लॉकडाऊन : एकोणचाळीसावा दिवस
मार्चचा पहिला आठवडा. आमचं घरच्या नातेवाईकांचं पुण्यात एक गेट टु गेदर झालं. त्यावेळी कोरोना व्हायरसची अगदी थोडी थोडी चर्चा होती.
दहा तारखेला मी मार्च महिन्यासाठी किराणा भरला. त्यावेळी फोनवरुन ऑर्डर दिली. सामान निर्विघ्नपणे घरी आलं. अगदी नेहमीप्रमाणे. पण त्यानंतर मात्र कोरोनाची चर्चा हळुहळू वाढत गेली. केरळमधे कोरोनाचा एक रुग्ण सापडला होताच,आता पुण्यात, मुंबईतही अगदी एखाददुसरे का होईनात पण रुग्ण सापडू लागले.
आधी चीनमधे आणि मग इटलीत अचानक त्याहूनही जास्त वेगाने संख्या खूपच वाढलीय अशा बातम्या येऊ लागल्या. पण तरीही आपला भारत यापासून लांब आहे. आपण काही कोरोनाच्या तावडीत सापडणार नाही, असा ठाम दिलासा वाटत होता. पण मग मात्र संकट गहिरं होत गेलं. मला वाटतं २० मार्चला पंतप्रधान मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं. २२ मार्चला एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपण सगळ्यांनी तो पाळला. संध्याकाळी पाच वाजता थाळीवादन,टाळ्यावादन केलं. त्यावर उलटसुलट चर्चा झाल्या. नंतर २४ मार्चला रात्री आणखी एक घोषणा आणि काही तासांत पंचवीस तारखेला पूर्ण देशातच लॉकडाऊन झालं.
त्याआधी आईशपथ मी लॉकडाऊन हा शब्द ऐकलेला नव्हता. देश चक्क बंद झाला. कर्फ्यू लागला.रेल्वे वगैरे बंद होणे हे कल्पनेपलीकडचं होतं. सर्व दुकानं,मॉल्स,शॉपिंग कॉम्प्लेक्सेस बंद झाली. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहिल्या.
तर .. २५ मार्च हा लॉकडाऊनचा पहिला दिवस होता.. लोकल्स बंद, बसेस बंद, रेल्वे बंद, विमान सेवा बंद. संकट आणखी गहिरं, आणखी गहिरं होतच गेलं.
घरी राहा,सुरक्षित राहा हा मंत्र दिला गेला. वृद्धांना सर्वाधिक धोक्याचा इशारा. मी तर कॉलनीत फिरणंही बंद केलं. "सोशल डिस्टन्सिंग" हाही पूर्वी न ऐकलेला शब्द. बाहेर जाऊ नका. गेलात तरी कोणत्याही व्यक्तिपासून तीन मीटर अंतर ठेवा. शेकहँड नाही, गळाभेट तर नाहीच नाही. कुणाच्या घरी जाऊ नका, कुणाला घरी बोलावू नका. गावाच्या, जिल्ह्याच्या सीमा सीलबंद. हॉटेलिंग नाही, सिनेमा नाही , नाटक नाही, लायब्ररी सुद्धा नाही. टीव्ही हा म्हातारपणी एकमेव सोबती. पण टीव्हीवर मालिकांचे पुढचे भागही नाहीत. कारण शूटिंग्ज बंद. टीव्हीवर लागणाऱ्या जुन्या मालिका आत्ताच्या काळात अपील होत नाहीत. मग दिवसभर करायचं काय? वेळ कसा घालवायचा? घरची पुरुषमाणसं दाढ्या,मिशा , केस वाढवून घरातूनच कामं करायला लागली. पोरं झूम, स्काईपवर शिकायला लागली. घरातलं काम वाढलं. पाच एप्रिल आला. रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सगळ्या देशानं आपापल्या बाल्कनीत दिवे लावले. एक सकारात्मक संदेश सगळ्या देशात नव्हे सगळ्या जगात गेला. भारत एकजुटीनं कोरोनाशी लढतोय हे सगळ्या जगानं पाहिलं. एक दिवस गद्गगदून आलं. त्यावरुनही पुन्हा उलटसुलट चर्चा झडल्या. टीव्हीवर पॅनेलिस्ट लोक कचाकचा भांडले. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कंटाळा सुरु झाला.
पंधरा एप्रिल आला. पहिला लॉकडाऊन संपणार होता. आता लॉकडाऊन उठेल असं वाटत होतं, पण त्याचवेळी कोरोनारुग्णांचा देशातला आणि महाराष्ट्रातला वाढता आकडा बघून तो लॉकडाऊन वाढणार अशीही खात्री होती. त्याप्रमाणे तो पंधरा एप्रिल ते तीन मे पर्यंत वाढलाच.
आता त्यालाही खूप दिवस झाले. पहिला,मग दुसरा ,मग तिसरा,मग चवथा असे दिवस उलटताहेत. कितवा दिवस ,किती दिवस गेले तेही आठवत नाहीये. दिवस उजाडतोय,दिवस मावळतोय. कालच्यासारखाच आजचा दिवस. कसलाही फरक नाही. मन बधीर झालंय. हातपाय मोकळे असूनही कुणीतरी ते बांधून ठेवलेत असं वाटतंय. एक अदृश्य बंधन आपल्याला करकचून आवळतंय, असा फील येतोय. एक उदासी,बेचैनी मनाला घेरुन टाकतेय. कितीही पॉझिटिव्ह राहायचं ठरवलं तरी निगेटिव्ह विचारच मनात येताहेत. वाटतंय,किती दिवस आपण असं लॉकडाऊनमधे राहणार?
याआधी फार पूर्वी इन्फ्ल्युएंझाची,प्लेगची साथ भारतात आली होती. तेव्हा खूपच बळी गेले. अलिकडच्या काळात बर्ड फ्ल्यू,स्वाईन फ्ल्यूच्या साथीही येऊन गेल्या त्यातही जुन्या साथीपेक्षा काहीसे कमी असतील पण बळी गेलेच. आता या साथीनेही भरपूर विनाश करायला सुरुवात केलीय. जीव आणि अर्थव्यवस्था सर्वच बाबतीत. आता झालं याहून फार अधिक किंवा सावरता येणार नाही इतकं नुकसान न करता हीही साथ एकदाची निघून जाऊ दे.
एखाद्या बोगद्यातून प्रवास करावा आणि बोगद्याच्या पलिकडचं प्रकाशवर्तुळ दिसूच नये तसं झालंय. कितीही पॉझिटिव्ह राहावं म्हटलं तरी कठीण आहे, आणि ही सत्य परिस्थिती आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एखाद्या बोगद्यातून प्रवास
लस
छान!
एवढंपण निराश नका होऊ हो आजी.
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट...
घरुन काम...
सविस्तर प्रतिसादासाठी जागेवर
लॉकडाऊन मुळे
मा. प्रा. डॉ सर,
अभ्यास वाढवायला
नो नाय नेव्हर
जागेवर रुमाल टाकून ठेवतो.
दोन्ही बाजूंशी सहमत
बरोबर लिहिलंय, आजी ! अवघड
लेखन आवडलं.
मनापासून केलेलं लेखन आवडलं.
+१
वा आजी वा!
पूर्वानुभव व भविष्यकाळ
निसर्ग फार अगम्य
हे पटले
लेख नक्कीच विचार करायला
अनुमान ..
करोना आणि लॉकडाऊन
आजी, तुम्ही अलिकडे खूप
दीर्घकालीन परिणाम
गणेशा-लिहित राहा,वाचत आहे.या
धन्यवाद
खुप छान लिहिले आहे.