इथे पुस्तके राहतात !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 Jan 2020 - 10:50 am

लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, 'कर्‍हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.

त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.

पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.

आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.

अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.

यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !

अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून फिरंगी वातावरणाचा आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.

हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !

सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस
४. अगाथा क्रिस्ती

शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !

सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.

पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.
अगाथा क्रिस्ती यांच्या रहस्यकथा तर सर्वांनाच भारून टाकणाऱ्या. त्यातील थरार केवळ अप्रतिम. कथानायक हर्क्युल पॉयरोला कसे विसरता येईल?

अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !

पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्‍यांचा अगदी राग यायचा.

इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर

“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"

ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.

या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:

‘वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.

हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.

सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
**************************************************

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

कोमल's picture

29 Jan 2020 - 12:07 pm | कोमल

मस्त लेख.
भूतकाळाला उजाळा मिळाला.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्या तरी वाचनालयात नाव नोंदवले जाई. काही दिवसांनी घराजवळील छोटी लायब्ररी अपुरी वाटू लागल्यावर गावातील मोठ्या लायब्ररीचे सभासदत्व घेतले होते. ते आजही आहे. माहेरी गेल्यावर त्याच्या समोरून अनेकदा जाते फक्त आत जाणं होत नाही ही गोष्ट वेगळी.

कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू.

हे मी आणि बहीण सुद्धा सारखे करायचो. एकदा पकडले गेल्यावर छान खरपूस मार पण खाल्ला होता. त्यानंतर मग आईच्या पायाची चाहूल लागताच उशीच्या अभऱ्यात पुस्तक लपवून ठेवली जाऊ लागली. आई दुसऱ्या खोलीत गेल्यावर परत पुस्तकं बाहेर. :D

तुम्ही अत्यंत सज्जन आहात हो.

लायब्ररी म्हणजे आमच्या दृष्टीने नेमक्या त्या कपाटातील कादंबऱ्या उघडून पाने झरझर नजरेने स्कॅन करुन नेमके शब्द झपकन रडारमध्ये येताच* मग त्या पानाचे निवांत वाचन करणे आणि शेवटी गरम कानशील आणि थंड हातपाय घेऊन नाईलाजाने पुस्तक परत कपाटात ठेवून अन्य ठिकाणाहून भारा भागवत वगैरे घेऊन घरी जाणे..

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, चालायचेच. कालाय तस्मै नमः

* हे एक संगणकपूर्व काळातील Ctrl + f च्या तोडीचे स्किल त्या वयात असायचे.

तो पुढिल आयुश्यात रसिक, जाणकार व अभ्यासु वाचक बनु शकतो यावर कोणिही वाचनप्रेमि विश्वास ठेउ शकणार नाही.

कुमार१'s picture

14 Apr 2021 - 11:21 am | कुमार१

मार्मिक प्रतिसाद !

कुमार१'s picture

29 Jan 2020 - 2:06 pm | कुमार१

प्रतिसाद धमाल आहेत !

आईच्या पायाची चाहूल लागताच उशीच्या अभऱ्यात पुस्तक लपवून ठेवली जाऊ लागली >>
पुस्तक लपवायची मस्त जागा !

आणि शेवटी गरम कानशील आणि थंड हातपाय घेऊन नाईलाजाने पुस्तक परत कपाटात ठेवून
वा, स्मरणरंजन झाले !

गवि's picture

29 Jan 2020 - 2:12 pm | गवि

वा, स्मरणरंजन झाले !

A

???

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jan 2020 - 2:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचनालय किंवा ग्रंथालय म्हटले की माझ्या डोळ्या समोर पहिले नाव येते ते म्हणजे पुण्याच्या मुकुंदनगर मधले शलाका ग्रंथालय. आमच्या भावेकाकांनी छोट्याशा जागेत नेटकेपणाने आणि अथंत शिस्तीने हे ग्रंथालय चालवले होते. होते असे म्हणण्याचे कारण म्हणजे आता मी या ग्रंथालयाचा सभासद नाहीये.

इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषांमधली अनेक पुस्तके भावेकाकांच्या संग्रहालयात होती. निरनिराळी लोकप्रिय मासिके, दिवाळी अंक इथे नियमित पणे वाचायला मिळायचे. शिवाय मराठीतली अनेक नामवंत पुस्तके मी इथे वाचली.

शिस्तीच्या बाबतीत भावे काका एकदम काटेकोर होते. एखाद्या पुस्तकाचे पान कोणी फाडले किंवा खरब केले तर अशा सभासदाची ते अजिबात गय करत नसत. इतर सभासदांच्या देखतच ते त्याचा कोणताही मुलाहिजा न बाळगता पाणउतारा करायचे. असा की त्याची काय हिम्मत की तो परत पुस्तक खराब करुन आणेल.

पण याच भावेकाकांना कोणते नवे पुस्तक मागितले आणि त्यांनी ते आणून दिले नाही असे कधिच झाले नाही आपण मागितलेले पुस्तक उपलब्ध झाले की ते आठवणीने बाजूला काढून ठेवलेले असायचे व ग्रंथालयात पाउल टाकताच ते हातात पडायचे.

भावेकाकांमुळे मला पाश्चिमात्य संगीताची सुध्दा ओळख झाली. ग्रंथालयात मंद आवाजात गाणी सुरु असायची. त्या बद्दल विचारले की काकांचा माहितीचा धबधबा सुरु व्हायचा. मग त्या गाण्याच्या तबकडीचे / कॅसेटचे कव्हर ते वाचायला द्यायचे आणि त्यातल्या इतर गाण्यांबद्दलही माहिती द्यायचे. इकडे ऐकलेल्या गाण्यांची यादी करुन त्याची मी एक कॅसेटच बनवुन घेतली होती.

समग्र फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, टिनटीन, किशोर, रिडर्स डायजेस्ट, अमृत, इत्यादी पासुन सुरु झालेली ही सफर नंतर सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, यांच्या पर्यंत पोचली. या शिवाय श्री ना पेंडसे, पु ल देशपांडे आचार्य अत्रे, हे मराठी लेखक तर सिडने शेल्डन, फ्रेड्रीक फोर्सिथ, डॅन ब्राउन, आयर्विंग वॉलेस, इयान फ्लेमिंग हे लोक देखिल इथेच भेटले. भाषांतरीत पुस्तकांचा तर इथे मोठा खजिनाच होता.

या नंतर अनेक वाचनालयांचा सभासद झालो पण भावेकाकांसारखा शिस्तप्रिय आणि प्रेमळ ग्रंथपाल कुठेही भेटला नाही.

असेच मन लावून वाचन केले ते आमच्या गरवारे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात. इथले ग्रंथपाल होते नातुसर. भावेकाकांच्या अगदी उलट पध्दतिने त्यांनी ग्रंथालय सांभाळले आणि वाढवले होते. त्यांच्या जवळ गेलो की अत्यंत आस्थेने ते माझी चौकशी करायचे. स्वतःहून संदर्भग्रंध सुचवायचे. एवढ्या मोठ्या पसार्‍यात कुठे काय आहे ते त्यांना बरोब्बर माहित असायचे. आणि त्यातले बरेचसे त्यांनी हमखास वाचलेले असायचे. पुस्तक परत द्यायला गेलो की त्या बद्दल एखादा प्रश्ण विचारुन नक्की वाचले आहे की नाही याची ते खात्री करुन घ्यायचे. एखादे पुस्तक जर आमच्या गंथालयात उपलब्ध नसले तर ते दुसरी कडे कुठे मिळेल ते बरोब्बर सांगायचे. आणि ते उपलब्ध होईल याची व्यवस्था करुन द्यायचे. ते आणि त्यांचे सहकारी मोठ्या आस्थेने पुस्तकांची काळजी घ्यायचे.

लहानपणापासून वाचनाची गोडी लागली ती माझे बाबा (ज्यांनी वयाच्या ८० व्या वर्षीही वाचन सोडलेले नाही) भावेकाका आणि नातुसरांसारख्या वाचनप्रेमी लोकांमुळेच.

पैजारबुवा,

"अमृत"मध्ये विविध मनोरंजन असे. त्याचा आकारही डायजेस्टसारखा होता.

त्यात एक मुद्राराक्षसाचा विनोद आणि उपसंपादकांच्या डुलक्या असं काहीतरी सदर यायचं. त्यातली काही वाक्यं अजून लक्षात आहेत.

- तू उगीच चहात पाय गाळतोस.
-बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना तो ठेच लागून पडला.
- पाच सुवासिनींनी मंत्र्यांना आवळले.
- दाताचा ठोसा लागून तो खाली पडला

कुमार१'s picture

29 Jan 2020 - 2:34 pm | कुमार१

गवि,
अहो, डॉक्टरला पण तारुण्य असतेच की वो !
उपसंपादकांच्या डुलक्या >>> हा, हा ! आठवल्या.

ज्ञा पै,
सुंदर आठवणी. अशा शिस्तप्रिय ग्रंथपालांबद्दल नक्कीच आदर वाटतो.

कुमार, तुमचे समृद्ध वाचन बघून (वाचून खरेतर :-) ) हेवा वाटला.

साधारण आठवीनंतर वाचनाची गोडी लागली. शाळेत 'पुस्तक संचयिका' होती, ऑफ पिरियड / शिक्षक नसले की एका मोठ्या पेटीतून पुस्तके येत. वर्गातच हवे ते वाचता येई. हे छोटेखानी 'पेटी ग्रंथालय' त्यावेळी खूप आवडत असे पण एकही पुस्तक त्या ४५ मिनिटात किंवा फार तर ७० मिनिटात वाचून होत नसे त्याचा राग यायचा.

बाबांचे एक मित्र शहराच्या दुसऱ्या टोकावर ग्रंथालय चालवायचे. त्यांच्याकडून भाषा शिकण्यासाठीची पुस्तके वगैरे आणायची हा उन्हाळ्याच्या सुट्टीतला उद्योग.

खरी मजा दहावीनंतर, शेकडो पानांचा एका दिवसात फडशा पडे. घरी बाबांचा मोठा ग्रंथसंग्रह होता आणि कामाच्या ठिकाणी सुसज्ज ग्रंथालय. त्यामुळे बे-रोकटोक हवे ते वाचण्याची मुभा. हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरित झालेले प्रसिद्ध लेखकांचे साहित्य सर्वात जास्त वाचण्यात आले. हिंदी / इंग्रजी क्लासिक श्रेणीतलेही वाचले. ग्रंथपाल पटेल काका एकावेळी ३ (नियमानुसार) आणि वर ३ (त्यांच्या स्वतःच्या नावावर) वाचायला नेऊ देत. चंगळ वाटायची. बडोद्याला असतांना एका खाजगी ग्रंथालयातली गुजराती, मराठी आणि हिंदी पुस्तके इंटरनेटच्या बाल्यकाळातला विरंगुळा होती.

दक्षिण मुंबईतल्या ब्रिटिश लायब्ररी आणि काही नामांकित खाजगी ग्रंथालयांमध्ये डोकावणे व्हायचे. मराठीतले वाचन फार जुजबी होते आणि ते गेल्या १२ वर्षात घडले आहे.

आता नो ग्रंथालय. बहुतेक वाचन डिजिटल.

कुमार१'s picture

29 Jan 2020 - 5:58 pm | कुमार१

अनिंद्य,
छान आठवणी.

आता नो ग्रंथालय. बहुतेक वाचन डिजिटल.

>>>>> कालसुसंगत बदल योग्यच.
...........
लेखात पी जी वुडहाउस यांचा उल्लेख आहे. त्याबद्दलची एक आठवण.

काही काळ एक ब्रिटीश डॉ. वुडहाउस यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये काम करीत होतो. त्यांच्या व माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांना अगदी ठराविक प्रश्न विचारला, “ ते लेखक वुडहाउस तुमचे कोण?” त्यावर त्यांनी मंद स्मित करीत उत्तर दिले, “कोणीच नाही, आडनावबंधू देखील नाही. कारण,
I am Woodhouse and he is Wodehouse !”
.... असे हे आडनावांचे बारकावे.

सुधीर कांदळकर's picture

29 Jan 2020 - 8:56 pm | सुधीर कांदळकर

प्रथम या जिव्हाळ्याच्या विषयावरच्या लेखाबद्दल धन्यवाद देतो आणि मग माझा लांबलचक प्रतिसाद देतो.

काही आठवणी:
वाचनाचे व्यसन बालपणीचे आठवते त्याआधीपासूनचे आहे. अगदी वस्तू बांधलेल्या सामानाच्या पुडीचे कागद देखील आम्ही भावंडे वाचत असू. आजोबांकडे बर्‍यापैकी ग्रंथसंचय होता. त्यातली वाटेल ती कळणारी न कळणारी पुस्तके वाचत असू. पुराणातल्या कथा वाचायला मजा येत असे. भीम, अर्जुन, हनुमान यांच्या पराक्रमांच्या कथा पण वाचायला मजा येत असे.

नंतर चार आणेवाली राजपुत्र राजकन्यांच्या कथांची पुस्तके आली. मीही मोठा झाल्यावर एकाद्या राजकन्येशीच लग्न करणार होतो.

घरी तीर्थरूपांची पुस्तके एका मोठ्ठ्या पत्र्याच्या ट्रंकेत असत. त्यात झेंडूची फुले, साष्टांग नमस्कार, घराबाहेर इ. नाटके, वुडहाऊसची एकदोन पुस्तके, डॉन क्विझोट (दोन किखोते) अशी काही पुस्तके आठवताहेत. शाळेत ऑफ तासाला कधीतरी पुस्तकपेठी येई.

यूसिसमधे वाचलेल्या काही अभिजात कादंबर्‍या आठवताहेत. द पर्ल, टु सर विथ लव्ह वगैरे. बीसीएलमध्ये जास्तकरून खगोलशास्त्रावरील पुस्तके वाचली आणि कार्टूनसंग्रह पाहिले.

दादरच्या राम मारुती रोड कोपर्‍यावरच्या ;नवीन वाचनालय' या खाजगी ग्रंथालयात छान इंग्रजी पुस्तके मिळत. तिथे ऑर्थर हॅले, सिडनी शेल्डन, आयर्विंग वॉलेस, इ. ची जगप्रसिद्ध पुस्तके वाचायला मिळाली. जेम्स हॅडली चेस म्हणजे इंग्रजीतले बाबुराव अर्नाळकर. तेही इथे लाभले. काही काळाने ते ग्रंथालय बंद ह्गाले. आता तिथे पोलीस ठाणे आहे.भागवत नावाचे एक गृहस्थ पिशवीतून मासिके घरपोच फिरवून मराठी मासिकांची लायब्ररी चालवीत. त्यांच्या सभासदात बहुतेक गृहिणीच असत. फोर्ट एरियात पेटिट लायब्ररीत इंग्रजी पुस्तकांचा छान संग्रह होता.

काही किस्से:
दासावा ऊर्फ दादर सार्वजनिक वाचनालयात जोशी नावाचे एक सेवक होते. तोंडी सांगितलेले पुस्तक नेहमी भलतेच आणीत. अतिश्य गोड बोलत. नंतर कळले की ते बहिरे होते. या दासावाची माहीम मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणून एक शाखा होती. आता ती त्याच नावाने आहे पण स्वतंत्र ग्रंथालय म्हणून. तिथला सेवकवर्ग अतिशय बेशिस्त आहे. नेहमी मोबाईलवर मोठमोठ्या आवाजात बोलत असतात. त्याउलट नारायण पेठेतल्या पुणे मराठी ग्रसंचा मी काही काळ सभासद होतो. तिथला सेवकवर्ग शिस्तबद्ध आहे. तिथले संचालक नेमाने येतात आणि शिस्त राखतात. उगीच कोणाला बिनकामाचे उभे पण राहू देत नाहीत. अशी शिस्त पाहिजे. त्या सर्वांना माझा सलाम. कीर्ती कॉलेजमधले एक प्राध्यापक माझे स्नेही होते. त्यांनी आमच्या समान आवडीच्या विषयांवरची अनेक पुस्तके मला वाचायला दिली. पुस्तक हाताळल्यामुळे खराब होऊ नये, नवेच राहावे म्हणूनमी कव्हर घालतो. मला आठवते 'मिचिओ काकू'च्या 'व्हीजन' या जगप्रसिद्ध पुस्तकाला मी कव्हर घातले. पुस्तक परत घेतांना ग्रंथपालांनी कव्हर काढा म्हणून सुचना केली, नव्हे तसा आग्रहच धरला. तेव्हा या प्राध्यापकमहाशयांनी कव्हर घालणे कसे चांगले यावर एक व्याख्यान देऊन कव्हर तसेच ठेवले. आमच्या मालवणच्या नगर वाचन मंदिरातील सेवकवर्ग छान आहे. ग्रंथपाल शिंदेसाहेब बहुश्रुत आहेत. वाचन चांगले आहेच. नाटक या विषयावर भरभरून बोलतात. तिथल्या दळवी मॅडम सभासदांची आवडनिवड जाणून घेऊन पुस्तकांची शिफारस करतात.

आमच्या शेजारच्या माझ्यापेक्षा १० वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या जयबालाताईंनी माझ्या वाचनाला दिशा दिली. त्याही नंतर ग्रंथपालनातील पदवी घेऊन ग्रंथपाल झाल्या.

असो. प्रतिसाद अति लांबला. पुस्तके म्हटले की असे होते आणि आमचे हसे होते. पुन्हा एकदा अनेक, अनेक धन्यवाद.

सर्वसाक्षी's picture

30 Jan 2020 - 11:12 am | सर्वसाक्षी

आपल्या तसेच प्रतिसाददात्यांच्या वाचन व्यासंगाला प्रणाम.

लहानपणी पासून ते अगदी तिशीपर्यंत मला वाचनाचे फार वेड होते. मी लहान असताना नातेवाईक तक्रार करायचे की हा आला की पुस्तकात डोकं खुपसून बसतो, काहीही बोलत नाही. पुढे का कोणास ठाऊक पण उनाडपणा आला, वाचन कमी झाले.
मध्यंतरी भारतिय क्रांतिकारकांविषयक माहिती मिळवण्याच्या निमित्ताने पुन्हा वाचन झाले. या विषयावरील पन्नास एक तरी पुस्तके घरात आहेत. अनेक पुस्तके मी पुन्हा वाचणार आहे कारण एकतर ती भराभर वाचली असावीत किंवा निवडक मजकूर वाचताना अन्य तपशिलाकडे दुर्लक्ष झालं असावं. नुकतच जनरल जी डी बक्शी यांचं "बोस ऑर गांधी हू गॉट इंडिया हर फ्रिडम" वाचुन झालं

आपल्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा वाचनाची उर्मी आली, धन्यवाद

रक्तकमळे: भारतीय क्रांतिकारकांच्या कथा - त्र्यं. रा. गोडगे

कुमार१'s picture

30 Jan 2020 - 11:55 am | कुमार१

सुधीर, छान अनुभव.

मीही मोठा झाल्यावर एकाद्या राजकन्येशीच लग्न करणार होतो.

>>>> बघा, पुस्तकांचे मनोराज्य किती मस्त असते !

सर्वसाक्षी,
सुंदर वाचन आहे तुमचे ,
चालू ठेवा.

लहानपणी वाचनालय म्हणजे अगदी देहभान हरपून कुठल्याश्या कोपऱ्यात वाचत बसायचं आणि बंद व्हायची वेळ झाली की ग्रंथपाल किंवा शिपायाने बखोटीला धरून बाहेर काढायचं हे ठरलेलं असे. लेख आवडला हेवेसांनल.

सुन्दर लेख. मी पण सुट्टिमधे असाच फड्शा पाडाय्चो..जुनि आठ्वण जाग्य्या झाल्या.

गुल्लू दादा's picture

30 Jan 2020 - 3:47 pm | गुल्लू दादा

आजच एका वाचनालयात जाऊन आलो. शासकीय असल्याने सभासद न होता कमीतकमी न्युज पेपर्स आणि मासिके वाचता येतील हे ठाऊक होते. आतमध्ये एक दर्शनी खोलीमध्ये कर्मचारी होता. त्याला चौकशी करावी म्हणून काही विचारलं तर तो भलतेच उत्तरे देई. मासिके वगैरे आता काहीच वाचता येणार नाहीत आणि तुम्ही सभासद व्हा त्याशिवाय तुम्हाला कशालाच हात लावता येणार नाही हे जाहीर करून टाकले. मी सुद्धा मग जास्ती गोंधळ न घालता त्याच्या साहेबांना भेटलो आणि सगळी कहाणी कथन केली. सुदैवाने साहेबांनी सहकार्य केले मला मासिकेच काय अगदी पुस्तके पण वाचन्याची मुभा दिली , सभासद न होता. अर्थात मी लगेच सभासद होण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया लगेच पूर्ण केली. सांगायचे तात्पर्य इतकेच की कधी कधी खालच्या कर्मचार्यांशी वाद न घालता सरळ वरिष्ठांना भेटले तर काम सहज होते. माफ करा थोडं विषयांतर झाले. मला सुद्धा वेळ मिळेल तसा वाचत असतो. लेख छान झालाय. धन्यवाद :)

कुमार१'s picture

30 Jan 2020 - 4:27 pm | कुमार१

एस, योगेश व गुल्लू,
सहमत.

कधी कधी खालच्या कर्मचार्यांशी वाद न घालता सरळ वरिष्ठांना भेटले तर काम सहज होते.
बरोबर, आलेत असे काही अनुभव.

कुमार१'s picture

22 Feb 2020 - 3:51 pm | कुमार१

एक मजेदार लेख :

मोठ्याने वाचा बिनधास्त!

(https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/patipencil/read-aloud/)

मुक्त विहारि's picture

23 Feb 2020 - 12:21 am | मुक्त विहारि

मी कुठल्याही शहरात गेलो की, मंदिरात न जाता आधी वाचनालय शोधतो.

पुस्तकाला कवर घालणे, बाइंडिंग करणे हा आवडता छंद होता लहानपणी.
दोऱ्याने शिवून शब्दश: बाइंडिंग केलेली पुस्तके मला अजिबात आवडत नसत. ही पद्धत कुणी शोधली? दिवाळी अंकांसारख्या सुंदर अंकांनाही प्रथम मुसक्या बांधून प्रतिपदेला पुजा करून सोडत काढून वाचनालयात दिले जातात. नोव्हेंबर आणि डिसेंबरात आठ वाचक वाचत असावेत पण दहा वर्षे ठेवायचेत असा बंदोबस्त करतात.

कुमार१'s picture

23 Feb 2020 - 8:58 am | कुमार१

* पुस्तकाला कवर घालणे, बाइंडिंग करणे हा आवडता छंद होता
>>>
अगदी, अगदी !

मी सुद्धा अगदी आवडीच्या पुस्तकांना वेष्टण घालतो. जर असे पुस्तक कोणी उधार मागितले, तर "जपून वापरा, दुमडून उलटे ठेवू नका, वाचायची खूण म्हणून कागद ठेवा", अशा सूचना करतो.

कुमार१'s picture

23 Apr 2020 - 7:59 am | कुमार१

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

कुमार१'s picture

15 Jun 2020 - 3:21 pm | कुमार१

ग्रंथालयांचं भविष्य काय?

रोचक लेख इथे
https://maharashtratimes.com/editorial/article/what-is-the-future-of-lib...

कुमार१'s picture

27 Sep 2020 - 12:07 pm | कुमार१
कुमार१'s picture

14 Oct 2020 - 11:11 am | कुमार१

साहित्याचा खजिना ऑनलाईन

राजगुरुनगर वाचनालयाचा सुरेख उपक्रम.

Bhakti's picture

14 Oct 2020 - 2:18 pm | Bhakti

अफाट!!
मलापण वाचनाची आवड लागलघ होतं, तेव्हा मी खूप पुस्तक वाचलीत.आणि टिपण काढायला डायरी केली होती.अजूनही ती डायरी उघडून वाचायला मौज येते.मलापण पुस्तक विकत घेऊन वाचयला आवडत..ही पुस्तके स्वकीयांमध्ये​ पाहुण्यांसारखी फिरत असतात."हे तर माझं पुस्तक..असू द्या वाचा..असं म्हणत त्यांचं दुसरं पुस्तक आणते"..

कुमार१'s picture

19 Dec 2020 - 2:35 pm | कुमार१

एक छान लेख :
छापील पुस्तके विरुद्ध किंडल : जुना रोमान्स विरुद्ध नवा रोमान्स!

इथे

कुमार१'s picture

13 Apr 2021 - 6:49 pm | कुमार१

पुस्तकांची गुढी : स्तुत्य उपक्रम .
अभिनंदन !

कुमार१'s picture

12 May 2021 - 5:54 pm | कुमार१

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. पुस्तकांना ‘अत्यावश्यक वस्तू’ म्हणून दर्जा मिळावा आणि पुस्तक विक्री ही औषध व अन्नधान्य विक्री याप्रमाणे अत्यावश्यक सेवा समजली जावी, अशी मागणी या यचिकेत केली आहे.

https://www.aksharnama.com/client/article_detail/5153

कुमार१'s picture

12 Jun 2021 - 2:13 pm | कुमार१

१९४७ : ग्रंथालयाची पण फाळणी ....

ok

कुमार१'s picture

3 Nov 2021 - 10:11 pm | कुमार१

लोकप्रिय रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन.

विनायक पाटील's picture

4 Nov 2021 - 9:14 am | विनायक पाटील

आपला लेख वाचून सगळ्यांसारख्याच माझ्याही वाचनाच्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

एका अगदी लहान गावात वाढल्यामुळे वाचनालय हा प्रकार फार वाट्याला आला नाही. त्यामुळे वाचनालयात बसून वाचण्याची सवय लागली नाही. आणि त्यामुळेच कदाचित मराठीतील बहुतेक लेखक, कवी वाचलेले नाहीत. पण वाचनाच्या आठवणी अगदी भरघोस आहेत.
त्यातली एक म्हणजे बारावीची परीक्षा झाल्यावर आमच्या इंग्रजीच्या बाईंच्या गावी एसटीने जाऊन दोन मोठ्या पिशव्या भरून आणलेली आणि मग सुट्टीत मनमुराद वाचलेली पुस्तकं. त्यात वाचलेलं "डोह" अजून मनात उरलेलं आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.

कुमार१'s picture

4 Nov 2021 - 10:11 am | कुमार१

**एसटीने जाऊन दोन मोठ्या पिशव्या भरून आणलेली आणि मग सुट्टीत मनमुराद वाचलेली पुस्तकं.
>> हे आवडले
छान,
धन्यवाद व दिवाळी शुभेच्छा

जेम्स वांड's picture

4 Nov 2021 - 1:22 pm | जेम्स वांड

काय पण स्मरणरंजन आहे....

आमची वाचन सुरुवात म्हणजे आत्या घरी येत असे तेव्हा, आमचे पाहुणे मिलीटरीत होते ते कायम लुधियाना, अंबाला, दिल्ली, लखनऊ, मेरठ वगैरेकडे असत पोस्टींगवर.

आत्या तर आत्या पाहुणे पण प्रेमळ होते आमचे फार, आमच्या बहीण भावाने वाचलेली जुनी डायमंड कॉमिक्स, नागराज, चाचा चौधरी, सुपर कमांडो ध्रुव, बांकेलाल, इत्यादी कैक कॉमिक्स असत, चंपक, चांदोबाचे कधी मराठी कधी हिंदीतले नवे अंक पण घेऊन येत, उन्हाळ्यात भावंडासोबत घरात बसून आमरस खाऊन पेंगताना कॉमिक्स वाचणे एक स्वर्गसुख असे.

पुढे वाचनाची आवड आणि सामान्यज्ञान विषयात वार्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क काढल्यावर बाबांनी एकदम पंचवार्षिक शुल्क भरून किशोर मासिक लावले होते घरी, दर महिन्याला ४-५ तारखेच्या दरम्यान बालभारती पुणेच्या पत्त्यावरून येणाऱ्या किशोरची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू, किशोरमध्ये निनाद बेडेकर ते बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या शिवकालीन गोष्टी, शौर्यगाथा, कोडी, सामान्यज्ञान, विज्ञानजगतातील घडामोडी इत्यादी वाचण्याचे एक वेगळे सुख असे, संपूर्ण चित्रांकीत कॉमिक्स ते किशोर प्रवास घडला होता, अश्यातच, आमचे स्नेही असणाऱ्या एकाजणांच्या पत्नींनी (आम्ही त्यांना नानी म्हणत असू लाडाने) एक वाढदिवशी एक होता कार्व्हर हातात सरकवले मला वाटते तेरा चौदाचा असेन तेव्हा, बिनचित्राची पुस्तके इतकी जबरदस्त असतात अशी कक्षा रुंदावण्याचा तो काळ होता, त्यानंतर मागे वळून बघितले नाही.

रोज किमान अर्धातास वाचन करूनच झोपतो, वाचनालय किंवा एकंदरीत पुस्तक भाड्याने घेऊन वाचणे आवडत नाही शक्यतो, निवडक वाचतो पण जे आवडलं ते पुस्तक संग्राह्य घेतोच शक्यतो, जवळपास ७५० पुस्तके आहेत मालकीची, तोच आता खजिना आहे माझा, अजूनही वाढवतो आहेच.
विषय त्याज्य नाहीत त्यामुळे युगंधर अन शहेनशहा सोबत बसलेले असतात, मधेच एखाद अनुवाद असतो, कुठेतरी एक नाझी भस्मासुराचा उदयास्त असतो, तो विषय फारच व्यग्र वाटावा म्हणून का काय म्हणून मधेच अत्रेंची कमाल असणारी झेंडूची फुले डोकावत असतात, राजाशिवछत्रपती सोबत रियासतकार आठ खंड असतात, लेनिन, हो चि मिन्ह, सुभाषचंद्र बोस ह्यांची चरित्र असतात, पंचावन्न कोटींचे बळी असतात, १८५७चे स्वातंत्र्यसमर असतं, विषय जज न करता लेखक जज न करता पुस्तक वाचण्याचे गॉड गिफ्ट मला आहे असे म्हणले तरी चालेल, पण हो वाचन जीव का प्राण आहे.

थँक्स कुमार सर, आमच्यातील माहिती उत्तमरीत्या काढून घेताय तुम्ही ;) .

कुमार१'s picture

4 Nov 2021 - 2:25 pm | कुमार१

सुंदर प्रतिसाद

** जवळपास ७५० पुस्तके आहेत मालकीची, तोच आता खजिना आहे माझा, अजूनही वाढवतो आहेच.

>>> हे खूपच छान त्याबद्दल कौतुक
दिवाळी शुभेच्छा.!

कुमार१'s picture

12 Feb 2022 - 9:19 am | कुमार१

चांगभलं : कोकणातल्या खेड्यात बहरला ‘वाचन कोपरा’

https://www.loksatta.com/maharashtra/changbhala-story-of-reading-corner-...

हा उपक्रम नेटाने चालवणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील सालपे (ता. लांजा) येथील प्राथमिक शिक्षक श्रीकांत पाटील यांचे हार्दिक अभिनंदन !

सागरसाथी's picture

18 Feb 2022 - 7:04 pm | सागरसाथी

वाचनालय या संस्थेमुळे जीवन समृद्ध आणि आयुष्य सुकर केले.

श्रीगणेशा's picture

19 Feb 2022 - 3:44 pm | श्रीगणेशा

तुम्हां सर्वांचा वाचन व्यासंग वाचून हेवा वाटला.
एवढं पद्धतशीरपणे वाचायला कधी सुचलं नाही विद्यार्थीदशेत, पण त्याची कसर भरून निघेल असा प्रयत्न आहे आता.

कुमार सर,
(नेहमीप्रमाणे) खूप अभ्यासपूर्ण लेख आणि त्यावरील चर्चाही!
धन्यवाद _/\_

कुमार१'s picture

19 Feb 2022 - 4:02 pm | कुमार१

@ सासा
चांगली भावना आहे. अनुभव जरूर लिहा.

….
@श्रीग
वाचन कमी झाले असेल तरी खंत बाळगण्याचे काही कारण नाही. एक मजेशीर किस्सा सांगतो.

या मुद्द्यावर फ्रेंच साहित्य अभ्यासक बायर्ड यांचे एक पुस्तक आहे. त्यात ते असे म्हणतात,
"जगात एकूण प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या अफाट आहे. त्यामुळे एखाद्या वाचकाने कितीही पुस्तके वाचली, तरी त्यापेक्षा त्याने न वाचलेल्या पुस्तकांचीच संख्या अधिक राहते. म्हणजेच पुस्तके वाचली जाण्यापेक्षा ती वाचली न जाणे हीच अधिक नैसर्गिक गोष्ट आहे !"

झेपेल तितके वाचले तरी पुरे आहे :)

कुमार१'s picture

23 Feb 2022 - 9:47 pm | कुमार१

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा!
https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-university-s-jawaharlal-n...

नीलकंठ देशमुख's picture

24 Feb 2022 - 8:59 pm | नीलकंठ देशमुख

खूप छान...
बीडच्या वाचनालयांच्या माझ्या पण खूप आठवणी आहेत.
सविस्तर लिहावे लागेल.
अमृत ची आठवण झाली. किती वर्षानी..धन्यवाद.
वुडहाऊस तर सध्या सोबत आहे. तुमचे वाचनाचा आवाका खूप मोठा आहे .

कुमार१'s picture

24 Feb 2022 - 9:03 pm | कुमार१

वुडहाऊस तर सध्या सोबत आहे.

वा, मग अगदी सुरेख रंजन होत असेल
माझा वूडहाऊ शी संपर्क सुटून बरीच दशके उलटली......

कुमार१'s picture

23 Apr 2022 - 11:51 am | कुमार१

जागतिक पुस्तक दिनाच्या सर्व वाचनप्रेमींना शुभेच्छा !

१९९५पासून २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून युनेस्कोतर्फे साजरा केला जातो. या दिनी विल्यम शेक्सपियर यांची पुण्यतिथी असते.

मनिष's picture

23 Apr 2022 - 3:43 pm | मनिष

मी माझ्या वाचनाविषयी मिसळपाववर पुर्वी लिहिलं होते. तुमचा लेख वाचून त्याची आठवण झाली.

मला आपले उगाचच वाटते की मी बराच स्वतंत्र विचारांचा आहे आणि मुळातूनच वेगळा आहे, पण ह्या पुस्तकांच्या आठवणींच्या निमित्ताने जाणवते की कित्येक न पाहिलेल्या विचारवंतांनी/लेखकांनी किती प्रभावीत केलंय मला त्यांच्या पुस्तकांमधून. खरंतर माझे विचार तसे होते म्हणून त्या पुस्तकांनी मी प्रभावित झालो की ती पुस्तकं आवडली म्हणून विचारांवर प्रभाव पडला हे कोडे बर्‍याच पुस्तकांच्या बाबतीत अजुनही उलगडत नाही. जाऊ दे, काही कोडी न उलगडण्यातच गंमत असते!

पुस्तकांचे देणे

कुमार१'s picture

23 Apr 2022 - 5:06 pm | कुमार१

तुमचा तो लेख मी मिपावर येण्याच्या अगोदरच्या काळातील आहे.
आज वाचून तिकडे प्रतिसाद दिला आहे. लेख आवडलाच !

शुभेच्छा व धन्यवाद.

मुंबईतील एशियाटिक सोसायटीने नुकतेच ग्रंथ विक्री प्रदर्शन आयोजित केले होते. या ग्रंथालयाकडे भेट म्हणून अनेक पुस्तके येत असतात. ज्या पुस्तकांच्या दोनपेक्षा जास्त प्रती उपलब्ध होत्या त्या सर्व त्यांनी अतिशय स्वस्तात विकण्याची योजना जाहीर केली. एकूण ४००० पुस्तके विक्रीसाठी होती.

तीस रुपयात पुस्तक आणि वीस रुपयात नियतकालिक अशी ही योजना होती. 5 ते 18 मे हा कालावधी ठेवला होता. परंतु उद्घाटनाच्या दिवशीच अवघ्या दोन तासात संपूर्ण ग्रंथविक्री झाली !

कुमार१'s picture

30 May 2022 - 7:32 am | कुमार१

ok

नवदांपत्याचे अभिनंदन !

कुमार१'s picture

2 Jun 2022 - 4:24 pm | कुमार१

पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या बालक पालक प्रतिष्ठानने वाचनसाखळी प्रकल्प सुरू केला आहे. हे विद्यार्थी सोलापूर, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. प्रतिष्ठानने 25 प्रकारची विविध वाचनीय पुस्तके घेऊन मुलांना घरपोच पाठवली आहेत. एका मुलाचे पुस्तक वाचून झाले की तो ते जवळच्या मित्र-मैत्रिणींना देणार आहे. अशी ही साखळी आहे

अभिनंदन !

कुमार१'s picture

5 Jun 2022 - 3:36 pm | कुमार१

वाचनसंस्कृती संबंधी चांगला लेख :

हिंदी कथेचे जागतिकीकरण आणि मराठीचे अगतिकीकरण..

कुमार१'s picture

17 Oct 2022 - 9:51 pm | कुमार१

सुंदर उपक्रम !

माझ्या नात्यातील एका बाईंनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी गाठली. त्यानिमित्त त्यांनी विविध विषयांवरील 75 पुस्तके खरेदी केली असून त्यांच्या ओळखीतील प्रत्येक घरी त्या एकेक पुस्तक भेट देत आहेत.

असे एक पुस्तक त्यांनी मलाही दिले.

कुमार१'s picture

18 Oct 2022 - 7:55 am | कुमार१

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भिलार या पुस्तकांच्या गावात उत्सव शब्दांचा ही कार्यशाळा संपन्न

बातमी : छापील सकाळ , १८/१०/२२

कुमार१'s picture

22 Oct 2022 - 9:38 am | कुमार१

अफाट पुस्तकवेडाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे
हुतात्मा भगतसिंग.

त्यासंबंधी एक लेख इथे आहे :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6376
त्यातील हे निवडक :

.....पुस्तकांशिवाय भगतसिंगांची कल्पना करणेही अवघड आहे. २३ मार्च १९३१. भगतसिंगांच्या फाशीला अवघे काही तास उरले होते. त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला आले. ही त्यांची शेवटची भेट होती. त्यांनी भगतसिंगांसाठी एक पुस्तक आणले होते. त्याचे नाव होते – ‘The Revolutionry Lenin’. मेहतांनी पुस्तक दिल्यावर भगतसिंगांनी ते लगेच वाचायला सुरुवात केली. आपल्याकडे फार थोडा वेळ उरलेला आहे, हे त्यांना कळून चुकले होते. त्यांच्या फाशीची वेळ अकरा तासांनी अलीकडे आणण्यात आली होती. त्या वेळी थंड वारे पाहत होते. भगतसिंग लेनिनचे पुस्तक वाचण्यात गढून गेले होते. ....

कुमार१'s picture

23 Oct 2022 - 10:27 am | कुमार१

‘किर्लोस्कर' नियतकालिकाची जन्मकथा

.....१ जानेवारी १९२०
...

. ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला अन् मराठी साहित्यजगतात लहानशी खळबळ उठली. ‘किर्लोस्कर खबर’मध्ये उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडी, गावातील लोकांच्या कथा-कविता असे एकंदर त्याचे स्वरूप होते. .....
कुमार१'s picture

23 Oct 2022 - 10:27 am | कुमार१

‘किर्लोस्कर' नियतकालिकाची जन्मकथा

.....१ जानेवारी १९२०
...

. ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला अन् मराठी साहित्यजगतात लहानशी खळबळ उठली. ‘किर्लोस्कर खबर’मध्ये उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडी, गावातील लोकांच्या कथा-कविता असे एकंदर त्याचे स्वरूप होते. .....
कुमार१'s picture

27 Nov 2022 - 11:53 am | कुमार१

जॉन वूड : जागतिक ग्रंथप्रसाराची चळवळ
मायक्रोसोफ्ट मधील उच्चपदस्थ नोकरी सोडली. नेपाळमधील एका शाळेत ग्रंथालय उभारून दिले. तिथून एका मोठ्या शिक्षण प्रसारक योजनेचा प्रारंभ केला. त्याला “रूम टू रीड” असे समर्पक नाव दिले.

जगातील अनेक देशांमध्ये ग्रंथालय उभारणीत पुढाकार. नेपाळ नंतर दक्षिण आफ्रिका, झांबिया, टांझानिया भारत व बांगलादेशसह अन्य काही देशांमध्ये ग्रंथालय उभारणी. आजमितीस या ग्रंथालयांची संख्या वीस हजारांच्यावर आहे. तसेच 20, 000 मुलींनाही संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती दिलेली आहे.

कुमार१'s picture

27 Nov 2022 - 11:53 am | कुमार१

जॉन वूड : जागतिक ग्रंथप्रसाराची चळवळ
मायक्रोसोफ्ट मधील उच्चपदस्थ नोकरी सोडली. नेपाळमधील एका शाळेत ग्रंथालय उभारून दिले. तिथून एका मोठ्या शिक्षण प्रसारक योजनेचा प्रारंभ केला. त्याला “रूम टू रीड” असे समर्पक नाव दिले.

जगातील अनेक देशांमध्ये ग्रंथालय उभारणीत पुढाकार. नेपाळ नंतर दक्षिण आफ्रिका, झांबिया, टांझानिया भारत व बांगलादेशसह अन्य काही देशांमध्ये ग्रंथालय उभारणी. आजमितीस या ग्रंथालयांची संख्या वीस हजारांच्यावर आहे. तसेच 20, 000 मुलींनाही संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती दिलेली आहे.

कुमार१'s picture

24 Dec 2022 - 4:31 pm | कुमार१

मौलिक विज्ञान आणि वैद्यकीय ग्रंथ वाचविण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेत एक अभूतपूर्व मोहीम आखली होती.

तेव्हा नाझी फौजांचे युरोपमध्ये सर्वत्र थैमान होते. त्यांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी नष्ट करण्याकडे कल होता. त्यामध्ये ग्रंथालयांवरही अर्थातच त्यांचा डोळा होता.

अमेरिकेलाही नाझींच्या रॉकेट हल्ल्याची भीती होती.
म्हणून 25/ 8/ 1942 रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी सी येथे असलेल्या लष्करी ग्रंथालयातील अनेक मौल्यवान पुस्तके (एकूण वजन 75 टन !) गुप्तपणे तिथून 350 मैलांवर असलेल्या Cleveland येथे लष्करी संरक्षणात हलवण्यात आली.

तेव्हा वाचवलेल्या पुस्तकांमध्ये, सन १५४३ मधील मानवी शरीररचनेसंबंधीचा मूलभूत ग्रंथ आणि नंतर प्रसिद्ध झालेल्या रक्ताभिसरणावरील बृहदग्रंथांचा समावेश होता.

पुढे या हलवलेल्या ग्रंथालयातून अमेरिकेचे सुसज्ज राष्ट्रीय वैद्यकीय ग्रंथालय उभे राहिले.

कुमार१'s picture

30 Jan 2023 - 11:02 am | कुमार१

'बोईमेला’ आजपासून

बुकसेलर्स अँड पब्लिशर्स गिल्ड’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘इंटरनॅशनल कोलकाता बुक फेअर’ अर्थात बोईमेला आयोजित केला जातो.

मेळय़ाचे वैशिष्टय़ हे की पुस्तकप्रेमींच्या उपस्थितीच्या निकषावर याचा जगात फ्रँकफर्ट येथील पुस्तकमेळय़ानंतर दुसरा क्रमांक लागतो.

कुमार१'s picture

6 Feb 2024 - 7:56 am | कुमार१

इथे ‘अमृत’ मासिक देखील होते.

या लोकप्रिय मासिकाचे माजी संपादक आणि साहित्यिक मनोहर शहाणे यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले.
आदरांजली !
अमृतमधील उपसंपादकांच्या डुलक्या हे सदर विशेष लोकप्रिय होते.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2024 - 11:29 am | मुक्त विहारि

कौटुंबिक, मासिक होते.

खरोखर जिव्हाळ्याचा विषय...
आपल्या लेखामुळे लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्यात..
मस्त लेख आणि तसेच प्रतिसाद देखील..

शाळेत असताना वाचनप्रेमापायी मी आणि माझा एक मित्र आमच्या 'ग्रंथालय' या साधारणपणे दुर्लक्षित प्रदेशात 'पडीक' असायचो.
ग्रंथपाल हे बऱ्यापैकी स्थूल होते - तेव्हा त्यांना आमची बरीच मदत व्हायची - नवी पुस्तकं आली कि त्यांना नंबर नुसार लावणे, कपाटातील पुस्तकांच्या अदलाबदली, त्याबदल्यात आम्हाला इतरांपेक्षा जास्त पुस्तक मिळायची.

पुस्तकं वाचून संपवायच्या नादात अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीचं पुस्तक घालून वाचणे - कधी कधी यावरून बाबांचे फटके खाणे..

तेव्हा आजसारखे 'एंटरटेनमेंट ब्लॅकहोल्स' (OTT, तुनळी, चेपू, कायप्पा ....) जे आपला नुसता वेळच नाही तर अजूनही बराच काही गिळंकृत करतात, ते नव्हते.
मनोरंजनासाठी वाचन हे उत्तम साधन होता. आणि त्यावेळच्या सक्षम लेखकांनी वाचनाची गोडी वाढवली.
आताच्या पिढीला वाचनाची गोडी लागावी म्हणून जमेल तसे प्रयन्त करत असतो - गिफ्ट म्हणून पुस्तक हा नियम त्याचाच भाग.

कुमार१'s picture

6 Feb 2024 - 4:50 pm | कुमार१

'ग्रंथालय' या साधारणपणे दुर्लक्षित प्रदेशात

वा ! &#128578
..

गिफ्ट म्हणून पुस्तक हा नियम त्याचाच भाग.

कल्पना छान पण ..
माझा अनुभव :

एरवीच्या पारंपरिक समारंभात आपण जर एखाद्याला पुस्तक भेट म्हणून घेऊन गेलो तर आपण अपवाद ठरतो. पुन्हा संबंधित यजमानाला साहित्य वाचनाची आवड आहे का नाही, हा मुद्दा असतो. अजिबात आवडत नसल्यास तो भेट उघडून बघताना आपल्या नावाने खडे सुद्धा फोडू शकतो !
पूर्वी मी नात्यात / परिचितांकडे घरगुती कार्यक्रमास बोलवले असताना ‘दैनंदिन पर्यावरण’ हे पुस्तक भेट देत असे. परंतु त्यानंतर संबंधित व्यक्तींनी कालांतराने त्या संदर्भात कधी काही मत व्यक्त केल्याचे आढळले नाही.

तेव्हापासून मी उगाचच कोणालाही पुस्तक भेट देत नाही.

अहिरावण's picture

22 Feb 2024 - 11:31 am | अहिरावण

मी एका पुस्तक विक्रेत्याशी साटं लोटंच म्हणाना तसे केले आहे.
मित्रांना वाढदिवस, लग्न इ साठी एक भेटपत्र देतो. त्यात त्या पुस्तक विक्रेत्याच्या नावाचा आणि विशिष्ट रकमेचा चेक देतो.
ज्यांना भेट मिळाली त्यांनी जाऊन त्या दुकानातुन हवे ते पुस्त्क खरेदी करावे. अधिकचे पैसे स्वतः टाकावे. पुस्त्क विक्रेता १५ ते २० टक्के सवलत देतो.

अनेक जण हवे ते पुस्तक घेतात... काही जण पिना स्टॅपलर पेन घेतात... ते पण असो.

तीन महिन्यात एखाद्याने नेले नही चेक रद्द होतो.. भविष्यात त्या व्यक्तीस काहीही माझ्यातर्फे दिले जात नाही...

कुमार१'s picture

22 Feb 2024 - 11:47 am | कुमार१

ज्यांना भेट मिळाली त्यांनी जाऊन त्या दुकानातुन हवे ते पुस्त्क खरेदी करावे.

कल्पना आवडली.
कूपनच्या धर्तीवर आहे. :)

सुधीर कांदळकर's picture

16 Feb 2024 - 8:41 pm | सुधीर कांदळकर

कांहीतरी सापडते इथे. महायुद्धात पुस्तके वाचवण्यासाठी केलेली खास कारवाई पाहून छान वाटले. इतिहासातल्या ग्रंथालये जाळून वा इतर मार्गांनी नष्ट करणार्‍या राज्यकर्त्यांच्या पार्श्वभूमीवर हे छानच वाटले.

काल रेडिओ दिनानिमित्त तुमच्या धाग्याची आठवण येऊन गेली. तुमचा रेलवेचा धागा देखील असाच चिरतरुण आहे. अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

16 Feb 2024 - 9:13 pm | कुमार१

धन्यवाद !
तुमच्यासारखी चिरतरुण मंडळी प्रतिसादातून प्रोत्साहन देतात. त्यामुळेच धागा तरुण राहतो :)

बऱ्याच दिवसांनी लिहिते झालात.
येत चला……