनाला त्याच्या उगमस्थानाकडे परत वळवतात, तिथेच स्थिर करतात आणि शेवटी सच्चिदानंद निजस्वरूपात मनोलय घडवून आणतात.

रमण महर्षींच्या उपदेशातले एक मूलभूत तत्व असे आहे की आत्मलाभ व्हावा अशी ईच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरू लाभणे अनिवार्य आहे. सद्गुरू मनुष्य देहधारीच असणे मात्र अनिवार्य नाही. (रमण महर्षींसारख्या दुर्मिळ उदाहरणांमधे गुरू मनुष्य देहधारी नसतात. शिवस्वरूप मानला गेलेला अरूणाचल पर्वत महर्षींना गुरूस्थानी होता). रमण महर्षी नेहेमी असे निदर्शनास आणून देत असत की आत्मलाभ व्हावा अशी आत्यंतिक तळमळ ज्याच्या ठायी नाही अशा शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवण्याचे सामर्थ्य कुठल्याही सद्गुरूंपाशी नसते. एखाद्या साधकाने/ साधिकेने गांभिर्याने आणि आंतरिक तळमळीने आत्मशोध सुरू केला, की गुरुकृपेचा आणि गुरूंच्या सामर्थ्याचा ओघ आपोआप त्याच्या/ तिच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र साधकाने/ साधिकेने कुठलाही प्रयत्न केला नाही, तर सद्गुरू देखील असहाय्य ठरतात.

प्रश्नः गुरूकृपा कशी असते? गुरूकृपेने आत्मसाक्षात्कर कसा घडून येतो?
रमण महर्षी: गुरू आणि आत्मस्वरूप एकच असते. आपल्याला जे काही मिळाले आहे त्यात समाधान न वाटल्याने एखाद्याचे मन उद्विग्न होते. अशी व्यक्ती आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाची करूणा भाकायला लागते. मनोभावे केलेल्या प्रार्थनेत असलेल्या अंगभूत सामर्थ्यामुळे अशा व्यक्तीची हळूहळू चित्तशुद्धी व्हायला लागते. ओघानेच पुढच्या टप्प्यावर अशा साधकाची प्रार्थना ईश्वरी साक्षात्काराच्या तळमळीत परिणत होते. आपल्या ऐहिक वासनातृप्तीकरता न राहता अशा भक्ताची प्रार्थना अहेतुकपणे आणि फक्त ईश्वरी कृपा संपादन करण्यासाठी होत जाते. हे साध्य झाले की ईश्वरी कृपा हळूहळू प्रकट व्हायला लागते. ईश्वरच मानवी देहाच्या स्वरूपात अशा शिष्याच्या संपर्कात येतो. आपल्या सहवासात त्याची चित्तशुद्धी घडवून आणतो आणि अंती त्याला आपल्या सत्यस्वरूपापर्यंत घेऊन जातो. भक्ताचे मन सामर्थ्यवान होते आणि त्याची अंतर्मुख होण्याची क्षमता वाढायला लागते. अंतर्यामी असलेले गुरूतत्व अशा वेळी मनाला त्याच्या उगमाकडे खेचून घेते आणि मन शांतवावे या साठी मदत करते. हीच गुरूकृपेची महती आहे. खरे तर ईश्वर, गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद मुळातच नसतो.

प्रश्नः (साधकाने) सद्गुरूंचा शोध कसा घ्यावा?
रमण महर्षी: अनादि अनंत असलेला परमेश्वरच त्याच्यावर प्रीती जडलेल्या भक्ताविषयी करूणा वाटल्याने कृपावंत होत (गुरूस्वरूपात) भक्ताची प्रगल्भता लक्षात घेत त्यानुसार भक्तासमोर प्रकट होतो. आपण स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत अशी भक्ताची धारणा असल्याने दोन देहधारी व्यक्तींमधल्या इतर नातेसंबंधांप्रमाणेच गुरू शिष्य या नात्याची त्याला अपेक्षा असते. पण मूर्तिमंत ईश्वर किंवा आत्मस्वरूपच असलेले सद्गुरू 'आतून' काम करायला लागतात. ते शिष्याला त्याने अवलंबलेल्या मार्गातल्या चुकांची जाणीव करून देतात. त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात, तसेच त्याला अंतर्यामी स्वरूप साक्षात्कार होईपर्यंत त्याची पाठ सोडत नाहीत.

प्रश्नः खरे सद्गुरू कोणत्या गुणांवरून ओळखता येतात?
रमण महर्षी: अविचल असणारी आत्मनिष्ठा, 'जीव हेच ब्रह्म' आहे या दृष्टीने सगळ्या भूतमात्रांकडे पाहणे (सर्वत्र समबुद्धयः) तसेच स्थळ, काळ आणि परिस्थिती कशीही असली तरी त्यामुळे न ढळणारे धैर्य आणि स्थितप्रज्ञता.

प्रश्नः नानाविध मार्गांचा उपदेश करणारे कित्येक अध्यात्मिक गुरू या जगात आहेत. एखाद्याने आपले सद्गुरू कोण हे कसे ठरवावे?
रमण महर्षी: तुमच्या जेव्हा लक्षात येते की अमुक एक सद्गुरूंच्या सान्निध्यात असताना आपल्याला विनासायास मनःशांती मिळते तेव्हा त्या सद्गुरूंचा स्वीकार करा.

प्रश्नः ते काय उपदेश करतात हे देखील लक्षात घ्यायला नको का?
रमण महर्षी: (ज्याला आत्मज्ञानाव्यतिरिक्त काहीही नको आहे अशा) एखाद्या प्रबळ मुमुक्षा असलेल्या सच्च्या साधकाला तुम्ही अमुक करा आणि तमुक करा असे सांगतात ते खरे सद्गुरूच नव्हेत. असा साधक आधीच आपल्या क्रियाकलापांमुळे पिडीत आणि व्यथित झालेला असल्याने त्याला मन:शांती आणि विश्रांत अवस्थेची नितांत गरज असते. वेगळ्या शब्दात सांगायचे तर त्याला नैष्कर्म्य स्थितीची ओढ असते. तो आधीच करत असलेल्या ढीगभर कर्मकटकटींमधे भर घालत किंवा त्यात बदल करून त्या ऐवजी काही पर्यायी क्रियाकलाप करायला त्याने उद्युक्त व्हावे असे जर सद्गुरू सांगतील, तर अशाने त्या साधकाला काय फायदा होणार आहे?

(कर्ता भावाने केलेले) कर्म ही निर्मितीची प्रक्रिया असते. ती आपल्या अंतरी असलेल्या मूळच्या निर्भेळ आनंदाचा विनाश करणारीच ठरते. त्यामुळे क्रियाकलापांची वकिली करणारा मार्गदर्शक हा सद्गुरू नसून तो आत्मघाताला प्रवृत्त करणारा गुन्हेगारच ठरतो. अशा परिस्थितीत उत्पत्तीचे कारण असलेले ब्रह्मदेव किंवा साक्षात यमराजच वेषांतर करून सद्गुरूंच्या रूपात तुम्हाला चकवा देत आहेत असेच म्हणावे लागेल. असे तथाकथित सद्वुरू साधकाला मुक्त तर करूच शकणार नाहीत, उलट (त्यांच्या उपदेशाचे पालन केल्याने) साधकाच्या गळ्याभोवतीचा कर्मबंधाचा फास आणखी आवळला जाईल.

प्रश्नः मी माझे सद्गुरू कसे शोधू?
रमण महर्षी: उत्कटपणे ध्यान साधना करा (सद्गुरूकृपेची घटना आपोआप घडेल, सद्गुरूंची ओळख आतून पटेल).

प्रश्नः सद्गुरूकृपा झाल्याची चिन्हे किंव लक्षणे काय असतात?
रमण महर्षी: गुरूकृपेबद्दल तर्क किंवा बौद्धिक विचार करता यावा किंवा शब्दात व्यक्त करता यावी अशी ती बाबच नाही. ती विचारांच्या आणि शब्दांच्या पल्याडची गोष्ट आहे.

प्रश्नः तसे असेल, तर गुरूकृपेने शिष्याला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख होते किंवा आत्मलाभ घडून येतो असे का म्हणतात?
रमण महर्षी: एखाद्या मदोन्मत्त गजराजाच्या स्वप्नात सिंह यावा आणि त्याने दचकून जागे व्हावे असा तो प्रकार आहे. स्वप्नात का होईना आपल्या नजरेसमोर सिंह उभा ठाकल्यावर हत्ती एकदम सावध होतो आणि त्याला जाग येते, तसेच सद्गुरूंचा अत्यंत सामर्थ्यशाली कृपाकटाक्ष पडल्यावर अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या आणि गाढ झोपी गेलेल्या शिष्याला जाग येते आणि आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन घडल्याने त्याला खरे ज्ञान प्राप्त होते.

प्रश्नः जे. कृष्णमूर्ति असे म्हणतात की कुठल्याही गुरूंची आवश्यकता नसते.
रमण महर्षी: हा निष्कर्ष त्यांनी कुठल्या आधारावर काढला? आत्मसाक्षात्कारानंतर जर कुणी असे म्हणत असेल तर ते कदाचित योग्य ठरेल, पण त्या आधी खचितच नाही.

प्रश्नः योगी अरविंद आणि इतर काही जण असे म्हणतात की तुम्हाला कधीच कुणी गुरू नव्हते.
रमण महर्षी: तुम्ही गुरू कुणाला म्हणता या गोष्टीवर तुम्ही काढलेले निष्कर्ष अवलंबून असतात. गुरू देहधारीच असावेत याची गरज नसते. सद्गुरू दत्तात्रेयांना चोवीस गुरू होते, ज्यात पृथ्वी, जल इ. पंचमहाभूतांचाही समावेश होता. या न्यायाने या जगातली प्रत्येक गोष्ट त्यांना गुरूस्थानी होती.

गुरू असण्याची नितांत आवश्यकता असते. उपनिषदे म्हणतात, की इंद्रियगोचर भवसागरातून आणि बौद्धिक विचारांच्या जंगलातून एखाद्याला फक्त गुरूच बाहेर काढू शकतात. त्या मुळे गुरू तर आवश्यकच आहेत.

प्रश्नः मला असे म्हणायचे आहे की महर्षींना देहधारी गुरू कधीच नव्हते.
रमण महर्षी: अन्य वेळी माझे देहधारी गुरू असतीलही. (या जन्मीचे म्हणाल तर) मी अरूणाचलाच्या स्तुतीपर कवने रचलेली नाहीत का? गुरू, ईश्वर आणि आत्मा एकच तर आहेत. प्रत्येक साधकची गरज लक्षात घेत ईश्वर मनुष्य स्वरूपात किंवा अन्य स्वरूपात प्रकट होत मनोभावे प्रार्थना करणार्‍या भक्ताला आत्मलाभ होण्यासाठी मदत करतच असतो.

प्रश्नः एका सद्गुरूंशी एकनिष्ठ असताना तुम्ही अन्य गुरूंचा आदर करू शकता का?
रमण महर्षी: गुरू एकच आहेत. ते निव्वळ देहधारी नसून चैतन्यस्वरूप आहेत. तुमच्यातले दोष दूर होत नाहीत तोवर त्यांच्या सामर्थ्याच्या आधाराची आवश्यकता असतेच असते.

प्रश्नः काही थोर विभूतींना गुरू नसूनही ज्ञानप्राप्ती कशी झाली?
रमण महर्षी: काही अत्यंत विरळ्याच आणि अतिशय परिपक्व अशा साधकांच्या समोर ईश्वर निराकार असलेल्या ज्ञानप्रकाशाच्या स्वरूपात लकाकतो आणि तत्क्षणी ते त्यांच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान करून घेतात.

प्रश्नः मी आपल्या चरणी कायमचा लीन झालेलो आहे. आम्ही ज्याचे अनुकरण करावे असा काही उपदेश भगवान आम्हाला देतील काय? अन्यथा इथून ६०० मैलांवर वास्तव्य करावे लागत असताना आपली मदत आम्हाला कशी मिळू शकेल?
रमण महर्षी: खरे सद्गुरू अंतर्यामी आहेत (ज्यांचे तुमच्या अस्तिस्त्वाशी तादात्म्य आहे).

प्रश्नः हे समजण्यासाठी देखील मला सद्गुरूंची गरज आहे.
रमण महर्षी: ते अंतर्यामी उपस्थित आहेतच.

प्रश्नः मला समोर दिसतील असे गुरू हवे आहेत.
रमण महर्षी: समोर दिसणारे गुरूच तुम्हाला हे सांगत आहेत की गुरू अंतर्यामी देखील उपस्थित आहेत.

प्रश्नः एखाद्या शिष्याला कालांतराने लक्षात आले की आपले गुरू पुरेसे पात्र किंवा सक्षम नाहीत, तर त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवलेल्या शिष्याची पुढची गती कशी असेल?
रमण महर्षी: ती प्रत्येक शिष्याच्या गुणवत्तेप्रमाणे वेगवेगळी असते.

प्रश्नः एखाद्याला एकापेक्षा अधिक अध्यात्मिक गुरू असावेत का?
रमण महर्षी: गुरू कोण आहेत? शेवटी ते तुमचे आत्मस्वरूपच तर आहेत. साधकाच्या मनाचा अध्यात्मिक विकास होत असताना मधे ज्या अवस्था येतात त्या प्रमाणे बाह्य गुरू या स्वरूपात आत्माच तर प्रकट होत असतो. असे म्हणतात की सगळ्या साधकांना वंदनीय आणि अत्यंत प्रिय असलेल्या प्राचीन काळातल्या दत्तगुरूंना तर चोवीसपेक्षाही अधिक गुरू होते. आपण एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकतो तेव्हा तो आपल्याला गुरूस्थानीच असतो. दत्तगुरूंचेच उदाहरण घेतले तर सहज लक्षात येईल की गुरूतत्व निर्जीव वस्तुंमधेदेखील असू शकते, कारण गुरू आणि आत्मतत्व यात एकात्मताच असते.

प्रश्नः एखाद्याने प्रामाणिक प्रयत्न केले तर तेच पुरेसे ठरून तो जन्म आणि मरणाच्या चक्रातून सुटेल अशा जीवनमुक्त अवस्थेप्रत पोचू शकतो, की आत्मसाक्षात्कार घडावा या साठी ईश्वरी कृपेचीच गरज असते?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कारासाठी ईश्वरी कृपा देखील आवश्यक असते, नव्हे ईश्वरी कृपाच आत्मसाक्षात्कार घडवू शकते. पण अशी कृपा सच्चे भक्त किंवा श्रेष्ठ योगीजनांनाच प्राप्त होते. मुक्तीकडे घेऊन जात असलेल्या मार्गावर चालत असताना ज्याने अथकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, केवळ अशा उच्च कोटीच्या साधकांनाच ईश्वरी कृपा प्राप्त होते.

पुरवणी:
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध अध्यात्मिक परंपरेत श्री दत्त संप्रदाय आणि श्री नाथ संप्रदायाचे मोलाचे योगदान आहे. सद्गुरूंचे तसेच गुरूदीक्षेचे अनन्यसाधारण महत्व असल्याने या संप्रदायांना गुरू संप्रदाय असे देखील संबोधले जाते. निवृत्तीनाथांसारख्या थोर सद्गुरूंविषयीचे आपले मनोगत व्यक्त करत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या
'अमृताते ही पैजा जिंके' असा सार्थ गौरव प्राप्त केलेल्या शब्दवैभवाचा ओघ असा काही दुथडी भरून वाहतो, की त्याला तोडच नाही! गुरूकृपेची महती वर्णन करताना प्रतिपाद्य विषय बाजूला पडतो, पण गुरूकृपा हा विषयच असा आहे की भरभरून बोलल्याविना राहवत नाही असे कबूल करत आपल्या हातून वारंवार बोलल्या जात असलेल्या 'अवांतराबद्दल' माऊलींनी सद्गुरूंची आणि श्रोत्यांची माफी देखील मागितलेली आहे! माऊलींनी लिहीलेले 'अवांतर' हा मराठी साहित्यातले एक अनमोल लेणे ठरला आहे.

पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या गुरूपरंपरेचे महात्म्य सांगत असताना सद्गुरू चरणांची उपासना केल्याने आपले जीवन कृतार्थ झाले आहे असा नि:संदिग्ध शब्दात निर्वाळा दिलेला आहे. त्यानेच या लेखाची सांगता करतो:

आदिनाथ सिद्ध । आदिगुरु थोर । त्यासी नमस्कार । भक्तिभावे ।।
तयाचे पासून । शिवशक्ति बीज । लाधले सहज । मत्स्येंद्राते ।।
मत्स्येंद्राने दिले । गोरक्षालागोन । गोरक्षे गहिनी । धन्य केला ।।
गहिनीनाथे बोध । केला निवृत्तीसी । निवृत्ती उपदेशी । ज्ञानदेवा ।।
ज्ञानदेव शिष्य । देव चुडामणि । पुढे झाले मुनी । गुंडाख्यादि ।।
रामचंद्र महा । देव रामचंद्र । प्रसिद्ध मुनींद्र । विश्वनाथ ।।
योगसार ऐसे । परंपरा प्राप्त । सद्गुरु गणनाथ । देई मज ।।
स्वामी म्हणे झाले । कृतार्थ जीवन । सद्गुरु चरण । उपासिता ।।

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

मूकवाचक's picture

12 Jun 2020 - 12:21 pm | मूकवाचक