07 मार्च
एस. पी. कॉलेजमधे एकत्र शिकलेले आम्ही मित्र आज (ब-याच दिवसांनी) भेटतो. प्रभात रस्त्यावरच्या एका हॉटेलात बसून आम्ही रात्रीचं जेवण घेतो, नंतर सुजाता मस्तानीत मस्तानी हाणतो. (आंबा मस्तानीला तोड नाही!) ब-याच गप्पा होतात, पण मला आठवतं तसं करोनाव्हायरसचा विषय निघत नाही.
13 मार्च
आज आम्ही जेवायला बाहेर जायचं ठरवतो. मॉडर्न कॅफे हे आमचं आवडतं हॉटेल आहे. तिथलं व्हेज कटलेट आणि उपवासाची कचोरी आम्हाला विशेष आवडतात. भरपेट जेवण करायचा कुणाचाच मूड नसतो (आणि तसंही त्या पंजाबी जेवणाला आम्ही जाम कंटाळलोय) तेव्हा मॉडर्न कॅफेवर पटकन एकमत होतं. आज हॉटेलात गर्दी नेहेमीपेक्षा कमी दिसते. 'करोनाला पुणेकर जाम घाबरलेले दिसतात', कुणीतरी म्हणतं आणि मी हसतो. हॉटेलबाहेर पडताना 'आता एक वर्षभर हॉटेलात जायचं नाव काढू नको' असं जर कुणी मला तेव्हा म्हटलं असतं तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता का?
17 मार्च
ऑफिसमधे आज खूप म्हणजे खूपच कमी लोक आहेत. एरवी 700/800 लोक असलेल्या आमच्या मजल्यावर आज मला (मी धरून) अंदाजे दहा एक लोकं दिसतात. पण याची एक चांगली बाजूही आहे. एरवी पॅंट्रीमधली दुपारपर्यंत गायब होणारी बॉरबॉन बिस्कीटं आज संध्याकाळ झाली तरी डब्यात जशीच्या तशी दिसतात. मी रिकाम्या ऑफिसचा एक व्हिडिओ काढतो आणि लोकांना पाठवतो. लोक हादरतात. 'तू जरा गंभीरपणे घे हं', मला ऐकविण्यात येतं. खरं तर मला रिकाम्या ऑफिसात काम करायला खूप मजा येत असते, पण मी घाबरतो. राहिलेला आठवडा मी घरूनच काम करतो.
19 मार्च
'येत्या रविवारी, 22 मार्चला सकाळी सात ते रात्री नऊ आपण जनता कर्फ्यू पाळूया आणि संध्याकाळी 5 वाजता अत्यावश्यक सेवा देणा-या आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजवूया' अशी सूचना पंतप्रधान मोदी करतात. या आवाहनातला पहिला भाग मला पटतो, पण दुसरा भाग काही केल्या पटत नाही. भारतीयांना प्रत्येक गोष्टीचा सोहळा करायची एक सवय आहे, त्यामुळे इथे काय होणार हे मला स्पष्ट दिसत असतं आणि घडतंही तसंच. संध्याकाळी पाच वाजता थाळ्या बडवणारे, ढोल वाजवणारे, मिरवणूक काढणारे, घोळक्याघोळक्याने फिरणारे लोक पाहून हसू येतं (आणि रडूही).
22 मार्च
ह्या दिवशी मी (दर रविवारसारखा) घरातच असतो. पुण्यातल्या रिकाम्या रस्त्यांचे वरून घेतलेले फोटो, छायाचित्रण व्हॉट्सअॅपवर पहायला छान वाटतं. ही दृश्य पाहून '28 Days Later' ह्या ब्रिटिश सिनेमाची आठवण येते.
25 मार्च
आज गुढीपाडवा. आम्ही गुढी उभारतो खरी, पण त्यात दरवर्षीसारखा उत्साह नसतो. गाठ्या मिळवण्यासाठी काल आम्हाला बरीच धावपळ करावी लागलेली असते. दरवर्षी ऑफिसात डब्यातल्या गार पुरणपोळ्या खाणारा मी या वर्षी मात्र घरी गरमागरम पोळ्या खातो.
01 एप्रिल
यावर्षी मी कुणालाच एप्रिल फूल करत नाही कारण या वर्षी करोनाव्हायरसनंच मला जबरदस्त एप्रिल फूल केलेलं असतं. ज्याला स्वत:लाच वेड्यात काढलं गेलंय तो इतरांना काय वेड्यात काढणार? पोलिसांनी गृप अॅडमिन्सना जबरा दम भरल्यामुळं या वर्षी एप्रिल फूलचे संदेश व्हॉट्सअॅपवर अजिबात येत नाहीत.
04 एप्रिल
सकाळी उठल्यावर आरशात पहाताना, आपलं पोट करोनाव्हायरससारखं पसरत चालल्याचं मला जाणवतं. लॉकडाऊनमधे पहिला बळी पडलेला असतो तो माझ्या जीमचा. मी घरच्यांना सोबत घेऊन रोज सकाळी व्यायाम करायला सुरुवात करतो. घरी जीमइतका चांगला व्यायाम होत नाही, पण काहीच व्यायाम न करण्यापेक्षा हे चांगलंच आहे, नाही का?
14 एप्रिल
पंतप्रधान मोदी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवतात. अर्थात असं घडणार हे जवळपास प्रत्येकालाच माहित असतं. मी नातेवाईकांना, मित्रांना फोन लावतो. मी त्यांचं आणि ते माझं सांत्वन करतात. त्यांच्याशी फोनवर बोलल्यावर जरा बरं वाटतं.
23 एप्रिल
आज लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास एक महिना झालेला असतो. मी घरून काम करत असतो. एक-एक महिना सुट्टीवर असलेल्या लोकांशी बोललं की मला त्यांचा जाम हेवा वाटायला लागतो.
1 मे
आज महाराष्ट्र दिन. पण आजूबाजूला पाहिलं तर मला महाराष्ट्र दीन झालेला दिसतो. (आमचा आपला कंट्री विनोद हो जावईबापू...)
02 मे
आज मी डालगोना कॉफी बनवतो. लॉकडाऊनमधे एकदा तरी डालगोना कॉफी बनवली नाही तर पोलिस तुरुंगात टाकतात असं कानावर आल्यामुळे मी घाबरून ही कॉफी बनवतो. कॉफी ठीकठीकच लागते. लोक हिच्यामागे एवढे वेडे का झालेत हे मला काही केल्या समजत नाही.
8 मे
'रेल्वेरुळांवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी अंगावरून गेल्याने मृत्यू' ही बातमी वाचून हृदय कळवळतं. आता रूळ ही काही झोपण्याची जागा नव्हे, पण चालून चालून थकलेल्या ह्या मजूरांना जर पहाटे थोडी झोप घ्यावीशी वाटली तर त्यांना दोष कसा देता येईल? सरकारनं त्यांना औरंगाबादपर्यंत पोचवण्याची सोय केली असती तर...
14 मे
आज आम्ही आमच्या आंब्याच्या झाडावरचे आंबे उतरवतो. मला मार्केटयार्डमधे दरवर्षी भरणा-या आंबा महोत्सवाची आठवण येते...
17 मे
'लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला' अशी बातमी आज येते. मला काहीच वाटत नाही. ही बातमी 'लॉकडाऊन 31 डिसेंबर पर्यंत वाढवला' अशी असती तरी मला काही वाटलं नसतं. एव्हाना मला काही वाटणंच बंद झालेलं असतं.
22 मे
लॉकडाऊनचा आता मला जबरदस्त कंटाळा आलेला असतो. 'आता तो करोना परवडला, पण हे लॉकडाऊन नको' असं मी मनाशी म्हणतो. त्याचवेळी दोनदोन राज्यं पार करून आपल्या गावी चालत जाणारे लोक, घरात खायला काही नसल्यामुळं उपासमारीनं मेलेले ते सोलापुरातले वृद्ध नवरा बायको, आपल्या वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणारी ज्योती, इच्छा असूनही आपल्या वडिलांचा अंत्यविधी न करू शकणारी आणि तो आता तुम्हीच करा असा पोलिसांना आग्रह करणारी मुलं, आठवड्यातले सातही दिवस काम करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलिस यांची मला आठवण येते. यांच्या तुलनेत आपण किती नशीबवान आहोत हे जाणवलं की थोडी लाजही वाटते.
26 मे
पुण्यात करोनाव्हायरसच्या केसेस वेगानं वाढत चालल्याचं मी वर्तमानपत्रात वाचतो. सोबत 'नायडू रूग्णालयातल्या 3 नर्सेसना करोनाची लागण' आणि 'खाजगी रूग्णालयातल्या नर्सेस देत आहेत राजीनामे' ह्या दोन बातम्या आत सापडतात. करोनाव्हायरसच्या केसेसच्या बाबतीत देशात पुण्याचा जवळपास पहिला नंबर असतो. 'कुठलीही गोष्ट असूद्या, आपलं पुणं नेहमी पहिल्या क्रमांकावर पाहिजे' ही घोषणा लोकांनी जरा जास्तच गंभीरपणे घेतल्याचं मला जाणवतं. परिस्थिती सुधारणं सोडा, आता ती अधिकाधिक अवघड होत जाणार आहे हे मला दिसतं आणि मी हादरतो.
त्या रात्री 'मी मॉडर्न कॅफेमधे बसून व्हेज कटलेटची तिसरी प्लेट फस्त करतोय' असं स्वप्न मला पडतं. पण अचानक त्या कटलेटसची वटवाघुळं होतात आणि माझ्याकडं पाहून फिस्कारतात. मी किंचाळत ऊठतो. माझी झोप जी उडते ती उडतेच, नंतर परत काही मला झोप लागत नाही.
प्रतिक्रिया
28 May 2020 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डायरीतल्या नोंदी आवडल्या. लिहिते राहा. १७ मे आणि २२ मेच्या नोंदी खास होत्या.
बाकी, काही नोंदीवर पुन्हा तोच काथ्याकूट होईल म्हणून, काही नोंदीवर बोलणं टाळतो.
-दिलीप बिरुटे
28 May 2020 - 12:17 pm | चौकस२१२
१९ "अत्यावश्यक सेवा देणा-या आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजवूया' अशी सूचना पंतप्रधान मोदी करतात."
या बाबत : काही गोष्टींची पाश्वभुमी नमूद करणे जरुरीचे वाटले म्हणून लिहीत आहे ...
-१) पहिले म्हणजे हे प्रतीकात्मक आणि सहभागाची नोंदणी व्हावी या हेतूने केले होते .. आणि फक्त भारताचं मोदींनी नाही तर असे "आभार" इतर देशातील सरकारने किंवा लोकांनी उत्स्फूर्ते पणे अत्यावश्यक सेवा देणा-या आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता म्हणूनअसे "प्रतीकात्मक" काहीतरी केले आहे ... म्हणजे हि कल्पना अगदीच "मूर्ख " स्वरूपाची नसावी !
-२) हे आव्हान "रस्त्यावर या एकत्र जमा" असे नव्हते ( लोकांचे चुकले आणि कदाचित तयावेळेल्स या सगळ्याची गंभीरता लक्षात आली पण नसावी !)
-३) "'आता तो करोना परवडला, पण हे लॉकडाऊन नको' असे बहुतेक सगळे जग म्हणत आहे , पण हे कडू औषध आपल्या स्वताचं आणि सामाजिक स्वास्थ्यसाठी घावे लागते आहे हे हि सर्व बहुतेक जाणत आहे .. दुसरे करणार काय? नुसती सरकार वॉर नाराजी करून काय होणार आहे ? निर्बंधांवर टीका करणे सोपे आहे हो पण दुसरा ठोस पर्याय हि कोणाकडे नाही ..
28 May 2020 - 1:38 pm | यश राज
ज्यावेळेस भारतात टाळ्या आणि थाळ्या वाजवुन कोरोना वॉरीयर्सचा उत्साह वाढव्ण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले गेले अगदी त्याच सुमारास साधारणतः २६ मार्चला ईंग्लंड मध्ये सुद्धा असेच आवाहन करण्यात आले होते. ज्यात लोकांनी उत्स्फूर्ते पणे सहभाग नोंदवला. त्यावेळेस टाळ्या आणि थाळ्या व सोबत फटाके सुद्धा वाजवले होते. त्यादिवशी गुरुवार होता. आवर्जुन सांगावेसे वाटते की इथले लोक त्या दिवसानंतर प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी ८ वाजता घराच्या बाल्कनीत / वरांड्यात येवुन टाळ्या व थाळ्या वाजवुन कृतज्ञता व्यक्त करतात.
आज गुरुवार आहे व नेहमीप्रमाणे आजही संध्याकाळी ८ वाजता आम्ही टाळ्या व थाळ्या वाजवणार.
29 May 2020 - 5:01 am | चौकस२१२
यशराज.. हेच हेच मी म्हणत आहे... हे प्रतीकात्मक आहे आणि जगात लोक करतात ( केलेच पाहिजे असा आग्रह नाही फक्त आव्हान केलं एखाद्या सरकारने )
पण "भारत सरकारच फक्त कसं चुकीचे आहे"असा अजेंडा जे राबवतात त्यांना असा जागतिक अवलोकन करून मग टीका करावी असे कधी वाटत नाही उलट सुचवयाला गेलं तर "हमें हमारे हाल पार छोड देव " अशी मखलाशी ! किंवा "हे सर्व थोथांड " असले तारे !
भारत सरकार चुकले नसेल असे नाही पण ती चूक दाखवताना एक वैचारिक विरोध आणि तो जिथे तिथे राबवयाचा हे धोरण काही मंडळींना सोडवत नाही
"बोलले मोदी हान टपली" हेच धोरण काही संपादकांचे / पत्रकारांचे आणि अनेक सर्वसामान्य नागरिकांचे
बरं हा विरोध करताना जे वैद्यकीय क्षेत्रातील आहेत त्यांना पण मोदी भक्त म्हणून हिणवायचे !
धन्य आहे ..असो
28 May 2020 - 12:47 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारी लिहिलंय ! डायरी आवडली !
वाचताना सिनेमात जसा मोंताज असतो, तसे वेगवेगळे तुकडे डोळ्यासमोर आले !
हे भाररी ....
२२ मे आणि २६ मे ची डायरी गंभीर करणारी !
28 May 2020 - 1:57 pm | शेखर
कोरोना संबधित प्रत्येक धागा हा मोदी व सरकार समर्थक / विरोधक ह्यांच्या वाद / प्रतिवादा साठी आखाडा झालाय. अरे, कुठे तरी थांबा....
28 May 2020 - 8:20 pm | मराठी कथालेखक
अगदी सहमत. लॉकडाऊन असो की विषाणूची सविस्तर माहिती घेणं असो किंवा आणखी काही. शेवटी तेच तेच वाद होत आहेत.
इथेही डायरीकडे एक लेखनप्रकार , लेखकाने स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणून बघितलं जात नाहीये. हा "काथ्याकूट" मधला धागा नाहीये याचं भान असायला हरकत नसावी.
डालगोना कॉफी चा उल्लेख आवडला. लेखक साडी चॅलेंजला विसरले वाटतं ? . आपल्या मैत्रिणींचे , आवडत्या स्त्रियांचे साडीतले फोटो बघणं हा विरंगुळा होता
ल्युडो खेळ पण लोकप्रिय झाला , लोक घरात बसून आपापल्या मित्रांशी खेळू शकतात, मजा येतेय.
बाकी सहसा डायरीतले क्रियापद हे भुतकाळ दर्शवणारे असतात,
म्हणजे "आज मी डालगोना कॉफी बनवतो." ऐवजी "आज मी डालगोना कॉफी बनवली" हे अधिक योग्य वाटलं असतं.
28 May 2020 - 9:15 pm | शेखर
माझा रोख काही प्रतिसादांकडे आहे आणी नक्क्कीच धाग्याच्या आशया कडे व लेखकाच्या भावनांबद्दल नक्कीच नाही. तसे ध्वनीत झाले असल्यास दिलगीरी व्यक्त करतो.
29 May 2020 - 12:06 am | मराठी कथालेखक
तुमच्या प्रतिसादात काहीच गैर नाही. माझंही म्हणणं तुमच्यासारखंच आहे.
29 May 2020 - 4:51 am | चौकस२१२
भावना व्यक्त करण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणून बघितलं जात नाहीये.
चर्चा असो , काथ्याकूट असो किंवा आपण म्हणता तसे स्वतंत्र डायरी व्यक्त होणे .. असो
एखादे ज्वलंत परस्थिबद्दल विधान केले कि त्यावर प्रतिक्रिया येणार ना?
त्यामुळे माझा रोख काही लेखकाला नाउमेद करणायचा नवहता पण जर काही मुद्दे १८०° कोनातून पटत नसतील तर त्यावर बोलणारच माणूस , ( उदाह: थाळ्या बडवणे ची कुचेष्टा / टीका, मूळ हेतू ना समजवून घेता इत्यादी )
ज्यात त्यात सरकार कसे चुकले असे जर कोणी मांडत असेल तर "तसे नसेल" असे मांडणारे मुद्दे दुसरी बाजू मांडणार !
30 May 2020 - 10:34 pm | संजय क्षीरसागर
तुम्हाला ग्राउंड रियालिटीची माहिती आहे का ?
स्थलांतरीत कामगारांचे जे अतोनात हाल चालले आहेत त्याची तुम्हाला कल्पना आहे का ?
अशा कामगारांना नेणार्या १,००० बसेस युपीच्या सीमनी बॉर्डरवर रोखल्या आहेत.
करता का तुम्ही जयघोष चालवलेल्या मोदींना फोन आणि सोडवता का प्रश्न ?
30 May 2020 - 10:35 pm | संजय क्षीरसागर
युपीच्या सीएमनी बॉर्डरवर रोखल्या आहेत.
31 May 2020 - 7:57 am | चौकस२१२
आम्ही ऑस्ट्रेलियात थाळ्या बडवल्या असतील कि मेणबत्या लावल्या असतील पण एक नक्की कि या कठीण समयी "केवळ टीका करायचीच " म्हणून टीका सरकार वर केली नाही
आज सरकारने आणि जनतेने बऱ्यापकी नियोजाय करून परिस्थिती आटोक्यात आणली आहे त्यामुळे संक्षी साहेब आपण कितीही आपली नकारघंटा बडवा .. आम्ही येथे जर उद्या पंतप्रधानाने आव्हान केलं कि ज्यांनी यात खूप कठीण काम केले आहे त्याबद्दल धन्यवाद म्हण्यायसाठी थाळ्या , चमचे आणि अजूनही काही बडवा तर आम्ही बडवू..
चुका सरकारच्या इथंही घडल्या...नाही असे नाही , लोक वेड्यासारखे इथंही वागले .. पण राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कडवे विरोधक असून सुद्धा दाव्यान्नी आणि उजव्यान्नी ( राजकारणी आणि समान नागरिक ) फुकाचे वाद घालून सरकारला सतावले नाही किंवा प्रमाण कमी ..
28 May 2020 - 10:46 pm | संजय क्षीरसागर
मजा आली वाचतांना.