‘शब्दमल्हार’ नियतकालिक, ऑक्टोबर 2019 च्या अंकात श्री. रविंद्र पांढरे यांनी लिहिलेला लेख:
दांभिकतेवरचं परखड भाष्य:
‘मी गोष्टीत मावत नाही’
- रवींद्र पांढरे
सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा बहुजन समाजजीवनाचा एक महत्त्वाचा घटक. याचं जगणं म्हणजे समाजजीवनाचं, समाज संस्कृतीचं प्रतिबिंबच. चाकोरीबद्ध आयुष्य हे याचं प्रातिनिधीक वैशिष्ट्य. स्वप्न पाहील, पण ते पूर्णत्वास गेलंच पाहिजे यास्तव आग्रही नाही. समाजकारण, राजकारण, अध्यात्म, साहित्य आणि कामजीवनही, यावर तासनतास चर्चा करेल, त्यावरचं आपलं आग्रही मत हिरीरीने मांडले, पण ते केवळ चर्चेपुरतं, आपआपल्या वर्तुळाच्या मर्यादेत. हा तसा पापभिरू, मतं मांडताना भलेही विज्ञान-निष्ठ असल्याचा आव आणेल, पण प्रत्यक्ष जगतांना सामाजिक रूढी- परंपरा सहसा ओलांडणार नाही. राजकारणावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं मत ठामपणे मांडेल, पण ‘झिंदाबाद... जय हो... तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, या पलीकडे याची मजल जात नाही. देवाधर्माला थोतांड म्हणून हिनवेल, पण सोमवारचा उपवास आणि शनिवारचं शनिदर्शन सहसा चुकू देणार नाही. कामजीवन म्हणजे जणू पापच असा अविर्भाव. ‘लय संधी आल्या आयुष्यात पण आपुन कधी वाकडं पाऊल टाकलं नही’ असं उघड म्हणतांना मनात मात्र संधी हुकल्या चा पश्चाताप करेल. ‘आपल्याले वाचनाची लय आवड हाये’ असं छातीठोकपणे सांगताना, खांडेकर, फडके, पुलं आणि शिवाजी सावंत यांच्या अलीकडच्या चार लेखकांचीही नावं याला सांगता येत नाहीत. अशा या सामान्य माणसाचं प्रातिनिधीक जगणं डॉ. सुधीर देवरे यांनी आपल्या ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीत अचूक शब्दबध्द केलंय.
‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी म्हटलं तर सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुधर्म देवकिरण याचं आत्मकथन आहे. पण हे आपण नेहमी अनुभवलेल्या पारंपरिक आत्मकथनासारखं आत्मकथन नाही. निवेदकाच्या जगण्यातील आत्मानुभवाच्या कथनातून आणि या जगण्यावर केलेल्या, कधी मिश्किल तर कधी गांभिर्यपूर्वक भाष्यारतून ही कादंबरी उलगडत जाते. ‘आयुष्याच्या कादंबरीत कथानक कुठं विकसत जातं, ते खुरटंच राहतं ना आयुष्यभर, मग आविष्कारात कथानक विकसत गेलं पाहिजे हा अट्ट.हास का?’ असा प्रश्न उपस्थित करून निवेदक कादंबरीची परंपरागत मांडणी व शैली टाळून आपल्या खास अशा स्वतंत्र नाविन्यपूर्ण शैलीत आत्मकथनाची रचना व मांडणी करतो. मांडणी व शैलीच्या दृष्टीने पाहू गेल्यास ही कादंबरी प्रायोगिक कादंबरी आहे. प्रायोगिक कादंबऱ्या बहुदा सर्वसामान्यांना दुर्बोध वाटतात असा अनुभव आहे. पण ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी याला अपवाद आहे. प्रायोगिक असूनही ही कादंबरी दुर्बोध वाटत नाही. सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारं सुधर्म देवकिरण याचं कादंबरी रूपातलं हे आत्मकथन साहित्यावर निष्ठा असणाऱ्या व मराठी साहित्य सातत्याने वाचणार्यार वाचकाला सहज आकळेल असं उतरलं आहे. परंपरागत कादंबरी सारखं कथानक विकसित होत नसलं तरी, गोष्टीत न मावणाऱ्या सर्वसामान्य माणसाची ही अफलातून गोष्टच आहे. सूक्ष्म निरीक्षणातून व सखोल चिंतनातून सर्वसामान्यांचं सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक आणि लैंगिक अशा विविध भूमिकेतील जगणं या कादंबरीत लेखकाने अचूक चिमटीत पकडलंय. चाकोरीतलं सामान्य जीवन जगत असतानाची सामान्य माणसाच्या मनातली विविध विषयासंदर्भातली मानसिक आंदोलनं तर लेखकाने बिनचूक टिपली आहेतच, पण त्यावर केलेल्या कधी मिश्किल तर कधी गंभीरतापूर्वक भाष्यामुळे कादंबरी केवळ चिंतनियच नाही तर रंजकही झाली आहे.
कादंबरीतील जगणं वास्तवदर्शी आहे. चाकोरीबद्ध जीवन जगणारा सामान्य माणूस घराचं थडगं करून, थडग्यात राहून संसाराचं सुख चाखत राहतो. सकाळी पोरं, संध्याकाळी बाग, रात्री बायको हेच रूटीन म्हणजे जगणं. मग ‘जग बदललं तरी मी जिथल्या तिथेच’ या जाणिवेने उदासतो. अपेक्षा वाढल्या की नात्यात तेढ निर्माण होते, मग कुणी कुणाचं नाही असं म्हणतो. सामाजिक संकेत उपचार सांभाळता सांभाळता हैराण होतो, सर्वसामान्यांच्या अशा जगण्यावर सुधर्म देवकिरण, ‘सामान्य माणूस माणसासारखा समग्र जगत नाही. आपल्या एका मढ्याची व्यवस्था लागावी म्हणून आयुष्यभर अनेक मढ्यांसाठी सामान्य माणूस धावाधाव करत असतो. भाविस्वर्गासाठी वास्तव जगण्यात नरक भोगतो’ अशा शब्दात परखड भाष्य करतो.
सर्वसामान्यांचं धार्मिक जगणं, उपचार बहुदा दांभिकतेने ओतप्रोत भरलेले असतात. या दांभिक धार्मिक जगण्यातील वास्तव निरीक्षणे, ‘कुंभमेळ्यात म्हाताऱ्या आई-बाबांना जाणीवपूर्वक विसरून जाणे, स्वाध्यायी म्हणवणाऱ्या बाईचे, उष्टे अन्न भिकारणीला न वाढता डुकरां- कुत्र्यांना घालणे,’ धार्मिकतेतील ढोंग उघड करतात. निवेदक म्हणतो, ‘देवाने माणसाला नाही तर माणसाने देवाला जन्माला घातले आहे. माणसाला देव कळतो पण माणूस कळत नाही. जो ढोंग करतो त्याला आपण अस्तिक म्हणतो. टोकाची धार्मिकता पाळणारे लोकच नैतिकता धुळीला मिळवताना दिसतात. धार्मिक दंगली अस्तिकतेमुळे होतात.’ सुधर्म देवकिरणची ही निरीक्षणे धार्मिक दांभिक जगण्यावर अचूक बोट ठेवतात.
मला राजकारणावर बोलायला आवडत नाही असं म्हणतच, राजकारणाविषयीचं सर्वसामान्यांचं मन निवेदक उघड करून दाखवतो. उठाठेवी, लाचखोरी, सौदेबाजी करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार करणं म्हणजे स्वार्थासाठी केलेली हुजरेगिरी, चमचेगिरी, लाचारी आहे असं त्याला वाटतं. ‘ज्यांनी मत देऊन निवडून दिलं त्यांच्याकडूनच असे सत्कार घडवून आणणं हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा ठरवायला हवा’ असं सांगून निवेदक स्वार्थी राजकारण्यांचं व समाजाचंही पितळ उघड करतो. मटक्याचा अड्डा चालवून गब्बर झालेल्या धनदांडग्यांच्या हातून होणारे गुणवंतांचे सत्कार ही निवेदकाला चीड आणणारी घटना आहे. ‘राजकारणातील खरोखरीच्या रिमोटकंट्रोलला लाज वाटली पाहिजे’ अशा शब्दांत निवेदक हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करतो.
सुधर्म देवकिरण कादंबरीत (तुटक तुटक) लेखक असल्यामुळे त्याची साहित्यविषयक मतं जाणून घेणंही मोठं उद्बोधक आहे. ‘साहित्य संमेलनात माझा न्यूनगंड मला टोचत राहतो. बारक्याशा कवीचाही माझ्यावर दबाव पडतो. प्रतिथयश आहेत त्यांच्या वाऱ्यालाही मी भिरकत नाही. संमेलनात कोणी ओळख करून दिली तर ती हवेतल्या हवेत. मी औपचारिक होतो. अशा ओळखी होत नसतात हे मला चांगल्या प्रकारे कळतं. अशा वातावरणात मी उपराच राहतो.’ सुधर्म देवकिरणची ही मानसिकता, अनुभव सर्वसामान्य लेखकाला आपलीच मानसिकता, आपलेच अनुभव वाटतात. स्वखर्चाने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा, बापाच्या स्मृतिप्रित्यर्थ कविता स्पर्धांचं आयोजन, अशा प्रसंगांच्या वास्तवदर्शी वर्णनातून निवेदक नवोदित सर्वसाधारण कवीचं, साहित्यिकांचं केविलवाणंपण, त्याची लाचारी अधोरेखित करतो. ‘ज्युनियर लेखक सिनियर लेखकाला देव मानतो, सिनियर लेखक ज्युनियर लेखकाला पाण्यात पाहतो. मी कनिष्ठांचा द्वेष करतो आणि वरिष्ठांचा हेवा.’ साहित्य क्षेत्रासंबंधीची ही निरीक्षणं देखील नोंद घ्यावी अशी आहेत.
कामजीवन हा मानवी समाजजीवनाचा जेवढा हळवा, नाजूक तेवढाच महत्त्वाचा अपरिहार्य घटक. कामजीवनावरही कादंबरीत झगझगीत प्रकाश टाकलेला आहे. अनुभव कथन करताना सुधर्म देवकिरण म्हणतो, ‘लता आठवीत असताना आमंत्रणाचं हसायची, तिरकस पाहायची. अशीच वाया गेली. जोरणची मुलगी मामेबहीण म्हणजे चेष्टेने बायकोच. आम्ही एका रात्री एकाच अंथरुणात एकाच पांघरूणाखाली झोपलो डाराडुर. जाग आल्यावर कळलं रात्र वाया गेली. ही मामेबहीण पुढे कितीतरी दिवस पश्चातापासाठी पुरली. तिसऱ्या पायाचा ठणका स्वस्थ बसू देत नाही. मी समोर मोहिनी, रंभा, उर्वशी उभी करतो, माझ्यात घर्षण करत मोकळा होऊन जातो. ‘सुधर्मचे हे अनुभव किती प्रातिनिधीक आहेत याची खूण वाचकाला पटते. सुधर्म आणखी म्हणतो, ‘‘समोरचं पक्वान्न पाहून असं का होतं वखवखल्यासारखं. माझ्या वासनेची सोय म्हणून मी लग्न केलं. प्रत्येक व्यक्तीला गरमागरम भिन्नलिंगी शरीर आवडतं.’ ही निरीक्षणं नोंदवतानाच दांभिकतेवर बोट ठेवत तो म्हणतो, ‘‘संधी मिळूनही मी व्यभिचार केला नाही. नैतिकतेत बसत नव्हता म्हणून, की भितीने हृदय धडधडत होतं म्हणून?’’ सुधर्मचा हा प्रश्न प्रातिनिधीकच. कामजीवनाच्या अशा अनुभवां- निरीक्षणांसोबतच, ‘सलिंग प्रजोत्पादन उत्क्रांतीसाठी यशदायी म्हणून नर- मादीत आकर्षण असतं’ असं शास्त्रधारित विवेचनही कादंबरीतून आलेलं आहे.
‘आपल्या सभोवती निर्माण होणाऱ्या पोकळीत आपण आपलं एक भावव्याप्त अवकाश निर्माण केलं पाहिजे, ओढाओढीत माणूस माणसांत राहत नाही, वारा त्याचं काम बरोबर करतो, आपण फक्त फेकत रहावी घाण. यश धरून ठेवता आलं पाहिजे वर्तमानाच्या चिमटीत, म्हणजे उदासिनतेचा झटका येणार नाही.’ अशी सुभाषितवजा वाक्ये कादंबरीत पानोपानी विखुरली आहेत. मुळातून वाचावी व आस्वाद घ्यावा अशी ही कादंबरी आहे.
एकूणच सर्वसामान्यांचं जगणं प्रतिबिंबित करणारं आत्मनिवेदन व दांभिक जगण्यावरचं परखड भाष्य या द्वारे ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीतून गोष्टीत न मावणाऱ्या सामान्य माणसाची असामान्य गोष्ट उलगडत जाते.
दांभिक जगण्यावर परखड भाष्य करणारी ही कादंबरी आपणच आपल्याला आपली खूण पटवून देते. साहित्याविषयी कुतूहल, आस्था असणार्याष प्रत्येकाने वाचावी अशी ही दखलपात्र, लक्षणीय प्रायोगिक कादंबरी आहे.
कादंबरी: मी गोष्टीत मावत नाही
लेखक: डॉ. सुधीर राजाराम देवरे
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन, पुणे
प्रतिक्रिया
7 Oct 2019 - 4:35 pm | डॉ. सुधीर राजार...
272 वाचकांनो धन्यवाद
7 Oct 2019 - 10:14 pm | जॉनविक्क