पुज्य सकाळी कामे आवरून नित्यनेमाने शिरस्ता बाहेर पडलो. आजकालच्या जमान्यात पत्रकारांना काडीची म्हणून किंमत राहिली नाही. पण जिवनावश्यक, अत्यावश्यक, चौथा स्तंभ वगैरे संबोधून नमोजींनी आम्हांला अशा स्मशानवैराग्याच्या दिवसांत पण बाहेर जाण्यास भाग पाडीले. मौजे बाभुळगाव येथील 'जनता कर्फ्यू' नामक ऐतिहासिक दिनाचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही सायकलवर टांग टाकली.
आखिरकार दोन डोंगर उतरून, पायवाटेने प्रसंगी सायकल उचलून आम्ही त्या दिडदमडीच्या गावात पोहोचलो. उन्हातान्हात रापून तहान लागली होती. सर्वत्र सामसूम होती. या आडवळणाच्या गावात होटेल नावाचे काही असावे का, याचा काही तपास लागला नाही. गाव कसले, आठ दहा घरांची वस्तीच ती. दुकान वाटण्याजोगे पत्र्याचे एक शेड दिसले. तेही बंद होते. गरीब बिचारं एक कुत्रं तिथं एका फाळक्यावर मस्त ताणून झोपले होते.
दुसऱ्या एका फाळक्यावर बसून मी आजूबाजूचा परिसर न्याहळू लागलो. पण कुत्र्याला ते आवडले नसावे. शुभ्र पांढऱ्या रंगाचे 'मोत्या' किंवा तत्सम नाव असणारे ते आकर्षक कुत्रे भलतेच फैलावर आले. आम्ही पुरते टरकून गेलो. पण अचानक कुठूनतरी एक दगड सणकत येऊन त्याच्या फेकाटात बसला तेव्हा कुठे ते शेपूट योग्य ठिकाणी घालून पळून गेले.
"कोण रे तू फाटक्या, हितं कशाला आलाय मरायला?" एक दांडगा म्हातारा हातातली काठी पारजत ढांगा टाकतंच पुढे येऊन ठापला.
"पत्रकार आहे मी, शहरातून आलोय, बातमी घ्यायला.... पण आता निघतोच आहे.. लगेच" ती काठी कुठे कशी बसेल या विचारात आम्ही महत्वपूर्ण माहिती पुरवली.
"आस्सं आसं... ए बंटे पाणी घीऊन यी... टिवीवाले आलेत... आप्पास्नीबी बुलीव..." म्हातारा फळकुटावर बसत म्हणाला.
"टिव्हीवाले नाही, वर्तमानपत्र. 'बळीराजा टाईम्स'.." आमच्याकडे दाखवण्यासाठी ओळखपत्र वगैरे काही नव्हते.
मग तांब्याभर पाणी आले. ते आप्पा नामक अजूनच वयस्कर गृहस्थ आले. गेलाबाजार बंटी नामक आकर्षक तरूण मुलगी तिथेच थांबल्याने माहोल एकप्रकारे खुला झाला.
"मग कधी यायच्याती ईमायनं?" वयस्कर आप्पाने अतिशय गंभीरपणे तोंड उघडलं. हा म्हातारा असला काही बाऊन्सर टाकेल असं वाटलंच नव्हंतं.
"ईमायनं..? अहो युद्ध नाही सुरु झालं. त्या कोरोना व्हायरसमुळे कर्फ्यू लावलाय मोदींनी."
"हा त्येच की, ईमायनानं औषध फवारणी करणार म्हंत्याती... किटाणू मारायला.."
"आहो नाही नाही.."
"न्हाय कसं. आवो व्हाट्स्स्याप ला आलंय. टाळ्याबी वाजवाय लावल्यात संध्याकाळी.." समोरच्या गोठ्यात बसलेला एक तरूण सुंभ चेहऱ्याने आमच्याकडे बघत म्हणाला. हा मला अजून कसा दिसला नव्हता.
"जळ्ळा मेला तो ईषाणू. कशाला आलाय म्हणावं बाबा हिकडं.." त्याच्याच मागे एक बाई उभी होती. ती तिथे कधी आली?
"बरका..." तो तरूण उठून माझ्याकडे येत म्हणाला, " भांडगावला एकजण सापडला... गोळ्या घातल्या की राव त्याला."
"गोळ्या घातल्या..?"
"मग, करोना सक्सेस झाला त्याला.. टिवीला बातमी हुती की.."
टिव्हीला बातमी म्हटल्यावर आम्हीही चपापलो. पत्रकार असूनही ही असली बातमी आमच्याकडून कशी निसटली?
अखेर त्यांनी आम्हाला इतक्या प्रमाणात 'ठोस' माहिती पुरवली की आज संध्याकाळपर्यंत 'ईमायनं' येण्याची खात्रीच पटली.
सायकलवर टांग टाकून जेव्हा आम्ही माळेगाव मार्गे हायवेला लागलो तेव्हा असल्या अचाट प्लॅनबद्दल नमोजींना मनातल्या मनात सलाम ठोकला. पण मागून पोलिसांची गाडी आली आणि काहिही न विचारता असभ्य वाटेल अशा ठिकाणी दोन बांबू ठेवून दिले.
शहरात आलो तेव्हा संध्याकाळी ढोल ताशे लावून जंगी मिरवणुका सुरू होत्या. आणि आम्ही सिटावर न बसता सायकल चालवून पार मेटाकुटीला आलो होतो. तसाच दामटत ऑफिसला गेलो तर मॅनेजरने अगोदरच बातमी तयार करून ठेवली होती.
"बाभुळगावमध्ये 'जनता कर्फ्यू' ला उदंड प्रतिसाद!"
प्रतिक्रिया
24 Mar 2020 - 8:50 am | कंजूस
हाहाहा.
कित्ती दिवसांनी हिकडं येणं केलंत राव.
24 Mar 2020 - 10:54 am | चांदणे संदीप
कित्ती दिवसांनी बातमी आली जव्हेरभौ. बाकी सगळ ठीकाय ना?
सं - दी - प
24 Mar 2020 - 1:08 pm | चिगो
झक्कास लिवलंय, जव्हेर भाऊ.. आम्हीपण सकाळी सात वाजता अतिनील किरणांमुळे उपग्रहातून सुटणारा वायू, जो फक्त भारतदेशावर पसरणार होता, तो बघायला गॅलरीत यायचा मन्सुबा केला होता.. पण अलार्म नाही लावला स्साला. एका ऐतिहासिक क्षणाला (जे आजकाल दर दोन दिवसांनी येतात) मुकल्याची खंत करत पांघरुण ओढून झोपत राहीलो मग..
24 Mar 2020 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भक्त नावाची बेक्कार फळी असे संदेश टाकते की डोकं भिंतीवर आपटून घ्यावे वाटते.
पण मी थाळी नै तर टाळी वाजवली, आपल्याही अंगावर ते अतिनील किरणे पडली पाहिजेत. ;)
-दिलीप बिरुटे
25 Mar 2020 - 5:47 am | चौकस२१२
इथे पण राजकारण! ... भक्त / अँटी भक्त .. काय हे!
५ वाजता घंटानाद करा हे बाह्यांगी हास्यस्पद वाटत असलं तरी अनेक समाजात एखाद्या सार्वजनिक उपक्रमाची सुरवात किंवा शेवट यात आवाज करणे ( घंटा, तोंडाने ) अश्या प्रथा आहेत...अरबी संस्कृतीत https://en.wikipedia.org/wiki/Ululation हे पहा .. अशा मुळे काही विषाणू मारणार नाहीयेत हे खरे पण त्याच बरोबर त्याची चेष्टा करणे हे पण उचित वाटत नाही .
सकाळ मधल्या श्रीराम पवारांचं लेख सारखी वाटली हि प्रतिक्रिया .. काहीही करून शेवटी सध्याचे पंतप्रधान आणि त्यांनी घेतलेला "कोणताही " निर्णय हा चुकीचाच आहे हाच "सूर" लावणारे "पत्रकार"
25 Mar 2020 - 7:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण टाळी, थाळी वाजवावी किंवा त्याचे समर्थन करण्याबाबतच्या आपल्या मत स्वातंत्र्याच्या, मताचा आदर आहेच, पण मला जे वाटतं ते मी व्यक्त केलंय, माझी मतं जी आहेत ती आहेत. आपले मन:पूर्वक आभार...!
-दिलीप बिरुटे
25 Mar 2020 - 2:27 pm | चौकस२१२
मी समर्थन नाही करीत आहे साहेब...म्हणूनच मी प्रथमच लिहले कि हे "हास्यास्पद" वाटू शकते ...मी फक्त हि कल्पना का काढली असावी यामागचा तर्क अगदीच एवढे चेष्टा आणि टीका करण्यासारखा आहे का ? यावर बोलतोय... त्यापेक्षा सर्वांनी मिळून याचा सामना कसा करावा यावर वेळ घालवूयात
आता २१ दिवसाच्या कारफू बद्दल विरोधक तारे तोडतील.. ते स्वतः जर सत्तेत असते तर त्यांना पण असे काही निर्णय घयावे लागले असते .. हे ते विसरतात
असो
24 Mar 2020 - 1:10 pm | विजुभाऊ
हॅ हॅ हॅ
लय भारी. मिरासदारांची आठवण झाली
24 Mar 2020 - 5:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
रीपोर्ट भारी लिवलाय
पैजारबुवा,
24 Mar 2020 - 5:36 pm | दिनेश५७
मस्त!
24 Mar 2020 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2020 - 6:40 am | तुषार काळभोर
येणं केलं भाऊसायेब..
मी काल रात्रीच वैतागून चार ग्रुप सोडलेत. उपग्रह, विमान, औषध, अमावस्या, डोकं फिरल नायतर काय!
बातम्या, इंटरनेट, मिपा, व्हॉटसअप, हापिसतला (ई)मेल, दुसरा विषयच नाय.
25 Mar 2020 - 8:08 am | सोत्रि
जव्हेरभाऊ, लैच भारी!
आता तर 'ईमायनं' येण्याची खात्रीच पटली बरं का! :)
- ('ईमायनं' येण्याची वाट बघणारा) सोकाजी
25 Mar 2020 - 6:36 pm | Nitin Palkar
अक्षी वरचा सोत्रींचा प्रतिसाद 'चिटकवावासा' वाटतोय
25 Mar 2020 - 8:04 pm | प्राची अश्विनी
झकास!!
27 Mar 2020 - 2:13 pm | बिपीन सुरेश सांगळे
आवडली गोष्ट मजेशीर