या सम हा - ग्रंथ परिचय
बाह्यांग परिचय -
मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावाच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे.
३३५ पाने असलेल्या या ग्रंथावर संपादकीय हात फिरवण्याचे काम आनंद हर्डीकर यांनी केले आहे.
भूमिका स्पष्ट करताना मेजर जनरल शशिकांत पित्रे म्हणतात,... "बाजीराव एक सच्चा सोल्जर्स जनरल - बारगीरांचा सेनानी - होता… लष्करी सिद्धांतांच्या ऐरणीवर त्याला पारखले गेले नाही, लष्करी इतिहासात त्याच्या असामान्यतेची, युद्ध विजयी डावपेचांची दखल घेतली गेली नाही." या पार्श्वभूमीवर बाजीरावाच्या प्रत्येक लढाईचे लष्करी मोजमापातून विश्लेषण करण्याचे या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
दिलीप माजगावकरांनी हा प्रकल्प सुचवला होता. एका नाट्यगृहातील चर्चेत एका अद्वितीय रणधुरंधराची बोळवण रोमांचकारी चितचोर नायकात केल्यामुळे जनरल शशिकांत पित्रे यांना ती घुसमट असह्य झाली. कदाचित तो प्रसंग त्यांना या ग्रंथाची निर्मिती करायला प्रेरित करून गेला असावा.
१० प्रकरणात सामावलेल्या ग्रंथात २० नकाशे घटनास्थळांची ओळख करून देतात.
बाजीरावाचे मोगल, पोर्तुगीज आणि सिद्दी प्रतिस्पर्धी. यांना नमविण्यात बाजीरावाने आपली दोन दशकांची अल्पायुषी लष्करी कारकीर्द कामी लावली. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर केले.
या ग्रंथातून शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतरच्या काळातील गुंतागुंतीच्या घटनाक्रमाला सुटसुटीतपणे संगतवार कथन केल्याने वाचकांना अनेक गोष्टी समजून घ्यायला सोपे आहे.
बाजीरावाच्या संबंधात आलेल्या सरदारांची ओळख सुरवातीला करून दिल्याने नंतरच्या युद्ध प्रकरणातील त्यांचे उल्लेख पटकन लक्षात येतात.
अजिंक्य बाजीरावाच्या युद्ध नेतृत्वाची लोकविलक्षण यशोगाथा जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहून युद्धशास्त्राविषयीची, युद्धनेत्यांविषयीची उपेक्षा दूर होईल. या आणि अशा तर्हेच्या लेखनकार्याला आपल्या लष्करी अकादमीच्या अधिकृत पाठ्यक्रमात समाविष्ट व्हावे. हीच सदिच्छा आहे.
…
राजहंस प्रकाशन, १०२५ सदाशिव पेठ,
प्रकाशक :दिलीप माजगावकर.
मूल्य ₹४००.
प्रतिक्रिया
9 Feb 2020 - 6:06 pm | शशिकांत ओक
'भोपाळचा सापळा' शीर्षकातून ह्या ग्रंथाच्या अंतरंगाचे दर्शन करणारा भाग सादर होत आहे.
11 Feb 2020 - 6:43 pm | दुर्गविहारी
मि.पा.वर अलीकडे फार येणे होत नाही, त्यामुळे हा धागा वाचायचा राहून गेला. आपल्या धाग्यामुळे या पुस्तकाविषयी उत्सुकता वाढली आहे. धन्यवाद.