लॉकडाऊन : एकोणचाळीसावा दिवस

आजी's picture
आजी in काथ्याकूट
2 May 2020 - 9:10 am
गाभा: 

मार्चचा पहिला आठवडा. आमचं घरच्या नातेवाईकांचं पुण्यात एक गेट टु गेदर झालं. त्यावेळी कोरोना व्हायरसची अगदी थोडी थोडी चर्चा होती.

दहा तारखेला मी मार्च महिन्यासाठी किराणा भरला. त्यावेळी फोनवरुन ऑर्डर दिली. सामान निर्विघ्नपणे घरी आलं. अगदी नेहमीप्रमाणे. पण त्यानंतर मात्र कोरोनाची चर्चा हळुहळू वाढत गेली. केरळमधे कोरोनाचा एक रुग्ण सापडला होताच,आता पुण्यात, मुंबईतही अगदी एखाददुसरे का होईनात पण रुग्ण सापडू लागले.

आधी चीनमधे आणि मग इटलीत अचानक त्याहूनही जास्त वेगाने संख्या खूपच वाढलीय अशा बातम्या येऊ लागल्या. पण तरीही आपला भारत यापासून लांब आहे. आपण काही कोरोनाच्या तावडीत सापडणार नाही, असा ठाम दिलासा वाटत होता. पण मग मात्र संकट गहिरं होत गेलं. मला वाटतं २० मार्चला पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं. २२ मार्चला एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपण सगळ्यांनी तो पाळला. संध्याकाळी पाच वाजता थाळीवादन,टाळ्यावादन केलं. त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या. नंतर २४ मार्चला रात्री आणखी एक घोषणा आणि काही तासांत पंचवीस तारखेला पूर्ण देशातच लॉकडाऊन झालं.

त्याआधी आईशपथ मी लॉकडाऊन हा शब्द ऐकलेला नव्हता. देश चक्क बंद झाला. कर्फ्यू लागला.रेल्वे वगैरे बंद होणे हे कल्पनेपलीकडचं होतं. सर्व दुकानं,मॉल्स,शॉपिंग कॉम्प्लेक्सेस बंद झाली. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहिल्या.

तर .. २५ मार्च हा लॉकडाऊनचा पहिला दिवस होता.. लोकल्स बंद, बसेस बंद, रेल्वे बंद, विमान सेवा बंद. संकट आणखी गहिरं, आणखी गहिरं होतच गेलं.

घरी राहा,सुरक्षित राहा हा मंत्र दिला गेला. वृद्धांना सर्वाधिक धोक्याचा इशारा. मी तर कॉलनीत फिरणंही बंद केलं. "सोशल डिस्टन्सिंग" हाही पूर्वी न ऐकलेला शब्द. बाहेर जाऊ नका. गेलात तरी कोणत्याही व्यक्तिपासून तीन मीटर अंतर ठेवा. शेकहँड नाही, गळाभेट तर नाहीच नाही. कुणाच्या घरी जाऊ नका, कुणाला घरी बोलावू नका. गावाच्या, जिल्ह्याच्या सीमा सीलबंद. हॉटेलिंग नाही, सिनेमा नाही , नाटक नाही, लायब्ररी सुद्धा नाही. टीव्ही हा म्हातारपणी एकमेव सोबती. पण टीव्हीवर मालिकांचे पुढचे भागही नाहीत. कारण शूटिंग्ज बंद. टीव्हीवर लागणाऱ्या जुन्या मालिका आत्ताच्या काळात अपील होत नाहीत. मग दिवसभर करायचं काय? वेळ कसा घालवायचा? घरची पुरुषमाणसं दाढ्या,मिशा , केस वाढवून घरातूनच कामं करायला लागली. पोरं झूम, स्काईपवर शिकायला लागली. घरातलं काम वाढलं. पाच एप्रिल आला. रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सगळ्या देशानं आपापल्या बाल्कनीत दिवे लावले. एक सकारात्मक संदेश सगळ्या देशात नव्हे सगळ्या जगात गेला. भारत एकजुटीनं कोरोनाशी लढतोय हे सगळ्या जगानं पाहिलं. एक दिवस गद्गगदून आलं. त्यावरुनही पुन्हा उलटसुलट चर्चा झडल्या. टीव्हीवर पॅनेलिस्ट लोक कचाकचा भांडले. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कंटाळा सुरु झाला.

पंधरा एप्रिल आला. पहिला लॉकडाऊन संपणार होता. आता लॉकडाऊन उठेल असं वाटत होतं, पण त्याचवेळी कोरोनारुग्णांचा देशातला आणि महाराष्ट्रातला वाढता आकडा बघून तो लॉकडाऊन वाढणार अशीही खात्री होती. त्याप्रमाणे तो पंधरा एप्रिल ते तीन मे पर्यंत वाढलाच.

आता त्यालाही खूप दिवस झाले. पहिला,मग दुसरा ,मग तिसरा,मग चवथा असे दिवस उलटताहेत. कितवा दिवस ,किती दिवस गेले तेही आठवत नाहीये. दिवस उजाडतोय,दिवस मावळतोय. कालच्यासारखाच आजचा दिवस. कसलाही फरक नाही. मन बधीर झालंय. हातपाय मोकळे असूनही कुणीतरी ते बांधून ठेवलेत असं वाटतंय. एक अदृश्य बंधन आपल्याला करकचून आवळतंय, असा फील येतोय. एक उदासी,बेचैनी मनाला घेरुन टाकतेय. कितीही पॉझिटिव्ह राहायचं ठरवलं तरी निगेटिव्ह विचारच मनात येताहेत. वाटतंय,किती दिवस आपण असं लॉकडाऊनमधे राहणार?
याआधी फार पूर्वी इन्फ्ल्युएंझाची,प्लेगची साथ भारतात आली होती. तेव्हा खूपच बळी गेले. अलिकडच्या काळात बर्ड फ्ल्यू,स्वाईन फ्ल्यूच्या साथीही येऊन गेल्या त्यातही जुन्या साथीपेक्षा काहीसे कमी असतील पण बळी गेलेच. आता या साथीनेही भरपूर विनाश करायला सुरुवात केलीय. जीव आणि अर्थव्यवस्था सर्वच बाबतीत. आता झालं याहून फार अधिक किंवा सावरता येणार नाही इतकं नुकसान न करता हीही साथ एकदाची निघून जाऊ दे.

एखाद्या बोगद्यातून प्रवास करावा आणि बोगद्याच्या पलिकडचं प्रकाशवर्तुळ दिसूच नये तसं झालंय. कितीही पॉझिटिव्ह राहावं म्हटलं तरी कठीण आहे, आणि ही सत्य परिस्थिती आहे.

प्रतिक्रिया

एखाद्या बोगद्यातून प्रवास करावा आणि बोगद्याच्या पलिकडचं प्रकाशवर्तुळ दिसूच नये तसं झालंय. कितीही पॉझिटिव्ह राहावं म्हटलं तरी कठीण आहे, आणि ही सत्य परिस्थिती आहे.

चांगले लिहिले आहे..
लिहीत रहा.. वाचत आहे..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

2 May 2020 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर

लस तयार होत नाही तोवर हे अनिश्चितेचे वातावरण असणार आहे ग आजे.रामायण संपून उत्तर रामायण चालू झाले आहे.. "उत्तमोत्तम ग्रंथ वाचा,दुर्मिळ चित्रपट पहा असे सल्ले दिले जात आहेत.. परवापासुन लॉक्डाउन अनेक राज्यांत शिथिल होणार आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2020 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडलं. ''कितीही पॉझिटिव्ह राहावं म्हटलं तरी कठीण आहे, आणि ही सत्य परिस्थिती आहे'' अगदी खरंय.

आता घरात कोंडून घेण्याचीही हाइट झालीय. आपण घरी बसतोय तरी रुग्णसंख्या वाढतेच आहे.

आजी आज तर सकाळपासून खुपच आळसावलोय. येतोच थोड्या वेळाने नव्या उत्साहाने.

आजी लिहिते राहा. काळजी घ्या बाहेर पडू नका.

-दिलीप बिरुटे

एवढंपण निराश नका होऊ हो आजी.
यापूर्वी याहीपेक्षा भयंकर साथी आल्या आणि गेल्या. पण मानवजात टिकून आहे आणि बहरलीही आहे.
लॉकडाउनने कितीतरी सकारात्मक गोष्टी शिकवल्या. ब्रिटिश छाप गुलामगिरी न करता घरूनही काम करता येते. शॉपिंग, मॉल्स, धार्मिक उत्सव याशिवाय ही छान जगता येते. प्रदूषणातून सुटका, एकमेकांप्रति स्नेह आणि मदतीची भावना. खूप चांगल्या गोष्टी दिल्यात लॉकडाउनने.
आणि हाही लवकरच संपणार आहे, धीर धरा आणि घरी राहणं एंजॉय करा !

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट... स्नेहांकिता, तुमचा प्रतिसाद वाचून तसंच काहीसं वाटलं (आजींना sorry म्हणून..).
एक खरं आहे लॉकडाऊन मधला सुरुवातीचा थरार, नव्हाळी संपून आता उरलाय तो वैताग अशी भावना बहुतेकांची सध्या आहे. घरून काम करण्यातली नवलाईही नव्याच्या नऊ दिवासंसारखी सरली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातच ही परिस्थिती 'न भूतो' अशी आहे. 'न भविष्यती' अशी देखील असो अशी अशा करू या. 'This shall also pass...' हा मंत्र सर्वजण जपू या... सकारात्मक विचार आणि मन रमवण्याचे, वेळ घालवण्याचे वेगवेगळे उपाय शोधणे हा एक मार्ग आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2020 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रिटिश छाप गुलामगिरी न करता घरूनही काम करता येते.

घरुन काम आज जरी चांगले वाटत असले तरी त्यात असंख्य धोकेही दडलेले आहेत.
सविस्तर प्रतिसादासाठी जागेवर रुमाल टाकून ठेवतो. किंवा भविष्यात कधीही प्रतिसाद लिहिण्यासाठी
हा धागा जागा उकरुन काढायचे अधिकार राखून ठेवले आहेत. ;)

-दिलीप बिरुटे

सविस्तर प्रतिसादासाठी जागेवर रुमाल टाकून ठेवतो. किंवा भविष्यात कधीही प्रतिसाद लिहिण्यासाठी
हा धागा जागा उकरुन काढायचे अधिकार राखून ठेवले आहेत. ;)

जुने प्रा डॉ परत आssss ले.. !

जुने मिपा परत आssss ले .. !

प्रशांत's picture

2 May 2020 - 5:17 pm | प्रशांत

लॉकडाऊनमुळे जुने प्रा डॉ भेटले असं म्हणायचे का?

सस्नेह's picture

2 May 2020 - 1:07 pm | सस्नेह

मा. प्रा. डॉ सर,
आज आपल्याला भांडायची हुक्की आलेली दिसते.
तरी णम्रपणे णमूद करत आहे की हा रॉंग नंबर आहे.
प्रचेतस सर यांचा प्रतिसाद खाली आहे.
कधीच न भांडणारी
स्नेहा

प्रशांत's picture

2 May 2020 - 5:19 pm | प्रशांत

आज आपल्याला भांडायची हुक्की आलेली दिसते.

हे काय?

अभ्यास वाढवायला पाहिजे (मला).

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2020 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज आपल्याला भांडायची हुक्की आलेली दिसते.

आजीच्या धाग्यावर शीस्तीत राहतो, इकडे कोणाशीच भांडण नाय करता येत.

प्रचेतस सर यांचा प्रतिसाद खाली आहे.

वल्लीसेठला ऑफिसकाम आहे आज-सूत्र

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

2 May 2020 - 1:28 pm | चौथा कोनाडा

जागेवर रुमाल टाकून ठेवतो.

प्रा डॉ सर, हा तो रुमाल नाहीय जो बाहेर जाताना मास्क म्हणून वापरता.
नै, काळजी घ्यायला हवी म्हणून विचारलं :-)

Prajakta२१'s picture

2 May 2020 - 10:46 pm | Prajakta२१

दोन्ही बाजूंशी सहमत

ज्यांच्याकडे नेट ची प्रॉपर (नीट स्पीड ने चालणारी )सुविधा,PC ला बॅकअप ,फॅमिली सपोर्ट सिस्टिम आहे त्यांना वर्क फ्रॉम होम
वरदान आहे
संसारी बायका आणि ज्यांची लहान मुले आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम ही कटकट वाटू शकते
ह्यात घरी काम करावेसे न वाटणे (lack ऑफ मोटिवेशन),घरी कोणी इतर बाबी बघणारे नसणे (lack ऑफ सपोर्ट ),वीज आणि नेट चे issues
असे अनेक फॅक्टर आहेत
सध्या माझ्याच टीम मध्ये जेन्टस ना तांत्रिक सोडून काहीच अडचणी येत नाहीत तेच लेडीज ना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो
घरी असल्यावर लेडीज चा फोकस फॅमिलीवर असतो त्यामुळे काम दुसऱ्या प्रेफरन्स वर येऊ शकते जे ऑफिस मध्ये असताना होत नाही
अजून बरेच काही लिहिता येईल पण जाऊदे आता एवढेच
ज्यांचे ऑफिस आणि फॅमिली असे दोन कप्पे (कंपार्टमेंट) इतके दिवस व्यवस्थित करून ठेवले होते त्यांना अवघड जाऊ शकते

तसेच जे सिंगल्स एकेकटे राहत आहेत त्यांना घराकडे पण लक्ष द्यावे लागते तुम्ही ज्या भागात राहत आहात तो पण एक फॅक्टर आहे
कोथरूड भागातील वर्क फ्रॉम होम आणि कसबा पेठेतील वर्क फ्रॉम होम ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे
(कसबा पेठेत उगीचच लोकांवर लक्ष ठेवून मजा बघणारे लोक आहेत कोथरूड मध्ये पण आहेत पण डिग्री जरा कमी )

चौथा कोनाडा's picture

2 May 2020 - 11:51 am | चौथा कोनाडा

बरोबर लिहिलंय, आजी ! अवघड होऊन बसलंय सगळं !
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था !

घरची पुरुषमाणसं घरातूनच कामं करायला लागली. पोरं झूम, स्काईपवर शिकायला लागली. घरातलं काम वाढलं.

आगामी काळाची पावले, परफेक्ट वर्णन !

Nitin Palkar's picture

2 May 2020 - 12:01 pm | Nitin Palkar

आजी, तुमचं लेखन नेहमीच आवडतं, स्नेहांकिता यांच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देताना मूळ लेखाला प्रतिसाद द्यायचा राहून गेला. सध्या आपण प्रवास करत असलेला हा बोगदा वळणा वळणांचा असला तर कुठे तरी तो नक्की संपेल... लिहित रहा.
_/\_

मनापासून केलेलं लेखन आवडलं. सगळीकडे काहीशी हीच परिस्थिती आहे आता. हेही दिवस जातील. घरी राहा, सुरक्षित राहा.

प्रशांत's picture

2 May 2020 - 5:20 pm | प्रशांत

लॉकडाऊनचे परिणाम चक्क वल्लीशी शमत

कंजूस's picture

2 May 2020 - 1:41 pm | कंजूस

वा आजी वा!

चौकटराजा's picture

2 May 2020 - 2:43 pm | चौकटराजा

आतापर्यंत अनेक साथी आल्या तरी मानव जात नष्ट झाली नाही ! हा इतिहास आहे .डॉन ब्रॅडमनचे २९ शतकांचा विक्रम मोडला जाणे शक्य नाही असे माझया वडिलांची पिढी ठामपणे म्हणत असे कारण गावस्कर ३० वे शतकी करीपर्यंत तोच तर पूर्वानुभव होता. खरे तर १९२० नंतर आता यात मानव जातीने विषाणू विज्ञांनात फार प्रगती केली आहे ! पण जो जीवविज्ञानाचा अभ्यासक नाही त्त्याला हे माहीत नसते की विषाणू ही स्वतः: एक प्रभावी प्रयोग शाळा आहे. त्याला मानवी जीवना सारख्या त्याच्या उत्पादनाचा दोन दोन वर्ष चाचण्या घ्याव्या लागत नाहीत. सबबी साध्या " सर्दी" या रोगावर देखील मानव विजय मिळवू शकलेला नाही. सूर्य उद्या उगवेलच असं आपण म्हणतो कारण मानव बरेच निष्कर्ष पूर्वानुभव व संख्याशास्त्र याना धरून घेत असतो . हे सर्व तीन चार महिन्यात आटपेल असे त्या पिढीला वाटते जिने ६ वर्षे चाललेले दुसरे महायुद्ध अनुभवलेले नाही. तेंव्हा या पिढीचा पुर्वानुभव तीन महिन्याचे होरायझन च गृहीत धरत आहे. प्रत्यक्ष असे असेल का ? लस जे निर्माण करताहेत त्यांना देखील याचा अंदाज नाही . पुन्हा याठिकाणी पूर्वानुभव असा सांगतो की की २४ महिने लागतील .आपण हे असले जग फक्त २०१२ सारख्या आपत्ती पटात पाहत आलो आहे .त्यांत काहीतरी घडते व शेवटी टाळ्या एकमेकांना मिठ्या ई. पण ती सुखांत कथा माणसाने मागणी अनुसार लिहिलेली असते. इथे मागणी सुखांत कथेचीच आहे पण ती लिहिणारा निसर्ग फार अगम्य आहे !

वामन देशमुख's picture

4 May 2020 - 10:18 am | वामन देशमुख

इथे मागणी सुखांत कथेचीच आहे पण ती लिहिणारा निसर्ग फार अगम्य आहे !

_/\_

Prajakta२१'s picture

2 May 2020 - 3:33 pm | Prajakta२१

इथे मागणी सुखांत कथेचीच आहे पण ती लिहिणारा निसर्ग फार अगम्य आहे ! >>>>>>>>>>>>>हे पटले
चांगला लेख

शेखरमोघे's picture

2 May 2020 - 8:09 pm | शेखरमोघे

लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे. लेखात (तसेच त्यावरच्या अनेक प्रतिसादात) अनेक वेगवेगळ्या विचाराना आणि कल्पनाना चालना मिळत आहे.

बोगदा आणि (अजून न दिसणारा) प्रकाश किरणः काही वेळा काही न करण्यातूनच अचानक आपल्यातल्या सुप्त गुणान्चा शोध लागतो. माझा एक ८०+ वयाचा एक मित्र काही काळापूर्वी काही कारणाने "अन्थरूणबद्ध" होता. आधी पाठीला मोठा तक्क्या, मग खाण्यापिण्या-औषधान्करता सदैव समोर छोटे टेबल असा सरन्जाम गोळा करत, टेबल समोर आहेच तर चाळा म्हणून लिहीत आता बर्‍याच नियमित कविता करतो आहे - मित्रमन्डळीत कौतुक तर होतेच पण इतरानाही त्यान्च्या आजारीपणात " काहीतरी करावेसे वाटणे" याची स्फूर्ती मिळून जाते. माझ्या ओळखीचा एक तरूण जुलै-ऑगस्ट २०२० अमेरिकेत उच्च शिक्षणाकरता जाणार म्हणून जानेवारीपासून स्वैपाकाचे प्राथमिक धडे distance learningने (आईकडून) घेऊ लागला - मार्च एप्रिल मध्ये सक्तीच्या स्वावलम्बनातून आता छान पोळ्यान्पासून अनेक पदार्थ करत आता"पूर्ण पणे तयार" असे आईचे प्रशस्तीपत्रक मिळवून गेला.

ब्रिटिश छाप गुलामी: आणखीही काही गुलामीचे नमुने बघितले आहेत. एका मोठ्या MNC मधला एक "भारत मुख्य" त्याच्या इतर देशात असलेल्या वरिष्ठान्शी बोलण्याकरता म्हणून सन्ध्याकाळी उशिरापर्यन्त थाम्बत असे आणि म्हणून इतर सगळ्यानीच त्याला जी माहिती (कदाचित) लागू शकेल ती मिळवून देण्याकरता ताटकळत, त्याचे आटपेपर्यन्त थाम्बून रहावे ही त्याची अपेक्षा असे आणि अर्थातच ती सदैव पाळली जावी याची वेगवेगळ्या प्रकारे वारन्वार आठवण करून दिली जात असे. आणखी एका मोठ्या (भारतातील एका विशिष्ट समाजाच्या मालकीच्या) जागतिक उद्योग समूहातल्या वरिष्ठाना जो कोणी त्या "मालक कुटुम्बातील" वयस्क माणूस समोर येईल त्याला अगदी सगळ्यानीच वाकून, पायाला स्पर्श करून नमस्कार करावा ही अपेक्षा असे. त्यामुळे कुठल्याही व्यावसायिक कामाला सुरवात होण्याच्या आधी "पाया लागू" करण्याकरता चक्क रान्ग देखील लागे.

आता "कोरोनाचा कहार" आटपल्यानन्तरचे जग कसे असेल यावर बरेच विचार सुरू झाले असेल. ते जग वेगळे तर नक्केच असेल, पण त्या वेगळेपणातही टिकून रहाण्याची ज्यान्ची क्षमता पुरेशा वेळात तयार झाली नसेल ते मागे पडून विसरले जातील - पण डार्विनचा सिद्धान्त पुन्हा एकदा खरा ठरेल.

चौकटराजा's picture

3 May 2020 - 9:06 am | चौकटराजा

माणूस पूर्वनुभव व संख्याशास्त्र यावर अवलम्बून राहून भविष्य वर्तवीत आलेला आहे. सिंगापूर विद्यापीठाने आलेला डेटा वापरून असे वर्तविले आहे की,,, जागतिल पातळीवर ९७ टक्के साथ ३० मे ला आटोक्यात येईल तर १०० टक्के २ डिसेम्बर. भारताचे हेच अन्दाज अनुक्रमे २६ मे व ४ ऑगस्ट असे आहेत.

मित्रहो's picture

3 May 2020 - 10:20 am | मित्रहो

लॉकडाऊन हळूहळू कमी होईल. बस, ट्रेन, विमान प्रवास मात्र इतक्यात सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. तीच गोष्ट मॉल, सिनेमा, नाटक, गाण्याचे कार्यक्रम, धार्मिक समारंभ याची आहे. करोना बर्‍याच लांबच्या मुक्कामाने आलेला आहे. तो जायचा नाही. आपलयाला करोना सोबत जगणे शिकावे लागनार आहे. मग कधीतरी औषध येईल, मग लस येईल. करोना लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. या काळातत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले असेल.

Sanjay Uwach's picture

3 May 2020 - 10:21 pm | Sanjay Uwach

आजी, तुम्ही अलिकडे खूप कंटाळून जात अहात. लॉक डाऊन चालू झाला, कंटाळ आला.मी निवृत्त झाले कंटाळा आला. तुम्ही सुंदर लिहू शकता, शुध्द लेखनाची तुम्हाला चांगली जाण आहे. मग कंटाळा घालवायला आणखीन काय पाहिजे.
कवी.विं. दा. करंदीकरान च्या दोन ओळी तुमच्या साठी
चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ll माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

वामन देशमुख's picture

4 May 2020 - 10:22 am | वामन देशमुख

आजी, इतकेही निगेटिव विचार मनात आणू नका.

अश्या साथी, महायुद्धे वगैरे तात्पुरत्या असतात; जरी त्या दीर्घकालीन परिणाम करून जातात तरी ते परिणाम पॉझिटिवच असतात!

गणेशा-लिहित राहा,वाचत आहे.या तुमच्या अभिप्रायामुळे हुरुप आला.

माईसाहेब कुरसुंदीकर-लॉकडाऊन शिथिल होत आहे ,ही आनंदाचीच बातमी आहे .नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.-"आजी लिहिते राहा.बाहेर पडू नका.काळजी घ्या"ह्या तुमच्या शब्दांनी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवल्या.थँक्यू.

स्नेहांकिता-धीर धरा. निराश होऊ नका. घरी। राहणं एन्जॉय करा."स्नेहांकिता, ही पाहा,मी निराशा झटकून टाकली.

प्राजक्ता-सविस्तर अभिप्रायासाठी धन्यवाद.

कोनाडा-माझ्याशी तुम्ही सहमत आहात. एक टाळी तो बनती है बॉस!

नितीन पालकर-"बोगदा नक्की संपेल" तुमच्या या वाक्यानं उमेद आली.

प्रचेतस-"हेही दिवस जातील."तुमचा आशावाद उत्साह देऊन गेला.

प्रशांत आणि कंजूस-धन्यवाद.

चौकट राजा-सविस्तर आणि तुमच्या परिपक्व मनाची ग्वाही देणारा अभिप्राय. बरे वाटले.आशादायक.

शेखर मोघे-डार्विनचा सिद्धांत पुन्हा एकदा खरा ठरेल ." हे तुमचे विधान पटले.

चौकट राजा-मे महिन्यात कोरोना आटोक्यात येईल , हा आशावाद मनाला धीर देऊन गेला. धन्यवाद.

मित्रहो-भविष्यात कोरोनामुळे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघालं असेल " हे तुमचे म्हणणे खरे आहे.

संजय उवाच-मी कंटाळून गेलेय ,असं तुम्हाला वाटतंय ना? लेख लिहिताना तसं खरंच होतं. पण आता मी सावरलंय. मी स्वीकारलंय सगळं.

वामन देशमुख-"आजी,निगेटिव्ह विचार मनात आणू नका."हे मला सांगण्यामागची तुमची कळकळ समजली.धन्यवाद.

ह्या सगळ्या अभिप्रायात बिरुटे,गवि,स्नेहांकिता,नितीन पालकर यांची एकमेकांत चर्चा वाचून मजा आली. कॅरी ऑन मित्रों.

Prajakta२१'s picture

6 May 2020 - 9:58 pm | Prajakta२१

आजी धन्यवाद
आपली ह्या विषयावर मते वाचावयास आवडतील

Nupur Padekar's picture

7 May 2020 - 12:33 am | Nupur Padekar

आजी आपन् निरश हो नका.हे हि दिवस जातील. सुखा दुखाच्या लपंडावात माणुस होरपळून जातो.आणि कित्येक रोग आले कित्येक गेलेत आज आपण खूप प्रगत झालेलो आहोत. निश्चितच थोडा वेळ लागेल ह्यातून सावरायला. तोपर्यत जीवाचं रान करून जीवाची काळजी घेऊया