'तंबोरा' एक जीवलग - ६

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
20 Sep 2019 - 8:31 pm

कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण सोपे नसते. जे शास्त्र शिकायचे ती कला असेल तर ते आणखीन कठीण होते. त्यातही गाणे असेल तर महाकठीण. आईची तारेवरची कसरत पहात माझे असेच मत झाले होते. पुढे माझे गाण्याचे शिक्षण सुरू झाले तसे माझे हे मत दृढ होत गेले. आज तर त्यात काहीच संशय नाही.

गानकला शिकून तिचा व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे जन्मजात असाव्या लागतात, काही आपल्या नशिबात असाव्या लागतात तर काही कष्ट करून मिळवाव्या लागतात. पैकी कंठात सूर आणि विद्या ग्रहण करण्याइतपत बुद्धी हे भांडवल जन्मतः असावे लागते. गाणं ही गुरूमुखी विद्या असल्याने उत्तम गुरू नशिबात असावा लागतो त्या पुढे कष्ट करून मिळालेली विद्या वाढवणे, तिच्यावर हुकूमत बारकावे आणि ती टिकवून ठेवणे हे सर्व कष्टसाध्य आहे.

पहिल्या दोन नसतील तर कितीही कष्ट करून काही फायदा नाही. दुसरी नसेल तर मिळालेल्या विद्येचा व्यवसाय म्हणून वापर करणे दूरच रहाते. या कारणाने महाविद्यालयातील पदव्या मिळविण्याइतके काही गाणे सहज सोपे ठरत नाही. शिकून संपले ते कसले गाणे! म्हणूनच या शिक्षणाला 'साधना' असं म्हणातात. साधना कधीच संपत नाही. ती अखंड चालू रहाते.

माझे अगदी प्रारंभीचे शिक्षण आईकडे झाले तरी मी खरी तालीम घेतली ती आमच्या भेंडीबाजार घराण्याच्या प्रसिद्ध खां साहेबांच्याकडे. त्या नंतर काही तालिम पतियाळा घाराण्याचीसुद्धा मी घेतली. माझ्या गंडाबंधनाचा दिवस अजूनही स्पष्ट आठवतो. गंडाबंधन म्हणजे आजपासून तुम्ही माझे गुरू व मी शिष्य. असे गुरूजवळ कबूल करून त्यांच्याकडे विद्येची याचना करणे. त्या नंतर गुरू जे शिकवतील, जसे शिकवतील, जेंव्हा शिकवतील ते सर्व कबूल. ह्या 'जे', 'जसे' आणि 'जेंव्हा' याचा समतोल राखत सातत्य राखणे फार कठीण आहे. गुरूंबद्दल पूज्य भावना व्यक्त करायच्या म्हणून अशा गंडा बंधनाचा एक छोटासा समारंभ करण्याची पद्धत असायची. गुरुंची आणी तंबोर्‍याची पूजा करायची. गुरूंना वस्त्रे, फुले, फळे, दक्षिणा अर्पण करायची असे साधारणतः त्याचे स्वरूप. हल्ली काही असे नसते. गुरूशिष्य परंपरेने शिकवणारे गुरू आणि शिकणारे शिष्य आता कुठले असायला?

माझे गंडाबंधन ललितापंचमीच्या दिवशी झाले. खां साहेब आमच्याचकडे रहात होते. त्या दिवशी सायंकाळी त्यांचे काही शिष्य आणि मित्रगण आले. आईने सर्व तयारी केलेलीच होती. मी खां साहेबांची पाद्यपूजा केली, हार घातला, त्यांना वस्त्रे, फळे, मिठाई आणि दक्षिणा अर्पण केली. तंबोर्‍याचीही पूजा केली. खां साहेबांनी तो सुरात लावला आणि माझ्या हातात तो देत ते म्हणाले, "बेटा सूर लगाओ". मी षड्ज लावला. त्यांनी एक संध्याकाळचा एक राग शिकवायला सुरुवात केली. शिकविण्याआधी रागाचे नांव वगैरे सांगणे हे असे ते कधीच करत नसत. विचारायची हिम्मत कुठली असणार. साधारण अर्धा तास आलापी सांगून हा समारंभ संपला. तो रागही तेवढ्यापुरताच होता. कारण दुसरे दिवशी पहाटेला त्यांनी मला भैरव शिकवायला घेतला. त्या दिवशीची कोमल रिषभ असलेली ती रागिणी म्हणजे 'गौरी' होती हे मला फार नंतर त्यांनी जेंव्हा गौरी शिकवायला काढला तेंव्हा कळले.

दुसर्‍याच दिवशी पहाटे साडेचार वाजता माझे रीतसर शिक्षण सुरू झाले. पहाटे उठण्याची सवय तेंव्हापासून जी लागली ती आजतागायत. प्रातःविधी उरकून फक्त चहा घेऊन शिकायला बसायचे. खां साहेब आधीच उठलेले असत. बरोब्बर साडेचारला बाहेर येऊन बसायचे. मला थोडासा जरी उशिर झाला तरी "क्या कहने बडी अच्छी निंद लगी" बढिया है! बढिया है! चंगा है" असे स्वतःशीच म्हणायचे. काल शिकवलेले मी आधी सुरू करायचे. ते मी कसे गाते इकडे त्यांचे बारिक लक्ष असे. जर मी बरे म्हटले तर पुढचे आपणहून शिकवायचे. पुढचे म्हणजे एखादा पलटा वगैरे. इतकेच. फार नाही. नाहीतर मी आपली कालचेच ते घोकत बसे. बरोबर येईपर्यंत पुढचे काही शिकवत नसत. काल शिकवलेल्या सरगम पाठ व्हायलाच हव्या. त्या जर पाठ नसतील तर तालिम बंद करून ते सरळ उठून जायचे. पाठांतरावर फारच भर असे. अशा वेगाने माझी तालिम सुरू झाली. अर्थात पुढे पुढे चांगला वेग पकडला मी. पण सुरूवात अशीच. माझ्या तालमीच्या वेळेस आई तिथं आजिबात फिरकायची नाही.

सुरवातीची एक हकिकत सांगून हा भाग पुरा करते. एका रागात मध्यमावरून कोमल रिषभावर मिंड घ्यायची होती. मिंड म्हणजे एका सुरावरून दुसर्‍या सुरावर आस न तोडता येणे. अर्थात त्या दोन स्वरांच्या मधले सगळे स्वर आणि श्रूती लागणार. परंतू त्यांचे प्रमाण आणि वेळ हेच त्यात मुख्य असते. खां साहेबांनी ती मिंड अशी घेतली की माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. त्या स्वरांच्या करामतीमुळे मी दिपून गेले, विचलीत झाले. बापरे हे आपल्याला कसं जमणार? असं वाटून मला ते आजिबात जमेना. "यह तो बहुत मुश्किल है" इतकच मी म्हणाले. झालं. त्यांनी माझ्या अस्सं रोखून पाहिलं. त्या त्यांच्या पहाण्यानेच मला समजलं आपली चूक झाली आहे.

"मुश्किल है तो जरूर मगर आसान करते है. उठो. ते ओरडले. मी थरथर कापत उभी राहिले. तंबोरा माझ्या खांद्यावर एकतारीसारखा देऊन म्हणाले अब देखो आसान हो गया. असे म्हणून त्यांच्या खोलीकडे निघून गेले. खांद्यावर तंबोरा, मी अश्रू गाळत उभी, दोन तास झाल्यावर बाहेर येऊन म्हणाले. पटको अब. अब होगा गाना आसां. जबतक ये नही आता तबतक तालिम नही होगी." तंबोर्‍याचे ओझे मला खाली ठेवायला परवानगी देऊन पुन्हा निघून गेले. ते क्वचितच चिडायचे. असे जरी होते तरी ते फार प्रेमळ होते. माझ्या आयुष्यातल्या पित्याच्या प्रेमाची फार मोठी कमतरता त्यांनी भरून काढली. त्यांच्या प्रेमळपणाच्या गोष्टीसुद्धा येतीलच.

गौरीबाई गोवेकर

कलालेख

प्रतिक्रिया

कुठेच कसल्याच बाबतीत स्वतःला थोडीशीही तोशीस लागू न देणारे आम्ही यावर काय बोलणार ?

अगदी कितीही अप्रतिम म्हटले तरी आपल्या साधनेपुढे या शब्दाचे मनात वजनच तयार होत नाहीए.

शास्त्रीय संगीतातल्या गुरु-शिष्य परंपरेवर प्रकाश टाकता आहात, उत्तम.

एक प्रश्न आहे :- वेगळ्या संगीत घराण्यांचे गुरु दुसऱ्या घराण्यातल्या शिष्यांना शिकवतांना थोडे कमी-जास्त, आपपरभाव करतात का ?

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

21 Sep 2019 - 1:56 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

तुम्ही चांगला प्रश्न विचारलात.
जेंव्हा एखादा गायक आपल्यापेक्षा निराळ्या संगीत घराण्याकडे शिकायला जातो तेंव्हा त्याची मूळ घराण्याची बंदिस्त तालिम झालेलीच असते. दुसर्‍या संगीत घराण्यातील काहीच गोष्टी घेण्यासाठी तो जातो. सगळी गायकी नाही. जसे त्या घराण्याच्या खास बंदिशी, चीजा, एखादे वैशिष्ठ्य...

तसे दुसर्‍या घराण्याचे गुरू तेवढ्याच गोष्टी त्याला देतात. कारण तेवढीच गरज असते. आता ते शिकवताना आपपरभाव करतात का? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीगणिक बदलेल. सर्वसामान्यतः हाडाचा कलावंत खुनशी, पाताळयंत्री, राजकारण खेळणारा असा नसतो. मी पाहिलेले मोठे कलावंत मनाचे अत्यंत उदार होते. ( अपवाद आहेत. ते ही तसे वागण्याला परिस्थिती कारणीभूत. तरीही असे वागणे चूकच)

आणखी एक महत्वाची गोष्ट नमुद करावीशी वाटते ती ही की, गुरूंना सुद्धा काही प्रमाणात आपल्या गंडाबंध शिष्यांच्या अधिन रहावे लागते नाईलाजाने. अशा परिस्थितीत अशा शिष्यांच्या तंत्राने वागताना कदाचित या दुसर्‍या घराण्याच्या शिकायला आलेल्या शिष्यावर अन्याय होत असेलही. पण ती काही गुरूंची मूळ प्रवृत्ती नव्हे. अर्धकच्चे शिष्य हे सगळं असं वागून आपल्या गुरूच्या नावाला कलंक फासतात. माझ्या माहितीत शिष्येच्या अशा पाताळयंत्री, राजकारणामुळे तिची तालिम बंद केलेले उदाहरण आहे.

माझ्या बाबतीत मी दुसर्‍या घराण्याची काही तालिम घ्यावी अशी माझ्या गुरूंचीच इच्छा होती. त्या मुळे त्यांनीच तशी तजवीजही केली. मला काही असा त्रास झाला नाही.

अनिंद्य's picture

23 Sep 2019 - 10:46 am | अनिंद्य

याविषयी कुतुहूल होते.
तुम्ही नेमकेपणाने सांगितले, आभार _/\_

राजे १०७'s picture

20 Sep 2019 - 9:01 pm | राजे १०७

छान लिहिलंय. खरा जोहरीच हिऱ्याला पैलू पाडून अनमोल बनवतो तसं गुरुंचे काम असते. कुंभार मडक्याला थापटताना आतून हात लावून मग थापटतो.‌

जालिम लोशन's picture

20 Sep 2019 - 11:50 pm | जालिम लोशन

छान

सुधीर कांदळकर's picture

21 Sep 2019 - 8:10 am | सुधीर कांदळकर

मस्त प्रांजळ अनुभवकथन. गुरुकुल परंपरेचे अनेक पैलू आता दिसतील अशी आशा आहे.

हाही लेखांक आवडला. धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2019 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

पुभाप्र
पैजारबुवा,

श्वेता२४'s picture

21 Sep 2019 - 11:11 am | श्वेता२४

पु.भा.प्र.

उगा काहितरीच's picture

21 Sep 2019 - 5:04 pm | उगा काहितरीच

छान ! पुभाप्र...

बोलघेवडा's picture

22 Sep 2019 - 2:01 pm | बोलघेवडा

वा वा!!! एका अद्भुत विश्वाची सफर घडवून आणत आहात!!!लिहीत राहा!!

नावातकायआहे's picture

23 Sep 2019 - 2:49 pm | नावातकायआहे

पु भा प्र