हिरवाईच्या गप्पा - भाग २

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in कृषी
29 Sep 2017 - 10:21 pm

हिरवाईच्या गप्पा - भाग १

हिरवाईच्या गप्पा - भाग १ बराच मोठा झाल्याने हा दुसरा भाग सुरू करत आहे.

काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे मिरचीला नवीन फुलोरा सुरु झाला आहे. वर्षभर फुले येणे चालूच असते पण मधूनच एकदम अशी भरपूर फुले येतात...

पिवळी जास्वंदही बहरली आहे...

दोन आठवड्यांपूर्वी लावलेल्या पुदिन्याच्या काड्यांनाही छान फुटवा फुट्ला आहे...

हे वरचे सगळे मी काही दिवसांपूर्वी खरडफळ्यावर टाकले होते. पण निसर्गाला बहुतेक हे सगळे पाहवले नाही. आज दुपारी विजांच्या गडगडाटासकट पावसाने चांगलेच झोडपले. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. टेरेसवरची गरीबबिचारी फुलझाडे अश्या निसर्गापुढे किस झाडकी पत्ती ! त्यांच्या पडझडीचे फोटो काढू शकलो नाही. नेहमी ताठ मानेने सूर्याकडे पाहत असलेली जास्वंदीची फुले निसर्गाच्या कोपापुढे मान खाली खालून जमिनीकडे पाहत होती. तरीही, त्यांच्यावर जमलेल्या पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकवित ती लक्ष वेधून घेत होती...

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

30 Sep 2017 - 6:17 am | पिलीयन रायडर

काका, पहिले तीन फोटो दिसले. पण शेवटचे दोन दिसत नाहीत.
चला नवा धागा सुरु झाला. माझी शेती जरा मागे पडलीये. भरपूर गडबडीत आहे सध्या. पण तरीही मला मुगाचे लांब लांब मोड काढून पहायचेत. चायनीज लोक वापरतात तसे. फारच छान लागतात ते. कोरीयन पदार्थात दिसतात.
(साधारणपणे मुगाला आपण १-२ दिवसात मोड काढून वापरतो. ह्यात ६ दिवस ठेवायचे आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2017 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता दिसतात का ?

चिनी मंडळी मुगाचे स्प्राऊट्स वापरतात व कोरियन सोयाबीनचे.

इथे एक झटपट स्प्राऊट पाकृ मिळेल.

दसर्‍यासाठी घरची झेंडूची फुले...

पिलीयन रायडर's picture

30 Sep 2017 - 6:57 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम फोटो आहे काका!!

सोयाबीनचे असतात का ते?! ओके! मी काल एक कोरियन बाईचा व्हिडीओ पहिला. ती म्हणे की माझी आजी सोयाबीनचे करायची. पण तिने मुगाचेच दाखवले. मी जे खाल्ले ते कोणते होते काय माहिती...

पाकृ साठी धन्स!

योगविवेक's picture

22 Dec 2019 - 4:56 pm | योगविवेक

जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गोल गोबऱ्या झेंडूचे ढीगच्याढीग पाहून या नाजुक जातीच्या झेंडूच्या आठवणी गुदमरून गेल्या होत्या. त्या जाग्या झाल्या. धन्यवाद.

कंजूस's picture

2 Oct 2017 - 5:35 am | कंजूस

फोटो आवडले.
जपानी लोक मिरिन,साके आणि मुगाचे मोड वापरून सॅलड करतात

आमच्या कारल्याच्या वेलाला कारली लागली आहेत. एक कारलं मोठं झालं होतं, पण त्याला कीड लागली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2017 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो टाका फोटो... "एस" आणि फोटो नाही म्हणजे घोर फाऊल ! ;)

फोटो काढायला कारली मोठी होऊ द्यावीत म्हणून थांबलो होतो. पण कारली मोठी होईनात. गळून पडतात. अधिक शोध घेता बोटभर लांबीची होताच कारली किडत आहेत असे दिसले. काय करता येईल? रासायनिक कीडनाशक फवारण्याचा इरादा नाही. नाहीतर मग हा वेल काढून टाकेन. तसाही आपोआप, मुद्दाम न लावता आला आहे तो.

१) परागीभवन झालेलं नसल्यास २) मुळांशी पाणी तुंबणे ३)वेल वाढताना अगोदर ओला कचरा तळाशी टाकावा. ही कारणे आहेत का पाहा.
क्र १ साठी ब्रशने पुकेसर फुलावर दुपारी बाराच्या आत पसरवा.
हल्ली नपाकडून डासांसाठी धूर मारण्यात येतो त्याने चांगले किटकमात्र मरतात.
( चांगल्या पोसल्या गेलेल्या वेलाची पाने काळसर हिरवी दिसतात.)

कारली लागतात, पण मोठी व्हायच्या आधीच कीड पडतेय.

फळमाशी असते ती फुलातच अंडी घालते. घराच्या भाजीपाल्यावर फवारा मारण्यापेक्षा बाहेरचीच भाजी बरी नाही का?
१५ फेब्रुवारी/महाशिवरात्रीनंतरचे वेल वाढवावेत - उन्हाळी भाज्या. यावेळी कीड फार कमी पडते.

ओके. मग हा वेल काढून टाकतो. नेक्ष्ट टैम.

मनिमौ's picture

27 Oct 2017 - 2:22 pm | मनिमौ

फवारा.

तंबाखू अर्क बनवला होता एकदा. चांगली किलोभर तंबाखू आणली विकत. एका मोठ्या अंघोळीच्या पातेल्यात पाणी उकळायला लावून त्यात तंबाखू खळखळून उकळवली. पण नंतर त्या पातेल्याचा वास जाईना! ;-) मग परत बनवला नाही. :-D

त्या पातेल्यात पुदीना लावा.

रामपुरी's picture

28 Oct 2017 - 2:29 am | रामपुरी

मग पुदिन्याचा वास कसा घालवणार? :)

कपिलमुनी's picture

27 Oct 2017 - 2:24 pm | कपिलमुनी

माझ्या गॅलरीसमोर ११ माळ्यांच्या इमारतीचे काम चालू आहे त्याची सीमेंतची धूळ गॅलरीमधे येते आणि त्यामुळे झाडे मरत आहेत अगदी तुळससुद्धा टिकत नाही.
दिवसातून ३ वेळा तुषार सिन्चनाचा प्रयोग करून पाने धुण्याचा कार्यक्रम केला पण उप्योग झाला नाही. नेट बसवले तरी धूळ आत येते आणि प्लाटिक टकला तर वारा, उजेड अडतो आहे.

काय करावे ?

काचा लावल्या तर वारा अडतो पण धुळ बंद होते. झाडे येतात.

कपिलमुनी's picture

1 Nov 2017 - 5:37 pm | कपिलमुनी

गॅलरीला काचा लवून बन्द करणे महापालिकेच्या नियमाच्य विरुद्ध आहे.

कंजूस's picture

2 Nov 2017 - 9:52 pm | कंजूस

टॅक्स वाढवत असतील.

एकूण पाच बोन्सायची माती बदलणे, रूट ट्रिमिंग आणि फॉलिएज ट्रिमिंग ही कामे केली. त्यातले एक फिग ट्रीचे रुट्स ओव्हर रॉक पद्धतीचे बोन्साय आणि एक वडाचे बोन्साय आता छान ट्रेन झाल्यासारखी वाटत आहेत. अजून दोनेक वर्षांनी पहिल्याचे फॉलिएज डेरेदार बनेल आणि दुसऱ्याच्या पारंब्या अजून येतील. सध्या साताठ पारंब्या आल्या आहेत. जरा दोनेक महिन्यांनी पाने चांगली फुटली की फोटो टाकतो.

अनिंद्य's picture

3 Apr 2018 - 11:21 am | अनिंद्य

५ -५ बोन्साय !
You are a rich man!

हाहाहा! निसर्गाशी मैत्री हीच खरी श्रीमंती. (स्वगत : शाळेत फळ्यावर आजचा सुविचार म्हणून खपून जाईल. ;-) )

हिरवाईचे अपडेट्स:
मावा (पांढरा, काळा, आणिक कसला कसला...) फारच त्रास देत असल्याने सर्व मिरच्या, सर्व कढीपत्ता, सर्व जास्वंदी, आणि काही इतर झाडे इ. काढून टाकले. घरचा भाजीपाला बंद. सोनचाफा वेड्यागत बहरतो आणि त्याच्या सुवासाने आपल्यालाही वेड लावतो. मागे आमच्याकडे डबल डिलाईट म्हणून गुलाबाचा एक प्रकार होता. अशक्य सुंदर रंग आणि अप्रतिम सुगंध. पण नंतर का कुणास ठाऊक, सुकून गेला. फुलपाखरांना अंडी घालण्याकरिता तगर ठेवले आहेत. त्याच्या पानांचा फडशा पाडून नंतर कोशात गुरफटून घेणारा सुरवंट पाहिला. पण कोष उसवून फुलपाखरू केव्हा उडून गेले कळाले नाही.

बोन्साय: रुट्स ओव्हर रॉक फायकस बोन्साय माझ्या अतिउत्साहीपणामुळे अर्धमेला झाला होता. रुटिंग हार्मोन म्हणून दालचिनी पावडर लावली, तर वरचा भागच जळून गेला. आता खाली बऱ्याच फांद्या फुटल्या आहेत. पण आधी माझ्या मनात असलेला आकार आता ह्या झाडाला देता येणार नाही. आणि ह्यातल्या कुठल्या फांद्या किती ठेवाव्यात, कापाव्यात, कसं ट्रेन करावं ह्याची एकच एक अशी कल्पना डोळ्यांसमोर येत नाहीये. पाहू. आणखी दोन वर्षे नो छाटणी. फायकसच्याच एका कटिंगपासून राफ्ट प्रकारची प्री-बोन्साय उगवली आहेत. त्यांना छान ट्रेन केले तर इंटरेस्टिंग कंपोझिशन होईल.

चिंचेचे दोन प्री-बोन्साय छान इंग्रजी एस शेपमध्ये वाढवले आहेत. आणखी काही वर्षे फक्त नेबारी (पृष्ठभागावर दिसणारी मुळे) आणि सॅक्रीफिशिअल ब्रांचेसच्या साहाय्याने खोडाचे टेपर (निमुळता भाग) वाढवणे हेच करणार आहे. हे बोन्साय एक छान बनेल नंतर. चिंचेचीच अजून काही रोपे वाढत आहेत. काही एक्स्पोज्ड रुट्स तर काही तिरपी बोन्साय बनवणार.

वडाच्या बोन्सायपैकी एकाची एक फांदी पाहणाऱ्याकडे येत असल्याचे जाणवले. ती छाटून टाकली. अजून मनासारखे डेरेदारपण नाही आलेले. दुसऱ्या वडाच्या बोन्सायची पाने छान लहान लहान येऊ लागली आहेत. आता अजून काही फांद्या आणि पारंब्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठी दमट हवामान हवे. पुण्यात कृत्रिमपणे निर्माण करणे जरा खर्चिक आणि जागा खाऊ काम आहे (स्प्रिंकलर इ.).

एक जुनिपर आणलंय. ते नक्की जुनिपर आहे की सायप्रेस हे समजत नाहीये. पण आत्तापासूनच ट्रेनिंगला चांगला प्रतिसाद देऊ लागले आहे. त्याचे फॉर्मल प्रकारचे बोन्साय बनवणार. ही स्टाईल बनवायला सर्वात अवघड मानली जाते. बघूयात.

बोन्साय टीप: सदाहरित कोनीय प्रकारचे बोन्साय लवकर म्हणजे दहा-पंधरा वर्षांत तयार होतात; तर पानगळीच्या झाडांना त्यावरक्षा दुप्पट ते तिप्पट काळ लागू शकतो.

चिमण्यांसाठी लावलेल्या कृत्रिम घरट्यांवर त्या खुश आहेत. बर्ड फीडर आणि वॉटरहोल बनवायचे होते, पण इथे बोक्यांचा उपद्रव होतो पक्ष्यांना. तेव्हा ह्या गोष्टी उंचावर सुरक्षितपणे लावणे महत्त्वाचे आहे. हे काम ह्या आठवड्यात संपवेन शक्यतो.

आणि हो, 'हिने' वेलदोड्याच्या बिया पेरल्या आहेत. उगवताहेत का ते बघू. म्हणे तुमच्यापेक्षा माझा हात जास्त हिरवा आहे. आमच्या कुटुंबाला ही बोन्सायची झाडे फारशी रुचत नाहीत. केवळ वर्षातून एकदा फेऱ्या मारायला माझी वडाची झाडे उपयोगी पडतात म्हणून टिकली आहेत. ;-)

बाकी मंडळी, काय म्हणतेय तुमची हिरवाई?

अनिंद्य's picture

25 Apr 2020 - 8:13 pm | अनिंद्य

सुमारे दोन वर्षांनी अपडेट ! पण बोन्सायचे आहे म्हटल्यावर योग्यच :-)

वडाचा पारंब्या असलेला बोन्साय is a sight to behold. बोन्सायचे फ़ोटू डकव हे श्रीमंत माणसा !

माझी वर्षभर रुसलेली बाग आता थोडी गोडीत येतेय. चित्रे डकवतो लवकरच.

जालिम लोशन's picture

26 Apr 2020 - 12:07 am | जालिम लोशन

निसर्गाशी मैत्रि हीच खरी श्रीमंती, दोनचार शशक वाचल्या आणी विकृतीची किळस आली, मिॅॅपावरुन कायमच लाॅगआऊट होण्याचे ठरवले, बाकी झाडेतर आता पुर्ण बहरात आहे, कडुनिंबापासुन सोनचाफ्यापर्यंत.

बांधकामामुळे सध्या आठ दहा कुंड्यातील सगळी झाडे मरगळली आहेत. तुळस आणि पाम मेली. पण ब्रह्मकमळ , झिपरे आणि दोन तीन शोभेची झाडे आता पुन्हा फुटू लागलीयेत. मोगऱ्यालाही फुटवे आले आहेत. फुले लागुदेत मग फोटू टाकते.

गच्चीवरील बागेत मिरच्या आणि गोकर्णची फुले लागलेली आहेत. नंतर फोटू टाकतो.
२०० लिटर वेस्ट डिकांपोजर द्रावण तयार केले आहे. कुणाला हवे असल्यास घेऊन जाणे.

निनाद's picture

7 Sep 2020 - 5:50 am | निनाद

मिरच्या यावेळी जोरदार आल्या. खरं तर एका लाल मिरच्यांच्या पाकीटातल्या तळाची जमा झालेल्या मिरचीच्या बिया होत्या त्याच टाकल्या होत्या. त्यातली ५ झाडे प्रमुख जगली. त्याला सुमारे किलोभर मिरच्या आल्या असतील साधारण चार माहिन्याच्या काळात. लिंबाचे झाड मागे जिबात फळे धरत नव्हते. पण लिंबाला यावेळी चांगली फळे धरली आहेत.

कंजूस's picture

7 Sep 2020 - 7:21 am | कंजूस

कारली लावा.

निनाद's picture

8 Sep 2020 - 4:54 am | निनाद

कारल्याच्या बिया येथे मिळेनात. अन्यथा नक्कीच माझ्या यादीत आहे. आता पातीचा कांदा लावणार आहे आणि थोडी अजून पालक लावायचा विचार आहे. टॉमॅटो च्या झाडावर आलेला टॉमॅटो तसाच जमीनीत मिसळून टाकला आहे. पाहू या. झाडे येतात का.
पुदिना जरा कमी केला. बेफाट वाढला होता. अर्थात त्याच्या मुळ्या फार लांबवर घुसत जातात. आणि हा नष्ट व्हायला फार अवघड असतो. त्यामुळे कुंडीतच असायला हवा होता. असो.

असे लिंबू लागले आहेत सध्या

घरीच भाजी करायला आणलेलं कारलं एखाद वेळेस पिकलेलं निघालं की तेच लावायचं बी. चांगला येतो वेल. माझ्याकडे तसाच आला आहे. आता दोन तीन कारलीसुद्धा लागली आहेत.

पांढरं कमळ ( कृष्णकमळाचा एक प्रकार).मार्चमध्ये चिककमगळूर येथे स्टेशनच्याबाहेर वेल होता. फळंही होती बोराएवढी. त्यात दहाबारा बिया होत्या. सर्व रुजले. फुल दीड इंचाचे आहे. सहाला उमलते आणि तीन तासाने मावळते. चमेलीसारखा सुगंध आहे. वेल मात्र रानटी दिसतो. पण सक्सेस. आता ओगस्टपासून फुले येऊ लागली, फळेही धरली लगेच.

निनाद's picture

8 Sep 2020 - 5:21 am | निनाद

फुले खूप सुंदर पण याला आटोक्यात ठेवा - फार भयंकर पसरतो. जमीनीच्या खालून मुळ्या फार दूरवर जात राहतात.

कंजूस's picture

8 Sep 2020 - 11:53 am | कंजूस

हो.
आटोक
यातच राहील कारण बाटलीत आहे.

निनाद's picture

9 Sep 2020 - 5:16 am | निनाद

चवळी आणि हरभरे भिजत घातले आहेत. थोडे मोड आले की लावणार आहे. मागे उसळ करताना दोन खाली पडलेले हरभरे एका कुंडीत लावले होते. तर त्या झाडांना एकशे दहा हरभरे आले होत! (मुलीने मोजले, तीला खुप मजा वाटत होती की इतके हरभरे एका बी मधून मिळाले!)

पंचमढीला सहलीसाठी गेलो होतो तेव्हा तेथील हॉटेलच्या बागेतून फुलझाडाचे एक कंद आणून लावले होते. त्यापासून तयार झालेल्या रोपाला तब्बल तीन वर्षांनंतर पहिले फुल आले आहे. वाट बघावी लागली पण रोप व फुल दोन्ही फारच छान दिसताहेत.
याचे मराठी नाव कोणी सांगेल काय?

पंचमढीला सहलीसाठी गेलो होतो तेव्हा तेथील हॉटेलच्या बागेतून फुलझाडाचे एक कंद आणून लावले होते. त्यापासून तयार झालेल्या रोपाला तब्बल तीन वर्षांनंतर पहिले फुल आले आहे. वाट बघावी लागली पण रोप व फुल दोन्ही फारच छान दिसताहेत.
याचे मराठी नाव कोणी सांगेल काय?