आज आपण मीरेच्या भावविश्वातले एक मनोहर रूप पाहूं. "विरहिणी". सर्व संतांनी, त्यांत पुरुष संतही आले, विराणी लिहल्या. जेथे ज्ञानदेवासारखा एक बालयोगीही विराण्या लिहतो तेथे तुम्हाला मीरेने विराण्या लिहल्या, हो, अनेक लिहल्या, याचे नाविन्य वाटणार नाही. पण मीरेकडे वळण्याआधी जरा विषयांतर करण्यास परवांगी द्या.
संतांनी विराण्या कां लिहल्या ? संतांची परमेश्वरावर श्रद्धा आहे. परमेश्वराची व आपली भेट व्हावी; अगदी सायुज्यता नाही तरी किमान समिपता लाभावी ही आंस. पण मुक्तीचतुष्टय हे तत्वज्ञानात ठीक. आपल्या नेहमीच्या व्यवहारात वा भाषेत हे कसे सांगावे ? त्यांनी आजुबाजूला पाहून स्थलकालातित " स्त्री-पुरुषातील आकर्षण " आपली भावना व्यक्त करण्यासाठी वापरावयाचे ठरविले. भक्तांनी आपल्याकडे स्त्रीची भुमिका घेतली. मुख्य कारण तत्कालीन स्त्रीसमाज हा आपल्याकडे नेहमीच दुय्यम भुमिका घेत होता. तिचा प्रियकर तिचा परमेश्वरच होता. परमेश्वर श्रेष्ठ, भक्त त्याच्या पायाशी लीन होणारा , या दृष्टीने हे योग्यच होते. लक्षात घ्या, एकदा ही भुमिका घेतल्यावर भक्त स्त्री कीं पुरुष ह्याला काहीच महत्व उरले नाही. यांत शब्द कसेही वापरले तरी लैंगिक व्यवहार सुचवावयाचा नव्हता. सर्व केवळ भक्ताला आपल्याला वाटणारी परमेश्वर प्राप्तीची खोल अपेक्षा दाखवावयाची होती. म्हणूनच संत तुकोबा बिन्धास्त लिहतात "बळियाचा अंगसंग झाला आता, नाही भवचिंता -- माऊली म्हणतात " नको नको हा वियोग, कष्ट होताती जीवासी ’ भारतातील सर्व संत विराण्या लिहतात. सरतेशेवटी भक्त पृथ्वीवर आणि परमेश्वर दूर,वर आकाशात. भक्त कायमचा विरहीच रहाणार. भारतातील सर्व संत विराण्या लिहतात. कै. काका कालेलकर म्हणतात ख्रिस्ती धर्मातही विराण्या आहेत. असो
गली तो चारों बंद हुई
गली तो चारों बंद हुई मैं हरिसे मिलूँ कैसे जाय॥
ऊंची-नीची राह लपटीली, पाँव नहीं ठहराय।
सोच सोच पग धरूँ जतनसे, बार-बार डिग जाय॥
ऊँचा नीचां महल पियाका, म्हाँसूँ चढ्यो न जाय।
पिया दूर पंथ म्हारो झीणो, सुरत झकोला खाय॥
कोस कोसपर पहरा बैठ्या, पैंड पैंड बटमार।
हे बिधना कैसी रच दीनी, दूर बसायो म्हारो गाँव॥
मीराके प्रभु गिरधर नागर, सतगुरु दई बताय।
जुगन-जुगनसे बिछड़ी मीरा, घरमें लीनी लाय॥
लपटीली राह ---निसरडी वाट, डिगना--- घसरणे
झीणा---दुबळा. बारीक, झकोला खाय ---झोक जाणे
बटमार ---लुटमार करणारे, लुटारू, बिधना ---ब्रह्मदेवाने
जुगन जुगन ---युगे युगे, दई --- देव, ईश्वर
विराणी तशी सोपी आहे. खरे म्हणजे मीरेला आपला प्रियकर कोठे आहे त्याचा पत्ताच नक्की माहीत नव्हता. पण ती शेवटी म्हणते त्या प्रमाणे सद्गुरू कृपावंत होऊन तेवढे तरी सांगतो. उत्साहाने मीरा त्याच्याकडे जावयास निघते.आणि पुढे काय झाले ते मीराबाई सांगत आहे.
चारी वाटा बंद झाल्या आहेत. आता हरीची भेट कशी होणार ? चढ-उताराची वाट आणि तीही निस्ररडी.
कितीही काळजीपूर्वक पाऊल ठेवले तरी पाय घसरतच आहे..प्रियकराचे घर इतक्या उंचीवर, मी बिचारी चढणार तरी कशी ? या चिंचोळ्या पायवाटेवर माझ्या झोकांड्या जाऊं लागल्या आहेत. घरच्या लोकांचे डोळ्यात तेल घालून लक्ष व समाजाची टीका यांना उद्देशून ती म्हणते जागोजागी पहारा व वळणावळ्णावर लुटारू ! ह्या विधात्याने आम्हा दोघांत इतके मैलोगणती अंतर कां बरे ठेवले आहे.
शेवटी ती म्हणते सद् गुरूने पत्ता दिला खरा, आता तरी युगेयुगे विरहात असलेल्या मीरेला आपले घर मिळॊ !
पहिल्यांदी ही विराणी वाचली तेव्हा आठवण झाली ती आम्ही 65-70 वर्षांपूर्वी शाळेत असतांना सायकलवरून सिंहगडावर जात होतो त्याची. पाऊस लागला तर भिजत भिजत. सायकली पायथ्याशी ठेवून डोंगर चढावयास सुरवात करावयाचो. म्हणजे रस्ता वगैरे होता म्हणा पण तो शाळेतल्या मुलांकरिता नाही अशीच आमची समजूत. थोड्याफार फरकाने आमची वाटचाल मीरेसारखीच होती. ..... गया वो जमाना. आता आठवून फक्त म्हणावयाचे "वो कागजकी कश्ती, वो बारिशका पानी.",
दुसरी विराणी आहे
घडी एक नहिं आवडे,
घडी एक नहिं आवडे,
तुम दरसण बिन मोय।
तुम हो मेरे प्राणजी,
कासूँ जीवण होय॥
धान न भावै, नींद न आवै,
बिरह सतावै मोय।
घायल सी घूमत फिरूँ रे,
मेरो दरद न जाणै कोय॥
दिवस तो खाय गमाइयो रे
रैण गमाई सोय।
प्राण गमाया झुरताँ रे,
नैण गमाया रोय।
जो मैं ऐसी जाणती रे,
प्रीति कियाँ दुख होय।
नगर ढँढोरा फेरती रे,
प्रीति करो मत कोय॥
पंथ निहारूँ डगर बहारूँ,
ऊभी मारग जोय।
मीराके प्रभु कब र मिलोगे,
तुम मिलियाँ सुख होय॥
धान... भात, (येथे) भोजन, निहारना ... निरखून पहाणे
बुहारना ...स्वच्छ करणे, डगर ... रस्ता
तुला पाहिल्याशिवाय एक घडीही चैन पडत नाही.तू माझा प्राणच आहेस तर मग तुझ्याशिवाय जगावयाचे तरी कशासाठीं ? तुझा विरह सतावतो; त्यामुळे अन्नही रूचत नाही झोपही येत नाही. मी घायाळासारखी वणवण फिरत रहाते पण माझे दु:ख तर कोणालाच कळत नाही. काही तोंडात टाकले तर दिवस फुकट गेला आणि क्षणभर डोळा लागला तर रात्र वाया गेली असेच वाटते.झुरून झुरून प्राण गेले आणि रडून रडून डोळे ! वैतागून मीरा म्हणते "प्रेम केल्याने असेच दु:ख मिळते हे माहीत असते तर सगळ्य़ा शहरात दवंडीच पिटली असती की "लोक हो सावध व्हा. कोणीही प्रेम करू नका." अंती मीरा ती ज्या मार्गावरून चालली आहे त्याकडे निरखून पाहते आणि म्हणते मी हा मार्ग स्वछ करीन पण शेवटी हा रस्ताच आपणाला जाळून टाकणार आहे कीं काय ?
मीरेची विरहवेदना खोल जखम करून जाते, नाही ?
शरद
प्रतिक्रिया
12 Nov 2019 - 12:10 pm | यशोधरा
सुरेख!!
13 Nov 2019 - 7:52 pm | अलकनंदा
फारच छान! अजून लिहा, ही विनंती.
19 Nov 2019 - 8:21 pm | अपश्चिम
प्रेम नि विरह , दोन्हि भावना शब्दतीत च
20 Nov 2019 - 11:47 am | जॉनविक्क
ह्या जीवन्मुक्त लोकांनी सगुण साकाररुपातल्या ईश्वराचे गुणगान करून अजाणतेपणी अतिसमान्यांचे जेवढे अध्यात्मिक नुकसान केले आहे त्याची खरोखर भरपाई होणे शक्य नाही. सगुण साकारतेला शरण अध्यात्माशी असंग असणाऱ्यापुरता मर्यादित असणे धर्माच्या दीर्घकालीन मुख्य प्रयोजनासाठी आवश्यक मानतो. असो, इथे किमान स्त्री पुरुष भेदाची तरी व्यवस्थित पोलखोल झाली आहे हे वाचून आंनद वाटला.