देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्
प्रस्तावना
लेखामागचे गृहीतक
श्लोक १
श्लोक २
श्लोक ३
श्लोक ४
श्लोक ५
श्लोक ६
श्लोक ७
श्लोक ८
श्लोक ९
श्लोक १०
श्लोक ११
श्लोक १२
अवांतर १
अवांतर २
अवांतर ३
अवांतर ४
अवांतर ५
अवांतर ६
अवांतर ७
प्रस्तावना
नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली. सवयीने जपाला बसलो. पण सतत आद्य शंकराचार्यकृत देवी अपराध क्षमापन स्तोत्राची आठवत होत होती. मी नेहमी स्तोत्रे वगैरे म्हणणारा नाही. त्यामुळे असे का होतंय ते काही कळत नव्हतं.
माझे वडील गुरुचरित्राचा पाठ दरमहिन्यांत करत असत. त्या सात दिवसात हे स्तोत्र तसेच करुणात्रिपदी ते म्हणत असत. त्यांचा आवाज ही चांगला होता व शास्त्रीय गाण्याचं अंग पण होतं. रात्रीचे आठ-साडेआठ वाजलेले असत. दिवे बंद करून देवापुढे समई, निरांजन व उदबत्ती लावलेली असे. सगळीकडेच शांतता पसरलेली असे. आई वडील सर्वात पुढे बसलेले असत व आम्ही चारही भावंडे मागे बसलेले असू. वडील मोठ्याने म्हणत असत व आम्ही फक्त श्रवणभक्ती करायचो. मोठ्या भावंडांनी डोळे बंद केल्याचे पाहून, बऱ्याच वेळेस मीही डोळे मिटून बसत असे. वडिलांचे ते भावपूर्ण म्हणणं आठवलं की आजही तात्काळ अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात. अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल लिहितोय मी.
मी त्या वेळेस शाळेत होतो. त्यामुळे मला शब्द वगैरे आजही आठवत नाहीयेत. आठवतंय ते चाल, नाद आणि वडिलांचा भावनेने ओथंबलेला आवाज. आजही पहाटे अचानक तेच आठवत होते. पण आज मात्र शब्द काय असावेत याचं कुतूहल निर्माण झालं होतं. ह्या कुतूहलाने मला फार काळ जप करू दिला नाही. गुगलदेवाला शरण जाऊन या साईटवरून शब्द मिळवले. त्या साहाय्याने वडिलांच्या चालीत स्तोत्र म्हणून पाहिले. मस्त वाटले. थोडावेळ तसाच बसून राहिलो. परत एकदा म्हणावेस वाटल्याने परत एकदा म्हणून पाहिले. निव्वळ आठवणीतल्या चालीमुळे शब्दफोड करणे जमून गेले होते.
थोड्यावेळाने स्तोत्राच्या अर्थाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मग त्याच साईटवरील अर्थ वाचून काढला. काहीतरी राहतंय, सगळा अर्थ नीट येत नाहीये अशी भावना सारखी मनात येत होती. ही रचना शंकराचार्यांनी नामस्मरणाच्या महती सांगण्यासाठी तर रचलेली नाही ना असं काहीतरी मनात येत होतं.
नुकताच नर्मदा परिक्रमा करून मी जेमतेम आठवड्यापूर्वीच परत आलेलो होतो व त्या यात्रेत नामस्मरणाबद्दल विचारांचे बऱ्यापैकी आदान प्रदान झाले होते. त्यामुळेच मला असं काहीतरी वाटतंय अशी मी माझ्या मनाची समजूत घालत होतो. पण शेवटी आपल्याला काय वाटतेय किंवा आपल्याला जे समजलंय ते लिहून काढायला काय हरकत आहे असे वाटल्याने ते प्रथम कच्च्या स्वरूपात लिहून काढले.
माझे संस्कृत फार काही चांगले नाहीये. यासाठी माझी भाची सौ.स्वाती गोवंडे हिच्याकडून संस्कृत सरल अर्थ व मराठी सरल अर्थ लिहून घेतला. माझी वहिनी सौ.अमला भागवत यांच्याकडून थोडेसे दुरूस्त करून घेतले. ( मला समजायला सोपे जावे म्हणून संस्कृत अर्थात डॅश टाकले. हे बरोबर केले की नाही माहित नाही!) मगच मी मला समजलेला अर्थ आणखी स्पष्ट स्वरूपात मांडू शकलो.
लेखामागचे गृहीतक
या स्तोत्राचा विचार करताना आद्य शंकराचार्यांची त्यामागील भूमिका प्रथम समजावून घेणे इष्ट होईल असे वाटते. जर ती भूमिका समजावून घेतली तरच गूढार्थ ध्यानात येईल असे वाटते. यासाठी पाचव्या श्लोकावर प्रथम विचार करायला लागतो.
आचार्यांचा कार्यकाळ लक्षात घेतला तर तो इ.स.७८८ ते इ.स. ८२० असा आहे. म्हणजे त्यांनी आपले विहित कार्य अंदाजे ३२ वर्षात पूर्ण केले असल्याचे दिसून येते. असे असूनही ते पाचव्या श्लोकात म्हणतात की, माझे वय आता पंचाऐशी पेक्षा जास्त आहे. या त्यांच्या विधानाचा अर्थ प्रथम लावणे क्रमप्राप्त ठरते.
या विधानाच्या खोलात गेल्यास त्यातून अनेक अर्थ निघू शकतात. तेच आपण आता पाहणार आहोत.
१. व्यावहारिक अर्थ
पहिल्या प्रथम आपण अगदी साधा सोपा वाटणारा व्यावहारिक अर्थ पाहू. साधारणता माणसाचा असा स्वभाव असतो की, तो आपल्यापेक्षा कमी वय असलेल्याला दुय्यम समजतो. त्याला आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असेल असे मानण्याकडे श्रेष्ठींचा कल असत नाही.
किंबहुना असा कमी वय असलेला कोणी काही सांगायला लागला तर, याच्यापेक्षा कितीतरी पावसाळे मी जास्त पाहिले आहेत आणि आता हा आम्हांलाच शिकवतोय अशा प्रकारची भावना मोठ्यांच्या मनात उद्भवू शकते. ही एक सहजप्रवृत्ती आहे. यावर मात करण्याचा हेतू असू शकतो.
त्यावेळची स्थिती पाहता, पन्नाशी गाठली म्हणजे असा माणूस खूपच जगला, असे वाटायचे. अशा स्थितीत पंच्चाऐंशीपेक्षा जास्त वय असणारा माणूस आपल्यापेक्षा नक्कीच विद्वान असणार असे वाटून, आचार्यांच्या म्हणण्याकडे लोकं गांभीर्याने पाहतील असाही त्यांचा उद्देश असू शकतो.
यासाठी खरंच आपले वय वाढवून सांगायची गरज होती का? असा आपल्याला प्रश्न पडतो. आजही आचार्यांचा फोटो पाहिला की, त्यांचे वय जेमतेम २०-२२ वर्षे असेल नसेल असेच वाटते. आचार विचार उच्चार खाणे पिणे यावरील संयम, योगमुद्रांचा अभ्यास, प्राणायाम वगैरेंमुळे माणूस त्याच्या वयापेक्षा जास्त तरूण दिसण्याची शक्यता वाढते असे म्हटले जाते. त्यामुळे ते नेहमीच त्यांच्या वयापेक्षा लहान वाटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी लोक त्यांच्या बोलण्याला मान देत नाहीत असाही अनुभव त्यांना आलेला असणे शक्य आहे. ज्ञानेश्वरांनाही असाच अनुभव आला असल्याचे दिसून येते.
त्या काळाची स्थिती लक्षात घेता, जैन व बुद्ध धर्मांनी वैदिक धर्मावर केलेले आक्रमण केलेले होते. तसेच शैव, वैष्णव, कापालिक, शाक्त, गाणपत्य वगैरेंच्या मतांमतांचा गलबला माजलेला होता. यात परत निरनिराळ्या तांत्रिक उपासना करणाऱ्यांची भर पडलेली होती. अनेक वामचारी पंथ उदयाला आलेले होते. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची फसवणूक होत होती. सगळा सावळा गोंधळ माजला होता.
या सर्व मतांतराच्या गलबल्यामधले प्रस्थापित दुठ्ठाचार्यांशी आचार्यांना वाद करूनच आपल्या विचारांचे श्रेष्ठत्व सिद्ध करायला लागले होते. त्यावेळेस त्यांना आलेल्या अनुभवावरून, आपल्या पश्चात, निव्वळ आपल्या वयावरून कोणाच्या मनांत या महत्त्वाच्या स्तोत्राबद्दल शंका येऊ नये म्हणूनही आचार्यांनी असे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हा फारच वरवरचा, किंवा तांत्रीक पध्दतीने केलेला विचार आहे.
२. उपासनेची खोली
दुसरा अर्थ असा आहे की, आचार्य हे अतिशय बुद्धिमान होते. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर लागलीच संन्यास घेणाऱ्यांपैकी होते. कोणतीही गोष्ट विलक्षण वेगाने ते आत्मसात करत असत. त्यामुळे केवळ ३२ वर्षात वेदांचे अध्ययन, भारतभ्रमण, अद्वैत सिद्धान्ताची पुनर्स्थापना, त्यासाठी वाराणसीमधील विद्वानांशी शास्त्रार्थ करून त्यांना आपले मत मान्य करायला लावणे तसेच त्याकाळातील मिथिला नगरीतले अत्यंत गाजलेले मंडन मिश्र व त्यांच्या विदुषी पत्नी यांना शास्त्रार्थात हरवून त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाला असलेला सर्व विरोध संपुष्टात आणला. चार पीठे स्थापन करून विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली.
हे सगळं जरी त्यांनी ३२ वर्षांच्या अवधीत केलेले असले, (खरे तर मुंजी अगोदरची आठ वर्षे वगळली तर ह्या सगळ्याला २४ वर्षेच लागली असेच म्हटले पाहिजे. पाचव्या वर्षी मुंज झाली असे समजले तर २७ वर्षे. असो.) तरी ३२ वर्षात एखादा माणूस मिळवून मिळवून कितीसं ज्ञान मिळवेल असा संशय कोणाला येऊ शकतो. त्यासाठी हे स्तोत्र लिहिण्याअगोदर त्यांनी किती अभ्यास केला आहे, किंवा किती मोठा अनुभव गाठीशी बांधून ते हे सगळे लिहीत आहेत हे लक्षात यावे हाही उद्देश यामागे असू शकतो. यासाठीही ते जणू काही म्हणत असावेत की,
एखाद्याने ८ व्या वर्षी अध्ययनाला सुरवात केली असेल व वयाच्या ८५ वर्षांनंतरही त्याचे अध्ययन चालूच असेल तर असा माणूस किती विद्वान असेल किंवा त्याला किती अनुभव असेल ते लक्षात घ्या. मी जे काही सांगतोय ते इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर, अनुभवांनंतर सांगतोय असं समजून या स्तोत्राचा गांभीर्याने विचार करा.
३. साधनांच्या मर्यादा
माणूस साधना करून करून किती करेल? शेवटी त्याला शरणच जायला लागते हे गोंदवलेकर महाराजांचे वाक्य प्रसिद्ध आहे. त्या वाक्याची आठवण हे स्तोत्र वाचताना पदोपदी येते. जणू हे वाक्य समजण्यासाठीच त्यांनी हे स्तोत्र लिहिले आहे असे वाटते. (गोंदवलेकर महाराजांच्या अगोदर फक्त ११०० वर्षे !!!)
थोडक्यात आतापर्यंत मी जे काही केले, किंवा जे काही ग्रंथ, स्तुतीस्तोत्रे वगैरे लिहिले, ते सर्व चित्तशुद्धीसाठी कामाला आले. चित्तशुद्धीसाठी सगळ्यांनीच तसं केले पाहिजे. पण त्याच कार्यात अडकू नका. त्यातच गुंतू नका. हे आपले अंतिम ध्येय नाहीये; कारण या सर्व साधनांत द्वैत शिल्लकच राहते. काहीवेळेस साधना करताना हे द्वैत मावळल्या सारखे वाटले तरी ती साधना संपताच ते द्वैत पुन्हा उफाळून येते. हे द्वैत कायमचे संपून अद्वैताच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी संपूर्ण शरणागती हेच एकमेव साधन उरते. तेच मी केलंय, तुम्हीही करा. असाच त्याचा सारांश बनतोय, असं माझं मत बनलंय.
४. जीवनाचे सार
तिसरा अर्थ असा निघतो की, मी आता जे काही सांगतो आहे ते अगदी निर्वाणीचे आहे. मी आता पंचाऐंशी ओलांडली आहे असं म्हणत असताना, माझे आता थोडेच दिवस राहिले आहेत असाही अर्थ त्यातून ध्वनीत होतोय. त्यावेळची आयुर्मर्यादा लक्षात घेता यात तथ्य असावेसे वाटतंय.
यातून त्यांना हेच सूचित करायचे असावे की, मी आतापर्यंत बरेच काही लिहिले, सांगितले आहे. पण आता मात्र मी माझ्या आतापर्यंतच्या जीवनाचे सगळे सार या स्तोत्रात मांडत आहे. तुम्ही तेवढे जरी केले तरी तुम्हाला त्या व्यतिरिक्त आणखी काहीही करायची जरूरी भासणार नाही.
५. मार्गदर्शन हाच हेतू,
माझ्या समजुतीप्रमाणे आचार्यांनी सिद्धावस्था प्राप्त केल्यानंतर, आपल्या शेवटच्या टप्यावरील अनुभवांवर आधारित ही स्तोत्ररचना केलेली असावी. या टप्यावर पोहोचल्यावर माणूस अगदीच अगतिक बनतो. ही अवस्था इतकी पुढची आहे की, मार्गदर्शनासाठी कोणीच नजरेच्या टप्प्यात दिसत नसते. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे अशांना मार्गदर्शन व्हावे, आपला रस्ता चुकलेला नाही याची त्याला खात्री पटावी, एवढ्याचसाठी आचार्यांनी हा खटाटोप केलेला असावा.
असं मला वाटण्याचे आणखी एक सबळ कारण म्हणजे आचार्यासारखे युगपुरूष किंवा संतमंडळी यांचे सांगणे नेहमीच “आधी केले मग सांगितले” या स्वरूपाचे असते. त्यामुळे या अवस्थेबद्दल ते फक्त तर्काने बोलणे अशक्य आहे. या अवस्थेतून पुढे गेल्यावर म्हणजे सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर ते इतरांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने, आपल्या मागील अवस्थांबद्दलाच्या अनुभवाबद्दल बोलत असणार हे नक्की होते.
(अवांतर १ पहा)
मी पाचव्या श्लोकाबद्दल जे काही आतापर्यंत लिहिले आहे त्याला छेद जाईल असा अर्थ एका पुस्तकांत असल्याचे मला माझ्या एका सृहूदाने कळवले व त्या भागाची फोटो कॉपी पाठवली. पण मी त्या पुस्तकाच्या लेखकाशी सहमत होऊ शकलो नाही. त्याची कारणेही मी त्या सृहूदाला पाठवली.
(अवांतर ५ पहा)
श्लोक १
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा: |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
सरल अर्थ संस्कृत
मन्त्रं न जाने, यन्त्रं न जाने, स्तुतिं न जाने
आवाहनं, ध्यानं तथा स्तुतिकथा: अपि च न जाने
ते मुद्रा: न जाने, विलपनं च न जाने
परं त्वत् अनुसरणं क्लेशहरणं मात: जाने
सरल अर्थ मराठी
मला मंत्र, तंत्र येत नाही. तुझी स्तुती कशी करावी हे सुद्धा मी जाणत नाही. तुझे आवाहन करणे, ध्यान करणे किंवा स्तवने, स्तोत्र, कथा यांचीही मला माहिती नाही. तुझ्या मुद्रा मला समजत नाही. व्याकुळतेने आक्रोश कसा करावा ते सुद्धा मला कळत नाही. परंतु तुला शरण जाण्यामुळे माझे दु:ख दूर होतात. हे आई इतकेच मला समजले आहे.
मला समजलेला अर्थ :-
आचार्यांची ग्रंथसंपदा व त्यांनी केलेल्या विविध उपासना लक्षात घेतल्यावर, “मला काही सुद्धा येत नाही” असं ते का म्हणताहेत, हेच प्रथम कळेनासे होते. प्रथमदर्शनी असं वाटतं की, ही त्यांची नम्रता आहे. पण नीट खोलात गेल्यावर लक्षात येते की, ते अगदी मनापासून खरं काय ते सांगत आहेत. फक्त ते अर्धसत्य आहे. त्यामुळे आपल्याला ते चटकन लक्षात येत नाहीये व आपला गोंधळ उडतोय.
त्यांना असं म्हणायचं आहे की,
आई, मी आतापर्यंत खूप मंत्रसाधना केलीय. तुझी खूप स्तुतीस्तोत्रे गायली आहेत. सगळे पूजाविधी यथासांग कसे करायचे ते मी करत आलोय, सर्वांना सांगत आलोय. देवता आवाहन, प्रतिष्ठापना करून, तिचे ध्यान करून देवतांना आपलेसे कसे करून घ्यायचे तेही मला आता यथासांग जमायला लागलंय. सर्वात अवघड असा प्रकार म्हणजे योगमुद्रा. त्याचाही अभ्यास माझा करून झालाय.
पण आता मला या सर्व उपासनांच्या मर्यादा जाणवायला लागल्या आहेत. मला दिवसाचे २४ तास यापद्धतीने वर्षाचे ३६५ दिवस उपासना करायची आहे व तीही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. पण अशा प्रकारची अखंडितपणे करता येणारी कोणतीच उपासना मला येत नाहीये. अशा अखंडित उपासनेसाठी लागणारे मंत्र, यंत्र, स्तुती, आवाहन, ध्यान किंवा मुद्रा याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे.
आईने आपल्याला उचलून घ्यावे असे वाटणाऱ्या बालकाला बाकी काही आले नाही तरी निदान जिवाच्या आकांताने रडता तरी आले पाहिजे. पण मला ते सुद्धा येत नाहीये.
घरट्यातील पिलांपैकी जे पिलू सर्वात जास्त आकांताने ओरडते, आपली चोच सर्वात जास्त वासते आणि आपले पाय जास्तीत ताणून आपली चोच सर्वात वर कशी राहील याचा खटाटोप करते, त्याच पिलाला त्याची आई सर्व प्रथम चारा भरवत असते. पण ही माहिती असूनही, जर मला त्याप्रमाणे प्रत्यक्ष वागता येत नसेल तर काय उपयोग?
मात्र आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलीय. (तुझ्याकडेच लक्ष ठेवत) सतत तुझ्या मागेमागे येत राहणे, ही एकमेव गोष्ट अशी आहे की ती विनासायास व विनाअडथळा सातत्याने करता येऊ शकते.
इतकेच नव्हे तर मला असाही अनुभव येतोय की, तुझा जर सातत्याने मागोवा घेत घेत, तुझ्या मागे मागे येता आलं, तर निव्वळ तेवढ्यानेच, माझे सगळ्या प्रकारचे त्रास दूर होताहेत.
श्लोक २
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तवचरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
सरल अर्थ संस्कृत
विधे: अज्ञानेन, द्रविणविरहेण,आलसतया
विधेय अशक्यत्वात् तव चरणयो: या च्युति: अभूत्
तत् हे सकलोद्धारिणि जननि शिवे एतत् क्षन्तव्यम्
(यत:) क्वचित् कुपुत्र: जायेत:, कुमाता न भवति
सरल अर्थ मराठी
पूजेच्या विधींचे ज्ञान नसल्याने, संपत्ती नसल्याने, आळशीपणामुळे, विधी करणे शक्य न झाल्याने तुझ्या चरणांची सेवा करण्यात जी कमतरता राहिली असेल त्यासाठी सर्वांचा उद्धार करणाऱ्या कल्याणकारी माते क्षमा कर. (कारण) कदाचित वाईट मुलगा जन्माला येईल परंतु वाईट माता कधीच असणार नाही.
मला समजलेला अर्थ :-
सतत तुझ्या मागे मागे येता यावे यासाठी कोणता पूजा विधी आहे हेच मला माहीत नाहीये.
बरं, असा पूजा विधी जरी मला माहीत झाला तरी, शेवटच्या श्वासापर्यंत चालणाऱ्या, या दिर्घकालावधीच्या पूजाविधीसाठी कितीतरी साहित्य सातत्याने जमवायला लागेल. एवढा पैसाही माझ्याकडे नाहीये.
मी आतापर्यंत उत्साहाने बऱ्याच गोष्टी करत आलोय, शिकत आलोय, शिकवतही आलोय. मला त्याचा कंटाळा कधीच आला नाही.
पण आतापर्यंत शिकलेलं सर्व सोडून देऊन संपूर्णपणे नवीन पूजाविधी शोधून काढायचा उत्साह माझ्यात राहिलेला नाही. माझ्यात आळस भरलाय असं तू म्हटलंस तरी चालेल.
आतातर माझी अवस्था अशी झालीय की, मला जे काही करता येत होतं, त्यापैकी काहीसुद्धा करावंस वाटत नाहीये आणि त्याबदल्यात नव्याने काय करायचं ते सुचत नाहीये. त्यामुळे मी तुझ्यापासून खूप लांब फेकला गेलोय असं वाटू लागलंय.
तरीपण मला तुझाच आधार वाटतोय. सगळ्यांचाच उद्धार करून, त्यांचे कल्याण करण्याचा तुझा उपजत स्वभाव आहे.
हा तुझा स्वभावच, तुला, माझे अपराध पोटात घेऊन मला क्षमा करायला लावेल यांत मला काडीचीही शंका नाही.
असं मी ठामपणे कसं काय म्हणू शकतोय? याचं तुला आश्चर्य वाटत असेल नाही? पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?
कुपुत्र असू शकतो. पण कुमाता असूच शकत नाही. हा तर जगन्मान्य सिद्धांत आहे!!! ||२||
श्लोक ३
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
सरल अर्थ संस्कृत
हे जननि, पृथिव्यां ते बहव: सन्ति सरला:
परं तेषां मध्ये विरल-तरल अहं तव सुत:
मदीय: अयं त्याग: समुचितं इदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥३॥
सरल अर्थ मराठी
हे आई, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ सरळमार्गी पुत्र आहेत. परंतु त्यामध्ये तुझा मुलगा मी सगळ्यांपेक्षा वेगळा तरल (चंचल) असा तुझा मुलगा आहे. (परंतु) हे शिवे या कारणामुळे तू माझा असा त्याग करणे योग्य नाही. (कारण) वाईट मुलगा कदाचित जन्माला येईल परंतु वाईट माता कधीच असणार नाही.
मला समजलेला अर्थ :-
या भूतलावर तुझे अनेक सरळमार्गी पुत्र असतील; नव्हे आहेतच. हे सरळ मार्गी लोक, एखादी गोष्ट करायला लागल्यावर त्यात कधी शंका काढत बसत नाहीत. त्यामुळे आपोआपच ते शेवटच्या श्वासापर्यंत अंगिकारलेली गोष्ट करत राहतात. आपल्या मार्गापासून ढळणे, हे त्यांच्या बाबतीत कधीच होत नाही.
पण त्यांच्यामध्ये मी मात्र सरळ स्वभावाऐवजी तरल किंवा चंचल स्वभावाचा निपजलो आहे की काय असे वाटतंय. माझ्या शंकेखोर स्वभावामुळे ही चंचलता माझ्यात आलीय का? का माझी कुशाग्र बुद्धीच याचे कारण आहे ते काही कळत नाहीये.
पण एवढे मात्र खरे की, मी आतापर्यंत जे काही करत आलोय त्यापासून मी दूर जातोय हे नक्की? खरं सांगायचं तर आतापर्यंत जे करत आलोय ते सगळंच सोडून द्यावेसे वाटतेय.
पण मी हे खरंच मुद्दामहून करत नाहीये. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही आहे. तरीही असं का होतंय? तेच तर मला कळत नाहीये. असं असताना, मला सगळं नीट समजावून सांगायच्या ऐवजी, तू जर मला तुझ्यापासून दूर लोटायला लागलीस, तर ते कसं बरं योग्य होईल? तूच सांग.
नाही, तू मला दूर लोटूच शकणार नाहीस.
कारण;
मला एक पक्कं माहिती आहे की, कुपुत्र असू शकतो.
पण कुमाता असूच शकत नाही. ||३||
श्लोक ४
जगन्मातर्मातस्तवचरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||
सरल अर्थ संस्कृत
(हे जगन्मात: तव चरणसेवा (मया) न रचिता
वा हे देवि मया भूय: द्रविणम् अपि न दत्तम्
तथा अपि त्वं मयि निरुपणं स्नेहं प्रकुरुषे
(यत:) कुपुत्रो जायेत क्वचित, कुमाता न भवति)
सरल अर्थ मराठी
हे जगन्माते, मी तुझ्या चरणांची सेवा केली नाही. किंवा हे देवी, मी तुला पुष्कळ संपत्ती सुद्धा वाहिली नाही. तरीही तू माझ्यावर जे निरतिशय प्रेम करतेस त्याचे कारण कदाचित वाईट मुलगा जन्माला येईल परंतु वाईट माता कधीच असणार नाही]
मला समजलेला अर्थ :-
हे जगन्माउली, मी आतापर्यंतत तुझी खूप सेवा केली. तुझ्या पायांवर अभिषेक करून, धूप, दीप, नैवेद्य अर्पण केला. धूपारती, पंचारती केल्या. अशा प्रकारे खूप काही केलं आहे. पण तुझ्या चरणांची सेवा करण्याचा खरा अर्थ कधी लक्षातच आला नाही. तुझ्या पायावर माझ्यातला “मी” वाहिल्यावर चरणसेवा पूर्ण होते हे कधी डोक्यातच आले नाही. माझ्यातला “मी” कायमच माझ्याकडेच राहून गेला. तुझ्या चरणांची सेवा म्हणजे संपूर्ण शरणागती ही संकल्पनाच मनाला शिवली नव्हती.
मी तुझ्यासाठी म्हणून द्रव्य वेचलं नाही, असं नाही. पण आता लक्षात येतंय की, निव्वळ तुझ्या प्राप्तीसाठी मी ते वेचले असं म्हणता येत नाहीये. माझ्यातला “मी” तुझ्या चरणी वाहणे, या एकमेव हेतूने जर माझ्या हातून द्रव्य खर्च झाले असते, तर मात्र मी तुझ्यासाठी पैसे खर्च केले असे म्हणता आले असते.
तरीसुद्धा तू तुझं निरुपम प्रेम माझ्यावर ठेवलंस. त्यात कधीच खंड पडला नाही.
त्यावरून तर हे सिद्धच होतंय की,
एक वेळ कुपुत्र जन्माला येऊ शकेल,
पण कुमाता कधीच असू शकत नाही.॥४॥
श्लोक ५
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||
सरल अर्थ संस्कृत
(विविध-विध-सेवाकुलतया देवा: परित्यक्ता: (मया)
मया पञ्चाशिते: अधिकं वयसि अपनीते
इदानीं चेत् हे मात: यदि कृपा न अपि भविता
निरालम्ब: (अहं) हे लम्बोदरजननि कं शरणं यामि ॥५॥)
सरल अर्थ मराठी
हे आई, तुझी कृपा व्हावी म्हणून मी सर्व देव देवतांच्या विविध उपासना सोडून दिल्या आहेत. पंच्याऐशीहून अधिक वयाचा मी झालो आहे. हे गणेश माते ,आता जर तुझी कृपा झाली नाही तर माझ्यासारख्या निराधाराने कोणाला शरण जायचे?
मला समजलेला अर्थ :-
वयाची पंचाऐशी ओलांडली. आतापर्यंत खूप काही केलं. पण त्यामुळे तुझ्या माझ्यातले अंतर मात्र कमी होत नव्हतं. क्षितिज जसं आपल्यापासून सतत अंतर ठेवून असतं, अगदी तसंच अंतर तू माझ्यापासून कायम राखलंस. पण मला आता त्याचे कारण कळलंय.
हे अंतर कमी करणं माझ्या हातात नाही. मात्र तुझ्या मनांत जर तसं काही आले तर मात्र हे अंतर तू कमी करू शकतेस. यासाठी तुझीच तशी इच्छा व्हायला पाहिजे. त्यालाच कृपा म्हणतात हेही आता कळलंय.
आणि हो, महत्त्वाचे म्हणजे, तुझी ती कृपा होईपर्यंत कोणतीही तक्रार न करता वाट बघण्याची माझी तयारी असायला हवी हे मी माझ्या मनाला बजावून सांगितलंय.
ही विनातक्रार काकुळतीने वाट बघायची माझ्या मनाची तयारी असणेच म्हणजेच संपूर्ण शरणागती. तीच खरी चरणसेवा. हे अगदी सूर्यप्रकाशासारखे आता स्पष्ट झालंय.
पण त्यामुळे झालंय असं की, तुझी कृपा कधी होतीय याची वाट पाहण्याच्या नादात मी सर्व देवदेवतांच्या पूजाअर्चा व उपासना करायचं विसरून गेलोय.
आणि येवढे करून, तुझी पूजाही नाही व तुझी कृपाही नाही असं काही झालं तर मी या वयांत कुठे जाऊ? कुणापुढे हात पसरू?
सर्वांचे अपराध आरामात पोटात घेता येतील, एवढे मोठे पोट असणाऱ्या गजाननाची आई तू. तुझ्या दृष्टिने पाहता, माझे अपराध पोटात घेणे ही तर फारच किरकोळ गोष्ट आहे. तर मग तूच सांग. तुझ्याशिवाय मी कोणाला बरे शरण जाऊ? तुझ्याशिवाय मला कोणता आधार शिल्लक राहिला आहे? ॥५॥
श्लोक ६
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै: |
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ||६||
सरल अर्थ संस्कृत
(श्वपाक: मधुपाक-उपम-गिरा जल्पाक: भवति
निरातङ्क: रङ्क: चिरं कोटि-कनकै: विहरति
तव अपर्णे मनुवर्णे कर्णे विशति फलं इदं
जननी जपनीयं जपविधौ जन: को जानीते॥६॥)
सरल अर्थ मराठी
हे अपर्णे, तुझ्या नामातील अक्षरे केवळ कानावर पडल्यानेही, अतिशय क्षुद्र माणूस सुद्धा मधासारखी गोड वाणी असलेला वक्ता होतो. अतिशय दरिद्री असलेला गरीब माणूस कोट्याधीश होतो. तर तुझ्या जपाच्या अनुष्ठानाने जे फळ मिळते ते कोणाला कसे कळेल?
मला समजलेला अर्थ :-
एखाद्या गरिबाला कोट्यवधी सुवर्णमुद्रा दिल्या व त्याने त्या कशाही खर्च करूनही जर त्या थोड्यासुद्धा कमी झाल्या नाहीत तर आपल्याला ते किती आश्चर्यकारक वाटेल नाही का?
किंवा सतत निरर्थक बडबड करणाऱ्या माणसाचे बोलणे जर एकदम मिठ्ठास व अर्थपूर्ण झाले तर आपल्याला तो मोठा चमत्कार वाटल्याशिवाय राहील का?
अगदी तसेच तुझे संपूर्ण नाम नव्हे तर तुझ्या नामातील काही अक्षरे सुद्धा चमत्कार घडवून आणतात. त्यातले एखादे अक्षर जरी नुसते कानावर पडले तरी असे काहीतरी भव्यदिव्य घडून आणण्याची ताकद त्या अक्षरात असते.
समुद्राच्या प्रत्येक लाटेमध्ये जसा समुद्र ओतप्रोत भरलेला असतो तसा तुझ्या नामातील (क्षर नसलेल्या) प्रत्येक अक्षरात तू भरून राहिलेली असतेस हेच तर त्याचे कारण आहे हे एव्हाना मला माहीत झालंय.
असे प्रत्येक अक्षर माते तुझ्यासारखेच असते म्हणून तर त्याला मातृक असे म्हणतात ना गं?
तुझ्या नामातील एखादे अक्षर नुसते कानावर पडले, तरी त्यातून एवढे सामर्थ्य निर्माण होत असेल, तर ते अक्षर जर मी वाणीने उच्चारले तर त्यातून कितीतरी अधिक शक्ती बाहेर पडेल ना गं?
पण त्याचे गणित मांडण्याचा फंदात मी कशाला पडू?
जर ती अक्षरे आपल्याच वाणीने उच्चारून आपल्याच कानाने ऐकली तर काय होईल याची तर मला गणनाच करता येणार नाही.
अशा तुझ्या नामाचा जर जप मोठ्याने केला व आपल्याच कानाने ऐकला तर काय होईल ह्याचा विचार जरी मी करायला लागलो, तरी माझी मती गुंग होऊन जाते.
आणि असा जप अखंड करण्याचा विधीच जर एखाद्याने सुरू केला तर मात्र;
असे काही तरी घडून येईल, ज्याचा अर्थ प्रत्यक्ष वेद सुद्धा जाणू शकणार नाहीत.
कळीकाळाची शक्ती सुद्धा त्यापुढे फिक्की पडेल.
ते असं काही तरी असेल की, कळीकाळाची शक्ती म्हणजे सूर्यापुढे एखादा काजवाच भासावा.
एकंदरीत ती सगळीच प्रक्रिया, त्या प्रक्रियेचे परिणाम,
सगळंच अवर्णनीय, अपौरूषेय आणि अवर्चनीय असेल.
आचार्यांनी सगुणोपासनेला खूप महत्त्व दिले आहे. त्यासाठी त्यांनी देवी, गणपती, शंकर वगैरेंची स्तुती स्तोत्रे रचली आहेत. निर्गुण ब्रह्माची प्राप्ती ही सगुणोपासनेशिवाय होऊच शकत नाही, यावर ते नेहमीच ठाम राहिलेले आहेत.
मात्र या स्तोत्रात ते देवाच्या नामालाच देवाचे सगुणरूप मानताहेत. देवाच्या सगुणमूर्तीच्या उपचारांपेक्षा ही भगवंताच्या नामाची सगुणोपासना कशी श्रेष्ठ आहे हे समजावून सांगताहेत असे लक्षात येते. त्यामुळे नाम नामी अभेद सिद्धांत मांडण्यासाठीच जणू हे स्तोत्र लिहिले आहे की काय असे वाटते.
ज्ञानेश्वर माउलीही हरिपाठात थोडंसं असच म्हणताहेत.
(अवांतर २ पहा.)
श्लोक ७
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति: |
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदम् ||७||
सरल अर्थ संस्कृत
(चिताभस्म-आलेप:, गरलम्-अशनं दिक्पट-धर:,
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी, पशुपति:,
कपाली, भूतेश: जगदीशैकपदवीं भजती
हे भवानि त्वत् पाणिग्रहण-परिपाटी-फलम् इदम् ॥७॥ )
सरल अर्थ मराठी
चिताभस्म लावणाऱ्या, विष पिणाऱ्या, दिगंबर, जटाधारी, गळ्यात सर्पमाला धारण करणाऱ्या, पशुपती, हातात कटोरा घेतलेल्या, भूतपिशाच्चांचा देव असलेल्या शंकराला जगदीश्वर ही पदवी मिळाली. हे भवानी तुझे पाणिग्रहण करून तुझ्याशी विवाह केल्याचेच हे फळ आहे.
मला समजलेला अर्थ :-
शंकर चिताभस्म लावतात. म्हणजे रोज स्मशानात जाणे आले. पूर्वी त्रिकाल स्नानसंध्या केली जायची. म्हणजे दररोज तीनदा स्मशानात जाणे आले. प्रेताला शिवलं तरी अंघोळ करायची पद्धत आहे. इथे तर प्रथम अंघोळ करायची आणि मग, चिता जळल्यावर उरलेली राख भस्म म्हणून अंगाला फासायची आहे.
विषाची कधी परीक्षा पाहू नये म्हणतात. इथे तर सगळंच उलट चाललंय. ज्या अतिजहाल विषापासून सगळे दूर पळताहेत, तेच विष आपणहून मागवून घेऊन प्यायचे म्हणजे काय? सगळं विचित्रच की हो.
वैराग्यास योग्य असं अन्न सेवन करायचे. म्हणजे पोटासाठी खायचे. जिभेसाठी नाही. मिष्टान्न वर्ज्य. चवीसाठी कोणतीही प्रक्रिया करत बसायचे नाही. थोडक्यात जे मिळेल ते , मिळेल तसंच खायचे.
दिगंबर अवस्थेत राहावयाचे. म्हणजे वस्त्रे प्रावरणे वर्ज्य. “एक नूर आदमी, दस नूर कपडा” अशी पद्धत असताना कपडेच नाहीत म्हटल्यावर तो माणूस कसा दिसेल याची कल्पनाच करवत नाही.
जटा वाढवतात. म्हणजे चांगले दिसण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रश्नच येत नाही.
गळ्यात भुजंगरूपी हार धारण करतात. साप, नाग घरात येऊ नयेत म्हणून आपण किती धडपडत असतो. इथे तर मुद्दामहून नाग गळ्यात घालून बसायचे. कहरच झाला म्हणायचे.
ते पशुपती आहेत. सर्व जीवमात्रांचे शंकर प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्या वरातीमधील देवतांबरोबरच दानव, दैत्य, भूत, प्रेत सगळेच सामील होतात. नाचतात. गातात.
भुतांचे नाथ आहेत. बापरे. भूत, पिशाच्च वगैरे शब्दांची पण आपल्याला अॅलर्जी आहे. इथे तर ह्यांच्याच संगतीत सगळे दिवस काढायचे या कल्पनेनेच एखाद्याला वेड लागायचे.
असे असूनही सर्वजण त्यांना जगदीश म्हणतात!!!!! त्यांना सर्वभूतमात्रांचे स्वामी समजले जाते.
संसारात आपल्याला जे जे मिळवायचे असते त्याचा संपूर्णपणे त्याग करायचा आणि संसारात जे जे आपण टाळतो, आपल्यापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो ते सगळं कवटाळून बसायचं. असं असूनही सर्व जगाचे स्वामी व्हायचं!!!
खरंच प्रथम दर्शनी हे अनाकलनीय वाटतं. पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
हे आई, त्यांनी तुझ्याशीच विवाह करून, तुझे अखंड साधिन्य मिळवले त्याचंच तर हे सगळं फळ आहे.
मी तुझ्या मागे मागे येत राहिल्याने माझे सर्व कष्ट दूर का होतात? त्याचे कारण आता कुठे माझ्या लक्षात येतंय. तुझ्या मागे मागे येताना नकळत मला तुझे साधिन्य मिळत असते. मग मात्र मी काय करतोय किंवा मी काय केलेले नाही याचा विचार करायची जरूरीच पडत नाही.
श्लोक ८
न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखिसुखेच्छापि न पुनः |
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||
सरल अर्थ संस्कृत
मे मोक्षस्य आकांक्षा न भव-विभव-वाञ्छा अपि न
विज्ञानस्य (विशेषेण ज्ञानस्थ) अपेक्षा न, शशिमुखि सुखेच्छा अपि न
अत: हे जननि त्वां संयाचे यत् मम जननं
हे मृडानी रुद्राणी शिव शिव जपत: यातु भवान् इति ॥८॥
सरल अर्थ मराठी
मला मोक्ष मिळावा ही माझी इच्छा नाही, भरपूर संपत्ती मिळावी अशीही इच्छा नाही. विशेष ज्ञानाची प्राप्ती व्हावी किंवा चंद्रमुखी स्त्रीचे सुख मिळावे असेही माझे मागणे नाही. म्हणून हे आई, मी असे मागणे मागतो की, माझा संपूर्ण जन्म हे मृडानी, रुद्राणी शिव शिव असे जप करण्यात जावो.
मला समजलेला अर्थ :-
आताच्या प्रचलित दृष्टीने नामस्मरणाचा प्रवास हा सामान्यातून असामान्यत्वाकडे जाणारा असा असल्याने, असामान्यत्वाला पोहोचलेले आचार्य मला नामस्मरण पाहिजे बाकी काही नको असे जेव्हा म्हणतात तेव्हा या श्लोकाचा अर्थ आपल्याला गोंधळात टाकायला लागतो.
(अवांतर ३ पहा.)
याचे कारण असे आहे की, संपूर्ण शरणागती ही सर्व साधनांची शेवटची पायरी आहे. यानंतर कोणतेही साधन करून पुढे जाता येत नाही तर या शेवटच्या पायरीवर पोहोचल्यावर पुढे जाण्यासाठी फक्त भगवंताच्या कृपेची आवश्यकता असते.
आचार्य शेवटच्या पायरीवरच पोहोचलेले असल्याने, यापुढे कोणतेही साधन उपयोगी पडणार नाही हे त्यांना माहीत झालंय. त्यातून हा श्लोक निर्माण झालाय. हे सर्व लक्षात घेतले की मात्र श्लोकांचे अर्थ नीट समजायला लागतात. ह्यातील सगळ्या श्लोकांची रचनाच अशी आहे की, त्यातून फक्त नामस्मरण व शरणागतीचे महत्त्व विशद होते.
या शेवटच्या पायरीवर भगवंताच्या कृपेची आवश्यकता असल्याने त्याच्या मागेमागे जात राहणे आणि त्याच्या कृपेची वाट पाहणे एवढंच आपण करू शकतो. त्याचे भान सतत जिवंत ठेवायला लागते. हे भान सतत जिवंत राहण्यासाठी २४ तास अनुसंधानाची गरज असते. हे अखंड अनुसंधान ठेवणे अखंड नामस्मरणाने शक्य होते. नामस्मरण अखंडपणे करता येते कारण ते करण्यासाठी कोणत्याही अटी नसतात. साधनसामुग्री , शिक्षण वगैरेची ही आवश्यकता नसते. ही अशी एकमेव साधना आहे की ती दिवसाचे २४ तास या पद्धतीने शेवटच्या श्वासापर्यंत करता येऊ शकते.
हे सगळे माहीत असल्याने
ते म्हणत आहेत.
“आई, मला आता मोक्षाची इच्छाच राहिली नाहीये.”
“संसारातलं वैभव, चंद्रमुखी स्त्री, लोकांना विशेष वाटेल असे ज्ञान वगैरे सारख्या गोष्टी तर मोक्षापुढे फारच क्षुल्लक आहेत. त्याबद्दलची माझी इच्छा तर केव्हाच मेलीय.
मी असं म्हणतोय कारण;
वरील सर्व गोष्टींचं शब्दांत वर्णन करता येतंय.
त्यांच्याबद्दल मनांत काहीतरी कल्पना करता येतीय.
त्यामुळेच ते फारसं भव्यदिव्य नाहीये हे माझ्या आता लक्षात आलंय.
त्याच्यापेक्षाही सर्वोत्तम व भव्यदिव्य असं काही असू शकतं,
तसंच ते इतकं अतुलनीय असतं की, ना त्याचे वर्णन करता येते, ना त्याची कल्पना करता येते, ना ते शब्दाने सांगता येतं.
असं जे काही असते, ते, जर निव्वळ नामस्मरणाने मिळत असेल तर मी नामस्मरणाव्यतिरिक्त इतर गोष्टी कशाला मागत बसू?
आई,
खरंच सांगतो, तुझ्या व शिवाच्या नामस्मरणात माझा उरलेला जन्म जावो एवढंच मी मागेन.
बाकी माझी काही इच्छाच राहिलेली नाहीये.
आचार्य हे संन्यासी होते.
असे असूनही संसारातले वैभव किंवा चंद्रमुखी स्त्रीसुखाचा उल्लेख खटकण्याची शक्यता आहे. यासाठी त्यामागची पार्श्वभूमी सांगणे जरूर आहे असे वाटते.
(अवांतर ४ पहा.)
श्लोक ९
नाराधितासि विधिना विविधोपचारै:
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि: |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||
सरल अर्थ संस्कृत
विविधोपचारै: विधिना न आराधितासि
रुक्षचिन्तनपरै: कृतं वचोभि: न (आराधितासि)
हे श्यामे, त्वमेव मयि अनाथे यदि
उचितं तव कृपाम् धत्से
सरल अर्थ मराठी
निरनिराळ्या विधींनी, पूजा उपचारांनी मी तुझी उपासना केली नाही. रुक्ष, विचारी शब्दांनी सुद्धा मी तुझी उपासना केली नाही. हे श्यामे (पार्वती) जर तुला योग्य वाटत असेल तर तू माझ्यासारख्या अनाथावर कृपा कर..
मला समजलेला अर्थ :-
तुझ्या विधिवत उपचारांत आता माझं शरीर रमत नाही.
त्यामुळे शरीराने काही करावंसच वाटत नाही आहे.
मनाने तुझे चिंतन करणे खूप आनंददायी वाटायचे.
पण तुझे चिंतनही दिवसेंदिवस रुक्षं होत चाललंय.
त्यामुळे तुझे चिंतन करणेही आता कंटाळवाणे व्हायला लागलंय.
त्यामुळे आतातर तुझे चिंतन करायचेही थांबलंय.
या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्या शरीराला व मनाला आलंबन घ्यायला कोणताच आधार शिल्लक राहिलेला नाहीये.
या शरीराचे व मनाचे, मी काय करायचे? तेच कळेनासे झालेय.
खरंच मी निराधार झालोय.
मी अगदी अनाथ दीनवाणा झालोय.
मला हे हवंय, हे नकोय, असं काहीच तुझ्याकडे मागायची इच्छा मला उरलेली नाहीये.
आई,
आता, तुला जे योग्य वाटेल त्यापद्धतीने तू माझ्यावर कृपा कर.
त्याबाबत माझी कोणतीही तक्रार असणार नाही.
तू जे काही करशील ते मी मनापासून स्वीकारेन.
श्लोक १०
आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि
नैतच्छठत्वं मम भावयेथा:
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ती ||१०||
सरल अर्थ संस्कृत
आपत्सु मग्न: त्वदीयं स्मरणं
हे करूणार्णवेशि दुर्गे (अहं) करोमि
एतत् मम शठत्वं न भावयेथा:
(यत:) क्षुधा-तृषार्ता जननीं स्मरन्ति
सरल अर्थ मराठी
संकटात अडकल्यावर तुझेच स्मरण हे करुणामयी दुर्गे मे करतो. ही माझी लबाडी आहे असे समजू नको. (कारण) तहान-भुकेने व्याकूळ झाल्यावर आईचेच स्मरण करतात.
मला समजलेला अर्थ :-
आई, जेव्हा जेव्हा माझ्यावर आपत्ती कोसळते, तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे धाव घेतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की इतरवेळेस मी तुला विसरलेला असतो.
एखाद्या लहान बाळाला आईचे भान सदोदित असते. म्हणूनच थोडावेळ जरी आई दृष्टीआड झाली की, ते मोठ्याने भोकाड पसरते. पण असं असलं तरी ते काही सदा सर्वकाळ आईला चिकटून बसत नाही. मात्र तहान- भुकेने व्याकूळ झालं की मात्र तेच बाळ सगळं सोडून तुझ्याकडे धाव घेतं.
माझंही तसंच होतंय. मी काहीही करत असलो तरी तुझे भान मला सदैव असते.
पण आपत्ती येताच मात्र हातातलं सगळं सोडून, मी तुझ्याकडेच धाव घेतो.
तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण?
शिवाय, तू तर करुणेचा सागर आहेस.
मग तुला सोडून दुसरीकडे कुठे जायची मला गरजच काय?????
श्लोक ११
जगदम्ब, विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि |
अपराधपरम्परापरं
न हि माता समुपेक्षते सुतम् ||११||
सरल अर्थ संस्कृत
जगदम्ब किं अत्र विचित्रं
मयि (तव) परिपूर्णा करुणा अस्ति
अपराधपरम्परापरं अपि
माता सुतम् न समुपेक्षते ॥११॥
सरल अर्थ मराठी
हे जगदंबे, यात आश्चर्य ते काय की तुझी माझ्यावर अपार कृपा आहे. (कारण) सतत अपराध करत असला तरी आई मुलाची उपेक्षा कधीच करत नाही.
मला समजलेला अर्थ :-
आचार्यांचे सगळेच जीवन इतके आदर्शवत आहे की, आचार्य अपराध करतात म्हणजे नक्की काय करतात हेच आपल्या लक्षात येत नाही. कारण आचार्य ज्या स्थितीला पोहोचले आहेत त्या स्थितीला पाप पुण्याची व्याख्या पूर्णपणे वेगळी असते. कुठलातरी उपास मोडला किंवा सोवळे ओवळे पाळण्यात झालेली चूक अशा प्रकारचे ते अपराध नसतात.
“कृतज्ञता म्हणजे पुण्य व कृतघ्नता म्हणजे पाप”, ही पाप-पुण्याची त्यांची व्याख्या असते. त्यानुसार त्यांना म्हणायचे असते की, मी आतापर्यंत तुझ्यासाठी खूप काही केलेले असले तरी, तुझी कृपा होती म्हणूनच मी ते करू शकलो यात मला अजिबात शंका नाही. असे असूनही “मी केले” ही भावना मी संपूर्णपणे तुझ्या चरणी वाहू शकलो नाही. सगळे श्रेय तुझेच असूनही त्यातले थोडेसेतरी श्रेय माझ्या नकळत मी माझ्याचकडे ठेवत होतो. हे कृतघ्नतेचे पाप मी आयुष्यभर करत आलोय. खरंच हे पाप अपरंपार आहे.
आई, काही काही वेळेस मला असं वाटतं की, मी अशा प्रकारचा अपराध सतत करत असूनही तू माझ्यावर रागावत कशी नाहीस? सतत माझ्यावर कृपादृष्टी कशी काय ठेवू शकतेस ?
खरंतर, मला दोन फटके मारून शिक्षा करायचे सोडून, तू जेव्हा असं काही करतेस ना, तेव्हा तर ते मला फारच विचित्र वाटते.
पण मला आता त्याचं उत्तर कळलंय.
लेकाचे अपराध आई नेहमीच पोटात घालते, ते उगीच नाही. त्यामागेही त्या माउलीचा काही विचार असतो.
आज नाही तर उद्या, त्याच्यात नक्कीच सुधारणा होईल या अपेक्षेने ती त्याची उपेक्षा करत नाही, त्याला दूर लोटत नाही.
तर त्याला सुधारणेची संधी देत राहते.
पण आता माझ्या लक्षात हे सर्व आलंय.
मला मिळालेली ही संधी आता मला वाया घालवायची नाही आहे.
श्लोक १२
मत्समः पात़की नास्ति
पापघ्नी त्वत्समा न हि
एवं ज्ञात्वा महादेवि
यथायोग्यं तथा कुरु ||१२||
सरल अर्थ संस्कृत
मत्सम: पातकी नास्ति
पापघ्नी त्वत्समा न हि
एवं ज्ञात्वा महादेवि
यथायोग्यं तथा कुरु
सरल अर्थ मराठी
माझ्यासारखा पापी माणूस नाही. तुझ्यासारखी पाप नष्ट करणारी नाही. हे जाणून हे महादेवी जसे योग्य असेल ते कर.
मला समजलेला अर्थ :-
आई,
माझ्यासारखा पातकी या जगात दुसरा कुणीही नाही, हे अगदी खरं आहे.
सामान्य माणसाकडून सामान्य प्रतीची कार्ये घडतात. त्याचे संपूर्ण श्रेय त्याने तुला दिलं नाही तर त्यामुळे होणारा अपराध हा नक्कीच छोटा मानला पाहिजे.
उलट असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्याला तर तुझी सर्वात जास्त मदत लागते. असे असूनही तो त्यातले बरेच मोठे श्रेय ढापत असेल कर तो कृतघ्नतेचा अपराध खूप मोठ्या प्रमाणावर करत असतो असेच म्हटले पाहिजे.
दुसरे असे की, सामान्य माणूस, पाप पुण्याच्या खऱ्या व्याख्येबाबत अनभिज्ञ असतो. त्यामुळे त्याचा दोष कमी प्रतीचा मानला पाहिजे.
याउलट जो शिकला सवरलेला आहे, ज्याचा सर्व शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे, ज्याला ही पाप-पुण्याची व्याख्या माहीत आहे, त्याच्या हातून जर तुझे श्रेय ढापण्याचा अपराध घडत असेल, तर मात्र तो महाअपराधी समजला गेला पाहिजे.
कसही असो. सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारी तुझ्यासारखी दुसरी कुणीही नाही, हेही तेवढंच खरं आहे. होय की नाही?
मग आता हे सगळं लक्षात घेऊन, तुला जे काही योग्य वाटेल ते कर.
तुझा तोच स्वभाव असल्याने तू ते करणारच आहेस म्हणा.
आणि तू जो काही निर्णय करणार असशील तो अर्थातच मला मान्य असणार आहे!!!
||इति श्रीमत्परमहंस-परिव्राजकाचार्य श्रीशंकराचार्यविरचितं देव्यापराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णं ||
अवांतर १
नामस्मरणाचे महत्त्व सांगण्यासाठी ह्या श्लोकाची रचना आचार्यांनी केली आहे असा मी जो अर्थ काढलाय तोच अर्थ आचार्यांना अभिप्रेत असेल तर, आचार्यांनी तेव्हांच तसे स्पष्ट का सांगितले नाही असा प्रश्न आपल्या मनात येतो.
इथे आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, आचार्यांचा काळ हा ज्ञानेश्वर माउलीच्या आधी ५०० वर्षांचा काळ आहे. निरनिराळ्या विचारांचा, उपासना पद्धतींचा कोलाहल माजलेला आहे. अध्यात्म हा संसारी लोकांचा प्रांत नसून त्यासाठी संसार सोडायला लागतो, संन्यास घ्यावा लागतो अशीही समजूत काही लोकांनी करून घेतली आहे.
आचार्यांना यात बदल करायचा आहे. पण त्यासाठी जगरहाटी सोडून बदल करणे अशक्य असते. तर समाजातीलच एक भाग बनून असा बदल करण्याचा प्रयत्न करणे इष्ट असते. यालाच चिखल साफ करण्यासाठी चिखलात उतरावे लागते असे म्हटले जाते. फक्त चिखल साफ करताना तो आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घेतली की काम भागते. (येथे “चिखल” हा शब्द वाक्प्रचारातील शब्द म्हणून घेतला आहे. तुच्छता दर्शवण्यासाठी नाही.)
यासाठी प्रचलित पद्धतीनुसार सर्वमान्य असा संन्यासाश्रम स्वीकारून, प्रचलीत शास्त्रांचा, वेदांचा सर्वांगीण अभ्यास करून समाजातील मतांतरात एकवाक्यता निर्माण करणे जरूरीचे होते. त्यावेळच्या पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळच्या विद्वानांचे आव्हान स्वीकारून शास्त्रार्थ करून अद्वैत तत्त्वज्ञानाची पुनर्स्थापना केली. हेच त्यांच्या जीवनाचे विहित कर्म होते. हे कार्य करण्यासाठी त्यांना एक पायरी खाली उतरून द्वैताचे भान ठेवणे आवश्यक होते.
हे कार्य सिद्ध झाल्यावर मात्र त्यांनी द्वैतातून अद्वैताकडचा आपला शेवटचा प्रवासाचा आढावा या श्लोकात घेतलेला असावा असे वाटते. त्यासाठी आईचा सतत मागोवा घेणे क्रमप्राप्त असते. यासाठी आईचे भान सतत जिवंत ठेवायला लागते. हे भान जिवंत ठेवण्यासाठी आईला तिच्या नावाने (विलपनं= जिवाच्या आकांताने) हाक मारत राहावयाचे असते. त्यालाच नामस्मरण म्हणतात. ही गोष्ट फक्त नमूद करून फक्त ते थांबले आहेत असे वाटते.
ज्ञानेश्वरांच्या काळात, सामान्य लोकांना अध्यात्माचा अधिकार नाही, इतकेच नव्हे तर त्यांना वेदांचा अथवा संस्कृत भाषा शिकायचा पण अधिकार नाही अशी समजूत होती. त्यामुळे सामान्यांनाही जमेल अशा प्रकारच्या नामस्मरणाबद्दल स्पष्ट बोलायचे त्यांनी टाळले असावे असा तर्क करता येतो.
(परत वर जा) / अनुक्रमणिका
अवांतर २
थोडंफार असंच काहीसं ज्ञानेश्वर माउलीही हरिपाठात सांगताहेत असं वाटतं.
नारायण हरी उच्चार नामाचा
तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२५.२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तें जीवजंतूंसी काय कळे ॥२५.३॥
(परत वर जा) / अनुक्रमणिका
अवांतर ३
संसारी माणसाने देवाचे नाव घेत राहावे. अध्यात्मातले बाकी काही केले नाही तरी चालेल अशी आपली समजूत झालीय कारण १२ व्या शतकात ज्ञानेश्वर माउलीने उच्चारवाने सांगितले की,
“हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी”
शिवाय पुढे असेही सांगितले की,
असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरी ॥
म्हणजे,
जिभेला वेग देऊन भगवंताचे नाम घ्या. या पद्धतीला चारही वेदांचा व सहाही शास्त्रांचा पाठिंबा आहे. आशीर्वाद आहे. यात तुमचा संसारही चांगला होईल कारण प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या घरी येऊन तुम्हाला मदत करील.
१. निळोबा
निळोबाही असंच सांगताहेत.
संत एकांती बैसले । सर्वही सिद्धांत शोधिले ।
ज्ञानदृष्टी अवलोकिले । सार काढिले निवडोनि ॥
ते हे श्रीहरीचे नाम । सर्व पातकां करी भस्म ॥
अधिकारी उत्तम अथवा अधम । चारी वर्ण नरनारी ॥ )
म्हणजे भगवंताचे नाम घेणे ही उपासना पद्धती सर्वोत्तम असून, सगळ्यांना ती उपलब्ध आहे. त्यासाठी कोणतीही पूर्वअट लागू होत नाही. थोडक्यात संसारी माणसाने अध्यात्माकडे किंवा सामान्यातून असामान्यत्वाकडे जाण्याचा हा मार्ग आहे असेच आपल्याला वाटते.
२. अडचणी व सुलभता
दुसरा मुद्दा म्हणजे, निरनिराळ्या देव देवतांचे मंत्र, तंत्र, उपासना, उपासनांचे नियम हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसते. तेवढा वेळही ते देऊ शकत नाहीत. परत त्याला बरीच साधनसामुग्री व पैसा पण लागतो.
त्यामुळे सामान्य संसारी माणसे संसार सुखाचा व्हावा म्हणून नामस्मरण किंवा जपाला सुरवात करतात. जे यात टिकतात त्यांचा हळूहळू अध्यात्माच्या प्रांगणात प्रवेश होऊ लागतो. यातून हळूहळू चित्तशुद्धी होत जाते. दोष कमी होत जातात. ध्यान वगैरे लागायला लागते. यानंतर मात्र निव्वळ संपूर्ण शरणागतीद्वारे पुढची प्रगती होत असते. पण हा मार्ग सामान्य माणसांना अवलंबावयास सोपा वाटतो.
३. गोंदवलेकर महाराज
तसेच आजच्या काळात तोच एक मार्ग उरलेला आहे असे गोंदवलेकर महाराज ही म्हणतात.
आतापर्यंत भगवंताचे जे अवतार झाले ते सर्व देहधारी होते. पूर्वीच्या लोकांकडे आचारधर्म होता, नीतिमत्ता होती. पण आता काळच बदललाय. आता लोकांची बुद्धीच भ्रष्ट व्हायला लागली आहे. त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीने पूजा पाठ, यज्ञयाग तसेच योगमार्गाने वाटचाल करणे शक्य होणार नाही. त्यासाठी यजमानही मिळणार नाही. तसेच त्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणारे विद्वान ब्राह्मणही सापडणार नाहीत. शिवाय त्यासाठी पैसे खर्च करायची इच्छाच लोकांमध्ये राहणार नाही.
नीतिमत्ता घसरायचे हे प्रमाण यापुढे वाढतच जाणार आहे व परिस्थिती आणखी आणखी गंभीरच होत जाणार आहे. यासाठी मूळ रोगावरच इलाज करायला लागेल. लोकांची भ्रष्ट झालेली बुद्धीच प्रथम स्थिर करायला लागेल. रोग सूक्ष्मातला असल्याने त्यासाठी करावयाचा उपायही सूक्ष्मातलाच असला पाहिजे. त्यामुळे यानंतरचा भगवंताचा अवतार सूक्ष्मातला असेल. त्यालाच त्यांनी “नामावतार” असे नाव दिले आहे.
(परत वर जा.) / अनुक्रमणिका
अवांतर ४
अद्वैत तत्त्वज्ञानाच्या पुनर्स्थापनेसाठी काशीच्या विद्वानांना शास्त्रार्थात हरवल्यावर आचार्य मिथिलेला गेले. तेथील विद्वान मंडन मिश्र यांचा आजूबाजूला खूपच दबदबा होता. त्यांचा अद्वैत तत्त्वज्ञानाला विरोध असल्याने त्यांना शास्त्रार्थात जिंकणे आवश्यक होते. त्यांना जिंकल्यावर त्यांच्या पत्नी भारतीने आचार्यांना आव्हान दिले.
“मी त्यांची अर्धांगी आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या पतिदेवांना हरवले असले तरी तो अर्धाच विजय आहे. जेव्हा तुम्ही मलाही हरवाल तेव्हांच तुम्ही पूर्ण विजय मिळवला असे म्हणता येईल.” या सौ.भारती यांच्या मुद्यावर आचार्यांना सहमती दाखवायला लागून त्यांनी सौ.भारती यांचे आव्हान स्वीकारले.
सौ.भारती या मोठ्या हुशार विदुषी होत्या. संन्याशाला काम कलेमध्ये काहीच गती नसते हे ओळखून त्यांनी त्यासंदर्भातच प्रश्न विचारायला सुरवात केली. मग मात्र आचार्यांनी काही काळासाठी मुदत मागून घेतली. ती मागणी विदुषी भारती यांनी मान्य केली.
आचार्य सूक्ष्म दृष्टीने विचार करू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की एक तरुण राजा अचानक मरून पडला असून त्याच्या अंत्यविधी वगैरेची अजून सुरवात झालेली नाही.
तात्काळ आचार्यांनी आपल्या शिष्यांना बोलावून मी काही काळासाठी देह सोडत आहे. यास्तव माझ्या पार्थिवाची कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगून त्यांनी त्यांचा देह सोडला व ते राजाच्या शरीरात प्रवेश करते झाले.
राजवाड्यात आनंदी आनंद झाला. तरुण राजाची पत्नी ही स्वरुपसुंदरी किंवा चंद्रमुखी असणे शक्य होते. आचार्यांनी राजाच्या शरीराद्वारे संसारातले सर्वश्रेष्ठ वैभव म्हणता येईल असे राजवैभव तसेच काम कलेचा अनुभव घेऊन पूर्ण ज्ञान प्राप्त केले. आवश्यक ती विद्या मिळाल्यावर आचार्यांनी राजाच्या देहाचा त्याग करून स्वत:च्या देहात प्रवेश केला.
यानंतर आचार्यांनी विदुषी भारती यांच्याशी शास्त्रार्थ परत सुरू केला. मात्र एका स्त्री समोर या विषयावर स्पष्ट बोलण्याऐवजी, त्यांनी या विषयातील आपले सगळे ज्ञान एका ग्रंथात लिहून काढले व तो ग्रंथ भारती स्वरस्वती यांना दिला आणि सांगितले की, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ग्रंथात मिळतील. सर्व ग्रंथ वाचून झाल्यावर सौ. भारती स्वरस्वती यांनी आपली हार मान्य केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या पतीसोबत आचार्यांचे शिष्यत्वही पत्करले.
परत वर जा / अनुक्रमणिका
अवांतर ५
माझ्या एका सृहुदाने एका पुस्तकातील पाचव्या श्लोकाचा अर्थ मला पाठवला. तो खाली दिला आहे. मला अर्थातच तो पटला नाही. त्याची कारणेही मी त्याला दिली. तीच परत येथे मांडत आहे.
अशा अनेक देवता आहेत की त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने उपासना कराव्या लागतात. त्यामुळे मी त्यांचा नादच सोडून दिला. अशा प्रकारे माझा सात आठ वर्षांचा वयाचा (८५ महिने. हे स्तोत्र आचार्यांचे आहे. आचार्यांचे आयुष्य ३२ वर्षांचे. त्यामुळे ८५ वर्षे असा अर्थ करता येत नाही. आचार्य इतरांचे प्रतिनिधित्व करीत असतील तर ८५ हा आकडा निरर्थक ठरतो.) काळ निघून गेला. अशा परिस्थितीत तू जर माझ्यावर कृपा केली नसतीस तर, हे गजाननाचे माते, निराधार असलेल्या मला कोणाला शरण जाता आले असते?
मला वरील अर्थ फारसा पटला नाही. कारण;
१. एखाद्या परिक्षेला बसायचे असेल तर आपण त्या परिक्षेचा अभ्यासक्रम बघतो. अभ्यासक्रम मोठा असेल तर काही भाग आपण ऑप्शनला टाकतो व त्या भागाच्या नादाला न लागता उरलेल्या अभ्यासक्रमावर जोर देतो. जर बाजूला काढलेल्या विषयांच्या भागावर प्रश्न विचारले गेले नाहीत तर आपण त्या परिक्षेत पहिलेही येऊ शकतो!!
पण असं काही आचार्यांनी केले आहे असे वाटत नाही.
२.एखाद्याचा मृत्यू झाला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, त्याचा त्या अगोदर जन्म झाला होता हे मान्य करावेच लागते. अन्यथा मृत्यू या संकल्पनेबद्दल कोणताच अर्थबोध होऊ शकणार नाही. त्यांनी श्लोकांत “परित्यक्ता” असा शब्द वापरला असल्याने प्रथम त्यांनी त्या पूजाविधी संपूर्णपणे ग्रहण केल्या होत्या व नंतर त्यांनी त्या त्यागल्या असे मानावे लागते.
३.साधारणत: लौकिकात एखादी विद्या शिकताना, आपण ग्रंथांचा आधार घेतो. माहिती मिळवतो व त्या आधारे आपले प्रभुत्व सिध्द करतो. त्यामुळे ग्रंथ ज्ञान देतात असे आपण म्हणतो.
पण हीच पद्धत अध्यात्मात वापरता येत नाही. ग्रंथांच्या वाचनामुळे कुतुहूल निर्माण होऊन एखादा मुमुक्षू बनू शकेल. किंवा एखाद्याला रस्ता कसा आक्रमायचा याचे मार्गदर्शन होऊ शकेल. पण प्रत्यक्ष रस्ता काटायचे काम ज्याचे त्यालाच करायला लागते.
अध्यात्मात ग्रंथ वाचनाने माहिती जरूर वाढेल. शब्दसंग्रह किंवा शब्दज्ञान जरूर वाढेल. पण अनुभव मिळणार नाही. अध्यात्म हा संपूर्णपणे जाणिवेचा प्रांत असल्याने तिथे अनुभवाला महत्व दिले जाते. जाणणे ही क्रिया इतकी सूक्ष्म आहे की, त्यातील प्रत्येक गोष्ट शब्दांनी सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे अनुभव नसणाऱ्या अशा माणसाला फारतर विद्वान किंवा पंडीत म्हणता येऊ शकेल. त्याच्या जिभेवर नाचणाऱ्या स्वरस्वतीमुळे त्याला मान देणे योग्य व आवश्यक असेल, इतकेच म्हणता येईल.
त्यावेळची निरनिराळी प्रस्थापित मतांतरे खोडून काढण्यासाठी आचार्यांना त्या मतांचे पुरस्कार करणाऱ्या सर्व अनुभवी श्रेष्ठींशी शास्त्रार्थ करायला लागलेला आहे व ते त्यात जिंकलेले आहेत. निव्वळ शब्दज्ञानावर किंवा वरवरच्या ज्ञानावर ते जिंकले असावेत असे समजणे योग्य होईल असे वाटत नाही.
थोडक्यात “परित्यक्ता” शब्द वापरून आचार्य हेच सुचवताहेत की, त्यांनी त्या विधींना प्रथम आत्मसात केलेले होते, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला होता, त्यातील गुह्य समजावून घेतलेले होते व त्यानंतर त्या विधींचा त्याग केला होता.
आचार्य अनुभवांनाच महत्व देत असणार याचे आणखी एक उदाहरण म्हणजे काम कला क्षेत्रात काही कळत नाही हे लक्षात आल्यावर शब्दप्रामाण्यावर व ग्रंथप्रामाण्यावर अवलंबून न राहता, त्यांनी परकाया प्रवेश करून प्रत्यक्ष अनुभव मिळवण्याचाच प्रत्यत्न केलेला दिसतो.
४. निरनिराळ्या उपासना करताना पथ्ये नियम पाळावे लागतात. काही पथ्ये व नियम तर आयुष्यभरही पाळावे लागतात. अन्यथा फळ मिळायच्या ऐवजी दोष मात्र माथी बसण्याची शक्यता असते. “परित्यक्ता” या शब्दातून आचार्यांना हे स्पष्ट करायचे आहे की, ते त्या सगळ्या बंधंनात अडकून पडलेले नाहीत. तर मुक्त झालेले आहेत. आणि तरीही कोणताही दोष लागण्याची भिती त्यांना शिवलेली नाही.
जे पूजाविधी मी सोडून दिले, त्या सर्व देवदेवतांपेक्षा आईची शक्ति मोठी आहे, हेच तर त्यांना यातून सांगायचे होते असेच वाटते. मुलाचे अपराध पोटात घेण्याची आईची कुवत किती मोठी आहे हे सर्वांच्या लक्षात यावे यासाठीच मोठे पोट असलेल्या विघ्नहर्ता गणपतीची आई असल्याचा उल्लेख ते करत आहेत. यातून त्यांना हेही साधायचे होते की, अयोग्य उपासना करणारे जे असतील ते न घाबरता त्या उपासना सोडून देऊ शकतील. त्या देवतांच्या तथाकथीत कोपाला घाबरणार नाहीत.
५. आचार्यांना अदैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करायचा होता. ते त्यांचे विहित कार्य होते. त्यासाठी त्या काळात अस्तित्वात असलेल्या उपासनांचा अभ्यास करणे हे त्यांचे कर्तव्यच होते. ते कर्तव्य त्यांनी खूप थोड्या वेळात पूर्ण केले असा थोडासा अर्थ मात्र मान्य करावा लागतो. साधारणत: ज्या कार्याला ८५ वर्षे लागू शकतात ते कार्य त्यांनी खूपच कमी काळात (८५ महिने ? माहित नाही) केले हे नक्की. याबाबत थोडासा खुलासा करणे आवश्यक आहे.
साधारणत: माणूस एखादी विद्या शिकायचा हेतू धरून विद्या शिकायला सुरवात करतो. हळूहळू त्यात तो आपली अपेक्षा घालतो. मग त्यात थोडासा आग्रहही घातला जातो. विरोध, स्पर्धा, अडथळ्यांवर मात करणे वगैरे सगळ्या टप्यांमधे त्याची शक्ति विभाजीत होत असते. जितक्या प्रमाणात या सगळ्यात गुंतण्याची शक्यता वाढते तेवढ्या प्रमाणात संपूर्ण प्राविण्य मिळवण्याचा कालावधी वाढत जात असतो. परत यांत तो नंतर इतका गुंततो की पुढचे आयुष्यभर किवा बराच कालावधी तो तेच करत राहतो.
मात्र आचार्यांसारखे लोकोत्तर पुरूष, लोककल्याणासाठी काम करत असतात. त्यांना स्वत:साठी काहीच मिळवायचे नसते. त्यामुळे त्यांची शक्ति कधीच विभागली जात नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत ते लवकर पारंगत होऊ शकतात. अंगीकृत कार्यात “ मी व माझे” ह्या दोन गोष्टींचा समावेश नसेल तरच असा अनुभव येण्याची शक्यता असते हेही यातून आचार्यांना सांगायचे आहे. पण तो गूढार्थ आहे.
इतकेच नव्हे तर ज्या साधनांना ८५ वर्षे लागू शकतील, त्या साधनेत गती प्राप्त झाल्यावर असे लोकोत्तर पुरुष गुंतून राहिलेले नसल्याने झटक्यात त्या कलेचा अथवा विद्येचा त्याग करू शकतात. हेही त्यांना सांगायचे आहे.
मला असे वाटते की, अद्वैत तत्वज्ञानाचे श्रेष्टत्व जगापुढे मांडणे, तसेच ही राजविद्या राजगुह्यं आहे, सर्व विद्यांमधे श्रेष्ठ आहे. कोणतेही दोष नाहिसे करण्याची ताकद या विद्येमधे आहे हे सगळे यातून स्पष्ट करण्याचा आचार्यांचा हेतू असावा असे वाटते.
६. काहीवेळेस तर असे वाटते की, आचार्यांसारखे लोकोत्तर पुरूष प्रत्येक श्वास लोककल्याणासाठी घेत असतात व विहित कार्य पूर्ण झाल्यावर आपला अवतार संपवतात. मरण येत नाहीये म्हणून शेवटच्या श्वासाची वाट बघत बसत नाहीत. त्यामुळे या श्लोकातील ८५ वर्षांचा उल्लेख आचार्यांनी जाणीवपूर्वक किंवा हेतूपुरस्सर केलाय की काय अशी शंका येते.
या श्लोकाकडे लोकांचे लक्ष वेधले जावे. या श्लोकाचा वरवरचा अर्थ काढण्यांत समाधान न लाभल्याने लोकांनी आणखी खोलांत जावे. त्यात काही गूढार्थ लपलाय का ते शोधण्याचा प्रयत्न करावा. वगैरे.
नक्की काय हेतू आचार्यांचा यामागे असावा हे सांगता येत नाही. आपण फक्त तर्क करू शकतो.
७ काहींचे म्हणणे आहे की, एक शंकर नावाचे आचार्य होऊन गेले. ते ८५ वर्षांपेक्षा जास्त जगले. त्यांचा हा श्लोक जगद्गुरूंच्या नावावर खपवला गेला आहे. असं जर कुणाला म्हणायचे असेल तर मात्र हा लेख त्यांच्यासाठीच लिहिला गेला नाही एवढंच म्हणता येईल. :)
परत वर जा / अनुक्रमणिका
अवांतर ६
काही जणांचे म्हणणे आहे की, हे स्तोत्र फार कडक आहे. हे स्तोत्र म्हणण्याचा नेम धरू नये. आता यावर काय बोलणार?
कोणतीही गोष्ट सकाम करताना, अडचणी ह्या येतच असतात. जेवढे आपले प्रारब्ध खडतर असते त्याप्रमाणांत आपण धरलेला नेम पाळताना अडचणी ह्या येणारच. इथे आपले प्रारब्ध व आपली उपासना यामधेच थेट लढाई असते. जो ताकदवान असतो तो जिंकणार असतो. मात्र उपाय सत्गुरुंनी सुचवलेला असेल तर जिंकण्याची शक्यता जास्त असते; कारण शिष्याला झेपेल अशीच साधना सत्गुरू नेहमी देत असतात. सकाम नेम करण्याच्या संदर्भात मी काही तज्ञ नाही. मी कधी सकाम उपासना केली नाही. त्यामुळे मला याबाबत जास्त काही लिहिता येणार नाही.
निष्काम कर्माला असे कोणतेच नियम, अटी लागू नसल्याने फारसे अडथळे येत असतील असे वाटत नाही. आणि समजा आलेच तर त्याचे त्याला फारसे वाईट वाटत असेल असेही मला वाटत नाही. बऱ्याच जणांना असे वाटते की, त्यांची उपासना सकाम नाही. पण त्यांच्या मनात कोठेतरी एक सुप्त इच्छा दडलेली असते की, आपल्याला नव्याने काही नको. फक्त आता जे काही आहे ते तसेच रहावे. किंवा नव्याने काही अडचणी येऊ नयेत. पण अशा प्रकारचा सुप्त हेतू सुध्दा आपली निष्काम उपासना सकाम उपासनेत रुपांतरीत करत असतो.
अवांतर ७
काहींना हे स्तोत्र नकारात्मक वाटते. एकाने मला शंका विचारली की, विवेकानंद म्हणतात की, तुम्ही स्वत:ला कमी समजू नका. असे असताना स्वत:ला अपराधी किंवा पापी समजत राहणे हे नकारात्मक दृष्टिकोनाचे आहे असे वाटत नाही का? ही शंका मला ही पूर्वी आलीली आहे. मी पण अशी स्तोत्रे टाळत असे. कदाचित एवढ्यामुळेही हे स्तोत्र कडक आहे, यास्तव सारखे सारखे म्हणू नका असा काही प्रवाद पडला असल्यास माहित नाही. आता मात्र माझे मत बदललेले आहे.
मी उत्तरादाखल एवढेच म्हणालो की, "आचार्य आपली चूक कबूल करताहेत. ते आपला पश्चाताप व्यक्त करत आहेत. ही चूक मी परत कधी करणार नाही असा निश्चय व्यक्त करत आहेत. आणखीन वरच्या स्थितीला जाण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. पण हे सगळे समजून घेतले नाही तर मात्र हे स्तोत्र नकारात्मक वाटू शकते.
प्रतिक्रिया
24 May 2020 - 10:49 pm | शाम भागवत
:)
24 May 2020 - 11:07 pm | Prajakta२१
मला आवडते हे स्तोत्र
नीट मन लावून हे स्तोत्र म्हणत असताना रडू येते हे चांगले आहे का?
बरयाचदा मन एकदम कोरडे करून म्हणण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी एक टिपूस येतोच
आत्ता पण गलबलल्यासारखे झालेय
तर रडू येऊ नये म्हणून काय करावे?
धन्यवाद
24 May 2020 - 11:29 pm | शाम भागवत
कोणतीही चांगली गोष्ट वाचली की, माझे डोळे तात्काळ भरून येतात. कधी तर धारा लागतात. तिथे मला परमेश्वराचे अस्तित्व जाणवते की काय कोणास ठाऊक?.
पण त्यावेळची मनस्थिती माझी खूप आनंददायी व हवीहवीशी असते, लोक काय म्हणतात किंवा हे योग्य का अयोग्य ह्याची चर्चा कोण करत बसताय?
मी मस्त पैकी डोळे पुसून, डोळे मिटून घेतो. (बहुधा डोळे अगोदरच मिटलेले असतात) व शांतपणे बसून राहतो. त्यावेळेस अगदी शांत शांत वाटते. मग थोड्या वेळाने पुढचे वाचू शकतो.
अंतःकरण शुध्द होत असल्याच्या या खुणा आहत असे मला वाटते.
_/\_
24 May 2020 - 11:31 pm | Prajakta२१
पु ले शु
25 May 2020 - 12:23 pm | चौथा कोनाडा
रडू येणे ही अतिहळव्या मनाचे लक्षण आहे !
स्तोत्रातले श्लोक, सिनेमातील विशिष्ट प्रसंग, काही ठराविक लोकांची भेट/दर्शन (उदा. बाबा बाप्पु, आई, अम्मा माताजी वै)
या कडे त्रयस्थ त्रटस्थ वृत्तीने पाहिले असता रडू येणे बंद होऊ शकते !
23 Jun 2020 - 8:09 am | शाम भागवत
"आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात."
जास्तीचे इथे वाचू शकाल.
http://misalpav.com/node/47066
24 May 2020 - 11:23 pm | कानडाऊ योगेशु
तुम्ही लिहिलेय म्हणुन माझेही कुतुहल जागे झाले. पण तुम्ही हा प्रश्न अनुत्तरितच ठेवला आहे. अर्थ जाणुन घ्यायची ही सगळी प्रक्रियाच आनंददायक असावी पण हे सर्व झाल्यावर तुम्हाला जे हुडकतो होतो ते सापडले हे फिलिंग आले का?
24 May 2020 - 11:25 pm | शाम भागवत
हो
24 May 2020 - 11:24 pm | मनो
श्लोक १ संबंधित हे आठवलं
"I know that I know nothing" is a saying derived from Plato's account of the Greek philosopher Socrates. It is also called the Socratic paradox. The phrase is not one that Socrates himself is ever recorded as saying.
This saying is also connected or conflated with the answer to a question Socrates or Chaerephon is said to have posed to the Pythia, the Oracle of Delphi, in which the oracle stated something to the effect of "Socrates is the wisest."
25 May 2020 - 7:50 am | मूकवाचक
_/\_
25 May 2020 - 10:17 am | कंजूस
स्तोत्र आणि आशय आणि उपयुक्तता याबद्दल कळत नाही.
शंकराचार्य नावाचे एक आचार्यपद होते. ज्यांना आपण कालडीच्या आठव्या शतकातल्या शंकराचार्यांना 'आद्य' संबोधतो त्याहीपेक्षा अगोदर ते पद होते असा इतिहासकारांचा कयास आहे.
'माझे वय पंच्याऐंशी' हे दुसऱ्या एका शंकराचार्यांचे असावे. चार पीठेसुद्धा अगोदर अस्तित्वात असावीत पण आद्य शंकराचार्यांनी त्यांसाठी तिथल्या राजांकडून अर्थ संपादन केले असावे. चारांपैकी श्रृंगेरी पीठात त्यांची आवडती शारदांबा, आणि शिव मंदिर आहे, तर द्वारका,पुरी , आणि बद्रीनाथास कृष्णावतार आहे.
भारतातल्या हिंदू, जैन, आणि बौद्ध या तीन मुख्य धर्मांत १) मृत्यु, २) मृत्युपश्चात जीवन ३) जन्माअगोदर कोण, ४)कर्माचे अस्तित्व आणि वहन, ५) विश्वोत्पत्ती आणि मुख्य ६) देव कल्पना यांवर तत्त्वज्ञान मांडले आहे.
कोणत्या पद्धतीवर श्रद्धा ठेवता ती नंयर आवडू लागते, पटू लागते, भले त्याची उकल होवो अथवा न होवो. कारण एकच - जीवाचा जन्म,मृत्यू आणि प्राक्तन अटळ आणि अगम्यच राहिले आहे.
---------
शास्त्रार्स्थ चर्चेत/ वादविवादात अमक्याने तमक्यास हरवले म्हणजे काय हेसुद्धा "बरे बाबा, तू म्हणतोस ते खरे, मी हरलो" म्हणत माघार घेणे असावे.
25 May 2020 - 12:14 pm | शाम भागवत
कंकाका,
तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडले त्याबद्दल धन्यवाद.
आपण जी काही उपासना करतो अथवा धारणा धरतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे. मग मात्र त्या माणसाला त्या मार्गावर राहण्या व्यतिरिक्त काही करावयाची जरूरी नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे.
गेली ३० वर्षे देवाचे नाव घेत राहिल्याने माझी वरीलप्रमाणे प्रगती होते आहे तसेच दोष कमी होत आहेत असा अनुभव येत असल्याने मी हा मार्ग धरला आहे. दुसरेही मार्ग असू शकतील यावर माझा विश्वास आहे त्यामुळे त्या दुसऱ्या मार्गांबद्दल मी सहानुभूती बाळगून आहे.
मला देवाचे नाव घ्यायला आवडते. ही आवड वाढत असेल तर मी खोलात जातो. अन्यथा चर्चेत भाग घेत नाही. शंकराचार्याचा इतिहास किंवा तुम्ही मांडलेले सहा मुद्दे वगैरे मधे मी रमू शकत नाही किंवा मला लक्षही द्यावेसे वाटत नाही. कारण त्यामुळे माझी आवड जोपासली जाईल असे वाटत नाही. त्या दृष्टिने पाहता मी स्वार्थी आहे असे म्हणता येईल.
जोपर्यंत मला माझ्या मार्गात अजून प्रगतीच्या संधी आहेत असे वाटत राहील, किंवा आपल्यात अजून दोष आहेत आणि ते घालवता येऊ शकतात असे वाटत राहील तोपर्यंत तरी जप किंवा नामस्मरण करत राहण्याचा इरादा आहे.
नामस्मरणाला आचार्यांनी महत्व दिलेले आहे असे लक्षात आले, म्हणून मी तिकडे ओढला गेलो. त्यावर विचार करू लागलो. या सगळ्यात जपाची माझी आवड वाढली, माझ्या मार्गावरची श्रध्दा दृढ झाली. मी मनापासून सांगतो, हे सगळे मला काहीतरी फायदा होतो आहे म्हणूनच करत होतो. लिहायला लागल्यावर आपल्या विचारात सुसुत्रता येते हे जाणवल्याने लिहीत राहिलो. नामस्मरणाच्या मार्गावरून चालणाऱ्या अन्यांनापण मदत व्हावी म्हणून येथे उतरवले. त्रुटी असतील तर कोणितरी त्या दाखवून देईल व माझे विचार आणखीन प्रगल्भ होतील हा त्यामागचा हेतू आहेच. इथेही माझा स्वार्थच मला कर्म करायला प्रवृत्त करतोय हे नक्की. त्यामुळेच मला कोणी स्वार्थी म्हटले तरी राग येत नाही.
पण त्याच बरोबर ह्या मार्गाने जाण्यात काही अर्थ नाही अस कोणी सांगायला लागला तर त्याला “बर“ असे म्हणून बाजूला व्हायचे असते हे आता माहीत झाले आहे. कारण माझा अनुभव मला त्याच्याशी सहमत होऊ देत नाही. तसेच माझाच मार्ग कसा बरोबर आहे हेही मी पटवत बसत नाही कारण माझी ती जबाबदारीच नाहीये.
:)
“शहाण्याने जगाला सुधरवण्याच्या फंदात पडू नये. जग सुधरवायला आलेली माणसे त्यासाठीच जन्माला आलेली असतात“ या गोंदवलेकर महाराजांच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास असल्याने ती सिमारेषा मी कधी ओलांडत नाही.
:)
_/\_
25 May 2020 - 12:30 pm | चौथा कोनाडा
ही विधाने आपण खालील तर्हेने मांडू शकतो काय ?
आपण जी काही कर्त्यव्ये करतो अथवा कामे करतो, त्याने सर्व प्राणीमात्रांप्रती तसेच निसर्गाप्रती आपल्यातली माणूसकी/ कृतज्ञतेचा भाव वाढत असेल, आपण कोणाला दुखवत नसू तर आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत असे समजावयाचे.
ही विधाने बरोबर असतीळ तर धार्मिकतेचे काय नुकसान होऊ शकते ?
25 May 2020 - 1:07 pm | शाम भागवत
हो मांडू शकता. बरोबरच आहे ते.
फक्त मला या पध्दतीने वागायला आवडते म्हणून मी तसे वागतो हा भाव पाहिजे. मी या पध्दतीने वागतो म्हणून मी कोणीतरी विशेष आहे असा अभिमान वाटला नाही पाहिजे. अन्यथा वादावादीला, भांडणाला वगैरेला सुरवात होते.
मी तरी हे पथ्य सांभाळतो आणि त्याचा मला खूप फायदा झालाय.
मात्र
यावर चर्चा केल्याने माझ्या नामस्मरणाच्या मार्गावरील वाटचालीला फायदा संभवत नसल्याने माझा पास.
_/\_
25 May 2020 - 1:22 pm | संजय क्षीरसागर
धार्मिकता म्हणजे व्यक्तिगत धारणा किंवा श्रद्धा.
वास्तविकात सर्व अस्तित्व एक आहे आणि ते अंतर्बाह्य पोकळ आहे. थोडक्यात, कुणाच्या आत कुणीही नाही.
तस्मात, आपण आनंदात असलो की आपल्या कोणत्याही कृत्यातून दुसर्याला दुखावण्याची शक्यता शून्य. त्यामुळे दुसरा दुखावला गेला की नाही यापेक्षा आपण आनंदी आहोत का हे पाहणं श्रेयस.
25 May 2020 - 11:58 am | मूकवाचक
आदि शंकराचार्यांविषयी अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असेल तर हे पुस्तक उपयुक्त आहे:
Book
25 May 2020 - 1:00 pm | संजय क्षीरसागर
लेखन आणि मांडणी सुसूत्र झाली आहे. तुमची मेहेनत कौतुकास्पद आहे.
माझ्या प्रतिसादांचा तुम्हाला उपयोग होण्याची शक्यता नाही कारण गेली ३ दशकं तुमचा जप चालू आहे. त्यामुळे प्रतिसाद अशांसाठी आहे ज्यांना या फंदाची व्यर्थता जाणून घ्यायची आहे आणि त्यात पडायचे नाही.
_____________________________________________
> "आचार्य आपली चूक कबूल करताहेत. ते आपला पश्चाताप व्यक्त करत आहेत. ही चूक मी परत कधी करणार नाही असा निश्चय व्यक्त करत आहेत. आणखीन वरच्या स्थितीला जाण्याचे त्यांचे हे प्रयत्न आहेत. पण हे सगळे समजून घेतले नाही तर मात्र हे स्तोत्र नकारात्मक वाटू शकते."
हा सगळ्या खटाटोपामागचा फंडा आहे,
__________________________________________
पण ते अयोग्य आहे कारण
१. देव ही मानवी कल्पना आहे. मानवाच्या मेंदूशिवाय इतर कुठेही त्या कल्पनेचं अस्तित्व नाही.
२. अशा काल्पनिक गोष्टीचं नाम न घेणं हा अपराध होत नाही. शिवाय मुळात देव हीच कल्पना आहे त्यामुळे नामाभिधान पण काल्पनिक आहे.
"जय शंभो" न म्हटल्यानं अफ्रिकनाला अपराध वाटणार नाही आणि "भंभो मोगँबो" न म्हटल्याचा आपल्याला पश्चात्ताप होणार नाही.
३. आदीम गोष्ट शांतता आहे, ती अनिर्मित आहे आणि तेच आपलं स्वरुप आहे.
४. जेवढा जप किंवा कोणत्याही ध्वनीचा नाद साधक करतो तेवढी शांतता हेच आपलं स्वरुप आहे हे समजण्याची शक्यता दुरावते.
५. त्यात पुन्हा जपाची भानगड अपराधभावाशी जोडली गेली तर साधकाला परतीचा मार्ग अशक्य होतो.
25 May 2020 - 1:08 pm | शाम भागवत
_/\_
25 May 2020 - 1:19 pm | प्रसाद गोडबोले
बरेच दिवसान्नी संक्षींना बॅटिन्ग करताना पाहुन मजा आली !
25 May 2020 - 1:54 pm | प्रसाद गोडबोले
सर्वप्रथम , श्याम भागवत जी , सादर नमस्कार वि.वि.
अतिषय सविस्तर आणि सुंदर लेखाबद्दम मनःपुर्वक धन्यवाद ! आचार्यांच्या अनेक स्तोत्रांपैकी हे एक अत्यंत आवडते स्तोत्र आहे . पांडुरंगाष्टक, आत्मषटक कौपीनपंचक ही उत्तम स्तोत्रे ! हरिमीडे आणि दक्षिणामुर्ती स्तोत्रे अजुनही डोक्यावरुन जातात , ( किन्व्वा त्यावर विचार करावा इतका वेळ अजुनतरी मिळालेला नाही . )
बाकी ह्यास्तोत्रातील कित्येक श्लोकांवर वाद विवाद करता येईल पण आता कोणत्याच प्रकारचे वादसंवाद करण्यात रस राहिलेला नाही. सर्वच जण समान अध्यात्मिक पातळीला किंव्वा बौधीक पातळीला नसतात. शिवाय लोकांचे ब्रिंगिग अप ही इतक्या भिन्न भिन्न पातळीला झालेले असते की अगदी समान बौधिक पातळी असली तरीही समान गोष्टींचा समान अनुभव उपभोगणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा आपण कोणालाच काहीच सांगण्याच्या फंडात न पडणे हेच उत्तम . आपण आपल्याला जो काही अर्थ लागेल त्यातुन जो काही अनुभव येईल त्याचा आनंद उपभोगु. ( अवांतरः हा प्रतिसाद ही त्याच प्रक्कारातला आहे. हे सारं स्वांतःसुखाय आहे , आपल्याला कोणालाच काहीच पटवुन द्यायचं नाहीये ! :) )
ह्या स्तोत्रातील "पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला:" हा श्लोक मला अत्यंत आवडतो, डोळ्यात पाणी ये कधी कधी . कधीकधी स्वतःच्या "विरल तरल" असण्याचा नाईव्ह असण्याचा रागही येतो , मानवर घेतलं तर चालु बनताही येईल , भौतिक जगात आज आहे त्यापेक्षा जास्त यश मिळवताही येईल , पण खरेच ते वर्थ आहे का असा प्रश्न डोक्यात फिरत रहातो. अशावेळी " आई ह्या लेकराचा त्याग करणं तुला शोभणारं नाही कारण एकवेळ पोरगं वाईट असु शकतं पण आई कशी वाईट असेल" हा श्लोक फार म्हणजे फारच करुण रसाचा अगदी अर्क काढल्यासारखा वाटतो.
आणि हा एक श्लोक फार अप्रतिम आहे "चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो".
ह्या श्लोकाचा अर्थ ज्ञनेश्वर माऊलींच्या अमृतानुभवातील काही श्लोकांसोबत वाचुन पाहिला की एकदम भारी वाटतं -
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।
किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।
सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
माया , शक्ती आहे ह्या विचारामुळे, कल्पनेमुळे आपण शिवत्वाचा अनुभव घेऊ शकतो , तो आनंद उपभोगु शकतो , इरव्ही अरुप अशा शिवा बद्दल काय बोलणार. आपण जे जगदीश वगैरे म्हणतो ते मायेमुळे, जर देवी, शक्ती, मायाच नसेल तर कसले आले जग अन कसले आले ईशत्व ! अहाहा !!
असो.
पुन्हःएकदा अप्रतिम लेखाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !
उपासकासी सुचना | उपासना उपासना ||
25 May 2020 - 2:47 pm | शाम भागवत
धन्यवाद.
_/\_
अमृतानुभवातील ओव्या पण आवडल्या.
खर आहे. यामुळे लोकांतात असूनही वाहून जायला होत नाही.
काहीतरी मिळवण्यासाठी सगळे जग धावत असते. पण मिळवण्यापेक्षा लाभणे महत्वाचे असते. लाभणार नसेल तर मिळवलेले त्रासदायक ठरण्याचीच शक्यता जास्त असते.
हे एकदा लक्षात आले की मग आपला हव्यास कमी कमीच होत जातो. आणि सगळे जीवन सोपे होऊन जाते.
पुन्हा एकदा धन्यवाद.
25 May 2020 - 3:18 pm | संजय क्षीरसागर
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।
किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।
केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
______________________________________
पहिल्या तीन ओळीतून काही मार्गदर्शक तत्व नसलं तरी चौथी ओळ दिशादर्शक म्हणता येईल
> केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें
___________________________________
माणसाचं सर्व जग त्याच्या मेंदूपलिकडे कुठेही नाही.
तस्मात, कोणताही एक ध्वनी (उदा. हंम् ऽऽऽ), डोळे मिटून, शांतपणे आणि एकसंधतेनं उच्चारला तर त्याने संपूर्ण मेंदू व्याप्त होतो. ते "केलें जगायेव्हढें लेणें" करायला पुरेसं आहे.
त्यानी ब्रेन सेल्सपण रिचार्ज होतात आणि यथावकाश शांततापण लाभते.
त्यासाठी कोणत्याही नामसाधनेची गरज नाही आणि अपराधभावाची तर बिल्कुल नाही.
25 May 2020 - 3:59 pm | कंजूस
शाम भागवत, संक्षी आणि प्रगो?/मार्कस ओरेलिअस तिघांचीही विषय मांडणी संयमित आणि सुसुत्र असते. मला आवडते.
बाकी कुणी एखादे तत्त्वज्ञान किंवा नित्यनियम गेली बरीच वर्षे आचरणात ठेवले असतील तर 'त्रुटी' वगैरेंचा अजिबात करू नये.
25 May 2020 - 5:12 pm | शाम भागवत
इथे त्रुटी म्हणजे लेखातील त्रुटी असा अर्थ अभिप्रेत आहे. लेखातील त्या त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल असे मला म्हणायचे आहे.
नामस्मरणातील त्रुटी कोणीतरी लक्षात आणून देईल यासाठी मी लेख लिहिलेलाच नाही. :)
कारण ज्याला जपाचा अनुभव नाही तो जप कसा काम करतो हे जाणूच शकणार नाही.
झानेश्वर माउली तर म्हणतात की,
तेथिल प्रमाण नेणवे वेदांसी।
तें जीवजंतूंसी केवी कळे ॥॥
25 May 2020 - 5:25 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही फक्त एका गोष्टीचं उत्तर शोधा
शांतता ही अनिर्मित स्थिती की नाम हा मानव निर्मित टिपी !
नक्की काय साधायचंय ?
25 May 2020 - 5:31 pm | शाम भागवत
मला जरूर वाटत नाही.
तस्मात पास.
:)
25 May 2020 - 5:47 pm | संजय क्षीरसागर
फार वेळ चालू शकत नाही. कारण मग तुम्ही केलेल्या लेखन सायासाचा कुणालाही उपयोग होणार नाही.
पब्लिक फोरमवर जेंव्हा आपण व्यक्त होतो तेंव्हा एकतर आपल्याकडे संबंधित विषयाची सर्व उत्तरं हवीत.
किंवा मग उत्तर नाही असं सांगायचा प्रामाणिकपणा हवा.
25 May 2020 - 6:06 pm | शाम भागवत
अहो, नामस्मरणाची महती सांगण्यासाठी मी लेख लिहिलेलाच नाहीये. आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन.
पण नामस्मरणांत काही अर्थ नाहीये हे तुम्हाला मांडायचे आहे. ती तुमची जरूरी आहे. ती तुम्ही मांडत रहा. मी कुठे हरकत घेतलीय. नामस्मरणाने लोकांचे नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करताय अशी माझी समजूत आहे. जालावरचे लोक सूज्ञ आहेत. काय घ्यायचे व काय नाही हे ठरवायला ते सक्षम असताना त्यांची काळजी मी का करू. मी तरी माझे लेखन त्यांना फायद्याचे ठरेल किंवा नाही याबाबत कोणतेही विधान करू इच्छीत नाही.
थोडक्यांत नामस्मरणाचा कसा उपयोग नाही हे मांडण्याचा तुमचा अजेंडा आहे. तुम्ही तुमचे विचार मांडत रहा. मी वाचत राहीन. तुमचे विचार वाचायला मला तरी काही प्राॅब्लेम नाही.
_/\_
25 May 2020 - 5:12 pm | प्रचेतस
आचार्यांची स्तोत्रे विलक्षण लयबद्ध असतात म्हणून खूप आवडतात.
आपला लेखही अतिशय आवडला.
25 May 2020 - 5:14 pm | शाम भागवत
धन्यवाद.
_/\_
25 May 2020 - 7:58 pm | संजय क्षीरसागर
> आचार्याच्या स्तोत्रातून नामाची महती गायली जातीय असा माझ्या लेखनाचा विषय आहे. आचार्य तसं काहीही करत नाही आहे हा मुद्दा तुम्हाला मांडायचा असेल तर तो विषयाला धरून होईल. मी पण उत्तर द्यायला बांधील असेन.
या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ?
27 May 2020 - 10:29 am | संजय क्षीरसागर
> या स्त्रोतातले तुमचे तीन अत्यंत आवडते श्लोक आणि त्यांचा अर्थ इथे कॉपी पेस्ट कराल का ?
कारण यावरून ३ गोष्टी स्पष्ट होतील
१. ज्या देवीकडे क्षमायाचना केली जातेयं ती मुळात आहे का ? थोडक्यात, साधकाच्या कल्पनेपालिकडे तिला अस्तित्व आहे का ?
२. नाम न घेतल्यानं नक्की काय अपराध झालायं?
३. अपराधाचं क्षमापन देवी नक्की केंव्हा आणि कसं करते ?
तुमचा प्रतिसाद या मार्गावर चालणाऱ्यांना उपयोगी होईल किंवा मग तो मार्ग सोडून मुक्तपणे जगायला उपयोगी होईल.
29 May 2020 - 11:15 am | शाम भागवत
कोणाला तरी उपयोग होईल किंवा कोणाला तरी वाचवता येईल हा तुमचा अजेंडा आहे. तो तुम्ही स्वबळावर पूर्ण करावा.
या स्तोत्राबद्दल मला जे वाटते ते मी लिहिले आहे. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही लिहा. वाचक सूज्ञ आहेत. त्यांना जे काही पाहिजे असेल तेवढे ते घेतीलच.
तुमचे सर्व विचार हे नेहमीच वस्तुनिष्ठ असतात हे मिपावर जगजाहीर आहे हे मला कालच खरडपट्टीवर कळलेले असल्याने, तुम्ही काही लिहिले की त्यावर काहीही लिहावयाचे नसते हे आता माझ्या लक्षात आलेले आहे. यास्तव, तुमच्यासाठी हा शेवटचा प्रतिसाद.
_/\_
7 Jun 2020 - 8:04 am | Jayant Naik
तुमचे विवेचन मनाला खूप भावले. मुळात शंकराचार्य हे ब्रम्ह फक्त सत्य आहे आणि सारे जग मिथ्या आहे असे म्हणणारे . पण शेवटी शेवटी ते सुद्धा भज गोविन्दम ..मूढ मते असे लिहून गेले आहेत. आणि या स्तोत्रात तर त्यांनी मातेची आळवणी अतिशय आर्त पणे केली आहे. तुम्ही ते अतिशय सुंदर प्रकारे उलगडून दाखवले आहे. आपले अतिशय आभार. भज गोविन्दम वर सुद्धा काही लिहिता आले तर अवश्य लिहा.
7 Jun 2020 - 1:05 pm | शाम भागवत
धन्यवाद.
_/\_
24 Jun 2020 - 7:57 am | पर्णिका
सुरेख लेख... श्लोकांचा अर्थ समजल्यामुळे स्तोत्र वाचायला छान वाटते.