तिचा काहीच दोष नसतो..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
26 May 2020 - 2:05 pm

शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता.

आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो!

तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता. आता मधात माझं घर होतं त्याला ती करणार? पण "ती मुद्दाम तुया घरासमोरून जाते ना बे" हे मित्रांच मत. मग तिच्या येण्याजण्याच्या वेळी आमचं अंगणात चकरा मारणं ठरलेलं. मग एक दिवस घोळ होतो. तिच्या येण्याची अन मी समोरच्या गटारातून बॉल काढून, आंगभर शिंतोडे घेऊन, जग जिंकल्याच्या आविर्भावात फाटकाकडे येण्याची एकचं वेळ होते. आमचा अवतार बघून तिच्या मैत्रिणी हसतात. ह्यात तिचा काय दोष!

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो...

आता ताप काय कोणाला येत नाही का? तिलाही आला.डॉक्टरकडे गेली बिचारी. बरीच गर्दी होती. आतमध्ये कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आला. दोनच मिनिटांनी कमरेवर हात ठेवून केबिनमधून मी बाहेर पडलो. ती तरी काय करणार?

तिचा काही म्हणजे काहीच दोष नसतो...

आता मी काही एवढा ढ वगैरे नव्हतो. पण एकदा गणिताच्या मॅडम चाचणी परीक्षेचे मार्क वर्गात सांगत होत्या. आमच्यातल्याच एका भैताडाने त्याच्या पेपरवर माझा रोलनंबर लिहिला होता. त्याला विसपैकी तीन मार्क मिळाले. मॅडमनी वर्गासमोर अन तिच्यासमोर माझा जाहीर सत्कार केला. दुसऱ्यादिवशी मॅडमला चूक लक्षात आली. त्यांनी वर्गासमोर ती मान्य केली. पण त्यादिवशी नेमकी ती आली नव्हती! आता घरी पाहुणे आले त्याला ती काय करणार...?

तिचा कधीच दोष नसतो..

तिचा भाऊ आमचा शाळेत नव्हता. पण भावाची "ती" आमच्या शाळेत होती. तो वरचेवर चक्कर टाकायचा. एकदा सायकल पार्किंग वरून झाले आमच्यात भांडणं. शाळा आमची होती त्यामुळे आम्ही शेर. धुतला त्याला सगळ्यांनी उभाआडवा. मी त्याची कॉलर पकडलेली. तेवढयात ती समोर आली. तिची बिचारीची काय चूक?

तिची कधीच चूक नसते...

ती वर्गाची कॅप्टन बनते. वर्गात दंगा होऊ नये ही तिची जबाबदारी असते. केवळ तिच्यासाठी मी शस्त्र खाली ठेवलेले असतात. पण एक दिवस...!

एक दिवस मागच्या बेंचवरच्या मुलाला शांत बसवण्यासाठी मी ओरडलेलो असतो. माझी काहीच चूक नाही हे तिलाही माहिती असते. पण राजधर्म!!! केवळ राजधर्म म्हणून माझे नाव ती फळ्यावर लिहिते.

तिचा काहीच दोष नसतो...

परत मित्र म्हणतात,

"अबे तिला तुझं नाव तिच्या हाताने लिहायचं होतं म्हणुन लिहीलंय. बघ किती सुंदर लिहीलंय"

आम्हाला लय गोड वाटतं

आता तिचं अक्षर मुळातच सुंदर असतं..त्यात तिची काय चूक..

तिचा काहीच दोष नसतो...

खरं सांगतो, तिचा काहीच दोष नसतो..

समाप्त

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 May 2020 - 2:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना वाक्यावाक्याला छातीतुन कळा जात होत्या
त्यात तिची काय चूक.. तिचा काहीच दोष नसतो...

पैजारबुवा,

यश राज's picture

26 May 2020 - 2:28 pm | यश राज

आवडली एकदम.

किल्लेदार's picture

26 May 2020 - 6:13 pm | किल्लेदार

मस्त...
तिचा काहीच "दोष" नसतो असा "उद्घोष" केल्याने मनाला "संतोष" थोडीच मिळणार ? घशाला मात्र "शोष" पडेल.

टवाळ कार्टा's picture

26 May 2020 - 6:23 pm | टवाळ कार्टा

=))

सस्नेह's picture

26 May 2020 - 6:37 pm | सस्नेह

टिपिकल शाळकरी कैफियत !

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2020 - 10:22 am | ज्ञानोबाचे पैजार

बहुतेक हा पहिला भाग असावा

या नंतर महाविद्यालयिन, व्यावसाययिक, सोसायटिक, पिएमटियिन, प्रभातफेरीयिन, हास्यक्लब्यिन, ब्यांककॅशविड्रॉलायनियिन, जेष्ठ्नागरीकसंघटनियिन आणि अंत्यसंस्कारकार्मियिन हे भाग अपेक्षीत आहेत.

वरील यादित मी सर्वसामान्य पुरुषांच्या आयुष्यातले काही मोजके पण महत्वाचे टप्पे अथोरेखित करायचा प्रयत्न केला आहे. आपापल्या वकुबानुसार, अनुभवानुसार आणि कल्पनाशक्तीनुसार यात अजून अनेक भाग जोडले जाउ शकतात.

पैजारबुवा,

चिनार's picture

27 May 2020 - 1:54 pm | चिनार

लिहा माऊली तुम्हीच..
आमचं मानसिक वय काही शाळेच्या पलीकडे गेलंय असं वाटत नाही. त्यामुळे एवढी प्रतिभाशक्ती कुठून येणार...

आणि पिएमटियिन वर लिहिण्यासाठी तर आधी पुढचा जन्म पुण्यात घ्यावा लागेल (त्यासाठी खूप वेटिंग असते असं कळलंय). प्रो प्रो प्रो प्रो म्हणजे काहींच्या काही प्रो लेव्हल आहे ती..

गणेशा's picture

26 May 2020 - 7:08 pm | गणेशा

वा वा..
काय लिहिले आहे.. मज्जा आली वाचताना..

गटारातला बॉल, आणि डॉ चे किस्से तर चित्रवेधक..

चांदणे संदीप's picture

26 May 2020 - 7:26 pm | चांदणे संदीप

लेख खतरा! ;)
सगळ्या लायनींना डिट्टो मार्क द्यावा वाटला.

वर पैजारबुवा म्हटले तसेच... इतक्या कळा आल्या, जितक्या नारदमुनींनी उभ्या हयातीत केल्या नसतील! ;)

सं - दी - प

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 May 2020 - 8:40 pm | अनिरुद्ध.वैद्य

केवढा हा दर्द!!

श्रीगणेशा's picture

26 May 2020 - 9:08 pm | श्रीगणेशा

अगदी ओघवतं लिहिलंय.

नशीब ... भावनेच्या भरात ... "एकजात, सर्व स्त्रियांचा दोष कधीच दोष नसतो", असे न लिहिता....
स्पेसिफिक एकाच विशिष्ठ "ती" बद्दल लिहिलंय.

स्वच्छंद's picture

27 May 2020 - 12:27 am | स्वच्छंद

ती' च्यावर मस्त लेख झालाय. पण तुम्ही तर मुळातच लेखक त्याला ती तरी काय करणार? तिचा काय दोष?

वीणा३'s picture

27 May 2020 - 1:44 am | वीणा३

लेख मस्त झालाय!!!

हाय.. मार डाला =))

रातराणी's picture

27 May 2020 - 10:58 am | रातराणी

आवडलं! छान लिहिलंय. आता त्याचा काही दोष नसतो ही जिलबी पाडावी का ? ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2020 - 11:03 am | ज्ञानोबाचे पैजार

खरेतर "त्यात त्याचाच आणि फक्त त्याचाच दोष असतो" अशी जिलेबी जास्त वास्तवदर्शी होईल

रातराणी's picture

27 May 2020 - 11:15 am | रातराणी

माऊली आप सही जा रहे हो!! :) :) _/\_

त्याचा दोष ही द्विरुक्ती झाली. दोष म्हटलं की त्याचाच हे अभिप्रेत आहे..

तुषार काळभोर's picture

27 May 2020 - 6:34 pm | तुषार काळभोर

प्रत्येक वाक्याला एक कळ निघत होती हलकीशी...
असो..

... राहिल्या त्या आठवणी!

मायमराठी's picture

27 May 2020 - 10:21 pm | मायमराठी

हे असे सगळे आणीबाणीचे प्रसंग फुल्ल टू दंगलमय असतात.
सहलीला जाताना आपण शिक्षकांनी बसवलेल्या जागी बसायचं. मुली शांत
म्हणून पुढे आणि मुलं मस्तीखोर म्हणून मागे. नेम धरून तिला ड्रायवरच्या मागच्या आडव्या सीटवर बसवलं जावं. तिने अख्खी बस उजळत्या हास्याने प्रकाशमान करून टाकावी आणि आम्हाला धड अंधारही होता न यावं. शांतपणे आमचे ध्यान लागत असतानाच आगाऊ मित्रांनी मुद्दाम उसळून उसळून गाणी म्हणत रहावी जेणेकरून तिने मागे पहावं. मग तिने रागाचा पुरेपूर आव आणत लाजलेले गाल लपवत लपवत आपली जागा बदलावी.
म्हणजेच ही चिडवाचिडवी नसती तर ती जागा तिला मान्य होती. हे असं आपल्याला वाटणं...
ह्यात तिचा खरंच काहीही दोष नाही.

तुषार काळभोर's picture

28 May 2020 - 6:32 am | तुषार काळभोर

वा!!

मित्रहो's picture

28 May 2020 - 4:57 pm | मित्रहो

जबरदस्त भारी आवडलेले आहे. मजा आली. काही आठवणी जाग्या झाल्या. आता त्याच तिचा काय दोष

mrcoolguynice's picture

28 May 2020 - 8:20 pm | mrcoolguynice

ती सध्या काय करतेय ?

mrcoolguynice's picture

28 May 2020 - 8:22 pm | mrcoolguynice

T

रुपी's picture

28 May 2020 - 10:38 pm | रुपी

छान. आवडलं :)

सौंदाळा's picture

30 May 2020 - 7:04 pm | सौंदाळा

नेहमीप्रमाणे मस्त
ती परत आठवली