गंडाबंधन झाल्यावर शिक्षणाला सुरुवात झाली हे मागच्या भागात लिहिलंच आहे. खां साहेबांनी पहिला राग शिकवायला घेतला तो भैरव. संपूर्ण; म्हणजे सगळ्या सुरांचा राग. सप्तकातले सगळे सुर येतात यात. भैरव म्हणजे शंकर. खाली येताना हलणार्या धैवताचा गोडवा अत्यंत गोड लागतो. रागाची प्रकृती धीरगंभीर. पहाटेच्या वेळची मऊ मृदु कोवळीक आणि शिवाच्या डमरूचा, शंखाचा धीर गंभीर नाद याच मिश्रण आहे या रागात. रागाचा आवाका मोठाच आहे तसा पण लगेच ओळखता येतो.
खां साहेबांच्याकडे शिकण्यापूर्वी आईकडे तसे जुजबी शिक्षण झालं होतं माझं. खां साहेबांनी शिकवायला काढला तेंव्हा 'भैरव' म्हणून ओळखला होता मी, पण बोलले मात्र नाही. राग संपूर्ण शिकून झाल्याशिवाय ते सहसा रागाचं नांव सांगायचे नाहीत. मी सुद्धा विचारलं नाही कधी. खां साहेबांचा आवाज अत्यंत सुरेल. तीन सप्तकात तोच गोडवा टिकायचा. माझ्या स्वरात शिकवताना त्यांना कधी प्रश्न आला नाही. एका हाताने ताल धरून दुसर्या हाताने तानपुरा छेडत सहज शिकवायचे. तालाला तर ते इतके पक्के होते की चार चार आवर्तनं ताल न धरता पाचव्या आवर्तनाला सहज समेवर यायचे. सूर आणि ताल यांचं शिक्षण समसमान चालतं.
भैरवाचे सूर घोटून घ्यायला सुरवात केली. मी काय म्हणते इकडे बारीक लक्ष असायचं. श्रुतींचा फरक झालेला लगेच लक्षात यायचा. पुन्हा पुन्हा सांगायचे चुकलं तर. कंटाळा नाही केला कधी. किंवा जाऊदे म्हणून सोडूनही नाही दिलं. बरोबर येईपर्यंत पुन्हा पुन्हा सांगायचे, स्वतः गाऊन दाखवायचे. बरोबर आलं की त्यांच्या चेहर्यावर अगदी पुसटसं हलकं स्मित यायचं. जे जमलं ते पुन्हा पुन्हा घोटून घ्यायचे. फार प्रेमानं शिकवायचे. असं शिकवणं म्हणजे फार संयमाचं काम. लिहून वगैरे घेतलेलं चालायचं नाही तालमीच्या वेळेला. जे काही लिहायचं असेल ते नंतर. आपलं आपण आपल्यासाठी लिहायचं.
"कागज पर उतारकर कोई गाना सिखता है? बेवकूफी. गाना तो यहां होता. हैं यहा! भेजे में. फिर उतरता है गले में" असं म्हणायचे. खरंच आहे ते. सरगम पाठच व्हायला हव्यात. पाठ झाल्या की वेगवेगळ्या लयीत घोटायच्या त्या. दुगुन, तिगुन, चौगुन. मात्रांचा हिशेब चोख. अर्ध्या, पाव मात्रेचा फरकसुद्धा चालायचा नाही. सगळं कसं मोजून मापून. असं असलं असलं तरी ते मोजमाप, हिशेब वगैरे गाण्यात दिसता कामा नये. दिसलं पाहिजे फक्त सौंदर्य आणि गोडवाच. संपूर्ण तंत्रात तर गायचं पण हेच तंत्र गाण्यात पूर्ण झाकूनही टाकायचं जरासुद्धा दिसता कामा नये. इतकं उत्स्फूर्त आलं पाहिजे.
माझ्याकडे शिकणार्या विद्यार्थीनी चिजांचे नोटेशन मागत. नोटेशन ही पाश्चिमात्य पद्धत. आपल्या संगीताचं नोटेशन होणार नाही. अगदी शेजारच्या दोन स्वरांमध्ये सुद्धा श्रुतींचे स्वर लागतात. त्याचं कसं करायचं नोटेशन? आणि केलं तरी ते वाचून का कुठे गाणं येईल! पण आजकाल शिकणार्यांना नोटेशनच्या खांबांशिवाय राग उभारताच येत नाही. नोटेशन वरून शिकून उभारल्या जातो तो ओबडधोबड सर्कशीचा तंबू. मोत्याच्या झालरी लावलेल्या शामियान्याचा डौल आणि सौंदर्य त्याला कुठे असणार! डोक्यात आणि कंठात उतरवणे हेच खरं गाणं. काही काही विद्या गुरूसमोर बसूनच शिकाव्या लागतात. त्याला पर्याय नाहीच.
आता मला वाटतं की, खां साहेब मला काय/कसे शिकवतात या कडे आईचे लक्ष असले पाहिजे. पण ती तालिम सुरू असताना आमच्यात कधीच यायची नाही. नंतरही आज अमुक शिकवलं का? तमूक कसं शिकवलं म्हणून कध्धी मला विचारायची नाही. मी एकटी गात असताना चूकलं तर सांगायची मात्र. हे असं नाही असं म्हणून पण ढवळाढवळ नाही.
ललितापंचमीस मी शिकायला सुरवात केली आणि काही दिवसांनी दिवाळी आली. आमच्या घरी अनेक परिचीत कलाकार, कला क्षेत्राशी संबंधीत अशा अनेक सुह्रद जनांचा राबता असायचा. आईचा स्वभावही मानी पण मोकळा होता. माणसे जोडली जायची. आताही दिवाळी तोंडावर आली आहे. आनंदाचा. सकल अनुभूतींनी तॄप्त होण्याचा काळ. दिवाळीच्या सुमाराची एक आठवण मनात येते आहे. ती सांगते आणि हा भाग पूर्ण करते.
मी खां साहेबांच्याकडे शिकायला सुरवात केली तेच वर्ष असावं बहुतेक. एक चांगले परिचीत कलाकार गृहस्थ आमच्या घरी आले. मी नुकतीच तालिम घ्यायला सुरुवात केली होती. माझी चौकशी करून ते म्हणाले, " काय मग.. येणार का बाईंच्याकडे?" कोणत्या बाईंबद्दल बोलता आहात? मी विचारलं.
"अहो, तुमच्या घराण्यातल्या एक फार मोठ्या बुजुर्ग गायिका इथं हाकेच्या अंतरावर रहातात. फार म्हणजे फार मोठ्या. आईला म्हणाले काय बाई! अजून नेलं नाहीत का तिला त्यांच्याकडे? अहो दर्शन तरी करून आणायचं. माझ्याकडे वळून ते म्हणाले "मी जाणार आहे आता. चला येता तर"
आईनं ते कुणाबद्दल बोलत आहेत ते ओळखलं. हसून म्हणाली. अहो अवश्य जा तिला घेऊन त्यांच्या पाया पडायला. आत्ताच गंडा बांधलाय तिनं. मी घेऊन जाणारच होते तिला एकदा. मग मी गेले. त्यांच्याबद्दल मी खूप काही ऐकून होते पण त्यांना पाहिलेलं नव्हतं. त्या फार वॄध्द होत्या. गोव्याच्याच त्याही. गाणं बंद केलेलं होतं. फक्त भजन करीत घरीच स्वतःसाठी. एकेकाळी अतिशय धनवान आणि सौंदर्यवान म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचा विषय निघाला की मोठमोठ्ठे लोक आजही कान धरतात. आई तर त्यांना सरस्वतीच मानायची.
आम्ही गेलो. बाई त्या गृहस्थांना चांगल्या ओळखत होत्या. आमच्या घरापासून जवळच त्यांची इमारत होती. अतिशय सुंदर! तेजस्वी, गोरापान रंग. करारी चमकदार, अगदी वेगळ्याच रंगाचे डोळे. सडपातळ उंच बांधा. पिकलेले केस. मोहक निरागस हास्य ऐंशीच्या आसपास वय असेल त्या वेळी. या या म्हणून बाईंनी स्वागत केलं. मी त्यांच्या चेहर्याकडे पहातच राहिले. या वयात इतकं सौंदर्य!! तरूणपणी काय असेल!! त्यांनी ओळख करून दिली.
" बाई माझ्या! इतनी बडी हो गयी." माझ्या चेहर्यावरून ममतेनं हात फिरवीत त्या म्हणाल्या. "अगं तुला कित्ती तान्ही असताना पाहिलं होतं!" त्यांचे तेजःपूंज डो़ळे मोठ्या कौतूकानं मला न्याहाळात होते. मी पायाशी वाकले ती तिथंच त्यांच्या पायाजवळ बसले. त्यांच्या मऊसूत पायावरून हात फिरवीत राहिले. उत्स्फूर्तपणे बाई मधेमधे हिंदी बोलत. त्या उर्दुही उत्तम बोलत असत. त्यांच्या दिवाणखान्यात त्यांच्या तरुणपणाची काही चायाचित्रं लावलेली होती. त्यांच्याइतकी सुंदर स्त्री मी अजूनपर्यंत तरी पाहिली नाही. राजा रविवर्म्यां सारख्या चित्रकारानं त्यांची चित्र काढलेली आहेत. त्यातील एक त्यांच्या दिवाणखान्यात लावलेलं आहे.
आईला त्या ओळखत होत्या. माझ्या जन्मदात्यालाही त्या ओळखत होत्या. आईची चौकशी केली. खां साहेबांबद्दल विचारलं. त्यांचा त्या एकेरी उल्लेख करीत होत्या. मला गम्मत वाटली. "क्या बताऊं! छोटा था तब मेरे गोद मै बिठाती थी उसको. अब बडा अच्छा गाता है". मी त्यांचा गंडा बांधला हे ऐकून त्यांना फार आनंद झाला. "दत्तालाच काळजी. तुला छान तालिम मिळेल." म्हणाल्या. तेवढ्या संपूर्ण वेळ त्यांचे ते सौंदर्य, हावभाव, तेजस्वी डोळे मी पहात होते. पुढे चार पाच वेळा त्यांना भेटायचा योग आला. पण ही पहिली भेट दिवाळीच्या सुमाराची. " खूश रहो बेटी " म्हणून त्यांनी दिलेला आशीर्वाद ही माझी दिवाळीची भेट. दिवाळीच्या निमित्तानं आठवणींच्या पोतडीतून तिचा सुगंध दरवळतोच आहे अजून.
गौरीबाई गोवेकर.
प्रतिक्रिया
21 Oct 2019 - 7:35 pm | पहाटवारा
त्या बाई .. अंजनीबाई मालपेकर ?
22 Oct 2019 - 12:39 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
.......
21 Oct 2019 - 8:21 pm | जालिम लोशन
सुरेख
21 Oct 2019 - 8:49 pm | सुधीर कांदळकर
आवडले. अगदी निरांजनाच्या प्रकाशासारखे स्निग्धसात्विक लेखन. आपले मनही तसेच सात्विक असावे.
फारच छान.
पुभाप्र, धन्यवाद.
22 Oct 2019 - 12:40 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
खूप खूप धन्यवाद सुधीरजी. आवडलं की नक्की लिहा.
22 Oct 2019 - 12:48 am | विजुभाऊ
खूप छान लिहिताय हो.
दोन श्रुतींमधले सूर जो ऐकू शकतो त्याला देवाने स्पेशल मेंदु दिलेला असतो.
भाग्यवान आहात.
22 Oct 2019 - 4:30 am | जॉनविक्क
व्वा. क्या केहना !
- पुन्हा एकदा मुग्ध, भसाडा परंतु जाण जपणारा जॉनविक्क.
22 Oct 2019 - 12:41 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
धन्यवाद
22 Oct 2019 - 9:59 am | ज्ञानोबाचे पैजार
हा भागही आवडला,
सुरेख होते आहे लेखमाला.
पैजारबुवा,
22 Oct 2019 - 10:48 am | सुमो
आवडला.
लेखमाला अत्यंत ओघवती आणि उत्तम लिहिताहात तुम्ही.
पु भा प्र.....
22 Oct 2019 - 10:51 am | अनिंद्य
ह्या मालिकेतील लेखांची वाट बघत असतो.
वेगळ्या जगाचे सुंदर अनुभवकथन आणि अजिबात बडेजाव नसलेले. खूप आवडते.
हा भागही आवडला.
22 Oct 2019 - 12:41 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
धन्यवाद
22 Oct 2019 - 10:54 am | संजय पाटिल
आवडला हा पण भाग!!!
पु.भा.प्र.
22 Oct 2019 - 2:24 pm | जगप्रवासी
जशी काही वाऱ्याची मंद झुळूक. खूप छान वाटतं वाचताना.
नोटेशन वरून शिकून उभारल्या जातो तो ओबडधोबड सर्कशीचा तंबू. मोत्याच्या झालरी लावलेल्या शामियान्याचा डौल आणि सौंदर्य त्याला कुठे असणार! >> वाह वाह! काय चपखल उदाहरण / उपमा दिलात. खूप आवडलं वाक्य
22 Oct 2019 - 5:23 pm | गौरीबाई गोवेकर नवीन
धन्यवाद
25 Oct 2019 - 10:56 am | श्वेता२४
डोक्यात आणि कंठात उतरवणे हेच खरं गाणं. काही काही विद्या गुरूसमोर बसूनच शिकाव्या लागतात. त्याला पर्याय नाहीच.
हे मात्र अगदी खरं. पु.भा.प्र.
28 Oct 2019 - 8:00 am | अर्धवटराव
त्यानेच सुरु केलेल्या मिपावर असली दर्दी संगीतमाला बघुन तो नक्कीच सुखावला असता.